मराठीला संज्ञांची नवी जाणीव हवी का ? ( जागतिक मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने )

Submitted by राज अज्ञानी on 13 February, 2026 - 13:41

(लेखकाच्या मर्यादा :
१. मराठी भाषेचं ज्ञान यथातथाच असणे. या विषयाच्या अनुषंगाने हव्या असलेल्या संज्ञा माहीत नसणे.
२. लेखाची मांडणी करण्याचे कौशल्य नसणे.
३. असा लेख पूर्वीपासूनच असल्यास शोध घेऊनही सापडला नसल्याने हा प्रपंच.

हे सुरूवातीलाच सांगण्याचे कारण म्हणजे ज्या विषयावरचा हा लेख आहे त्या विषयाची उदाहरणे (मराठीत ) देताना मर्यादा उघड झालेल्या आहेत. वाचकांनी भर घातल्यास उत्तमच. )

मराठीला संज्ञांची नवी जाणीव हवी का ?

मराठी भाषा धोक्यात आहे का? (म भा धो आ का ) Proud
हा वरचेवर विचारला जाणारा प्रश्न आहे आणि त्याचा समाचार ही वरचेवर घेतला जात असतो. रा ग जाधव यांनी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना सांगितले होते कि जोपर्यंत कष्टकरी मनुष्य मराठी बोलतो तोपर्यंत मराठीला धोका नाही. खरंच आहे. आपण मराठीला एव्हढं टेकन अ‍ॅज ग्राण्टेड ( बघा इथेच अडलो, आठवतच नाही याला आपण काय वाकप्रचार वापरत होतो ते ) घेतो कि आपण मराठीत परफेक्ट तरआहोत, मग वेगळी मेहनत का घ्यायची हा प्रश्न पडतो. पण गेल्या काही वर्षात आपली मराठीवरची पकड (प्रभुत्व) ही काही तेव्हढी मजबूत नाही, नव्हे यथातथाच असल्याचे जाणवत गेले. पण शब्द सापडत नव्हते. किंवा नेमकी समस्या लक्षात येत नव्हती.

तर म भा धो आ का हा प्रश्न विचारताना आपण सहसा इंग्रजीच्या आक्रमणाचा उल्लेख करतो. पण खरा प्रश्न तो आहे का ?
खरा प्रश्न काय आहे ? मराठीत आपण विचार किती नेमकेपणाने करू शकतो? नाही असंही नाही.
मराठीत आपण नेमकेपणे व्यक्त होऊ शकतो का ? छे !
मराठीत आपल्याला कमीत कमी शब्दात गहन आशय मांडता येतो का ?

भाषा ही केवळ अभिव्यक्तीचे साधन आहे, ही एक सर्वसामान्य समजूत आहे. पण विसाव्या शतकात भाषाशास्त्राने ही समजूत उलटी केली.
Edward Sapir आणि Benjamin Lee Whorf यांनी मांडलेला सिद्धांत, ज्याला आज “Sapir - Whorf Hypothesis” म्हणून ओळखले जाते, असे सुचवतो की भाषा केवळ विचार व्यक्त करत नाही. तर ती विचारांना आकार देते.

आपल्याकडे एखाद्या अनुभवासाठी शब्द नसेल, तर तो अनुभव धूसर राहतो. शब्द निर्माण झाला की अनुभव स्पष्ट होतो. हाच धागा पकडून (म्हणजे मायबोली धागा नव्हे) पुढे Ludwig Wittgenstein यांनी एक प्रसिद्ध विधान केले:
“The limits of my language mean the limits of my world.” ( माझ्या भाषेच्या मर्यादा म्हणजे माझ्या जगाच्या मर्यादा.)

हा वाक्यांश आपण भावनिकपणे उद्धृत करतो; पण त्यातील तात्त्विक खाचा खोचा ( शब्द बरोबर आहे का ?) लक्षात घेत नाही.

१. शब्द म्हणजे बौद्धिक साधन

इंग्रजी भाषेत “confirmation bias”, “gaslighting”, “straw man” अशा संज्ञा आहेत. या शब्दांचा उपयोग काय? ते केवळ लेबल नाहीत; ते बौद्धिक साधने आहेत. म्हणजे काय ? तर या संज्ञा त्या भाषेत रूढ असल्याने त्या वापरून मला मोठ मोठी वर्णने टाळता येतात.

कोणी मुद्दा भरकटवतो आहे, असे लांबलचक वर्णन करण्याऐवजी “हा भोंगळ प्रतिवाद आहे” असे म्हटले की चर्चा पुढे जाते.
कोणी एखाद्यावर व्यक्तिशः हल्ला करतो आहे, तर “व्यक्तिहल्ला” हा शब्द वादाला परत मुद्द्याकडे आणतो. या वाक्यात गंमत बघा, मला पर्सनल अ‍ॅटॅक हा शब्द वापरून नेमके पणे माझे म्हणणे पोहोचवता येते. पण ते मराठीत सांगताना मला रूढ झालेला शब्द, संज्ञा, वाकप्रचार सापडत नाही किंवा आठवत नाही म्हणा तर. मी त्याचे भाषांतर करतो तेव्हां मलाच ते विनोदी वाटते.

संज्ञा ही प्रतिकात्मक असते. ती चर्चेत कमी शब्दात नेमकेपणे मुद्दा पोहोचवतेच पण परिस्थितीही थोड्या शब्दात उभी करते. ती भावनिक प्रतिक्रिया आणि विश्लेषण यांच्यात फरक करते.

मराठीत अशा संज्ञा रूढ आहेत का ? नसतील, तर आपण विचार करतो, पण नेमकेपणाने व्यक्त होत नाही. भली मोठी लांबड लावावी लागते. मग प्रतिसादांची लांबी मोजण्याचे प्रकार होतात.

