लिओ ऑप्टसची दंतकथा (भाग तिसरा) : एडविनचे पलायन

Submitted by यःकश्चित on 9 July, 2025 - 14:30

प्रकरण तिसरे

एडविनचे पलायन

----------------------------------------------------------------------------------------------------------------

“आता काय करायचं ? या स्मिथनी तर मोठाच गेम केला आपल्यासोबत.”, जोसेफ चिडून म्हणाला.

तशी काहीअंशी कल्पना होतीच आम्हाला, कारण आमचा हस्तक्षेप दोघांनाही आवडला नव्हता. नाईलाजाने आमच्यासमोर संमती दाखवल्यासारखे भासवून आमच्या मागे त्यांनी आपला हेतू पूर्ण केला होता.

“ मला वाटते त्यांना पुढील रहस्यभेद झाला असावा. ”, मी म्हणालो.

“ पण हे बुद्धिहीन जीव पुढच्या टप्प्यावरचे कोडे कसे सोडवणार आहेत. दंतकथेप्रमाणे जर ही खरीच शृंखला असेल तर येणाऱ्या टप्प्यांवरती कोडी अधिक जटिल होत जातील. त्यावेळी त्यांना नक्कीच कोणा बुद्धिवंताची मदत लागेल. ” - जोसेफ

“ होय जोसेफ, सगळे खरे आहे. पण सध्याच्या स्थितीला आपण काय करू शकतो !”

जोसेफ जरा बेचैन झाला होता. खजिना मिळणार नाही म्हणून नाही पण त्याच्या बुद्धिचातुर्याला चालना देणारी गोष्ट बऱ्याच दिवसांनी मिळाली होती आणि ती अशी हातातून जाताना पाहून त्याच्या मनाला आतून फार क्लेश होत होते. हताश होऊन आपली हतबलता कशावर तरी काढण्यासाठी समोर असलेल्या दरवाज्याला त्याने जोरात बुक्की मारली.

.. आणि तेवढ्यात त्याला कुणाच्या तरी विव्हळण्याचा आवाज आला.

आम्ही चकित होऊन इकडे तिकडे पाहू लागलो. आणखी एकदा तो आवाज आला. आम्हाला तो घरच्या आजूबाजूने येत असावा असे वाटले म्हणून आम्ही घराच्या सभोवताली त्या आवाजाचा उगम शोधू लागलो. स्मिथच्या घराबाजूला बरेच गवत वाढले होते. त्याच्या मागे कुणी आहे का हे पाहण्यासाठी आम्ही थोडे गवत बाजूला सारले पण पुन्हा एकदा विरुद्ध दिशेने आम्हाला तोच आवाज आला. आता आवाज थोडा ओळखीचा वाटू लागला होता. घराच्या मागे थोडी अडगळ साचली होती तिकडे जाऊन आम्ही आवाजाचा मागोवा घेतला. पण हेही प्रयत्न निष्फळ ठरले.

इतक्यात जोसेफला काय सुचले काय माहित, त्याने खिडकीला कान लावून पाहिले. आवाज घराच्या आतून येत होता. पण घराला तर बाहेरून भले मोठे कुलूप होते. आज मध्ये जाऊन पाहणार कसे !

जोसेफचा खुरापती दिमाख अश्यावेळी बरोबर चालतो. त्याने जवळच गवतात पडलेला एक दगड उचलला आणि खिडकीच्या दिशेने भिरकावला. फुटलेल्या काचेतून हात घालून त्याने ती खिडकी उघडली आणि आम्ही दोघांनीही त्या खिडकीतून घरात प्रवेश केला.

स्मिथच्या दिवाणखान्याप्रमाणे इतरही खोल्या तितक्याच अस्वच्छ होत्या. बहुतेक त्यांच्या घरचा नोकर एडविन कोडी सोडवणे सोडून इतर कोणत्या कामात मदत करत नसावा.

“मिस्टर स्मिथ ! एडविन !”, आम्ही जोरजोरात हाका मारल्या. पण उत्तरादाखल फक्त विव्हळणेच ऐकू आले.

