वारी

Submitted by UlhasBhide on 30 June, 2012 - 01:12

वारी

जरी पंढरीची करी मी न वारी, तरी भेटशी तू मला श्रीहरी
तुझ्या दर्शनाची मला काय चिंता, तुझा वास माझ्या मनोमंदिरी

टिळा ना कपाळा कधी लावला मी, कधी घातली माळ नाही गळां
गमे मायभूमी मला पंढरी, मी समाजात पाही तुला विठ्ठला

तुझे भक्त लाखो तुला पूजताना, तुझी लक्ष रूपे मला पाहु दे
तुझ्या दर्शनाचा मिळो लाभ त्यांना, तुझा अंश त्यांच्या मनी जागु दे

सदा सर्व काही मिळाले अम्हाला, असे वेळ आता तुला द्यायची
तुझ्या पंढरीला पुन्हा उद्धराया, कटीबद्धतेने उभे राह्यची

.... उल्हास भिडे (३०-६-२०१२)
(आषाढी एकादशी निमित्ताने)

गुलमोहर: 

वा काका - एखाद्या महाभागवताला घडलेले विश्वव्यापी विठ्ठल दर्शन व एक अर्थपूर्ण इच्छा वाचतो आहे असे वाटले.
फार फार आवडली, हृदयाला भिडली. मनापासून धन्यवाद.....
जय हरि विठ्ठल श्रीहरि विठ्ठल.....

सुंदर अविष्कार, काका..
आजच्यादिवशी, विट्ठलाचे असे छानसे स्मरण करत, हे लयबद्ध काव्य वाचताना आनंद झाला Happy

टिळा ना कपाळा कधी लावला मी, कधी घातली माळ नाही गळां
गमे मायभूमी मला पंढरी, मी समाजात पाही तुला विठ्ठला>> वा, ह्या ओळी भावल्यात फार..

काका सणासुदीच्या ऑकेजनल कविता तुम्ही तरी करू नयेत ही अपेक्षा. >>>
विजय, कविता नीट वाचलीत का ?
कविता वरकरणी ऑकेजनल वाटली तरी,
त्यातला महत्वाचा संदेश(जो कदाचित कुणीही कुठेही देत नाही) वाचलात का ?
हे वाचूनही कविता केवळ ऑकेजनल/वर्णनात्मक वाटली असल्यास,
कविता (आणि मी) भावना पोहोचवायला कुठेतरी कमी पडली(/लो) का
याबद्दल मला अंतर्मुख होऊन विचार करावा लागेल.
धन्यवाद.
-------------------------------------------------------------------------------------------------
हो ..... आणि एक सांगायचं राहून गेलं.
मी कविता करत नाही, ती होते.

भिडे काका खूप सुंदर कविता .... प्रत्येक ओळ अर्थपूर्ण आहे.
धन्यवाद, एवढी छान कविता वाचण्याची संधी दिल्याबद्दल.
-सामी

विजय, कविता नीट वाचलीत का ?>>>

खरे सांगू का? नाव आणि पहिली ओळ वाचल्यावर पुढे वाचावीशी वाटली नाही... तुम्ही म्हणताहात तर आता वाचतो

तुझ्या पंढरीला पुन्हा उद्धराया, कटीबद्धतेने उभे राह्यची>>>

पंढरीला उद्धरणे म्हणजे काय हे समजले नाही.

सदा सर्व काही मिळाले अम्हाला, असे वेळ आता तुला द्यायची - ही ओळ 'आयुष्याला' उद्देशून वाचली आणि खूप आवडली.

मी कविता करत नाही, ती होते.>>>>

अंशतः पटले, कारण वृत्तबद्ध कविता करावीही लागते.

आवडली.
री पंढरीची करी मी न वारी, तरी भेटशी तू मला श्रीहरी
यातली गंमत पुढच्या ओळींतही साधता आली असती तर आणखी बहार आली असती.

आवडली !

खुप सुंदर रचना, काका Happy

टिळा ना कपाळा कधी लावला मी, कधी घातली माळ नाही गळां
गमे मायभूमी मला पंढरी, मी समाजात पाही तुला विठ्ठला>>> ह्यातल्या दुसर्‍या ओळीत लयी प्रमाणे बघता मी वर स्वल्प विराम येतो पण अर्थाच्या दृष्टीने तुम्ही दिलायत तिथेच योग्य आहे. तरिही तिथे काही बदल करुन बाकीच्या सगळ्या ओळींसारखीच लय असती तर अधीक मजा आली असती Happy

सर्वांना धन्यवाद.
--------------------------------------------------------------------------------------------------
विजय, तुम्ही उपस्थित केलेल्या मुद्यांबाबत आपण वैयक्तिक पातळीवर चर्चा करू.
--------------------------------------------------------------------------------------------------
कविन,
तुम्ही मनापासून कविता वाचून दिलेला अभिप्राय आवडला, धन्यवाद.
ही कविता ’सुमंदारमाला’ या अक्षरगणवृत्तातली आहे.
आणि माझ्या अंदाजानुसार वृत्त नीट निभावलं गेलं असल्याने
लय बिघडलेली नसावी.
(सर्व ओळींची लय सारखीच आहे असं मला तरी वाटतंय.)

तरीदेखील तुमच्या सूचनेचा जरूर विचार करेन.

<<....कधी नाही कुटले टाळ्...पंढरीला नाही गेले...चुकुनिया एक वेळ....>> या ओळिंची आठ्वण झाली....

कविता खूप आवडली.

उकाका : एकादशीला मस्त पंढरपुरात घरात पडून होतो ........... त्याच दिवशी नेमकी ही कविता मिस झाली ........त्याच दिवशी वाचायला मज्जा आली असती.............

असो

मला ही कविता म्हणजे आजवर माझ्या गझलेतून / कवितेतून आजवर मी जगू पाहिलेला प्रत्येक शब्द वाटली .........

या कवितेसाठी लाख लाख आभार काका

सर्वांना धन्यवाद.
----------------------------------------------------------------------------------------
धन्यवाद वैभव,
तुम्हाला या कवितेतून ’विठ्ठल’ भेटला असल्यास कविता धन्य झाली.