
१ माप बेसन
१ माप ओलं खोबरं किंवा डेसिकेटेड कोकोनट किंवा खोबर्याची पूड (मी ही वापरली)
१ माप तूप
१ माप दूध
१ माप दुधाची भुकटी किंवा खवा पावडर (मी ही वापरली)
अडीच मापं साखर
अर्धा चमचा वेलचीपूड
सजावटीसाठी सुक्यामेव्याची पूड इत्यादी ऐच्छिक घटक
श्रद्धा आणि सबुरी
मी तर म्हणते या फंदात पडूच नका!
काही गाणी नसतात का, ऐकायला सोप्पी वाटतात आणि साधं गुणगुणायला लागलं तरी तारांबळ उडते - हे त्यापैकी प्रकरण आहे.
अजूनही मागे वळा.
पण तरीही तुमचा हट्टच असेल, तर क्रमवार कृती ही अशी:
१. ओल्या नारळाचा चव किंवा डेसिकेटेड / ग्रेटेड वगैरे खोबरं वापरणार असाल, तर बेसन + खोबरं + दूध + साखर + दुधाची भुकटी हे सगळं एकत्र ब्लेन्ड करून घ्या.
मी कोकोनट पावडर वापरली, त्यामुळे ही ब्लेन्डिंगची स्टेप वगळली.
या रेसिपीत शॉर्टकट हा एवढाच एक घेण्यासारखा आहे.
२. फोन लांबच्या टेबलावर सायलेन्टवर पालथा घाला. मेसेजेस, मायबोली, फेसबुक वगैरे बघायची ही वेळ नाही. पार्लरला जायचा तर विचारही मनात आणू नका.
३. हे सगळं मिश्रण आणि तूप एकत्र करून जाड बुडाच्या मोठ्या भांड्यात मध्यम आचेवर ढवळायला लागा. भांड्याचं बूड जाडच. आच मध्यमच. थोडी कमीही चालेल, पण जास्त चालणार नाही.
खोबरं आणि दूध करपायला अतिशय उत्सुक असतं हे लक्षात असू दे. ही रेसिपी म्हणजे त्यांच्यातला आणि आपल्या पेशन्समधला खेळ आहे. आपल्याला जिंकायचं आहे.
४. ढवळत रहा.
५. ढवळत रहा.
६. ढवळत रहा.
७. आता मिश्रण आळायला लागेल, गोळा जमायला लागेल, आता लागेल, आता लागेल... असं तुम्हाला वाटेल. पण तसं होणार नाही. तेव्हा ढवळत रहा.
८. मिश्रणाचा रंग पालटायला लागेल. पण ते अजूनही गोळाबिळा होणार नाही. ढवळत रहा.
९. यापेक्षा तुपावर बेसन भाजून सरळ लाडू वळले असते तर बरं झालं असतं असं तुम्हाला वाटेल. पण आता ती वेळ गेलेली आहे, तेव्हा ढवळत रहा.
१०. कंटाळून तुम्हाला हे मिश्रण मायक्रोवेव्हमध्ये ठेवावंसं वाटेल. बाकी वड्यांची मिश्रणं नाही का चुटकीसरशी आळतात त्यात?! ही चूक चुकूनही करू नका*!! ढवळत रहा.
११. आता भांड्याच्या कडा कोरड्या व्हायला लागतील आणि मिश्रण आळलं नाही तरी ढवळताना कडा सोडायला लागेल.
१२. अभिनंदन! तुम्ही जिंकलात. ढवळणं थांबवा, आच बंद करा.
१३. आता आपलं नेहमीचंच - वेलचीपूड चांगली मिसळून घ्या, तुपाचा हात लावलेल्या थाळीत मिश्रण ओता, पसरा, वरून सुक्यामेव्याची पूड थापा, वड्या कापा आणि गार करायला ठेवा.
१. * मी मायक्रोवेव्ह वापरायची चूक केली. मोठ्या काचेच्या भांड्यात मिश्रण घालून फक्त दीड मिनिटासाठी मायक्रोवेव्ह केलं. ते इतकं फसफसलं, की ते काचेचं भांडं आणि मायक्रोवेव्हची प्लेट यांचा एक स्वतंत्र रबरबाट एपिसोड झाला. जाऊ द्या, नकोत त्या दु:खद आठवणी!
