सांज्याच्या पोळ्या

Submitted by मनीमोहोर on 14 March, 2026 - 23:41
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

सांज्याची पोळी

हल्ली विशेष केली जात नसली तरी काही वर्षापूर्वी पर्यंत पाकातल्या पुऱ्या, सुधारस, साखरभात सांज्याच्या पोळ्या, ही पक्वान्न महाराष्ट्रीयन घरात खूप लोकप्रिय होती. सांज्याच्या पोळ्या सणाचं असं विशिष्ट पक्वान्न नसलं तरी घरोघरी अनेक वेळा होत असत. घरात नेहमीच उपलब्ध असणार साहित्य, करायला त्यामानाने सोप्या , दोन तीन दिवस टिकणाऱ्या आणि सर्वांना आवडणाऱ्या ह्या पोळ्या कोणी आयत्या वेळी आलं तरी पटकन करता येत असल्यामुळे गृहिणींच्या आवडत्या होत्या. पचायला हलक्या असल्याने आणि एखादी कोरडी चटणी व्यंजन म्हणून पुरेशी असल्याने प्रवासात नेण्यासाठी ही अनेक वेळा केल्या जात असत.
अलीकडच्या काळात मात्र ह्या पोळ्या विस्मरणात गेल्या सारख्या झाल्या असल्याने मी ही गेल्या अनेक वर्षात केल्या नव्हत्या. पण पुढील पिढीला माहित व्हाव्यात म्हणून मुद्दाम केल्या आणि त्यांना आवडल्या ही. म्हणून इथे शेअर करते आहे.
साहित्य
शिऱ्यासाठी
दोन वाट्या मध्यम जाडीचा रवा
दोन मोठे चमचे तूप
पाच ते सहा वाट्या पाणी
तीन वाट्या गूळ
स्वादासाठी थोडं मीठ, वेलची जायफळ पूड.

आवरणासाठी
तीन वाट्या चाळलेली कणिक
तेल, मीठ
दोन चिमूट हळद घातलेलं पिवळसर पाणी.

क्रमवार पाककृती: 

रवा तूपावर भाजून घ्यावा. अगदी लालेलाल करू नये. तीन वाट्या गुळ पाच ते सहा वाट्या पाण्यात (रव्याच्या जाडीवर अवलंबून ) विरघळवून घेऊन ते गुळाच उकळत पाणी रव्यावर घालून गुठळ्या झाल्या असल्यास त्या मोडत मोडत मऊसर शिरा करून घ्यावा. स्वादासाठी थोडं मीठ आणि वेलदोडे ,जायफळ पूड घालावी. गरज असेल तर साधारण गार झाल्यावर पाण्याचा हात लावून शिरा मळून मऊ करून घ्यावा.

कणीक दोन चिमूट हळद घातलेल्या पाण्यात घट्टसर भिजवावी आणि मुरण्यासाठी पाण्यात बुडवून ठेवावी. दीड दोन तासांनी कणिक बाहेर काढून थोड्या तेल, मीठ आणि गरज लागली तर पाण्याच्या हाताने छान मळून घ्यावी.

कणकेच्या छोट्या गोळ्यात दुप्पट शिऱ्याचा गोळा भरून पुरण पोळी सारखा उंडा करावा आणि तांदुळाच्या पिठीवर पोळी लाटून चांगल्या तापलेल्या तव्यावर पोळी दोन्ही बाजूनी नीट भाजून घ्यावी. थोडा वेळ जाळीवर ठेवून गार झाली की डब्यात भरावी. लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणाऱ्या पोळ्या तयार

20260313_130329.jpg
.

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी दोन
अधिक टिपा: 

१) तूप जास्त घालू नये कारण शिरा मोकळा न करता चिकट करायचा आहे. शिरा गार झाल्यावरच पोळ्या करायला घ्याव्यात. तो आदल्या दिवशी करून फ्रिज मध्ये ठेवला तरी चालतो.
२) गूळ आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. वर दिलेल्या मापाने माझ्या मते व्यवस्थित गोडीच्या पोळ्या तयार होतात. तरी आपल्या आवडीप्रमाणे गुळाचे माप घ्या.
गुळाचा पाक अजिबात करायचा नाहीये. फक्त गूळ विरघळवून घ्यायचा आहे.
3) कणिक घट्टच भिजवा, पाण्यात ठेवली की थोडं पाणी तिच्यात मुरतं आणि थोडी सैल होते म्हणून.
४)बटर पेपर पोळपाटावर अवश्य ठेवा, त्याने कमी पिठी घेऊन ही पातळ, कडे पर्यंत शिरा गेलेली छान पोळी लाटता येते.
ह्या पोळ्या भाजायला वेळ लागतो थोडा त्यामुळे तवा चांगला तापलेला हवा आणि गॅस ही मघ्यम ते मोठा ठेवा. अगदी बारीक ठेवू नका.
५)खूप वेळा पोळी उलट पालट करू नका त्याने पोळी कडक होते.
६)ह्या पोळ्या पू पो एवढ्या नाजूक आणि नखरेल नसतात. करायला सोप्या असतात. आणि पू पो सारख्या जड ही होत नाहीत पोटाला .
७)खाताना तूप किंवा दूध बरोबर घ्या. मला ना दु सर्वात आवडतं असेल तर घेऊन बघा.

