अनबालगन आणि विजयालक्ष्मी - माझ्यासाठी अनबा आणि विजी. माझे चेन्नै बडीज. सदा आनंदी राहणारे जोडपे. दोघेही माझे जिवलग मित्र. विजीच्या हातचे तमिळ पद्धतीचे चविष्ट जेवण जेवणे हा माझा चेन्नैतला नियमित कार्यक्रम. घरी चार-चार मदतनीस असूनही स्वतः पदर खोचून माझ्यासाठी स्वयंपाक करणारी विजी आणि प्रचंड आग्रह करकरून वाढणारा अनबा हे दृश्य नेहमीचेच. दोघांच्या आग्रह करून वाढण्याच्या सवयीला मी हसतो, नावे ठेवतो. दोघे काही बोलत नाहीत, सवय बदलत नाहीत. एकदा खोदून विचारले, इतका आग्रह का?
सुगरणींची (सुगरणांची ) आणि एकूणच पाककौशल्याची दोन टोकं असतात. एका टोकावर स्वयंपाक ही एक कला आहे असे मानणारे लोक असतात आणि दुसऱ्या टोकावर स्वयंपाक हे एक शास्त्र आहे असे मानणारे लोक असतात. या दोन टोकांच्या मध्ये झोके घेणारे माझ्यासारखे बरेच असतात. स्वयंपाक ही एक कला आहे मानणारे लोक मला लहानपणीच खूप भेटले. पण ते सगळे अगदी निरागस होते.
"वैनी, भाजी कशी केली?" या प्रश्नाला फक्त हाताचा आधार घेऊन उत्तर देणाऱ्या बायका मी बघितल्या आहेत.
"एवढं एवढं आलं" (स्वतःच्या तर्जनीची दोन पेरं दाखवत)
"एवढ्या एवढ्या लसणीच्या कुड्या" (त्याच हाताच्या बोटांचा चिऊच्या चोचीसारखा चंबू करत)