सुख थोडं दु:ख भारी दुनिया ही भलीबुरी - "द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज"

Submitted by आशूडी on 24 June, 2014 - 15:09

अरुंधती रॉय यांच्या 'द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज' या बुकर अ‍ॅवॉर्ड विजेत्या पुस्तकाचा अपर्णा वेलणकर यांनी केलेला अनुवाद (हो, मी अनुवादच वाचते. चंपकइतक्या जाडीची पुस्तकं अजून इंग्रजीतून वाचली नाहीत त्यामुळे उत्तम साहित्य वाचायचं तर सध्या भिस्त उत्तम अनुवादकावर आहे खरी.) वाचला आणि अक्षरशः झपाटून गेले. पुस्तक संपलं तेव्हा आता करण्यासारखं उरलंच काय! अशी चुटपूट मनाला लागून राहिली. एवढ्या नितळ पारदर्शी पुस्तकाबद्दल लिहायला हवंच पण तेवढी आपली पोच नाही याची प्रामाणिक जाणीव मनात होती, आहे. सकाळचा विचार रात्रीपर्यंत टिकला तर लिहायचं असं ठरवलं होतं. तेव्हा मायबोलीवर या पुस्तकाबद्दल झालेली इथली http://www.maayboli.com/node/2685?page=50 चर्चाही वाचून काढली आणि मग लिहावंसं वाटलंच.

पुस्तकाच्या सुरुवातीलाच असलेले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अभिप्राय वाचूनच दडपायला होतं. केरळमधली गोष्ट. कुठलाही स्थलकालाचा हिशेब न मांडता तेवीस वर्षांच्या कालखंडात स्वैर बागडते. पांढर्‍या कोर्‍या जागा वाचकाला शहाणे करुन सोडतात. कुठून कुठे आलो, ओव्हर टू ... , बॅक टू .. फटाफट खिट्ट्या पडतात रुळांचे सांधे बदलले जातात गाडी या पट्टीवरुन त्या पट्टीवर कधी गेली ते प्रवाशाला समजतही नाही आणि हळूच समजते पण.

दोन चिमुकल्यांच्या भावविश्वाची कहाणी. ट्रुथ इज स्ट्रेंजर दॅन फिक्शन, नथिंग इज फिल्मी सगळं सगळं एका दमात वाजवून खरं करुन दाखवणारी कहाणी. शोकांतिका; पेक्षा शोकसोहळा. वाचता वाचता कुठून तरी करुण सूर कानावर येऊ लागतात आणि ते शेवटपर्यंत पिच्छा पुरवतात. अनाम दु:ख हळूहळू घेरत जातं. तुम्ही आधीन होता त्याच्या. नियतीच्या मनात नेहमीच काहीतरी वेगळं का असतं? माणसं अशी का वागतात? सनातन प्रश्नांना कधीच उत्तरं नसतात. पण प्रत्येक गोष्टीची एक किंमत असते. ती कोण ठरवतं? जेवढा अपराध तेवढीच शिक्षा (पाहिजे, पण होत नाही तसं!). दोन जुळ्यांचं भावविश्व ज्या अजब रितीने गुंतलेलं असतं ते पाहून डोळे विस्फारतात. स्वच्छंद बालपणाला शिस्तीचं कुंपण घातलं तरी निरागसता उमलून येतेच. पानापानावर होणारा गोंडस कोवळ्या बाल्याचा मुक्त आविष्कार पाहून मन मुग्ध होतं आणि या बिचार्‍यांना पुढे काय सोसावं लागणारे या कल्पनेने विद्धही. इस्था आणि राहेल यांची वर्णनं वाचताना, त्यांची गोड गोड गाणी ऐकताना, त्यांचे 'उद्योग' बघताना हसू फुटतं. केसांचा कोंबडा = इस्था आणि 'लव्ह इन टोकियो' दोन मणी लावलेलं डोक्याचं कारंजं = राहेल (डम डम.) हे समीकरण पक्कं लक्षात राहतं - राहेलच्या प्लॅस्टिकच्या घड्याळावर एकदाच पक्की वेळ चिकटवलेली असते तसं - दोनला दहा कमी! त्या दोघांचं ते अबोध वय हा संपूर्ण कादंबरीचा केंद्रबिंदू आहे. फक्त आणि फक्त, ते लहान असतात म्हणून असं सगळं घडतं!