त्या विव्हळण्याचा मागोवा घेत आम्ही स्मिथ यांच्या बेडरूममध्ये गेलो. ह्या असल्या घाणेरड्या बेडवरती स्मिथ कसे झोपत असावेत हा विचार करून मी मनातल्या मनात “व्याक” केले. टेबल लँपच्या बाजूच्या कोपऱ्यात मि. स्मिथ मुटकुळं करून पडले होते. त्यांच्या डाव्या कानाच्या मागून रक्ताचा एक ओघळ खांद्यावरून डाव्या अंगावर पसरला होता.

“ मि. स्मिथ, तुमचे असे हाल कुणी केले ?”, जोसेफने आश्चर्यचकित होऊन विचारले. त्याच्या चिडचिडीची जागा आता आश्चर्याने घेतली होती.

“ पाणी”, स्मिथ कण्हतच म्हणाले, “ थोडं पाणी देता का ?”

मी स्वयंपाकघरात जाऊन पाण्याचा ग्लास घेऊन आलो. पाणी पिऊन स्मिथ थोडे सावरून बसले. इतकं वेळ रक्त वाहून गेल्यामुळे ते जरा अशक्त वाटत होते. पाणी पिऊन त्यांना जरा बरे वाटले.

“ स्मिथ कोणी मारलं तुम्हाला ? आणि एडविन कुठाय?”, मी.

“नाही माहीत ! आज सकाळी आठच्या दरम्यान उठलो तेंव्हा एडविनने नेहमी प्रमाणे मला कॉफ़ी बनवून दिली. वर्तमानपत्र वाचत मी कॉफी संपवून एडविनला कप नेण्यासाठी हाक मारणार होतो इतक्यात मागून कोणीतरी माझ्या डोक्यावर प्रहार केला. त्या हल्लेखोराने इतक्या जोरात प्रहार केला की मी तत्काळ बेशुद्ध झालो. जेंव्हा मला शुद्ध आली तेंव्हा मी या कोपऱ्यात पडून होतो. माझ्या अंगात एडविनला हाक मारण्याचे देखील त्राण नव्हते. अर्धा तास मी असच पडून राहिलो. तेवढ्यात मला दरवाज्यावर थाप ऐकू आली.”

“ ती मी तुमच्या दारावरचं भलं मोठं कुलूप पाहून त्राग्याने मारलेली बुक्की होती”, जोसेफने दाराच्या पलीकडची माहिती सांगितली.

“ कुलूप ?”, डोळे शक्य तितके मोठे करत स्मिथनी अचंबा व्यक्त केला, “मग तुम्ही आत कसे आलात?”

“ त्या पलिकडच्या खिडकीतून”

“ आणि मग एडविन कुठे आहे ?”, पुन्हा प्रश्न !

“ ही माहिती तुम्ही आम्हाला देणार, स्मिथ”, मी.

स्मिथ आता बऱ्यापैकी सावरले होते. मला अचानक लक्षात आले की स्मिथची डोक्यामागची जखम अजून उघडीच आहे. मी ती जखम थोडीफार साफ करून त्यांच्या कपाटाच्या हॅंडलवर लटकणारा कापडाचा तुकडा त्यांच्या डोक्याला बांधला.

“चला, स्मिथ आपण बाहेर बसूया”
त्यांच्या बेडरूमच्या मानाने दिवाणखाना कमी घाण होता.

आम्ही दोघांनी त्यांना हाथ धरून उठवून हळू हळू बाहेरच्या सोफ्यावर बसवले. स्मिथच्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह अजूनच ठळक झाले होते.

“ हां तर स्मिथ, हा एडविन कुठे गायब झालाय ? आणि तुम्ही सकाळी कॉफी पिताना एडविन काय करत होता ? आणि तुम्हाला कॉफी देताना त्याचा मूड कसा होता ?”, आता माझ्यातला डिटेक्टिव जागा झाला होता.

