दुसरं प्रेमपत्र: सूर निरागस हो. . .

Submitted by मार्गी on 18 September, 2016 - 12:10

प्रिय अदू. . . .

काल तुझा दुसरा वाढदिवस झाला! तू दोन वर्षांची झालीस! कालचं तुझं नाचणं, सेलिब्रेशनमध्ये हसणं, सगळ्यांसोबत खेळणं, गोल गोल फिरणं आणि न कंटाळता न रडता अखंड स्टॅमिना ठेवणं. . . खरोखर शब्द फार फार अपुरे आहेत. मला काल तुझी आणखीन एक गोष्ट विशेष वाटली. तुझ्या स्वभावाचा तो भागच आहे. तुझी निरागसता! सहज भाव! मन खरोखर इतकं शुद्ध नितळ असू शकतं? हो, असू शकतं, असतं, हे तुझ्याकडे बघून जाणवतं अदू. म्हणून कालची बर्थडे पार्टी ही 'सूर निरागस हो. . .' अशीच होती. . . .

अदू, गेल्या दोन वर्षभरामध्ये तुझ्यासोबत जीवन सार्थक करणारे असंख्य क्षण आले. एक एक दृश्य डोळ्यांपुढे जीवंत होतं. अगदी काही दिवसांची असताना तू माझ्याकडे बघून हसलीस; आपण जीभेच्या भाषेने बोलायला सुरू केलं! तुला पहिल्यांदा मांडीवर घेतलं तो क्षण. असे असंख्य क्षण तू दिलेस. तुझ्या सोबतीविषयी लिहिताना डोळे पाणावतात. शब्द फुटत नाहीत. तू उच्चारलेला पहिला शब्द! तुझ्या एक एक लीला! अक्षरश: नवसंजीवनी असं काही असेल तर ते तुझं चैतन्यमय अस्तित्व! आणि झोपल्यावर तुझा शांत व सखोल समाधानी असलेला चेहरा! असंख्य आठवणी, पण लिहिताना एक शब्द सुचत नाहीय अदू.

लौकिक अर्थाने तू आम्हांला पालक म्हणून घडवते आहेस. Child is the father of man. तुझ्या जन्मासोबत आमचाही पालक म्हणून जन्म झाला. आणि खरं तर पालक म्हणूनच नाही; पण जीवनामध्ये नवी दृष्टी येण्यासंदर्भातही तू आम्हांला जन्म दिलास. आज तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुझ्याकडून काय काय शिकतोय आणि काय शिकू शकतो हे तुला सांगावसं वाटतं. मागच्या वर्षीच्या पत्रात बोललो होतो त्याला जोडून पुढे बोलावसं वाटतं.

मुलांना ईश्वराची फुलं का म्हणतात, ह्याचा खरा प्रत्यय तुला बघताना येतो. शुद्धता म्हणजे काय; शांती- समाधान काय हे तुला बघताना कळतं. आता हे शब्दामध्ये कसं सांगू? तुझ्याआधी मी फार मुलं इतक्या जवळून बघितली नव्हती. पण मला वाटतं तुझ्यामध्ये जे चैतन्य आहे; जी प्रगाढ शांती आहे; ती सगळ्यांमध्येच असते. अदू, मला आठवतंय मागच्या दिवाळीच्या वेळेस तू फटाक्यांचा आवाज ऐकण्याइतकी मोठी झाली होतीस. पहिल्या दिवाळीला तू छोटसं बाळ होतीस. त्यामुळे तुझ्या कानात बोळे घातले होते. पण गेल्या दिवाळीच्या वेळेस मात्र तुला फटाक्यांचे आवाज नीट कळत होते. आणि तूसुद्धा ते खूप सहजपणे ऐकत होतीस. तुला भिती तर माहितीच नाही. ज्याची सहसा लहान मुलांना भिती असते; त्याची तुला ओढ वाटते. मग ते पाणी असेल, अंधार असेल किंवा भूभू असेल! फटाक्यांमुळे न घाबरता तू खुदकन हसायचीस! धुडूम! तुझी ही सहजता मला सम्मोहित करते अदू.

