संस्मरणीय भटकंती - दक्षिण मुंबई (गेट वे - मरीन ड्राईव्ह) - छंदीफंदी

Submitted by मीस्वच्छंदी on 6 September, 2025 - 01:00

गेल्यावर्षी म्हणजे ऑगस्ट 2024 मध्ये, जवळजवळ दोन दशकांहून जास्त वर्षांनी, मी आणि माझ्या मैत्रिणींने दक्षिण मुंबईतील फोर्ट, नरिमन पॉईंट, मरीन ड्राईव्ह भागाची मस्त सैर केली, आमच्या जुन्या आठवणी जागवण्याचा केलेला तो एक छोटा प्रयत्न होता.
भुरभुरत्या पावसातील दक्षिण मुंबईची ही काही क्षणचित्रे आणि आठवणी.

***

पूर्वी जायचो तसंच यावेळीही ट्रेननीच जायचं आम्ही आधीच ठरवलेलं. परंतु गर्दीच्या कारणास्तव जाताना फर्स्ट क्लासने जायचं ठरलं. मी बरेच वर्षांनी लोकल ट्रेनचा प्रवास करत होते. खरं तर ठाणा स्टेशनसुद्धा इतकं बदललंय की सुरुवातीला मला गांगरायलाच झालं. आजकाल म्हणे तिकीटं ऑनलाईन, ॲप्सवरून वगैरे बऱ्याच प्रकारांनी मिळतात त्यामुळे तिकीट काढायला काही रांगा नसतात पूर्वीसारख्या. मैत्रिणीने असंच ऑनलाईन एका ॲपवरून आमची तिकीट काढली आणि आम्ही निघालो.
एकंदर बेत, CSMT ला उतरणे, १३८ पकडून नरिमन पॉईंटला जाणे, जुना क्लास बघणे, तिथून मग मरीन ड्राइव्ह आणि उरलेला वेळ आवडेल तसा घालवणे. तसंही फोर्ट, नरिमन पॉईंट भागात गेल्यावर काय करायचं हा प्रश्न खचितच कोणाला पडेल.
अगदी पूर्वीसारख्चयाच पूर्ण रस्ताभर, जळजळ चाळीस-पंचेचाळीस मिनिटं, नॉनस्टॉप हास्य-गप्पा चालू होत्या.
सीएसटीला उतरल्यावर, खरं तर काही घाई नव्हती पण तरी, मुंबईच्या प्रवासाला तुम्ही एकदा लागलात की निवांतपणा काही रहातचं नाही. चालता चालताच सीएसटी स्थानकाचे जमतील तसे फोटो काढले.

१३८ पकडायल गेलो पण गेट वे च्या बसेस बघितल्यावर त्यातीलच एक पकडली. मैत्रिणीबरोबर फिरण्यातील एक मुख्य मुद्दा / फायदा - फार आखीव रेखीव प्लॅन प्रमाणेच जायला पाहिजे असं काही नसतं. मनात आलं तसू केलं. त्यामुळे आनंद द्विगुणीत होतो.
शेवटच्या स्टॉपवर उतरल्यावर बघतो तो ही गर्दी. गेटवे ऑफ ला कधीही गर्दी असणारच, पण तरी.. तसंच माझ्या आठवणी प्रमाणे पूर्वी कधी अशा पोलीसचौकी बसवून चेकिंग करताहेत वगैरे बघितलं नव्हतं पण आता ही मोठ्ठी लाईन होती पोस्ट चेकला.
छान मस्त पाऊस भुरभुरत होता, करडं आकाश, त्याचं छटटेतला अरबी समुद्र आणि त्या पार्श्वभूमी वरती बुलंद गेट वे ऑफ इंडिया. त्याच्याबरोब्बर समोर ताज हॉटेलची मोठी दिमाखदार बिल्डिंग.
खरं सांगायचं तर 26/11 नंतर मी पहिल्यांदाच ताज आणि गेटवेच्या भागात आले होते. इतक्या वर्षानंतरही, ताजची दिमाखदार बिल्डिंग बघताना 26/11 आणि मुंबई स्पिरिट परत एकदा आठवल्याशिवाय रहावलं नाही.
असो! तिथे आम्हाला दोन-तीन बेस्टच्याच बसेस दिसल्या. त्या AC डबलडेकर होत्या आणि त्यांना खूप मोठ्या खिडक्या होत्या. चौकशी केल्यावर कळलं की त्या बेस्टने सुरू केलेल्या पर्यटन बसेस होत्या. शंभर रुपये तिकीटात दीड एक तासात तुम्हाला तो पूर्ण भाग फिरवून आणतात. म्हणजे मस्त एसीमध्ये बसून बाहेरचा पाऊस, समुद्र, मुंबईची रहदारी, प्रेक्षणीय स्थळे बघायची आणि जमेल तसे फोटो घ्यायचे. कल्पना अतिशय उत्तम होती. डबलडेकर मध्ये वर बसून त्या मोठ्या काचेच्या स्वच्छ खिडकीतून खरच खूप छान दिसत होतं. फोटोही छान येत होते.

