
थरथरणाऱ्या जमिनीवरून चाचपडतच आम्ही आधारासाठी एकमेकांच्या जवळ आलो. कुठूनसा जोराचा वारा येऊन त्याने पाचोळा उडवीत अख्खा सभामंडप साफ केला. वेलींनी आच्छादित असलेल्या त्या आतील १२ स्तंभांना आग लागली होती. ती आगही वाऱ्याने विझवली. वेली जळून जाऊन आता त्या संगमरवरी स्तंभावरील उघड झालेली नक्षी फार सुंदर दिसत होती. जमिनीचा कंप अजूनही चालूच होता. भूगर्भात हालचाली वेग घेत होत्या. तेवढ्यात ११ देवतांचे चौथरे भंग पाऊन त्यातले दगड पुढे मागे होऊन त्यांनी आता सिंहासनाचा आकार घेतला होता. प्रत्येक सिंहासनाच्या पाठीवर त्या त्या देवतेचे चिन्ह कोरले होते. बाराव्या स्तंभासमोर जिथे एक चबुतरा होता, त्या चबूतऱ्यातून एक रत्नजडीत महासिंहासन वर आले. ते देखील १२ स्तंभाप्रमाणे संगमरवरी होते. त्या सिंहासनाच्या पाठीवर सोन्यात कोरलेले विजेचे चिन्ह होते. ते झ्युसचे, सभाप्रमुखाचे आसन म्हणून शोभत होते. आम्ही ज्या मध्यवर्ती चौथऱ्याजवळ थांबलो होतो तो चौथरा आता एका गोलमेजाच्या स्वरूपात बदलला होता. त्याचबरोबर अरण्याची पालापाचोळा, फांद्या, काटक्या आणि मातीनी झाकलेली जमीन जाऊन तिथे ग्रीक पद्धतीच्या फरश्या दिसू लागल्या होत्या. जमीन वरखाली होऊन त्या सभामंडपाला प्राचीन काळाचे रूप आले होते. आता जमिनीचा कंपही थांबला होता. प्राचीन काळी जेंव्हा देवता इथे जमून विचारमंथन करायच्या त्या काळी कदाचित सभामंडप असा दिसत असावा.
अजून एकदा विजेच्या गडगडाट आणि लखलखाट झाला आणि त्याचबरोबर आजूबाजूचे अरण्य अदृश्य झाले. त्या सभामंडपाच्या भोवती आता फक्त एक शुभ्र पांढरी पोकळी होती. ना आकाश ना जमीन, ना दिवस ना रात्र, ना भविष्यकाळ ना वर्तमानकाळ ना भूतकाळ अश्या अवकाशाच्या आणि काळाच्या सीमा नसलेल्या एका आभासी विश्वाच्या उंबरठ्यावर आम्ही उभे होतो.
“आपण कुठे आहोत ?”, स्मिथ एकदम अचंबित होऊन सभोवताली नजर टाकत म्हणाले.
“आपण तिथेच आहोत, त्या अरण्यात, कदाचित”, जोसेफ त्या जागेचा आढावा घेत बोलू लागला, “कदाचित कदाचित”
तोही जरासा गोंधळलेलाच होता, पण त्याच्या गोंधळलेपणात कुतूहल होतं. त्या सभामंडपातल्या प्रत्येक सिंहासनाच्या जवळ जाऊन त्यांचे बारकाईने निरीक्षण करत होता. सर्व सिंहासन निरखून जेंव्हा तो मध्यवर्ती मेजासमोर आला, तेंव्हा त्याने त्या मेजावर झालेल्या बदलाची निरीक्षणे सांगायला सुरू केले.
“ही १२ चिन्हे इथे नव्हती आधी. मला असे वाटते, प्राचीन काळी जेंव्हा या सभा भरल्या जात असाव्यात तेंव्हा प्रत्येक देवता या मेजावरच्या आपापल्या चिन्हासमोर येऊन ज्ञानार्पण करत असावेत. याच मेजावर आपल्याला पुढचा मार्ग मिळेल असे मला वाटते. कदाचित. ”
जोसेफला पहिल्यांदाच इतकं संभ्रमित झालेलं मी पाहिलं होतं. जोसेफला इतकी माहिती असून तो संभ्रमित झाला होता. आम्ही नुसते कयास बांधत होतो.
