
पुन्हा एकदा आम्ही स्मिथच्या दारात उभे होतो. महत्वाचं म्हणजे, यावेळी त्यांच्या दाराला कुलुप नव्हतं. जोसेफने दारावरची बेल वाजवली, स्मिथनी दार उघडलं. स्मिथ आता विश्रांती घेऊन बरे झाले होते आणि बॅग घेऊन तयारी करून आमचीच वाट पाहत बसले होते. आम्हीही आपापल्या खांद्यावर काही जुजबी सामान घेऊन पुढच्या मोहिमेच्या तयारीत होतोच.
एअरपोर्टकडे जाण्यासाठी आम्ही एक टॅक्सी बोलवली होती. स्मिथ घराला कुलूप लाऊन टॅक्सीमध्ये येऊन बसले. आम्ही तिघे एयरपोर्ट कडे निघालो. थोड्याच वेळात आमची टैक्सी एयरपोर्टवर पोहोचली. जवळपास दिड दोन तासाच्या विमान प्रवासानंतर आम्ही अथेन्सच्या जमिनीवर पाय ठेवला. एयरपोर्टच्या बाहेरच उभ्या असणाऱ्या एका टॅक्सीवाल्याला पकडून आम्ही Elusis गावची वाट धरली. इतक्या दूरच्या प्रवासाला कुणी टैक्सी ड्राइवर तयार होत नव्हते. चार पैसे जास्त देण्याच्या बोलीवर हा ड्राइवर तयार झाला होता. स्मिथ पुढच्या सीटवर आणि आम्ही दोघे टॅक्सीच्या मागच्या बाजूस बसलो होतो. जोसेफचं इंटरनेटवर काहीतरी शोधकार्य चालू होतं. मी Elusis च gps लाऊन रस्ता बघत होतो आणि स्मिथ ग्रीसचे वास्तुस्थापत्य कौशल्य न्याहाळत होते.
खरंच ! ग्रीक स्थापत्य म्हणजे तत्वज्ञान, सौंदर्यशास्त्र आणि मानवी अनुभव यांचा एक अद्भुत आविष्कार होता. प्रत्येक इमारतीवर प्राचीन ग्रीक संस्कृतीचे प्रतिबिंब उमटले होते. अथेन्सच्या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना Archaic शैलीपासून ते Corinthian शैलीपर्यंत सर्व प्रकारच्या वास्तुकलेचे आम्हाला दर्शन होत होते. बऱ्याच चौकांच्या मध्यभागी सुंदर आणि रेखीव नक्षीकाम केलेलं शिल्प अथेन्सच्या सौंदर्यात आणखी भर टाकत होते. गणिती अचूकतेसोबतच प्रत्येक शिल्प अतिशय बारकाईने घडवले होते. एखादा चौक ओलांडून गेल्यावर आम्हाला ग्रीक स्थापत्यशैलीचे ते विशेष स्तंभवर्तुळही दिसायचे. पूर्वीच्या काळी या ठिकाणी सभा भरल्या जात असाव्यात.
मी देखील gps वरती पाहायचे सोडून ग्रीसचे ते स्थापत्य सौंदर्य डोळ्यात साठवत होतो. जोसेफ त्याच्या कसल्याश्या शोध कार्यातून मधेमध्ये हे सौंदर्य पाहायचा. का कुणास ठाऊक, स्मिथ मला त्या ग्रीसच्या वास्तुशिल्पात हरवल्यासारखे वाटले. काही क्षणांसाठी आम्ही तिघेही हे विसरून गेलो होतो की आम्ही अथेन्समध्ये का आलो होतो !
अथेन्सच्या आधुनिक गजबजाटाला मागे टाकत आम्ही शहराची सीमा ओलांडली, तेंव्हा रस्त्याच्या दुतर्फा उंच झाडे आमचे स्वागत करीत असल्यासारखी भासली. मधूनच एखादे जुने दगडी घर आणि त्याच्या समोरचा मळलेला अक्षरफलक दिसायचा. मध्येच एखाद्या दूरच्या डोंगराकडे बोट दाखवून जोसेफ इंटरनेटवर नुकत्याच वाचलेल्या माहितीचे आमच्यासमोर प्रदर्शन करायचा. अथेन्स सोडून आता आमची टैक्सी E94 महामार्गावरून भरधाव वेगाने पुढे धावत होती.
