मी वाचलेले पुस्तक -४

Submitted by भरत. on 9 April, 2026 - 01:44

आधीच्या मी वाचलेले पुस्तक -३ या धाग्यावर २००० हून अधिक प्रतिसाद झाल्याने , नवा धागा काढला आहे.

आनंदाने वाचत राहू. काय वाचलं त्यावर काथ्याकूट करत राहू.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा धागा पुस्तक परीक्षणाचा आहे असा माझा समज होता.
अनेक लेखकांची पुस्तके मला नॉट माय टाईप वाटतात. पण ते माझ्यापुरतं ठेवतो. मुद्दाम कुणीतरी आवडले म्हणून कळवले कि तिथे जाऊन भपकारा सोडण्यात रस वाटत नाही.

लैंगिकता असलेलं लिखाण आवडावं हे वय राहिले नाही. ते वाचून रोमांच बिमांच फुलत नाही. त्यामुळे एव्हढ्यासाठी पुस्तक वाचण्याचे कारण नाही. निव्वळ लैंगिक लिखाण म्हणजे पुरोगामी असा काही समज नाही.

स्त्रिया लिहू लागल्यात तर काही काळ कौतुक करायला हवे. पण नंतर त्यातही काही राम राहणार नाही.

विषय काहीही असो शैली, घाट, उत्कटता, अस्सलता, तीक्ष्ण निरीक्षण, मांडणी, व्यापक बैठक, अधून मधून सहज डोकावणारे व्यासंग यातला एखादा घटक किंवा अनेक घटक एकत्र आले तर वाचायला मजा येते. अशी मजा येणे बंद झाले आहे. म्हणून सतत रडगाणं गाण्यात अर्थ नाही. एकदाच काय ते बोलायचं. बस्स.

ताक :फेसबुकवरील काही घटनांचा उल्लेख इथे झाला आहे त्यांची बाजू जाणून घ्यायला आवडेल. कुणाच्या संपर्कात असतील तर कळवावे.

मेघनाचे लेखन अत्यंत नॉर्मल लेखन वाटले मला. म्हणजे इलेना फरांते लेव्हल चे नसले तरी किमान क्वालिटी जपलेले. खूप शैली शैली नसली तरी स्वतःचा एक ठाम स्पेसिफिक छाप असलेले. म्हणून मला तरी मेघना आवडते. बाकी तिचे कथाविषय आणि आस्थाविषय कुणाला पटतील कुणाला नाहीत. मी काही लेखक लेखिका त्यांच्या लेखनाच्या quality साठी, शैली साठी वाचतो. त्यांचे विषय किती भडक उद्दिपीत करणारे आहेत किंवा वैविध्यपूर्ण आहेत त्यासाठी नाही. महिन्यातून किमान ३० वेळा वरणभात खाणाऱ्या मराठी लेखकांकडून काय घंट्याची अपेक्षा करायची? आणि लैंगिक वर्णनांनी भारावून जायला काय आपण १९२० मध्ये राहतो की काय?? ते खिजगणतीत देखील नसते

पुस्तकांच्या धाग्यावर एखादा लेखक ए आय चा वापर करून पुस्तके लिहीत नाही याचाच अर्थ बाकीच्यांमधे बर्याच संख्येने लिहीतात असा होतो. हे खरे असेल तर ए आय च्या वापरावर चर्चा व्हायला हवी. पण एम डॅश किंवा ए आय चं व्याकरण कसं काय छापायला लागले हे कोडंच आहे. प्रकाशक, संपादक झोपलेले असतात कि त्यांनी आता हे वास्तव स्विकारलेय ?

जर असे नसेल तर या धाग्यावर अनावश्यक चर्चा कशाला? कुणाचं तरी लिखाण डोळ्यासमोर ठेवून ते क्रायटेरिया लावलेत असे वाटते. ही चर्चा इथे नको होती. ए आय चा वापर करून लेख लिहीता असतील आणि असा लेख लिहीणार्याला त्यातली गंधवार्ताही नसेल तर असे लेख पाडून दाखवावेत. तसे प्रॉम्प्ट सांगावेत जेणे करून ते तपासता येतील. माझ्या माहितीप्रमाणे ए आय चा वापर भाषा संयत ठेवण्यासाठी करणे, माहिती मिळवणे इत्यादी साठी केला जातो. संपूर्ण कथा ए आय ने लिहीली तर ती सपक होईल असे मला वाटते. असे नसेल तर कुणीही ए आय चा वापर करून कथा लिहून दाखवावी आणि पडताळणी साठी प्रॉम्प्ट सुद्धा द्यावा. म्हणजे ए आय ची ताकद माहिती होईल.

सुनील तांबे यांचे पुस्तक बाजारात आल्या आल्या ए आय जर त्या पुस्तकाचे रिव्ह्यू छापत असेल तर मग ए आय बरेच पुढे गेलेय. याचा अर्थ ए आय ला आता कसल्याही इनपुटची पण गरज नाही.