केरळचं उतू जाणारं पावसाळी हिरवं ओलं कच्चं निसर्गसौंदर्य, गुण्गुण्णारे कीडे, टकमक बघणारे पक्षी, खारवलेल्या लोणच्यांचा तिखट आंबट वास, साउंड ऑफ म्युझिक मधलं गोड गोड चित्रण ( जे फक्त सिनेमातच असतं असं इस्था राहेलला समजतं) पावसाच्या गूढ पार्श्वसंगीतावर तोललेलं संपूर्ण घटनाचक्र. सख्ख्या नात्यांची गुंतागुंतीची वीण, स्वार्थ, असूया, हेवा, वरवरचं प्रेम, निर्व्याज प्रेम, माया समाजकारण आणि राजकारणाचे (उगीचच) व्यक्तिगत आयुष्यांवर झालेले परिणाम, फक्त एकेका चुकीच्या निर्णयाने उद्ध्वस्त झालेली वैराण आयुष्यं (मग ते पाप्पाचींच्या 'पतंगा'चा चुकीचा निवाडा असो की शिक्षणासाठी ऑक्स्फर्डला गेलेल्या चाकोने लग्न करुन बसणं असो की सोफी मॉलनं इस्था आणि राहेलच्या सोबत जाण्याचा हट्ट असो की अम्मूनं एकदाच आपल्या मनाची ऐकलेली हाक असो! ) प्रत्येक पात्र यथास्थित उभं करण्यासाठी लेखिकेने दहा दहा पानांचा ऐवज वापरला आहे आणि म्हणूनच हे सारं डोळ्यासमोर प्रत्यक्ष घडत आहे इतकं चित्रदर्शी होऊन जातं. (मला तर बेबी कोचम्मा म्हणजे उषा नाडकर्णी आणि अम्मू म्हणजे नीना गुप्ता अगदी ठसठशीत दिसल्या. आणि वेलुथा कदाचित नसीरुद्दीन शाह) या कहाणीत पाझरणारी माया आहे, उसनं अवसान आणलेलं, मनापासून केलेलं, उत्कट, जन्मजात, निरपेक्ष अशा अनेक छटांचं प्रेम आहे, अधीर शृंगार आहे, अश्रूपात आहे, ज्यांना उफराटी उत्तरं मिळतात असे क्षुल्लक प्रश्न आहेत, यात नाट्य आहे, कपट आहे, क्रौर्य आहे, पराभव आहे आणि अखेर स्वतःच स्वतःला माफ करावं लागतं हे तात्पर्यही! मोठ्यांच्या मोठ्या जगात गुपचूप आपली अनेक छोटी छोटी जगं निर्माण करण्याचं इस्था आणि राहेलचं सामर्थ्य.. पाण्यावर वाहून गेलेली, पृथ्वीच्या पोटात रुतलेली, गाडलेली, वार्‍यासवे उडत गेलेली त्यांची लाखमोलाची गुपितं.. या सार्‍यात आपण गुंगून जातो. 'द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज' - छोटे छोटे आनंद.. आयुष्यभर सुखाची पखरण करण्याची शक्ती असलेली इवलाली बीजं.. आपल्या ड्रॉवरमध्येही आपल्या पूर्वायुष्यातले असे क्षण गोठवून ठेवलेले दिसतात कधी कधी.. हीच बीजं क्रूरपणे उधळली गेली तर होणार्‍या नुकसानाची भरपाई शक्य नाही! द गॉड ऑफ लॉस! अपराध छोटा,शिक्षा मोठी.

