कधीतरी अनपेक्षित पणे खोल काळोखाच्या गर्तेत तुम्ही भोवर्यात फिरत असल्याचे जाणविते तेव्हा अर्थातच पायाखाली जमीन नसते. कृष्णाने जे जे केले ते त्याची माया. आपण जे जे केले ती माया नाही. माया जमा केल्यास काया-वाचा बंद होते माया काय आणि पाप पुण्याचा हिशोब काय ! सारे म्हणे साठून राहते . संचित. माया संचित नसते. मायावी जगात आल्यानंतर माया आणि मोह अनेक प्रकारे येऊ लागतात आपल्या सहवासात. कोणी म्हणते " आयुष्य जगण्यासाठी आहे. कल का किसने देखा है ! " काही लोक मात्र कल - आज - और- कल सारेच बघतात.
लिखाणाची पण एक गम्मत असते. लिहावेसे वाटते तेव्हा लिहायला समोर काहीच नसते. किवा लिहिण्याची परिस्थिती नसून ड्रायव्हिंग किवा अशी काहीशी अस्थिर अवस्था असते. डोक्यात विचारांचे थवेच्या थवे उडू लागतात. एका मागोमाग एक.. लयबद्ध .. शिस्तीने. एखाद्या उघड्या खिडकीतून कोणा काळाचे प्रतिबिंब उमटते. गुंतता- गुंतता विचारांचे विषयवार लेखन करावेसे वाटते. परंतु लिखाण होत नाही. लिखाण होणार नाही हे पुर्वानुभ्वे लक्षात घेता ; हे लक्षात आले असल्याचेही नमूद करण्याची नोंद मन घेते. आणि पुन्हा विचार ..आणि पुन्हा एक " गुंता "