प्रसन्नवडी (आपापल्या जबाबदारीवर करा!)

Submitted by स्वाती_आंबोळे on 25 August, 2025 - 14:37
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ माप बेसन
१ माप ओलं खोबरं किंवा डेसिकेटेड कोकोनट किंवा खोबर्‍याची पूड (मी ही वापरली)
१ माप तूप
१ माप दूध
१ माप दुधाची भुकटी किंवा खवा पावडर (मी ही वापरली)
अडीच मापं साखर
अर्धा चमचा वेलचीपूड
सजावटीसाठी सुक्यामेव्याची पूड इत्यादी ऐच्छिक घटक
श्रद्धा आणि सबुरी

क्रमवार पाककृती: 

मी तर म्हणते या फंदात पडूच नका!
काही गाणी नसतात का, ऐकायला सोप्पी वाटतात आणि साधं गुणगुणायला लागलं तरी तारांबळ उडते - हे त्यापैकी प्रकरण आहे.
अजूनही मागे वळा.

पण तरीही तुमचा हट्टच असेल, तर क्रमवार कृती ही अशी:

१. ओल्या नारळाचा चव किंवा डेसिकेटेड / ग्रेटेड वगैरे खोबरं वापरणार असाल, तर बेसन + खोबरं + दूध + साखर + दुधाची भुकटी हे सगळं एकत्र ब्लेन्ड करून घ्या.
मी कोकोनट पावडर वापरली, त्यामुळे ही ब्लेन्डिंगची स्टेप वगळली.
या रेसिपीत शॉर्टकट हा एवढाच एक घेण्यासारखा आहे.

२. फोन लांबच्या टेबलावर सायलेन्टवर पालथा घाला. मेसेजेस, मायबोली, फेसबुक वगैरे बघायची ही वेळ नाही. पार्लरला जायचा तर विचारही मनात आणू नका.

३. हे सगळं मिश्रण आणि तूप एकत्र करून जाड बुडाच्या मोठ्या भांड्यात मध्यम आचेवर ढवळायला लागा. भांड्याचं बूड जाडच. आच मध्यमच. थोडी कमीही चालेल, पण जास्त चालणार नाही.
खोबरं आणि दूध करपायला अतिशय उत्सुक असतं हे लक्षात असू दे. ही रेसिपी म्हणजे त्यांच्यातला आणि आपल्या पेशन्समधला खेळ आहे. आपल्याला जिंकायचं आहे.

४. ढवळत रहा.

५. ढवळत रहा.

६. ढवळत रहा.

७. आता मिश्रण आळायला लागेल, गोळा जमायला लागेल, आता लागेल, आता लागेल... असं तुम्हाला वाटेल. पण तसं होणार नाही. तेव्हा ढवळत रहा.

८. मिश्रणाचा रंग पालटायला लागेल. पण ते अजूनही गोळाबिळा होणार नाही. ढवळत रहा.

९. यापेक्षा तुपावर बेसन भाजून सरळ लाडू वळले असते तर बरं झालं असतं असं तुम्हाला वाटेल. पण आता ती वेळ गेलेली आहे, तेव्हा ढवळत रहा.

१०. कंटाळून तुम्हाला हे मिश्रण मायक्रोवेव्हमध्ये ठेवावंसं वाटेल. बाकी वड्यांची मिश्रणं नाही का चुटकीसरशी आळतात त्यात?! ही चूक चुकूनही करू नका*!! ढवळत रहा.

११. आता भांड्याच्या कडा कोरड्या व्हायला लागतील आणि मिश्रण आळलं नाही तरी ढवळताना कडा सोडायला लागेल.

१२. अभिनंदन! तुम्ही जिंकलात. ढवळणं थांबवा, आच बंद करा.

१३. आता आपलं नेहमीचंच - वेलचीपूड चांगली मिसळून घ्या, तुपाचा हात लावलेल्या थाळीत मिश्रण ओता, पसरा, वरून सुक्यामेव्याची पूड थापा, वड्या कापा आणि गार करायला ठेवा.

वाढणी/प्रमाण: 
एका मेझरिंग कपच्या मापाने मध्यम आकाराच्या पन्नासेक वड्या झाल्या. पण मी मायक्रोवेव्हच्या नादात थोडी सांडलवंडही केली.
अधिक टिपा: 