असंख्य वेळेस बघितलं आहे की, तुझ्या मनामध्ये समोरच्या गोष्टींबद्दल एक सकारात्मक खुलेपणा असतो. फार क्वचित तू एखादी गोष्ट बघून नको म्हणतेस किंवा रडतेस. जगाकडे निरोगी दृष्टीने कसं बघावं, हे तुझ्याकडे बघून शिकायला हवं. एखादा भूभू भुंकत असेल किंवा एकदम दिवे गेले तरी तू प्रसन्नच असतेस! प्रसन्नता हे तुझं खरं नाव आहे! अदू, मला हे सगळं शब्दात लिहिणं फारच कठिण वाटतंय. पण प्रयत्न करतो. मागच्या वाढदिवसानंतर लगेचच तू काही दिवस बरीच आजारी होतीस. चार- पाच दिवस तर तू अगदी अशक्त होतीस. दिवसभर सगळीकडे पळून मस्ती करणारी; धावत- ओरडत- चित्कारत फिरणारी तू अगदी मलूल होऊन गेलीस. बाएर जायचं ना म्हणणारी तू एकदम शांत होऊन दिवसभर झोपून राहायचीस. त्यावेळी भले तुझं बोलणं- हसणं कमी झालं असेल, पण तुझ्या चेह-यावरचं स्मित टिकून होतं. दादाकडे तू तेव्हासुद्धा हसून बघत होतीस.

अदू, मला वाटतं तुझी प्रसन्नता अकारण असल्यामुळे बाहेर काहीही असलं तरी तुझं मन प्रसन्नच राहायचं. आणि अजूनही तसंच आहे. आमच्या नजरेमध्ये जिथे आनंदाचा मागमूस दिसत नाही; तिथे तू खुदकन हसतेस. मला आठवतं तू अजून लहान असताना सरपटत सरपटत दुस-या खोलीत यायचीस. मला शोधत यायचीस. आणि मी दिसलो की किती हसायचीस! जीव कसा लावावा हे खरंच तुझ्याकडून शिकण्यासारखं आहे. गेल्या वर्षभरात तू असंख्य वेळेस अशी ऊर्जा दिलीस. आज ह्या गोष्टींकडे बघताना एका अर्थाने प्रचंड पश्चात्ताप होतो. आतून प्रचंड दु:ख होतं. तू इतकी प्रसन्न, शांत, आनंदमय असताना आम्ही मात्र आमच्या चिंता, आमचे असंख्य टेन्शन्स, जीवनातले प्रेशर्स- सगळं रबिश घेऊन तुझ्याकडे जायचो. अनेक वेळेस तर तुझ्यापासून लांब जावं लागायचं. आणि रोजच्या आयुष्यातल्या कामामध्ये तुला मनासारखा वेळ देणं जमतही नाही. आम्ही मनामध्ये इतके ताण घेऊन असताना तू कधीही तक्रार केली नाहीस. को-ऑपरेटिव्ह हा काही बरोबर शब्द नाही, पण तू खरोखर प्रचंड को- ऑपरेट करतेस. तुला एकदा सांगितलं की तू समजून घेतेस. त्यामुळेच तुला नानीकडे ठेवून आम्ही दिवसभर तुझ्यापासून दूर जाऊ शकतो. किंबहुना तू आम्हांला जाऊ देतेस. इतकं तुझं मन मोठं आहे; इतकी शांती तुझ्याकडे आहे. आम्ही तुला बाय करताना तुला त्रास होतोच. ते स्वाभाविक आहे. पण दुस-या मिनिटाला तू प्रसन्नचित्त असतेस. गोष्टी ज्या आहेत त्या तशा स्वीकारणं ही कला आम्हांला शिकव ना! पीज अदू!
जीवनातले संघर्ष, असंख्य धक्के, मनामधील असंख्य तणाव, विकार, उद्रेक ह्यांना घेऊन तुला भेटल्यानंतर मात्र एका क्षणामध्ये सगळं विसरलं‌ जातं. अदू, आम्ही लहान असताना कॉमिक्समध्ये वाचायचो की, काही व्हिलन त्यांच्यावर वार केल्यावर अचानक अदृश्य व्हायचे किंवा ट्रान्समिट व्हायचे. तसे आमच्या मनातले विकार व ताण तुला भेटताना अदृश्य होतात! असा हा तुझा परिसाचा स्पर्श की लोखंड जरी असेल, तरी त्याचंही सोनं होईल! आम्ही तुला भेटल्यावर तुझं ते आनंदाने नाचणं, चित्कारणं आणि पळणं! Really, child is the father of man. मागच्या पत्रामध्ये म्हंटल्याप्रमाणे आम्ही तुझे लाड करू त्यापेक्षा कितीतरी जास्त तूच आमचे लाड करतेस. तुझ्यामध्ये असलेली अखंड प्रसन्नता आणि ऊर्जा!

