झुंड... नाही टीम!

Submitted by अमितव on 4 March, 2022 - 23:53
By Twitter, Fair use, https://en.wikipedia.org/w/index.php?curid=60841204

****** झुंड चित्रपट बघणार असाल तर तो बघुन झाल्यावर हा लेख वाचा. अर्थात चित्रपटात स्पॉयलर देण्यासारखं काही नाही पण कोर्‍या पाटीने बघायला कधीही जास्त मजा येते. ******

प्रा. विजय बोराडे (अमिताभ) निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले नागपूरच्या बहुतांशी पांढरपेशी उच्चवर्गीय विद्यार्थ्यांच्या कॉलेज मधील प्राध्यापक. ह्या कॉलेजच्या जवळच एक झोपडपट्टी आहे. तिथली युवा पिढी ड्रग्स, व्यसने, मारामार्‍या, भुरट्या चोर्‍या यात आकंठ बुडालेली आहे. या कॉलेज आणि झोपडपट्टीत आहे एक साधी भिंत. खरतर साधी नाही. तर जातीपाती, वर्ग, आर्थिक परिस्थिती यांना उभी विभागणारी भिंत. या भिती पलीकडे कॉलेजमध्ये यायला झोपडपट्टीतील मुलांना प्रवेश वर्ज; आणि अलीकडील कोणी पलिकडे जाऊ इच्छित नाही, अपवाद फक्त बोराडे सरांचा.

एकदा बोराडे सरांना हीच तरुणाई एक डबड्याबरोबर फुटबॉल खेळताना दिसते, आणि त्यांना या मुलांना परिस्थितीतून, व्यसनातून, चोर्‍यामार्‍यातून बाहेर काढण्यासाठी खेळाचा मार्ग दाखवावासा वाटतो. झुंड चित्रपट ह्याच तरुणाईची खेळाच्या माध्यमातून बाहेर पडायची कथा सांगतो. बोराडे सर यात कितपत यशस्वी होतात? ही मुलं त्यांचं कितपत ऐकतात? आपला पीळ सोडून नळीत शेपुट घालतात का? त्यांचा भूतकाळ ते करायची त्यांना मुभा देतो का? त्या भूतकाळाला मागे टाकून येणं खरोखर कितपत शक्य होतं? याची उत्तर चित्रपट पाहुन मिळतीलच.

उच्चवर्गातील, ती ही मुख्यत्त्वे शिक्षक, मुख्याध्यापक अशा प्रौढ व्यक्तींतील आणि या मुलांतील दरी अनेक प्रसंगांत दिसत रहाते. ती समोरासमोर व्यक्त होतेच असं नाही. पण पॅसिव्ह अग्रेसिव्ह वागणुकीतून, सर्वसामान्य रुजलेल्या स्टिरिओटाईप्स मधुन ती दिसत रहाते. बर्‍यापैकी असेच आपण ही कधी ना कधी व्यक्त झालेलोच असतो, त्यात काही चूक आहे हे न सांगता थोडा विचार केला की खजिल होऊन आपलं मन कुरतडत राहिल.... असा खास मंजुळे टच! पार्श्वभूमीवर बाबासाहेबांच्या जयंतीची तयारी, वर्गणी, जल्लोश... अशा निरिक्षणात्मक पातळीवर, कधी चक्क डॉक्युमेंटरी प्रकारे पात्रपरिचय करत तर कधी काल्पनिक आणि तरीही वास्तव वाटेल असे प्रसंग घेत चित्रपट पुढे जात रहातो.

नागराज मंजुळेचा चित्रपट आहे, त्यामुळे फँड्री/ सैराटशी तुलना होणे अटळ आहे. तर ज्या प्रमाणे फॅन्ड्री/ सैराट मध्ये नागडं सत्य कसलाही मुलाहिजा न ठेवता धाडकन समोर येते तसं दलित लोकांचे वास्तव इथे धगधगीतपणे पुढे येतच नाही, कदाचित मराठी प्रेक्षकाच्या प्रगल्भतेच्या तुलनेत हिंदीत कितपत धोका पत्करावा असा हेतू असेल. बॉलिवुड मध्ये अशा भूमिका प्रस्थापित कलाकारांकडून ब्राउनफेस/ ब्लॅकफेस करुन करण्याची रुढ परंपरा तर मोडली, पण कथेत रोमँटिसिझम कायम ठेवूनच कथा प्रवास करते.

