एक उनाड दिवस तू कधी तरी जगशील
पुन्हा पुन्हा मिटल्या डोळ्यांनी
फक्त मलाच बघशील
स्वत:शीच हसशील
गुपचूप लाजशील
पुन्हा पुन्हा मोबाईल काढून
जुना मेसेज वाचशील
रुळणाऱ्या चुकार बटेचा
गालाला होणारा हळूवार स्पर्श
खट्याळ वारा सारखा देत राहील
आणि तुला वाटेल -
माझी नजर थांबली आहे तुझ्या चेहऱ्यावर
- असं मला नेहमी वाटायचं
असं मला नेहमी दिसायचं
पण आत्ताच कळलं की,
नाही. तू कधीच बांधली गेली आहेस
तुझ्या आवडीच्या बंधनात
त्याची पोच म्हणून ही 'गोड' बातमी!
हरकत नाही!
मी तरी कुठे तुझ्याशिवाय झुरतोय?
मी तर जुन्या आठवणींवर मनापासून हसतोय !
पण एकच काळजी वाटते
सारेच जीव गुंतलेले
या जगण्यात वेड्या
स्वप्नांना पंख लागलेले
पायी वास्तवाच्या बेड्या
करा लुटुपुटूचे वार
एकमेकांवर
हा त्याच्यावर
तो तुझ्यावर
तू ह्याच्यावर
कुणालाच नको कळायला
कोणी केले कुणाला कव्हर
एकदा बुडलेली टायटॆनिक
परत आली का कधी तरी वर?
*
संध्याकाळी भेटूया
एकमेकाला म्हणूया
हा तुला म्हणेल
तो त्याला म्हणेल
तू ह्याला म्हण
"अभिनंदन"
"कसे घुमवले मूर्तीना, सर!
एकदा बुडलेली टायटॆनिक
परत आली का कधी तरी वर?"
*
जनतेला बनवू मूर्ख
सोन्याला पितळेचा वर्ख
कसे करील कोणी तर्क
आदर्श दुग्धालयाचे लोणी
आहेच आमच्या तळहातावर
आज सूचेनात शब्द
कसे सांगावे
काय बोलावे
तू तर चाललीस
काय लिहावे
बोटांचे अधीर संवाद
हलकेच हास्याचे कारंजे
नयनातील होकारांचे
अन् लटक्या नकारांचे
खेळ !
सारेच थांबले आता
तू तर चाललिस
मन पाऊस पाऊस
त्यात असेना टिपूस
आहे व्यापून सर्वांना
कधी दिसेना कोणास
मन वादळ वादळ
घोंघावलं तनभर
खुणा उमटल्या नाही
उरी जखमा अपार
मन सागर सागर
किती अथांग गभीर
लाटा येती जाती तरी
भिजवेना कणभर
मन समज नुमज
कसं शहाणे ते बाळ
कधी वेडेपिसे होता
उधळिते रानोमाळ
मन अबलख वारू
धावे ब्रह्मांडाच्या पार
मना जाणे कोणी थोर
मन केवळ विचार.....
आता उगा कशाला हा पूर आसवाचा
तो पदर रेशमाचा जेव्हा भिजून गेला
घटिका जगावयाची उरलीच नाही हाती
क्षण थांबले ते सारे, केव्हा थिजून गेला
चाले कशास आता श्वासांस मोजणे हे
डोळ्यांत प्राण माझ्या जेव्हा विझून गेला
शृंगार साज तेव्हा वायाची गेले सारे
चेहरा कलेवराचा फुका सजून गेला
ही चंदनी सुगंधी रचिली चिता कशाला
हा देह चंदनाचा जेव्हा झिजून गेला
अनुराधा म्हापणकर
जशी किसानाला लागे
ओढ मृगाच्या सरीची
चाले चातक वारकरी
वाट आषाढी वारीची.
दिंडी अबीर बुक्यात
टाळ मृदंग वाजती
तुझे नेत्र दोन्ही देवा
जणू अमृत पाजीती.