२. तुम्ही म्हणाल, 'हात्तिच्या! हे तर सेव्हन कप स्वीट!'
हो आणि नाही. म्हणजे इन्टरनेटवर ज्या सेव्हन कप स्वीटच्या रेसिपीज आहेत त्यात खोबर्याऐवजी एक माप दही घालतात, आणि बेसन आधी तुपावर भाजून घेतात. शिवाय आपले घटकपदार्थ एकूण साडेसात मापं आहेत!
३. बेसन भाजून न घेतल्यामुळे यांची चव बेसनलाडूंपेक्षा बरीच निराळी आणि पोत खुसखुशीत होतो. खोबर्यामुळे छान रवाळपणाही येतो.
४. मिश्रण नीट कडा सोडायला लागलं की जरी पातळसर दिसलं तरी थापायला घ्या. गोळा व्हायची वाट बघाल तर फसाल. मी फसता फसता वाचले, त्याचा पुरावा ताटलीच्या मध्यात त्या मोदकाशेजारी दिसेल.
एवढ्या डिस्कलेमरी पदार्थाला
एवढ्या डिस्कलेमरी पदार्थाला प्रसन्नवडी नाव का दिले असेल ? Uhoh
<<
वड्यांची देवी प्रसन्न झाली अन इबांचा वडा होता होता वाचला, म्हणून.
श्रद्धा आणि सबुरी वाचून
श्रद्धा आणि सबुरी वाचून प्रकरण डेंजर असणार याचा अंदाज आलाच होता, वाचत गेले तशी खात्रीच पटली. फार मजा आली वाचायला
'करू नका, वाचू नका, आत्ताच
'करू नका, वाचू नका, आत्ताच मागे वळा' अश्या धमक्या देऊन लिहिलेली ही दुसरी पाककृती! वाचायला मजा आली. इतक्यात भारतात येणार नसालच!
पहिली पाककृती कोणती ते नका विचारू. मला माझे धागे वर आणणे रुचत नाही.
सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार.
सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार.
नमस्कार अलीबाबा, लाँग टाइम!
>>> पहिली पाककृती कोणती ते नका विचारू
बरं, राहिलं!
चुकवून दाखवा आव्हानानंतर हे
चुकवून दाखवा आव्हानानंतर हे करून दाखवू नका आव्हान का?
"मी ही वापरली" मधल्या ही वर हायपरलिंक आहे का ते पाहिलं.
ओगले आजींच्या खुरचंदवड्यांत रवा आहे , तोही बेसनाच्या पाच पट आणि पाकसुद्धा आहे.
फोटो काय कातिल आहे! अश्या
फोटो काय कातिल आहे! अश्या वड्या आयत्या मिळाल्या खायला की प्रसंन्न वात टतं
मस्त खुसखुशीत लिखाण झालंय ! वेळोवेळी दिलेल्या धोक्याच्या इशार्या नंतर लांबच रहावे बरे!
खुरचन वडी मधे रवा आणि खवा हे मेन पदार्थ असतात ना ? नाशिकची बुध्याची खुरचन वडी खावी आणि आनंद घ्यावा
खुसखुशीत छान झाल्या वड्या.
खुसखुशीत छान झाल्या वड्या. अजुन थोडा आधी विस्तव बंद करायला हवा होता.
आयत्यावेळी घरात पिस्ते आहेत ते खारवलेले आहेत ते लक्षात आलं. मग बदाम कुटून घातले. त्यात मिश्रण आणखी गार झालं आणि बदाम चिकटले नाहीत नीट.
मस्तच लिहिलंय.
मस्तच लिहिलंय.
स्वाती आणि अमित दोघांच्याही वड्या छान दिसत आहेत.
इतके डिस्क्लेमर्स वाचूनही
इतके डिस्क्लेमर्स वाचूनही केल्यास आणि इतक्या छान केल्यास! बहाद्दर आहेस!
सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार.
अमित वड्या फारच उत्तम दिसतायत
अमित वड्या फारच उत्तम दिसतायत.
मजा आली वाचायला.प्रसन्नवडी
मजा आली वाचायला.प्रसन्नवडी नाव शोभतयं.दोघांच्याही वड्या छान दिसतायत.
नमस्कार! आजकाल फार नाही येत
नमस्कार! आजकाल फार नाही येत इकडे.
Pages