इस्था आणि राहेलसाठी लेखिकेने लिहीलेले छोटे छोटे पण नंतर मोठे होऊन बसलेले तपशील हे या कादंबरीचं बलस्थान आहे. एखादी गोष्ट या दोघांच्या मनात पक्की ठरली की नंतर मनातल्या मनात म्ह्टलेलं 'डम डम' कायमचं लक्षात राहणार आहे. खूप घाबरल्यावर, ओरड्याच्या शिक्षेच्या भीतीला पळवून लावण्यासाठी म्हटलेली गाणी अतिशय गोड आहेत. कंसातली वाक्यं, अधोरेखन, बोल्ड, इटालिक टाईपचा वापर जे म्हणायचं आहे ते बरोब्बर पोचवतो. वेलुथाला पाहून फुलून येणारी राहेल अगदी आजूबाजूला बागडते आहे असं वाटतं. मानवी भावभावनांचा निर्वाणीच्या क्षणी कसा कस लागतो आणि शेवटी घाणेरड्या तेलासारखा तवंग धरुन स्वार्थच कसा वर येतो हे शेवटच्या काही प्रसंगात बेमालूमपणे दाखवले आहे. सुरुवातीपासून ओरडून ओरडून शेवट सांगत राहूनही शेवटी शेवट येतो तेव्हा घालमेल होते. कोणतेही धक्कातंत्र न वापरता, वाचकाला नक्की काय घडलं होतं तेव्हा? ते पडदा बाजूला करुन नीट दिसतं. सगळे संदर्भ लागतात, तपशील जुळतात. अनपेक्षित असं काहीच नसतं तरीही असं कसं झालं? हा प्रश्न पडतोच. घराच्या अंतर्गत राजकारणाला फुकट मिळालेले मार्क्सवादाचे, जातीयतेचे अस्तर लागते आणि भलतीच क्रांती घडून नीट घडी बसलेल्या घराची कल्पनातीत उलथापालथ होऊन झालेली वाताहत हताश करते.

प्रेम कुणी कुणावर करावं, किती करावं, कसं करावं याचे खरंच जगाने घालून दिलेले कायदे आहेत हे लख्ख जाणवतं - जेव्हा ते नियम मोडल्याची काय जबर शिक्षा असू शकते हे दिसतं तेव्हा. नियतीचे अपरिहार्य पाश आवळले जात असताना, पानापानातून शोक ठिबकत असताना शेवट कळून चुकतो तरीही तिथपर्यंत पोहोचायचे धाडस होत नाही. आयमेनेम हाऊसभोवती तेवीस वर्षं कोसळणार्‍या सरींनी भिजलेल्या झाडोर्‍यातलं प्रत्येक ओलं पान या पुस्तकाच्या पानात अवतरलं आहे. भिजलेल्या नोटेगत त्यातल्या दु:खाचं मोल जपावं..पुस्तकाच्या पानांतून अडकलेल्या इस्था आणि राहेलला पटकन बाहेर ओढून घ्यावं आणि छातीशी धरुन त्यांचे मुके घ्यावेत, त्यांना शेवटापासून दूर दूर न्यावं असं वाटत राहतं. पण तसं होणार नसतं! कारण प्रेम कुणी कुणावर करावं, किती करावं, कसं करावं याचे खरंच जगाने घालून दिलेले कायदे आहेत!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदम नाट्यमय लिहीलं आहे .. पुस्तक वाचायची इच्छा होत आहे .. Happy

अपर्णा वेलणकर म्हणजे फॉर हियर ऑर टू गो वाल्या ना?

