वर्तुळ, चक्राकार, आवर्त

Submitted by पायस on 29 December, 2014 - 19:22

रयुजी(इंग्रजी आवृत्तीत नोहा) आपले काम करतोय आणि अचानक टीवी ऑन होतो. एका आठवड्यापूर्वी पाहिलेली व्हीडीओ टेप लागलेली असते. एक विहीर दिसतेय. सादाको(समारा) विहिरीतून सरपटत बाहेर येते. रयुजी गोंधळतो, टीव्ही बंद करण्याचा प्रयत्न करतो पण टेप चालूच राहते. ती तसेच पुढे येत येत टीव्हीतून बाहेर पडते. ऑलरेडी टरकलेला रयुजी(नोहा) तिच्याकडे आ वासून बघत राहतो, पळण्याचा एक असफल यत्नही करतो. मग स्क्रीनवर दिसतो तिचा फेमस मृत्युकटाक्ष. त्याचे अंग विचित्र तर्‍हेने आखडायला लागते. चेहरा वेडावाकडा होतो व असह्य वेदनांनी तो जमिनीवर कोसळतो. अजून काही क्षण तडफडल्यानंतर एखाद्या पाण्याबाहेर काढलेल्या माशाप्रमाणेच आचके देत त्याचा श्वास थांबतो.
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~

रिंग हा जपानी भयपट १९९८ साली येऊन थडकला आणि भूतपटांची व्याख्याच बदलली. वर वर्णन केलेला सीन हा त्याचा आयकॉनिक सीन! याचा नंतर हॉलिवूडने रिमेक केला व तोही तूफान चालला. संथ गतीने पुढे सरकणारी पटकथा, किळसवाण्या दृश्यांपेक्षा सशक्त कथेला अनुसरुन भीति निर्माण करणारी दृश्ये ही त्याची काही वैशिष्ट्ये. यापूर्वी हे हॉरर मध्ये नव्हते अशातला भाग नाही पण इतर कुठल्याच चित्रपटाचा हॉरर जॉनर वर एवढा परिणाम झाल्याचे माझ्या ऐकिवात नाही. पण रिंग हा केवळ एक चित्रपट नसून त्यापेक्षाही बरेच काही आहे. जसे पुराणकथांच्या वेगवेगळ्या कीर्तनकारांप्रमाणे वेगवेगळ्या आवृत्त्या असतात - उदा. चंद्राला कला का असतात? यासाठी मी आजपर्यंत दक्ष, पार्वती, ब्रह्मा अशा तीन शापकारांच्या ३ कथा ऐकल्या आहेत - तसेच रिंग ही मूळ कलाकृतीची एक व्हर्जन आहे. अशा अनेक व्हर्जन्स आहेत.

रिंग ही कोजी सुझुकी लिखित कादंबरी आहे जिच्यावर हा चित्रपट बेतला आहे. कादंबरीचे अजून दोन पार्टस/सिक्वेल आहेत, रासेन व रुपु. रिंग हा जरी भूतपट या कॅटेगरीत मोडत असला तरी मूळ कादंबरी ही साय-फाय/मेडिकल थ्रिलर या प्रकारात मोडते. हे ऐकल्यावर माझे डोके गरगरायला लागले होते. रिंगच्या अनेक व्हर्जन्स आहेत हे माहिती होतेच मग मूळ कादंबरी त्रिकूट आधी वाचून काढले व मग चित्रपटाला नव्याने बघण्याचा प्रपंच केला. यावेळेस कादंबरीच्या दुसर्‍या पार्टवरचा रासेन हा विस्मरणात गेलेला सिक्वेल देखील पाहिला.

