जाळ आन धूर.... संगटच

Submitted by Sano on 11 April, 2016 - 03:23

काळ्या काताळ दगडातून घडवलेली प्रशस्त अशी, पाच-पन्नास ऐसपैस पायऱ्या उतरणारी, जुन्या इतिहासाच्या खुणा सांगणारी आणि थंडगार पाण्याने भरलेली विहीर. विहिरीच्या कमानीवरून कॅमेरा हळुवार घुमतो आणि दिसतात ते दोन कोवळे प्रेमी, पायऱ्या उतरत येणारी ती आणि तिची वाट बघत कठड्यावर बसलेला तो. पाठीमागे हळुवार घुमणारे आणि वातावरणात मिसळून जाणारे संगीत. बस्स, अत्यूच्च दर्जाचं जे काही असतं ते हेच, पाहताच क्षणी मोहून टाकणारं. आपल्या मातीतलं.

सैराट ह्या आगामी चित्रपटाचा हा पहिला टीजर. जेव्हा सारे क्रिएटिव्ह लोक एकत्र येऊन एकाच धेय्याने काम करतात तेव्हा अशा अप्रतिम कलाकृती घडतात आणि अश्या कलाकृती म्हणजे आपल्या सारख्या रसिक पामरांसाठी पंचपक्वांनी मेजवानीच असते.

ह्या पहिल्या टीजर पासूनच हा चित्रपट काय असेल हि उत्सुकता लागून राहिलीय. नागराज मंजुळे, ज्याच्या फँड्रीने अक्षरशः माझी विकेट काढलेली, तो हि मोट चालवतोय म्हटल्यावर अपेक्षा खूपच वाढल्यात. ह्या चित्रपटाचा संपूर्ण असा ट्रेलर आजून आला नाहीय त्यामुळे कथा काय असेल ह्याचा नक्की आढावा घेता येत नाही पण तीन चार गाण्यांच्या व्हिडिओ मधून नागराजचा कॅनव्हास किती मोठा आहे हे जाणवते.

गावाची भव्यता, दूरवर पसरलेली माळराने, तिथली हिरवीगार शिवार, तिथल्या अश्याच कितीतरी कथांच्या साक्षी असलेल्या वास्तू आणि मुख्य म्हणजे ह्या गावातली खरी वाटणारी माणसं. एकूणच चित्रिकरण अगदी international level चे असलं तरीही मातीशी इमान राखणारं वाटतेय.

फँड्री नंतर नागराज हा चित्रपट घेऊन येत असल्यामुळे खूप अपेक्षा आहेत. एका मुलाखतीत नागराज ने स्पष्ट केलेय कि तो त्याच्याच गोष्टी सांगणार आणि आशा आहे कि 'कमर्शियल' आणि त्याची गोष्ट ह्यांची सांगड घालून तो काहीतरी भन्नाट सादर करेल.

सैराट चे संगीत आणि त्यातले शब्द हि ह्या चित्रपटाची फार मोठी जमेची बाजू. अजय-अतुलचे 'सैराट झालं जी' गोड आहे त्यात टप्प्या-टप्प्यावर वर येणारी मराठमोळी वाद्यें आणि पाश्चात्त्य वाद्यें ह्यांची घातलेली सांगड म्हणजे 'टू मच'.
'झिंगाट' हे गाणं तर अगोदरच लोकांच्या पसंतीस उतरलंय. फँड्री मधले 'तिचा झगा गं' आणि आता सैराटचे 'झिंगाट', माहित नाही हि गाणी कोणत्या प्रकारात येतात पण गावरान भाषा किंवा तिथल्या लोकसंगीताचीे छाप असल्याने कानात भरून राहतात.

"आता उतावीळ झालो, गुडघा बाशिंग बांधलं,
तुझ्या नावाचं मी इनीशल ट्याटुनं गोंदलं."

सर्वसाधारण भाषेत पण 'मॉडर्न' होऊ पाहणाऱ्या शब्दात लिहलेले हे गाणे कळस आहे.