“ किती वेळ लागेल हे Elusis यायला ?”, स्मिथनी ड्रायव्हरला विचारले.
स्मिथच्या प्रश्नानी आम्ही पुन्हा मूळ उद्देशावर परत आलो.
“Google maps अजून २०-२५ मिनिटे सांगत आहे.”, मी gps पाहून स्मिथना उत्तर दिले.
“ हा पुढे दिसतोय ना त्या चौकातून डावीकडे वळलो की १५ मिनिटावर तुमचं Elusis येईल.”, ड्रायव्हरने अचूक माहिती देत टॅक्सी महामार्ग सोडून कच्च्या रस्त्यावर आणली. इतक्यात डावीकडे बाण दाखवणारा Elusis २७ किमी. असा दिशादर्शक फलक आम्हाला दिसला. त्या वळणावरून डावीकडे शेतातून जाणाऱ्या एका कच्च्या रस्त्याला आम्ही लागलो होतो. जवळपास ८-१० मिनिटे त्या रस्त्यावरून धूळ उडवत पुढे गेल्यावर जुन्या archaic शैलीची घरे दिसताच आम्हाला Elusis गाव सुरू झाल्याचे कळले.
काहीच मिनिटात ड्रायव्हरने टॅक्सी त्या गावच्या एका विशाल वृक्षाजवळ थांबवली. आम्ही तिघे टॅक्सीतून खाली उतरलो. जोसेफने पैसे दिल्यानंतर ड्राइवर पुन्हा एकदा त्याच कच्च्या रस्त्यावरुन धुराळा उडवत नजरेपार झाला.
जोसेफने आपल्या बॅगमधून पाण्याची बाटली काढून आपला घसा ओला केला. जवळच असलेल्या एका दगडी घराजवळ ५-६ मुलं खेळत होती. भर दुपारची वेळ असल्याने रस्त्यावर तशी फारशी वर्दळ नव्हती. Elusis गाव फारसे गजबजलेले नव्हते. त्यामुळे त्या खेळणाऱ्या पोरांव्यतिरिक्त जवळपास कुणी दिसत नव्हते. आता सभामंडपाचा पत्ता कोणाला विचारावा हा विचार करत असतानाच गावातून बाहेर जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराला जोसेफने अडवले. Gnosis Stoa कडे जाण्याचा मार्ग दाखवून आमच्याकडे साशंक नजरेने पहात तो दुचाकीस्वार निघून गेला.
“ चला, इथून पुढे पाचच मिनिटावर आपले ज्ञानगर्भ सभामंडप आहे”, त्या झाडाच्या मागून जात असणाऱ्या एका चिंचोळ्या रस्त्याकडे बोट दाखवत जोसेफ म्हणाला.
कपाळावरचा घाम पुसत मी आणि स्मिथ जोसेफच्या मागून चालू लागलो. पाच सहा घरे ओलांडून पुढे गेल्यावर एका घनदाट अरण्यात जाणारी निर्जन पायवाट आम्हाला दिसली. दोन वळणे घेऊन अरण्याच्या कुशीत अदृश्य होणारी ती नागमोडी वाट येणाऱ्या रहस्याची चाहूल अजूनच गूढ करीत होती. आम्ही जसे जसे त्या अरण्याच्या गर्भाकडे जात होतो, तशी शीतल वाऱ्याने होणारी झाडांच्या पानांची सळसळ, दूरवरून ऐकू येणारी पक्ष्यांची मंजुळ किलबिल हळू हळू कमी होत गेली. काही वेळानंतर त्या जंगलात पाचोळ्यावर पडणाऱ्या आमच्या पावलांचा आवाज तेवढा ऐकू येत होता, बाकी जंगल रागावून बसवलेल्या पोरासारखे चिडीचूप होते. जंगलाच्या आतल्या भागात जास्त वाराही वाहत नव्हता आणि त्या भागातली झाडे बरीच उंच असल्याने आकाशही दिसणे आता बंद झाले होते. भर दुपारच्या कडाक्याच्या उन्हाची वेळ असूनही त्या घनदाट अरण्याच्या मध्यभागी बऱ्यापैकी अंधार होता. इतकी भयाण शांतता असूनही त्या निर्जन अरण्यात आम्ही निर्भीडपणे ज्ञानगर्भाचे उरलेले स्तंभ कुठे दिसतात का याचा मागोवा घेत पुढे जात होतो.