“जोसेफ माझा अंदाज असा आहे की आपण आपल्या खऱ्या वास्तवापासून तोडले जाऊन या आभासी विश्वात आलो आहोत आणि ह्या सभामंडपाचं कोडं सोडविल्याशिवाय आपल्याला आपल्या मूळ विश्वात परत जाता येणार नाही.”, मी केवळ अंदाज मांडू शकत होतो.
“मग आता ?”, स्मिथ त्या अनभिज्ञ विश्वात अडकण्याच्या चिंतेने म्हणाले.
“आता काय, सोडवूयात कोडी. संपूर्ण विश्वातील महान कूटप्रश्नकाराच्या विश्वात यापेक्षा आणखी वेगळं काय मिळणार.” - जोसेफ.
त्या मध्यवर्ती मेजावरच्या चिन्हांचे मी निरीक्षण करू लागलो. लंबगोलाकार आकाराच्या त्या मेजावर प्रत्येक देवतेची ११ चिन्हे होती आणि या सगळ्यांच्या मध्ये केंद्रात विजेचे चिन्ह होते. आतापर्यंच्या माझ्या जुजबी माहितीनुसार मला पोसाईडनचं त्रिशूळ, अफ्रोडाईटचे कबूतर, हिफास्टसचा हातोडा आणि झ्यूसचे विजेचे चिन्ह एवढेच ओळखता आले. बाकीच्या चिन्हांसाठी मी जोसेफकडे वळलो.
“महाशय, ही चिन्हे सांगाल का कोणाकोणाची आहेत ?”
तशी जोसेफने तो उभा होता तिथून मेजाभोवती गोल फिरत सर्व चिन्हांची माहिती द्यायला सुरुवात केली.
“हे पहा, हा मोर. हिरा म्हणजेच झ्यूसची पत्नी हिचे चिन्ह. विवाह आणि स्त्रीत्वाची देवी. हा त्रिशूळ, समुद्राचा देव पोसाईडनचे चिन्ह. हे गव्हाचे पीक म्हणजे शेतीची देवी डेमिटर, तिचे चिन्ह. हे घुबड, बुद्धीची देवता अथेनाचे चिन्ह. ही वीणा, सूर्य, संगीत आणि भविष्याचा देव अपोलोचे चिन्ह आणि हे धनुष्य, चंद्र, शिकारी आणि कौमार्याची देवी आर्टेमिसचे चिन्ह.”
जोसेफचे ग्रीक पुराणाबद्दलचे अगाध ज्ञान पाहून मी भलताच चकित झालो होतो. स्मिथदेखील आश्चर्य आणि कौतुक अश्या मिश्र भावनेने त्याच्याकडे पाहत होते. पण जोसेफचे आमच्याकडे लक्ष नव्हते. तो त्याच्या आवडीच्या विषयाची माहिती देण्यात गुंग होता.
“हा भाला, युद्ध आणि हिंसेचा देव एरिसचे चिन्ह. प्रेम, सौंदर्य आणि वासनेची देवी अफ्रोडाइट, तिचे हे कबूतर. ह्या हिफास्टसच्या हातोड्याबद्दल तर मी आधीच सांगितले आहे. हा मद्यप्याला डायनोससचा, मद्य, रंगभूमी आणि उत्सवाचा देव. आणि हा कॅड्यूसस, दुहेरी सर्प आणि पंख असलेला राजदंड, संदेश, व्यापार आणि प्रवासाचा देव हर्मसचे चिन्ह आणि हा सर्वात मध्यभागी सर्व देवतांच्या देवाचा झ्यूसचा विजेचा लोळ.”, असे म्हणून उत्साहाच्या भरात त्याने त्या विजेच्या चिन्हावर हात ठेवला.