पण पुस्तक इंग्रजीतूनच वाचा. मूळ भाषेची मजा अनुवादात नाही. इतकी रिच आणि सुरेख भाषा. वर्णने अप्रतिम आहेत. मी आत्ताच परत वाचून काढले. पहिल्यांदा वाचले तेव्हा एस्था राहेल च्या भूमिकेतून वाचले होते ( टाकून दिलेली मुले. कोणालाच नको असलेली, आईला जड झालेली. ) पण आता अम्मूच्या आणि सोफी मोलच्या आईच्या भूमिकेतून वाचले. अम्मूची शोकांतिका आहे ही.

आई शप्पत आज सकाळी उठल्यावर हा विचार आला होता. कुत्रे पहाटे उठून आवाज आणि हिंडायला जायची घाई करतात तेव्हा मी त्यांना ट्विन अँबॅसॅडर्स ऑफ मिझरी म्हणते त्यापासून विचार चक्र सुरू झाले आणि आता हिने लिहीलेले वाचले. वेलुथाच्या स्वभावातील गोडवा! अगदी रडवतो. बरेचसे संवाद अगदी नाट्य छटे सारखे बोलून बघितले तर फार मजा येते. साउथ मध्ये राहिल्याने काही गोष्टी फिट बसलेल्या कळतात.

साउंड ऑफ म्युझीक बघायला जायची ट्रिप, एअपोर्ट व्हिजिट सोफी मोलचे लाड व मुलांकडे दुर्लक्ष, बेबी कोचम्मा चा व आईचा स्वभाव, अम्मूच्या वडिलांचा वाइट पणा व फ्रस्ट्रेशन. काय काय लिहिणार अनेक लेयर वर लिहीलेले पुस्तक आहे

इंग्रजीतूनच वाचा. आग्रहाने परत.

केलं असतं अम्मू आ णि वेलुथाने प्रेम तर जगाचं काय बिघड्णार होतं मुलांना चांगला प्रेमळ बाप सद्रष्य मित्र मिळाला असता तर काय झाले असते? अगदी उकलून जायला होते.

मी सुट्टीत गोव्यात झोपाळ्यावर बसून बरेच वाचले. व क्लायमॅक्स व एक उत्तम व सेन्सिटिव प्रेम सीन आहे शेव्टी तो नेमका फ्लाइट मध्ये परत येताना. घरी कशी येउन पोहोचले समजलेच नाही.

आयमेनेम हाउस अगदी रक्तात उतरले आहे. त्यात अरुंधती तेव्हा पुस्तकाचे प्रमोशन करत होती तेव्हा आयमेनेम असे म्ह्णत असे ते हि इतके एक्सॉटिक वाटायचे.

ह्यात एक वाक्य आहे गोइंग टू डॉग्ज दिस इंडिया इज. विमानातून उतरलेले परदेशस्थ मनात म्ह्णतात ते! इतके चपखल बसवले आहे ते वाक्य. क्या बात क्या बात. !

वा! काय सुंदर लिहिलं आहेस. मला पुस्तक वाचल्यावर जे, जसं आणि जितकं वाटलं होतं, ते, तसंच आणि तितकंच तुलाही वाटलं हे पाहून मुळात मला फार आनंद झालाय. (कारण मिवापुवरच्या चर्चेत पुस्तक आवडलेलं कुणीच सामिल झालं नव्हतं. Wink )
खूपच छान Happy

माझंही आवडतं पुस्तक. लिरिकल भाषा आहे. अनुवाद वाचला नाहीये, पण मूळ इंग्रजी पुस्तकातले तपशिल, भाषा, नात्यांची उकल अप्रतिम.

खूप पूर्वी इंग्रजीतून वाचलं आहे. हे रसग्रहण वाचत असताना ती चित्र डोळ्यासमोर पुन्हा येत होती. ऐन पावसाळ्यात वाचत होते पुस्तक त्यामुळे केरळ अवतीभवती अवतरल्यासारखा वाटत होता!
आशुडी, फार छान रसग्रहण! शीर्षक अगदी चपखल! पुन्हा पुस्तक उचलून वाचावंसं वाटलं. त्या वेळी पुस्तक संपल्यावर मात्र एखाद्या पोकळीत जाऊन बसावं आणि भरून आलेलं सारं रडून मोकळं करावं असं वाटत होतं! नंतर अनेक दिवस ते पुस्तक नजरेआड राहील असं ठेवलं होतं.
अमा, तुम्ही खूप वेगळंच आणि मस्त लिहिता! मला तुमच्या सर्व विषयावरच्या कॉमेंट्स खूप आवडतात!