आधी थोडेसे कथेविषयी. चित्रपटानुसार एक शापित व्हीडीओ कॅसेटची दंतकथा जपान(अमेरिका) मध्ये धूमाकूळ घालत असते. जो कोणी ती पाहिल त्याला एक फोन येतो आणि बरोब्बर एका आठवड्याने तो/ती मरतो/ते. एक रिपोर्टर याची स्टोरी बनवू बघते आणि ती टेप पाहते. टेप मध्ये बरीचशी असंबद्ध दृश्ये असतात व शेवटी एक मुलगी एका विहिरीतून बाहेर पडताना दिसते आणि तिच्या घरचा फोन वाजतो. शाप खरा निघतो आणि तिला टेन्शन येते. त्यात तिचा मुलगा पण टेप पाहतो आणि भूत त्याला पछाडतं. मग ती तिच्या नवर्‍याची(घटस्फोटित, इंग्रजी आवृत्तीत एक्स बॉफ्रे) मदत घेते. मग पुढे काय होते हे चित्रपटात पाहणे इष्ट.
कादंबरीत आणि चित्रपटात काही आमूलाग्र फरक आहेत. पुस्तकाचा हीरो चित्रपटाप्रमाणे हिरवीण नसून तो नवरा/मित्र म्हणजे रयुजी आहे, रादर पुस्तकात हिरवीण नाहीच रयुजीचा एक पत्रकार मित्र टेप बघतो आणि रयुजीची मदत घेतो. त्यामुळे आदर्श मातेने मुलाला भूतापासून वाचवणे हा मेलोड्रामा नंतर घुसडलेला.
व मुळात पुस्तकाप्रमाणे भूत वगैरे काही नसतंच. ती भूतणी मरण्यापूर्वी एक अलौकिक मानसिक शक्तींनी युक्त मुलगी (टेक्नोपॅथ) असते व मरताना तिला कांजिण्या झालेल्या असतात. तो चिकनपॉक्स व्हायरस तिच्या मानसिक शक्तींमुळे म्युटेट होतो व तो हे सर्व हॅल्युसिनेशन्स घडवून आणत असतो व मृत्युदेखील त्याच्यामुळे होत असतात. पुढच्या पार्टस मध्ये त्याचे आवर्ती रूप अजून स्पष्ट होते आणि संपूर्ण जग त्याच्यामुळे आजारते, पछाडले जाते. थोडक्यात कादंबरी एक मेडिकल थ्रिलर आहे जी काही प्रमाणात सुपरनॅचरल गोष्टींचा वापर करते.

मी म्हटलं वा! मग ओरिजिनल कथा जर चित्रपटापेक्षा अधिक सुसंगत आहे तर मग त्या कथेला धरुन केलेली आवृत्ती अधिक चांगली पाहिजे! म्हणून मी रिंग कान्झेनबान (भाषांतर : रिंग समग्र, हे रिंगचे सर्वात पहिले रुपांतर) व रिंग व्हायरस(कोरियन) पाहिले. रासेन (म्हणजे स्पाईरल, चक्राकार) देखील पाहिला. आणि मी निराश झालो. कादंबरीचा मूळ थॉट थ्रिलरचा असताना केवळ व्हीडीओ टेपच्या दृष्याची आणि व्हायरस जे भ्रमजाल उभे करतो (तो फेमस शॉट) ची भुरळ पडल्याने दोन्ही आवृत्त्या हॉररच्या वाटेने जातात. रासेनमात्र ठीक होता. तरी माहितीनुसार तो पडला. शेवटी मूळ हिट रिंगचा दिग्दर्शक हिडिओ नकाता चे मत ऐकले आणि पटले.

नकाता हॉरर क्षेत्रात आता दादा मानला जातो. नकाता म्हणतो कि कादंबरी उत्तम असली तरी क्लिष्ट आहे. सर्वसामान्य प्रेक्षकाला त्यातील मेडिकल गाभा झेपलाच नसता. मी जेव्हा पहिल्यांदा कादंबरी वाचली तेव्हा मला व्हीडीओटेपवर काय दिसते हे कसे चित्रित करता येईल हे लगेच क्लिक झाले. सादाको बाहेर येण्याचा सीनही कळला पण व्हायरसला कसे सोपे करायचे? मग मी विचार केला कि कथेचा थॉटच बदलला तर? लोकांना तशीही व्हिलन म्हणून सादाको पटणे सोपे आहे. आणि मग रिंगचा भूतपट म्हणून नव्याने जन्म झाला. नंतर नकाता आणि सुझुकी यांनी भूतपटाच्या अँगलने कथेची नव्याने मांडणी केली आणि रिंग चे चक्र सुरु झाले.

