२. दुसरं प्रेमपत्र: सूर निरागस हो. . .
३. लव यू ज़िन्दगी: अदूचा तिसरा वाढदिवस!!!!
४. मुलीच्या चौथ्या वाढदिवसानिमित्त लिहिलेलं पत्र: गोष्ट आणि फगड्या
५. मुलीच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त लिहिलेलं पत्र: परीकथेच्या सवे
६. अदूला सहाव्या वाढदिवसाचं पत्र- औ पाबई!
७. अदूला सातव्या वाढदिवसाचं पत्र: असंख्य प्रश्न आणि अमर्याद स्वप्नं
८. अदूचा आठवा वाढदिवस: आनंदयात्रेची आठ वर्षं!
९. मुलीला नवव्या वाढदिवसाचं पत्र: अदू इन वंडरलँड आणि ॲलेक्स पर्वाची सुरूवात
१०. दहाव्या वाढदिवसाचं पत्र: मस्ती की पाठशाला!
दि. १७ सप्टेंबर २०२५
✪ सिंहगड, विजयदुर्ग, देवगिरी आणि भटकंतीची लेक- माला!
✪ पेरू, पारा, पारडं, मुग डाळ, अदरक अशा शब्दांचे नवीन अर्थ!
✪ अर्जुन पर्वाची सुरूवात! तुझं अर्जुनला कडेवर घेणं!
✪ ॲलेक्सची तुझ्यावरची माया, त्याचे shows आणि woes
✪ वाळूत, डोंगरात, समुद्रात आणि धबधब्यात केलेली मस्ती
✪ "हा जिल्हाच खारूताईंचा आहे!"
✪ माशाचं पिलू मोठी सायकल चालवायला शिकलं!
✪ वाचन अजूनही कंटाळे पण मस्ती खूप करे
✪ तुझं सलग १५ वाक्य संपूर्ण मराठी बोलणं!
✪ डोंगरांची मजा, कराटे आणि (मला मिळणारे) धपाटे!
✪ मुंज्या, स्त्री आणि भेडिया!
✪ क्रिकेट, बुद्धीबळ आणि तुझं पहिलं मेडल!
प्रिय अदू...
तर अदू! पाबई! आज तुझा अकरावा वाढदिवस!!! ह्या वर्षी गंमतच झाली! पत्र लिहीण्याच्या आधीच तू पत्र मागितलं! जसं ते छोटं बाळ होतं ना जे मागे लागायचं की, गोष्ट सांग गोष्ट सांग. आणि मग ते स्वत:च म्हणायचं, "एकदा काय झालं!" तशी गंमत. गेल्या वर्षभरात अशा खूप गमती झाल्या! आणि अगदी कालची गंमत म्हणजे तू चक्क २४ तास माझ्याशी "मौन" केलंस! मला ते आवडलं! रूसून बसलीस. मी कितीही प्रयत्न केले तरी तू बोलत नव्हतीस. एक बार तय किया तो तय किया! आपण जे ठरवलं ते करायचं ही जिद्द आहे तुझी. वर्षभरात खूप वेळेस तुझी ही जिद्द दिसली! तुझ्या आवडी, तुझ्या गोष्टीमध्ये तू "बीलीव्हर" आहेस. आपण नवीन ठिकाणी राहायला आलो त्या सोसायटीत स्विमिंग पूल तुला मिळाला. किंचितही न घाबरता अगदी "बीलीव्हर" होऊन सहजपणे तू पोहायला लागलीस! चार दिवसांमध्ये मस्त जमायला लागलं! आणि नवीन सोसायटीत तर खूप मित्र- मैत्रिणी मिळाले!

गेल्या वाढदिवसानंतर काहीच दिवसांनी तुला दुसरा लहान भाऊ मिळाला! अर्जुन! तुझे लहानपणीचे फोटो बघताना तू म्हणायचीस, "मी किती क्युट होते रे!" आणि तसाच गोंडस बाळ अर्जुन तुला मामेभाऊ म्हणून मिळाला. ॲलेक्ससोबत अजून एक भाऊ! त्याला तू चक्क कडेवर घेते आहेस! तेही अगदी आरामात! आणि इकडे ॲलेक्सनेही काय काय तुफानी धमाल केली! त्याचे ते शोज! त्याला प्रत्येक वेळी बाहेर नेतानाचं दिव्य! औंधला सोपं होतं जरा. पण पिंपळे गुरवच्या नवीन जागेत बरंच कठिण गेलं. त्याचे तिकडे दोघं- तिघं तरी मित्र होते! इथे खूपच मारामारी व्हायची. कठिण काम होतं. त्यात तो मध्ये मध्ये सुटला तर पूर्ण सोसायटीत पळायचा! पकडताच यायचा नाही! आणि ॲलेक्सवर झालेला तो टॉमीचा हल्ला!