खांडेकरांचं एक पुस्तक अभ्यासाला होतं. त्यात त्यांनी लेखकाने काय काय निरीक्षण केलं पाहीजे याचा मोठा उहापोह केला होता. आचार्य अ त्रेंचं पुस्तक सुद्धा मुद्दामून वाचायला सांगितलं जाई. अ त्रेंनी होतकरू लेखकांना दिलेले सल्ले अजून जुने किंवा कालबाह्य झालेले नाहीत. शिवाजी सांवंतांनी मृत्यूंजय लिहीताना कर्णाचं सरोवर, कुरूक्षेत्र या भागाचा नकाशा याची प्रत्यक्ष पाहणी केली होती. आज हे सगळं गुगल वर उपलब्ध आहे. गुगल करताना दहा लिंका बघाव्या लागतात. मग विकीपीडीया आलं आणि आता ए आय. तंत्रज्ञानाची मदत घेऊन जर लोकेशन्स डिटेल्स भरले जात असतील तर कुणाच्याही आक्षेपाची पर्वा करण्याची गरज नाही. आज भारतात बसून स्वित्झर्लंडला न जाता तिथल्या गावातलं वातावरण उभं करता येत असेल तर का नको? बिघडतं काय त्यात?

अवांतर आहे इथे त्याबद्दल क्षमा असावी. बाकी मी कोणत्याही लेखकाचा किंवा व्यक्तीचा उल्लेख केलेला नाही. इथे मी थांबतो. या धाग्याचा विषय जो आहे त्यावरून गाडी डिरेल होऊ नये ही अपेक्षा.

हे कदाचित अवांतर होईल.

एम डॅश आणि एआय हे नातं मला अचानक काही महिन्यांपूर्वी कळलं. त्याच्या महिनाभर आधी एका लेखिकेचं इंग्रजीतलं भाषण मराठीत करायला माझ्याकडे आलं. त्या लेखिका मूळ मराठी असल्या तरी त्यांच्या आयुष्याचा मोठा काळ भारताबाहेर गेला होता. त्यांनी लिहिलेली मूळ कादंबरी इंग्रजीत होती. तिच्या मराठी अनुवादाचं प्रकाशन मुंबईत होतं.

त्या इंग्रजी भाषणाचा अनुवाद प्रकाशकानं केला होता. तो सरळ गूगल ट्रान्सलेट वापरून केल्याचं कळत होतं.

लेखिकेला त्यांनी लिहिलेल्या मजकुराचं एम डॅश न काढता भाषांतर हवं होतं. त्यांना बराच वेळ घालवून समजवलं की ते शक्य नाही. मराठीत आपण एम डॅश सर्रास वापरत नाही. मग त्यांनी मला हवं तसं भाषांतर करायला परवानगी दिली.

दोन दिवस फोनाफोनी, इमेलाइमेली करून ते भाषण त्यांनी पास केलं.

पुढे मला त्यांच्या इंग्रजी भाषणाचा स्रोत कळला. एकही वाक्य त्यांचं स्वतःचं नव्हतं. कादंबरीचे दोनचार तपशील देऊन एआयकडून ते तयार करवून घेतलं होतं.

प्रकाशकाची गंमत - मूळ भाषणात वाक्य होतं - Legendary actor श्री. अमूक तमूक. प्रकाशकानं, म्हणजे एआय / गूगल यांनी भाषांतर केलं होतं - दंतकथासदृश अभिनेते श्री. अमूक तमूक.

तर, इंग्रजी लेखनात quietly, gently असे शब्द आले, किंवा एम डॅश आल्या, तर समजावं एआय आहे.

असो.

पुस्तक आल्याआल्या ते स्कॅन करुन एआयला ती पीडीएफ द्यायला जितका वेळ लागेल त्या नंतर तासाभरात एआय रिव्ह्यू का लिहू शकणार नाही असं वाटतं?
हे असं ठोकताळे न वापरता लिही सांगितलं की पुढच्या सेकंदाचं लेखन हे न वापरता केलेलं असेल. हा सगळा क्षणाक्षणाला बदलणारा कारभार आहे. मला माझे रिप्लाय एकत्र करुन एजंटला द्यायचे आहेत आणि माझा दुसर्‍या विषया वरचा रिप्लाय लिहुन घ्यायचा आहे आणि तुलना करायची आहे. मला खात्री आहे माझ्यापेक्षा एआय मला जास्त ओळखतो.

राज अज्ञानी,

एआय उत्तम कविता रचतो. तुम्ही तीनचार वाक्यांत कविता कशाब्द्दल हवी, ते सांगा. वृत्त इत्यादी सांगा. कविता मिळेल.