२. भाषिक सापेक्षता आणि मराठीची अवस्था

Sapir-Whorf सिद्धांताचा अतिरेकी अर्थ असा घेतला जातो की भाषा विचार ठरवते. तसे पूर्णपणे नसले तरी एक गोष्ट निश्चित आहे. भाषा विचारांच्या सवयी घडवते.

जर एखाद्या समाजात “कळपवृत्ती” हा शब्द रोजच्या चर्चेत वापरला जात असेल, तर त्या समाजाला स्वतःच्या अनुकरणशीलतेची जाणीव राहते. जर “मत-हट्टीपणा” हा शब्द रूढ असेल, तर लोक स्वतःच्या पूर्वग्रहांकडे पाहू शकतात. हे थोडं जड होतंय हे लक्षात आहे. इथे असे म्हणायचे आहे कि जर हे शब्द रूजलेले असतील तर बोलताना मोठा आशय पोहोचवता येतो. तसे हे शब्द रूजलेले आहेत का ? ते सुटसुटीत आहे का ?

शब्द नसले की प्रवृत्ती सामान्य वाटतात. शब्द आले की त्या प्रवृत्ती तपासल्या जातात.

मराठी समाजात सार्वजनिक चर्चेची पातळी आपण पाहतो. मुद्दे भरकटवले जातात. व्यक्तीवर हल्ले होतात. सोयीचे पुरावे पुढे केले जातात. पण आपण त्यांना संज्ञां निर्माण केलेल्या नाहीत. कदाचित काही गोष्टी या काळातच आलेल्या आहेत, त्या आधीपासून नव्हत्या. जसे कि ट्रोलिंग. पण मग इंग्रजीत पण ही संज्ञा आधी नव्हतीच. तिथे संज्ञा वरचेवर बनतात आणि त्या रूजतात. आपण मागे का पडतो ? मग आपण ट्रोलिंग हाच शब्द वापरतो. बुलिंग हा शब्द वापरतो.
नाव नसलेला प्रकार आपल्याकडे वापरला जातो. ज्यांना इंग्रजीचा गंध नाही किंवा जास्त वापर होत नाही त्यांच्या साठी संज्ञा नकोत का ?
त्या भाषाशुद्धीच्या चळवळीप्रमाणे अवजड असल्या पाहीजेत असे काही नाही. उलट सुटसुटीतच हव्यात.

३. Wittgenstein आणि Language Games ( भाषिक खेळ).

Wittgenstein यांनी language games ही कल्पना मांडली. प्रत्येक समाजात भाषा विशिष्ट पद्धतीने वापरली जाते. शब्दांचा उपयोगच अर्थ निर्माण करतो.
जर मराठीतील सार्वजनिक “language game” मध्ये तर्कसंगत संज्ञा नसतील, तर त्या खेळात भावनिकता जास्त आणि विश्लेषण कमी राहील.

आपण “भांडण” करतो; “वादविवाद” कमी करतो.
कारण वादविवादाला शब्दसाधने लागतात.

४. शब्दनिर्मिती ही सांस्कृतिक कृती आहे

मराठीने शब्द निर्माण केले नाहीत असे नाही. संतसाहित्यात आध्यात्मिक शब्दसंपत्ती निर्माण झाली. समाजसुधारकांनी सामाजिक संज्ञा दिल्या.
सावरकरांनी अनेक शब्द निर्माण केले आणि रूजवले. यष्टीरक्षक, गोलंदाज, फलंदाज हे आज रूजलेले शब्द त्यांनी निर्माण केले आहेत. त्या वेळी ते जड वाटले असावेत.

ग्रामीन भागात सर्रास म्हणी वापरल्या जातात. त्या मुळे थोडक्यात खूप काही सांगता येते. हा लेख सुद्धा थोडक्यात झाला असता. पण वापर नसल्याने म्हणी आणि वाकप्रचार यांचा विसरच पडला आहे. ही मोठीच हानी आहे असे मला वाटते. ज्यांच्याकडे हा ठेवा आहे त्यांचा हेवा वाटतो.

डॉ. आंबेडकरांनी “संविधानिक नीतिमत्ता”, “प्रतिनिधित्व”, “बहिष्कृत” यांसारखे शब्द सार्वजनिक चर्चेत आणले. शब्द आले आणि विचारांचे नवे मार्ग उघडले.

भाषा जिवंत असते तेव्हा ती शब्द घडवते.
भाषा केवळ अनुवाद करते तेव्हा ती मागे राहते.

आज आपण confirmation bias म्हणतो, पण मत-हट्टीपणा वापरत नाही. ( या पेक्षा अचूक शब्द असेल तर कळवा. हे शब्द माझ्या मर्यादेमुळे वापरले आहेत हे आधीच सांगितले.)
“Gaslighting” म्हणतो, पण “मनभुलावणी ” वापरत नाही. ( इथे सपशेल आपटलो. गुगल सुद्धा प्रतिशब्द देण्यात असमर्थ आहे. मग भले मोठे वाक्य बनवावे लागते.

प्रश्न इंग्रजीचा नाही. प्रश्न आत्मविश्वासाचा आहे.

५. संज्ञा आणि बौद्धिक स्वावलंबन

जर आपण वैचारीक शब्द आयात करत असू , तर आपण विचारीक चौकटही आयात करतो आहोत .
जर आपण शब्द स्वतः निर्माण करत असू , तर विचारांना आपल्या सांस्कृतिक संदर्भात अर्थ देऊ शकतो .

मराठीला टिकवायचे असेल तर काव्यात्मक घोषणाबाजी पुरेशी नाही; संज्ञा हव्यात.
भावना पुरेशा नाहीत; विश्लेषण हवे.
घोषणा पुरेशा नाहीत; बौद्धिक शिस्त हवी.

Wittgenstein म्हणतात, "भाषेच्या मर्यादा म्हणजे जगाच्या मर्यादा. आपण आपल्या जगाला किती मोठे करायचे हे आपल्या शब्दांवर ठरते."