झोपडपट्टी टीमचा कर्णधार डॉन उर्फ अंकुश मेश्राम ह्या कथेचा नायक. तो साकारला आहे अंकुश गेडाम याने. काय काम केलंय याने! त्याच्या कडून इतकं सहज सुंदर काम करुन घेण्यात मंजुळ्यांचा हात कोण धरणार! चित्रपटात याची पार्श्वकथा उत्तम प्रकारे उभी केली आहेत. त्याच्या पात्राला असलेले कंगोर व्यवस्थित उभे केले आहेत. पण दुर्दैवाने अंकुश सोडून कुठल्याच खेळाडूची बॅक स्टोरी चित्रपटात येत नाही. त्यांचा मनाचा ठाव लागत नाही. एक रझियाची कथा थोडी फार आहे, पण तिच्याही मनाची आंदोलने आणखी हवी होती. तब्बल तीन तासाचा चित्रपट आहे, म्हणून हे जास्तच जाणवतं. इतर पात्र कोण आहेत हे डॉक्युमेंटरी स्टाईल थोडंफार समजतं, पण मंजुळे स्टाईल दृकश्राव्य असतं तर मजा आली असती वाटत रहातं.

अजय- अतुलच्या सैराट मधल्या जादू नंतर इथलं संगीत अगदीच तोकडं वाटलं. 'लफडा झाला' तर झिंगाटची कॉपी वाटते. सुरुवातीचं 'झुंड' छान आहे, पण सैराटचा साऊंड ट्रॅक आठवला की... असो... Happy
असंच सुरुवातीला बोराडे सर त्या फुटक्या डब्या बरोबर फुटबॉल खेळताना बघतात तेव्हा अचानक पाऊस चालू होतो. तो प्रसंग जादुई आहे, पण त्यात व्हिएफएक्स पाऊस आणि त्यात अमिताभच्या चष्म्याच्या काचेवर एक पावसाचा टिपुसही पडत नाही, कपडे, केस भिजणे तर दूरची गोष्ट असल्या चुका का राहिल्यात कोण जाणे. (का माझं काही चुकतंय?)

हिंदीत असे रांगड्या प्रवाहा बाहेरच्या नागड्या व्यक्तिरेखांना घेऊन, त्यांच्यावर मेहेनत करुन, त्यांच्याकडून काम काढून घेऊन चित्रपट फारसे नसतात. त्यामुळे एकुणात चित्रपट आवडला. पण नागराज मंजुळेचा म्हटल्यावर कदाचित फारच जास्त अपेक्षा ठेवून गेलो असेन, त्यामुळे थोडी निराशा झालीच.
अंकुशला ती गोरी मुलगी आवडते ते ठीकच. पण इतर टीम मधल्या मुलींबरोबर कुणी कनेक्ट होईल, संवाद साधेल. एक टीम म्हणून सगळे खेळाडू एकत्र येतील. तर असं काहीच दिसत नाही. सगळ्यांचा पासपोर्ट काढायला जे श्रम लागतात ते दाखवायला जो वेळ दिला आहे, त्यातला थोडा वेळ एक टीम म्हणून उभं रहायला दिला असता तर?

बाकी पूर्ण चित्रपट अनेकदा टिपिकल वळणावर येतो पण टिपिकल न होता काही सकारात्मक संदेश, दृष्टी देऊन जातो. नक्की कुठे ते आणखी लोकांनी बघितला की प्रतिसादांत बोलूच.

तर लोकहो पटपट बघा, म्हणजे वचावचा बोलता येईल. शेवटी मंजुळेचा आहे, त्यामुळे अनेक लहान लहान पात्र, लकबी इ. वर बोलण्यासारखं बरंच आहे. Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

छान परिक्षण!
चित्रपटाचं कथा सूत्र वाचून हे आठवलं>>> +१ त्यांच्यावरच कथा आहे ना.

छान लिहिलेय. पिक्चर अर्थात बघणारच. तरीही लेख वाचला. कारण ट्रेलर पाहून कथानक समजलेलेच. मंजुळे नाव ऐकून पटकथा काय असावी हा देखील अंदाज आलेलाच. अमिताभला पाहून अभिनय काय असणार हे देखील कळलेलेच. अजय अतुलच्या गाण्यांनी तशी थोडीफार निराशाही झालेलीच. मंजुळेंना मात्र एखादी गोष्ट सांगायला तीन तास का लागावेत हे समजले नाही. पण म्हणजेच चित्रपटात कमर्शिअल मनोरंजक दृश्येही बरीच असणार हे नक्की.