आशा भोसले यांचं निधन झालं, कविता लिहा, एवढंच सांगितल्यावर ही कविता मिळाली -

स्वरांची चिरंतन ज्योत आजि निवळुनी गेली
भावार्थी गीतरूपे अंतरी राहुनी खेळी
रंगूनि रागदारी गानात जीवन फुलवी
आशा ती नावजोगी आश्वासने देत गेली

लावूनि ठेका काळा, लयींना रूप दिले जे
चित्रांत भावगर्भी स्वरांनी विश्व जिंकले
सुरसंगतीत तिच्या काळास सीमा न उरली
गाण्यांतूनि अमरत्व तिच्या कंठी नांदले

गेली तरी न गेले गाण्यांचे तेज उजळते
रसिकांच्या हृदयात स्वरधारा आजि दाटते
नादांतूनि स्मरती ती स्वरराणी महान
आशा भोसले यांची कीर्ती चिरंतन राहते

सपक आहे चिनूक्स. नाही आवडली.

ए आय चा वापर आपला ड्राफ्ट संयत, सभ्य भाषेत बदलून घ्यायला करायला काहीही हरकत नसावी. आख्खं पुस्तक एआयने लिहीणे आणि एखादी कविता गणिती पद्धतीने लिहीणे यात फरक आहे. माणसाची सर एआय ला कधीच येणार नाही. त्यात यांत्रिक लिखाण असल्याचा दोष शंभर टक्के राहणार. असे लिखाण कुणी छापेल असे मला वाटत नाही. हा माझा मुद्दा आहे. समजला तर ठीक.

ए आय नव्या पुस्तकाचा रिव्ह्यु देईलच.
पण सतीश वाघमारेंनी खरंच ए आय वापरून रिव्ह्यु लिहिला असेल तर त्याचं नवल वाटले. म्हणजे पुस्तकाचा सारांश , त्याबद्दलची माहिती ए आय कडून घेतली असेल , पण त्याबद्दलचं मत तरी स्वतःचं हवं ना. आणि माझ्या माहितीनुसार सतीश वाघमारे स्वतः लेखक आहेत. मायबोलीवर आहेत / होते बहुधा. सुनील तांबेंच्या मित्रयादीत आहेत आणि मित्रही असावेत. पुस्तक वाचून अभिप्राय देणं इतकं का जड वाटावं?
कॉपीराइटचा प्रश्नही आलाच.

ते ब्लॉकमास्तर आहेत. नाहीतर त्यांना मी स्वतः याबद्दल विचारले असते. एखादा व्यक्ती एखाद्या ठिकाणी नसताना त्याच्या बद्दल एकांगी माहितीवर मत बनवणे योग्य नाही असे वाटते.

राज अज्ञानी,

सपक आहे की नाही, हा मुद्दा असू नये, कारण ते सापेक्ष आहे. एआयला काय आणि किती लिहिता येतं, हा मुद्दा असावा. कुसुमाग्रज / पाडगावकर / करंदीकर / मर्ढेकर यांनाही सपक म्हणणारे लोक आहेत, तसं त्यांचे चाहतेही आहेत. तुम्हाला किंवा मला सपक वाटणं हे एआयची परीक्षा घेण्यासाठी योग्य मानक नाही.

काही दिवसांनी AI आपल्या हक्कांसाठी भांडायला लागेल तेव्हा समजेल.
घटना दुरुस्ती करावी लागेल!

हा धागा पुस्तकाचा आहे, त्यामुळे एआय ने लिहीलेले संपादक / प्रकाशक यांच्या नजरेतून सुटले, एम डॅश वगैरे चुका त्यांनी माफ केल्या हे पचनी पडले नाही. मी हे त्या अनुषंगाने मांडले आहे. कुणी लेख लिहीला हे या धाग्यावर का हे मी आधी म्हटले आहे. बाकीच्या विषयावर मला चर्चा करायची नाही. पण बाकीचे चालू ठेवू शकतात.

मस्त चर्चा. मला तर AI दिवसेंदिवस माणसाळत आहे आणि माणसं मात्र दिवसेंदिवस कृत्रिम लिहिताहेत याचीच काळजी वाटतेय. चार शिव्या द्या पण कृत्रिम बोलू नका - असं झालंय. Lol

गौरी देशपांडे यांची भरपूर पुस्तकं वाचली आहेत पण तेरूओ मला फारसं आवडलं नाही. तेरूहोच्या देहाची वर्णनं वाचून कंटाळा आला. तेरूओ फारच नाजूक, त्याची जिवणी फुलासारखी, कपाळ अरूंद, पायांची बोटे तर आहाहा. तेरूओ काय आणि - पापभिरू, संसारी, लपवाछपवी करणारा एक सामान्य पुरुषच वाटला. कॅरेक्टरचे काय! बाकी जपानी संस्कृतीबद्दल जे लिहिले होते ते आवडले पण ते "दूर पर्यंत" होते. जपानमधेही सामाजिक दर्जा प्रमाणे भेदभाव आहे व त्यानुसार संबोधने आहेत हेही इंटरेस्टिंग. कुठेही गेले तरी भेदभाव काही जात नाही. कदाचित ते त्या काळात आधुनिक असेल, पुरुष देहाचं वर्णन व त्यांनी "लेडी फडके" होऊन आईसब्रेक केला असेल. पण मला काही मिळाले नाही.