मराठी भाषा वाचवायची असेल तर तिला प्रेम पुरेसे नाही. तिला नेमके, धारदार, विचारवाहक शब्द हवेत. शब्द निर्माण करणे म्हणजे केवळ भाषिक कृती नाही. ती बौद्धिक स्वातंत्र्याची नांदी आहे.

आपल्या ग्रामीण बोलीत किती अचूक निरीक्षणे आहेत :-

“मेंढरांसारखं चालू नका.” याला आपण काय शब्द बनवूया ? कळपवृत्ती ?

“नाक वर करून फिरतो.” श्रेष्ठताभाव ? ( श्रेष्ठ्गंड - माबोवाचक यांची सुचवणी)

“आपलं माणूस पुढं.” पक्षपात. (नेपॉटिझम). हिंदीत भाई भतीजावाद.

या वाक्यांना काय शब्द आहेत ? (मरसुचवणी)

नेहमी आपणच पीडित आहोत अशी भावना. बळीभावना ?
मुद्दा काही आणि उत्तर काही - भोंगळ प्रतिवाद ?
आपल्या मताला पूरक तेवढंच दाखवणं - सोयीचा पुरावा ? सटीक शब्द सांगा.
गोल-गोल फिरवणे - ?

जर या सगळ्यांना आपण सुटसुटीत संज्ञा दिल्या तर चर्चेचा / वादाचा स्तर एका क्षणात उंचावेल. इंग्रजी किंवा इतर भाषेचा आधार घ्यावा लागणार नाही. मराठीत चर्चा रंजक होतील. भाषा प्रवाही होईल.

इथे काही नेहमी वापरात असलेल्या इंग्रजी संज्ञा घेत आहे. याला अचूक, सुटसुटीत, सटीक, रुजलेला शब्द माहीत आहे का ? शब्दच नाही तर म्हण, वाकप्रचार काहीही.

१. तर्कदोष किंवा वादशैली ( वादाची शैली )

Straw Man
भोंगळ प्रतिवाद / विकृत मुद्दा
म्हण: “नसता मुद्दा उकरून काढणे” किंवा मढं उकरणे ?

Ad Hominem = व्यक्तिगत हल्ला
“मुद्दा सोडून गुद्दा ”

Whataboutism = उलटप्रश्नवाद
“तुझं बोल ?” म्हणत पळ काढणे

Red Herring विषयांतर ( ध्यान हटवणे )
“भलत्याच रस्त्याला लावणे”

Slippery Slope = अति- भयवाद ( निसरडा रस्ता - माबो वाचक )
म्हण ?

False Dichotomy ??

Circular Reasoning गोल-गोल तर्क / सबगोलंकारी ( नेमका अर्थ काय याचा ?)

Cherry Picking सोयीचा पुरावा
म्हण ?

Moving Goalposts नियम बदलणे , पलटी मारणे ?

Gaslighting ??

२. मानसशास्त्रीय प्रवृत्ती

Confirmation Bias मत-हट्टीपणा
“आपलं तेच खरं”

Cognitive Dissonance मततणाव
“मनकल्लोळ”

Projection दोषारोपण , प्रक्षेपण
“आपली ............. लपवून दुसऱ्याची धरणे ” ( म्हण नेमकी लक्षात नाही ).

Groupthink गट-अंधश्रद्धा , गटश्रद्धा
“कळप जाईल तिकडे”

Echo Chamber प्रतिध्वनी वर्तुळ ( शब्दशः झाले हे )
“ अहो रूपं अहो ध्वनिं ”

Victim Mentality बळीभाव
“सतत रडगाणं” रोज मरे त्याला कोण रडे

Superiority Complex श्रेष्ठताभाव . याच्या साठी एक शब्द वाचनात आला होता. विरूद्ध हीनताभाव ? ( श्रेष्ठ गंड / हीन गंड - माबो वाचक)
“नाक वर करून चालणे”

Learned Helplessness ?
“हात टेकणे ”

३. समाज-राजकारण

Populism लोकानुनय

Tokenism दिखाऊपणा , ग्रामीण म्हण लक्षात आल्यावर इथे अपडेट करीन.

Virtue Signaling

Cronyism

Scapegoating

Narrative Building

Soft Power

४. संवाद आणि नातेसंबंध

Passive Aggressive

Emotional Blackmail

Silent Treatment

Stonewalling

Boundary Setting

५. निर्णय व अर्थशास्त्र

Opportunity Cost

Sunk Cost Fallacy

Bandwagon Effect

Herd Mentality

Status Quo Bias

Short-termism

हा विषय बरेच दिवसांपासून रुंजी घालतोय, पण वेळेअभावी राहून जातोय. खरे तर शब्दकोश घेऊन किंवा बुद्धीला ताण देऊन नेमके शब्द द्यायला हवे होते. पण निसटून जाऊ नये या मुळे गुगल ट्रान्सलेशनची मदत घेतली आहे. भाषांतर विनोदी आहे याची कल्पना आहे. आपण सांभाळून घ्याल आणि लेखाचा आत्मा लक्षात घेऊन भर घालाल ही अपेक्षा करून दोन शब्द (?) संपवतो.

या खटाटोपाचा हेतू लक्षात आला असेल ही अपेक्षा. जर भरकटलेला वाटला किंवा विस्कळीत वाटला तर तो माझ्या बुद्धीचा / मांडणीचा दोष समजावा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तम, विचारप्रवर्तक लेख. आपण मराठी भाषा आणि समाजाविषयी अतिशय मूलगामी विचार मांडले आहेत त्यासाठी तुम्हाला शेलापागोटे (Kudos to you)!