बाकी नागराज मंजुळेंचा चित्रपट आला की प्रस्थापित आणि ऊपेक्षित अश्या दोन वर्गांमध्ये नेहमी लफडे सुरु होतात. ते यंदाही जोरात आहेत. सुदैवाने मी दोन्ही वर्गात नसल्याने चित्रपटाचा तटस्थपणे आनंद ऊचलू शकतो.

चित्रपट पाहिला. कलाकृती म्हणून छान. मनोरंजन म्हणून ओके.

काही ठिकाणी संथ वाटला
अ.अ. संगीत ठिकठाक. फाssर काही नाही
सैराटशी तुलना करायला नको. सैराटची गोष्टच वेगळी होती. सैराट ही नशा होती.

बाकी मंजुळे सगळीकडे दिसत रहातो.
काॅलेज आणि झो. पट्टी मधली भिंत,
शेवटच्या सीनमधलं विमानाचं उड्डाण
शेंदूर फासलेला देव
सिक्युरिटीवाला कटर फेकायला लावतो तो सीन भारी !!!

मला ह्यात बच्चनची निवडच पटली नाही. त्याचं बच्चनत्वच सतत जाणवत रहातं. बच्चन आहे म्हणजे आता सगळं नीटच होणार असं वाटत रहातं. संघर्ष जाणवत नाही.

त्याच्याऐवजी एखादा लहानखुरा, काळासावळा, मृदु बोलणारा तरी कणखर .. दहावी फ मधे अतुल कुलकर्णी आहे तसा कोणीतरी शिक्षक दिसणारा असता तर जास्त आवडला असता. त्या एकदोन मराठी संवाद आहेत त्यातही तो बच्चनच वाटतो. त्याचं बायकोचं नातं नीट समजतच नाही. तिचंही मोठं योगदान आहे बारसे सरांच्या आयुष्यात.

>> मंजुळेचा म्हटल्यावर कदाचित फारच जास्त अपेक्षा ठेवून गेलो असेन, त्यामुळे थोडी निराशा झालीच.

सहमत!

नुसताच कोरा पासपोर्ट घेऊन विजा शिवाय प्रवास कसा काय करणार?
पटकथेत इतका मोठा घोळ कसा काय राहू शकतो?

- (निराश) सोकाजी

खन्ना, रॉय, मलिक, कपूर अशी नावे न घेता चक्क 'बो-रा-डे' म्हणुन आनंदाच्या धक्क्यातून सावरते न सावरते तोच दिग्दर्शक, कथाविषय एकंदर कथावस्तू कळत गेली. आणि नावाचे प्रयोजन कळले.

छान माहिती अमित! लौकरच बघायचा प्लॅन आहेच आणि कमालीची उत्सुकता आहे.

टायटल साँग अफाट चांगले जमले आहे. २-३ वेळा ऐकले की आपण एकदम "हुक्ड"! अजय-अतुल पैकी अतुल ने गायले आहे असे दिसते - जबरदस्त एनर्जी, ढोल वगैरेचा ठेका मस्त आहे. मधे तर एकदा जॅझ मधले वाद्य वाजवले आहे बहुधा. मस्त इफेक्ट आहे. त्या गाण्याचा एकूण टोन आहे तो अतुल च्या आवाजात सुद्धा जाणवतो. "अपुन की बस्ती गटर मे है पर तुम्हारे दिल मे गंद है". मी टोटली अ‍ॅडिक्ट झालोय या गाण्याचा.

लफडा झाला जरी वरकरणी झिंगाटची कॉपी वाटले तरी ते ही जमले आहे. लिरिक्स मस्त आहे त्त्याचेही.

ट्रेलर पाहून तरी वाटते की पिक्चर मधे बरेच काही आहे आणि सैराट प्रमाणे अनेक फ्रेम्स मधले सीन्स हळुहळू उलगडत जातील.

