अचानक दाणकन कानाखाली बसल्यावर जो एक सुन्नपणा येतो, बधीरता येऊन कान बंद होऊन आकस्मिक आणि क्षणिक बहिरेपणा येतो, तो कधी अनुभवलाय? मी नुकताच अनुभवला...सैराट बघितला तेव्हा!
काळ्या काताळ दगडातून घडवलेली प्रशस्त अशी, पाच-पन्नास ऐसपैस पायऱ्या उतरणारी, जुन्या इतिहासाच्या खुणा सांगणारी आणि थंडगार पाण्याने भरलेली विहीर. विहिरीच्या कमानीवरून कॅमेरा हळुवार घुमतो आणि दिसतात ते दोन कोवळे प्रेमी, पायऱ्या उतरत येणारी ती आणि तिची वाट बघत कठड्यावर बसलेला तो. पाठीमागे हळुवार घुमणारे आणि वातावरणात मिसळून जाणारे संगीत. बस्स, अत्यूच्च दर्जाचं जे काही असतं ते हेच, पाहताच क्षणी मोहून टाकणारं. आपल्या मातीतलं.