एका वेगळ्या विषयावरचा छान लेख.
पण संज्ञाच हवी हा आग्रह धरण्यापेक्षा म्हणी व वाक्प्रचाराचा सुद्धा वापर करावा असे माझे मत.
मला आठवलेले, सुचलेले काही
Slippery Slope = निसरडा रस्ता
Superiority Complex = श्रेष्ठगंड (न्यूनगंड च्या विरुद्धार्थी)
Scapegoating = बळीचा बकरा
Herd Mentality = कळप प्रवृत्ती / झुंड प्रवृत्ती / झुंडशाही

हे मस्त आहे - याची गरज आहे. एक वेगळाच विषय पुढे आणल्याबद्दल धन्यवाद. लेखातील भाषाशास्त्रज्ञ माहीत नाहीत पण लेख पोहोचतो व्यवस्थित.

मराठी वाचवायची असेल तर तिला प्रेम पुरेसे नाही. तिला नेमके, धारदार, विचारवाहक शब्द हवेत. शब्द निर्माण करणे म्हणजे केवळ भाषिक कृती नाही. ती बौद्धिक स्वातंत्र्याची नांदी आहे. >>> सिरीयसली. अशा अनेक नवीन कल्पनांकरता प्रचलित इंग्रजी (आणि कधी फ्रेंच, लॅटिन सुद्धा) शब्द वापरून आपण मराठी वाक्ये लिहीतो. त्यापेक्षा जर याकरता सुटसुटीत मराठी शब्द प्रचलित झाले तर आवडेलच. कदाचित ते ग्रामीण बोलीतही सापडतील.

(वरती "सिरीयसली" लिहील्यावर मी तोच अर्थ व टोन पोहोचेल असा प्रतिशब्द आहे का विचार केला, पण सापडला नाही Happy लोक कॅज्युअल हिंदीत बोलताना "सच मे, यार!" वगैरे म्हणतात तसे मराठीतही असावे काहीतरी)

चेरी पिकिंग ला सोयीचा पुरावा अगदी फिट्ट बसतो. प्रोजेक्शनला प्रक्षेपण रूढ होऊ शकतो सर्वांनी वापरला तर. बाकी काही अगदी तितके फिट्ट वाटले नाहीत. इतर काही शब्द असे आहेत की कदाचित मराठीत असतीलही शब्द पण लेखीच राहिले असतील. काही सुरूवातीला बोजड वाटतील पण लेखी भाषेत वापरले गेले तर रूढ होतीलही (वरती फलंदाज वगैरे उदाहरणे आहेत तसे). कधी मराठी प्रतिशब्द अगदी नेमका त्याच अर्थाचा नसेल पण सुटसुटीत असेल तर तो ही प्रचलित होऊ शकतो.

विचार करायला लावणारा लेख आहे. आवडला.

टेकन अ‍ॅज ग्राण्टेड = गृहित धरतो
सिरीयसली = खरंच?
विचारात पाडणारा लेख. आवडला. प्रतिसाद नंतर लिहितो.

छान लेख!

विचार छान आहे. प्रॅक्टिकल कुठवर ही शंका आहे.

कारण आज कित्येक मराठी शब्द रोजच्या वापरातून हद्दपार झाल्याने ते वाचायची आणि ऐकायची सवय मोडल्याने जेव्हा ते कानावर पडतात किंवा वाचनात येतात तेव्हा ते अवजड वाटतात.

असे अवजड झालेले शब्द एखाद्याने बोलताना वापरले की बहुतांश लोकांना ते बोलणे ऐकायला आवडत नाही. लिखाणात वापरले तर ते लिखाण वाचायला आवडत नाही.

एखाद्या लेखाचा विषय आशय आवडून सुद्धा जर लेखकाने आपले मराठी भाषेवरचे प्रभुत्व त्यात जपले असेल तर एखाद्या सामान्य वाचकाला तो लेख शब्दबंबाळ करतो. वाचताना थकल्यासारखे होते आणि सोडावा लागतो.

या लेखात उदाहरणे देताना काही इंग्लिश संज्ञा वापरल्या आहेत त्या देखील आपल्यासाठी काही सोप्या आणि नेहमीच्या वापरातील आहेत असा भाग नाही. पण त्या इंग्लिश असल्याने त्यांना भाव आहे. एखाद्याला एखादा इंग्लिश वाक्यप्रचार पहिल्यांदा समजतो तेव्हा तो त्याचा अर्थ जाणून घेतो आणि त्याचा कुठेतरी वापर करून आपले ज्ञान दाखवतो. मराठीबाबत दुर्दैवाने असे होत नाही. त्याऐवजी आपण, You Tube - तू नळी, WhatsApp - कस काय, Facebook - थोबाड पुस्तिका असे शॉर्ट फॉर्म प्रचलित करण्यातच धन्यता मानतो.

लेख वेगळा आहे.
एक मुद्दा पटला की बदलत्या काळाप्रमाणे नवीन शब्द मराठीत तयार व्हावेत. पण काही शब्द इंग्रजीतून जसेच्या तसे उचलले तरी हरकत नाही ही गोष्ट इंग्रजीतही योग, गुरु, पंडित वगैरे सारखे शब्द त्या गोष्टी तिथे पोहोचल्यावर पोहोचले.
बरेचसे मुद्दे पटले नाहीत किंवा लेखकाला काय म्हणताच आहे ते नीटस समजलं नाही.
हा लेख थोडा पूर्वग्रहदूषित, अपुऱ्या ज्ञानावर किंवा गृहितकांवर आधारित वाटला.
शब्द असतात, म्हणी असतात. वापरायला आपण कमी पडतो कारण आपली असमर्थता.

लेखाच्या सुरुवातीपासूनच
दाखल्यादाखल, एव्हढं टेकन अ‍ॅज ग्राण्टेड >> टेकन फॉर ग्रँटेड>>> गृहीत धरणे
वापरातले नेहेमीचे मराठी शब्द न वापरता उगाच इंग्रजी शब्द वापरून ह्याला काय म्हणायचंचा धोशा लावल्यासारखे वाटले.

