रयुजी(इंग्रजी आवृत्तीत नोहा) आपले काम करतोय आणि अचानक टीवी ऑन होतो. एका आठवड्यापूर्वी पाहिलेली व्हीडीओ टेप लागलेली असते. एक विहीर दिसतेय. सादाको(समारा) विहिरीतून सरपटत बाहेर येते. रयुजी गोंधळतो, टीव्ही बंद करण्याचा प्रयत्न करतो पण टेप चालूच राहते. ती तसेच पुढे येत येत टीव्हीतून बाहेर पडते. ऑलरेडी टरकलेला रयुजी(नोहा) तिच्याकडे आ वासून बघत राहतो, पळण्याचा एक असफल यत्नही करतो. मग स्क्रीनवर दिसतो तिचा फेमस मृत्युकटाक्ष. त्याचे अंग विचित्र तर्हेने आखडायला लागते. चेहरा वेडावाकडा होतो व असह्य वेदनांनी तो जमिनीवर कोसळतो.
मी प्रामुख्याने इंग्रजी चित्रपटांचा चाहता आहे. अगदी सगळ्या प्रकारचे चित्रपट बघतो. त्यांच्याकडे असलेलं विषयांच वैविध्य मला खूप आकर्षित करतं. नेहमीचे हाणामारी आणि विनोदपट तर बघतोच, पण शक्यतो थोडे वेगळे सिनेमे बघायला आवडतं. शिवाय यासारखे सिनेमे आपल्याकडे चित्रपटगृहात प्रदर्शित होत नसल्याने बघायला मिळत नाहीत, पण ते कुठल्यातरी वाहिनीवर किंवा डी.व्ही.डी.वर सहज बघायला मिळतात. अशाच काही मला आवडलेल्या चित्रपटांविषयी लिहीण्याचा मानस आहे. सुरुवात २००८ साली आलेल्या पॅथोलोजी या सिनेमापासून करतोय. हे चित्रपटांचे परिक्षण मात्र नाही हे शीर्षक वाचून आपल्या लक्षात आलं असेलच.