मला जोसेफचे विशेष कौतुक करावेसे वाटले. इतिहास, पुराण यांचा त्याचा अभ्यास भलताच विस्तृत होता, हे मी आज प्रत्यक्ष पाहिले. मला जोसेफला काहीतरी विचारायचे होते पण जोसेफने हात ठेवलेला विजेचा लोळ अचानक पिवळ्या रंगात चमकू लागला. तसे आम्ही तिघे तिकडे पाहू लागलो. जोसेफने हात उचलला पण तो विजेचा लोळ अजूनच तेजस्वी होत गेला. त्यातून आता हलकासा पिवळा धूर येऊ लागला आणि आमच्या डोक्यावरती नसलेल्या आकाशात आणखी एकदा विजांचा गडगडाट झाला. आम्ही एकमेकांकडे पाहू लागलो. जोसेफने विजेवर हात ठेवल्यामुळे कदाचित त्या सभामंडपातील कोडे कार्यान्वित झाले होते. आम्ही काय होत आहे याचा अंदाज घेत होतो तोवर एका धीरगंभीर आवाजात एक आकाशवाणी झाली.
त्यांच्या पवित्र जागी, देवांच्या हृदयात वसलेल्या,
अगम्य भाषांनी लपवलेल्या, संकेताचे ज्ञान,
काळाच्या पलीकडून या सभामंडपात प्रस्थापित होईल,
तेंव्हाच नवीन ज्ञानाचे दरवाजे उघडतील.
नवीन कोडं ! मेंदूला नवा खुराक मिळाल्याने मी आणि जोसेफ उत्साहित झालो. स्मिथ जरासे बुचकळ्यात पडले होते. तसा आम्हालाही त्या आकाशवाणीचा अर्थ तितका स्पष्ट झाला नव्हता पण आधी कधीही न पाहिलेले काहीतरी गूढ पाहायला मिळणार म्हणून आम्ही आतुर होतो.
“देवांचे हृदय, अगम्य भाषा आणि संकेताचे ज्ञान यांचा परस्पर संबंध काय असू शकतो !”, स्मिथनी त्यांच्या डोक्यातील गोंधळ बोलून दाखवला.
“तेच तर शोधायचे आहे, मि. स्मिथ. मला या आकाशवाणीतून सध्या इतकेच समजले की आपल्याला कुठूनतरी काहीतरी या सभामंडपात आणायचे आहे.”, जोसेफकडे वळून मी म्हणालो, “जोसेफ तुला काय वाटते ?”
“मलाही तसेच वाटते, आपल्याला इकडे काहीतरी आणायचे आहे. पण ते काय आणि कुठून आणायचे हे आपल्याला शोधावे लागेल.”
एव्हाना त्या विजेच्या चिन्हातून येणारा पिवळा धूर बंद झाला होता आणि ते चिन्हही आपल्या मूळच्या दगडी कोरलेल्या स्वरूपात परत आले होते. माझ्या डोक्यात एक विचार आला. जोसेफने जेंव्हा त्या विजेच्या चिन्हावर हात ठेवला तेंव्हा हे कोडे कार्यान्वित झाले होते मग बाकीच्या चिन्हावर हात ठेऊन कदाचित बाकीची कोडीसुद्धा काही बोलतील, या विचाराने मी माझ्या समोरच्या काही चिन्हांवर हात ठेऊन पाहिला. पण आजूबाजूची हवादेखील हलली नाही. बहुधा जोसेफच्या स्पर्शात काही विशेष असावे म्हणून त्यालाही हात ठेवायला सांगितला. त्यानेही काही झाले नाही. आणि तसेच स्मिथसोबतही झाले. आम्ही आता दिशाहीन झालो. जोसेफ इकडे तिकडे पाहत होता.
“डॅनी, मी थोड्या वेळापूर्वी जेंव्हा त्या प्रत्येक सिंहासनाच्या जवळ जाऊन पाहत होतो, तेंव्हा तिकडे देखील मला अशीच चिन्हे दिसली होती. कदाचित त्या चिन्हावर हात ठेवून काही मार्ग मिळेल.”, जोसेफने नवी कल्पना मांडली.