तिला नेमके, धारदार, विचारवाहक शब्द हवेत. शब्द निर्माण करणे म्हणजे केवळ भाषिक कृती नाही. ती बौद्धिक स्वातंत्र्याची नांदी आहे.>>>
मराठीला टिकवायचे असेल तर काव्यात्मक घोषणाबाजी पुरेशी नाही; संज्ञा हव्यात.
भावना पुरेशा नाहीत; विश्लेषण हवे.
घोषणा पुरेशा नाहीत; बौद्धिक शिस्त हवी.

मराठी वाचवायची असेल तर तिला प्रेम पुरेसे नाही. तिला नेमके, धारदार, विचारवाहक शब्द हवेत. शब्द निर्माण करणे म्हणजे केवळ भाषिक कृती नाही. ती बौद्धिक स्वातंत्र्याची नांदी आहे.
>>>
ह्यात काय म्हणायचे आहे तुम्हाला? कळलं नाही.

कारण ही काही वाक्ये म्हणजेच खर तर उगाच घोषणाबाजी किंवा भावनिक बरळणे वाटते आहे.

बौद्धिक, धारधार, वैचारिक, तात्विक लिखाण मराठीत झाले नाही किंवा होऊ शकत नाही असे काही म्हणायचे आहे का?

शब्दबंबाळ >>> पाल्हाळ लावणे. नको असताना उगाच खूप शब्द वापरून लांबणं लावणे किंवा गोंधळ वाढवणे.
लेखकाने आपले मराठी भाषेवरचे प्रभुत्व त्यात जपले असेल तर ते लेख शब्दबंबाळ कसा होईल? उलट मुद्देसूद आणि आटोपशीर व्हायला हवा.

मराठी शब्दकोशात भर घालणारी अजून एक व्यक्ती म्हणजे मारुती चितमपल्ली - प्राणीकोश आणि पक्षीकोश.
त्यांचं सर्पकोशावर काम चालू होतं... प्रकाशित झाला का या माहीत नाही.

मी स्वच्छंदी, तुमच्या परखड आणि स्पष्ट मतांबद्दल मनापासून आभार. अशी निर्भीड मतं सुधारणा करण्यासाठी उपयुक्त ठरतात. पण या गोष्टी मला मान्य आहेतच, डिस्क्लेमर लिहून त्यापासून सुटका करून घेण्याचा हेतू नव्हता. इथे अपेक्षित आहे कि जर अशा संज्ञा रूजलेल्या नसतील तर त्या रूजवाव्यात. जर अज्ञान असेल तर ते दूर करावे. तुम्ही सुद्धा तुम्हाला माहीत असलेल्या संज्ञा सुचवून भर घालू शकता.

म्हणी आणि वाकप्रचार शाळेत असताना तोंडपाठ होते. पण नंतरच्या आयुष्यात वापर कमी झाल्याने आता चटकन आठवत नाहीत. ललित लेखन करत नसल्याने गरज पडली नाही. असे खूप जणांचे होते. म्हणजे आता म्हणी आणि वाकप्रचारही आठवत नाहीत आणि ज्या संज्ञा रूजलेल्या नाहीत त्या माहीत नसल्याने अडचण होते असे अनेकांचे होत असेल, यावर उपाय विचारला आहे. हा लेख पुन्हा वाचून पहावा , त्यानंतर हेच मत कायम असेल तर माझ्या लेखनाचा, मांडणीचा दोष समजावा जो आधीच मान्य केलेला आहे. धन्यवाद आपले.

अजबराव, लेख आवडला याबद्दल आभारी आहे.

फारएण्ड, समजून घेऊन दिलेला अभिप्राय हा शक्ती देत असतो. तुम्ही खूप मनापासून वाचले आहे आणि सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यातल्या अनेक संज्ञांना मी बनवलेले प्रतिशब्द चपखल नाहीत हे मान्य आहे. उदाहरणे देताना कमी पडलो आहे. या निरीक्षणाचे स्वागत.

माबो व्चाक, तुमच्या प्रतिसादाषी तंतोतंत सहमत आहे. अचूक शब्द सांगितलेत तुम्ही. गंड हा शब्द आठवला नाही. लक्षात आणून दिल्याबद्दल आभारी आहे.

उपाशी बोका - नेमके शब्द सुचवल्याबद्दल धन्यवाद.

ऋन्मेष - प्रॅक्टिकल आहे का ? ही शंका रास्त आहे. पण आपण प्रयत्न केले पाहीजेत ना ?

मी स्वच्छंंदी - इंग्रजी शब्द कोणते घेतले पाहीजेत , कोणते नाही याच्या कसोट्या इतर काही विद्वानांनी सांगितलेल्या आहेत त्यामुळे इथे त्यांचा विचार केला नाही. कारण तो वेगळा विषय आहे. ज्या गोष्टी इथे अस्तित्वातच नव्हत्या, जे ज्ञान आयात केले आहे, ज्या संकल्पना आयात केल्या आहेत त्या साठी परदेशी शब्द असावेत असा त्या विद्वानांचा सांगावा आहे. हे पुरेसं असावं.

जर आपण वैचारीक शब्द आयात करत असू , तर आपण विचारीक चौकटही आयात करतो आहोत .>>> +१००० भारतातील सध्याच्या शिक्षणपद्धतीत याशिवाय अधिक काही होण्याचे संभवत नाही....गेल्या दोन दशकांत किती वेळा आपण एखाद्या भारतीयाने एखादी टर्म कॉईन्ड केली आहे असे कुणालाही वाचल्याचे आठवते??

उदाहरणे देताना कमी पडलो आहे >>> नाही असे समजू नका. तसे सुचवण्याचा रोखही नव्हता. मी हा लेख या दृष्टीकोनातून वाचला - की तुम्ही एक विचार मांडला आहे, त्याबद्दल बर्‍याच शब्दांची उदाहरणे दिली आहेत आणि त्यातील काहींना प्रतिशब्द सुचवायचा एक प्रयत्न केला आहे. त्यातले काही फिट्ट असतील काही चर्चेतून पुढे येतील.

