
सांज्याची पोळी
हल्ली विशेष केली जात नसली तरी काही वर्षापूर्वी पर्यंत पाकातल्या पुऱ्या, सुधारस, साखरभात सांज्याच्या पोळ्या, ही पक्वान्न महाराष्ट्रीयन घरात खूप लोकप्रिय होती. सांज्याच्या पोळ्या सणाचं असं विशिष्ट पक्वान्न नसलं तरी घरोघरी अनेक वेळा होत असत. घरात नेहमीच उपलब्ध असणार साहित्य, करायला त्यामानाने सोप्या , दोन तीन दिवस टिकणाऱ्या आणि सर्वांना आवडणाऱ्या ह्या पोळ्या कोणी आयत्या वेळी आलं तरी पटकन करता येत असल्यामुळे गृहिणींच्या आवडत्या होत्या. पचायला हलक्या असल्याने आणि एखादी कोरडी चटणी व्यंजन म्हणून पुरेशी असल्याने प्रवासात नेण्यासाठी ही अनेक वेळा केल्या जात असत.
अलीकडच्या काळात मात्र ह्या पोळ्या विस्मरणात गेल्या सारख्या झाल्या असल्याने मी ही गेल्या अनेक वर्षात केल्या नव्हत्या. पण पुढील पिढीला माहित व्हाव्यात म्हणून मुद्दाम केल्या आणि त्यांना आवडल्या ही. म्हणून इथे शेअर करते आहे.
साहित्य
शिऱ्यासाठी
दोन वाट्या मध्यम जाडीचा रवा
दोन मोठे चमचे तूप
पाच ते सहा वाट्या पाणी
तीन वाट्या गूळ
स्वादासाठी थोडं मीठ, वेलची जायफळ पूड.
आवरणासाठी
तीन वाट्या चाळलेली कणिक
तेल, मीठ
दोन चिमूट हळद घातलेलं पिवळसर पाणी.
रवा तूपावर भाजून घ्यावा. अगदी लालेलाल करू नये. तीन वाट्या गुळ पाच ते सहा वाट्या पाण्यात (रव्याच्या जाडीवर अवलंबून ) विरघळवून घेऊन ते गुळाच उकळत पाणी रव्यावर घालून गुठळ्या झाल्या असल्यास त्या मोडत मोडत मऊसर शिरा करून घ्यावा. स्वादासाठी थोडं मीठ आणि वेलदोडे ,जायफळ पूड घालावी. गरज असेल तर साधारण गार झाल्यावर पाण्याचा हात लावून शिरा मळून मऊ करून घ्यावा.
कणीक दोन चिमूट हळद घातलेल्या पाण्यात घट्टसर भिजवावी आणि मुरण्यासाठी पाण्यात बुडवून ठेवावी. दीड दोन तासांनी कणिक बाहेर काढून थोड्या तेल, मीठ आणि गरज लागली तर पाण्याच्या हाताने छान मळून घ्यावी.
कणकेच्या छोट्या गोळ्यात दुप्पट शिऱ्याचा गोळा भरून पुरण पोळी सारखा उंडा करावा आणि तांदुळाच्या पिठीवर पोळी लाटून चांगल्या तापलेल्या तव्यावर पोळी दोन्ही बाजूनी नीट भाजून घ्यावी. थोडा वेळ जाळीवर ठेवून गार झाली की डब्यात भरावी. लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणाऱ्या पोळ्या तयार

.
१) तूप जास्त घालू नये कारण शिरा मोकळा न करता चिकट करायचा आहे. शिरा गार झाल्यावरच पोळ्या करायला घ्याव्यात. तो आदल्या दिवशी करून फ्रिज मध्ये ठेवला तरी चालतो.
२) गूळ आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. वर दिलेल्या मापाने माझ्या मते व्यवस्थित गोडीच्या पोळ्या तयार होतात. तरी आपल्या आवडीप्रमाणे गुळाचे माप घ्या.
गुळाचा पाक अजिबात करायचा नाहीये. फक्त गूळ विरघळवून घ्यायचा आहे.
3) कणिक घट्टच भिजवा, पाण्यात ठेवली की थोडं पाणी तिच्यात मुरतं आणि थोडी सैल होते म्हणून.
४)बटर पेपर पोळपाटावर अवश्य ठेवा, त्याने कमी पिठी घेऊन ही पातळ, कडे पर्यंत शिरा गेलेली छान पोळी लाटता येते.
ह्या पोळ्या भाजायला वेळ लागतो थोडा त्यामुळे तवा चांगला तापलेला हवा आणि गॅस ही मघ्यम ते मोठा ठेवा. अगदी बारीक ठेवू नका.
५)खूप वेळा पोळी उलट पालट करू नका त्याने पोळी कडक होते.
६)ह्या पोळ्या पू पो एवढ्या नाजूक आणि नखरेल नसतात. करायला सोप्या असतात. आणि पू पो सारख्या जड ही होत नाहीत पोटाला .
७)खाताना तूप किंवा दूध बरोबर घ्या. मला ना दु सर्वात आवडतं असेल तर घेऊन बघा.
