तुष्की

माझ्या त्या सा-या कविता

Submitted by तुषार जोशी on 3 April, 2013 - 20:20

जग रुसले तेव्हा आल्या माझ्या त्या सा-या कविता
दु:खाचे औषध झाल्या माझ्या त्या सा-या कविता

माझ्या त्या सा-या कविता

जग रुसले तेव्हा आल्या माझ्या त्या सा-या कविता
दु:खाचे औषध झाल्या माझ्या त्या सा-या कविता

मी किती लपविले सांगू संदर्भ तुझ्या प्रीतीचे
बडबडल्या सगळे साल्या माझ्या त्या सा-या कविता

कोणाचे कुणीच नसते वाटले मनाला जेव्हा
आम्ही आहोत म्हणाल्या माझ्या त्या सा-या कविता

आयुष्याच्या रूंदीची चर्चा चालवली त्यांनी
पाठवल्या मीटरवाल्या माझ्या त्या सा-या कविता

ऐक ना

Submitted by तुषार जोशी on 3 April, 2013 - 20:08

तुला हृदयात दिली जागा भली मोठी
तुला ओवाळती माझ्या नयनांच्या ज्योती
तुझ्यासाठी आले किती चांदण्या माळून
वाटेमधे राजा जाऊ नकोस सोडून
ऐक ना ऐक ना ऐक ना रे माझे
ऐक ना ऐक ना ऐका ना रे माझे

तूच म्हणाला होतास जमेल जमेल
सारे सुरळीत व्हाया मार्ग सापडेल
धीर देत होतास मी आहेना म्हणून
वाटेमधे राजा जाऊ नकोस सोडून
ऐक ना ऐक ना ऐक ना रे माझे
ऐक ना ऐक ना ऐका ना रे माझे

माझ्यासारखी प्रेयसी मिळणार नाही
थांब नाते तोडण्याची नको करू घाई
मार्ग काढू आयुष्याचा दोघेही मिळून
वाटेमधे राजा जाऊ नकोस सोडून
ऐक ना ऐक ना ऐक ना रे माझे
ऐक ना ऐक ना ऐका ना रे माझे

तुझ्या प्रगतीत साथ होईन प्रेमाने

जन्मठेप

Submitted by तुषार जोशी on 3 April, 2013 - 20:05

आसुसल्या वचनांची
कोमेजल्या स्वप्नांची
जन्मठेप
जन्मठेप
जन्मठेप माझी

आशा लावी किरण कधी आशा लावी वारे
पंख नाही पाय लुळे आणिक बंद दारे
ठेऊ कुठे देऊ कुणा जगण्याची ओझी
धुमस धुमस श्वासांची
गहिवरल्या भासांची
जन्मठेप
जन्मठेप
जन्मठेप माझी

क्षितिज रोज खुणावते उंचंबळे फार
तुळशीला पाणी माझ्या कोण घालणार
क्षितिजाला भेटू कशी तुळस नवसाची
आहे तसे जगण्याची
दूरून क्षितिज बघण्याची
जन्मठेप
जन्मठेप
जन्मठेप माझी

~ तुष्की

दुःखाची योजना

Submitted by तुषार जोशी on 19 December, 2012 - 14:00

खरे लोकं हरत नसतात
मग मी का हरले? असे वाटते का?
बाप्पा सगळे वरून बघतात
मी का फसले? मनास जाचते का?

आपल्या आयुष्यात दुःख असतात
विश्वासघात असतात काही
ते सगळे आपल्यापर्यंत पाठवायला
बाप्पाला लागतात भारवाही
मग आपल्याच आसपासची माणसे
त्याचे माध्यम बनतात
ते वाईट नसतात दुष्ट नसतात
ते तर माध्यम असतात
तावून सुलाखून प्रगल्भ कणखर
त्या वेदना करतात कळले का?

आपण बघतो फक्त वेदना आणि
म्हणतो मलाच त्या कशाला
आपलं नशीबच वाईट समजतो
आणि जाळत बसतो स्वतःला
स्वतःला समजावले पाहिजे
आयुष्य अजून संपलेले नाही
बाप्पाने याहूनही उदात्त असे
आपल्यासाठी ठेवलेय काही
सुख समजण्यासाठी कदाचित

शब्दखुणा: 

याच दिवशी

Submitted by तुषार जोशी on 19 December, 2012 - 13:58

याच दिवशी तुझ्या हातात हात दिला
एक कायमची जागाच दिली हृदयात
याच दिवशी सुख दुःख एक झाले
आयुष्याची झाली एक नवी सुरवात

याच दिवशी आयुष्याचा सजला निर्णय
हाच दिवस विश्वासाचा सण ठरला
रुसवे फुगवे आले आणिक निघून गेले
तुझ्या माझ्या सोबतीचा दरवळ उरला

