जाणिव

मागे वळुन पाहताना..

Submitted by मन्या ऽ on 9 March, 2020 - 01:11

मागे वळुन पाहताना..

मागे वळुन पाहताना
एक निरागस चेहरा
दिसतो मज मनसोक्त
खळखळुन हसताना

मागे वळुन पाहताना
तोच चेहरा दिसतो मज
भेदरलेल्या डोळ्यांनी
आसपास पाहताना

मागे वळुन पाहताना
लोकांचे चेहेरे न्याहाळताना
तो चेहरा दिसे मज
ओंगळवाण्या नजरा सहन करताना

मागे वळुन पाहताना
ओळखीच्या चेहेऱ्यांवरचे
पाहिले मी मुखवटे
एकावर एक चढवताना

मागे वळुन पाहताना
स्वतःला आरशात बघताना
पाहिले आहे मी
स्वतःचीच किळस करताना

सिग्नलची परी आणि मी

Submitted by र।हुल on 1 September, 2017 - 09:27

लाल दिवा बघुनी
थांबलो सिग्नलला
काचेवरती नाजूक
काळा हात फिरला ॥१॥

बघुनी मी अस्वस्थ
थोडा मनांत झालो
हलकेच काच गाडीची
खाली करता झालो ॥२॥

उघडणारी काच बघुनी
डोळे तिचे चमकले
उदास मलूल चेहर्यावरी
हास्य खिन्न विलसले ॥३॥

हातांत मिळताच काही
मनोमन ती हरखली
बघुनी माझ्याकडे ती
खळखळून किती हसली ॥४॥

कृतज्ञतेने हात तिने
माझ्यासमोर जोडले
बघुनी मला मनांत
खजील अपार वाटले ॥५॥

हळूहळू ती पाठीमागे
मागे सरकत राहीली
मनपटलावर माझ्या
माझीच ईशू झळकली ॥६॥

Subscribe to RSS - जाणिव