नारळ

सफरचंद + नारळ वडी

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

सफरचंद - २
नारळाचा चव - १ वाटी
साखर - २ वाट्या
साजुक तुप - १ चमचा

क्रमवार पाककृती: 

सफरचंद किसुन घ्यावे. २ सफरचंदांचा साधारण २ वाट्या किस होतो.
नारळाचा चव, साखर, सफरचंदाचा किस नॉनस्टीक पॅनमधे एकत्र करुन गॅसवर ठेवावे. मंद आचेवर ठेवावे.
Mix1.jpg

हे मिश्रण हलवत रहावे लागते. १० ते १५ मिनीटांनी आपोआपच पॅन स्वच्छ होते आणि मिश्रण एकत्र होउन गोळा तयार होतो. पाक अटुन घट्ट गोळा तयार होतो. असा गोळा तयार होईपर्यंत हलवत रहावे. शेवटी गॅस मोठा केला तरी चालतो.
gola.jpg

ताटाला थोडेसे तुप लावुन गरम असतानाच वड्या थापाव्या.
wadya.jpg

गार झाल्यावर वड्यापाडुन डब्यात भरुन ठेवाव्या स्मित
daba.jpg

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी २ फक्त :)
अधिक टिपा: 

१.सफरचंद पुरेशी गोड असतील तर साखर १ वाटीच घ्यावी.
२.सफरचंद किसताना पाठीकडुन किसावे, म्हणजे साल नीट किसली जाते. उलटे किसलेतर गर किसला जाउन साल हातात निघुन येते. किसलेले साल, छान केशराच्या काड्यांसारखे दिसते.
३.वेळ वाचवण्यासाठी, स्वयपाकाला सुरुवात करताना हे मिश्रण गॅसवर ठेवावे, साधारणपणे स्वयपाक होईपर्यंत मिश्रण आळुन येते आणि वड्या थापायला तयार होतात.

माहितीचा स्रोत: 
या वड्या आईने मला शिकवल्या की मी आईला ते आठवत नाही :). वडी हा प्रकार मात्र आईची देणगी.

अमावास्या , नारळ आणि मनोविकार

0

अमावास्या , नारळ आणि मनोविकार

अमावास्येला नारळ का फोडतात ? यामागचे धार्मिक कारण काय आहे?

तसेच या दिवशी लिंबु आणि मिरची गाडीला, घराला बांधायचीही प्रथा आहे.

अमावास्येला कोणतेही काम सुरु करु नये असे म्हणतात.. ते का? काही लोक ( उदा. दत्तपंथीय शंकर महाराज) अमावास्येला शुभ मानतात आणि नवे काम करावे असेही मानतात. असे का?

अमावास्या ( आणि पौर्णिमा) या दिवशी मानसिक विकार उफाळून येण्याचे प्रमाण जास्त आहे, असेही काही लोक मानतात, ते खरे आहे का?

( सर्व जिवंत आणि मृत व्यक्तीना सर्वपित्री अमावास्येच्या शुभेच्छा.)

दाक्षिणात्य पध्दतीने नारळाची चटणी

लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दोन कप खोवलेला नारळ
एक मध्यम आकाराचा कांदा, चार तुकडे करून
एक टीस्पून लाल तिखट
मीठ

फोडणीसाठी :

शुध्द तूप
कढीपत्ता
मोहरी

क्रमवार पाककृती: 

खोवलेला नारळ व कांदा मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावा. त्यात लाल तिखट व मीठ घालून पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरवावे. आपल्याला चटणी जेवढी दाटसर हवी असेल तितपत किंवा थोडे कमी पाणी घालावे. (नंतर अनेकदा चटणीला पाणी सुटते.)

लहान कढईत तूप गरम करावे. मोहरी घालावी. ती तडतडल्यावर त्यात कढीपत्ता घालून परतावा. गॅस बंद करावा. फोडणी गार झाल्यावर चटणीत घालावी. इडली / डोसा / आप्प्यांबरोबर द्यावी. सँडविच/ पोळी/ भाकरी/ भाताबरोबर ही छान लागते.

(फोटो काढायच्या अगोदरच चटणीचा फन्ना उडाल्यामुळे इथे आता चटणीचा फोटो देता येत नाहीए, क्षमस्व!