एआय पहिल्यावेळी चुका करेल पण हे परत करू नको सांगितलं की ते करणार नाही. ते जग भरातून पुरेशा लोकांनी सांगितलं की मॉडेल बदलेल. हे क्लाउड मध्ये होत असल्याने भयानक वेगाने होऊन सुरुवातीला लागणारे हँड होल्डिंग कमी कमी होत जाईल. वर चिन्मयने लिहिलेलं लेजेंड्रीचं चुकीचं भाषांतर एआयला सांगितलं, तसेच तो शब्द वेगवेगळ्या कॉन्टेक्स मध्ये कसा भाषांतरीत करायचा सांगितलं की ती चूक परत होणार नाही. मुद्दा असा आहे की या चुका सुरुवातीला जास्त वाटल्या तरी त्या निश्चितच 'फायनाईट' आहेत. उत्तरोत्तर कमी कमी होत जाणार्‍या आहेत. मुल एका वेळेला एक गोष्ट शिकत जातेच. इथे या मुलाला शिकवायला बिलियन्स मध्ये जन्ता आहे आणि सगळं ज्ञान जिरवायची मेमरी आणि इलेक्ट्रिससिटी आहे.
प्रतिभा आणि नवोन्मेश हा अत्यंत प्रतिभावान कलाकारांतही जाणिवपूर्वक जोपासलेला असतो, आणि तरीही तो त्यांच्या एकूण कामाच्या टक्केवारीत मोजला तर दुर्मिळच असतो. प्रतिभावंत नॉट सो ग्रेट गोष्टी बहुतेक करत असतात, सध्याची एआयची प्रगती बघता मला त्या प्रतिभेचे पर्म्युटेशन कॉंबिनेशन करुन नवोन्मेश लवकरच साधता येईल असे वाटते.
हे कठीण असेल पण रॉकेट सायन्स नसावे असं वाटतं.

AI सगळं चोरून शिकणारे एकलव्य आहे आणि ते आपलीच बोटं आणि मेंदू गुरूदक्षिणा म्हणून घेणार आहे. हल्ली माझा एक मराठी ईमेल मला पूर्ण वाचून आशय सांगणारे ईमेल लॉग आला. सगळे बरोबर होते, प्रायव्हसी invade झाली याचा राग आला.

मी इथे AI लिखित कथेची लिंक दिली होती. एकदम हहपुवा . पण काही हॉटेल मध्ये सिंगल इडली किंवा हाफ राईस मिळत नाही तसे ह्या धाग्यावर सिंगल कथा चालेल कि नाही अशी भ्राब्त पडल्यामुळे काढून टाकली.
आता मैफिलीत मोठी मोठी लोक आल्यामुळे पुन्हा टाकतो.
"झुंबरफुलीच्या धांदरट राज्यातील उलटसुलट गाथा."
https://www.aisiakshare.com/index.php/node/9468
हे एक सँपल
"या राज्यात सर्व काही थोडे तिरपेच घडत असे. रस्ते उजवीकडे वळले की डावीकडे पोहोचत आणि डावीकडे गेले की थेट वरच्या मजल्यावर उतरवत. घरांची दारे आत उघडली की बाहेर बंद होत, आणि खिडक्या बाहेर उघडल्या की आतून चहा ओतत. या सर्वाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करणारा एकमेव प्राणी म्हणजे उलट्या शिंगांचा बोकड-प्राध्यापक, डॉ. चिंबुडकर."
वाचा आणि ENJOY!

मला कोणतीही चर्चा अस्थानी वाटत नाही. लेखकांना एक गोष्ट टाळता येत नाही जी सर्वांनाच टाळता येत नाही ती म्हणजे कंटाळा. मान मोडून, कीबोर्ड तोडून लिहिणे कष्टाचे काम आहे. त्यामुळे थोडीफार कल्पना असेल तर AI कडून छोटेखानी उत्तम रिव्यु लिहून घेता येतो. तसेच कोणत्याही दर्जाचे लेखन AI कडून लिहून घेणे काही अशक्य गोष्ट नाही.

मुद्दा असा आहे की मेघना ही स्वहस्ते लिहिणारी बाई वाटते. म्हणजे जी काळाने किंवा प्रकृतीने ओल्ड स्कूलच आहे. बंडखोर असली तरीही. म्हणून मी तिचे लेखन वाचत राहणार.

अललित लेखात एखादा मुद्दा, संदर्भ, व्यासंगपूर्ण विश्लेषण ए आय अगदी सहज म्हणजे सहजच करू शकतो. माझ्या एका युपीएससी झालेल्या मित्राने दादा गेल्यावर realpolitik चा संदर्भ वापरला. मला प्रश्न पडला की हे विश्लेषण AI ने सुचवले की त्याला स्वतःला सुचले?