बसमध्ये आम्ही फक्त चारच प्रवासी होतो, त्यामुळे कंडक्टरही वर येऊन बसला आणि तो आम्हाला जाता जाता माहिती देत होता. कॉलेजचे दिवस आठवले, कंडक्टरचा एवढा विनयशील अनुभव मला वाटतं पहिल्यांदाच येत होता - इतका छान हसून वगैरे बोलत होता, बहुतेक एसी आणि रिकाम्या बसचा परिणाम असावा.
स्वच्छ गिरगाव चौपाटी बघून, "चौपाटी आणि इतकी स्वच्छ...," असे शेलके उद्गार काढतोय न काढतोय तोच मागून कंडक्टरभाऊ बोललेच, “ही गिरगाव चौपाटी आहे.. कधीही बघा, नेहमीच एकदम स्वच्छ असते.” इतके बाणेदार बोलणे, तेही मुंबईत? दचकायलाच झालं क्षणभर.

गेटवे ऑफ इंडिया हून निघुन राजाभाई टॉवर, जेजे स्कूल ऑफ आर्ट, हुतात्मा चौक, सीएसटी स्टेशन करत करत मरीन ड्राईव्ह नरिमन पॉईंट, गिरगाव चौपाटी करून परत गेटवे ऑफ इंडियाला आलो.