धन्यवाद सर्वांना.
मूळ पुस्तक वाचण्याच्या आग्रहामागची कळकळ पोचली. पण तरीही प्रश्न असा पडतो की मग अनुवाद कशाला करतात? इंग्रजीचे एक वेळ चालून जाईल पण भैरप्पांची कन्नड पुस्तके, तोतोचान, गोड गोड फ्रेंचजपानी कथा कशा वाचायच्या? अनुवाद न वाचताच "पेक्शा मूळ पुस्तक वाचा" असा आग्रह म्हणजे अनुवादकावर प्रश्नचिन्ह आहे. मूळ कथेला सर्वांगाने दुसऱ्या भाषेत आणताना धडपड होणारच. पण तर त्याचा दर्जा सबटायटल्स इतका खाली उतरत नाही. अपर्णा वेलणकरांनी अत्यंत ताकदीने भावानुवाद करून इतकं अस्सल उतरवलं आहे की मूळ वाचायची गरज वाटू नये!

आशूडी- कितीही उत्तम अनुवाद असला तरी मूळ भाषेतली लय, गोडवा, भाषेची संस्कृती हे फक्त पंचवीस टक्केच अनुवादात उतरु शकते असं म्हणतात. कथानक कळणे म्हणजे पुस्तक कळणे नाही. याकरताच जर भाषा येत असेल तर मूळ भाषेतले पुस्तक वाचण्याचा आग्रह असतो. विशेषतः जेव्हा एखादे पुस्तक भाषेकरताच नावाजलेले असते तेव्हा. क्राइम थ्रीलर्स वगैरेमधे हा आग्रह नसतो.

बरोबर शर्मिला. Happy
पण तिला २५% च हवेत, हे तिने आधीच स्प्ष्ट करून टाकलं आहे. Proud जौद्याझालं.

आधी अनुवाद वाचून मग मूळ वाचावंसं वाटणं आणि मग पुन्हा अनुवाद वाचावंसं वाटणं - असंही होतं- असं ललिताने 'मी वाचलेले पुस्तक' धाग्यावर लिहिलंच आहे. कुणाला काय नि कसं मोटिव्ह मिळेल सांगता येत नाही. त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे कुणाला काय आवडेल तेही सांगता येत नाही. हे पुस्तक इथल्या अनेक लोकांना आवडलं नाही. मला मात्र ते अविस्मरणीय वाटतं. नुसत्याच भाषेच्या सौंदर्यासाठी नाही, तर लेखनतंत्र आणि कथानक या गोष्टींसाठी. त्यातल्या पात्रांसाठीही.

'कॅचर इन द राय' च्या अनुवादातली अर्पण पत्रिका आता सहज आठवली..

"मूळ पुस्तक वाचता येत असेल तर अनुवाद कशाला वाचायचा असं म्हणणार्‍या तुला अर्पण..
हा अनुवाद वाचू नकोस, पण आवडलेल्या पुस्तकांचे अनुवाद नक्की कर कधीतरी.."

(अनुवादावरून चाल्लंय, म्हणून आठवलं. इथं चाललेल्या विषयाशी फार संबंध नाही. संजय जोशींचं फारसं वाचलेलं नाही, वाचलंय तेवढं आवडलं की नाही, हीही निराळीच गोष्ट.)