माहितीचा स्रोत: 
पारंपरिक
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केया, वावे आणि वरची प्रज्ञाची पोस्ट वाचून कळाले. सांजा- सांजा होता है, शिरा- शिरा होता है. सांज्येकी पोळी चाहिए तो सांज्याही बनाओ. पण खरेच उत्सुकता वाढली. धन्यवाद मुलींनो आणि ममो. Happy

सांज्याच्या पोळ्या गुळाच्याच असतात...उरलेल्या शिऱ्याच्या पोळ्यांना "शिऱ्याच्या पोळ्या" म्हणतात.. शिरा आणि सांजा यांच्या चवीत खूप फरक आहे....गुळाच्या सांज्याला जो खमंगपणा आहे तो शिऱ्या ला अजिबात येत नाही.. खाओ तो जाने... केया अनुमोदन.

प्राजक्ता बघितले व्हिडिओ, धन्यवाद, चुकून तुझी पोस्ट नीट वाचली गेली नव्हती.

अस्मिता, अंजू करून बघा एकदा प्रॉपर सांज्याची पोळी. प्रद्न्या ने लिहिले आहे तशी मऊ लुसलुशीत, सात्विक पोटाला जड न होणारी. थोड्या करा पहिल्यांदा, आवडतात का ते बघण्यासाठी म्हणून.

वाह! सांज्याच्या पोळ्या!

ह्या फक्त आईच्या हातच्याच आवडल्यात. ती चव, तो लुसलुशीतपणा अजून स्मृतीत आहे.
मी स्वतः कधी केल्या नाहीत.

आई पोळीसाठी शिरा करताना नेहमीसारखा करत नसे. ती गुळाच्या उकळत ठेवलेल्या पाण्यात भाजलेला रवा हळूहळू घालत असे. एकीकडे ढवळत असे. त्याने गुठळी होत नाही.

धन्यवाद ममो .

शेवटी आज केल्या सांज्याच्या पोळ्या.
आज करायच्या असं ठरवलंच होतं तसं. रामनवमीला आमच्याकडे साबा असताना कणकेचा गुळाचा शिरा व्हायचा. आमच्याकडे कुठलेही सणवार हे फक्त खाण्यापुरतेच मर्यादित असतात. जे ना गेल्यापासून तर तेही मी माझ्या सोयीने करते.
तर गुळाच्या शिऱ्या पासून अगदीच फारकत पण नाही आणि कित्येक वर्षात नं खाल्लेल्या सांज्याच्या पोळ्या पण खायच्या होत्याच म्हणून मग त्याच करायच्या ठरवलं.

चार दिवसांपूर्वी बऱ्याच लोकांना ब्रेकफास्टला बोलावलं होतं तेव्हा इडली चटणी आणि उपमा केला होता. तेव्हा बराच रवा तुपात भाजून ठेवला होता त्यातला वाटीभर उरला होता.(गेल्या सत्तर वर्षात एवढा सुंदर उपमा खाल्ला नाही असं आलेल्या एक बाई परत परत म्हणत होत्या. आणि ते अत्रे स्टाईल मधे नव्हतं तर त्यांना खरच खूप आवडला होता उपमा)
तर अनायसे हाताशी असलेला भाजलेला रवा वापरून बाकी कृती अशीच केली.
छान झाल्यात.
(फोटो नाही टाकत मी इथे कधी कारण तो डायरेक्ट येत नाही त्यावर size लहान करणं वैगेरे बरेच सोपस्कार करावे लागतात त्याचा कंटाळा येतो)

के अश्विनी आणि शर्मिला धन्यवाद

गेल्या सत्तर वर्षात एवढा सुंदर उपमा खाल्ला नाही असं आलेल्या एक बाई परत परत म्हणत होत्या. आणि ते अत्रे स्टाईल मधे नव्हतं तर त्यांना खरच खूप आवडला होता उपमा) अत्रे स्टाईल Happy

ह्या फक्त आईच्या हातच्याच आवडल्यात. ती चव, तो लुसलुशीतपणा अजून स्मृतीत आहे. >> बरोबर आहे, ह्या पोळ्यांना नॉस्टॅल्जिक व्हॅल्यू खूपच आहे.
फोटो अपलोड करण्याबाबत सहमत. इथे फोटो अपलोड करणं सोप व्हायला हवं आहे असं मला ही नेहमीच वाटत.

Pages