उबो - "सिरीयसली" हा शब्द जेथे प्रश्नार्थक विचारला जातो तेथे "खरंच?" बरोबर आहे. पण आजकाल "सिरीयसली!" असे अनौपचारिकपणे बोलताना लोक जे म्हणतात त्याबद्दल मी बोलत होतो. समोरचा म्हणतोय तसेच आपल्यालाही कधी वाटले आहे आणि त्यामुळे त्याच्याशी तीव्र सहमती आहे असे ध्वनित केले जाते त्यातून - त्याला चपखल मराठी शब्द सुचला नाही.

<<उबो - "सिरीयसली" हा शब्द जेथे प्रश्नार्थक विचारला जातो तेथे "खरंच?" बरोबर आहे. पण आजकाल "सिरीयसली!" असे अनौपचारिकपणे बोलताना लोक जे म्हणतात त्याबद्दल मी बोलत होतो. समोरचा म्हणतोय तसेच आपल्यालाही कधी वाटले आहे आणि त्यामुळे त्याच्याशी तीव्र सहमती आहे असे ध्वनित केले जाते त्यातून - त्याला चपखल मराठी शब्द सुचला नाही.<<
फारएण्ड, 'नक्कीच' किंवा 'अलबत' हा शब्दप्रयोग चालू शकेल.

सिरीयसली!" असे अनौपचारिकपणे बोलताना लोक जे म्हणतात त्याबद्दल मी बोलत होतो >> हो ना! नायतर काय! व्हय की ! (या शिवाय च्यायला! च्यामारी! असले सौम्य शिवराळ शब्द त्या अर्थाने वापरले जात). थोड्या अर्थछटा वेगवेगळ्या आहेत त्यामुळे सर्व सिरियसलींना एकच पर्याय चपखल बसणार नाही. पण आपल्याला शब्दसंग्रहात बचत करणे हा उद्देश तसाही नाहीच्चे!

वरचा प्रतिसाद वाचून असं नको वाटायला की मी इंग्रजी शब्द घुसडण्याच्या विरुद्ध आहे. मी समोरचा जसं सहज समजून घेईल तसं बोलतो शक्यतो. इंग्रजीमिश्रित भाषा बोलणार्‍याला मी इंग्रजीरहित उत्तर सहज देऊ शकलो तर ठीक, पण त्याने जर त्याबद्दल माझ्याविषयी साला आखडू असा समज करून घेतला तर संभाषण खुलेपणाने होणार नाही. अर्थात हा विचार त्यानेही करून शक्यतो त्याची भाषा माझ्या भाषेच्या जवळपास आणली तर तो मध्यममार्ग झाला व दोघांनी एकमेकांचा मान राखला असं होईल. अन्यथा एक भाषा एकाने दुसर्‍यावर बळजबरीने लादली असं होईल.

रिलेशन मेंटेन करण्यासाठी भाषेची अ‍ॅडजस्टमेण्ट करून त्याची मदत केली पाहीजे असं सिरीयसली वाटतं.

राजा _अज्ञानी माझ्याकडून थोडे परखड लिहिले गेले असेल तर क्षमस्व! व्यक्तिगत टीका किंवा दुखावण्याचा हेतू नाही.

परत वाचायला घेतलं तर अजून विसंगती टोचायला लागल्या. चुका दिसायला लागल्या. त्यामुळे मग सोडून दिलं.

तिला नेमके, धारदार, विचारवाहक शब्द हवेत. शब्द निर्माण करणे म्हणजे केवळ भाषिक कृती नाही. ती बौद्धिक स्वातंत्र्याची नांदी आहे.>>>
मराठीला टिकवायचे असेल तर काव्यात्मक घोषणाबाजी पुरेशी नाही; संज्ञा हव्यात.
भावना पुरेशा नाहीत; विश्लेषण हवे.
घोषणा पुरेशा नाहीत; बौद्धिक शिस्त हवी.

मराठी वाचवायची असेल तर तिला प्रेम पुरेसे नाही. तिला नेमके, धारदार, विचारवाहक शब्द हवेत. शब्द निर्माण करणे म्हणजे केवळ भाषिक कृती नाही. ती बौद्धिक स्वातंत्र्याची नांदी आहे.
>>>
ह्यात काय म्हणायचे आहे तुम्हाला? कळलं नाही.

वरील मुद्दा सविस्तर पाने सांगाल का?

रिलेशन मेंटेन करण्यासाठी भाषेची अ‍ॅडजस्टमेण्ट करून त्याची मदत केली पाहीजे असं सिरीयसली वाटतं.

Submitted by एक लेखक on 15 Februar>>>

या कॉमेंट/ नोंदीवरून
तुम्ही वेळ घालवण्यासाठी लेख लिहिला आहे याची कल्पना आली.

मी उगाच माझा वेळ व्यर्थ घालवल्याचेही जाणवले. Happy

मी स्वच्छंदी, हा लेख तुम्हीच लिहीला आहे. जर हा लेख मी लिहीला आहे असे म्हणयचे असेल तर माझा बहुमान समजेन. Happy

आपण मराठीला एव्हढं टेकन अ‍ॅज ग्राण्टेड ( बघा इथेच अडलो, आठवतच नाही याला आपण काय वाकप्रचार वापरत होतो ते ) घेतो
>>

ह्या वाक्यात गृहीत ह्या सोप्या शब्दाची 'अति परिचयात अवज्ञा' न्यायाने उपेक्षा करून इंग्रजी शब्द वापरायची गरज नव्हती.

मराठीत आपण नेमकेपणे व्यक्त होऊ शकतो का ? छे !
मराठीत आपल्याला कमीत कमी शब्दात गहन आशय मांडता येतो का ?