“नेहमीसारखाच ! कदाचित तो रोजच्याप्रमाणे स्वयंपाकघरात साफसफाई करत असावा. आणि माहिती नाही !”, त्यांनी माझ्या प्रश्नाची उत्तरे उलट क्रमाने दिली होती.

“जोसेफ, स्मिथच्या डोक्यावर कशानेतरी प्रहार केला असेल ना ! चल आपण ती वस्तू शोधू”, मी जोसेफकडे पाहत म्हणालो.

“शोधायची कशाला ही काय इथेच आहे.”, टेबलावरच्या फुलदाणीकडे बोट दाखवत तो म्हणाला. त्या फुलदाणीवर रक्ताचे खूप बारीक शिंतोडे दिसले. हल्लेखोराने फुलदाणी साफ केली होती पण त्याला कसलीतरी घाई असावी, त्याने फुलदाणी व्यवस्थित साफ केली नाही आणि फुलदाणीच्या एकदम खालच्या बाजूला बारीक डाग तसेच राहिले होते.

“ वाह जोसेफ, माझ्यासोबत राहून तुझ्यातही एक गुप्तहेर तयार होतोय बरं का !”

“ माझ्यातही तुझ्याएवढीच बुद्धी आहे बरं ! फक्त तू तुझी बुद्धी गुन्ह्याच्या संदर्भात निरीक्षण करण्यात वापरतोस आणि मी माझी बुद्धी कोडी सोडवण्यात आणि नवीन भाषा शिकण्यात वापरतो.”

जोसेफच्या चतुर उत्तरावर मी फक्त एक स्मितहास्य केलं आणि आपला मोर्चा पुन्हा स्मिथ यांच्याकडे वळवला.

“ तर मि. स्मिथ, एडविन कुठे गायब झाला ?”

“खरंच काही कल्पना नाही. सहसा तो असा विचित्र कधीच वागत नाही. पण आज कोण जाणे, न सांगता कसा गायब झाला !”

“ओह आय सी !”, मी अचानक काहीतरी आठवून म्हणालो, “मि. स्मिथ, ती तुमच्या पूर्वजांची पेटी कुठे आहे ?”

“जिथे मी मुटकुळं करून पडलो होतो, तिथेच बाजूच्या टेबलाच्या कप्प्यात आहे”

स्मिथचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच जोसेफ आत पळाला होता आणि त्याने आतून आवाज दिला- “पेटी इथे नाहीये”

“म्हणजे नक्कीच एडविन पेटी घेऊन पळून गेला.”, माझ्या डोक्यात विचारचक्रे चालू झाली.

“स्मिथ मला सांगा, आम्ही गेल्यानंतर काल तुमचं आणि एडविनचं काय बोलणं झालं ?”

“तसं विशेष काही बोलणं नाही झालं ! तुमच्या जाण्यानंतर आम्ही दोघांनी एकत्र बसून त्या १३ व्या कोड्यावर विचार करत होतो. ‘या मजपाशी’ म्हणजे नेमकं कुठे जायचंय हे शोधत होतो. आम्हाला दोघांनाही काही सुचेना. एकतर या ग्रीक पुराणकथांचा माझा फारसा अभ्यास नाही, आणि या बारा देवतांबद्दलही तशी फारशी माहिती नव्हती आम्हाला. त्यामुळे ग्रीक मंदिरे आणि स्मारके यावर आम्ही गूगल करून पाहिले. पण गुगलवर ठोस असं काहीच मिळालं नाही. तोपर्यंत सात वाजायला आलेले. मग मी एडविनला रात्रीच्या जेवणाची व्यवस्था करायला सांगितली. तो जेवण बनवून आणेस्तोवर मी माझा गूगलवरचा शोध तसाच चालू ठेवला. मला काही जागा मिळाल्या जिथे आपल्याला पुढचा मार्ग मिळू शकतो. जसे की माउंट ऑलिम्पस -”

“हा ग्रीसमधील सर्वात उंच पर्वत आहे, आणि इथे या बारा देवतांचं वास्तव्य आहे, असं मानलं जातं. ट्रेकिंगसाठी आजही ही एक प्रसिद्ध जागा आहे. जो या पर्वताच्या शिखरावर पोहोचतो, त्याला या बारा ऑलिम्पियन गॉड्सचा आशीर्वाद मिळतो असे म्हणतात. ”, जोसेफने या जागेची विस्तृत माहिती दिली.