मग नकाताने असे नवीन अजून काय केले? मूळ कथानक अतिशय वेगवान आहे. सतत काही ना काही घडत राहते. पण चित्रपटात ज्याला जम्प स्केअर म्हणतात असा एकच सीन आहे सादाको टीव्हीतून बाहेर येण्याचा. नकाताने त्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी इतर सर्व किरकोळ भीतिदायक प्रसंग हटवून त्याऐवजी अस्वस्थ करणार्‍या प्रसंगाची पेरणी केली. असे प्रसंग जे तुम्हाला उशी/चादरीमागे लपायला भाग नाही पाडणार पण तुम्हाला चुळबुळ करायला लावतील. तसेच अस्वस्थता अजून वाढविण्यासाठी चित्रपटाचा पेस एकदम स्लो केला. हळुहळु तुमची चुळबुळ वाढत जाते आणि सादाको बाहेर येताच अनेक किंकाळ्या, 'ओह शिट' चे आवाज चित्रपट ऐकतो. हिरोईनच्या घरातले थंडावलेले वातावरण, सुरुवातीचा दोन मुलींचा टेपमुळे मरण्याचा प्रसंग ज्यात त्या मरण्याचा बरोब्बर आधी कट दिला जातो, रयुजीला भूताने दिलेले ओझरते दर्शन, टेपमधील विचित्र दृश्यमालिका काय काय आणि किती सांगू? केवळ अस्वस्थ करुन घाबरवता येते यावर चित्रपट समीक्षकांचा तोवर विश्वास नव्हता. जवळपास सर्वच दृश्ये आपल्याला जाणीव करुन देत राहतात कि काहीतरी बिनसलेय, काहीतरी घडतंय पण शेवटपर्यंत थांगपत्ता लागू देत नाही कि काय आणि मग आपल्या अंगावर टीव्हीतून बाहेर येणारे भूत सोडले जाते. कल्पना करा कि तुम्ही डोळ्यावर चादर घेऊन भूताचा सिनेमा बघताय आणि कधीही भूत येण्याची अपेक्षा आहे. थोड्यावेळाने मित्र म्हणतो कि काढ आता चादर भूत येऊन गेलं आणि चादर काढताच भूत परत येते! अगदी तशी अवस्था नकाताला अपेक्षित होती आणि त्यात तो यशस्वी झाला.

हे सर्व अनेक दिग्दर्शकांनी कॉपी करण्याचा प्रयत्न केला. फूंक मध्ये रामू या टेकनिकची अत्यंत भ्रष्ट नक्कल करु पाहतो. पण नकाता कडे अत्यंत सशक्त कथा/पटकथा होती. फूंक मध्ये ओपनिंग शॉट फुंकर मारल्यानंतर उरणारा कथेचा धूर होता. इथे जाता जाता आवर्जून नमूद करावेसे वाटते कि रिंग इ. चित्रपटांनंतर स्लो पेस्ड हॉरर चा ट्रेंड आला. पण पहिला स्लो पेस्ड हॉरर (माझ्या मते) हा त्याच्या १८ वर्षांपूर्वी आला - कुब्रिकचा द शायनिंग. (स्टॅनले कुब्रिक तुस्सी ग्रेट हो)

मूळ कादंबरी जबरदस्त आहे, नो डाऊट. पण नकाताची पटकथा तिला विसरायला लावते. माझ्यामते यातच दिग्दर्शकाचे यश लपले आहे.

टीप : शीर्षक ३ कादंबर्‍यांच्या नावांचे स्वैर भाषांतर आहे. Ring, Rasen(Spiral) and Rupu (Loop)

रिकमेंडेशन : जर पाहणार असाल तर नकाताचा ओरिजिनल पाहा. इंग्रजी आवृत्ती वाईट नाहिए पण त्यात मूळ कादंबरीचा आत्मा पार हरवला आहे. सर्व गोष्टींना स्पष्टीकरण देण्याचा अट्टाहास नडला आहे, काही गोष्टी मुद्दाम ओपन एंडेड होत्या अस्वस्थता वाढविण्यासाठी, तो फीलच हॉलिवूड घालवून टाकते. निव्वळ घाबरुन घेण्यात रस असेल तर मात्र इंग्रजी आवृत्ती चांगल्या मार्कांनी पास. कादंबरीवाली स्टोरी एक्सप्लोर करायची असेल तर आधी रिंग व्हायरस(कोरियन) पाहा पहिला पार्ट समजून घेण्यासाठी. इतर आवृत्त्या फारच सवंग आहेत. मग रासेन पाहा. जर नकाताने त्याचा मास्टरपीस बनवला नसता तर रासेन नक्कीच नावाजला गेला असता पण ते होणे नव्हते. रुपु वर अजून सिनेमा बनवला गेला नाही. नकाताच्या स्टोरीलाईनला धरुन काही सिक्वेल्स आहेत पण त्यांना ओरिजिनलची सर नाही.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहीलंय. इंग्रजी ring 1 आणि 2 पाहिलेत. जॅपनीज ringu नंतर पाहीला. तो जास्त डेंजर वाटला. तुम्ही बहुधा तोच रेफर करत आहात.

रमड + १
छान लिहीलय.. . इंग्रजी रिंग व्हर्जन पाहिलेत. जबरी आहेत. मूळ कादंबरीचा अनुवाद आहे का शोधायला पाहिजे..

प्रतिक्रिया आवडल्या सर्वांना धन्यवाद Happy
rmd - हो. स्पेलिंग ringu असले तरी त्याचा उच्चार रिंग होतो (अजब जापानी लॉजिक!!)
ज्यांना शक्य आहे त्यांनी कादंबरी सुद्धा अवश्य मिळवून वाचा, इंग्रजी अनुवाद मिळतो. रॉबिन कूकसारखी शैली आहे सुजूकीची.