आम्ही पुन्हा त्या हिफास्टसच्या सिंहासनाजवळ गेलो आणि हातोड्याच्या चिन्हावर हात ठेवला पण काहीच झालं नाही. त्याच्याच शेजारी असलेल्या आफ्रोडाईटच्या कबुतरावर पण हात ठेऊन पाहिले, पुन्हा तेच. आम्ही पुन्हा एकदा दिशाहीन झालो.
“त्यांच्या पवित्र जागी, देवांच्या हृदयात म्हणजे कदाचित आपल्याला या प्रत्येक देवतेच्या पवित्र ठिकाणी, जिथे अजूनही त्यांचा वास आहे, अश्या ठिकाणी जाऊन काहीतरी आणायचे असावे.”, माझ्या डोक्यात अचानक चमकलेला विचार मी सांगितला.
“या हिफास्टसची पवित्र जागा म्हणजे त्याचे मुख्य मंदिर अथेन्समध्ये आहे.”, जोसेफ.
“पण आपण तिकडे जाणार कसे ? आपण तर या अनभिज्ञ विश्वात अडकलो आहोत. तुमच्या म्हणण्याप्रमाणे इथले कोडे सोडवल्याशिवाय आपण बाहेर पडू शकत नाही आणि बाहेर पडून ते संकेताचे ज्ञान आणल्याशिवाय इथले कोडे सोडवू शकत नाही. हे म्हणजे कोंबडी आणि अंड्याच्या कोड्यासारखे एकमेकांत गुंतलेले कोडे झाले.”, स्मिथनी आणखी एक मोठा प्रश्न उपस्थित केला.
आता हा पेच कसा सुटणार ! या समस्येचे निराकरण कसे करायचे या विचारात आम्ही पडलो. टॅक्सीतून उतरल्यापासून आम्ही विश्रांतीच घेतली नव्हती. तहानही लागली होती. थोडे दमायलाही झाले होते. त्यातून आम्ही त्या शुभ्र धवल पोकळीत असल्यामुळे दिवस की रात्र चालू आहे हेही कळत नव्हते. ह्या कोड्याने झपाटलेल्या आमच्या मेंदूला आत्तापर्यंत न झालेली दमल्याची जाणीव आता दिशाहीन झाल्यामुळे होऊ लागली होती. आपापल्या बॅगातून बाटल्या काढून आम्ही घसा ओला करण्याइतपत घोटभरच पाणी प्यालो. अजून किती वेळ इथे अडकलेले राहणार आहोत याचा अंदाज नसल्याने पाणी पुरवून प्यावे लागणार होते.
स्मिथ थकून आता हिफास्टसच्या सिंहासनासमोर असलेल्या पायरीवरच फतकल मारून बसले. मीही पुढचा मार्ग कसा शोधायचा हा विचार करत, त्यांच्या शेजारी बसलो. जोसेफ मात्र त्या सिंहासनाचे अजून निरीक्षण करत होता. कुठेच काही कळ, खटका, कडी किंवा एखादे पुढचा मार्ग दाखवणारे कोडे, यापैकी काहीच न मिळाल्यामुळे तोही हताश होऊन त्या सिंहासनाला पाठ टेकून सभामंडपाकडे नजर टाकत बसला. आपल्या खांद्यावरच्या बॅगेतून त्याने एक सिगारेट काढली.
मी आश्चर्याने जोसेफकडे पाहू लागलो. माझ्यासाठी हे नवीन होते. जोसेफला मी गेल्या ७-८ वर्षांपासून ओळखत होतो. माझ्याकडे आलेल्या फादर फर्नांडिसांच्या खुनाच्या केस पासून. तो मला इतिहास, पुराण, शास्त्र इत्यादिशी संबंधित केसेस मध्ये मदत करायचा. फादर फर्नांडिस यांच्या मृतदेहाच्या हातात बायबल होते आणि त्यावर लॅटिनमध्ये काही सांकेतिक मजकूर लिहिला होता. त्याचा अर्थ समजून घेण्यासाठी मी भाषातज्ञांचा शोध घेत होतो, तेंव्हा आमची प्रथम भेट झाली होती. अगदी त्या केसपासून ते आज लिओ ऑप्टसपर्यंत तितक्याच उत्साहाने तो मला मदत करत होता. इतक्या वर्षांच्या ओळखीत त्याला मी आज प्रथमच सिगरेट हातात घेतलेला पाहत होतो.