“ होय, आणि दुसरी जागा मिळाली ती म्हणजे ‘ऑलिम्पियन झ्यूसचे मंदिर’ (temple of Olympian Zeus) हा zeus म्हणजे सर्व देवतांचा देव, ज्याची उपासना केल्याने त्याच्यासोबत बाकीच्या सर्व देवतांदेखील प्रसन्न होतात.”

“पण या मंदिराची उभारणी सहाव्या शतकात सुरू झाली, आणि आपले लिओ ऑप्टस हे इसवीसन पूर्व पाचव्या शतकातले. लिओ ऑप्टसना या मंदिराबाबत कसे माहिती असणार जे अजून बांधलेच गेलेले नाही. त्यामुळे हे मंदिर आपला पुढचा मार्ग असू शकत नाही, जोसेफने महत्वाची माहिती दिली.

मला पुन्हा एकदा जोसेफच्या बुद्धीचे कौतुक वाटले.

“अच्छा ! मग हे मंदिर आपला पुढचा मार्ग नाही. आणि ही एक शेवटची जागा मिळाली, ती म्हणजे ‘डिलोझ आयलंड’ (delos island). हे अपोलो आणि आर्टेमिस चे जन्मस्थान. ग्रीक सायक्लेड्स बेटांच्या समूहातील एक सर्वात पवित्र बेट. इथेच लेटोने पोसाईडनच्या मदतीने अपोलो आणि आर्टेमिसना जन्म दिला. पण इथल्या सूर्यप्रकाशात चमकणाऱ्या कोरड्या भग्नावशेषात भरलेल्या गूढतेमुळे आजही इकडे फारसे पर्यटन नाही.”

“त्याच कारणामुळे आपल्याला हवा असलेला खजिना किंवा पुढचा मार्ग इथे असू शकतो.”, मी तर्क लावला.

“वाह! उपयोगी जागा शोधल्या आहेत, मिस्टर स्मिथ. माउंट ऑलिम्पस आणि डिलोझ आयलंड या दोन्ही तितक्याच शक्य जागा आहेत, पुढचा मार्ग सापडण्यासाठी. पण आपल्याला यातून एक निवडावी लागेल आणि त्या जागी - ”

“एक मिनीट - आणि मि. स्मिथ, तुम्ही जेवताना या जागांची माहिती एडविनला दिली, आणि खजिन्याच्या मोहापायी एडविन तुम्हालाच बंदिस्त करून एकटाच पुढे गेला असावा.”, मी जोसेफचे वाक्य तोडत कालच्या घटनांचा अंदाज मांडला.

“हो, मी ही माहिती एडविनला सांगितली खरी, पण मला वाटत नाही की तो असे काही करेल. इतक्या वर्षांपासून तो आमच्याकडे नोकर आहे. तसेच त्याच्या मागच्या कित्येक पिढ्या स्मिथ कुटुंबाच्या सेवेत निष्ठेने कार्यरत आहेत. मग आता एडविन असा का वागेल ?”, स्मिथनी त्यांचे मत मांडले.

“तुमच्या बोलण्यात तथ्य आहे, पण मि. स्मिथ कोणाची बुद्धी कधी फिरेल काही सांगता येत नाही. संपत्तीच्या मोहापायी कित्येक जणांनी आपल्या जवळच्याच लोकांचा खून केल्याच्या बऱ्याच केसेस मी पाहिल्या आहेत. त्यामुळे सध्या काही पुरावा नसला तरी ही शक्यता आपल्याला नाकारता येत नाही.”, अचानक काहीसे आठवून मी म्हणालो, “स्मिथ, तुम्ही जेंव्हा एडविनला ही माहिती दिली, तेंव्हा त्याच्या दृष्टीने कोणती जागा त्याला जास्त सूचक वाटली ?”