आणि तो एक चिमुकला पॉमेरियन कुत्रा! ॲलेक्स जर ज्याचं नाव घेऊ नये तो- म्हणजे तो कणकेचा गोळा असेल तर तो पॉमेरियन कुत्रा हॅरी पॉटरसारखा होता आणि ॲलेक्स त्या चिमुकल्यासोबत अगदी त्या कणकेच्या गोळ्यासारखाच करायचा! आणि हो, एकदा तुझा जोरात पंच मला लागल्यामुळे मीसुद्धा तासभर बिन नाकाचा झालो होतो! तू शाळेतून दमून आलीस की ॲलेक्सच्या पोटावर चक्क अर्धा- पाऊण तास झोपायचीस. आणि तोसुद्धा अजिबात हलायचा नाही! तुझ्या त्या एका कार्टूनमध्ये ते वाक्य होतं ना पाहा- "जैसी करनी, वैसी भरनी!" तसं मात्र झालं नंतर. तू ॲलेक्सला आईपासून तोडलं होतंस. तिला किती रडू आलं असेल तेव्हा. किती वाईट वाटलं असेल. तेच तुलाही नंतर भोगावं लागलं. ॲलेक्सला आपल्याला दुसरीकडे न्यावं लागलं. कारण त्याला इथे अडकून ठेवल्यासारखं होत होतं आणि आपणही तर अडकून पडत होतो. ॲलेक्स लांब नाही गेलाय तर त्याच्या मित्रांमध्ये आणि पुढे शिकायला गेलाय.
पण तू हा विरह आणि हा त्रासही सहन केलास. तुझ्यासाठी हे तितकंच दु:खदायक होतं जितकं त्याच्या आईला तेव्हा वाटलं असेल. हळु हळु तू स्वत:ला समजवलंस. हा त्रास सहन केलास. आता माझं म्हणणं आहे इतका त्रास तू सहन करू शकतेस तर आणखी थोडा सहन कर. केस वाढवण्याचा त्रास सहन कर. हो ना. आणि हो, तो, ज्याचं नाव लोक घेत नाहीत आहे ना, तशाच इतरही गोष्टी आहेत! तुझ्या अशा गोष्टी ज्या सांगू नयेत! असं जे केलं जाऊ नये, असं जे बोललं जाऊ नये आणि असं जे ऐकलं जाऊ नये! तेसुद्धा लक्षात ठेव!
गेल्या वर्षभरातल्या गमती आठवताना अर्जुन आठवतो! अजूनही तिथून जाताना तू त्याचं हॉस्पिटल दाखवतेस! अगदी जन्मल्या जन्मल्या तू त्याची काळजी घेतली होतीस! आणि आता तो तुझ्याशी मस्त खेळतो! किती छान तू त्याला खेळवतेस! नोव्हेंबरमध्ये खूप लोक जन्मलेले आहेत बघ! आपण मग सिंहगडाचा दुस-यांदा ट्रेक केला! आणि गंमत म्हणजे मी एकदाही घसरलो नाही. नंतर आपण सगळ्यांनी धायरीतल्या खंडोबा मंदिराचाही मस्त ट्रेक केला पाहा. आणि तिथून खाली आल्यावर मी तुम्हांला सांगितलं की, तिथे कोण येत असतो! त्याच वेळेस बहुतेक तू मफिनची गोष्ट रेकॉर्ड केलीस. की तो मफीन नावाचा प्राणी कसा चोरांना पकडून देतो! तू सांगितलेली गोष्ट खूप जणांना आवडली पाहा. आणि मुंज्या चित्रपटाबद्दल तू सांगितलेला तुझा अनुभव तर पिक्चरच्या अर्धा झाला! आणि त्यातली गोष्ट ऐकताना सगळे गोंधळून गेले!
जानेवारीमध्ये आपण नवीन घरी आल्यावर तर तुला खूप गोष्टी मिळाल्या. नवीन मित्र- मैत्रिणी मिळाले. आयुष, स्वरा, रेवा, राधा! आणि आपल्या बिल्डिंगमधली ती "द देवांsssशी!" तुला हवा तेव्हा सहज जाता येईल असा स्विमिंग पूल मिळाला! स्विमिंग तू इतकी आरामात शिकलीस! स्वत:वर विश्वास ठेवलास. म्हणजेच "बीलीव्हर" झालीस! अशी बीलीव्हर तू मोठी पुस्तकं वाचण्यात आणि मोठा अभ्यास करण्यात कधी होणार ही मी वाट पाहतोय. अभ्यास तू करतेस. पण तो टी- 20 मधला व त्याच वेगाने! तू कसोटी क्रिकेटमधला अभ्यास कधी करशील अशी मी वाट बघतोय. जानेवारीतच तू माझी मोठी सायकलही चालवायला शिकलीस. माशाचं पिलू मोठी सायकल शिकलं! तुझे पायही दांड्यावरून पाहिजे तितके टेकायला लागले.