सुरेख! करून पाहीन
सुरेख! करून पाहीन
अरे व्वा, किती छान पाकृ
अरे व्वा, किती छान पाकृ लिहिली आहे .
बऱ्याच वर्षापूर्वी मी बंगलोरला होते, तेंव्हा तिकडे जाताना आई या पोळ्या करून द्यायची. तिकडची कंपनीतील मित्र वाट बघायचे आईच्या पोळ्या यायची. आई सुद्धा खूप द्यायची पोळ्या.
या पाकृ निमित्ताने त्या सर्व आठवणी परत आल्या.
माझ्या एका मावशीला ह्या
माझ्या एका मावशीला ह्या पोळ्या खूप आवडायच्या त्यामुळे तिच्या करता नेहमीच व्हायच्या.
रवा वापरण्या ऐवजी तेव्हा सोजी, जात्यावर गहू दळून काढलेला जाडसर रवा वापरल्या जायचा.
खूप छान पाकृ
खूप छान पाकृ
खरंच विसरली होती
अशात होत नाही करणं सांज्याची पोळी
आता आठवलीये तर करेन कदाचित
घरी पेढे खूप उरलेले असले की
घरी पेढे खूप उरलेले असले की करते मी अजूनही. गुळ थोडा कमी आणि पेढे मिसळून.
मंजू धनवन्ती धन्यवाद.
मंजू धनवन्ती शर्मिला, किल्ली धन्यवाद.
खरंच बघा करून मंजू, किल्ली छानच होतात.
धनवंती छान आठवण.. मुलं लहान असताना दोन तीन दिवस कुठे बाहेरगावी जायचा माझा प्लॅन असेल तर त्यांच्यासाठी नेहमी करून ठेवत असे. नुसत्या तुपाशी ही ती आवडीने खात असत.
शर्मिला, सोजीची बरी केलीस आठवण. सोजीच म्हणत त्या घरी काढलेल्या रव्याला. त्याचा तिखट मिठाचा सांजा ही भारी लागायचा.
पेढे घालण्याची आयडिया आवडली. आता पेढे संपत नसले की मी ही हेच करीन.
किती सुंदर दिसत आहेत! चव
किती सुंदर दिसत आहेत! चव जाणवली मेंदुला.
ममो, खव्याच्या पोळ्या करा ना
ममो, खव्याच्या पोळ्या करा ना एकदा.
मी कालच केल्या होत्या. सोबत
मी कालच केल्या होत्या. सोबत तूप आणि कैरीचे ताजे लोणचे ! मस्त लागतात.
प्रचंड आवडीचे पक्वान्न!
प्रचंड आवडीचे पक्वान्न!
मला करुन पाहायच्यात. न कधी
मला करुन पाहायच्यात. न कधी खाल्ल्या न कधी पाहिल्या.
रेसिपी दिल्याबद्दल धन्यवाद ग.
खूप आवडीची पोळी
खूप आवडीची पोळी
मात्र सांजा करून कधी केल्या नाहीत
शिल्लक शि-याच्या केल्यात ब-याचदा
शिरा नीट भरता यावा म्हणून थोडा मिक्सरमध्ये फिरवून घेते मी
नुसतं तूप घालून छान लागतात
पण लोणचं किंवा लसूण खोब-याच्या चटणी बरोबर खूपच छान लागतात
पोळ्या मस्तच दिसतायत. पटकन
पोळ्या मस्तच दिसतायत. पटकन खावीशी वाटतेय उचलून!
सोबत तूप आणि कैरीचे ताजे लोणचे ! मस्त लागतात.>>+1 माझं भयंकर आवडीचं पक्वान्न!
माझ्या बाबांना पुरणपोळीचं सोसत नसे, पूर्ण पथ्य होतं. अजिबात खात नसत. त्यामुळे सांजापोळी खूप वेळा असायची. घरचं आंब्याचं लोणचं आणि तुपाने माखलेली सांजापोळी. स्वर्ग!
मस्त! मला खूप आवडतात
मस्त! मला खूप आवडतात सांज्याच्या पोळ्या. किती तरी वर्षांत खाल्ल्या नाहीत. आता करते एकदा!
छान दिसतायत पोळ्या .
छान दिसतायत पोळ्या .
सुरेख दिसतायेत.
सुरेख दिसतायेत.
आई बरेचदा करायची पण साखर घालून करायची, गूळ जास्त छान लागत असणार, करून बघेन.
मस्त दिसतायत पोळ्या..माझी आई
मस्त दिसतायत पोळ्या..माझी आई अगदी अशाच करते..
रेसिपी दिल्याबद्दल धन्यवाद
रेसिपी दिल्याबद्दल धन्यवाद हेमाताई. छान दिसतायत पोळ्या , करून पाहीन नक्की.
रेसिपी नेहमीप्रमाणे छान
रेसिपी नेहमीप्रमाणे छान लिहिली आहे. पोळ्या सुंदर दिसताहेत.