“अं… कदाचित माउंट ऑलिम्पस त्याला पुढचा टप्पा वाटलेला असू शकतो. कारण बाकीच्या दोन जागांची माहिती ऐकताना तेवढा उत्सुक तो वाटला नाही.”, स्मिथ बोलता बोलता काहीतरी आठवायचा प्रयत्न करत होते.

“म्हणजे एडविन माउंट ऑलिम्पस कडे रवाना झालेला आहे”, जोसेफने माझ्या अंदाजाला हाती धरून शिक्कामोर्तब केले.

आता माझ्या डोक्यात घटनाक्रम पुन्हा पुन्हा चालत होता. हे स्मिथ खरं बोलत असावेत का हाही विचार आला माझ्या डोक्यात. पण त्यांच्या डोक्यावर झालेली जखम तरी खरी होती. जर एडविनने स्मिथना खरेच दगा दिला असेल. स्मिथ खोट्या कहाणीसाठी आपल्या डोक्यावर मारून घेऊन खरी जखम तर नक्कीच करणार नाहीत. पण मग हा पठ्ठ्या एडविन नक्की कुठे गायब झाला होता !

जोसेफ पुन्हा एकदा आपल्या उचापत्यांमध्ये मग्न झाला. आतल्या खोलीत जाऊन काहीतरी शोधून आला होता , पण त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट निराशा दिसत होती. आतल्या खोलीतून बाहेर येत येत त्यानें माझ्याकडे पाहत विचारले,
“डॅनी, तुलादेखील काल काहीतरी मिळाले होते ना !”

“ हो, काल रात्री घरी गेल्यावर ग्रीसमधल्या माझ्या काही स्थानिक मित्रांना कॉल लावला आणि ऑलिम्पियन गॉड्स बद्दल काही माहिती मिळते का ते पाहायला सांगितले. तसेच तुम्ही जशी मंदिरे आणि स्मारके शोधत होतात तशी कोणती जागा मिळते का पहा म्हणून सांगितले.”

“ मग काही माहिती दिली त्यांनी ?”, जोसेफ.

“ हो दिली ना, त्यामुळेच मी तुला सकाळी कॉल केला. त्यांनीदेखील याच मंदिरांची माहिती दिली. पण एका मित्राने सर्वांपेक्षा वेगळी एक जागा सांगितली. ‘ऑलिम्पियन ज्ञानगर्भ सभामंडप’ (Olympian Gnosis Stoa)”

“नाव ऐकूनच इथे काहीतरी गूढ असावं असं वाटतं”, जोसेफ.

“अथेन्सच्या उत्तरेला सुमारे ४० ते ५० किमी अंतरावर ‘Eluesis’ नावाचं एक छोटसं गाव आहे. त्या गावच्या पश्चिम सीमेवर हा सभामंडप आहे. त्या गावच्या स्थानिक पुराणानुसार पूर्वीच्या काळी जेंव्हा या धरतीवर देवतांचं वास्तव्य असायचं तेंव्हा ऑलिम्पियन देवता इथे एकत्र जमायच्या आणि जगाच्या गूढ संतुलनावर चर्चा करण्यासाठी जमायच्या. त्याच स्थानिक पुराणाच्या एका अध्यायात असे सांगितले आहे की मानवी जीवनावर परिणाम करणाऱ्या आणि त्यांना दिशा दाखवणाऱ्या महत्वाच्या ज्ञानश्रृंखलांची रचना देखील इथेच झाली. या सभामंडपात पूर्वी एकूण १४४ स्तंभ होते, पण कालौघात कुणी इकडे फारसं लक्ष नाही दिलं आणि देखभालही केली नाही. त्यामुळे आता तिथे फक्त ६० स्तंभ शिल्लक राहिलेत.”

“ पण मग ग्रीक सरकार किंवा ग्रीक पुरातत्व खात्याने या जागेकडे का पाहिले नाही ? ”, जोसेफने शंका व्यक्त केली.