***

एक वेगळा अँगल असा आता सूचला, की अनुवाद वाचले गेले नाहीत, तर (बहुसंख्येने) होणार नाहीत. आणि आपण (मराठी साहित्य, लेखक, वाचक) किती पाण्यात आहोत, ते आपल्याला कधीच कळणार नाही. (आणि मग गुर्जी म्हणतात तसं मराठी साहित्य म्हणजे जागतिक साहित्य सोसायटीतली झोपडपट्टी बनून राहील. :फिदी:)

ज्या भाषेतली पुस्तकं इतर भाषांमधे जास्तीत जास्त अनुवादित होतात ती भाषा जागतिक साहित्यात समृद्ध मानतात. इंग्रजी भाषेतली जास्तीत जास्त पुस्तकं मराठीत कशी अनुवादित होतील या काळजीपेक्षा मराठीतली इतकी कमी पुस्तकं इतर भाषांमधे का अनुवादित होतात ही काळजी करणं जास्त महत्वाचं नाही का? Wink

आता झोपडपट्टी आहे, हे एकदा ठरल्यावर काय अनुवादित करणार? :त्यापेक्षा आधी दुसर्यांचं वाचून आपल्यात अनुवादित करून झोपडीचं स्टुडिओ अपार्टमेंट तरी होतंय का बघूया. Proud असो..

हो शर्मिला. तसं तर मूळ पुस्तक न वाचता अनुवाद उत्तम झाला आहे असं तरी कसं म्हणू शकते? पण मग तेच इतरही भाषेतल्या पुस्तकांबद्दल आहे. ओढूनताणून न केलेली शब्दरचना, वाचताना मूळ रचनेच्या कल्पनेचं भूत मानगुटीवर नसणं आणि कथेचा गाभा, लय, सौंदर्य जपणं हे माझे तरी उत्तम अनुवादाचे निकष आहेत. 25 टक्के तर तेवढेच.. अगदीच काही नसण्यापेक्शा!
साजिऱ्या, असं गुर्जींनी कोण किती पाण्यात आहे ते पाहिलं तरी 'ते आम्हाला पाण्यात पाहतात' म्हणतात. जाऊदे. आम्ही 25 टक्के पाण्यात. Proud

या काळजीपेक्षा मराठीतली इतकी कमी पुस्तकं इतर भाषांमधे का अनुवादित होतात ही काळजी करणं जास्त महत्वाचं नाही का? >> शर्मिला, तुम ये वाचक की हैसियत से पूछ रही हो या लेखक के? Happy
अनुवादांना प्रोत्साहन देऊन उत्कृष्ट जागतिक साहित्य वाचायला मिळावं, मूळ किंवा अनुवाद वाचून आपण स्वत: किती समृद्ध होतो अशी चर्चा चालू आहे ना?

आशू,
सुरेख लिहिलं आहेस...

या पुस्तकातली भाषा समृद्ध आहे, पण तिचं अलंकरण मला ओढूनताणून केलेलं वाटतं. अनुवादाबद्दल बोलायचं, तर 'भावानुवाद' हा फार्फार सोयीचा शब्द आहे. मूळ लेखकाला अभिप्रेत असलेला अर्थ वाचकांपर्यंत पोहोचवता न येणं या शब्दामुळे लपून जातं. मग मूळ पुस्तक आणि अनुवाद शेजारीशेजारी ठेवले, की अनुवादकाची चलाखी लक्षात येते. मात्र 'अनुवाद' वाटेल अशा शैलीत मूळ लेखकाच्या लिखाणात भर घालायला आवश्यक असणारं भाषेचं सामर्थ्य अनुवादकाच्या ठायी आहे, याचं कौतुकही वाटतं. Happy

एक वेगळा अँगल असा आता सूचला, की अनुवाद वाचले गेले नाहीत, तर (बहुसंख्येने) होणार नाहीत. >>> या साजिराच्या मुद्द्यावरचं माझं मत आहे ते.

एनीवे, अनुवादापेक्षा मूळ पुस्तक 'शक्य असेल तर (म्हणजे मूळ भाषा येत असेल तर) वाचावे' इतकंच माझं मत. ते मांडुन झालं आहे. तुझ्या मताचा आदर आहे. बाकी चर्चेत मला रस नाही. यू कॅन कंटीन्यू..