ज्ञानेश्वराचा वारू
कसा भेदीतो रिंगण
देवा तसे दान द्यावे
व्हावे विश्वाचे अंगण.
विश्व पायापाशी यावे
असा जुळे धागा दोरा
सारे विसावले अंतरंग
भिमा चंद्रभागा तीरा.
काळ्या सावळ्याच्या गळा
शोभे तुळशीचा हार
माझा संसार फाटका
देवा तुझ्यावर भार.
नाव हाकरीतो सारी
सार्या जगताचा त्राता
उभी सावळी सुकुमार
संगे रखुमाई माता.
गंध केशराचा टीळा
वाटे तुझ्या भाळी लावू
जीव वेडा पीसा होई
देवा पुन्हा-पुन्हा भेटी येऊ.
तसं पसंत होतं मला
असं मेणबत्ती होऊन जगणं
तसं फारसं होतंच कुठे
माझं आयुष्याकडून मागणं
तुझ्यापुरतं पेटणं
तुझ्यापुरतंच पेटून उठणं
तू..
तू हवं तेव्हा काडी लावलीस
तू..
तू हवं तेव्हा मला पेटवलंस
आणि तुला नको वाटलं तेव्हा
माझं अस्तित्व तू मिटवलंस
जळताना कळतं होतं
कळताना जळतंही होतं
"मी" ... संपतेय....
"मी" ........... संपतेय ... !!
माझ्या प्रकाशाने तुला उजळवणं
हेच माझं प्राक्तन..
कारण माझा जन्मच मेणबत्तीचा !
.
शेवटी ..
कुणाचे डोळे दिपवून टाकायला
मी सूर्य थोडीच होते ???
वाटलं ते इतकंच..
वा-यावादळाततरी माझ्याभोवती
तुझ्या हातांची ओंजळ धरली असतीस तर !!
उदास रात्र पडकी हवा
खळ्यात हरवलेला चंद्र
नजर फिरत राहते उगाच
नभी हसती प्रकाशसर्प
दृष्टीभ्रम म्हणावा हा .. कि मेघांची अंदाधुंदी
काळोखाच्या कप्प्याकप्पात.. रात्रीची नजरबंदी
एकेक कप्पा निरखत जातो
उलगडतात चोरकप्पे
कुठे गुहा, कुठे लेणी..
सताड उघडे अंधारटप्पे
मागे पुढे उभा माझ्या .. काळाकभिन्नसा कातळ
अंधारातून उतरतेस तू.. जसं ओघळणारं काजळ..
अंधुरका आकार होतो
सुबक सुंदर दाटत जातो
मनकुंचला, मनःपटल
उमटत जाते चित्रकमळ..!
ते रात्रीचं चालत राहणं..
तुझं मनात उतरत जाणं..
तुझे श्वास, तुझे स्पर्श....ओठात विलगणारं हासू ,
तुझे भास, तुझी स्वप्नं.....एक ओघळणारा आसू
अंधाराचा देखावा विरतो
वारी
जरी पंढरीची करी मी न वारी, तरी भेटशी तू मला श्रीहरी
तुझ्या दर्शनाची मला काय चिंता, तुझा वास माझ्या मनोमंदिरी
टिळा ना कपाळा कधी लावला मी, कधी घातली माळ नाही गळां
गमे मायभूमी मला पंढरी, मी समाजात पाही तुला विठ्ठला
तुझे भक्त लाखो तुला पूजताना, तुझी लक्ष रूपे मला पाहु दे
तुझ्या दर्शनाचा मिळो लाभ त्यांना, तुझा अंश त्यांच्या मनी जागु दे
सदा सर्व काही मिळाले अम्हाला, असे वेळ आता तुला द्यायची
तुझ्या पंढरीला पुन्हा उद्धराया, कटीबद्धतेने उभे राह्यची
.... उल्हास भिडे (३०-६-२०१२)
(आषाढी एकादशी निमित्ताने)