ह्या वर्षातली एक मोठी मजा म्हणजे आपण तुझ्या मार्चमधल्या सुट्ट्यांमध्ये केलेली सहल! संभाजीनगरमध्ये आपण गेलो होतो पाहा आणि कुठे कुठे मस्त फिरलो! अजिंठा- वेरूळ बघितल्यावर तर मी तुलाच किती तरी वेळेस थँकयू म्हणालो! तुझ्यामुळे मलाही ते बघता आलं. किती मस्त त्या लेण्या, मुर्त्या आणि अविश्वसनीय वास्तु! तुलाही खूप मजा आली. आणि देवगिरीचा किल्ला! तिथेही आपण खूप खूप भटकलो! तिथे तू चक्क खारूताईला भरवलंस! तुझ्या हातावर येऊन तिने खाऊ खाल्ला! तिचे दात तुला मऊ मऊ वाटले! किती किती खूश होतीस तू! आपण जिथे फिरलो तिथे तिथे तुला खारूताई भेटल्या! हा जिल्हाच खारूताईंचा आहे, तू म्हणालीस! तिथेच आपण खूप पायी फिरलो! औरंगाबाद लेण्या, हनुमान टेकडी, ताजमहालचा डुप्लिकेट! अवनीसोबत तुझी ओळख झाली. खूप काका- काकू, आजी- आजोबा भेटले! आणि सगळ्यांत स्पेशल म्हणजे ते सुहास काका. इतके ते फुर्तिले होते की, एकदाही त्यांच्या हातावर तुझा हात त्यांनी लागू दिला नाही! आणि त्यांनी पिटबुलचा जो आवाज काढला त्याला तोड नाही! कमालीचे आहेत ते! किती किती हसवलं! मलाही खूप मजा आली होती! आपण इतकं फिरलो की, एका लेखात नाही मावणार ते! ती लेकीसोबतच्या भटकंतीची लेकमालाच होईल! आणि हो, नंतर आपण माझा लाडका लेक- पाषाण लेकला सायकलीवर गेलो! चक्क मोठ्या सायकलीवर तू १८ किमी राईड केलीस! आलाप व स्वराही भेटले होते.
एप्रिलमध्ये आपण गिरीशकाकासोबत देवगडला गेलो! किती किती मजा आली! किती चिल केलं आपण! आणि तू वाळूमध्ये स्वत:ला पूर्ण बुडवलं होतंस! देवगड किल्ला, कुणकेश्वर मंदिर, ते आमराईतलं घर! लाईट हाऊस, पवनचक्क्या आणि बीच! आणि विजयदुर्गमधलं ते भयानक बोटींग! मी अस्सा घाबरलो होतो आणि तुझा हात मीच घट्ट धरला होता! जोपर्यंत ती बोट परत येऊन धक्क्याला लागली नाही तोपर्यंत मी आकाशातच तरंगत होतो! बाप रे! भयानक अनुभव! तू आणि गिरीशकाका मात्र चिल होते!
मेमध्ये तू गिरीप्रेमीच्या कर्जत शिबिरात गेली होतीस! तिथे खूप मजा केलीस! तिथे आणि आपण सोबत फिरतानाही तुला सगळे सांगायचे, मुलांच्या टॉयलेटमध्ये जा! इथ्थे नही, ओथ्थे जाओ! किती तरी लहान मुलं तुला दादाच म्हणतात! आता मीसुद्धा थकलोय! जंगलतोड ही भीषण समस्या बनली आहे! असो! त्या कँपमध्ये तुझी ताई- दादांशी चांगली गट्टी झाली! प्रसाद दादा हारसीबी म्हणाला होता! पण तुझं आरसीबीच नंतर जिंकलं! किती आनंद झाला तुला! तिथे तुझे नवीन मित्र- मैत्रिणी झाल्या. मजा केलीस तू. टेंटमध्ये राहिलीस, खूप फिरलीस. ट्रेकही केला. आणि मग नंतर आपण गिरीप्रेमी संस्थेचा तो कार्यक्रम बघितला. आणि मग तुझेही दर महिन्याला ट्रेक सुरू झाले पाहा! आपण पहाटे फर्ग्युसन कॉलेजला गेलो तेव्हाचं तिथलं वातावरण! तुझ्या त्या ट्रेकमुळे मला पुण्यातल्या हनुमान टेकडीवरचा ट्रेक करता आला.