प्रेक्षकांसाठी तळटीप: फँड्री चे प्रोमोज सुद्धा असेच लव्हस्टोरी दर्शवणारे होते आणि रिलीजची तारीख पण जवळपास १४ फेब्रुवारीच होती. त्यामुळेच कि काय माझे बरेचससे मित्र आपापल्या 'हि'ला घेऊन हा चित्रपट पाहायला गेले होते पण तिथे त्यांना मिळाला तो जातीयव्यवस्थेचा ४४० चा झटका. चित्रपट अप्रतिमच होता पण चुकीच्या अपेक्षा घेऊन गेलेल्या माझ्या मित्रांचा पूर्ण भ्रमनिरास झालेला आणि चित्रपट टुकार आहे असा त्यांचा सूर लागलेला. असो, फँड्री ने लव्ह स्टोरी ला दिलेली हूल आणि त्यामुळेच रोमान्स च्या शोधात असणाऱ्यांचा झालेला भ्रमनिरास सैराट दूर करेल असे वाटतेय. पण तरीही हि नागराजची गोष्ट असल्याने काहीतरी वेगळे असेल असे जमेस धरूनच चित्रपटगृहात जा.

सैराटचे जे काही प्रोमोज youtube वर येताहेत त्यातून दिग्दर्शक नागराज मंजुळे, छायाचित्रकार सुधाकर रेड्डी आणि एडिटर कुतुब इनामदार ह्यांनी केलेली करामत जाणवते. त्यातीलच काही अप्रतिम फ्रेम्स खाली देत आहे. बाकी, बॅकग्राऊंड ला 'सैराट झालं जी' चालू असुदेच. Happy

प्रकाशचित्रे आंतरजालावरून साभार.


प्र. चि. १


प्र. चि. २


प्र. चि. ३


प्र. चि. ४


प्र. चि. ५


प्र. चि. ६


प्र. चि. ७


प्र. चि. ८


प्र. चि. ९


प्र. चि. १०


प्र. चि. ११


प्र. चि. १२


प्र. चि. १३


प्र. चि. १४


प्र. चि. १५


प्र. चि. १६


प्र. चि. १७


प्र. चि. १८

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झिंगाट आणि सैराट झालं दोन्ही गाणी मस्त. आताच बया का बावरल हे गाणं पण बघायला छान वाटत आहे.

तुमच्या पूर्ण लेखाला अनुमोदन. माझ्या पण अनेक मित्रांना फॅन्ड्री कळलाच नाही. त्यांना मंजुळेंनी काय दाखवलं आहे हेच झेपलं नाही.

नागराज मंजुळेंकडून खूप अपेक्षा आहेत या चित्रपटामधे. सैराट सध्या तरी फर्स्ट डे फर्स्ट शो ला बघायच्या यादीत.

तुम्हाला इतकी छान प्रतिचित्र कुठून मिळाली?

नागराज मंजुळे यांची मुलाखत महाराष्ट्र माझा मधे हीज हायनेस निखील वागळे यांनी घेतली होती जी दोन भागात प्रसारीत झाली.

नागनाथ मंजुळे हे लहान वयातच प्रौढपण जगले आहेत अस म्हणल तर चुकिच ठरणार नाही असा वेडा वाकडा प्रवास त्यांनी केलाय.

https://www.youtube.com/watch?v=k7KjnNqv17U

https://www.youtube.com/watch?v=AqWzRwhAHBs

एखादा माणुस घडण्याची त्यांच्या बाबतीतली सामाजीक परिस्थीतीमुळे प्रक्रिया कशी जटील झाली याचा सुरेख आढावा या दोन्ही मुलाखतीत आलाय.

एखादा माणुस नेता कसा बनतो त्याला जगण्यासाठी कसा संघर्ष करावा लागतो याच पध्दतीचा संघर्ष नागनाथ मंजुळे यांना सामाजिक प्रतिष्ठा सोडा परंतु माणुस म्हणुन जगण्यासाठी कसा करावा लागला हे स्वातंत्र्योत्तर काळातले चित्र या मुलाखतीत दिसते.

नागनाथ मंजुळे यांनी अनुभवलेल सैराट सिनेमाच्या माध्यमातुन पहाणे फारच बोलके असेल. नागनाथ मंजुळे या मुलाखतीत म्हणतात की हेच सत्य आहे असे नाही. तो सिनेमा व्हावा म्हणुन मुळची सत्यकथा आणि पटकथेत काही बदल आहेत.

