ताम्हिणी घाट, पावसाळी माहोल
Submitted by पुरंदरे शशांक on 15 September, 2019 - 10:42
ताम्हिणी घाट, पावसाळी माहोल
तलम तलमसे जलद उतरती मधेच धरणीवर
हिरवे कुंतल माळून बसले मोत्यांची झालर
भर माध्यान्ही रवि किरणही येती ना भुईवर
मेघ अडविती वाट तयांची विरविरती चादर
झरे वाहती अगणित नाजूक खळखळती सुस्वर
विराट रुपे घेऊनी काही कोसळती भूवर
ओलावा हा भरुन राहिला इथवरुनी तिथवर
एक चिमुकला पंख वाळवी ऊडून वरचेवर
पागोळ्या ओंजळीत वेची पोर कुणी अवखळ
रानफुले डोलती घुमूनीया तरुतळी त्या निश्चळ
...........................................................
जलद..... ढग
कुंतल.... केस
विरविरती.....विरलेली