मी तुला एकदा आपण रिक्षातून जात होतो तेव्हा एक गोष्टही सांगितली होती बघ- हिमालयामध्ये अडकलेला ऑस्ट्रेलियन माणूस! कसा तो डोंगरात बर्फामुळे वाट चुकतो, एका गुहेसारख्या जागेत अडकतो आणि ४३ दिवसांनी हेलिकॉप्टर त्याला सोडवतं. त्याची बहीण ऑस्ट्रेलियाहून येते शोधायला. आणि तो केवढी हिंमत करतो, किती झुंजतो! तोसुद्धा खूप मोठा "बीलीव्हर" म्हणावा लागेल! तो कराटेचा ब्लॅक बेल्ट होता आणि नंतर तुलाही कराटे आवडलं! पांढरं भूत बनून तुझं कराटे सुरू झालं! संध्याकाळी त्या रस्त्यावरून जाणं जाम भितीदायक काम आहे!
हे वर्ष पण खरं गाजवलं तुझ्या मैत्रिणींनी! तुमचा तो अल्फा ग्रूप आणि ते खूप वेळ फोनवर बोलत बसणं! आणि मला किती तरी नवीन शब्दांचे अर्थ कळाले! पेरू, पारा, पारडं, मुगडाळ आणि अदरक! हे अर्थ मला माहितच नव्हते! माझ्या ज्ञानात किती भर पडली! मुलींची ही नावंपण असू शकतात! तुझ्या ह्या मैत्रिणींमुळे मला त्या जुन्या मैत्रिणीच आठवतात ज्यांना तू आता भेटतच नाहीस! तुझ्या ह्या मैत्रिणी तर पिकाचूवरही भारी पडल्या! फेविकॉलचा जोड बनल्या आहात तुम्ही!
आपण गिरीशकाकासोबत ताम्हिणीलाही गेलो नंतर. मस्त फिरलो! तू धबधब्यामध्ये भिजून घेतलं! आणि हो, मार्चमध्ये गिरीशकाकासोबत अंजनवेलला केलेलं आकाश दर्शन! तिथे आपण टेंटमध्ये राहिलो. आलाप- स्वरापण सोबत होते पाहा. पहाटे मला ५ ला उठव, ४.३० ला उठव, नको मी तुमच्यासोबतच उठते! आणि खरंच तू उठलीस आणि पहाटेचं आकाश अनुभवलंस! सुनीता विल्यम्स असलेलं स्पेस स्टेशन आणि प्रचंड तारकागुच्छ असलेलं पूर्ण काळं आकाश! तुलाही खूप मजा आली! तिथेही आपण मस्त फिरलो होतो.
हे पूर्ण वर्ष "बीलीव्हरने"सुद्धा तितकंच गाजवलं! सोसायटीतल्या गणपती उत्सवात तुला "बीलीव्हर" गाण्याचं बक्षीस मिळालं. शिवाय बाकीही तीन बक्षीसं मिळाले. खूप मजा आली तुला. तुझं पहिलं मेडलही मिळालं! किती उशीरापर्यंत तुझं ते कॅरम व बुद्धीबळ अशा स्पर्धा सुरू होत्या! सोसायटीतल्या तुझ्या त्या मांजरी! खेळामध्ये आणि आवडीच्या गोष्टीत तू जशी "बीलीव्हर" आहेस, तशी इतर गोष्टींमध्येही होऊ शकतेस. फक्त स्वत:वर विश्वास ठेव. विराटसारखा स्वत:वर विश्वास ठेव, मग यशस्वी होशीलच! अरे, यशस्वी! अजूनही आपण बघितलेली ती मॅच आठवते! तू किती चिरकून चिरकून यशस्वीला हाक मारली होतीस! आपण नंतर भारत- इंग्लंड मॅचही बघितली. तू किती खूश झालीस, भारत चौथी मॅच जिंकला तेव्हा! आणि ऋषभ पंतचं हँड स्टँड व फ्लिप! तिकडे तुझं आरसीबी जिंकलं, पण मी बंगलोरला सायकलिंगला गेलो तेव्हा माझं "हारसीबी" झालं! मैदानात न उतरताच मी इंज्युअर्ड झालो! असंही होतं.
