एक प्रेमपत्र

Submitted by मार्गी on 13 September, 2015 - 21:24

मला तुझ्याशी खूप खूप बोलायचं आहे! तुला पत्र लिहिताना प्रचंड आनंद होतोय. अक्षरश: शब्द सुचत नाहीत. काय लिहू, किती लिहू आणि कसं लिहू अशी अवस्था होतेय! खूप भरून येतंय.

तू! तुझ्याबद्दल काय लिहू? लिहून व बोलून जे सांगता येईल ते फार फार थोडं आहे. कणभर आहे. पण तू, तुझं व माझं नातं, तू माझ्या आयुष्यात आलीस तो काळ व तिथून बदललेलं आयुष्य... काय काय आणि कसं सांगू!

तुझ्यासोबत घालवलेले प्रत्येक क्षण मनावर कोरले गेले आहेत! अगदी पहिल्या दिवसापासून. तुला भेटण्याआधीच्या आयुष्यामध्ये अनेक वेळेस सौंदर्य बघितलं होतं; सुंदर चेहरे बघितले होते; पण तू त्या सर्वांहून अगदी वेगळी! नितांत सुंदर! आयुष्यामध्ये मला आजवर खूप गोष्टी वेड लावणा-या मिळाल्या. अनेक जणांनी वेड लावलं. पण तू त्या सगळ्यांवर एका क्षणात मात केलीस! तुझ्या सोबतीत पूर्वी आवडलेले चेहरे आणि वेड लावणा-या व्यक्ती आठवतात आणि हसू येतं!

जीवन किती नितांत सुंदर; नितांत आल्हाददायक असू शकतं हे तुझ्या सोबतीतच कळालं. अपूर्व आनंद म्हणजे नक्की कसा हे पहिल्यांदा इतकं स्पष्ट झालं. तू जीवनात आलीस आणि सर्व जीवन भारावून गेलं. तुझ्या प्रकाशाने सर्व जीवन तू उजळून टाकलंस. खरोखर तुझ्याशी शब्दांनी बोलणं मला शक्यच नाही. आणि तुलाही शब्दांची भाषा गरजेची नाही. माझ्या मनातल्या भावना तुझ्यापर्यंत पोहचवण्यासाठी शब्दांचीही गरज नाही. त्या थेट 'ये हृदयीचे ते हृदयी' प्रमाणे पोहचतताच. खरोखर कसं लिहू हे पत्र?
******

तुला मी नावाने ओळखत नाही. कारण नाव फक्त लेबल असतं. एक औपचारिक बाब. तुला मी त्याहून खोलवर जाऊन बघण्याचा प्रयत्न करतो. माझ्यासाठी तू सुरुवातीपासूनच अनाम होतीस. शुद्ध प्रसन्नता! हे खरं तर तुझं नाव असायला हवं! आज तुझ्या सर्व आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न करणार आहे. पण सुरुवात कशी करावी हेच कळत नाही. अथांग महासागर! आपण एखाद्या किना-यावरून त्याचं एक टोक पाहावं अशी अवस्था आहे.

तुला नावाने मी तरी संबोधू शकत नाही. कारण नाव हे शेवटी एक कामचलाऊ लेबल तर असतं. प्रतिक मात्र असतं. समाजाने दिलेलं. अगदी वरवरचं प्रतिक तर असतं ते. तुझं अस्तित्व त्याहून किती गहन! नाव ही तर वरवरची उथळ ओळख. मी अमुक अमुक. मी कोण? तर अमुक क्ष. अमुक गावात राहणारा; य कुटुंबातला. अ आणि ब ह्यांचा मुलगा. खरं तर समाजाने दिलेली ही ओळख म्हणजे अनाम अस्तित्वावर घातलेलं सोयीचं पांघरूणच. खरी ओळख सखोल असते! जीवनात तू आलीस आणि तुझ्या सोबत खरी ओळख जाणून घेण्याची- स्वत:चा शोध घेण्याची प्रेरणा आणखी बळकट झाली...

