आज येथे पेपर क्विलिंग पाहून मी केलेले पेपर क्विलिंग आठवले. मी ‘झुबे’ या नावाची कविता पोस्ट केली होती. आता पेपर क्विलिंग ‘झुबे’ देत आहे. सर्वांना नक्की आवडतील.
१.
माझे झुबे…
तुझ्या एका टिचकिने
खुळ्कन हसायचे
अंगभर शहारायचे
लक् लक् गिरकी,
ती तर कधी थांबुच नये वाटायची......
आठवतं?
त्या दिवशीही
न चुकता उशिरा आलास
माझ्या अपेक्षित देहबोलीच्या बाजूला,
‘सॉरी’चा आव आणत उभा राहिलास...
‘आता हिला कसं समजावू? चे
सगळे हवेतले हिशोब मला
दुसरीकडे शुन्यात (?)
नजर लावुनही जाणवत होते
ओठातली शांतता डोळ्यांतुन ओघळणार इतक्यात..
तू टिचकी मारलीस…
अन् कानांशी ‘छुळ्ळुक'सा झुब्यांचा आवाज झाला...