मी आणि जोसेफ आसपास सभामंडपाच्या काही खुणा, किंवा उरलेले ते चिरपरिचित ग्रीक स्तंभ यापैकी काही दिसते का ते शोधत होतो. स्मिथ कधी माझ्यासोबत कधी जोसेफसोबत त्या अरण्याचे निरीक्षण करत होते. इतक्यात कशाला तरी अडखळून स्मिथ पडले. त्याचवेळी कुठून तरी हलकासा क्लिक ऐकू आला. स्मिथना सावरत मी आणि जोसेफ, स्मिथ कशाला अडखळून पडले ते पाहू लागलो.
तो एक दगडी चौथरा होता. पूर्वीच्या काळी तो कमरेपर्यंत उंच असावा पण कालौघात देखभाल न झाल्यामुळे किंवा भूकंप वा तत्सम आपत्तीने तो जमिनीत दबला गेला असावा. त्या चौथऱ्यावरचा पाचोळा साफ करत मी जोसेफला म्हणालो, “ इथे हा दगडी चौथरा दिसतोय म्हणजे सभामंडप नक्कीच जवळच असावा.”
“होय, तसे वाटते तर खरे ! पण इथे ना स्तंभ दिसतायत ना कसले वास्तूशिल्प.”, बोलता बोलताच जोसेफचे डोळे विस्फारले. तेवढ्यात मलाही ते दिसले. पाचोळा काढून टाकल्यावर, त्या चौथऱ्यावरती आम्हाला काही शब्द आणि काही आकृत्या दिसल्या. स्मिथची ती कागदपत्रे पाहून पाहून आता मला, ते शब्द जुन्या ग्रीकमध्ये आहेत, हा अंदाज आला.
“जोसेफ महाशय, जरा अर्थ सांगाल का याचा ?”, मी
जोसेफ त्या चौथऱ्यावरच्या संदेशाकडे निरखून पाहत होता. त्या ग्रीक शब्दांच्या बाजूला आग आणि हातोड्याची आकृती कोरलेली होती. जोसेफने आपल्या बॅगेतून कुठलेतरी पुस्तक काढून त्या शब्दांचा अर्थ लावायला सुरुवात केली.
मी आणि स्मिथ, जवळ दुसरा कोणता चौथरा किंवा एखादा स्तंभ दिसतोय ते शोधत होतो. पण उंचच्या उंच वृक्ष, त्यांचे भलेमोठे खोड या व्यतिरिक्त काहीच दिसत नव्हते. मोठाल्या वेलींनी काही वृक्ष लपेटून टाकले होते. इतके की झाडांचे खोड न वाटता वेलींची कलाकुसर असलेला स्तंभ वाटत होता. माझ्या मनात विचार आला, “कदाचित या वेलींनी सजवलेल्या वृक्षांच्या खोडांना प्रतीकात्मकपणे स्तंभ म्हणले असावे का ?”
तेवढ्यात जोसेफने हाक मारून बोलावले. त्याने त्या ग्रीक शब्दांचे भाषांतर केले होते.
“मित्रा, फारच सुंदर लिहिलं आहे हे”, जोसेफ.
“अरे, पण काय लिहिले ते तरी सांग”, मी.
“अरे हे ही आपल्या आधीच्यासारखेच आहे. कदाचित ते कोडेही असावे किंवा नसावे देखील. पण शब्दरचना तशीच. हे पहा हे त्याचे भाषांतर.”, असे म्हणून त्याने एक कागद आमच्या समोर केला.
