भाग २ : इराणमधील इस्लामिक क्रान्ती

Submitted by माझेमन on 19 March, 2026 - 08:40

दुसऱ्या महायुद्धानंतर मित्र देश विशेषतः अमेरिका आणि रशियाचे मार्ग वेगळे झाले होते. दोन्ही देश इतर देशांना आपापल्या
पंखाखाली घेण्यासाठी धडपडत होते. १९५१ मध्ये इराणचे पंतप्रधान होते मोहम्मद मोसादेघ. ते प्रो-रशिया होते आणि त्यांनी
इराणच्या तेलसाठ्यांचे राष्ट्रीयीकरण केले. साहजिकच ते खटकू लागले. आणि त्यांना हटवण्याची तयारी झाली. त्यांच्याजागी
फझलुल्लाह जाहिदी यांना आणण्यात आले. गमतीची गोष्ट अशी आहे की याच फझलुल्लाह जाहिदी यांना ब्रिटिश यांनी नाझींना मदत करण्यासाठी अटक केली होती. पण त्यांना interior ministry मधून अध्यक्षपदी आणण्यात ब्रिटिशांनी पुढाकार घेतला. आणि कटाचे मुख्य सारथ्य CIA ने केले. जाहिदीने सत्तेवर आल्या आल्या तेलसाठ्यांचे राष्ट्रीयीकरण रद्द केले. त्यामुळे
जनसामान्यांत अमेरिकेविरुद्ध रोष होता पण या दरम्यान मजलिसचे स्पीकर असलेल्या आयतोल्लाह खशानी आणि बेजबाहानी यांनी मोसादेघ यांना शहा आणि इस्लामचा गुन्हेगार ठरवून जनमत त्यांच्याविरुद्ध करण्यात मदत केली.

१९६१ साली खशानीच्या मृत्यूनंतर सय्यद रुहल्लाह मूसावी खोमेनीचा उदय झाला तो आयतोल्लाह खोमेनी म्हणून.

१९६३ मध्ये अयातोल्लाह खोमेनींनी शहा अमेरिकन कठपुतळी आहे हे सांगत त्याच्याविरुद्ध उठाव केला. शहाने हा उठाव
सैन्याच्या मदतीने चिरडून टाकला पण १९६४ साली अमेरिकन सैनिकाला डिप्लोमॅटिक इम्युनिटी जाहीर केल्याच्या निषेधार्थ
खोमेनींनी परत उठाव केला. परिणामस्वरूप त्यांना देशातून निष्कासित करण्यात आले.

दरम्यानच्या काळात शहाने मोठ्या प्रमाणात जमीन सुधारणा कायदे, निर्गुंतवणुकीकरण, महिला हक्क कायदे जंगले व कुरणांचे राष्ट्रीयीकरण केले. पण या जमीन सुधारणा व निर्गुंतवणुकीकरण नीट न राबविल्यामुळे आर्थिक विषमतेत भर पडली. महिला हक्क कायद्यांमुळे कट्टर धार्मिक गट नाराज झाले. त्यातच ७०च्या दशकातील तेलनिर्यातीतून आलेल्या सुबत्तेने महागाई वाढली व 'आहे रे' आणि 'नाही रे' गटातील दरी रुंदावली.

जिमी कार्टर अमेरिकेचे अध्यक्ष असताना म्हणजे साधारण १९७७ पासून खोमेनी अमेरिकेच्या संपर्कात होते. जिमी कार्टर अमेरिकेचे अध्यक्ष असताना म्हणजे साधारण १९७७ पासून खोमेनी अमेरिकेच्या संपर्कात होते. इराणमधला रशियन व ब्रिटिश प्रभाव नष्ट
करण्यासाठी अमेरिकेची गरज आहे अश्या अर्थाचे निरोप त्यांनी अमेरिकेत धाडले होते.