तुझ्या आगमनाने जीवनाची दिशाच बदलल्यासारखी वाटते आहे. एक हिंदी गाणं आठवतं- “उस ज़िंदगी से कैसे गिला करे जिस ज़िंदगी ने मिलवा दिया आपसे…" खरोखर तू आमच्याकडे येणं ही आम्हांला मिळालेली खूप मोठी‌ गोष्ट आहे. अगेन, मला शब्दांमध्ये हे सांगता येत नाहीय. पण हरकत नाही. तुला ते आतून माहितच आहे. जीवनामध्ये पुण्य म्हणतात की सत्कृत्य म्हणतात ते काही नक्कीच हातून घडलं असलं पाहिजे म्हणून इतकी सुंदर आणि अनमोल ठेव आम्हाला मिळाली. शब्द हे फक्त सूचक आहेत.
******

स्वरा आणि अद्विका! ही तुला दिलेली दोन नावं! केवळ प्रतिक म्हणून. व्यवहाराची गरज म्हणून. पण मी कधीच ती तुझी खरी ओळख मानली नाही! स्वरा, तू आयुष्यात आलीस तो दिवस अजून डोळ्यांसमोर आहे. शुद्ध प्रसन्नता! जन्मल्यापासून तू शुद्ध आणि अखंड प्रसन्नताच आहेस! जन्मली तेव्हा तू इतकीशी होतीस. तेव्हाही तुझे ओठ अगदी मुलायम आणि कोरीव होते! जीवन आणि मृत्यु ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू- एकाच नदीचे दोन किनारे! त्यामुळे तुझा जन्म होताना तुझ्या आईला मरणप्राय यातना झाल्या. पण त्यातूनच तिचा नवा जन्मही झाला. आणि खरोखर स्वरा, तुझ्या सोबतीने आम्हा सर्वांनाच नवीन जीवन मिळालं आहे. केवळ तीन दिवसांची असताना तू माझ्याकडे बघून हसलीस! आणि मी तुझ्याकडे बघून हसायच्या ऐवजी तूच माझ्याकडे बघून पहिल्यांदा हसलीस! तू एका प्रकारे पुढच्या प्रवासाची दिशाच सांगितलीस. तुला पहिल्यांदा मांडीवर घेतलं तो अनुभव... वेगवेगळे आवाज काढल्यानंतर तुझ्या चेह-यावर आलेलं हसू! एक महिन्याची असताना आपण जीभेच्या बायनरी भाषेतून बोललो पहिल्यांदा! ती आपली एक मुख्य भाषा होती! अजूनही तू आम्ही काय खातोय हे जीभ बाहेर काढूनच तर विचारतेस!

अद्विका, खरोखर तुझ्या सोबतीत जीवनामधील अनेक गोष्टी नव्याने समजत आहेत. तू खूप गोष्टी शिकवत आहेस. लहान मुलं ही निसर्गाने दिलेली खूप मोठी देणगी आहे. निसर्गाचा तो प्रसादच आहे. माणूस समाजात जगताना कालांतराने निसर्गत: मिळालेलं शुद्ध स्वरूप गमवतो. पर्वतीय प्रवाही नदीप्रमाणे निसर्ग आपल्याला उत्स्फूर्त व शुद्ध स्वरूप देऊन पाठवतो. पण... आपण हे शुद्ध स्वरूप तर हरवतोच आणि त्यावर शेकडो पुटं चढतात. निसर्गाने आपल्याला दिलेलं शुद्ध स्वरूप प्रसन्नता हेच आहे. पण आपण समाजात जगताना ते हरवून बसतो. तुझ्यासारखी लहान मुलं ही निसर्गाने दिलेलं वरदान आहे. जीवन पुन: एकदा नितळ शुद्ध- अखंड प्रसन्न करण्यासाठी मिळालेली ही सेकंड इनिंग आहे; दुसरी संधी आहे! हे सगळं तूच शिकवलं अद्विका.

