ती यायची नेमाने, सकाळी-सकाळी
कोण कुठली, कुठून यायची
किती पायपीट करून
थांगपत्ता नाही
यायची वाडा झाडायला
बदल्यात शिळंपाकंवरचा हक्क बजावयाला
लहान मुलांनाही सौंदर्यबोध असतो
गोरंपान रुपडं वर ठसठशीत कुंकू
सुरकतलेला देह नव्वारीत बांधून
मोठं अप्रूप वाटायचं
नशीब थट्टेखोर म्हणतात ते काही खोटं नाही
जिन्याखाली असायचा तिचा ऐवज
एक खराटा, थाळी, आणि पेला
कुणी तिला शिवायचं नाही
अन्न-पाणी वरून घालायचं
का ते कुणाच्याही बापाला ठाऊक नाही
कधी-कधी चार-आठाण्यांसाठी करायची घिसघिस
वाटायचं उरलंसुरलं का होईना
रोज खाऊन तर जायची इथून
मग कुणासाठी हा आतड्याचा पीळ
गाठ माझ्या पदराची तुझ्या उपरण्याला पडली
सप्तपदी चालताना तुझ्यासवे नजर माझी झुकली
लग्नमंडपी शोभा होती परी मनी माझ्या भीती
अनोळखी या नात्याला कशी मी समजू प्रीती
गाली होता विडा परी नयनी माझ्या अश्रू
अंतरपाट मधे स्थिर आणिक समोर उभा तू
हाती पुष्पमाला अन कानी घुमती अष्टके
जन्माचा जोडीदार कसा तू हे पडले मोठे कोडे
पाठवणीची घडी ती मज कठीण बडी जाहली.
माया आई-बाबांची डोळ्यातून वाहली
श्वास माझा अस्थिर होता अन ऊर भरूनी आला
मज न्याहाळूनी हात तू माझ्या हातावरी ठेवला
तुला जपेन असेच निरंतर हे स्पर्शातूनी बोललास
पाणावल्या डोळ्यात तू माझ्या प्रथम सामावलास
नाव तुझे घेऊन सासरचा उंबरठा ओलांडला