मी पण पाहिला आणि माझही मत एग्झॅक्ट्ली अमित सारखं !
सिनेमा चांगला आहे.. पण.. सैराट सारखं मनावर गारुड करणारा नाही .
टू मेनी कॅरॅक्टर्स आणि त्यामुळे सगळ्या पात्रांना न्याय देता नाही असं वाटलं , पण सगळ्या पोरांनी काय जबरदस्तं काम केलय / करवून घेतलय.. अंकुश, तो लाल केसांचा पोरगा तर फार भारी, त्यासाठी नागराजला सलाम !
अमिताभ कधी वाईट अ‍ॅक्टिंग करेल असे होणारच नाही , इथेही चांगलच केलय.. पण…….. तो अमिताभच वाटतो, बाकीची कास्ट अस्सल दिसते, तसा अस्सल मास्तर वाटत नाही !
इथे राहून राहून दहावी फ चा अतुल कुलकर्णी किंवा ‘तारे जमिन पर ‘ चा आमिर खान आठवला.. त्यांची एक शिक्षक म्हणूनं मुलांबद्दल तळमळ फार अस्सल वाटली होती अमिताभ पेक्षा !
इव्हन दंगल मधे गीता बबिता ला तयार करण्याची आमिर खानची जिद्द , बापा पेक्षा एक कडक मेंटॉर फार जबरदस्तं वाटली होती.. इथेही आमिर खान असता तर ?? ?????
तारे जमिन पर मधले आमिर खान आणि दर्शिलच्या वडिलांचे सिन्स तर फार मनाला भिडणारे होते, त्या तुलनेने इथे इन्टेन्सिटी कमी वाटली !
तरीही एक वेगळ्या जॉनरचा प्रामाणिक सिनेमा हिन्दी ऑडियन्सला अपिल होईल अशा प्रकारे सादर केल्या बद्दल नागराज आणि टिमचे अभिनंदन !
चित्रपटाची लेंथ फार जास्तं वाटली, त्यामुळे मधे अधे फोकस हालतो.. सैराट बघताना असं एकदाही वाटलं नव्हतं , एक अन एक मिनिट लक्षात आहे सैराटचं !
रिंकुचे कॅरॅक्टरच अनावश्यक होते , पासपोर्ट डॉक्युमेन्ट्सची गडबड वगैरे मधे फार वेळ गेला.. सिनेमा संपणार कि चालुच रहाणार रात्रभर असा प्रश्नं पडला.. अ‍ॅक्चुअली सरकारी कागदपत्रं , पासपोर्ट जमवतानाची बेसिक डॉक्युमेन्ट्सचा गोंधळ वगैरे तसे एन्टरटेनिंग दाखवायचा प्रयत्न केला पण या विषयावर नागराज अजुन एक सिनेमा बनवु शकेल , इथे फार मोठा झाला यामुळे सिनेमा !
अंकुशची लव्ह स्टोरी (त्या मुलीच्या साईडनीही) दाखवायचा मोह टाळला असता तरी चाललं असतं पण ठिक आहे , अंकुश हा लिड होता !

स्पॉयलरः
शेवटच्या क्षणाला एअरपोर्टला धावत जाऊन टार्गेट अ‍ॅचिव्ह करणे हे हिन्दी सिनेमाला अपिल व्हावे म्हणून केले का ?
ते नसते तर चालले असते.
नागराजच्या सिनेमाची शेवटची काही सेकन्दं आयकॉनिक असतात , मला वाटलं स्लो मोशनमधे अंकुश कटर फेकून देतो तिकडेच संपेल सिनेमा पण नागराज हॅड समथिंग एल्स टु सर्व्ह !
सिक्युरीटी चेक मधून सहीसलामत बाहेर पडल्या नंतर अंकुशची इमोशनल घालमेल, सगळ्यांच्या गळ्यात पडून रडणे आणि शेवटच्या काही सेकन्दात ज्या झोपडपट्टीत अंकुश वाढला, अनेक काळे धंदे, गुंडगिरी केली, उंच उडणारी विमानं खालूनच पाहिली त्याच झोपडपट्टीवरून त्याचे विमान उंच भरारी घेत जाते, झोपडपट्टी मागे टाकत.. आवडलाच पॉझिटिव शेवट , थँक्स टु नागराज फॉर किपिंग अप द ट्रॅडिशन Happy

मला ह्यात बच्चनची निवडच पटली नाही. त्याचं बच्चनत्वच सतत जाणवत रहातं. बच्चन आहे म्हणजे आता सगळं नीटच होणार असं वाटत रहातं. संघर्ष जाणवत नाही. >> कदाचित इरफान असता तर त्यानं खूप छान केला असता असे वाटून गेले .....