१. * मी मायक्रोवेव्ह वापरायची चूक केली. मोठ्या काचेच्या भांड्यात मिश्रण घालून फक्त दीड मिनिटासाठी मायक्रोवेव्ह केलं. ते इतकं फसफसलं, की ते काचेचं भांडं आणि मायक्रोवेव्हची प्लेट यांचा एक स्वतंत्र रबरबाट एपिसोड झाला. जाऊ द्या, नकोत त्या दु:खद आठवणी!
२. तुम्ही म्हणाल, 'हात्तिच्या! हे तर सेव्हन कप स्वीट!'
हो आणि नाही. म्हणजे इन्टरनेटवर ज्या सेव्हन कप स्वीटच्या रेसिपीज आहेत त्यात खोबर्‍याऐवजी एक माप दही घालतात, आणि बेसन आधी तुपावर भाजून घेतात. शिवाय आपले घटकपदार्थ एकूण साडेसात मापं आहेत!
३. बेसन भाजून न घेतल्यामुळे यांची चव बेसनलाडूंपेक्षा बरीच निराळी आणि पोत खुसखुशीत होतो. खोबर्‍यामुळे छान रवाळपणाही येतो.
४. मिश्रण नीट कडा सोडायला लागलं की जरी पातळसर दिसलं तरी थापायला घ्या. गोळा व्हायची वाट बघाल तर फसाल. मी फसता फसता वाचले, त्याचा पुरावा ताटलीच्या मध्यात त्या मोदकाशेजारी दिसेल.

माहितीचा स्रोत: 
हमार भौजी - अर्थात माझी वहिनी
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एवढ्या डिस्कलेमरी पदार्थाला प्रसन्नवडी नाव का दिले असेल ? Uhoh

Lol काय लिहिली आहे! वाचायलाच मजा आली.
तूप कधी, कुठे आणि कसं घातलं? सुरुवातीलाच सगळ्या मिश्रणात का? खवा पावडर कुठली वापरलीस? इंग्रो मध्ये गेलो आणि खवा पावडर मिळाली आणि परत वाचताना डिस्क्लेमरला अव्हेरुन करण्याचा उत्साह आला तर करेन. Proud

Proud
हो हो, सगळं एकत्र करूनच गॅसवर ठेवलं. मी नीट लिहिलं नाही का ते? दुरुस्त करते, धन्यवाद. Happy
खवा पावडर तीच इन्ग्रोमधली. पण कुठलीही दुधाची पावडर चालेल.

मी जिन्नस यादी बघूनच करायचं नाही ठरवलेलं . पाककृती वाचून खात्री झाली .एकदा असंच काहीसं केलेलं आणि पस्तावलेले . तेव्हा नकोच . बेसन गोड पाककृती जमल्या तर जमल्या (सहसा नाहीच जमत ). प्रचंड सबुरी लागते . तुमचं लिखाण आवडलं.

अरे बाप रे! करू नका करू नकाच्च असा आग्रहच केलाय. मग आता नाहीच करत म्हणजे झालं! आम्हाला माहिती आहे आयतं खायला कुठे जायचं ते.

Happy Happy फोटो मस्त आहे. पाकृही वाचली. बेसन बेस्ड पदार्थांची फार आवड नाही पण यातले बाकीचे घटकपदार्थ सगळे आवडीचे आहेत त्यामुळे मुंबईतील मराठी टक्क्याप्रमाणे बेसनाचे झाले असेल तर आवडेल. लिटरली मेल्टिंग पॉट. आणि न भाजलेले बेसन लाडू वगैरेंपेक्षा वेगळे लागत असेलही.

दिसतोय मात्र मस्त. मधल्या मोदकाने मस्त लुक आला आहे.

तुम्ही म्हणाल 'हात्तिच्या! हे तर सेव्हन कप स्वीट!' >>> वाचकांच्या माहितीबद्दल तुझ्या अपेक्षा अवास्तव आहेत Proud

एखादे मोठे पण रंगतदार गाणे मधेच वेगळी लय पकडते तसे ढवळत राहा पासून झाले. ७, ८, ९ मधे तर मला ढवळत राहा हा मतला वाटू लागला. मात्र ढवळत राहणे थांबा असे नंतर एक्स्प्लिसिटली (म्हणजे इथे फक्त स्पष्टपणे Proud ) लिहायला हवे. नाहीतर असे होऊ शकते.

ह्या खुरचंदच्या वड्या की.. (दिल्लीला मिळते ते खुरचंद वेगळे). माझी आज्जी ह्याच वड्या खुरचंदच्या वड्या ह्या नावाने करायची.

तिने नाही हो कधी एव्हडे डिस्क्लेमर दिले! कधी होऊन जायच्या कोणाला कळायचं सुद्धा नाही.. हे अगदी असंबा* प्रकरण दिसतय.. Wink Proud

* - आठवतय का हे ? Happy

Lol
आठवतंय तर! Proud
खुरचंद माहीत नाही, पण आज्यांच्या पेशन्सला सलाम आहेच! Happy

मेहेनतीला सलाम, छानच दिसतायेत. खुसखुशीत लेखन.

ढवळत रहा, ढवळत रहा वाचून न ढवळता कल्पनेने माझा हात दुखायला लागला Lol , इतकं चित्रदर्शी वर्णन.

Biggrin
वडी कशी लागते माहिती नाही, पण लिखाण खरेच प्रसन्न आहे !
तुम्ही म्हणाल 'हात्तिच्या! हे तर सेव्हन कप स्वीट!' >>> वाचकांच्या माहितीबद्दल तुझ्या अपेक्षा अवास्तव आहेत हे बरोबर आहे ! Happy

करून बघणार !