त्याचा प्रत्येक घावात अग्नीची शक्ती ।
धातूंच्या आत्म्याला अचूक युक्ती ।
अपूर्णाला देऊ पूर्णत्वाची प्रचिती ॥
“ याचा अर्थ काय ?”, अरण्य निरीक्षणात बराच वेळ गुंतलेल्या स्मिथनी आता कोड्याकडे मोर्चा वळवला.
“हिफास्टस (hephaestus)”
“काय ?”, त्या शब्दाचा अर्थ न कळल्यामुळे गोंधळून गेलेले स्मिथ काहीतरी आठवून परत बोलले, “हा असाच काहीसा शब्द आपल्या १२ देवतांच्या कोड्यात देखील होता ?”
“असाच काहीसा शब्द नाही, हाच शब्द. हिफास्टस. १२ ऑलिंपियन गॉड्स पैकी एक. अग्नि, धातुकाम आणि शिल्पकला यांची देवता. झ्यूस आणि हिरा यांचा पुत्र. त्याची धातूकामाची शैली अद्भुत. देव आणि शूरवीरांसाठी तो शस्त्रे आणि चिलखत तसेच काही जादुई कलाकृतीही बनवीत असे. असे म्हणतात, झ्यूसचे विजेचे लखलखते बोल्ट हिफास्टसनेच बनवले होते. ह्या चौथऱ्यावर शब्दांच्या बाजूला जी अग्नी आणि हातोड्याची आकृती आहे ती याच हिफास्टसची प्रतिके आहेत.”
जोसेफने आमच्या सर्वांच्याच ज्ञानात भर टाकली.
“म्हणजे हा हिफास्टसचा चौथरा. असे बाकीच्या देवतांचेही चौथरे जवळपास असावेत.”, हे सुचवून जोसेफ बाकीच्या चौथऱ्यांच्या शोधात लागला सुद्धा.
आम्हीदेखील बाकीचे चौथरे शोधू लागलो. जवळपासच्या प्रत्येक झुडुपाच्या मागे, वेलींना सारून आम्ही ते चौथरे शोधत होतो. सुमारे १५-२० मिनिटे प्रयत्न करून काहीच न मिळाल्याने पुन्हा आम्ही त्या हिफास्टसच्या चौथऱ्याजवळ जमलो. मी बाजूच्या एका झाडाची चांगली पुरुषभर फांदी तोडून त्या चौथऱ्याजवळ रोवली.
“हे काय केलेत विल्सन !”, गोंधळलेल्या स्मिथनी मला प्रश्न केला.
“ इकडे जवळ काही मिळेल असे वाटत नाही मला. त्यामुळे, आपण अरण्याच्या पुढच्या भागात शोधूया. पण आपण पुढे गेल्यावर पुन्हा चौथरा सहजपणे सापडावा म्हणून ही फांदी लावली.”, असे म्हणत मी माझ्या बॅगेतून एक पांढरे कापड काढून त्या फांदीला बांधले.
आम्ही पुन्हा एकदा ते ज्ञानगर्भ सभामंडपाचे ते प्राचीन स्तंभ शोधू लागलो. अरण्याच्या पुढच्या भागात थोडा उजेड होता. तिकडे काही मिळेल या आशेने आम्ही त्या दिशेने चालू लागलो. जसे जसे आम्ही त्या दिशेने चालत होतो, तसा प्रकाश वाढत गेला आणि काही क्षणातच आम्ही त्या अरण्याच्या बाहेर आलो. समोर एक सुंदर निर्मनुष्य किनारा होता. सोनेरी वाळूत उभ्या असलेल्या विशाल खडकावर मध्यम उंचीच्या लाटा येऊन थडकत होत्या.
Elusis गावच्या पश्चिमेस असलेल्या Saronic आखाताच्या किनाऱ्यावर आम्ही पोहोचलो होतो. दुपार टळून पश्चिमेला कललेला सूर्य आता संध्येच्या आगमनाची तयारी करत होता. पश्चिमेकडून तिरक्या येणाऱ्या किरणांनी किनाऱ्यावरची सोनेरी वाळू लख्ख चमकत होती. ज्या स्तंभाच्या आम्ही शोधात होतो, ते स्तंभ अख्खं अरण्य पालथं घालूनदेखील मिळाले नव्हते. त्यामुळे आम्ही तिघेही थोडे हताश झालो होतो. दिवस संपायला आला होता आणि आमच्या हाती तो एक चौथरा सोडून काहीच लागले नव्हते. अक्खा दिवस असाच वाया गेला होता.
