घाटावरचा नावाडी
होता नाव वल्हवित
नेक धंदा पिढीजात
आपला प्रेमे करीत
डोळ्यामध्ये पण त्याच्या
उद्याचे काहूर होते
गाव आणि घाट त्याचे
बुडून जाणार होते
बाप आजा पणजोबा
या घाटावर जगले
मी भाऊ अन ताईनी
इथेच जग जाणले
दुजे काम करू काही
पोटाची या चिंता नाही
माईची पण साथ ही
आता मिळणार नाही
उदास स्वरात त्याच्या
विरहाची आग होती
नाळ तुटल्या इवल्या
अर्भकाची हाक होती
नर्मदा मैया
अजूनही तुझे अष्टक
माझ्या ओठातून
नीट नाही फुटत
अजूनही तुझ्याकडे
येणे नाही घडत
कोसतोय मी स्वत:ला
का न मी तुझा होत
इतकी वर्ष आयुष्याची
उगाच आहे भटकत
आता चालव मला
तुझ्या किनाऱ्याने
प्रेमाच्या चाकोरीत
जीवनाच्या अंतापर्यंत
अमरकंटक ओंकारेश्वर
मिठीतलाई नेमावर
पुन्हा पुन्हा परिक्रमेत
जन्म जगणे अवघे जावे
तुझ्याशी एकरूप होत
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
रेवा तीरावर l संपावे जीवन
पापाचे क्षालन l व्हावे सार्या ll १ ll
नर्मदा हरच्या l घोषात चालून
दयावी उडवून l भवचिंता ll २ ll
तप:पूत मन l तप:पूत तन
अवघे होवून l जावे तेथे ll ३ ll
माईच्या प्रेमाने l भिजुनिया चिंब
पात्रातील थेंब l तिच्या व्हावे ll ४ ll
सोडुनिया भिती l काळजी उद्याची
जगावी रोजची l सुख दु:ख ll ५ ll
तीरावर उभे l संतांचे आशीष
तयाने जीवास l मार्ग लाभ ll ६ ll
कितीदा ऐकली l माईची ती माया
जीव तिच्या पाया l जडलासे ll ७ ll
साद घालतसे l युगे युगे वाहे
चल लवलाहे l आता तिथे ll ८ ll
जावे परीक्रमे l तिये दर्शनासी
उतावळी ऐसी l होय मना ll ९ ll
विक्रांत प्रभाकर