तुला बघताना आम्ही तुझे निर्माते किंवा तुझे नियंते आहोत, हे मला कधीच अभिप्रेत नव्हतं स्वरा. पालक हे बाळाचे निर्माते किंवा नियंते असूच शकत नाहीत. अरे, जे स्वत:ला दोन औपचारिक लेबलपलीकडे ओळखू शकत नाहीत, ज्यांना स्वत:चं शरीर अगम्य आहे; ज्यांनी मुळात स्वत:लाच निर्माण केलेलं नाही, ते नवीन चैतन्य कसं निर्माण करू शकणार. नाही. आम्ही फक्त माध्यम आहोत. एक मार्ग आहोत. निर्माता- नियंता तो निसर्ग. आमचं हेच सुकृत किंवा हेच भाग्य की, आमच्या पदरात त्याने तुला आणलं. आम्हांला धन्य केलं! आणि तूसुद्धा आम्हांला पालक म्हणून निवडलंस.

स्वरा, बालक- पालक संबंध व नातं मला तरी अगदी उलट वाटतं. समाज म्हणतो आई- वडील मुलाचे पालक असतात; त्यांनी मुलाला शिकवलं पाहिजे; त्यांनी मुलाचे लाड केले पाहिजेत.. मला तर तुझ्या सोबतीत अगदी उलट वाटतं. आम्ही तुला शिकवायचं? आम्ही शिकवून शिकवून तुला काय शिकवणार? कसं वागायचं ते? आमचे संकुचित विचार? आम्ही आमच्या शुद्धतेवर आणलेली मलीन पुटं? शुद्ध नदीचं गढूळ नाल्यामध्ये कसं रुपांतर करावं हे मूल्य? नाही, अजिबात नाही. मी तर म्हणेन की वस्तुस्थिती ह्याच्या अगदी उलट आहे.

तू आमची पालक आहेस. खरोखर. कारण सदैव आनंदात कसं राहावं, अखंड प्रसन्न कसं राहावं, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद कसा घ्यावा, जीवनात सभोवार असलेल्या चैतन्याला कसं ओळखावं हे तूच तर आम्हांला सांगते आहेस. खरोखर स्वरा. कसं सांगू! आणि आम्ही तुझे लाड ते किती अन् कसे करणार! त्याउलट तू आमच्याजवळ आलीस हेच अस्तित्वाने आमचे केलेले लाड आहेत!! ..तुला बघताना खूप खूप काही शिकायला मिळालं. तुझं सतत प्रसन्न असणं. समोर असलेल्या प्रत्येकाकडे बघून आनंदित होणं! तू अगदी लहान असल्यापासून प्रचंड गोड आहेस! इतकी गोड की, तुझे हातही तुला गोड लागायचे. तुझे पायसुद्धा गोड व्हायचे व तू ते चाटायचीस. आणि तुझ्या जवळ राहून राहून तुझं स्वेटरही गोड व्हायचं व तू तेही चाटायचीस. इतकंच काय, आमच्या हातांमध्येही तुला तोच गोडवा दिसायचा. इतकी तुझी नितळ दृष्टी. आम्ही तुला जितकं प्रेम देतो त्याहून अनंतपट जास्त प्रेम तू आम्हांला देतेस...

तुझ्या आजूबाजूला असलेल्या छोट्या छोट्या वस्तु तुझ्यासाठी आनंदमय असायच्या आणि अजूनही आहेत... एखादा खडा, एखादं खेळणं किंवा कागदाचा तुकडा! किंवा शर्टचं बटन. तुझ्याकडे अशी दृष्टी आहे जी ह्या सगळ्यांमध्ये चैतन्य बघू शकते; त्या चैतन्याला प्रतिसाद देऊ शकते. मला आठवतं एकदा संध्याकाळी तुला कडेवर घेऊन उभा होतो! अहा हा, तुला पहिल्यांदा कडेवर घेतलं तो क्षण... स्वरा, मला असं अनेकदा अडखळतच हे पत्र लिहावं लागणार आहे. असो. तर तुला कडेवर घेतलं असताना तू अचानक आकाशाकडे बघून खुदकन् हसलीस! मी बघितलं तर तिथून एक पक्षी उडाला होता! तू त्या पक्ष्यातल्या चैतन्याला प्रतिसाद दिलास- अभिवादन केलंस!