याड लागलं सध्या माझ्या हिटलिस्ट वर! काय अमेझिंग ट्रॅक आहे .त्याचा मेकिंग @ हॉलीवूड व्हिडीओही जबराट आहे.

आर उर्रात होती धडधड लाली गालावर आली
अन अंगात भरलय वार हि पिरतीची बाधा झाली
आता अधीर झालोया.. बग बधीर झालोया
अन तुझ्याच साठी बनून मजनु मागे आलोया
आन उडतय बुंगाट पळतय चिंगाट रंगात आलया
झालय झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
सारं झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग…झिंगाट

फार उतावीळ झालो गुडघ्या बाशिंग बांधल
तुझ्या नावच मी इनिशिअल tattoo न गोंदल
हात भरून आलोया लई दुरून आलोया
अन करून दाढी भारी perfume मारून आलोया
आग समद्या पोरात म्या लई जोरात रंगात आलोया
झालय झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
सारं झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग…झिंगाट

समद्या गावाला झालीया माज्या लगनाची घाई
कधी व्हन्नार तू रानी माज्या लेकराची आई
आता तर्राट झालुया … तुझ्या घरात आलुया
लई फिरून बांधा वरून आलोया कल्टी मारून आलुया
आगं धीन्च्याक जोरात , टेक्नो वरात … दारात आलूया …
झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
सारं झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
सारं झिंगाट झिंग

https://www.youtube.com/watch?v=g8bTNID9nPs

अलगूज वाजं नभात
भलतंच झालया आज
अलगद आली मनात
पहिलीच तर्नी ही लाज

हो….
अता झणाणलं कालजामंदी
अन् हातामंदी हात आलं जी
सैराट झालं जी…
सैराट झालं जी…
सैराट झालं जी…

बदलुन गेल या सार
पिरतीचा सुटलया वार
अल्लड
बिल्लोरी पाखरू न्यार
आल मनातलं ह्या व्हटामंदी
अन हातामंदी हात आल जी
सैराट झालं जी…
सैराट झालं जी…
सैराट झालं जी…

कवळ्या पानात ह्या
सावल्या उन्हात ह्या
पवळ्या मनात ह्या भरलं… भरलं
तुझ
घुमतय वाऱ्यामंदी सूर सनईचा राया सजल
सजल उन वार नाभाताना सजल
रंगल मन हळदीन राणी रंगल
सरल हे जगण्याचं झुरणं सरल
भिनल नजरेन
आग धडाडल ह्या नभामंदी
अन ढोलासंग गात आल जी
सैराट झालं जी…
सैराट झालं जी…
सैराट झालं जी…

अपरीत घडलया
सपान हे पडलंय
गळ्यामंदी सजलंय डोरलं.. डोरलं
साता जन्माच नात रूजलया काळजात
तुला र देवागत पुजल
रूजल बीज पिरतीच सजणी रुजलं
भिजलं मन पिरमान पुरत भिजलं
सरल मन मारून जगण सरल
हरलं ह्या पीरमाला समद हरलं
कडाडलं पावसामंदी
अन आभाळाला याट आल जी
सैराट झालं जी…
सैराट झालं जी…
सैराट झालं जी…

हे पण भारी आहे... https://www.youtube.com/watch?v=_7XteNy6tAQ

“याडं लागलं ग याडं लागलं गं
रंगलं तुझ्यातं याडं लागलं गं
वास ह्यो उसात येई कस्तूरीचा
चाखलंया वारं ग्वाडं लागलं गं
चांद भासतो दिसाच मावळाया लागलं
आस लागली मनात कालवाया लागलं गं
याडं लागलं ग याडं लागलं गं…”FB_IMG_1460432340601.jpgFB_IMG_1460432348030.jpgFB_IMG_1460432354947.jpgFB_IMG_1460432361563.jpgFB_IMG_1460432370490.jpg

धन्यवाद मित्रांनो, मी सुद्धा प्रतीक्षेत आहे.
@नितीनचंद्र, मी सुद्धा पाहिलीय ती मुलाखत, सगळ्या नकारात्मक गोष्टीवर मात करत आपले धेय्य कसे गाठावे हे नागराज कडून शिकण्यासारखे आहे.
सगळे फोटो इंटरनेट वरून साभार.
@जिप्सी, @ऋचा, मोगली नंतरचा not to miss चित्रपट Happy