“मला वाटते आज आपण या गावात मोटेलमध्ये एखादी खोली घेऊन राहूयात आणि उद्या सकाळी ताजेतवाने होऊन पुन्हा एकदा या अरण्याची पाहणी करूयात. जर उद्यादेखील इकडे काही मिळाले नाही तर मग आपण 'डिलोझ आयलंड'कडे प्रस्थान करूया. काय म्हणता ?”, स्मिथनी एक प्रस्ताव मांडला.
“हो तसे करूच, पण आधी पुन्हा एकदा त्या चौथऱ्याजवळ जाऊन त्याचे नीट निरीक्षण करू. कदाचित तुमच्या पूर्वजांच्या पेटीप्रमाणे त्या चौथऱ्यालाही एखादे बटन असेल, ज्याने एखादा रस्ता उघडेल आणि आपल्याला सभामंडपाचा मार्ग दाखवेल.”, मी आणखी एक प्रस्ताव मांडला.
तसेही आम्ही परत जाताना त्याच मार्गाने जाणार होतो. त्यामुळे या प्रस्तावाला सर्वांनी दुजोरा दिला. परत फिरण्यासाठी आम्ही तिघेही जंगलाच्या बाजूला वळलो, आणि एकाच क्षणी आमच्या तिघांचे डोळे लखाखले. अरण्याच्या आतल्या बाजूस काहीतरी चमकत होते. थोडे पुढे होऊन आम्ही त्या प्रकाशाचा मागोवा घेतला. सूर्य आता पश्चिमेला कलल्यामुळे सूर्याची तिरपी किरणे जंगलाच्या आत जाऊन कशावर तरी परावर्तित होऊन येत होती. त्या चमकणाऱ्या गोष्टीच्या दिशेने आम्ही पुन्हा अरण्याच्या आत चालू लागलो. काही क्षणातच आम्ही त्या चमकणाऱ्या गोष्टी समोर उभे होतो.
“हे स्तंभ आपल्याला आधी का नाही दिसले !”, उत्साहाएवढ्याच दांडग्या हताश स्वरात जोसेफ बोलला.
“कारण तेंव्हा आपण याच्या पलीकडच्या बाजूने पाहत होतो आणि सूर्याची किरणेदेखील आतासारखी तिरपी नव्हती.”, मी तो स्तंभ न्याहाळत बोललो.
वेलींनी आच्छादून टाकलेल्या ज्या वृक्षांना मी काही वेळापूर्वी प्रतीकात्मक स्तंभ समजत होतो, ते वृक्ष नसून खरोखरचे स्तंभ होते. वेलींच्या गुंतागुंतीच्या वेटोळ्यांमुळे आणि उजेडाच्या अभावाने त्या वेलींच्या आत काय होते होते हे कळाले नाही. पण आता तिरप्या सूर्यकिरणांनी त्या संगमरवरी स्तंभाचा भाग उजळून टाकला होता. त्या किरणांनी ३ स्तंभ उजळले होते. अजूनही उरलेल्या ५७ स्तंभांचा पत्ता नव्हता. जोसेफ त्या स्तंभांच्या जवळ जाऊन वेलींचे आच्छादन काढत येते का ते पाहू लागला. खालच्या बाजूने वेलींचे देठ मनगटाएवढे जाड होते त्यामुळे ते हाताने निघण्यासारखे नव्हते. जोसेफ आणि मी त्या स्तंभाच्या बाजूला आणखी स्तंभ शोधू लागलो. हे तीन स्तंभ तीन भिन्न दिशांना असल्याने आम्ही तिघे वेगळे होऊन प्रत्येक स्तंभाच्या आजूबाजूचे वृक्ष तपासू लागलो. मला त्या स्तंभाच्याजवळ आणखी दोन स्तंभ दिसले. मी शोधत असलेल्या स्तंभाच्या डावीकडे मीटरभर अंतरावर एक आणि उजवीकडे एक मीटरभर अंतरावर दुसरे असे ते दोन स्तंभ उभे होते. जणू त्या संगमरवरी स्तंभाचे ते रखवालदार असावेत. बाजूचे दोन्ही स्तंभ दगडी होते. संगमरवरी स्तंभासारखीच शैली पण साध्या दगडात कोरलेली.