स्वरा, अगदी बाळ असल्यापासूनच्या तुझ्या आठवणी! तुझं ते नाजुक रडणं; इवले इवले आळोखे- पिळोखे देणं! मला उचलून घ्या म्हणून हळुवार सांगणं! तू इतकी शुद्ध प्रसन्नता आहेस की, तुझं रडणंही नितांत सुंदर आहे- बघत राहावसं वाटण्यासारखं! मला तुझ्यामध्ये असलेली दृष्टी मोहित करते. निरागसता! आज आपण जे खरे सद्गुण मानतो (उथळ व समाजामधील तथाकथित सद्गुण नाही)- आनंदी असणं; निर्मळ असणं; शुद्ध असणं; प्रत्येक वस्तुत चैतन्य बघणं हे सर्व तुझ्यामध्ये आहेत. निसर्गामधील मानवासहित पशुपक्षी, झाडं, हवा, अंधार अशा सगळ्यांमध्ये तुला चैतन्य दिसतं! त्यांना तू प्रतिसाद देतेस. किंबहुना तू शुद्ध प्रसन्नता असल्यामुळे तुला सगळीकडे फक्त आनंदच दिसतो! ही दृष्टी मला मोठी प्रेरणा देते. मला सतत मार्गदर्शन करते. एके काळी माझ्यामध्येही ही 'शुद्ध प्रसन्नता' होती. पण मी ती गमावली. तुझ्या निमित्ताने मला ही शुद्ध प्रसन्नता पुन: प्राप्त करण्यासाठीची सेकंड इनिंग मिळाली आहे. आणि तुला बघताना जाणवतं की, हे फार अवघड किंवा अशक्य नाहीय.

निसर्ग देताना आपल्याला शुद्ध स्वरूपच देतो. आपणच त्याला मळवून टाकतो. कबीरांनी म्हंटलं आहे, "ज्यों कि त्यों धर दिनी चदरिया" निसर्गाने दिलेली शुद्ध चादर त्यांनी परत निर्मळ स्वरूपात परत दिली. माझ्या लहानपणीच्या अंधुक आठवणी! एके काळी मलासुद्धा बाहुली जीवंत वाटायची. एके काळी मलाही प्रत्येक गोष्ट जीवंत वाटायची. एक किडा मारतानाही त्रास व्हायचा. एके काळी माझं मनही आतून तुझ्यासारखं प्रसन्न होतं. आज तुझ्या सोबतीत ही दृष्टी मला परत प्राप्त करता येईल असा विश्वास वाटतो...