“जोसेफ ?”, मी प्रमाणाबाहेर डोळे मोठे करत आश्चर्यांने बोललो, “ह्या सवयी कधी लागल्या तुला ?”
थोडासा ओशाळल्यागत होऊन जोसेफ म्हणाला, “नुकतीच लागलेली सवय आहे ही, डॅनी. गेल्या ३-४ महिन्यांपासून. तसा मी नेहमी नाही ओढत सिगारेट, पण जेंव्हा खूप जास्त ताण येतो आणि काहीच सुचेनासं होतं तेंव्हा हात आपसूकच इकडे जातात.”
हातातली सिगारेट तोंडात धरून ती शिलगावण्यासाठी त्याने लायटर काढला. लायटर तोंडाच्या जवळ नेत त्याने लायटरचा खटका ओढला आणि त्या लायटरची आग ऊर्ध्वगामी जाण्याच्या ऐवजी हिफास्टसच्या सिंहासनाकडे ओढली गेली. मी ते पाहून चकित झालो. कदाचित वाऱ्याने असे झाले असावे असे वाटून, त्याने दुसऱ्या हाताचा आडोसा करत पुन्हा लायटर पेटवला. पुन्हा तेच !
जोसेफच्या डोळ्यात मला आता चमक दिसली. स्मिथ वळून काय प्रकार चालू आहे ते पहात होते. त्यांना समोरच्या पायरीवरून सरकवत जोसेफ गुडघ्यावरच बसून त्या सिंहासनाच्या समोर आला. हातातली सिगारेट पुन्हा त्याने बॅगेत ठेवली आणि लायटर दोन्ही हातानी सिंहासनाच्या समोर धरून पेटवला. लायटरमधून पेटलेल्या अग्नीतून एक ज्वाला त्या सिंहासच्या पायाशी असलेल्या एका अग्नीच्या चिन्हाकडे ओढली जाऊन गायब झाली. जोसेफ त्या चिन्हाचे जवळ जाऊन निरीक्षण करणार इतक्यात ते चिन्ह पेटले.
आम्ही तिघे त्या सिंहासनापासून थोडे दूर झालो. हळूहळू ती आग वाढत जाऊन संपूर्ण सिंहासनाने पेट घेतला. पुन्हा एकदा भूगर्भातून ती दगडी हालचाल सुरू झाली आणि हिफास्टसचे सिंहासन जमिनीतून वरती येऊन आमच्या उंचीपेक्षाही उंच झाले. समोर दिसणाऱ्या सिंहासनाच्या दगडावर आता आगीने रेखाटलेले हातोड्याचे चित्र उमटले. त्या हातोड्याच्या भोवती साधारणपणे ५-६ फूट उंचीचा उभा आयत दिसू लागला, आणि दुसऱ्याच क्षणाला त्या आयताचे दोन भाग होऊन दरवाज्यासारखी ती भिंत आतल्या दिशेने उघडली गेली. दरवाज्याच्या समोरून काही दगड पुढे येऊन तिथे चार पायऱ्यांनी आत जाण्याचा मार्ग दाखवला. त्यासरशी ती आग पूर्णपणे विझली, जणू काही हिफास्टस आम्हाला पुढचा मार्ग दाखवून प्रवेश करण्यास आमंत्रित करत होता.
“जोसेफ, काय विचार आहे ? आत प्रवेश करायचा की ही एक फसवी खेळी आहे कोड्यातली ?”, मी जोसेफकडे पाहत म्हणालो.