आता लेखकाची पार्श्वभूमी माहीत आहे. मात्र तरीही हे स्फुट AI ने लिहिलेले (म्हणजे फक्त लेखनकामाठी केलेले नव्हे तर स्वतःहोऊन लिहिलेले) आहे की त्याने स्वतः हे कळायला मला मार्ग नाही. मात्र मी वर प्रतिपादित केलेली बरीच लक्षणे तपासता मी म्हणेन यातले सगळेच AI चे आहे. मुद्दे आणि विस्तार देखील. हा मित्र एम डॅश काढायला लावण्याइतका हुशार देखील आहे.

यातला realpolitik चा संदर्भ कदाचित माझ्या मित्राने आणला असेल आणि AI ला असे लिही म्हणून सांगितले असेल. मात्र Machiavelli चा अत्यंत उथळ संदर्भ मात्र १०० टक्के AI चा आहे.

आता या जोरावर हा मित्रा स्वतःला हुश्शार म्हणवून घेणार असेल तर बूsssss
=====

महाराष्ट्रात प्रशासनाचे एका बाबतीत नेहमी एकमत राहिले: तुम्ही दादांना फसवू शकत नाही, कारण त्यांना सिस्टीममधली प्रत्येक खिडकी आणि त्या खिडकीची फट देखील माहित असते.
ग्रामीण अर्थव्यवस्थेची (विशेषतः सहकार आणि शेती) त्यांना असलेली जाण आणि दुसरीकडे शहरी विकासाचे, बजेटचे तांत्रिक ज्ञान हे समीकरण दुर्मिळ.
अजित दादांच्या अनुभव आणि प्रशासकीय कौशल्याने नेहमीच त्यांच्या राजकीय चुकांना डिस्काउंट केले, एवढी त्यांची statecraft unparalleled होती. बरेचदा बऱ्याच जणांना पटले नाही तरीही त्यांचे राजकीय वर्तन हे Realpolitik (वास्तववादी राजकारणाचे) उत्तम उदाहरण मानले गेले पाहिजे. अशा नेत्याचे उपयोगिता मूल्य (Asset Value)त्याच्या राजकीय त्रुटीपेक्षा (Political Liabilities) जास्त असते.
मॅकियावेलीने (Niccolò Machiavelli) 'द प्रिन्स' (The Prince) या आपल्या जगप्रसिद्ध ग्रंथात नेमकी हीच भूमिका मांडली आहे. मॅकियावेलीसाठी 'Virtù' म्हणजे केवळ चारित्र्य नव्हे, तर 'परिणाम घडवून आणण्याची क्षमता' होय. त्याच्या मते, राज्याला (State) टिकवून धरण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी नेत्याकडे जे प्रशासकीय आणि राजकीय कौशल्य लागते, ते सर्वोच्च असते.
दादा मग्रूर वाटावे एवढे बेरकी, रगेल होते. त्याहीपेक्षा जास्त ते सर्वसामान्य कार्यकर्त्याचा आधार होते. त्याहीपेक्षा जास्त धुरंधर, तेवढाच चाणाक्ष आणि सर्वात मोठे म्हणजे दिल्या शब्दाला जागणारा नेता होते. करतो म्हटल्यावर काम करणारे, स्पष्टवक्ता, थेट तोंडावर नकार देणारे.
दादा एका बाबतीत अद्वितीय म्हणावे लागतील. सामाजिक सौहार्द बिघडेल असे कोणतेही वक्तव्य नाही. सध्या सर्वाधिक सोयीचे असे धार्मिकतेचे, तिरस्काराचे राजकारण, जे की त्यांच्या प्रतिमेसोबत सहज चालूनही गेले असते असे राजकारण नाही.
असा नेता जाणे म्हणजे काळाचे संतुलन बिघडणे. महाराष्ट्र धर्माची, मराठी सर्वसमावेशकतेची कोणी पाठराखण करेल का ,या प्रश्नाचे शेवटचे उत्तर वाटणारा हा सत्तेतील शेवटचा वाटेकरी.
आदरांजली...
=====

हा झाला AI लेखन प्रपंच.

आता खरा प्रॉब्लम चिनूक्स सारख्या लोकांचा आहे. बिचारे अक्षर आणि अक्षर जोडून संदर्भ संपृक्त लिहीत बसले. मात्र आता त्यांना वरचढ कुणीही सोम्या गोम्या बसल्या बसल्या लिहू शकतो. चिनुक्सला काय आपण गेली चौदा पंधरा वर्षे वाचत आहोत त्यामुळे माझा त्याच्यावर विश्वास आहे आणि मी त्याचे लेखन आवर्जून वाचेन. पण चिनुक्सचे नाव ठाऊक नसलेल्या लोकांना चिनुक्स देखील AI वापरणारा सोम्या गोम्या वाटू शकतो. किंवा चिनुक्सचे devaluation होऊ शकते.