स्वरा! तुझ्यामध्ये सतत चैतन्याचे अविष्कार होताना मी बघतोय. तुझं वाढणं! खरोखर प्रत्येक दिवस तुझ्यासाठी ख-या अर्थाने वाढदिवस आहे! तो आमचाही वाढदिवस ठरावा, ही इच्छा! तुझं कुशीवर वळणं, नंतर सरपटणं, हळु हळु रांगणं, तुझे बोल, हळु हळु शब्दाच्या भाषेमध्ये तू बोलणं! आणि हे सगळं करताना तुझ्या चेह-यावर असलेलं अखंड हसू! तुझ्यामध्ये असा दृष्टीकोण आहे की, तुला कशाची भिती वाटत नाही किंवा कशाचा त्रास होत नाही. डोकं आपटलं तरी दुस-या मिनिटाला तू परत मजेत असतेस. पाण्याची व कुत्र्याची तुला भिती वाटत नाही! कारण भिती समाजाने शिकवलेली गोष्ट असते! पण स्वरा, जन्मत: तुला मिळालेलं अखंड प्रसन्न स्वरूप समाजामध्ये वाढताना हळु हळु दूषित होताना मी बघतोय. काही प्रमाणात हे अपरिहार्य आहे. तरीही त्याचा मला त्रास होतो. समाजामध्ये वाढताना तुझ्यामध्येही 'हे खेळणं हवं, हे नको' असा भाव येताना मी बघतो. अखंड व अनकंडिशनल असलेली शुद्ध प्रसन्नता कंडिशनल होत जाताना बघून खंत वाटते. पण जीवनाचा प्रवाह असाच पुढे जातो. पण तरीही तुला जास्तीत जास्त निर्मळ ठेवण्याचा प्रयत्न करण्याचा निर्धार आहे. जितकी जमेल तितकी प्रसन्नता टिकवून ठेवण्याचा प्रयत्न आहे.

अद्विका मला माहिती आहे हे खूप अवघड आहे. पण अशक्य नाही. कारण त्याची दिशा तूच दाखवली आहेस. शिवाय शुद्ध प्रसन्नतेची विटंबना कशी होते, हे जागोजागी दाखवणारं माझं गतजीवन आहेच. इंग्रजीत म्हणतात, Everybody deserves a second chance. त्यामुळे मला पुन: एकदा मिळालेली ही सुवर्णसंधी मी‌ चुकवणार नाही. तुझ्यामधली प्रसन्नता समाजाच्या रेट्यापुढे थोडी झाकोळेल; पण मी तिला सुरक्षित ठेवेन. मी तिला मिटू देणार नाही. आणि ते करता करता तुझ्या प्रसन्नतेच्या ज्योतीने माझीही प्रसन्नता पुन: पेटती करेन. स्वरा! अवघड असलं तरी माझ्या डोळ्यांपुढे चित्र स्पष्ट आहे.

मी तुला कोणतीही विचारधारा; कोणतीही मान्यता देणार नाही. किंबहुना मी त्या अर्थाने तुझा मार्गदर्शक बनणारच नाही. आम्ही फक्त तुझे देखभाल करणारे व तुला मदत करणारे असू. मनाच्या कोप-यात मी वाट बघतोय तू कधी दहा वर्षांची होशील. तेव्हा तुला असंच एक पत्र लिहून मी शेवटी तुला एकदाचं सांगू शकेन- स्वरा, आता तू पुरेशी मोठी झालीस. इथून पुढे आपण फक्त मित्र- मैत्रीण. चलो हाथ मिलाओ! पण अजून त्याला खूप वेळ आहे आणि मध्ये खूप टप्पे आहेत... आता हळु हळु शब्दांच्या जगात तू आलीस. तू आधी अबोध- अमन अवस्थेत होतीस. आता तुलाही मन मिळालं आहे जे म्हणतं मला हेच हवं. आता तुला लोक सांगतात जय बाप्पा कर; गाणं म्हण. मी तुला अशा प्रकारे कधीही काहीही सांगणार नाही असं मी मनात ठरवतो. पण समाजाने केलेले संस्कार इतके प्रबळ असतात की, एखाद्या अनकॉन्शस क्षणी मीसुद्धा काहीसं तसंच करतो. तुला अमुक कर असं सांगतो. पण मला हे थांबवायचं आहे. एक स्वतंत्र व्यक्ती म्हणूनच तुला सोबत द्यायची आहे (वाढवायचं वगैरे नाही; ते काम निसर्गच करतो!) व्यक्ती शब्द सुंदर आहे. प्रत्येक व्यक्ती ही निसर्गाची अद्वितीय अभिव्यक्तीच तर असते! त्या अभिव्यक्तीमध्ये मी हस्तक्षेप करू इच्छित नाही. जितकं आवश्यक असेल, तितकंच तुला आम्ही सांगणार.