सी आय ए ने ट्रेनिंग दिलेले गुप्त पोलीसखाते सहवाक शहाचा विरोधकांना निर्ममतेने मोडून काढत होते. अशातच १९७७ साली शहाचा एक प्रसिद्ध विरोधक अली शरियाती आणि खोमेनीचा मोठा मुलगा मुस्तफा याचे निधन झाले. दोघांच्याही निधनाचे कारण हृदयविकाराचा झटका असे जाहीर केले असले तरी यामागे सहवाकचा हात आहे असा संशय जनसामान्यांत पसरला. मुस्तफाचे अंत्यसंस्कार कौटुंबिक विधी न राहता राजकीय चळवळ बनले. आणि इराणमध्ये इस्लामिक क्रांतीची ठिणगी पडली. पैगंबरांचे नातू असलेल्या इमाम हुसैन यांना करबलाच्या लढाईत मारणारा याझिद म्हणून शहाला रंगवण्यात क्रांतिकारी यशस्वी ठरले. खोमेनी यांचे आकर्षण विद्यार्थी आणि शिक्षक वर्गातही वाढले होते. १६ जानेवारी १९७९ साली शहाने नागरी असहकार, तेल कंपन्यांतील कर्मचाऱ्यांचा संप इत्यादींनी ग्रासलेला इराण सोडला व १ फेब्रुवारीला खोमेनी इराणमध्ये परतले. शहाने राज्यत्याग केला नसला तरी त्याच वर्षी जनमत घेऊन इराण अधिकृतरीत्या इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण झाला. खोमेनी इराणचा तहहयात राहबर (मार्गदर्शक) बनले.

इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणने पहिला काटा काढला तो त्यांच्याच कम्युनिस्ट पाठिराख्यांचा. यात बहुतांशी अध्यापकवर्ग,
विद्यार्थी आणि कर्मचारी संघटनांमधले कम्युनिस्ट भरडले गेले.

दुसरा नंबर लागला तो तेहरानमधील अमेरिकन वकिलातीचा. शहाने अमेरिकेचा आसरा घेतला होता. त्यामुळे १९५३ प्रमाणेच
अमेरिका शहाला परत इराणमध्ये बसवण्याचा प्रयत्न करेल. ते होऊ नये या हेतूने वकिलातीवर हल्ला चढवून तिथले ५२ कर्मचारी
इराणने वर्षभरापेक्षा जास्त काळासाठी ओलीस धरले. त्यात शहाला इराणकडे हस्तांतरित करायची मागणी केली होती. या घटनेने
अमेरिकेतील जन्मात पूर्णतः इराणविरोधात गेले.

१९८९ साली खोमेनींचे निधन झाल्यावर अली खामनेई इराणचे तहहयात राहबर बनले.

अनुक्रमणिका :
भाग १ : इराण-इस्राएल-यूएस त्रांगडं आणि भारत
भाग २ : इराणमधील इस्लामिक क्रान्ती
भाग ३ : इराणचा अणुऊर्जा कार्यक्रम
भाग ४ : इराण आणि भारत
भाग ५ : भारत इस्राएल संबंध
भाग ६ : IMEC – India Middle East Europe Economic Corridor
भाग ७ : भारत सद्यस्थिती

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१९६३ मध्ये अयातोल्लाह खोमेनींनी शहा अमेरिकन कठपुतळी आहे हे सांगत त्याच्याविरुद्ध उठाव केला. पण त्याचवेळी ते रिगन सरकारशी बोलणी करण्याचा प्रयत्नही करत होते . >> रोनाल्ड रीगन यांचा कालावधी खूप नंतरचा आहे. त्या वेळी जॉन्सन होते.

@एक लेखक >>> आभार. रेगन नाही तर जिमी कार्टर अमेरिकेचे अध्यक्ष असताना म्हणजे साधारण १९७७ पासून खोमेनी अमेरिकेच्या संपर्कात होते. तशी सुधारणा करते.