सिक्युरीटी चेक मधून सहीसलामत बाहेर पडल्या नंतर अंकुशची इमोशनल घालमेल, सगळ्यांच्या गळ्यात पडून रडणे आणि शेवटच्या काही सेकन्दात ज्या झोपडपट्टीत अंकुश वाढला, अनेक काळे धंदे, गुंडगिरी केली, उंच उडणारी विमानं खालूनच पाहिली त्याच झोपडपट्टीवरून त्याचे विमान उंच भरारी घेत जाते, झोपडपट्टी मागे टाकत>> 'crossing the wall is strictly prohibited' अस काही आहे का शेवटच्या सिन मध्ये? एका रिव्ह्यू मध्ये वाचलं होतं. ते तसलं काहीतरी वाक्य असेल तर एकदम मंजुळे टच म्हणावा लागेल.

डीजे+१. रिंकूची पासपोर्ट धडपड.. मला दरवेळी पोलीस पाटील ( प्रिन्सचे बाबा बघून मस्त वाटलं), पोलीस, जिल्हाधिकारी इ. लैंगिक शोषण करतील, ब्लेड मिळाल्यावर उड्डाण रद्द होईल, पासपोर्ट मिळाल्यावर आकाश ठोसर बरोबरच्या मारामारीत पासपोर्ट गहाळ होईल, मॅच मध्ये हरतील, सामने कचरा केल्याने बंद होतील, सामन्यात मुलींवर अतिप्रसंग येईल आणि सरांची मान शरमेने झुकेल, आंबेडकर जयंती ला काही गोंधळ होईल, पहिल्या सामन्यात ती क्रश काही तरी करेल आणि अंकुश चं लक्ष विचलित होऊन सामना हरतील... असे अनेकानेक टिपिकल तडके नागराज कसे टाळेल? याचं टेन्शन होतं. ते कायम टेन्शन च राहिलं. ते ही आवडलं.

हो लंपन.
हे असच फ्रेम मध्ये आणखी काय आहे वाले टच बघायला परत एकदा बघितला पाहिजे.
पात्रांच्या वेशभूषेबद्दल लिहायचं राहिलं. बॉलिवूड मध्ये हे असे कपडे, केस कोण करतं!! पहिल्या मॅचला घालून आलेले कपडे काय लाजवाब आहेत.

पहिल्या मॅचचा अख्खा सीन ध्म्माल जमलाय, पात्रांचे झकपक कपडे, रंगीत गॉगल्स, गोलकिपर शेरवानी मधे, एकमेकातच मारामार्‍या आणि भांडणं. छतावर बसलेल्या लाल केसांच्या माणसाची कॉमेंट्री.. हसून लोटपोट !
नाही म्हंटलं तरी थोडी लगानची आणि सैराटच्या पहिल्या सामन्याची आठवण आलीच.. ग्यारा हजार जितनेका मौका, अपनेही टिमको देके धोका, कॅप्टन कुठे गेला नेमका, बघतओयेस काय रागान , षटकार मारलाय वाघानं Biggrin
अजय अतुलचं म्युझिक जबरदस्तं आहे, बॅक्ग्राउंड स्कोअर पण फार भारी.. रेहमानच्या लगानची आठवण आलीच !
माझ्या नवर्‍याला वाटलं सिनेमा संपला पहिल्या मॅच नंतर Biggrin अजुन इंटर्व्हल सुद्धा नव्हती झाली Proud

काल बघितला. विषय चांगला आहे. अमिताभला घेतल्यामुळे जास्त लोकं बघतील असं असेल किंवा मंजुळेचं त्याच्याबरोबर काम करायचं स्वप्नही असेल. अमिरही मस्त फीट झाला असता ह्या रोलमध्ये. अमित आणि डिजेच्या रिव्ह्युशी सहमत. कायच्या काय लांब झाला आहे. मध्ये अर्धा तास झोपही काढली.

ओह अच्छा. केलं ना एकमेकांबरोबर काम, मग झालं तर.
बाकी सगळ्या मुलांनी काम एकदम मस्त केलंय. सगळी अतिशय खरी वाटतात. तो डॉन आणि ती मुलगी ह्यांचं उगाच घुसवलेलं.