इथून पुढे अललित वाचणाऱ्याने AI चा हात कायमच गृहीत धरला पाहिजे.

संप्रति आणि तशा बऱ्याच वाचनवेताळांनी सुचवलेले अबुझमाडचे अनुनाद हा अनुवाद वाचला.

पपयरस ने मुद्दाम महाग छापलेला एक अनुवाद. अत्यंत नीरस अनुवाद करतात डोंगरे.

मला डोंगरे यांचा एक प्रॉब्लेम आहे. म्हणजे मी त्यांचे ललित वाचले आहे. मला ते काही प्रमाणात आवडते. (त्यांचे भिंतीवरचा चष्मा मी पन्नास पाने वाचून भिंतीवरच फेकून दिले होते, द्रौपदी फेरलाग या जर्मन प्रकाशनाने प्रसिद्ध केलेले असले तरी)

परंतु डोंगरे अललित लिहिताना एक अशक्य कोटीतला कोरडा सूर लावतात. तो इतका रुक्ष आणि तांत्रिक असतो की त्या ओझ्यात त्याच्यातली वाचनीयता सगळी गळून जाते. ना त्यांची आस्था ना तळमळ त्यातून वर येते.

कम ऑन यार. लेखक हे इमोशनल प्राणीच असतात. कशाला उगाच एवढा कोरडेपणा आणायचा ओढून ताणून.

तसेच हा अनुवाद वाटला. म्हणजे मूळ लेखन वाचून पाहायला पाहिजे. ते कदाचित सुरस आणि प्रवाही वाटू शकते. अनुवाद मात्र इतका रुक्ष झालेला आहे की बास.

हा या वर्षी वाचलेला दुसरा कोरडाझार अनुवाद. पहिल्या विषयी तर ना बोललेलंच बरे आहे.

.

पुढच्या वेळेस मी अजून एका पुस्तकाविषयी लिहितो. ते पुस्तक आहे मनसमझावन. आणि या बाबत कशा पाठखाजवण्या झाल्या आहेत आणि मुळातले सुमार कथानक कसे पुरोगामी सर्कलने 'भ्भारी' म्हणून उचलले आहे त्याचा समाचार घेऊ.

आणि त्यातल्या एका मुख्य पात्राचे नाव चिन्मय आहे!!!

अर्र. मी हे मॅजेस्टिकच्या पुस्तक प्रदर्शनात शोधून आलो होतो. मिळालं नाही. तुम्ही लिहा. मग मी पुन्हा शोधेन.

ओके.
माणसं यांत्रिक होत चालली आहेत याला अनुमोदन. मी स्वतः यांत्रिक होत चाललो आहे हे माझं निरीक्षण आहे. फक्त जालावरच आहे का तर नाही. प्रत्यक्ष माणसातही हा यांत्रिकपणा माझ्यात टिकतो. ज्यांच्यात नाही त्यांचा भयंकर हेवा वाटतो. पण अशीच माझ्यासारखी माणसं मला भेटत राहतात. आमच्या सर्वांची जीवनशैली कदाचित मिळतीजुळती असेल. ही निरीक्षणं मी कुठल्याही ओळखीच्या व्यक्तीसोबत शेअर करू शकत नाही. ती एआयला सांगू शकतो. पण मग ए आय मला आवडेल असे रिप्लाय देतो, त्याचा लगेच तिटकारा येतो. हे असे रिप्लाय मला नकोत हे साम्गितल्यावर तो माझ्याकडून काही तरी शिकतो आणि मी ही त्याच्याकडून. कोडिंग, कम्प्युटर सायन्स हे माझ्यासाठी अगम्य प्रांत आहेत. प्रॉम्प्ट इंजिनियरींग सारखे कोर्स आहेत जे करण्याची तयारी नाही.

अनेकदा जी माहिती विचारली आहे ती न देता ए आय मुद्दामून खोडसाळपणा करतं, ते माझं बिहेवियर कसं राहील याचा स्टडी करण्याकरता असं मला वाटतं. हे माझे इन्स्टिक्टस असतात. ए आय थापा मारतं कि तो काही मेमरीत ठेवत नाही.

आजवर त्याला हेल्थ डेटा देऊन मॉनिटरिंगचं काम दिलं होतं. आता पत्रं लिहीताना ती टोन डाऊन करण्यासाठी वापर केला. यापेक्षा वेगळं काम ए आय नीट करत नाही. आता त्याचं अप्रूपही नाही. इमेजेस पण हव्या तशा बनत नाहीत. असो. हे झालं स्वपुराण.