“ कारण ह्या जागेचं महत्व फक्त तिथल्या गावच्या स्थानिक पुराणापुरतेच मर्यादित असल्या कारणाने बाहेरील लोकांचे इकडे लक्ष गेले नाही.

“ अच्छा”, जोसेफने पुढची गणिते मोजायला घेतली, “ मग आता पुढे काय करायचं ? delos island ला जायचं की gnosis stoa?”

“ मला वाटते आपण दोनही जागा पाहूयात, पण मला विचाराल तर हा ज्ञानगर्भ सभामंडप मला जास्त सूचक वाटतोय. तिकडे आपल्याला पुढचा मार्ग मिळण्याची शाश्वती जास्त आहे. एकतर ही जागा जास्त प्रसिद्ध नसल्याने तिकडे रहस्य असण्याची जास्त शक्यता आहे आणि स्मिथनी एडविनला बाकी जागा सांगितल्या आहेतच, त्यामुळे तो माउंट ऑलिम्पस मध्ये काही नाही हे कळल्यानंतर आपला मोर्चा डिलोझकडे वळवेलच आणि बुद्धीच्या उणीवेमुळे तो तिथे अडकून राहीलच. जर आपल्याला gnosis stoa मध्ये काही मिळालं नाही, तर आपण तिकडे त्याला नक्कीच गाठू.”

“ठीक आहे.”

सध्यातरी सर्वांनाच हा प्लॅन ठीक वाटला. मी स्मिथच्या डोक्यावरची इजा लक्षात घेऊन त्यांना सांगितले, “ मि. स्मिथ, आज तुम्ही दवाखान्यात जाऊन जखमेवर उपचार करा आणि आजचा दिवस विश्रांती घ्या. मी आणि जोसेफ आता निघतो आणि उद्या सकाळी पुन्हा तुमच्या दारात हजर होऊ.”

***

दुसऱ्या दिवशी सकाळी, अथेन्सकडे निघणाऱ्या विमानाची ३ तिकिटे घेऊन, पुन्हा एकदा आम्ही स्मिथच्या दारात उभे होतो.

क्रमशः

(पुढील भागावर जाण्यासाठी क्रमशः वर टिचकी मारा)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नवीन भाग. Happy
वाचला. आवडला.
आधी मला हे भाषांतर वाटत होते कोण्या जुन्या इंग्लिश कथेचे. पण आज गुगल चा उल्लेख वाचून वाटतेय की तुम्ही स्वतः हे रेफरेन्सेस शोधून कथा लिहित आहात.

धन्यवाद धनवंती!

नावे इंग्रजी वापरल्यामुळे तसे वाटत असेल पण भाषांतरित नाही.. गूगल आणि chatgpt चा आधार घेऊन ग्रीक इतिहासाची माहिती घेऊन लिहीत आहे मी ही कथा Happy

^^गूगल आणि chatgpt चा आधार घेऊन ग्रीक इतिहासाची माहिती घेऊन लिहीत आहे मी ही कथा ^^

कौतुक वाटते.

चित्र टाकल्यामुळे अजूनच रोचक वाटते आहे.

गोष्ट मस्त आहे! पण ऑलिम्पियन झ्यूसचे मंदिर’ उभारणी इस पुर्व सहाव्या शतकात सुरु झाली. लेखन एकदम छान ! लिओ ऑप्टस नाव पण छान आयडिया. एकदम ग्रीक वाटते.

@नीलिमा - खूप खूप धन्यवाद!

पण ऑलिम्पियन झ्यूसचे मंदिर’ उभारणी इस पुर्व सहाव्या शतकात सुरु झाली. >>>> तुम्ही म्हणल्यानंतर मी पुन्हा गूगल करून पाहिलं, बरोबर इसपू. सहाव्या शतकात त्याची उभारणी चालू झाली, कदाचित माझ्या वाचण्यात काहितरी गल्लत झाली असावी. Uhoh आता सध्यापुरते आपण या माझ्या चुकीला सिनेमॅटिक लिबर्टी म्हणूयात Lol जर पुढे काही सुचले कथानकात तर मी ही चूक cover up करेन!