पण ती अशी दिसते

फोटो, साभार सुजीथकडून!)

वाढणी/प्रमाण: 
खाल तेवढी!
अधिक टिपा: 

ह्या चटणीत दक्षिणेत घरोघरी थोडेफार फरक आढळतात.

* काहीजण लाल तिखटाऐवजी सुक्या लाल मिरच्या थोड्या तेलात परतून त्या नारळाबरोबर वाटून घेतात.

* काहीजण फोडणीत थोडी उडीद डाळ घालतात, कुरकुरीतपणा येण्यासाठी. तसेच हिंगही घालतात.

* काहीजण नारळाबरोबरच थोडा चिंचेचा कोळही ह्या चटणीत घालतात. त्याने चवीत थोडा आंबटपणा येतो. तोही मस्त लागतो.

* कोथिंबीरही घातली जाते.

माहितीचा स्रोत: 
आपुनका दोस्त/ बडिंग शेफ सुजीथ

फलश्रुती - भाग १ - श्रीफळ

॥ श्री ॥
नारिकेलसमाकाराः दृश्यन्तेऽपि हि सज्जनाः ।
अन्ये च बदरीकाकारा बहिरेव मनोहराः ॥

या मालिकेची सुरवात, श्रीफळापासून करावी, हे ओघाने आलेच. नारळाचा उल्लेख एक फळ म्हणून करावा, हे बहुतांशी किनारपट्टीतील लोकांना रुचणार नाही.

तुम्हीच नाव सुचवा

समुद्रकिनारी फिरायला गेले असताना हे झाड माझ्याकडेही लक्ष द्या म्हणून ओरडत होतं.
ह्याच्यावर निसर्गाचाच कोप झालाय. जे पाणी हे ह्या झाडांसाठी जीवन असत तेच पाणी ह्याचा अंत पाहू लागलय. सागरलाटांनी ह्या झाडांची मुळ आपल्या हद्दीत घ्यायला सुरुवात केलेय.

XX.JPG

XX1.JPG

रवा आणि खोबर्‍याचे लाडू

लागणारा वेळ: 
३ तास
लागणारे जिन्नस: 

चार कप बारिक रवा, दोन कप बारिक वाटलेले ओले खोबरे ( एका मध्यम नारळाचे एवढे होते)
एक कप तूप, तीन कप साखर, मोठी चिमूट केशर (किंवा हवा तो स्वाद ), बेदाणे व काजू
(आवडीप्रमाणे )

क्रमवार पाककृती: 

जाड बुडाच्या भांड्यात थोडे तूप घालून रवा भाजायला घ्या. फ़ार गुलाबी करायचा नाही.
शक्य असेल तर खोबरे वाटताना फ़क्त शुभ्र भाग घ्या (मी आळस केला ) रवा भाजत आला
कि त्यात खोबरे घाला. परतत रहा, रवा परत हाताला हलका लागला पाहिजे ( खोबर्‍याचा
ओलेपणा रहायला नको. ) लागेल तसे तूप घालत रहावे.
दुसर्‍या भांड्यात साखर आणि दिड कप पाणी घालून पाक करत ठेवा. सतत ढवळत रहा.
पाकातच केशर किंवा वापरत असाल तो स्वाद घाला. उकळी येउन फ़ेस आला कि गॅस मंद
करा. पाकातला चमचा वर काढून, थोडासा पाक अंगठा आणि पहिले बोट यांच्यामधे धरुन
बोटे हळूहळू लांब करा. एखादी तार दिसायला लागली कि गॅस बंद करा व अर्ध्या कपापेक्षा
थोडा जास्त पाक काढून ठेवा. मग पाकात रव्याचे मिश्रण घालून ढवळा.
दोन तीन तास झाकण न ठेवता मुरु द्या. मग लाडू वळायला घ्या. मिश्रण कोरडे वाटले तर
काढून ठेवलेला पाक कोमट करुन लागेल तसा मिसळा. (रवा किती जाड आहे, यावर किती
पाक लागेल, ते ठरते ) मिश्रण हाताला शिऱ्यापेक्षा थोडे घट्ट लागेल, इतका पाक घाला. लाडु
वळताना, हवे तसे बेदाणे व काजू वगैरे वापरा. (मी भाजलेला काजू लाडूच्या आत ठेवलाय, त्याने
लाडवाचा ओलावा कमी होतो. )