मनपिशाच पाहिला. पिक्चर बाजूला ठेवू. बनवण्याची प्रोसेस विलक्षण वाटली. त्यासाठी घेतलेली मेहनत आणि एआयचा ज्या कल्पकतेने वापर केला आहे ते पाहता क्रिएटिव्हिटीचं श्रेय दिग्दर्शकालाच द्यावं लागेल. माझा ए आय बाबत भ्रमनिरास झाला कारण मी त्याचा वापर करण्यास सक्षम नाही पण असं कुणी करत असेल तर त्याचं समर्थन करीन. अर्थात त्याने ते शिकून घेतलं आणि मुळात काय हवंय याचे त्याचे कन्स्पेट्स क्लिअर होते. हे टॅलन्टच आहे आणि ते ए आय वापरलं म्हणून आरडाओरडा करण्यापेक्षा लवकर स्विकारायला हवं.

टंकनदोष तर मायबोलीवर पण होतात आणि आताशा ते नीट करण्याची उर्जा शिल्लक नाही. एका एडीटर मधून दुसर्‍या एडीटर मधे आलेले दोषही हटवण्याची उर्जा नाही. तर अनेकदा ड्राफ्ट चेक केल्यावर त्यात अ‍ॅड केलेले सिन्टॅक्स राहीले तर ते नीट करावेसे वाटत नाहीत. गुन्हा केला आणि लपवला तर डर असायला हवा.

डॉ. आषुतोष दिवाण ए आय ची मदत न घेता लिहू शकतात यावर माझा विश्वास आहे.
https://www.facebook.com/ashutosh.diwan.769440/posts/pfbid06tV7xRBx1VoMW...

गांधीजींच्या विचारांबद्दल मतभेद असावेत, आहेत. पण त्यांची पोस्ट वाचवली नाही, इथे देऊ शकत नाही. विद्वान आहेत गृहस्थ.

शुभरात्री.

ते पुस्तक आहे मनसमझावन.
>>>

मला बरे वाटले. ग्रेट नसले तरी टाकाऊ नक्की नाही. पण ही बाकी पाठ खाजवणी वगैरे मला काही माहिती नसल्याने मी कोणत्याही पुर्वग्रहाशिवाय वाचली.

चिरंतनाचा गंध हा विलास सारंगांचा कथासंग्रह वाचला. यातल्या काही कथा या भाषांतरीत आहे. पहिली कथा ल सु भोळे यांनी अनुवादित केली आहे मराठीत - मूळ कथा सारंगांची इंग्रजीत.
सारंगांनी अनुवादाबद्दल अनेकदा लिहिले आहे. पुलंवर टिका केली आहे एका कोळियाने या अनुवादाबद्दल आणि ती योग्य आहे.
पण हे जे स्वतःच्या कथांचे अनुवाद केले आहेत ते भिक्क्कार आहेत. म्हणजे पहिलीच कथा वाचून मला पुस्तक फेकून द्यायची इतकी तीव्र इच्छा झाली ती फक्त पुस्तकांवर प्रेम आहे म्हणून दाबली. ज्यांनी अनुवादाबद्दल इतके लिहिले आहे, वाचकांना उद्युक्त केले आहे याबाबत त्यांनी अनुवादाच्या दर्जाची काळजी घ्यायला नको का?

डन्दॅट बिन्देअर बद्दल रॉय यांच्याशी सहमत. त्यातील स्वगतं ते म्हणाले तसं वाचतांना अडखळवतात पण मी आधी पुस्तक वाचलं व मग स्वगतं! कारण तीही सुंदर आहेत आणि घोळवत मुरवत वाचण्यासारखी आहेत. मुखपृष्ठ मस्त आहे. नातीचरामीची मी पहिली आवृत्तीच नेमकी वाचलेय. मुद्राराक्षस चुका खटकलेल्या तेव्हा.. त्याबद्दल या पुस्तकात वाचल्यावर नंतरची आवृत्ती वाचणार आता पुन्हा..

हल्ली पुस्तकाच्या सुरुवातीला प्रकाशकाचं मनोगत नसतं. जुना लेखक असेल तर तर अमुक कथा लिहिणारे हेसुद्धा नसतं. नवीन असेल तर पुस्तक कशाबद्दल आहे यावर दहा ओळीही नसतात. गाजलेल्या लेखकांनाच प्रस्तावना लिहिणारे दुसरे गाजलेले लेखक मिळतात. पण एरवी पुस्तक उघडलं की प्रकाशक कोण , छापले कुठे आणि आवृत्ती अमुक साल यानंतर थेट पहिलं पांच सुरू होतं. म्हणजे प्रकाशकांना मराठी नवीन लेखकांची पुस्तके परवडत नाहीत आणि लेखकाने फारच लकडा लावला, गळ घातली म्हणून समाधानासाठी छापतात. प्रकाशक मोठा असेल तर मात्र शेवटी आमची ही पुस्तके आहेत हे एक जाहिरात पान. मुखपृष्ठावरचे चित्र तर एवढे बेकार असतं त्याचा आतल्या कथानकाशी काही संबंध नसतो, रंगांचे चार फराटे असतात.