पालक कसं व्हावं हे तूच मला शिकवते आहेस. अदू, मला आठवतं जेव्हा मी तुला स्वतंत्रपणे एकट्याने सांभाळायला शिकलो, तेव्हा आधी मला खूप टेन्शन होतं. मी अक्षरश: तासा तासाचं प्लॅनिंग करायचो- तुला पाच मिनिट खेळणं दाखवेन, दहा मिनिट गॅलरीत कडेवर घेऊन उभं राहीन, दहा मिनिट खिडकीतून रस्त्यावरची गंमत दाखवीन, पंधरा मिनिट चक्कर मारायला नेईन असं. पण तू बोट धरून एक एक गोष्ट अशी शिकवत गेलीस की, सगळं सोपं झालं. माझ्या कित्येक भिती तू खोट्या ठरवल्यास. तुला पूर्वी खिडकीजवळ किंवा कठड्याजवळ कडेवर घेताना भिती वाटायची खूप. पण तू हळु हळु सगळं सोपं करत नेलंस. तुझ्यामुळे एक प्रकारची शिस्त शिकावी लागली आणि पुढेही शिकावी लागणार आहे. कारण तू प्रखर बॅटरीसारखी तेजस्वी आहे. तिथे अंधार टिकू शकत नाही. तू जिथे खेळणार- बसणार; तिथे गोष्टी अशा हव्यात की, तुला खेळताना अडवायची गरज पडणार नाही. 'हे कर'; 'हे नको करू' असं कोणत्याही प्रकारे न सांगता तुला मुक्त पद्धतीने खेळता येण्यासारखी अरेंजमेंट देता यायला हवी. ती एक दृष्टीच तू दिलीस. आणि आम्ही तुला जे सांगू, ते तू कधीच टाळलं नाहीस. अदू, आजही तुझा सूर इतका निरागस असतो की, तू सहजपणे म्हणून जातेस- मी खुर्चीवड बसू, तेडी आणू? एकदा तुला समजावून सांगितल्यानंतर आणि स्वाभाविक प्रकारे येणारी तुझी प्रतिक्रिया येऊन गेल्यानंतर तू कधीच कोणत्याही गोष्टीची तक्रार केली नाहीस. खरोखर "ह्या क्षणामध्ये कसं जगावं" हे तूच दाखवून दिलंस.

