भूमिका

Submitted by अमुक on 8 November, 2025 - 00:52

रविवार, ११ मे २०२५ ला कोथरूडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यमंदिरात सादर झालेला ‘भूमिका’ नाटकाचा प्रयोग शुभारंभाचा होता की पुण्यातला पहिला होता की आणखी काही हे ठाऊक नसले तरी, या प्रयोगाची जाहिरात बघताक्षणी, ‘मना’ने बुद्धीशी मसलत न करता हे अनुभवण्याचा निर्णय परस्पर घेतला होता हे पक्के आठवतेय. चंद्रकांत कुलकर्णी, सचिन खेडेकर, क्षितिज पटवर्धन या प्रलोभनांपेक्षा सगळ्यात मोठे आकर्षण होते नाटकाचा आशय-विषय.

नाटक सुरु झाल्यापासून, प्रत्येक कलाकाराच्या प्रवेशाने, त्याच्या-तिच्या सादरीकरणाने, लेखक-दिग्दर्शक-तंत्रज्ञ या साऱ्यांनी उत्तरोत्तर साधलेली कमाल यामुळे प्रसंगागणिक वाढत जाणारी अस्वस्थता नाटकाच्या शेवटाकडे शिगेला पोहोचली तेव्हा तिची झिंग तुरिया अवस्थेस प्राप्त झाली होती. खरे तर तेव्हाच या नाटकाबद्दल, मिळालेल्या पहिल्या संधीवर लिहायचे असे ठरवले होते, आज ४ महिन्यांनंतर सॅबीच्या रसग्रहणाच्या रूपाने ती संधी मिळाली.

पुण्यासारख्या ठिकाणी मंचावर ‘वेगळे’ प्रयोग झाले नाहीत असे म्हणणे म्हणजे मुंबईकर घड्याळ बघत नाहीत म्हणण्यापैकी आहे. पुण्याच्या रंगावकाशाने प्रच्छन्न पुणेरी ‘घाशीराम कोतवाल’ पासून, ‘बेगम बर्वे’, ‘उत्तररात्र’, ‘लाईट्स आउट’, ‘गाईच्या शापाने…’(उपेंद्र लिमयेच्या पदार्पणाची एकांकिका), ‘मि. बेहराम’, ‘महापूर’, ‘काही अडलंय का?’ असे अनेक अस्वस्थ करणारे प्रश्न विचारणारे प्रयोग बघितले आणि त्यातून अनेक गुणी कलाकारांना मंचावतरणाची संधी देखील दिली. एव्हढेच नव्हे तर रंगमंचालाही अवकाश, समीप, खुला, कलाघर, अंगणमंच आणि आता द बॉक्स अशी विवीधरंगी रूपं पुण्यातच मिळाली. त्यामुळे पुण्याला ‘वेगळे’पण नवीन नाही आणि प्रयोग करून बघण्याची एलर्जीही नाही. किंबहुना एकाच वेळी व्यावसायिकपेक्षा अधिक प्रायोगिक कलाविष्कार घडविणारे दुसरे ठिकाण निदान महाराष्ट्रात तरी नसावे.

‘भूमिका’चे वैशिष्ट्य म्हणजे, क्षितिज म्हणाला तसं, ते प्रायोगिक-व्यावसायिक रंगमंचाच्या अवकाशावर अधिकार सांगतं. आशय-विषय प्रायोगिकशी नातं सांगणारा पण सादरीकरण पक्कं व्यावसायिक अशी ही संधी… कलाकृतीने साधलेली आणि प्रेक्षकांना दिलेली. संहिता परखड आणि निर्दोष करण्यामागची तीन-साडेतीन वर्षाची मेहनत, सखोल अभ्यास जाणवतोच पण त्यापेक्षाही लेखकाची विषयाची प्रचिती थेट भिडते, कुठल्याच फिल्टरशिवाय.

अभिनयाबद्दल फार काही बोलण्याची गरज नाही कारण कसलेल्या कलाकारांनी नवोदितांना घरातल्या वडीलधाऱ्यांच्या भूमिकेतून सांभाळून घेतले आहे आणि प्रत्येकाने आपली भूमिका जगण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असल्याने त्याद्वारे साऱ्यांनाच आत्मपरीक्षणाची पुरेपूर संधी मिळाली असावी आणि दिग्दर्शकाने ती भरभरून दिली असावी यात शंका नाही. तांत्रिक बाजूही तेवढीच भक्कम असल्याने रंगानुभवात मोलाची भर घालते.