गंमत वाटली ती ही की खरंतर यातील काही रस्त्यांवरुनं खूप वेळा गेलोय. पण प्रत्येक वेळेला कुठूनतरी कुठेतरी पोहोचायचं असायचं त्यामुळे कधीही आपल्या आजूबाजूला काय आहे याकडे लक्षच गेलं नाही. मग रस्त्यातील सौंदर्य टिपणं तर खूप दूरची गोष्ट झाली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला शेकडो वेळा - रात्री उशिरा ते सकाळी खूप लवकर- गेलोय पण त्यावेळी कधीही आजच्यासारखी फुरसत, कॅमेरा आणि दृष्टी नसावी.
मरीन ड्राईव्ह क्लासच्या अगदी जवळ असल्यामुळे मध्ये एखाद दोन-तास मिळाले तर अख्खा ग्रुप मिळून मरीन ड्राईव्हवर जात असू - सकाळी, दुपारी, अगदी रात्रीही. आता खूप बारकाईने सर्वकाही आठवत नसले तरी प्रामुख्याने आठवतंय ते म्हणजे, समोर दिसणारा अथांग समुद्र- स्क्रीनकडे बघून, वाचून वाचून थकलेल्या डोळ्यांना विश्रांती देणारा, ती पंचतारांकित क्षितिजरेखा, मैत्रिणींबरोबर केलेली धमाल, रात्रीच्या गारव्यात खाल्लेले चमचमीत मसालेदार चणे. मंतरलेले दिवस होते ते.
बसने जाताना ते सगळं आठवल्याशिवाय राहिलं नाही. तेव्हा कोणाकडे मोबाईल तर नव्हतेच पण कॅमेरेही नसत नेहेमी त्यामुळे त्या सगळ्या स्मृती फक्त डोक्यातच बंद आहेत.
गेटवे वरून परत आम्ही आमच्या जुन्या क्लासपाशी आलो.
त्या कोपऱ्यावरच्या टपरीवर एक एक कटिंग घ्यायचा, झालंच तर बाजूच्या सँडविचवाल्याकडे मस्त भरपूर मस्का (?) मारलेलं सँडविच खायचं. पण आमच्या त्या सगळ्या खुणा आता मिटल्या होत्या. पूर्वीचा रस्ताही आता मोठा झाला होता त्यात क्लासचे काही आवार गेल्यासारखे वाटले. पूर्वी भव्य वाटणारं प्रवेशद्वार आता काहीसं सामान्य/ खूजे भासले.
आपण काही शोधत यावं आणि कुठलीच खूण पटू नये असं काहीसं आमचंही थोडं झालं. पण तरी न हिरमुसता, "शास्त्र असतं ते" म्हणत सेल्फ्या काढल्या. मैत्रिणीचं तिकडेच काही काम होतं. त्यामुळे परतीच्या वाटेवर मी एकटीच होते.
यावेळी मात्र १३८ पकडली. CST ला उतरले. तिकिटाला छोटीशी रंग होती. फक्त १० रुपयांत परतीच तिकीट मिळालं तेव्हा खूप भारी वाटलं.. त्या भारतफेरीत तीच फक्त एक गोष्ट अधीसारखीच स्वस्त सापडली. पूर्वीसारखं मस्त दारात उभं राहून मुंबईची हवा खाल्ली, वारा प्यायला :).

काही वर्षांनी भारतात परत आलं की सगळंच बदललेल दिसतं- रस्ते, मेट्रो, गगनचुंबी इमारती, टोलेजंग दुकानं, हॉटेलं, मॉल्स, वाढलेली गर्दी, आकाशाला भिडणारी महागाई.
वाटलं, या सगळ्यात पूर्वी होती तशीच आहे ती म्हणजे ही मुंबईची जीवन वाहिनी - अहोरात्र चालणारी सेवा ( रात्रीचे ४ तास सोडून) तेही अत्यंत माफक दरात, प्रत्येक तीन ते चार मिनिटाला एक गाडी, सेंट्रल, वेस्टर्न, हार्बर, नवी मुंबई ही तिची व्याप्तीही वाढत जाणारी. मुंबईची खरी ओळख आणि अभिमान!

विचारांच्या तंद्रीत कधी माझं स्टेशन कधी आलं कळलही नाही. खूप वर्षांनी मनासारखी भटकंती करायला मिळाली म्हणून मन पिसासारखं हलकं झालेलं. अलगद गर्दीत स्वतःला झोकून दिलं आणि त्या गर्दीबरोबर आपोआप स्टेशनवर उतरलेही.

---
हॉटेल ताज

PXL_20240810_071117675~2.jpg

---
गेट वे ऑफ इंडिया

PXL_20240810_071114003~3.jpg

----

PXL_20240810_071114003~4.jpg

---
PXL_20240810_065637101~2.jpg

----

IMG-20240810-WA0042~3.jpg

---

IMG-20240810-WA0039~2.jpg

----

image_0.jpg

---

PXL_20240810_062342755~2.jpg

---

IMG-20240810-WA0052~2.jpg

---
IMG-20240810-WA0037~2.jpg

---
मुन्नाभाई च शूटिंग बहुदा इकडे झालं, ही किंवा खालची बिल्डिंग .

IMG-20240810-WA0022~2.jpg
---

PXL_20240810_062332898~2.jpg

---

PXL_20240810_064016617~2.jpg

----

IMG-20240810-WA0018~2.jpg

---

PXL_20240810_052952013.jpg

---
CST स्टेशन - सुरेख कोरीव काम केलंय.
जाता जाता घेतलेला धावता फोटो.