कुठे बघितलात तुम्ही सगळ्यानी इतक्या झटपट? सिनेमा हॉलला की ओटीटी वर आलाय?
झुन्डची टीम एका कार्यक्रमात आली होती सगळ रॉ टेलेन्ट शोधुन आणलय त्याने, त्यातला मेन कॅरेक्टर तो बारकेला केस रन्गवलेला मुलगा तो एवढा हजरजबाबी वाटला, कोळसा पाडून तो सगळ्या मुलाबरोबर मिळुन विकायचा.त्याचि आई पिक्चर मधे काम करायला नाही म्हटली तुझ्या किडन्या काढुन घेतिल म्हणे.
अमिताभ पेक्षा दुसर कुणी हव होत हे ट्रेलर मधेही वाटत होत, आयुष्यमान पण चालला असता का? तो छान मोल्ड होतो कॅरेक्टरसाठी.
चित्रपट बघायची उत्सुकता आहेच !

अमितव,
आत्ताच पाहिला 'झुंड'. चांगले परीक्षण लिहिले आहे तुम्ही. आवडले.

सगळ्यांचा पासपोर्ट काढायला जे श्रम लागतात ते दाखवायला जो वेळ दिला आहे, त्यातला थोडा वेळ एक टीम म्हणून उभं रहायला दिला असता तर?
>>>
पण तोच तर मुद्दा आहे ना ! एकेक कागदपत्र मिळवताना माणसाची जी ससेहोलपट होते, ती दाखवणं..! विशेषतः आदिवासी पाड्यांमध्ये, जिथं माणसं कुणाच्या खिजगणतीतच नसतात, तिथे तर कागद मिळवणं म्हणजे भिंतीला धडका घेण्यासारखंच असणार..!

मेधावि आणि दीपांजली यांचे प्रतिसाद पटले, आवडले.

नागराज मंजुळे जे करू पाहतायत ते फार आवश्यक आहे..
नायतर आपल्यातलेच काहीजण भविष्यात म्हणतील की आम्हाला हा विषयच माहिती नव्हता..!
बाकी मंजुळेंचाही दहा-पाच चुका करण्याचा अधिकार मान्य करायला हरकत नाही.. Happy

छतावर बसलेल्या लाल केसांच्या माणसाची कॉमेंट्री.. हसून लोटपोट ! >>> जाम खतरनाक प्रकार आहे तो..! Happy

कदाचित इरफान असता तर त्यानं खूप छान केला असता असे वाटून गेले .... +११

मंजुळेचं त्याच्याबरोबर काम करायचं स्वप्नही असेल
<<<
Lol no , If I'm not wrong it's Amitabh who wanted to work with Nagraj ! >>> दोन्ही खरे आहे.

अमिताभच्या परफॉर्मन्स बद्दल - इतर अनेक रिव्यूज मधे त्याने अमिताभगिरी केलेली नाही असे वाचले. इथे उलट मत दिसते. बाकी ही कथा पूर्ण काल्पनिक नाही - त्यामुळे त्या मूळ बोराडे सरांनी जसे केले असे साधारण तसेच दाखवण्याचा उद्देश असेल. अमिताभ स्क्रिप्टच्या बाहेर जात नाही. उलट चोप्रा-जोहर कडचे त्याचे रोल्स मला बोअर वाटतात, त्यामानाने इथे ट्रेलर मधे तरी चांगला वाटतोय. आपल्या डोक्यातील त्याची टॉवरिंग इमेज अनेकदा साधे रोल बघताना आड येते. इतर दिग्दर्शक त्याची बाहेरची इमेजच आजकाल रोल्स मधे प्रोजेक्ट करतात - तीच भाषा, तेच मॅनरिजम्स. मंजुळेसारखा दिग्दर्शक "काम करून घेण्याची" शक्यता जास्त वाटत होती.