मस्त फोटूज आणि लेख

एक प्रश्न ....
फँड्री मधले 'तिचा झगा गं' ????
तुम्हाला "तुझ्या प्रीतीचा विंचू चावला" म्हणायचे आहे का

सुंदर ओळख

हिरोईन थोडी मृण्मयी देशपांडे सारखी वाटते का? विशेषतः तिचे डोळे आणि ओठ

एक प्रश्न ....
फँड्री मधले 'तिचा झगा गं' ????
तुम्हाला "तुझ्या प्रीतीचा विंचू चावला" म्हणायचे आहे का>>>>> तेच तर Happy

हिरोईन थोडी मृण्मयी देशपांडे सारखी वाटते का +१
फँड्री मुळे नागराज मंजुळे आणि टीम कडून खूप अपेक्षा आहेत. पहायचाच आहे हा सिनेमा.

सुंदर गाणी, अप्रतिम छायाचित्रीकरण आणि गोड हिरो हिरोईन! ह्या सिनेमाकडून फार अपेक्षा आहेत!
फँड्री थेटरात बघता आला नव्हता आणि नंतर झी टीव्ही वर बघताना १७६० जाहिरातींनी वैताग आला होता. सिनेमा बाजूलाच राहिला! सैराट मात्र थेटरात पाहायचा विचार आहे.

@किरण कुमार, @preetiiii, नाहि. तुम्ही म्हणताय ते तर मूळ गाणेच आहे. मला आता निठसे आठवत नाही पण एका सीन मध्ये ते गाणे आहे (गाण्याचे कडवे). पेप्सीकोला विकायला जात असताना जब्या आणि पिर्या हे गाणे गुणगुणत असतात.

अजुन एक महत्वाचे.."याडं लागलं ग याडं लागलं गं" गाणे हे असे पहीले भारतीय गाणे
आहे जे california - Symphony Orchestra in Hollywood इथे रेकोर्ड झाले आहे...इथे पहा

https://www.youtube.com/watch?v=yo4E0tWGcV4&nohtml5=False

सिनेमा येऊ द्यायचा होता. नाव चांगलं असलं तरी सिनेमा पाहील्याशिवाय काही सांगता येत नाही.

एक आहे, फ्रेश आणि गावाकडचे , कथेला साजेशे चेहरे देण्याची परंपरा इथेही जपलेली दिसते. नाहीतर वेडं वाकडं ग्रामीण चालवून घेत असतो आपण.

मस्त लेख...
वाट पाहतोय..२९ तारखेची..
नागराज मंजुळेचा आपण तर फॅन झालुया..
अजय अतुल च संगीत तर लय भारी...रोज ऐकतोय..मन तृप्त झालया..

झिंगाट गाणे नाही आवडले.. शांताबाई यासारखे वाटले.. कदाचित मी आता रात्रीच्या शांत मूडमध्ये ऐकल्याचा परीणाम असेल पंण अजय अतुलच्याच ईतर अश्या गाण्यांचा क्लास जाणवला नाही.. पुर्ण ऐकवले बघवले गेले नाही..

सैराट गाणे मात्र आवडले..
त्याचा विडिओही मस्त वाटला.. चित्रपटाबाबत उत्सुकता वाढवणारा ..

फँड्री देखील चांगला वाटलेला पण प्रभावी नाही .. जिथे पोहोचायला हवा तिथे तो पोहोचला नसावा.. ज्यांना तो शेवटचा दगड मारलाय त्यांनाच ते समजले नाही तर नेम चुकलाच ना

लेखाबद्दल धन्यवाद, या चित्रपटाबद्दल अजूनपर्यंत ऐकले नव्हते.

जिथे पोहोचायला हवा तिथे तो पोहोचला नसावा..>>> म्हणजे कुठे?

ज्यांना तो शेवटचा दगड मारलाय त्यांनाच ते समजले नाही तर नेम चुकलाच ना>>> तो दगड मला, तुला, सगळ्यांनाच मारलाय त्याने. त्या दगडाने दिसणारी जखम जरी केली नसली तरी नेम चुकला नाहीये त्याचा.

Pages