सुट्टीमध्ये आपण विज्ञान प्रयोग केले पाहा! तू मला काही प्रयोग सांगितले- तो पाणी भरलेल्या ग्लासातून उलटा दिसणारा बाण! आणि पाण्याने भरलेला उलटा करूनही न पडणारा ग्लास. किती प्रयत्न करून मला ती भिंगरी शेवटी जमली होती पाहा! शिवाय तुला ते "स्त्री २" आणि भेडिया असे पिक्चर बघताना अजिबातच भिती वाटली नाही! किंवा तुला कशाचीच भिती वाटत नाही! स्टेजवर बोलतानाही नाही! मला मात्र खूप वेळा भिती वाटते! विशेषत: तुझ्या पंचची! तुला वाटते की भिती एका गोष्टीची! तुझी मारामारी, मस्ती आणि हल्ले ह्यावर माझ्याकडे एक रामबाण उपाय आहे! तो उपाय केला की तू प्रचंड घाबरतेस! गुदगुल्या केल्या की तू एकदमच लोळतेस आणि भितीने ओरडतेस!
तू अंग्रेज के जमाने के जेलरची नक्कलही छान करतेस. त्या सूरमा भोपालीचीही! पण तुझा मूड! तो मात्र अगदी तुझ्या त्या व्हिडिओगेम कॉमेंटेटरसारखा आहे! तू थोडं मनावर घेतलंस तर किती तरी गोष्टी छान करू शकतेस! मला खरंच वाटलं नव्हतं की, तू सलग एक मिनिट मराठी बोलू शकशील! पण तू बोललीस! अगदी मोजून मोजून शब्द शोधलेस. आमच्या बाई आम्हांला शिकवत होत्या, त्यांनी आम्हांला ... गृहपाठ दिला असं छान बोललीस! आणि आपण करून बघितलेला तो कापरेकर स्थिरांक! 6174! किती गंमत ना! तुला वाटतं मी तुमच्या शाळेत येऊन गणित शिकवावं! तुझा अभ्यास घेताना आपण करतो ती मस्ती! माझ्या अंगात येणारा टिपटिपवा आणि ॲलेक्स!
तर असं हे वर्ष! खूप गमती, धमाल आणि मस्ती केलेलं! आता तू आणि आजूही मोठ्या झाल्या. माझ्या हातात येतच नाहीत! आता मला खेळायला तो गोंडस बाळ मात्र आहे! तू स्वत: कशी होतीस, हे तुला त्याच्यात बघता येतं! तुझ्या लहानपणीची गाणी- गोष्टी तू विसरलीस, पण मला आठवतात! येणा-या वर्षातही तू खूप मजा करणार आहेस. खूप नवीन शिकणार आहेस. आणि खूप फिरणारही आहेस!
तुझ्या "बीलीव्हर"मधल्याच ह्या काही ओळी-
Pain! You made me a, you made me a believer, believer
Pain! You break me down and build me up, believer, believer
-तुझा निनू
निरंजन वेलणकर दि. १७ सप्टेंबर २०२५.
(वाचल्याबद्दल धन्यवाद! जवळच्यांसोबत शेअर करू शकता.)
वाह!! खूप गोड. अदूस अनेक
वाह!! खूप गोड. अदूस अनेक आशीर्वाद आणि शुभेच्छा.

अदरक, मुगडाळ, पेरु - ही नावं?
>>>>>>>>>>अशी बीलीव्हर तू मोठी पुस्तकं वाचण्यात आणि मोठा अभ्यास करण्यात कधी होणार ही मी वाट पाहतोय.
तुमची अदुला लिहीलेली सगळी
तुमची अदुला लिहीलेली सगळी पत्र, लेख मला आवडतात. या पत्रांमधून जितकी गोड अदु दिसते तितकाच प्रेमळ, मुलीला नवनवीन अनुभव देणारा बाबाही दिसतो.. अदुला शुभाशिर्वाद.
तुमची पत्रे मला कुछ कुछ होता
तुमची पत्रे मला कुछ कुछ होता है मध्ये राणी मुखर्जीने तिच्या सिनेमातल्या मुलीला लिहिलेल्या पत्रांसारखी वाटतात!
आणि तुमची बहुतेक उद्गारचिन्ह आणि पूर्णविराम यात गल्लत झाली आहे!
धन्यवाद! @ टवणे सर, नाही हो.
धन्यवाद!
@ टवणे सर, नाही हो.
बहुतेक त्यांना म्हणायचय अति
बहुतेक त्यांना म्हणायचय अति उद्गारचिन्हे टाकलीयेत जिथे पूर्णविराम चालला असता.