मला खरोखरीच माझ्या पहिल्या पोस्टीत विचारलेला प्रश्न पडला होता ज्याचे बऱ्यापैकी निरसन झाले आहे. शर्मिला,गैरसमज नसावा. Happy

अनुवादावरून चाललेलेच आहे तर: 'मीवापु' बाफावर लिंक दिलेला एक ब्लॉग वाचला.

...(काफ्काची पुस्तके) इंग्रजीमधून वाचणारे सर्व वाचक आणि काफ्का यांच्यामध्ये आणखी एका व्यक्तीची भर पडली आहे. ती व्यक्ती आहे अनुवादक. काफ्काने सर्व पुस्तके जर्मन भाषेत लिहीली आणि ती लिहीताना त्याने जे शब्द वापरले त्याला विशेष अर्थ होते. उदा. या पुस्तकात कायदेशीर कार्यवाहीसाठी काफ्का Verfahren हा शब्द वापरतो, पण या शब्दाचा आणखी एक अर्थ 'ठरवलेल्या मार्गापासून ढळणे' असाही होतो. अशा प्रकारचे शब्दखेळ काफ्का फक्त गंमत म्हणून करतो आहे की यातून त्याला आणखी काही अभिप्रेत आहे याबद्दल मतांतरे आहेत पण इंग्रजीत वाचताना हे सगळेच 'लॉस्ट इन ट्रान्सलेशन'मध्ये गमवावे लागते...

अनुवाद वाचताना आपण नक्की काय गमवलं, याचा अंदाज येणे खरेच कठीण आहे- हे मान्य. (विषयांतराबद्दल सॉरी, आशूडी) आता पुस्तकाकडे नि बाफाकडे वळा. Proud

सॉरी काय. उलट मीच थँक्यू. मी हेच तर लिहायचा प्रयत्न करत होते पहिल्या पोस्टीपासून की इंग्रजीचे एकवेळ ठीक आहे इतर भाषांचे काय? तिथे सगळेच 25 टक्केवाले.

आशुडी. अगदी अगदी. मनात घर करुन राहीलेलं पुस्तक आहे हे. बराच काळ त्यातली पात्र आपल्या सोबत राहतात.

नीना कुलकर्णी, नसीर पण व्हिज्युअल्स मध्ये फिट होत नाही. मलयाळी माणसांचे काटक काळे सोनेरी
सौन्दर्य वेगळेच असते तिथे शाह म्हणजे सांबाराबरोबर बिर्याणी. मिले सुर मेरा तुम्हारा मध्ये एक माणूस आहे तो फिट आहे वेलुथाला. इथे खालील लिंक मध्ये ३.१६ ला एक माणूस आहे तसा.

https://www.youtube.com/watch?v=-jf6pwtPqCs

अमा, पर्फेक्ट! पुस्तक वाचताना 'मिले सूर..'मधला तो माणूस माझ्याही डोळ्यांसमोर आला होता. Happy

अनुवादावरून विषय चाललाच आहे, तर .....
चिन्मय, तुझ्या पोस्टच्या संदर्भात -
उदाहरणार्थ - 'स्नो'चा अनुवाद आणि हा 'गॉड ऑफ..' चा अनुवाद यांची मनोमन तुलना झाली. (तसा थेट संबंध काही नाही, पण जागतिक स्तरावर गाजलेल्या दोन पुस्तकांचे तसे नुकतेच वाचलेले हे दोन अनुवाद, म्हणून केवळ..)
तर, 'स्नो'चा अनुवाद हा मला खूप रुक्ष वाटला होता. तेच, 'गॉड ऑफ..'चं अनुवादवाचन खूप आनंददायी वाटलं मला. वातावरणनिर्मिती, कथापरिसराची अनुभूती ही 'स्नो'च्या अनुवादात आली नाही. त्यातलं वातावरण अपरिचित, परदेशी आहे हा मुद्दा जरी मान्य केला, तरी अशी अनुभूती वाचकांना यायला हवी की नको? मग त्यासाठी थोडी भावानुवादाची कास धरली, (तू लिहिलं आहेस, त्याप्रमाणे) 'अनुवाद' वाटेल अशा शैलीत मूळ लेखकाच्या लिखाणात भर घालणारी भाषा वापरली, तर त्याला गैर म्हणावं काय?