शेवटचा इंग्रेडियंट वाचला आणि पुढचे लिखाण हे पा कृती म्हणून न बघता, ललित लेखन म्हणून वाचले..
वाचून प्रसन्न वाटले Happy

फोटो पाहुन एकदम प्रसन्न वाटले. कृती वाचुन प्रसन्नता पळुन गेली. मलाही सेव्हन कप….. प्रकरणच आठवले.

इतका पेशन्स माझ्यात नाहीये हे आधीच स्वतःला समजावले. नाहीतर बेसन बेस्ड काहीही खुप आवडते. माझ्या हातुन सर्वच प्रकरण त्या मोदकाच्या बाजुला जे आहे तसे होणार यात शंकाच नाही Happy

ते खुरचन आहे, खुरचंद नाही. चांदनी चौकात रात्रीचे गेलो होतो त्यामुळे खुरचनचे फक्त लटकणारे बोर्ड दिसले होते. इथे आंबोलीतील एक स्नेही दिल्लीला गेले होते ते येताना घेऊन आले. मला आधी वाटले होते की दुधाची खरवड काय खायची. पण खुरचन वडी छानच लागते. बेसन वगैरे काही नसते.

नाव छान आहे. पण पाकृ अवघड दिसते आहे. मी मागची तुझी "चुकवून दाखवा" म्हणून लिहिलेली सोपी पाकृ पण चुकवली होती त्यामुळे या फंदात पडायला नको. कुणी केल्यास खायला बोलवा.

लिहिलं भारीच आहेस. एवढा मायक्रो चा कुटाणा होऊन ही वड्या नीट झाल्यावर खरच तुला प्रसन्न वाटलं असेल. ज्याचा शेवट गोड ते सगळच गोड...
वड्या मस्त दिसतायत. रच्याकने थापल्या कशावर आहेत काहीतरी वेगळंच दिसतंय ते ताट

धन्यवाद साधना... .

छान दिसताहेत वड्या! ह्याच प्रमाणात बेसनाच्या ऐवजी रवा, खोबरं नारळ्याच्या ऐवजी पिस्ता, बदाम काजू कुट वापरून करते. साखर थोडी जास्त घेतली तर लवकर होतीव वड्या… साडेतीन वाट्या साखर.

रेसिपी मस्त आहे. वड्या प्रकार शत्रू पक्षात असल्याने आणि शेवटचे इंग्रेडिएंटस् सध्या मिळणं अशक्य असल्याने करेनच असे‌ नाही. पण फोटो तोंपासू आहे.

फारेंड Lol

काय लिहिली आहे! वाचायलाच मजा आली.>> + १
हे करून पाहण्याचे धाडस होणार नाही.
खायला प्रसन्न वाटेल.

तुमची बाकीच्या पाकृंपैकी काही तुमच्या जबाबदारीवर करून पहातो. Wink

मस्त लिहिलंय Lol

श्रद्धा आणि सबुरी - हे आवडलं!

भारी लिहिलंय
Lol
कितीजण करतील हे वाचून हा प्रश्नच आहे
निगुतीने करायचा प्रकार
छान दिसत आहेत वड्या

सर्व प्रतिसादकांचे अनेक आभार. Happy
खटाटोप होतो खरा, पण चव सुंदर येते, तेव्हा डरनेका नै!

>>> ते खुरचन आहे, खुरचंद नाही
ओह ओके. आता माझा इन्टरेस्ट वाढला - मला दुधाची खरवड, तुपाची बेरी, भाताची खरपुडी हे प्रकार भयंकर आवडतात.

ममो, हो - जाळीवर ताट ठेवलंय तळापासून गार व्हाव्यात म्हणून.

मंजुताई, तुमची रेसिपीही करून बघेन.

मानव Lol

>>> बेसन लाडवांसारख्या टाळूला चिकटतात का
नाही, अगदी खुसखुशीत होतात.
आणि लाडूसुद्धा माझ्या रेसिपीने केलेत तर टाळूला चिकटणार नाहीत याची गॅरेन्टी! Happy

अंजुताई Lol

अरे वा, मस्त दिसत आहेत वड्या. एक मैत्रिण ७ कप बर्फी देते प्रसादात. ती आयती मिळत असल्याने वड्यांचा खटाटोप करणार नाही.

फोन लांबच्या टेबलावर सायलेन्टवर पालथा घाला. मेसेजेस, मायबोली, फेसबुक वगैरे बघायची ही वेळ नाही. पार्लरला जायचा तर विचारही मनात आणू नका. >>> सिरीयसली वाचायला सुरूवात केली आणि लोळणच घेतली Lol

आता लागेल, आता लागेल... असं तुम्हाला वाटेल >>> Lol

पण आता ती वेळ गेलेली आहे, तेव्हा ढवळत रहा. >> तुम्ही आंबोळे कि ढवळे ? Proud

रेसिपी राहिली बाजूला , यातच लक्गे ल्रागून राहिलं Happy
शेवटी टू बी ऑर नॉट टू बी झालं.

Pages