अनेक पालक त्यांचा अहंकार मुलांवर ढकलतात. हे गाणं म्हणून दाखव, इंग्लिशमध्ये पाढे म्हण इ. इ. मी तसं काही करणार नाही. उलट तुला कोणी असे आदेश देत असेल तर मी स्पष्ट म्हणेन, तुला वाटत नसेल तर तू करू नकोस. मला कल्पना आहे हे अवघड जाईल. पण मी माझ्या अनुभवातून शिकलो आहे की, बाहेरून दिलेले मूल्य, संस्कार फार सखोल जात नाहीत. मोठ्यांचा आदर कर, त्यांना नमस्कार कर असं म्हणणं सोपं आहे. पण बाहेरून थोपवलेल्या गोष्टीमुळे आतली उत्स्फूर्त प्रेरणा मरते. गोष्टी औपचारिक होत जातात. आणि बाहेरून सांगून केलेला आदर केवळ वरवरचा असतो; त्याउलट जर स्वातंत्र्य दिलं तर आपोआप आदर देण्यायोग्य व्यक्तीला आदर दिला जातो व तो जास्त खरा असतो. तीच गोष्ट नमस्काराची. चैतन्य दोघांमध्ये आहे. मग फक्त लहानाने मोठ्यांना नमस्कार का करावा? खरं तर लहान मुलगा जे चैतन्य बघतो व ज्याला सहज प्रतिसाद देतो तो अशा औपचारिक नमस्कारापेक्षा किती जास्त जीवंत असतो! आणि केवळ शरीराने मोठे आहेत म्हणून नमस्कार कर; मान दे म्हणणं म्हणजे शुद्ध हिंसा आहे! पण असो...

अद्विका, मला जाणीव आहे अशा स्थितीमध्ये आपल्याला जायचं आहे. समाजाचा दाब प्रचंड असतो. पण मी तुझ्यातल्या शुद्धतेला वाचवेन. काही संस्कार/ काही गोष्टी अपरिहार्य असतात. गच्चीच्या काठाशी गेलीस तर तुला अडवावं लागेल. पण ते करतानाही तुझ्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा आदर ठेवून करणं शक्य आहे. आणि जो बोध बाहेरून निर्देश देऊन मिळतो; तो वरवरचा असतो. त्याउलट जर स्वभावाला वाव दिला तर त्या अनुभवातून बोध घेऊन माणूस जे शिकतो ते जास्त खोल जातं. म्हणून मी तुला म्हणणार नाही तू राग करू नकोस. मी तुला हेच म्हणेन की, तुला राग आला तर तो व्यक्त कर. दाबू नकोस. त्यातून तुला एक दिवस त्याचा फोलपणाही लक्षात येईल... मी कोणतेच विचार तुझ्यावर लादणार नाही. कोणतीच अपेक्षा ठेवणार नाही. आज नाही आणि कधीच नाही. कारण निसर्गाच्या जगात कर्तव्य नावाचा प्रकार नसतो. पण त्याहून अधिक सामर्थ्यशाली अशी सहज स्फुरणा असते. आणि मुख्य म्हणजे निसर्गाचा प्रवाह सतत पुढे जातो. हिमालयात नदी उगम पावते; हिमालयातल्या झ-यांचं पाणी तिला मिळतं; पण ती ते पाणी तिथे देत नाही; ते पाणी समोर जातं.