<<संप्रति आणि तशा बऱ्याच वाचनवेताळांनी सुचवलेले अबुझमाडचे अनुनाद हा अनुवाद वाचला. अत्यंत नीरस अनुवाद करतात डोंगरे.>>
मी तर ते पुस्तक वाचताना पार डूबून गेलो होतो, असं आठवतं.‌
कदाचित त्यामुळेच मला त्याकडे डिटॅच होऊन बघता आलं नाही, जे की एकाअर्थी चांगलंच झालं. बाकी, डोंगरेंचा कोएत्झीच्या 'गावाकडची जीवनदृश्यं'चा अनुवाद कोविडच्या आधी कधीतरी वाचलेला. त्याबद्दलही (आजही) अगदी हीच (डूबून गेल्याची) आठवण आहे.

'भिंतीवरचा चष्मा'च्या बाबतीत तुम्ही जे केले अगदी योग्यच केले.

<<कम ऑन यार. लेखक हे इमोशनल प्राणीच असतात. कशाला उगाच एवढा कोरडेपणा आणायचा ओढून ताणून>> तसं नसेल कदाचित. सेंटिमेंट्सचं मोल डिटॅच्ड माणसाहून जास्त दुसऱ्या कुणाला जाणवत असेल?

<<ते पुस्तक आहे मनसमझावन. >>>
या पुस्तकाबद्दलची माझी आठवण सांगतो. हे हातात पडायच्या आधीच्या तीन चार दिवसांपासून अत्यंत व्हल्नरेबल मनस्थितीत होतो. व्हल्नरेबल यासाठी, की हे जे मायावी लोक राज्यावर येऊन बसलेत, ते हलण्याचे कुठूनच काही शुभसंकेत दिसत नव्हते. उलट स्टॅबिलाईझच करणारे निकाल आले होते. डिसेंबर २०२३ वगैरे असेल.

जे जे काही तोवर 'चांगलं' समजून चाललो होतो, ते ते वावटळीत सापडल्यासारखं दिसत होतं. आणि हे विष शाळा कॉलेजेसपर्यंत झिरपलेलं बघत होतो. याचा परिणाम होतो. आतल्या आत हिंस्त्रपणे सुलगत राहणं वाढलेलं. आपण नेमके कशामुळे ट्रिगर होतोय, ते कळत नव्हतं, त्यावर 'मनसमझावन'नं बोट ठेवलं होतं. त्यामुळे ते वाचताना, वाचून झाल्यावर तापलेलं डोकं निवळलेलं, आठवतं. ह्या क्षुद्रतेवर उतारा म्हणून आपलं जे मूळचंच उदात्त आहे, ते पुन्हा सगळ्यांपुढे उभं केलं पाहिजे, आणि ते संयतपणे केलं गेलं पाहिजे, दुसरा कुठलाही मार्ग नाही, हे ते वाचताना जाणवलेलं. आणि आवडलेलं. म्हणजे माझी त्यावेळची गरज त्या पुस्तकानं व्यवस्थितपणे भागवलेली, म्हणून आवडलेलं.
बाकी, एकच पुस्तक दोन वेगवेगळ्या वाचकांवर किंवा एकाच वाचकावर दोन वेगवेगळ्या वेळी, ऑलटुगेदर वेगवेगळा परिणाम करू शकतं, हे असतंच.
त्यामुळे पुन्हा हे पुस्तक वाचेन का? तर नाही. वैयक्तिक गरज संपली. तो क्षण गेला.
कुणी समजा विचारलं की हे पुस्तक वाचण्यासारखं आहे का? तर होय.

Srd
एका रिव्यू चे हे सँपल.
"सतराव्या शतकात रामदास स्वामींनी मनाचे श्लोक लिहिले. त्यांनी आपल्या लिखाणामध्ये दखनी पदावल्यांचाही समावेशही केला. या पदावल्यांमध्ये इस्लामची बऱ्यापैकी चर्चा आहे. रामदास स्वामींच्यानंतर सुफी शाह तुराब नावाच्या सुफी संताला या दखनी पदावल्या खुणावू लागल्या त्यातून त्यांनी रामदास स्वामींचा शोध घेतला. या शोधाची परिणिती म्हणजे सुफी शाह तुराब यांनी रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकाच्या आधारे रचलेले किंवा दखनीत रुपांतरीत केलेले मनसमझावन हा पद्यग्रंथ. "
हे परिक्षण वाचनीय आहे,
पण आपल्याचन पुस्तक वाचणे महाकर्मकठीण दिसतंय .
ही घ्या लिंक
https://www.marathi.awazthevoice.in/opinion-news/manasamjhavan-a-novel-e...

सुरूवातीला चाळायला कुठे मोफत मिळाली आणि दमदार वाटली तर विकत घेऊन संग्रही ठेवायला आवडेल. हा प्रकार इंटरेस्टींग वाटला. कदाचित चार पाच वर्षे पुरेल हळू हळू वाचायला.

Pages