या नाट्याविष्काराच्या माध्यमातून नाट्य-चित्र-दूरदर्शन कलावंतांच्या जगण्याचे अनेक पैलू, त्यांची दृग्गोचर प्रतिमा आणि त्यामागची अगोचर घालमेल, त्यांच्या बदलत्या महत्वाकांक्षा, धारणा, त्याचा त्यांच्या घरावर, आप्तस्वकीयांवर आणि एकूणच समाजमनावर होणारा परिणाम या साऱ्याची झाडाझडती घेतली जाते, ते सारेच चिंतनीय. विशीष्ट प्रसंगात नायकाचा घसा बसल्याने बंद झालेला आवाज, करियर विषयीच्या पारंपरिक पठडीबाज कल्पना, नाटकातल्या लेखकाची बंदिस्त चौकट आणि ती तोडता न येण्याने होणारी तगमग, सगळ्याच भूमिकांचे यथार्थ नामकरण विशेषतः नायकाचे नाव ‘विवेक’, ही सारी या ‘भूमिके’ची बलस्थाने.

धोपट मार्गाने जाऊन विक्रमांबरोबरच व्यावसायिक गणितही सांभाळणाऱ्या लोकप्रिय फॉर्मच्या प्रेक्षकशरण नाटकांच्या मांदियाळीत आपल्या वेगळ्या रंगाचा झेंडा नाचवून प्रेक्षकांना अस्वस्थ करायला, विचार करायला भाग पाडायला आणि मुख्य म्हणजे कुठल्याही सोईस्कर निष्कर्षाला न येता स्वतःची ‘भूमिका’ घेण्याचे स्वातंत्र्य देण्याबरोबरच जबाबदारी सुद्धा घ्यायला लावायला धाडस लागते, ते या नाटकाने केले आहे.

नाटक बघतांना सांस्कृतिक, वैचारिक, सैद्धांतिक, सामाजिक अस्वस्थतेच्या लाटांवर हिंदकळतांना, डाव्या-उजव्या बाजूत कायमच घुसमटलेल्या मध्यममार्गी आणि मध्यमवर्गीय ‘मना’ला एकच प्रश्न सतावत होता, ‘हे नाटक लोक बघतील? त्यांना ते पचेल, रुचेल? की यातून एका भलत्याच वादाला तोंड फुटून (स)माजमाध्यमे त्याने बरबटलेली बघायला लागतील?’

सुदैवाने यातले (अजून तरी!) काहीही घडले नाही आणि सुजाण प्रेक्षकांचा केवळ प्रतिसादच नाही तर भक्कम पाठिंबा या नाटकाला मिळतोय याचे खूप खूप, अगदी विम्यावरील जीएसटी माफ झाल्याइतके, समाधान मध्यमवर्गीय मनाला होते आहे. या नाटकाचा रौप्यमहोत्सवोत्तर प्रवास असाच चालू राहो आणि अधिकाधिक प्रेक्षकांना अस्वस्थ करीत त्याने लवकरच सुवर्ण महोत्सव साजरा करो हीच आमची प्रार्थना आणि हेच (मराठी नाटकवेडा प्रेक्षक म्हणून) आमचे मागणे!

शुभम भवतु !

प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'मायबोली'चा नियमित वाचक आणि चाहता असलो तरी माझे इतरत्र प्रकाशित लिखाण इथे डकविण्याची परवानगी अलीकडेच मिळालेली असल्याने अजून मी इथल्या संवादशैलीला सरावलो नाही, चाचपडतो आहे. तेव्हा आपल्या प्रतिक्रियांची दखल घेऊन त्यावर प्रतिसादण्यास लागणाऱ्या विलंबाबद्दल क्षमस्व! मी सर्वांचाच आभारी आहे आणि प्रत्येक प्रतिक्रियेला स्वतंत्रपणे प्रतिसादाण्याचा प्रयत्न करीन, ते साधेल तोपर्यंत आपल्या सहकार्य आणि मार्गदर्शनाची अपेक्षा... धन्यवाद!

बाय द वे, प्रभावीरितीने मायबोली वापरण्याचा काही क्रॅश कोर्स कुणी सुचवेल का...?
'कुणी याल का, सांगाल का, सुचवाल का या पामरा?
येथे तरी लिहू नको, शिणवू नको व्यर्थ मेंदूला...?' (कवी अनिल यांची क्षमा मागून)