जोसेफ त्या दरवाज्याचे निरीक्षण करत होता. त्याने पुन्हा एकदा लायटर पेटवला. यावेळी आग दरवाज्याकडे ओढली नाही गेली. लायटर आपल्या खिशात परत ठेवत तो बोलू लागला, “ यावेळी अग्नी ओढला नाही गेला म्हणजे हे प्रवेशद्वाराचे कोडे पूर्ण कार्यरत झाले आहे. त्यामुळे मला वाटते आपण इथे प्रवेश करून, पुढच्या मार्गाला लागू शकतो.”
“आणि तसेही पण इथे सभामंडपात अडकून राहिलोच आहोत, तर इथे बसून राहण्यापेक्षा इकडे दरवाज्यातून आत जाऊन पाहूयात. कदाचित हिफास्टसच्या संकेताचे ज्ञान इथेच आत दडले असावे.”, स्मिथ बऱ्याच वेळाने काहीतरी हुशारीचं बोलले.
धाडस करून आम्ही तिघांनीही एक एक करून त्या दरवाज्यात प्रवेश केला. आत प्रवेश करताना आम्हाला थोडेसे उबदार जाणवले होते. थोड्या वेळापूर्वी लागलेल्या आगीमुळे ते दगड गरम झाले असावेत. आतमध्ये प्रवेश केल्यावर काही क्षण आम्हाला काहीच दिसत नव्हते. सर्वत्र फक्त अंधारच होता. पण प्रकाशातून अचानकपणे अंधारात किंवा अंधारातून प्रकाशाकडे गेल्यावर डोळे दिपतात तसे काहीसे झाले होते. काही क्षण गेल्यानंतर डोळे आता अंधाराला सरवू लागले आणि त्या काळोखात अंधुक अंधुक आम्हाला दिसू लागले.
इतक्यात आम्ही जिथून आत आलो त्या बाजूने दगड सरकून दरवाजा बंद झाल्याचा आवाज आला. हा फसवा दरवाजा होता का ? आता या अंधार कोठडीत आम्ही अडकून राहणार की काय ? या भीतीने आमची गाळण झाली. त्या अंधारातही आम्ही एकमेकांचा हात धरून होतो, एवढीच काय ती आधाराची भावना. हळू हळू आम्ही पुढे सरकू लागलो. जोसेफ पुढे होता आणि त्याच्या मागे त्याच्या खांद्याला धरून मी आणि स्मिथ चालत होतो. आता त्या अंधुक जागी आम्हाला दगडी भिंती दिसू लागल्या आणि हा एक भुयारी मार्ग सरळ कुठेतरी जातोय असा अंदाज आला.
आम्ही पुढच्या दिशेने पाऊल टाकतो ना टाकतो तोच, पुन्हा एकदा एक क्लिक ऐकू आला. आता काय नवीन हालचाल होते, कोणता नवीन दरवाजा उघडणार की या भुयारात आम्ही भरडले जाणार या कल्पनेने काळजात धस्स झाले.
पुन्हा एकदा दगड घासल्याचा आवाज आला आणि…..
ऊत्कंठावर्धक आहे. भराभर पुढचे
ऊत्कंठावर्धक आहे. भराभर पुढचे भाग येऊ द्या.
शेरलॉक होम्स वाचताना एकदम
शेरलॉक होम्स वाचताना एकदम हॅरी पॉटर ची पाने सुरू झाली असे वाटले.. दोन्ही आवडते, त्यामुळे हा भाग पण आवडलाच. लिहित रहा.
हा भाग पण छानच!
हा भाग पण छानच!
गोष्ट छन रंगवून लिहिता आहात.
गोष्ट छन रंगवून लिहिता आहात. पुढचे भाग्त लवकर येऊ द्यात.
शक्य अस्ल्यास मूळ पुस्तकाचे नाव सांगा. धन्यवाद.
सर्वांचे मनापासून आभार साधना,
सर्वांचे मनापासून आभार साधना, धनवंती, आबा आणि नंद्या !
@नंद्या: मूळ पुस्तक कुठले ? मी स्वतः लिहितोय कथा, अनुवादित नाहीये.