भाषा ही केवळ अभिव्यक्तीचे साधन आहे
>>

ह्या बाबत माझे निरिक्षण (अभ्यास नव्हे) असे आहे की विचारांमधेच तर स्पष्टता नसेल उलट भोंगळपणा असेल तर अभिव्यक्तीमधेही विस्कळीतपणा डोकावतोच. एखाद्याला लख्ख विचार करता येत असेल तर तो (कोणत्याही) भाषेत अधिक चांगल्या प्रकारे व्यक्त होऊ शकतो. माझ्यामते हा विचारांमधला नेमकेपणा देव/निसर्ग दत्त नसून कष्टसाध्य आहे. वाचन मनन चिंतन ईत्यादि गोष्टींना वेळ दिला असता आपले म्हणणे नेमकेपणाने मांडता येऊ शकायला हरकत नाही. पण.... हल्ली वेळ कोणाकडे असतो. प्राधान्यक्रम ही वेगळेच असतात. भाषा, शब्दप्रयोग, वाक्यरचना, मांडणी कशीही असो मुद्दा कळतोय ना असे म्हटले की झाले असे म्हणण्याची पद्धत रूढ होत चालली आहे.

इंग्रजीत असतीलही अनेक उत्कृष्ट संज्ञा पण योग्य त्या ठिकाणी आणि वेळी वापरता येणे हे ही विचारांमधल्या स्पष्टतेनुसारच जमणार असे मला वाटते.

त टी - खटाटोपाचा हेतू लक्षात आला कळकळ पोचली.

गेल्या दोन दशकांत किती वेळा आपण एखाद्या भारतीयाने एखादी टर्म कॉईन्ड केली आहे असे कुणालाही वाचल्याचे आठवते?? >> योग्य मुद्दा. कदाचित हिंदीत असू शकेल.

हर्पैनजी, प्रतिसाद आवडला. तळटीपेबद्दल धन्यवाद आपले.

फारएण्ड, तुम्ही समजून घेत आहात हे जाणवले. तुमचा रोख कुठेच आरोप करण्याचा नव्हता याची जाणीव आहे.

विवेक प्रतिसाद आवडला.
हरचंद पालव >> व्हय की जास्त आवडले.

एआय सुचवण्या :-

Gaslighting - बुद्धीभ्रम करणे, भ्रमखेळ करणे
Straw man argument - तर्कदोष, मिथ्या युक्तीवाद, बुजगावणे युक्तीवाद
False Dichotomy - मिथ्या द्विविधा
Circular Reasoning - चक्रीय युक्तिवाद, अन्योन्याश्रय दोष
Confirmation Bias - स्वमत पुष्टीकरण
Cognitive Dissonance - बोधनात्मक विसंगती
Virtue Signaling - दंभनितीप्रदर्शन
Cronyism - सवंगडीवाद
Scapegoating - बळी पाडणे
Narrative Building - प्रतिमा निर्मिती
Soft Power - सौम्यसंपदा
Emotional Blackmail - भावनिक पिळवणूक
Boundary Setting - लक्ष्मणरेखा
Opportunity Cost - संधीची किंमत
Status Quo Bias - यथास्थितीमोह

हे काही मला सुचलेले. जरा चुकीचेही असू शकतील :-

Cherry Picking - स्वल्पाकलन
Short-termism - स्वल्पदृष्टी
Bandwagon Effect / Herd Mentality - कळपवृत्ती
Stonewalling - अलगवाद
Passive Aggressive / Silent Treatment - कडक अनुल्लेख / दुर्लक्षास्त्र (हे खास मायबोली स्टाईल)

योग्य मुद्दा. कदाचित हिंदीत असू शकेल.>>>>हिंदीतून आलेला, लगेच आठवणारा आणि आंतराराष्ट्रीय स्तरावर वापरात असलेला असा शब्द म्हणजे 'जुगाड'.... आणखी कुठलाही आठवत नाही.

हिंदीत
मचा देना, पेल देना

मराठीत
टिंग्या टाकणे, अशक्य भारी , कोल्ला तुला, जबराट, फेकाफेकी, कोंबडा करणे, पोपट करणे , माकड करणे, धू धू धुतला, सही! चुथडा करणे, शेंड्या लावणे, गळपाटणे, थुका लावणे, एक ठेऊन देणे, राडा घालणे

इत्यादी शब्द आणि वाक्ये नवीन नसली तरी ती गेल्या काही दशकांमध्ये ज्या अर्थाने वापरात आली आहेत ते नवीन आहेत. शंभर वर्षापूर्वीच्या साहित्यात हे सापडणार नाही माझ्या मते

लेख विस्कळीत असला तरी मुद्दा पोहोचला आणि भिडला ही!
असेच विचार पूर्वी मनात आलेले आहेत, तुम्ही ते पोटतिडीकीने मांडले आहेत. धन्यवाद!
एक उदाहरण म्हणून, फ्रेंचांकडे एक भाषा मंडळ आहे आणि नव्या आलेल्या इंग्रजी शब्दांना प्रतिशब्द तयार करणे आणि प्रसारित करणे हेच त्यांचे काम आहे. मराठीत ते नाही तर आपण सुटसुटीत शब्द तयार करु,अडगळीत गेलेले वापरायला लागू. रुढ होतील न होतील ते पुढचं पुढे. फक्त भारदस्त संस्कृत पेक्षा इंग्रजी परवडले असा प्रकार होतो. इंग्रजीला मराठीची किनारवाले शब्द ही छान रुढ होतात. उ.दा. टेंपरवारी, वायसर हे आता मराठी शब्द आहेत.