अर्थात् आता समाजामध्ये- ठरलेल्या जीवनामध्ये येणा-या गोष्टी आहेतच. त्या ब-याच प्रमाणात अपरिहार्यसुद्धा असतात. समाजात वावरताना अनेक गोष्टी शिकाव्या लागतात. त्यामुळे तुला त्या बाबतीत अडवणं किंवा अनेक वेळी नको म्हणणं अपरिहार्य आहे. आणि शिवाय तू इतकी शार्प आहेस की, तुला वेगळं सांगू, शिकवू, त्यापेक्षा तू आमच्या वागण्यातूनच प्रचंड काही घेत असतेस. आम्ही तुझ्यासमोर बोलताना जे बोलतो तेच जर तू बोललीस तर तेव्हा मात्र आम्ही तुला नको म्हणूस असं सांगतो. आम्ही तुझ्यासमोर 'गप्प बस' म्हणतो आणि मग तूच आम्हांला ते ऐकवतेस, तेव्हा मात्र आम्ही तुला सांगतो की, असं मनायचं नाई! एक खुली विचारशक्ती कशी बंदीस्त होत जाते ह्याचंही उदाहरण बघायला मिळतं. तू विमानाचा आवाज ऐकतेस तेव्हा म्हणतेस मिमान आलं! आणि उत्तेजित होतेस. आणि लगेच (बाहेर न जाता) तूच सांगतेस की, दिसत नाई, ढगाते! अदू. . .

अद्विका- अदू, स्वरा, गोड, साखर, छकुली, मनुली, पिकू अशी तुझी‌ किती नावं! तू मला अगदी लहान असताना निन्ना म्हणायचीस! अगदी गोड आवाजात हाक मारायचीस, निन्ना! आणि आता निन्जन म्हणतेस! लहान बाळांना जन्मत: प्रत्येक गोष्टीमधलं चैतन्य दिसत असतं! तुलासुद्धा ते दिसतं. म्हणूनच तुला 'भितीदायक' भूभूचीही भिती वाटत नाही. भुंकणा-या भूभूच्याही तू सहज जवळ जाऊन त्याच्याशी बोलू शकतेस! अदू, चांगला शिक्षक तो असतो जो विद्यार्थ्यांचीही चांगली ओळख करून देतो आणि स्वत:लाही विद्यार्थ्यांपुढे ठेवतो; स्वत:ची तशी ओळख करून देतो. तशीच तू पालकत्व म्हणतात ती एक एक गोष्ट शिकवतेस. सुरुवातीला अगदी छोट्या गोष्टीही अवघड वाटायच्या. तुला सांभाळताना तू रडलीस तर काय करू, असं वाटायचं. पण तू मला ते सहजपणे कसं करायचं हे दाखवून दिलंस. तीच गोष्ट तुझ्या शी धुण्याची. लर्निंग बाय डुईंग! आणि हे करताना तुझी सोबत होती, तुझी मंजूळ 'निन्ना!' हाक होती! तू सतत देत असलेल्या सोबतीमधला जिव्हाळा होता. .

अदू! अनेक गोष्टी डोळ्यासमोर येत आहेत. एका कार्यक्रमामध्ये तू केलेली अखंड मस्ती! आणि पळून- चालून दमलेलं बाळ चक्क रांगणारं बाळ झालं! किंवा एक टोपी घातल्यानंतर दिसणारं तान्हं बाळ! तुला पहिल्यांदा मोटरसायकलवर नेलं तेव्हाचा अनुभव! प्रत्येक वेळेस तुझं आनंदाने मोहरून जाणं! तुला सांभाळताना सुरुवातीच्या दिवसांमध्ये खूप टेन्शन असायचं. लवकरच तू मला तेही शिकवलंस. तूच सांगायचीस, निन्जन पाणी दे, निन्जन बाएर जायचं ना. . .

अदू, तू दोन वेळेस बरीच आजारी पडलीस. त्यावेळीसुद्धा तू मांडीवर पडल्या पडल्या कोणतं गाणं म्हणायचं ते सांगायचीस. आजीकडून गाणं म्हणून घ्यायचीस. अगदी आजारी असतानाही तू अखंड रडते आहेस, हे कधीच झालेलं नाही. तुझी शांती प्रत्येक वेळी टिकून असायची. कडू औषध घेतानासुद्धा तू सहजपणे घ्यायचीस. ते फेकून द्यायची नाहीस. किंवा त्यामुळे रडायची नाहीस. अगदी इंजेक्शन घेतानासुद्धा तू जेमतेम एक मिनिट रडतेस. नंतर लगेच शांत आणि चेह-यावर हसू! दादासोबत आणि सगळ्यांसोबत तू नेहमी खेळतेस. तुला लोक आवडतात. आणि अदू, त्या दिवशी तू घोषणा केलीस तेव्हा तर मला मोठा धक्का बसला- 'आई, मला शाळेत जायचंय!'