जोसेफला देखील असेच आणखी दोन स्तंभ सापडले. त्याच दिशेने आम्ही आणखी स्तंभ शोधत जाणार, इतक्यात स्मिथ स्तंभ सोडून वेगळ्याच जागी जाऊन आम्हाला खुणावत होते. ते काय म्हणतात हे पाहायला आम्ही त्यांच्या जवळ गेलो. स्मिथ लगबगीने हातात असलेल्या असलेल्या वहीत काहितरी खरडत होते. ते काय लिहितायत ते पाहायला आम्ही वहीत डोकावलो तर त्यांनी वही बंद केली आणि आम्हाला “हे पहा” म्हणून दोन स्तंभाकडे दोन हात करून स्वतः तिसऱ्या स्तंभाकडे तोंड करून उभे राहिले. स्मिथनी बोलावलेल्या जागेवरून आम्हाला तीनही स्तंभ स्पष्टपणे दिसत होते.
“कमाल आहे ! थोड्या वेळापूर्वी एकही स्तंभ दिसत नव्हता आणि आता तीनही स्तंभ इथे उभे राहून दिसत आहेत.”, जोसेफने आश्चर्य व्यक्त केले.
मी पण तीनही दिशेला आलटून पालटून पाहू लागलो. मला त्या जागेवरून दगडी रखवालदार स्तंभही दिसत होते.
“मि. स्मिथ ही कमाल कशी झाली”, मी कुतूहलाने त्यांना विचारले.
“ ही कमाल नाही, भूमिती शास्त्र आहे. भूमिती आणि अंकशास्त्र हे माझे आवडते विषय. ”, हे सांगताना स्मिथ भलतेच खुश दिसत होते, “आपल्याला सभामंडप मिळाला.”
“पण स्मिथ इथे फक्त ३ च स्तंभ दिसत आहेत. सोबत आम्हाला सापडलेले आणखी ४ स्तंभ. बाकीचे ५३ कुठे आहेत ?”, जोसेफ.
“ सांगतो ! समजा आपण गृहीत धरलं की हे ज्ञानगर्भ सभामंडप वर्तुळाकृती आहे. तर हे सारे स्तंभ पण वर्तुळाकार उभे असणार. हे पहा.”, असे म्हणत त्यांनी थोड्या वेळापूर्वी बंद केलेली वही उघडली. त्या वहीत त्यांनी वर्तुळाकार आकारात घड्याळात अंक असतात तसे बारा गोल काढलेले. त्यातल्या प्रत्येक दोन वर्तुळामागे एक असे आणखी बारा गोलांचे एक बाह्य वर्तुळ काढले होते. एकाबाहेर एक अशी त्यांनी एकूण पाच वर्तुळे काढली होती. म्हणजे एकूण ६० गोल काढले होते.
त्यांनी आपलं बोलणं पुढे चालू ठेवलं, “ हे आपल्याला मिळालेले तीन स्तंभ. आता असं मानूया की ह्या सर्वात आतल्या वर्तुळातले २, ७, ११ ह्या ठिकाणचे स्तंभ आपल्याला मिळालेत आहेत. आपण या वर्तुळाच्या बरोबर केंद्रबिंदूवर उभे आहोत. त्यामुळे इथून आपल्याला तिन्ही स्तंभ सहजपणे दिसतात. या आकृतीनुसार जर आपण पाहत गेलो तर बाकीच्या गोलांच्या ठिकाणी आपल्याला हे इतर स्तंभ, या वहीत काढलेल्या जागी मिळतील.”