इत्यादी शब्द आणि वाक्ये नवीन नसली तरी ती गेल्या काही दशकांमध्ये ज्या अर्थाने वापरात आली आहेत ते नवीन आहेत.>>> हपा हे शब्द नविन असले तरी त्याचा सार्वत्रिक वापर, सर्व भाषांमध्ये आढळत नाही...जसं जुगाड हा मूळ पंजाबी शब्द हिंदी, मराठी सकट इंग्रजीतही बऱ्यापैकी त्याच अर्थाने वापरला जातो, ट्रोल हा मुळ इंग्रजी शब्द मराठी, हिंदी आणि इतर भाषांतही त्याच अर्थाने वापरला जातो. माझ्या मते 'कॉईन्ड टर्म ' चा क्रायटेरीया पास होण्यासाठी हा एक महत्त्वाचा मैलाचा दगड मानता येईल. बाकी एखाद्या भाषेपुरते मर्यादित असलेले बरेच शब्द दर वर्षी येतात आणि त्यातील बहूतेक पाच-सहा महिन्यांत लुप्त होतात.

काहींनी जे प्रश्न उपस्थित केले आहेत त्याची उत्तरे आधीच दिलेली आहेत. तरीही विचारलेले प्रश्न अनुपस्थित ठेवावेत कि त्यांना उत्तरं द्यावीत हा मला पडलेला प्रश्न आहे. धाग्याचा विषय पाहता ही उत्तरे आताच दिली तर भरकटण्याचा धोका आहे. कदाचित संबंधितांना वैयक्तिक उत्तर देणे योग्य राहील . सध्या तरी ते शक्य नाही. इतर सर्वांनी मराठी भाषेसाठी म्हणून माझा प्रमाद सहन करत धागा प्रवाही केला आहे त्याबद्दल सर्वांचे आभार.

कळकळ पोहोचली!
हर्पेन शी सहमत!
माझे असे निरीक्षण आहे की आजकाल लोकांना मराठीत/हिंदीत चांगल्या प्रकारे व्यक्त होता येत नाही आणि इंग्रजीमध्येही! मुळात भाषेवर प्रभुत्व हा प्रकारच कमी झाला आहे. अस्तित्वात असलेल्या शब्द संपदेबाबतच अज्ञान आहे, नव्या संज्ञा वगैरे दुरचा पल्ला! जो विचार आधी नव्हताच त्याबद्दल असलेला परदेशी शब्द वापरणे, तो स्थानिक भाषेचा भाग होणे समजूच शकते परंतू हल्ली बरेचदा केवळ काय फरक पडतो, मुद्दा कळल्याशी मतलब असे म्हणत सरमिसळ केलेली भाषा वापरली जाते. काही वेळा तर असे करताना वापरलेला इंग्रजी शब्द देखील योग्य अर्थछटेचा नसतो पण 'इंग्रजी' आहे ना मग बरोबरच असणार म्हणून मान्यही केला जातो.
शब्द संपदा ही जाणून बुजून प्रयत्न करुन वाढवावी लागते मग भाषा कुठलीही असो नाहीतर इंग्रजी मधे देखील 'यू नो व्हॉट आय मीन' वर गाडी फिरत रहाते. विचाराला योग्य अर्थछटा असलेला शब्द योजणे हे सरावाने जमायला लागते मात्र त्या साठी सातत्याने अभ्यासही लागतो. नविन संज्ञांसाठी प्रयत्न करावाच पण त्या जोडीला अस्तित्वात असलेली शब्द संपदा आत्मसात करायचे मनापासून प्रयत्न हवेत. आजकाल साधा शब्दकोश -डिजीटल रुपातीलही, वापरायची तसदी घेतली जात नाही. मी शाळेत असताना शब्दकोश आणि म्हणी-वाक्प्रचारांची नोंदवही (इंग्रजी, मराठी दोन्हीसाठी) चौथी-पाचवीपासून वापरणे अपेक्षीत होते. भाषेची आवड-परीक्षा वगैरे देणार तर मग त्यात हिंदी, संस्कृत वगैरे भर पडत जाई.

साजीरा,
वरच्या यादीतील soft power ला त्याची अर्थछटा लक्षात घेता सामवाद हा शब्द चालू शकेल ना? (साम, दाम, दंड, भेद)

विषय महत्त्वाचा आहे आणि चालू असलेली चर्चा उद्बोधक आहे.
शब्दसंपदा कमी असणं यावर स्वातीताईशी सहमत आहे.
अजून एक जाणवलेली गोष्ट म्हणजे प्रत्येक इंग्रजी शब्दाला अचूक अर्थवाही शब्द शोधण्याचा अट्टाहास दिसतो. त्या ऐवजी इंग्रजी प्रमाणे आधीच रूढ असलेल्या एखाद्या सोप्या शब्दालाच त्या संदर्भात एक नवीन अर्थ का दिला जात नाही?
हा किस्सा कदाचित मी आधी लिहीलाय माबोवर पण पुन्हा एकदा!
एका खेड्यात साल दोन हजाराच्या आसपास काही कॉलेजवयीन मुलांना संगणकाची तोंडओळख करून देण्यासाठी एक शिबीर आयोजित केले होते. तर काँप्युटर सुरू आणि बंद कसा करायचा हे शिकवले. मग काही गेम्स वगैरे झाले आता दिवसाच्या शेवटी काँप्युटर शट डाऊन करून ठेवायचा होता. तेव्हा एका मुलाने विचारले - मॅडम काँप्युटर मिटू का? बाकी मुलं हसली पण खरतर शटडाऊनला मिटा हा इतका सोपा प्रतिशब्द त्या मुलाने अजाणता वापरला होता! तो वापरात आणायला काय हरकत आहे? हा किस्सा माझ्या मैत्रिणीने सांगितल्यानंतर अनेक दिवस आम्ही आमचा लॅपटॉप मिटून ठेवत होतो!
इंग्रजीत देखील shut down हा केवळ संगणकासाठी वापरत नाही ना आपण? मग तसंच मराठीत करायला काय हरकत आहे?
असे नवे नवे शब्दार्थ वर्तमानपत्रातून किंवा आता सोशल मीडियामधून प्रसिद्ध करत रहावे.