सकाळी हा धागा उघडला पण पहिलंच वाक्य वाचून बंद केला. पाटी कोरी ठेवून बघायचा होता चित्रपट म्हणून. आताच चित्रपट संपवला. आणि घरी आल्या आल्या हा धागा वाचला...
मंजुळे कधीच निराश करणार नाहीत याची परत एकदा खात्री...
सैराट एकमेव आहे.. त्याच्याशी तुलना नाही होणार..
पण हा पण चित्रपट अगदी मस्ट मस्ट वॉच आहे.. अजिबात चुकवू नका...
सुरवातीच्या एका फ्रेम मध्ये एकीकडे कॉलेज चं ग्राउंड,चकाचक वस्ती आणि दुसरीकडे झोपडपट्टी मध्ये भिंत असा एक एरियल शॉट आहे.. खतरनाक घेतलाय तो...
हे वास्तव आहे आपलं आणि ते कुठे ना कुठे सतत नाकारत असतो आपण.. .. आपल्या बोलण्यात झोपडपट्टी, कचराकुंडी चे उल्लेख नकळत सुद्धा येत असतात..
" किती पसारा केलाय हा घरात.. घर आहे का कचराकुंडी ?" किंवा कोणी जोरजोरात भांडत असेल तर "काय हे झोपडपट्टी मधल्या लोकांसारखं भांडण" असं सहज बोलून जातो आपण..
मंजुळे खास त्याच्या स्टाइल ने डोळे उघडतो इथेपण.. हा सगळा पण आपलाच समाज.. नाकारून कसं चालेल...
नागराज पोपटराव मंजुळे , हॅट्स ऑफ टू यु....

शेवट सुखाचा झाला हे बघून बरं वाटलं कुठेतरी.. मंजुळेचा चित्रपट म्हणजे शेवट अंकुश ला नाहीच जायला मिळणार कारण तेच वास्तव असेल असं वाटलं होतं.. पण पॉझिटीव्ह दाखवलं म्हणून बरं वाटलं...

गाणी आवडली मला.. ऐकावीशी वाटतात परत परत यातच सगळं आलं..

फुटबॉल match, शेवटचा एअरपोर्ट वरचा सीन एकदम जमून आलाय.. विसा शिवाय प्रवेश वगैरे फुटकळ गोष्टी माफ करून टाकू... खरंतर लक्षात पण येत नाहीत त्याक्षणी..

आत्ताच थिएटर ला बघून आले. ते पण येन्जे माबो ग्रुप सोबत! मज्जा आली!
तर, लगान, चक दे, किंवा लॉंगेस्ट यार्ड् , एस्केप टू व्हिक्टरी असे खेळावर बेस्ड सिनेमे खूप आलेत. पण मंजुळेला अंडरडॉग्ज शेवटी महत्त्वाची मॅच जिंकले टाइप ठोकळेबाज स्टोरी सांगायची नाहीये.
त्याला सेकंड हाफ मधली झोपडपट्टी वाल्यांची ती "भिंत" ओलांडण्याची स्ट्रगलच दाखवायची आहे. रिंकू ची स्टोरी तीच आहे. त्यामुळे डीटेल मधे आली आहे. मला उलट आवडली तिची स्टोरी. लहानश्या रोल मधे तिनेही किती सुरेख काम केलंय. तिचं काम होतं तेव्हा तिचा चेहरा किती उजळतो अगदी.
फ्लॉज आहेत सिनेमात तसे. जसं एवढी मोठी तेही झोपडपट्टीतल्यांची स्पर्धा आयोजित करतात ते एकट्याचे काम नाही, त्याचे लॉजिस्टिक्स, परवानग्या, अरेन्जमेन्ट्स वगैरे काहीच दाखवले नाही. नंतर देशाबहेर स्पर्धेला जाताना फंडरेजिंग करणे, स्पोन्सर्स मिळावणे, इतर मदत उभी करणे असे दाखवता आले असते असे वाटले. पण बहुधा तो फोकस नाही त्यामुळे ते दाखवायल वेळ उरला नसावा.
पासपोर्ट / व्हिसाचा वर लिहिलेला मुद्दा पण बरोबर आहे. कॅरेक्टर्स बरीच आहेत त्यामूळे सगळ्यांना पुरेसा वाव नाही. पण सगळे लहान मोठे अ‍ॅक्टर्स मस्त काम करून गेलेत. तो केसांना मेंदी लावलेला म्हातारा, ह्रितिक असं नाव सांगणारा लहान मुलगा, वगैरे.
शेवटी तो कटर फेकतानाचा सीन आणि झोपडपट्टीवरून विमान झेप घेतानाचा सीन खास मंजुळे स्टाइल. आणि लास्ट बट नॉट द लीस्ट अजय अतुल चे म्युझिक आणि बॅकग्राउंड स्कोर पण जबरदस्त भारी!

