Dedicated to The God of Small Things...
कोणी कोणावर प्रेम करावं? आणि किती.. हे ठरलेलं आहे..
पहिल्या पावसाने दरवळावा आसमंत..
वार्यासोबत वाहत यावा आंब्याचा सुगंध..
नदीच्या शरीरात खोल घुसत जावेत भोवरे..
इतकं सहज प्रेम नाही होत माणसांच्या जगात..
जातीपातीच्या.. परिस्थितीच्या.. पैशाच्या.. रंगाच्या..
अनेक भिंती आहेत इथे..
आणि काही लक्ष्मणरेषा..
कधीच ओलांडू नयेत अशा..
ओलांडल्या तर जगबुडी होईल अशा..
कोणी कोणावर प्रेम करावं? आणि किती.. हे ठरलेलं आहे..
प्रेम म्हणजे नक्की काय हे बहुतेकांना माहित नसलं तरीही..
स्वतःच्या स्वतःला लागलेल्या शोधाला कोणी प्रेम मानलं तरीही..
आणि कोणाला सगळ्या व्याख्यांपलीकडे जाऊन प्रेम करता आलं तरीही..