प्रीति,

वातावरणनिर्मितीसाठी किंवा अपरिचित गोष्टींच्या परिचयार्थ थोडी भर घालणं / समजावून सांगणं मला मान्य आहे. पण 'भावानुवाद' म्हणत (जरी ते मूळ लेखनाशी सुसंगत वाटत असलं, तरी) इतर काही बदल करू नयेत, किंवा भर घालू नये, असं माझं मत आहे. या लेखिकेचे दोन अनुवाद मी वाचले. शोभा डे यांचं आत्मचरित्र आणि 'गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज'. पैकी शोभा डेंचं आत्मचरित्र आधी मराठीत वाचलं. नंतर सहज म्हणून मूळ इंग्रजी पुस्तक हाती घेतलं, तर बरेच बदल केले होते. शब्दांच्या छटांमध्येही फरक होता. म्हणून हा दुसरा अनुवाद बघितला, तर इथेही तेच. हे बदल करणं आवश्यक होतं, असं मलातरी तेव्हा वाटलं नाही. नंतर मग शांताबाईंचे एकदोन अनुवाद तपासून बघितले. त्यांनी वातावरणनिर्मितीसाठी केलेले किंचित फरक लक्षात आले. पण मूळ आशयाला, शब्दांना, अर्थाला कुठेही धक्का लावलेला दिसला नाही.

'भाषांतर की अनुवाद' या वादाबद्दल त्यात वाचलं. हे दोन शब्द आपण एकमेकांसाठी सर्रास वापरतो, पण ते तसे नाहीत. नाटकांमध्ये किंवा कादंबरीत तपशील महत्त्वाचे असतात. तिथे कदाचित भाषांतर करून चालणार नाही. पण संवादांचं भाषांतर करताच येत नाही, असं कुठे? मूळ लेखकानं संवादांची, शब्दांची रचना काहीएक विचार करून केलेली असू शकते. 'भावानुवाद' करताना त्या रचनेची काळजी घेतली जावी, असं मला वाटतं. हेच मी आशयाबद्दलही बोलेन. सध्या दर आठवड्याला प्रकाशित होणार्‍या 'भाषांतरित' कादंबर्‍या किंवा आत्मचरित्रं जितकी त्रास देतात, तितकाच त्रास दुर्दैवानं हे 'भावानुवाद'ही देतात.

योगायोगानं याबद्दल चर्चा करणारा एक लेख नुकताच वाचनात आला. मं. वि. राजाध्यक्षांचे निवडक लेख वाचत होतो. त्यात त्यांनी शेक्सपीअरच्या साहित्याच्या मराठी अनुवादांबद्दल लिहिलं आहे. आगरकर, गुर्जरांपासून ते कुसुमाग्रजांपर्यंत. 'भाषांतर की अनुवाद' या रंगलेल्या वादाचीही त्यात चर्चा आहे. हे जुने लेख मिळवून वाचायला हवेत.

Sorry for English.

In the above book, the characters are Catholic Christians and their mediam of communication is English. The kids recite verses backward No translation can bring about the beauty of the moment when a visiting nun thinks kids are visited by Satan. You cannot bring these cultural nuances into a translation. If you please, read the chapter on the funeral in the early pages. the sheer beauty of language is suffocating. Like rain soaked Kerala Afternoons. and how do you translate Bluegrayblue eyes? Sophikins, Soph?

Pages