मन पाऊस पाऊस

Submitted by पुरंदरे शशांक on 30 June, 2012 - 03:40

मन पाऊस पाऊस
त्यात असेना टिपूस
आहे व्यापून सर्वांना
कधी दिसेना कोणास

मन वादळ वादळ
घोंघावलं तनभर
खुणा उमटल्या नाही
उरी जखमा अपार

मन सागर सागर
किती अथांग गभीर
लाटा येती जाती तरी
भिजवेना कणभर

मन समज नुमज
कसं शहाणे ते बाळ
कधी वेडेपिसे होता
उधळिते रानोमाळ

मन अबलख वारू
धावे ब्रह्मांडाच्या पार
मना जाणे कोणी थोर
मन केवळ विचार.....

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

.

खुप सुंदर. आवडली.

मन अति अबलख
धावे ब्रह्मांडाबाहेर ...... हे मी असं वाचलं >

मन अबलख वारु
धावे ब्रह्मांडाच्या पार .

ऑर्फियस - अतिशय योग्य बदल सुचवलात - त्याबद्दल विशेष धन्यवाद.....
शाम - आता कसा वाटतोय चौथा चरण ? अभ्यासपूर्ण निरीक्षणाकरता विशेष धन्यवाद.
चिमुरी, योगुली - मनापासून धन्यवाद.

शशांक मस्त छान कविता.
बहिणाबाईंच्या 'मन वढाय वढाय' च्या चालीवर म्हणून बघितली, सुंदर.

मन अबलख वारू
धावे ब्रह्मांडाच्या पार
मना जाणे कोणी थोर
मन केवळ विचार.....

सुरेख!!!