तो एकजण बेंजो वाजवतो...जरा चुकत माकत....सारे जहाॅ से अच्छा...त्या गाण्याचा बॅग्राउंडचा वापरही खल्लास आहे.

मुलं स्वतःबद्दल बोलतात तो सीनही जबरदस्त. अडखळत असतात. डोळे व्याकुळ होतात त्यांचे. खूप आवडला तो सीन.

डाॅनचा चेहराही फार बोलका आहे. त्याला एकट्याला न घेता सगळे जातात तेव्हा काही न बोलता चेहरा बोलतो त्याचा.

अजून एक गोष्ट आवडली. हर जंग जीतना जरुरी नहीं.... कधीकधी माफी मागावी. सोडून द्यावं असं बच्चन सांगतो. शेवटी आकाश ठोसर मारामारीच्या मूडमधे येतो तेव्हा पासपोर्ट सुरक्षीत ठेऊन मग डाॅन सरळ त्याची माफी मागून टाकतो. मित्र वैतागतात. हा त्यांनाही परावृत्त करतो. विषय मिटवतो. फार आवडलं हे.

'crossing the wall is strictly prohibited' अस काही आहे का शेवटच्या सिन मध्ये? >>> हो Happy भिंत ओलांडणे हे प्रतिक बरेचदा आले आहे सिनेमात.

काल पाहिला. पाचपाटील आणि मैत्रेयीला अनुमोदन.

नागराजला इतकं भरभरून सांगायचं आहे की ते तीन तासांतसुद्धा सांगून होत नाही असं वाटत राहिलं.
त्यामुळे स्ट्रिक्टली स्क्रीनप्लेबद्दल बोलायचं तर काही महत्त्वाच्या बाबी राहून गेल्या आहेत किंवा वेळेअभावी बहुधा त्यांना नंतर कात्री लागलेली आहे.
अमिताभच्या मुलाचं परदेशी जाणं/ परत येणं याची काही नीटशी संगती लागत नाही. तशीच त्या रेल्वे ट्रॅकवर जीव द्यायला आलेल्या आणि नंतर टीममध्ये दाखल झालेल्या मुलाची. मैत्रेयी म्हणाली तसं ती टूर्नानामेन्ट ऑर्गनाइझ करण्यातले लॉजिस्टिक्स, शेवटी फन्ड्स कसे गोळा होतात, व्हीसाजचं काय, वगैरे भानगडी काही समजत नाहीत.

पण ते धरूनही सिनेमा अतीशय हार्ड हिटिंग आणि मनोरंजकही आहे. त्याला एक rawness आहे - तो जपण्याबद्दल नागराज आग्रही असावा असं वाटतं.

'सैराट'शी त्याची तुलना होणं बहुधा अपरिहार्य असावं - सैराटसारखाच पहिला हाफ एक वास्तव, पण आशादायी कहाणी सांगत आपल्याला पात्रांशी समरस व्हायला लावतो, तर दुसर्‍या भागात त्याला जे मांडायचं आहे ते भाष्य येतं.
नुसती एक मॅच जिंकली, स्वच्छतेच्या/शुचितेच्या कल्पना अंगात बाणवायचं ठरवलं म्हणजे लढाई संपत नाही, उलट ती तिथून सुरू होते, हे दाखवण्यात नागराज नक्कीच यशस्वी झाला आहे.

वर उल्लेख आलेले भिंतींचे व्हिज्युअल्स, प्लेग्राउंड लेव्हल होणं, ते शेंदूर फासलेलं डबडं, शेवटी विमान झोपडपट्टीवरून उडताना दिसणं - सगळीच रूपकं भारी!

सैराटमधले चेहरे दिसल्यावर उगाचच ओळखीचं कोणीतरी गर्दीत दिसावं तसं छान वाटत होतं.

अमिताभच्या जागी नाना पाटेकरला घेतलं असतं तर...?

भरत, लिंकसाठी धन्यवाद. हा भाग पाहिला नव्हता मी. (कदाचित हा सीझनच!)
म्हणजे सत्यघटनेवरून प्रेरित आहे हा सिनेमा?! _/\_

Pages