PXL_20240810_053116079~2.jpg

---

PXL_20240810_065312182~3-min.jpg

---
बृहन्मुंबई महानगर पालिका (BMC)

IMG-20240810-WA0013~3.jpg

---
CSMT ( छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बाहेरून)

PXL_20240810_065132989~2.jpg

---
फ्लोरा फाऊंटन

PXL_20240810_065625911.MP~2_0.jpg

---
हुतात्मा चौक

image_1.jpg

---

राजाबाई टॉवर
गुगल केल्यावर ही माहिती मिळाली, रोचक वाटली म्हणून टाकत आहे.
प्रेमचंद रॉयचंद जैन ह्यांनी आपल्या आईचे नाव देण्याच्या अटीवर ह्या टॉवरच्या बांधकामासाठी मदत केली होती.
त्यांची आई आंधळी होती, आणि सूर्यास्तापूर्वीच जेवत असे. तिला ह्या टॉवर ची घंटा वाजली की कळत असे आणि दुसऱ्या कोणाला वेळ विचारावी लागत नसे.

IMG-20240810-WA0024~5_0.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कधीतरी मुंबई फिरण्याची इच्छा आहे. कधी चान्स मिळतो बघूया. एयरपोर्ट वरून थेट गावी कॅब मिळते त्यामुळे कॅब मधून जेवढी मुंबई पहिली ती तेवढीच.
एका विलक्षण तोंड-दाबून-बुक्क्याचा-मार नामुष्कीला मुंबईकर स्पिरिट असे नाव देतात तेव्हा खूप भारी वाटतं.

पण एकंदरीत मुंबई ही खरी मेट्रो सिटी असल्यामुळे जास्त माणुसकी ठेवून आहे.

एका विलक्षण तोंड-दाबून-बुक्क्याचा-मार नामुष्कीला मुंबईकर स्पिरिट असे नाव देतात तेव्हा खूप भारी वाटतं.>>>> सहमत.

Anglophile म्हणून हिणवले तरी स्वातंत्र्यापूर्वीच्या राजवटीनी वसवलेली मुंबई आणि त्यानंतर एतद्देशियांनी तिचे केलेले भजे यावर बोलल्याशिवाय राहवत नाही.

भूषण वाटावे असे आपण मागच्या ७५-८० वर्षात मुंबईत काय बांधले ? Built heritage म्हणून आपले “भारतीय” योगदान काय ? ३० वर्ष खपून बजेटच्या तीनपट खर्चात बांधलेला आणि तरी landing चुकलेला एक वरळी सी लिंक पूल ? की धारावीची आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी? की third world concrete च्या विद्रूप गळक्या इमारती ?

समुद्र खूप जागी आहे मुंबईत, पण क्वीन्स नेकलेससारखा एखादा भाग वसवलेला आहे का? की माझ्याच बघण्यात नाही ?

@ मुंबई स्पिरिट is now an abusive word, given the way city rulers have ruined it beyond repair and left the common-folks like us to suffer for basics.

लेख दक्षिण मुंबईतल्या सचित्र भटकंतीबद्दल आहे याची जाणीव ठेऊन थांबतो.

माझेमन, सॉरी.

Submitted by अनिंद्य on 12 September, 2025 - 10>>> छंदीफंदी(?)

मुंबई स्पिरीट आणि प्रशासनाचा गलथानपण ह्या दोन परस्पर संबंधित असू शकतात पण वेगळ्या गोष्टी आहेत.
एकामुळे दुसऱ्या गोष्टीवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करणे/ शंका घेणे कितपत योग्य आहे?

या वर्षाची सुरुवातच दक्षिण मुंबईला भेट देऊन झाली. मुख्य उद्देश होता कोस्टल रोड आणि अटल सेतू बघायचा.