आम्ही तिघे चकित होऊन त्या वहीच्या आधाराने बाकी स्तंभ शोधू लागलो. लवकरच आम्हाला १२ स्तंभ मिळाले. त्यांच्या मागचे १२ रखवालदार स्तंभदेखील मिळाले. केवळ पहिल्या वर्तुळातले १२ स्तंभ संगमरवरी होते. बाकीचे सारे रखवालदार स्तंभासारखेच दगडी. दहाव्या संगमरवरी स्तंभाच्या पुढे आम्ही फांदी रोवलेला तो हिफास्टसचा चौथरा ही दिसला. आता ती फांदी चौथऱ्यापासून काढून मी स्तंभवर्तुळाच्या केंद्रस्थानी रोवली.
आम्ही पुन्हा एकदा त्या चौथऱ्याजवळ जाऊन तिथे काही अजून माहिती मिळते का ते पाहू लागलो. एखादी कळ मिळण्याच्या आशेने मी चारही बाजूंना चाचपडून पाहिले. पण तिथे ओबडधोबड दगडी पृष्ठभाग सोडून बाकी काही नव्हते. जोसेफने चौथऱ्याच्या आजूबाजूची जमीन साफ करायला घेतली. पायानेच तो पालापाचोळा साफ करू लागला. तेवढ्यात जोसेफचा पाय कशात तरी अडकून पुन्हा एकदा तो क्लिक चा आवाज झाला आणि दगड घासल्याचा आवाज होऊन हिफास्टसचा चौथरा अजून वरती आला.
तिघेही आम्ही आश्चर्याने त्या चौथऱ्याकडे आणि एकमेकांकडे पाहू लागलो. जोसेफने जमिनीवरच्या गोल कडीतून आपला पाय सोडवला. मागच्या वेळेस जेंव्हा स्मिथ अडखळले होते तेंव्हा याच कडीला हिसका बसून हा चौथरा अर्धवट वरती आला असावा. जोसेफच्या पायात पुन्हा तेच कडे येऊन तो यांत्रिकी हिसका पूर्ण झाला होता.
“जोसेफ, हा दहाव्या स्तंभासमोर हिफास्टसचा चौथरा आहे. तसे बाकीच्या ११ देवतांचे चौथरे देखील इतर ११ स्तंभांपुढे असावेत.”, मी.
“हो, जर आपण स्तंभापासून त्या केंद्रस्थांच्या फांदीपर्यंत त्रिज्या काढली तर हा चौथरा स्तंभाच्या त्या त्रिज्येवर आतल्या बाजूस दिड मीटरवर आहे, त्याच प्रमाणे इतरही चौथरे या ठिकाणी असावेत.”, असे म्हणून स्मिथनी आपली बाही काढून त्यावर इतर चौथऱ्यांच्या खुणा निश्चित केल्या.
आम्ही पुन्हा एकदा स्मिथच्या भूमिती निर्देशानुसार त्या कड्या शोधू लागलो. जोसेफला दुसऱ्या स्तंभाच्या पुढे ती कडी सापडली. यावेळी हातानेच त्याने कडीला एक हिसका दिला. क्लिक आणि दगड घासल्याचा आवाज येऊन आणखी एक चौथरा वरती आला. आम्ही तिघेही ३ दिशांना पांगून त्या कड्या शोधू लागलो.
पुढची ५-१० मिनिटे फक्त क्लिक आणि दगड घसल्याचे आवाज येत होते. जवळपास अर्ध्या तासानी आम्ही पुन्हा एकदा केंद्रभागी त्या फांदीच्या जवळ जमलो होतो.
“एकूण अकरा चौथरे मिळाले पण १२ वा चौथरा नाही इथे.”, स्मिथ.
“होय, झ्यूसचा चौथरा मिळायचा बाकी आहे आपल्याला. मी सर्व चौथऱ्यावरचे शब्द आणि आकृत्या तपासून पाहिल्या. इतर सर्व देवतांची काव्ये आणि प्रतीके दिसली, पण झ्यूसचे विजेचे चिन्ह दिसले नाही. मी त्या १२ व्या स्तंभाच्या आजूबाजूला देखील पाहिले, पण वीतभर उंची असणाऱ्या एका चबूतऱ्याशिवाय तिथे काहीच नव्हते.”, जोसेफ.