मी एकदाच खाल्ली आहे आणि मला आवडली नव्हती. आता विचार करता वाटतं. रव्याला स्वतःची अशी काही चव नसते. त्याला नटवावं लागतं. शिर्याला भरपूर तुपाने एक चव येते. शिरा पुरणाच्या तुलनेत सौम्य चवीचा. तो आवरणात गेला की आणखी सौम्य होतो. त्यामुळे काहीतरी मस्त खाल्लं असं वाटत नाही.
अवांतर - मी वाचलेले पुस्तक या धाग्यावर तुमच्या मोहर या पुस्तकाबद्दल अभिप्राय लिहिला आहे.
पुण्यात अरण्येश्वर देवळाजवळ
पुण्यात अरण्येश्वर देवळाजवळ एका फूडशॉपी मधे सांजापोळी, आंबासांजापोळी पॅकेट्स विकत मिळतात. मी आणल्या होत्या 2वेळा, आवडल्या होत्या.
(ही जाहिरात नाही, दुकानाचं नाव लिहिलेलं नाही.)
एकदा साबांनी अजिबात तूप न घालता रवा शिजवून तो पुरणजाळीतून घोटून पोळ्या करायला लावल्या होत्या मला. कणभरही तूप नाही, आणि तो चिट्ट चिकट गोळा पुरणजाळीतून काढून एकजीव करणं याने मी रडकुंडीला आले होते. आणि 20-25 पोळ्या होत्या, कमी नव्हेत! मी तेव्हाच ठरवलं की पुन्हा नाहीच.
१ दा ही खाल्ल्या नाहीत. पण
१ दा ही खाल्ल्या नाहीत. पण शिरा घातलेल्या सांजोर्या खाल्यात, फार सुबक लागतात.
सांजा तिखट(उपमा) असतो ना.. सांज्याच्या पोळ्या का म्हणतात ह्या ला?
… . न कधी खाल्ल्या न कधी
… . न कधी खाल्ल्या न कधी पाहिल्या.…
+ १
खव्याचे सारण भरलेल्या चाखल्या आहेत.
साटोरी चाखली आहे, त्याचे टेक्श्चर आवडले होते. ह्या साटोरीपेक्षा वेगळ्या लागत असणार चवीला.
रेसिपी अहो आईंना पाठवतो ही, असे नजाकतीचे काम त्याच करू शकतील.
किती सुंदर झाल्यात तुमच्या
किती सुंदर झाल्यात तुमच्या पोळ्या.. अप्रतिमच! मला खूप आवडतात आणि आता मुलालाही आवडतात. लहानपणी आई करायची आता बऱ्याच वर्षात घरी केलीच गेली नाहीये.. आता करून पाहते नक्की.. मुलुंडला एका पोळी भाजी केंद्रात उत्तम मिळतात पण त्या साखरेच्या असतात बहुतेक. माहेरी गेले की एकदा तरी आणल्या जातातच. आता गुळाच्या करूनच बघते लगेच आज उद्यात..
प्रज्ञा, बारीक रव्याच्या
प्रज्ञा, बारीक रव्याच्या केल्या तर पुरण यंत्रातून काढाव्या लागत नाहीत. मी नेहमी बारीक रव्याच्या करते . शिरा कोमट असताना चांगलं मळून घेतले की सहज होतात पोळ्या.
फोटोतील पोळ्या अगदी सुरेख
फोटोतील पोळ्या अगदी सुरेख दिसतायेत.
हा प्रकार आमच्याकडे फार करत नाही.
बाकी गोड फार आवडत नसल्याने पुरणपोळी, सांज्याची पोळी, गूळ पोळी यांना माझा पास.
पण याबरोबर जे इतर चमचमीत पदार्थ असतात ते फार्फार आवडतात. जसे की कटाची आमटी, कुरडई, भजी, चटणी, लोणची......
पोळ्या एकदम मऊसूत दिसतायत..
पोळ्या एकदम मऊसूत दिसतायत.. पटकन एक तुकडा तोडून खावा असं वाटले. गोड खूप आवडते.. वेळ मिळाला कि करून बघेन.. कायी होळिगे ( खोबऱ्याच्या पोळ्या ) पण करून बघायच्या आहेत.
सुरेख पोळ्या ममो.
सुरेख पोळ्या ममो.
तोंडाला पाणी सुटले.
सुरेख दिसतायत पोळ्या .आईने
सुरेख दिसतायत पोळ्या .आईने एकदा केल्या होत्या आवडल्या होत्या . वरची रेसिपी वाचून कराव्याश्या वाटत आहेत.दुधापेक्षा नारळाच्या दुधाबरोबर मलापण जास्त आवडतात.
मस्त दिसतायत. मी खाल्ल्या
मस्त दिसतायत. मी खाल्ल्या आहेत, पण आता कार्ब + कार्ब + साखर + फॅट हे कॉम्बिनेशन मला मनालाच झेपेनासं झालं आहे.
पुरण/गुळाच्या पोळ्यांना निदान डाळ/तीळ वगैरेंची 'सेव्हिंग ग्रेस' असते असं वाटतं.
छान दिसतायत. मी कधी खाल्ल्या
छान दिसतायत. मी कधी खाल्ल्या नाहीत, फक्त ऐकून आहे.
Pages