विकडे असला तरी बहुदा १ जानेवारी असल्याने भयंकर रहदारी नव्हती.

कोस्टल रोड जो मरीन ड्राइव भाग उत्तर मुंबईतील उपनगरांना जोडतो. त्याच पूर्ण काम झाल्यावर एकदा बघायचा होता.
खरच छान वाटलं.

त्यानंतर अटल सेतू वरून नवी मुंबईला गेलो. तो समुद्रमार्गही मस्त झालाय.
काही प्रकाशचित्रे टाकते.

तोपर्यंत ही एक क्लिप..

कोस्टल रोड https://www.instagram.com/reel/DS_jWCrlbec/?igsh=MzRlODBiNWFlZA==

मस्त फोटो..!
आज दिवसभर जीवाची मुंबई केली ..
आता मरीन ड्राइव्हला आहे .. समुद्राची हवा खात आरामात कठड्यावर बसून प्रतिसाद लिहितेयं..!

गेटवे ऑफ इंडिया, जहांगीर आर्ट गॅलरी, क्रॉफर्ड मार्केट आणि आता मरीन ड्राईव्ह..!
जोडून सुट्टी असल्याने आज खूप गर्दी आहे मुंबईत सगळीकडे...
मॉर्डन आर्ट गॅलरीत एक आर्ट फेस्टिव्हल सुरु आहे तिथे पण थोडावेळ हजेरी लावली. संध्याकाळी सैनिकांचा कार्यक्रम आहे गेटवेला पण तिथे बहुतेक एन्ट्री नसेल..!

त्यादिवशी मुंबईत अफाट गर्दी होती त्यामुळे फोटो नाही काढले जास्त..
गेट वे ऑफ इंडियाला फोटोग्राफर ( तो खूपच पाठी पडला म्हणून) कडून काढून घेतले चार फोटो..!

दरवर्षी एकदा तरी फेरी होते दक्षिण मुंबईत.. त्यामुळे फोटो काढायचा हल्ली कंटाळा येतो.

मुंबई सगळ्यांचीच.. गरिबांची , श्रीमंतांची, कष्टकऱ्यांची ..!

अरे वाह रुपाली मस्तच!

मुंबईच्या या भागातील त्याच त्याच इमारतींचे फोटो बघताना प्रत्येकवेळी फ्रेश वाटतात.. काहीतरी खास जादू आहे Happy

ऋन्मेष, मी स्वच्छंदी धन्यवाद..!

ऋन्मेष, मरीन ड्राईव्हला असताना तुमच्या मुंबईच्या धाग्याची , फोटोंची आणि अर्थात तुमची आठवण आली होती. क्षणभर वाटलं, मरीन ड्राईव्ह वरच्या गर्दीत अनपेक्षितपणे तुमच्याशी भेट घडेल ..!

रूपाली हा हा आणि धन्यवाद..
मलाही तुम्हाला भेटायला आवडले असते.

पण गेल्या काही महिन्यात मलाच चक्कर टाकता आली नाहीये तिथे. मागच्याच आठवड्यात मुलांनीच आठवण काढली होती की आपण बरेच दिवस मरीन ड्राईव्हला गेलो नाहीत. रात्रीचे त्यांना त्या कठड्यावर बसवले की उठत नाहीत Happy

जाताना टिपलेले .. मंदिरात गेलो नाही.
आता महालक्ष्मी मंदिराच्या मागच्या बाजूस असणारा खडकाळ किनारा लुप्त झालं आहे Sad

PXL_20260101_061933471~4.jpg

कोस्टलरोडचे
भूमिगत बोगद्यात शिरताना..
Screenshot_20260216-0948572.jpg

बोगद्याच्या आत..

Screenshot_20260216-0948142.jpg

स्पार्कल यांचा लेख आहे हा. तुमच्याच शैलीत कमेण्ट केलीय. तुम्हाला मी लिहीलेला लेख सापडला ना ? मग हे गुपीत फोडून टाकू.

Pages