मला रव्याचे लाडू मऊसर आवडतात. (तसे नसले तर रांगोळीचा लाडू खाल्यासारखा वाटतो मला.)
हा लाडु मऊसर होतो. फ़ारसा टिकणार नाही, पण चवीला मस्त लागतो. (फ़्रीजमधे आठवडाभर
राहील. ) या प्रमाणात ५० ते ६० लाडू होतात. (कपाच्या आणि लाडवाच्या आकारावर अवलंबून )

वाढणी/प्रमाण: 
५० ते ६० लाडू होतील.

कोकोनट केक

लागणारा वेळ: 
२ तास
लागणारे जिन्नस: 

२०० ग्रॅम खोबरे (एक नारळ). ताजा नसेल तर डेसिकेटेडही चालते.
२५० ग्रॅम साखर (मिळाली तर कस्टर्ड, नाहीतर साधी)
१५० ग्रॅम बटर (कॅलरी मोजणा-यांनी ऑऑ वाचावे)
१०० ग्रॅम रवा
५० ग्रॅम मैदा, चिमुटभर मीठ
५ अंडी (अंड्यांच्या जागी दही वापरुनही केक करता येईल. साधारण दिड कप दही लागेल असा अंदाज आहे.)
१.५ टेबलस्पून बेकिंग पावडर
काजु, काळ्या मनुका वगैरे जे सापडेल ते...

क्रमवार पाककृती: 

१. साखरेचा एकतारी पाक करुन घ्यावा. त्यात खोबरे घालावे आणि मंदाग्नीवर पुर्ण सुकेपर्यंत ढवळावे. गॅसवरुन खाली उतरवुन थंड होऊ द्यावे.
२. मैदा, मिठ आणि बेकिंग पावडर दोन-तिनदा चाळून घ्यावी.
३. गरम पाण्यात भांडे ठेवून बटर वितळवावे, मग भांडे बाहेर काढुन वितळलेल्या बटरमध्ये अंडी घालुन चांगले फेटावे.
४. आता वरील मिश्रणात रवा व मैदा हळुवारपणे मिसळा.
५. सर्वात शेवटी खोब-याचे मिश्रण आणि ड्रायफ्रुट्स टाकुन अगदी जपुन अलगदपणे एकजीव मिश्रण करा. तासभर मुरवत बाजुला ठेवा.
६. ओवन १८० डिग्रीला तापवा. चांगला तापला की केकच्या भांड्याला तेलाचा हात लाऊन त्यात वरिल मिश्रण ओतुन साधारण ४५ मिनिटे बेक करा.
७. जर बेकिंग कप असतील तर त्यांना तेलाचा हात लाऊन थोडेथोडे मिश्रण घातले तरी मस्त मावाकेकसारखे केक तयार होतात.

वाढणी/प्रमाण: 
२-३ जण एकावेळी संपवु शकतात. ते तुमच्यावर आहे :)
अधिक टिपा: 

१. अंडी फोडल्यावर त्यातले पिवळे वेगळे काढुन फक्त पांढरेच फेटावे. त्यामुळे एकतर अगदी मस्त फेटले जाते, शिवाय डोक्यात कॅलरींचे आकडे नाचत असतील तर तेही थोडे कमी होतात स्मित

२. अंडी किती फेटताय त्यावर केकचा स्पॉंजीनेस अवलंबुन आहे.
माझ्याकडे अंडे फेटण्यासाठी फक्त माझे हात आणि साधा एग बिटर असल्यामुळे मी असंभवच्या सुरवातीला अंडी फेटायला सुरवात केली ते थेट अग्निहोत्र संपेपर्यंत फेटत होते. स्मित

३. मिश्रण करताना अगदी हळूबाईपणा करणे आवश्यक आहे. त्यामुळे अंड्यातील हवा टिकुन राहते आणि केक हलका होतो. ढवळण्यासाठी नॉनस्टिकच्या भांड्याबरोबर जो लाकडाचा कलथा मिळतो तो वापरावा.

माहितीचा स्रोत: 
ब-याच वर्षांपुर्वी कुठेतरी वाचलेली.