अदू, तुला आमच्यामुळे अनेक वेळेस लांब लांब किंवा वेडेवाकडे प्रवास करावे लागले. अनेक वेळेस दिवसभर आईपासून लांब राहावं लागलं. पण कधीच तुझी काहीच तक्रार नसायची. मनात आलेली प्रतिक्रिया व्यक्त झाल्यानंतर तू पूर्ववत- शांत हसरी! मला आठवतं, घरात दु:खद प्रसंग होता- सगळ्या घरावर शोककळा होती. पण केवळ तुझ्या उपस्थितीमुळे ते वातावरण सुसह्य झालं. सगळ्यांच्या मनावर दु:खाची तीव्र छाया असूनही केवळ तुझ्या उपस्थितीमुळे हसू उमटलं.

अदू, तुझ्यासोबत ट्रेकिंग करतानाही खूप मजा येते! वाटेतल्या गमती जमती तू एंजॉय करतेस. भूभू, चिऊताई, फुलपाखरू, झाडं, डोंगर, किडी, गवत, गाड्या, चोंद्र, तारे! आणि मला घाम आला तर मी पुसू, मी पुसू म्हणत पुसून देतेस! आणि सारखी म्हणतेस खाली शोद, खाली शोद! चालव ना, चालव ना! आईसोबत हिमालयात फिरत असतानासुद्धा तू म्हणायचीस, मला शोद, चालव! आजूबाजूच्या सगळ्या परिसरासोबत तुझं नातं अगदी घट्ट. मग ते खेळणी असतील, कागदाचा तुकडा असेल किंवा तुझा तेडी असेल! तू आमच्यावरही तेवढीच माया करतेस. प्रत्येकामध्ये तुला चैतन्य दिसतं.

आणि लहान गोष्टींमध्ये तर तुला प्रचंड आनंद मिळतो. जवळून जाणा-या जेसीबीचा आवाज आला की लगेच तू धावत येतेस! त्याची घरघर दूर असतानाच तुला कळते आणि तू पळत येतेस. मग आपण खिडकीत जाऊन जेसीबी बघतो. जेसीबी आला की, तू हसून त्याच्याकडे बघते. मग तो हळु हळु पुढे जातो. त्यात गाणं लागलेलं असतं (एकदा तर त्यामध्ये चक्क घूंघट की आड से हे माझं गाणं लागलं होतं, त्यावेळी जे वाटलं ते विसरू शकत नाही. . !) आणि तो जाईपर्यंत तू टक लावून बघत राहतेस. अदू, तुझं मन इतकं निरागस आहे की, तुला भांडणा-या भूभूंचाही त्रास होतो. आम्ही रडायची नक्कल जरी केली तरी तुला खरंच रडू येतं. तुला खेळण्यांमध्येही तसंच चैतन्य दिसतं. तू म्हणतेस याला जोप आलीय! मग तू त्याला मांडीवर घेऊन झोपवतेस! बाहेर जाताना तू सारखी म्हणतेस, तू जाऊ नकोस, नको जाऊ ना! इतका तू जीव लावतेस. . . जेव्हा टिव्हीवर सैराटचं गाणं लागतं तेव्हा तू लगेचच चेकाळून नाचायला लागतेस! सैलात जालं जी! जिंग जिंग लागलं, असं म्हणतेस! त्यावर नाच करतेस आणि कडेवर घे म्हणतेस! मग आपण एकत्र नाचतो! छोट्या छोट्या गोष्टींमध्ये इतकं मोठं चैतन्य बघण्याची सूक्ष्मदर्शकासारखी सूक्ष्म दृष्टी तुझ्याकडून आम्हांला कशी मिळेल, हा मोठा प्रश्न आहे.

