'वन-विदिशा' : संरक्षण, नाश, पुनरुज्जीवन - Full Film Experiment by Rahi Anil Barve
काही चित्रपट असे असतात की ते संपल्यानंतर खरा चित्रपट आपल्या मनात सुरू होतो. 'वन-विदिशा' हा माझ्यासाठी तसाच एक अनुभव.
या चित्रपटात एक वनरक्षक स्त्री दाखवलेली आहे आणि एक सामान्य स्त्री दाखवलेली आहे. वनातली ती विशेष स्त्री ही फक्त एक व्यक्ती नसून ती जणू जंगलाचा आत्माच आहे असे वाटते. तिच्याबद्दल चित्रपटात एक वाक्य येते – "To protect is to be alone" म्हणजे संरक्षण करायचे असेल तर अनेकदा एकटे राहावे लागते. हे वाक्य फक्त तिच्या आयुष्याबद्दल नाही; ते जगातल्या प्रत्येक जपणाऱ्या व्यक्तीबद्दल आहे. आई असो, शिक्षक असो, पर्यावरण वाचवणारा माणूस असो किंवा एखाद्या नात्याला जपणारी व्यक्ती असो जपण्यामध्ये अनेकदा एकटेपणाची किंमत द्यावी लागते.
चित्रपटातील दुसरा पुरुष मात्र याच्या अगदी विरुद्ध आहे. त्याला स्वतःच्या शक्तीचा अभिमान आहे. तो जंगलात येतो, मासे मारतो, जीवनाशी खेळतो, लोकांना मोहात पाडतो आणि आपला सर्व गोष्टींवर अधिकार असल्यासारखे वागतो. त्याच्या कृतींमध्ये एक गोष्ट सतत जाणवते – त्याला वाटते की सुंदर, जिवंत आणि निर्मित झालेल्या प्रत्येक गोष्टीवर त्याचा अधिकार आहे. वनातल्या सामान्य स्त्रीला तो मोहात पाडतो आणि मॅजिक वॉटर पाजतो. हे काय आहे? असं तिने विचारताच क्रूर हसून म्हणतो it dissolves womb. I won't have bastard from tribal whore. याचा अर्थ जे सुंदर आहे ते तो भोगू शकतो पण त्याची जबाबदारी घेऊ शकत नाही .
इथे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे आपण जे निर्माण करू शकत नाही ते नष्ट करण्याचा आपल्याला अधिकार आहे का?
माणूस झाड, जंगल, जीवन निर्माण करू शकत नाही; पण त्याचा नाश मात्र सहज करू शकतो. क्षमता आणि अधिकार या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एखादी गोष्ट नष्ट करण्याची ताकद आपल्याकडे आहे, म्हणून ती योग्य ठरत नाही.
या चित्रपटात जेव्हा मासे मरतात किंवा हरणांचा नाश होतो, तेव्हा वनविदिशा त्यांना पुन्हा जीवन देते. इथे चित्रपट एक मोठे सत्य सांगतो... जे उत्तम, उदात्त आणि उन्नत आहे ते ते पुनरुज्जीवित होते, त्याच्यात पुन्हा उभे राहण्याची क्षमता असते. प्रेम, करुणा, सौंदर्य आणि जीवन या गोष्टी काही काळासाठी दडपल्या जाऊ शकतात; पण त्या पूर्णपणे नष्ट होत नाहीत.
या सगळ्या कथेमध्ये सर्वात जास्त विचार करायला लावणारे पात्र म्हणजे तो तिसरा पुरुष जो काहीच करत नाही, फक्त बघत राहतो. तो कुणाला मारत नाही. तो जंगल नष्ट करत नाही. तो कोणतीही स्पष्ट वाईट कृती करत नाही. पण तो सगळं घडताना शांतपणे बघतो.
इथे चित्रपट पुढचा अस्वस्थ करणारा प्रश्न ठेवतो: -
वाईट करणारा जितका दोषी असतो, तितकाच नुसते बघत राहणारा देखील दोषी असतो का?