किंबहुना संतती ह्या शब्दाचाही हाच अर्थ आहे. संतती म्हणजे जीवनाचा सततचा प्रवाह (संतत धार सारखा). तो पुढे पुढेच जातो. आई बाळाला जे प्रेम देते; ते प्रेम बाळ आईला भविष्यात देत नाही. तशी निसर्गाची रचनाच नाही. त्या बाळाला जर खरोखर प्रेम मिळालं असेल तर ते अनेक प्रकारे पुढे वाटेल. तेव्हा स्वरा आम्ही तुझे फक्त माध्यम आहोत. आणि तू आम्हांला पालक म्हणून निवडलंस; तुझे माध्यम होण्याची संधी दिलीस, ह्याबद्दल खरं तर आम्ही तुला धन्यवाद द्यायला हवेत. वरवर पाहता आम्ही तुझे पालक दिसत असलो तरी मला जाणीव आहे की, स्थिती बिलकुल उलट आहे. चैतन्याचा प्रवाह तुझ्यातून परत आम्हांला मिळाला आहे. सर्व काही तुझ्याकडून आम्ही शिकतो आहोत. आमचं काम एकच की, तुला मदत करणं. तुला जर चित्र काढायचं असेल तर रंगाचं साहित्य आणून देणं, इतकंच आम्हांला करायचं आहे. अन्य काहीही धारणा, विचारधारा, दिशा तुला देण्याची गरज नाही. बाहेरून थोपवलेल्या गोष्टी फार टिकतही नाहीत आणि त्या आतून काही स्फुरणा होण्यामध्ये बाधा मात्र बनतात. तेव्हा ते नाहीच. Man proposes and God disposes; but If you do not propose, he never disposes हे जास्त खरं आहे. असो.

स्वरा! हे पत्र फार वैचारिक झालं. गुंतागुंतीचं झालं. पण आम्ही असेच गुंतागुंतीचे आहोत. तू सहज आनंदात रममाण असताना आम्ही मात्र वितंडवाद करतो. वरवरच्या गोष्टींवर वेळ घालवतो. आनंद हा बाहेरून मिळत नाही; तो स्वत:मध्येच असतो हे तू सातत्याने आम्हांला सांगतेस. दाखवून देतेस. पण आम्हांला आनंद किंवा सुख बाहेरच्या कोणत्या तरी गोष्टीमध्येच मिळतं. तू आमच्या सोबत येऊन आता वर्ष होत आलं तरी अजूनही आम्हांला तुझ्याकडून हे शिकता आलेलं नाही... लवकरच तुझा पहिला वाढदिवस येईल. पण मला काळजी आहे आमचा वाढदिवस कधी येईल... तुझी शुद्ध दृष्टी आम्हांला कशी मिळेल...
******

जीवनाचे अंकुर
'तुमची मुलं' ही 'तुमची' नसतातच.
ती असतात,
जीवनाला असलेल्या स्वत:च्या
असोशीची बाळं.
ती येतात जगात तुमच्यामार्फत,
परंतु तुमच्या अंशातून नव्हे,
ती असतात खरी तुमच्याजवळ,
परंतु नसतात तुमच्या मालकीची.
तुम्ही द्यावं त्यांना तुमचं प्रेम,
पण लादू नयेत विचार.
कारण, त्यांना आहेत ना त्यांचे स्वत:चे विचार,
तुम्ही संभाळा त्यांचं शारीर अस्तित्व,
पण अधिराज्य नको त्यांच्या आत्म्यावर.
कारण त्यांचा आत्मा वास करतो
भविष्याच्या उदरात
जिथं जाणं तुम्हांला शक्य नाही
अगदी स्वप्नातही नाही.
त्यांच्यासारखं होण्याचा तुम्ही प्रयत्न करावा,
परंतु त्यांना आपल्यासारखं घडवण्याचा अट्टाहास नको.
कारण जीवनऔघ कधी‌ उलटा मागे वाहत नाही
अन् भूतकाळात रेंगाळतही नाही.
तुम्ही आहात केवळ एक धनुष्य
ज्यातून सुटतील हे चैतन्याचे तीर
उद्याच्या दिशेने
'तो' धनुर्धारी दोरी ताणेल तेव्हा
वाका आनंदानं
बस! इतकंच!

- खलील जिब्रान

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह, निरंजन - खूपच सजग आणि सह्रदय पिता आहात....

लेकीचं भाग्य तसेच तुम्हा दोघांचेही (आई-वडिलांचे) ....

खूपच आवडलं हे .....