ही दृष्टी म्हंटलं तर साधी आणि म्हंटलं तर कठिण गोष्ट आहे. कारण आपण त्याच गोष्टी बघू शकतो ज्यासाठी आपल्या डोळ्यांची खिडकी उघडी असते आणि आपली परिस्थिती त्यासाठी तयार असते. अदू, तुझी सोबत मिळण्याआधी मी लहान मुलांमधलं चैतन्य इतकं बघू शकायचो नाही. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपली दृष्टी वेगवेगळी असते. आपण जीवनाच्या मार्गात ज्या ठिकाणी असतो, तिथून त्या स्थानानुसार आपल्याला समोरची दृश्य दिसत असतात. आपल्या वासना ज्या प्रकारच्या असतील; तीव्र आवेग ज्या स्वरूपाचे असतील; त्यानुसार आपली दृष्टी ठरत असते. एकाच उद्यानामध्ये जर एक वैज्ञानिक आणि एक कवी गेले तर ते अतिशय वेगवेगळ्या गोष्टी बघतील. आणि हेसुद्धा असतं की, आपल्याला जे बघायची इच्छा आहे, तेच आपण बघतो आणि अर्थातच जे बघायची इच्छा नाही, ते बघू शकत नाही. पण अदू, तुझ्यामुळे जीवनात पूर्वी न दिसलेलं खूप मोठं दालन दृग्गोचर झालं. अनक्लटर्ड माइंड काय असतं; शुद्ध ऊर्जा कशी असते; हे बघायला मिळालं. . .

अदू! तू इतका जास्त जीव लावतेस की, अक्षरश: नतमस्तक झाल्यासारखं वाटतं. तू खाताना एक घास न विसरता आम्हांला देतेस. माया करतेस. इतकी जास्त आत्मीयता देतेस! अक्षरश: नतमस्तक झाल्यासारखं वाटतं. परत परत जाणवतं की, तूच आमची पालक आहेस; आमची मार्गदर्शक आहेस. त्याची परतफेड नाहीच, पण ती योग्यताही मिळवणं कठिण आहे. ती निर्दोष दृष्टी; ते शुद्ध, वर्तमानाच्या क्षणात जगणारं मन! हे कसं आणू! इतकी अविश्वसनीय निरागसता! अगदी तुझी खेळणीही तुला जीवंत असतात. तू इतकी निरागस, निर्मळ असते आणि माझं मन मात्र वासना- विकारांनी बरबटलेलं. तुला प्रत्येक गोष्टीतलं चैतन्य दिसतं, पण मला प्रत्येक गोष्टीतला दोष दिसतो. तुझ्यामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी 'एक्सेप्टन्स' आहे; तर मला प्रत्येक गोष्टीमध्ये काही खटकतं!

अदू, तू इतकी शार्प आहेस की, तुला सगळ्या गोष्टी बरोबर लक्षात राहतात. जिथून वडापाव आणतो, त्याच्या जवळ जाताना बरोबर तू म्हणतेस, वडापाव आणती? गाणं ऐकताना आपोआप तुझे हात दाद देतात. तुझी सगळी बडबडगीतं तुला पाठ आहेत आणि तुझ्यामुळे घरात सगळ्यांनासुद्धा! तुला लोकसुद्धा लक्षात राहतात! मुख्य म्हणजे माझ्यापेक्षा तू खूप जास्त सोशल आहेस, ह्याचं सगळ्यांना विशेष कौतुक वाटतं! मोबाईलमध्ये रिंगटोन म्हणून पूर्वी‌ लावलेलं गाणं कधी लागलं तर तू लगेच ओळखतेस- फोन आली! गणबाप्पासमोरून जाताना तूच मला सांगतेस 'जय बाप्पा कर!' तू इतकी शार्प आहेस की, आम्ही तुझ्यासमोर जे बोलू; तुला एकदा जे सांगू, ते तू बरोबर लक्षात ठेवतेस. त्यामुळे खरं तर आम्ही खूप जवाबदारीने तुझ्यासमोर बोललं पाहिजे. तितकी सजगता ठेवली पाहिजे.