आज चंद्र तुझ्या माझ्या साठी उगवेल
आज वारा गात सुटेल आपलीच गाणी
आज आठवू आपण दिले घेतलेले सारे
डोळ्यांमध्ये असेल आनंदाचे पाणी

~ तुष्की
नागपूर, १५ डिसेंबर २०१२, १२:११

शब्दखुणा: 

तुझ्या सुखाचं कारण ठरावंसं वाटतं

Submitted by तुषार जोशी on 11 December, 2012 - 10:31

पुन्हा तुझ्या प्रेमात पडावंसं वाटतं

मुलींच्या शाळा अभ्यास
यात मन लावून राबतेस
अजून पुढे शीकण्यासाठी
अभ्यास करत रात्री जागतेस
तेव्हा तुझं कौतुक वाटून
मनभरून बघावंसं वाटतं
पुन्हा तुझ्या प्रेमात पडावंसं वाटतं

मिळेल तेवढाच माझा वेळ
समाधानाने समजून घेतेस
जगणे सफल होण्यासाठी
सोबतीचे बळ देतेस
कितीही केलं तरी तुझ्यासाठी
अजून काही करावसं वाटतं
पुन्हा तुझ्या प्रेमात पडावंसं वाटतं

~ तुष्की
०८ आक्टोबर २०१२, १०:००
वर्नान हिल्स, शिकागो

शब्दखुणा: 

इतकंच.!..

Submitted by तुषार जोशी on 11 December, 2012 - 09:56

काही नाही.. आठवण आली इतकंच.!..
काळजातली शिवण निघाली इतकंच.!..

डोळ्यांमध्ये कचरा गेला सांगितले ना
तिच्या सहीची वही मिळाली इतकंच.!..

तुझ्या विना हे जगणे आता शक्यच नाही
जातांना ती मला म्हणाली इतकंच.!..

आठवणींना माझी कधीच हरकत नव्हती
गालावरती येते लाली इतकंच.!..

वाट पाहणे जीव जाळणे संपत नाही
पाहता पाहता वर्षे गेली इतकंच.!..

~ तुष्की
नागपूर, ११ डिसेंबर २०१२, ०१:१५

शब्दखुणा: 

चंद्रशेखर गोखले

Submitted by तुषार जोशी on 27 March, 2012 - 01:02

भावना पेरीत आले चंद्रशेखर गोखले
बाप चारोळीस झाले चंद्रशेखर गोखले

तरुण होता पांगलेला काव्यसुमनां पासुनी
ऐक 'मी माझा' म्हणाले चंद्रशेखर गोखले

रूढ होत्या ज्या प्रथा लोकांमधे मिरवायच्या
पार मोडोनी निघाले चंद्रशेखर गोखले

खूप झाल्या चार ओळींच्या कवितांच्या सरी
इंद्रधनुचे रंग ल्याले चंद्रशेखर गोखले

वाचुनी 'तुष्की' सुखाचा बहर येतो अंगणी
धन्य वाचाया मिळाले चंद्रशेखर गोखले

~ 'तुष्की'

+९१ ९८२२२ २०३६५
२६ मार्च २०१२, २३:३०

गुलमोहर: 

कितीक प्रश्न...

Submitted by तुषार जोशी on 25 March, 2012 - 00:09

तिला विचारण्यास मन सदैव भीत राहीले
कितीक प्रश्न का असे अनुत्तरीत राहिले?

पुन्हा पुन्हा वळून काल काय पाहिले तिने,
खुळ्या मनास काय जाण? ते खुशीत राहिले

कसे कळायचे तिला तिच्याविना नको जिणे
अबोल चित्त नित्य याच काळजीत राहिले

तिने दिला गुलाब लाल कोणत्या तरी दिनी
सुगंध कोवळे अजून ओंजळीत राहिले

कधीच 'तुष्कि' तू तिला विचारले, न जाणले
तिच्या मनातले गुपीत ठेवणीत राहीले

~ 'तुष्की'

+९१ ९८२२२ २०३६५
२५ मार्च २०१२, ०१:००

गुलमोहर: 

एकटेपणा

Submitted by तुषार जोशी on 23 March, 2012 - 16:38

रोज जाचतो एकटेपणा
वेड लावतो एकटेपणा

रात्र वाटते राक्षसी जशी
तीव्र घोरतो एकटेपणा

एकटे कधी सोडतो न तो
माग काढतो एकटेपणा

सोबतीस ना जागले कुणी
मित्र एकतो एकटेपणा

भेटण्यास तू येत जा जरा
मस्त संपतो एकटेपणा

'तुष्कि' पोचता काळजात तू
दूर राहतो एकटेपणा

~ 'तुष्की'

+९१ ९८२२२ २०३६५
२४ मार्च २०१२, ०१:४०

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - तुष्की