मी विचार करत होतो काळाच्या मागे जाऊन. त्या काळी हा ज्ञानगर्भ सभामंडप जर वैचारिक आणि ज्ञानस्थापक चर्चा करण्यासाठी बनवला असेल, तर सभेच्या प्रमुखाची जागा ही मंडपाच्या केंद्रस्थानी असावी. झ्युस हा या देवतांचा देव होता, त्यामुळे तोच या सभेचा प्रमुखही असणार. म्हणजे त्याचा चौथरा हा आपण केंद्रस्थानी शोधूया. असा विचार करून मी त्या फांदीजवळ आलो. जोसेफ आणि स्मिथही माझ्यामागे मी काय करतोय ते पाहण्यासाठी आले. मी खुणेसाठी रोवलेली ती फांदी उचकटण्याचा प्रयत्न केला. पण ती फांदी जरा जास्तच घट्ट रोवली गेली होती. थोडा जोर लाऊन मी ती फांदी वर ओढली. योगायोगाने किंवा नशिबाने म्हणा, पण ती आमच्याकडून रोवताना त्या कडीतच रोवली गेली होती. ती फांदी बाहेर येताना तिने त्या कडीलाही हिसका बसला होता आणि अलगदपणे दगड घासल्याचा आवाज येऊन शेवटचा चौथरा बाहेर आला.
हा चौथरा इतर चौथऱ्यांपेक्षा वीतभर उंच होता. त्यावरचा पाचोळा साफ करून दिसलेल्या त्या विजेच्या आकृतीने तिघांच्याही चेहऱ्यावर एक समाधानाचे स्मितहास्य आले.
तेवढ्यात आकाशात विजेचा गडगडाट झाला. आकाशातून प्रचंड आवाज करत एक विजेचा लोळ त्या चौथऱ्यावर आदळला. त्या झंझावाती विजेने चौथऱ्याच्या बाजूच्या पाचोळ्यासकट आम्ही तिघेही उडून दूर जाऊन पडलो. चौथरा आता एकदम स्वच्छ दिसत होता. एकामागून एक असे १२ क्लिक आम्हाला ऐकू आले.
….. पुन्हा एकदा दगड घासल्याचे आवाज येऊन जमीन थरथरू लागली.
(पुढील भागावर जाण्यासाठी क्रमशः वर टिचकी मारा)
अरे व्वा, नवीन भाग..
अरे व्वा, नवीन भाग..
) त्यांना प्रोत्साहन मात्र देण्याचा प्रयत्न करते.
आता वाचते, मग परत प्रतिसाद देते.
मी स्वतः तर इतके सुसूत्र लिहित नाही, मग तुमच्यासारखे जे लिहितात ( आणि मी फुकट वाचते
चांगली चाललीय पण कोडी अगदीच
चांगली चाललीय पण कोडी अगदीच सोपी दिसताहेत. स्मिथचे नातलग इतकी शतके काय करत होते देव जाणे. जोसेफला आज जुनी वाटणारी भाषा तेव्हा रोजच्या वापरातली असणार.
छान सुरुय
छान सुरुय
धन्यवाद धनवंती !
धन्यवाद धनवंती ! तुमच्यासारख्यांच्या प्रोत्साहनामुळेच माझ्यासारख्या नवलेखकांना आणखीन भारी लिहिण्याची स्फूर्ती येते. असेच (फुकट) खूप वाचत रहा आणि आम्हाला प्रोत्साहन देत रहा
साधना आणि झकासराव : खूप खूप आभार
पण कोडी अगदीच सोपी दिसताहेत. स्मिथचे नातलग इतकी शतके काय करत होते देव जाणे. >>>> प्रचंड हसलो ही प्रतिक्रिया वाचून
मी स्वतः लिहिलं असून पण मला स्मिथच्या पूर्वजांच्या बुद्धीची कीव आली
but anyway ती कोडी सोपीच होती पण प्राचीन ग्रीक लिपीत लिहिल्यामुळे त्यांना सोडवता आली नाहीत.
छान! पुभाप्र!
छान! पुभाप्र!
मस्त!
मस्त!