ज्याप्रमाणे विपश्यना साधना करताना सुरुवातीला मनामधले सगळे विकार वर येतात आणि सांडपाणी तुंबलेल्या गटारामध्ये एखादा शुद्ध दुधाचा थेंब टाकल्याप्रमाणे मनामधील जळमटांच्या पार्श्वभूमीवर सजगतेचा बिंदू दिसतो. पण त्याबरोबर तो आधीच्या त्या गटाराचं खरं रूपसुद्धा दर्शवेल. तशी तुझ्या सोबतीमध्ये मनामधले असंख्य विकार ख-या अर्थाने जाणवतात; ते विकार आहेत हे कळतं. कारण आपल्याला गोष्टींमधला फरक कळण्यासाठी काँट्रास्ट आवश्यक असतो. काळ्या फळ्यावर काळ्या खडून लिहिलं तर वाचता येत नाही. काळ्या फळ्यावर लिहिण्यासाठी पांढरा खडूच लागतो! तुझं सोबत असणं हे पांढ-या खडूसारखं आहे! मनामध्ये असलेले असंख्य विकार तुझ्या शुभ्रतेमध्ये ख-या अर्थाने दिसू लागतात. . .

आणि हे विकार; हे तणाव; मनातली ही अशांती व मळभ केवळ दिसणं पुरेसं नाही. अखंड सजगता ही अतिशय वेगळी गोष्ट आहे. वैचारिक पातळीवर आपल्याला सगळं कळत असतं. पण ते प्रत्यक्षात उतरवता येत नाही. आपण लाख म्हणतो की राग वाईट आहे; किंवा राग निरर्थक आहे; पण त्या त्या वेळी बरोबर राग आपला ताबा घेतोच. अदू, एक गोष्ट तुला सांगून ठेवतो. तुला मोठेपणी ती कळेल. एका गावामध्ये एक पुजारी राहात होता. सगळ्यांना वाटायचं की तो मोठा धार्मिक माणूस आहे. दिवसरात्र तो त्याच्या घरासमोरच्या मंदीरात बालाजी ह्या दैवताचा जप करत बसायचा. पहाटे तीन तास आणि संध्याकाळी तीन तास त्याचा जप व भजन मोठ्या आवाजात चालायचं. आसपासच्या लोकांना त्यामुळे खूप त्रास व्हायचा. पण देवाचं वजन आहे, म्हणून कोणी काही बोलायचं नाही. त्याच्या जवळच एक तरुण राहात होता. त्याला हा माणूस माहिती होता. त्याचं खरं नाव कोणालाच माहित नव्हतं. बालाजीचा कठोर उपासक म्हणून सगळे त्याला बालाजीच म्हणायचे. एकदा त्या तरुणाने त्याला धडा शिकवायचं ठरवलं. त्याने काही मित्र गोळा केले व त्यांना तयार केलं. बालाजीच्या घरासमोर एक छोटी विहीर होती. बालाजी रात्री अंगणातच खाटेवर झोपला होता. मध्यरात्रीनंतर त्याने मित्रांना गोळा केलं. त्यांनी बालाजीला खाटेसह गुपचूप उचललं आणि हळूच नेऊन विहिरीवर नेऊन ठेवलं. बालाजी झोपेतच होता. मग ते हळुच लांब जाऊन उभे राहिले आणि त्यांनी एक दगड मारून बालाजीला जागं केलं. ज्या क्षणी बालाजी जागा झाला, त्याने अतिशय मोठी किंकाळी फोडली! त्याच्या किंकाळीमुळे आजूबाजूचे लोक जागे झाले! तो भितीने थरथर कापत होता. तेव्हा तो तरुण समोर आला आणि त्याने बालाजीला विचारलं, आता सांगा, तुम्ही किंकाळी का फोडली? तुमचा बालाजी तुम्हांला आठवला नाही का? तुम्ही त्याची इतकी भक्ती करता तर तुम्हांला त्याची आठवण न होता भिती कशी वाटली? बालाजी पहिले नाराज झाला आणि मग खजील झाला. रोज ओरडून ओरडून केलेला जपसुद्धा आपल्या मनात खोलवर जात नाही; तिथली भिती आहे तशीच राहते, हे त्याला जाणवलं. त्यानंतर त्याने कर्मकांड म्हणून केला जाणारा जपाचा प्रकार बंदच केला! आणि काही काळानंतर तो अतिशय वेगळा माणूस झाला!