आजच्या समाजात हे खूप लागू पडते. अन्याय घडतो, हिंसा घडते, निसर्गाचा नाश होतो, नाती तुटतात; पण अनेकदा आपण म्हणतो. "मी काही केले नाही." पण प्रश्न असा असू शकतो. "तू थांबवण्याचा प्रयत्न तरी केलास का?"
चित्रपटाच्या शेवटी जो नाश करणारा पुरुष असतो तो स्वतःच स्वतःचा नाश करून घेतो. ते दृश्य सांगते की जो सतत विनाश पेरतो, तो शेवटी स्वतःच स्वतःच्या सर्वनाशास कारणीभूत ठरतो.
चित्रपटाचा गाभा एका वाक्यात सांगायचा झाला तर........
जे आपण निर्माण करू शकत नाही ते नष्ट करण्याचा आपल्याला अधिकार नाही. आणि जो नुसता नाश करतो तो हरतो; पण जो फक्त बघत राहतो, तो ही एक दिवस शिक्षेस पात्र ठरतो .
_______________________________________________________________________________________________________
* राही अनिल बर्वेंच्या व्हिज्युअल्स ची मी फॅन आहे .
* त्यांच्या इतर फिल्म्स प्रमाणेच चित्रपटात दिसणारे कुंद, अंधारे , दमट वातावरण चित्रपटाला वेगळी intensity देते .
* वन - विदिशा चे छायाचित्र ज्यांनी रेखाटले आहे त्याला सलाम, फार सुंदर आहे. तिचे विविध tribal दागिने, वेष म्हणजे डोळ्याला फिस्ट आहे .
* तळ्यातून दौडत जाणारी हरणे आणि त्या तळ्यात फुललेली कमळे हे दृश्य अत्यंत मनोहारी आहे.
* वन-विदिशेचे प्राणि प्रेम वाखाणण्याजोगे आहे कारण एक काजवा आणि एक छोटे मरणासन्न हरिणाचे पाडस तिच्याजवळ येऊन वनसंरक्षण करण्यासाठी विनंती करतात ते दृश्य सुद्धा अस्वस्थ करणारे आहे.
* बघा पुरुष आणि एक मुख्य पुरुष ही दोघेही उत्तम साकारले आहेत.
* experimental फिल्म्स मध्ये संवाद नेहमीच सरळ किंवा परिचित भाषेत नसतात. एखादी आदिवासी / स्थानिक बोलीभाषा वापरलेली असते, कधी जाणीवपूर्वक बनवलेली (constructed) भाषा असते, किंवा काही वेळा शब्दांपेक्षा आवाज, लय, ध्वनी, डार्कनेस यांना जास्त महत्त्व दिलेलं असतं. या सिनेमात या सगळ्याचा उत्तम मेळ दिसतो.
जरूर बघा. चित्रपट यू ट्यूब वर आजच रिलीज झाला आहे.

छान परिचय. बघणार. लिंक
छान परिचय. बघणार. लिंक दिलेली नाही, शोघून काढतो. हा पण AI वापरून बनवला आहे का?
वाह दक्षिण.किती सुरेख लिहितेस
वाह दक्षु.किती सुरेख लिहितेस. खूप उत्सुकता वाढलीये. आजच पाहीन
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=Jg1-f2zZRdo
ही लिंक आहे, ३६ मिनिटांची film आहे.
हो केशवकूल ए आय वापरून केला
हो केशवकूल ए आय वापरून केला आहे सिनेमा.
वर्षु नक्कि बघ सिनेमा. खुप सुंदर आहे.
दक्षि फारच सुरेख परिचय करून
दक्षि फारच सुरेख परिचय करून दिलास. ओघवते, चित्रदर्शी, वास्तव दाखवणारे लिखाण आहे तुझं.
चांगली ओळख करून दिली आहेस.
चांगली ओळख करून दिली आहेस.
नक्की बघणार .
बघवेल का माहीत नाही. त्या
बघवेल का माहीत नाही. त्या पुरुषाचे वाक्य आणि भाव फारच क्रूर वाटले.. ओळख फार छान करुन दिलीत.