त्यामुळे वैचारिक पातळीवर; बुद्धीच्या पातळीवर अशा गोष्टींविषयी सजग असणं सोपं आहे; पण अंतर्मनामध्ये खोलवर ती सजगता ठेवणं हे कष्टसाध्य आहे. आणि त्यासाठी सततची साधना- सततचं रिमाईंडर आवश्यक आहे. तरच ही सजगता खोलवर जाऊ शकते आणि कोणत्याही बिकट प्रसंगी- जागेपणी किंवा झोपेमध्येसुद्धा- टिकू शकते. अदू, तुझी शुद्धता- तुझी शुभ्रता आज आहे अशीच टिकवून ठेवणं, त्यावर कोणतेही डाग किंवा मळभ न येऊ देणं आणि निसर्गाने तुला आमच्यापर्यंत ज्या शुद्ध स्वरूपात आणलं, तसं तुला पुढे टिकवून ठेवणं, ही खरी आमची जवाबदारी आहे. अर्थात् म्हणतात ना की निसर्गामध्ये प्रत्येक जणच शुद्ध स्वरूपात जन्म घेत असतो. पण पुढे जाताना निसर्गाने दिलेलं शुद्ध वस्त्र घाणीने बरबटून जातं. हा एका अर्थाने निसर्गाचा नसला तरी समाजाचा नियमच आहे. एखादेच कबीर असतात जे पुन: मूळ स्व-रूप मिळवतात आणि म्हणतात 'ज्यों की त्यों धर दिनी चदरिया' निसर्गाने जे मूळ स्वरूप प्राप्त केलं होतं; ते पुन: मेहनतीने प्राप्त केलं! पण अदू तुझ्या रूपाने एक 'आशा' समोर आहे की, जसं तुझं शुद्ध स्वरूप आहे; तसं आमचंही एके काळी होतं. आज त्यावर धुळीची असंख्य पुटं चढली असली आणि गटार प्रचंड तुंबलेलं असलं तरी एके काळी शुद्ध रूप होतं, हे आजही आठवतं. लहानपणीच्या पुसट आठवणी आजही सांगतात की, एके काळी मलाही प्रत्येक गोष्टीमध्ये असंच जीवंत चैतन्य दिसायचं. अदू, तुझ्या सोबतीत ती नितळ दृष्टी आम्हांला परत मिळावी, इतका आशीर्वाद तू आम्हांला नक्कीच देशील. . .

तू बुद्धी दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे
जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे

******

माझे लेख इथे एकत्र आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप सुंंदर पत्र आहे . अदूला तिच्या उज्वल भवितव्यासाठी खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद...... तिची निरागसता आणि आनंंद अखंंड राहो ही प्रार्थना

छान!!! पत्र आवडलं!!! वाचताना मला माझ्या मुलीचे बालपण आठवले. मुलांना वाढवताना आपण त्यांच्याकडून किती काही शिकत असतो, हे तुमच्या पत्रामुळे मला जाणवले. ते बघण्याची दृष्टी फक्त आपल्यासारख्या संवेदनशील लेखकाकडेच असू शकते. आपले अभिनंदन!!!

छान!!! पत्र आवडलं!!! वाचताना मला माझ्या मुलीचे बालपण आठवले. मुलांना वाढवताना आपण त्यांच्याकडून किती काही शिकत असतो, हे तुमच्या पत्रामुळे मला जाणवले. ते बघण्याची दृष्टी फक्त आपल्यासारख्या संवेदनशील लेखकाकडेच असू शकते. आपले अभिनंदन!!! >>>>>> +११११

अनेकानेक धन्यवाद ... Happy