लिओ ऑप्टसची दंतकथा (भाग दुसरा) : बारा देवता आणि कृष्णवर्णीय नोकर

Submitted by यःकश्चित on 6 July, 2025 - 14:15

प्रकरण दुसरे

बारा देवता आणि कृष्णवर्णीय नोकर

----------------------------------------------------------------------------------------------------------------

आम्ही स्मिथच्या दारात शांतपणे उभे होतो. दोनदा बेल वाजवूनही कुणी दरवाजा उघडत नव्हते. मी जोसेफकडे पाहिलं. तोही आता अस्वस्थपणे थोडा साशंक झाला होता. धाडस करून मी पुन्हा एकदा बेल वाजवली. माझे कान तीक्ष्ण झाले. जोसेफला मागे सारून मी दरवाज्याच्या बाजूला पाठ लाऊन उभा राहिलो. दरवाजा उघडला गेला आणि दरवाज्यातून एक पिस्तुलधारी हात बाहेर आला. त्या हाताला काखेत पकडला आणि उलटा करून कोपऱ्यावर जोरात वार केला. तशी पिस्तुल त्या व्यक्तीच्या हातातून गळून खाली पडली.
ती पडलेली पिस्तुल जोसेफला घ्यायला सांगितली आणि आम्ही तिघे आत गेलो.

आपला दुखावलेला हात धरून स्मिथ विव्हळत खुर्चीवर बसले होते. त्यांच्या समोरच्या खुर्चीवर जोसेफ पिस्तुल रोखून धरून बसला होता. मी स्मिथच्या त्या कुबट वास येणाऱ्या, अस्ताव्यस्त सामान पडलेल्या दिवाणखान्यात नजर फिरवत होतो.

" मि. स्मिथ, या प्रकाराचा खुलासा हवाय. ", त्यांच्याकडे नजर टाकली, " आणि तोही खरा "

स्मिथने आधी माझ्याकडे आणि नंतर जोसेफकडे पहिले. त्यांच्या नजरेत एक प्रकारचा संकोच होता, पण दुसऱ्याच क्षणाला त्यांनी विचार बदलला हे त्यांच्या चेहऱ्यावर, मला आणि जोसेफला स्पष्टपणे दिसलं होतं.

" आता तुमच्यापासून काय लपवायचे. तुम्ही लिओ ऑप्टसबद्दल ऐकलंय का ? "

" होय. त्याचं काय ? ", जोसेफ.

" मग त्याच्या खजिन्याच्या दंतकथा पण ऐकल्या असतील. "

" नाही. पण मी असे ऐकून आहे की त्याने मरतेवेळी त्याची जीवनभराची संपत्ती कुठेतरी दडवून ठेवली आहे. "

" होय. त्याच खजिन्याच्या मी शोधात आहे. "

" पण ह्या साऱ्या तर दंतकथा आहेत. मग तुम्ही यावर विश्वास कसा काय ठेवलात ? तुमच्याकडे -"

" होय. ", स्मिथ अधिरपणाने वाक्य तोडत बोलले, " होय. माझ्याकडे याचा पुरावा आहे."

मि. स्मिथ खुर्चीवरून उठून आमच्यावरून नजर न हालू देता भिंतीला पाठ घासतच त्यांच्या टेबलजवळ गेले. एका खणातून त्यांनी एक कागदाचे बिंडोळे बाहेर काढले व जोसेफच्या हातात दिले.

एप्रिल १५, १५०२

आज मी अतिशय खुशीत आहे. मी माझ्या आनंदाचे वर्णन शब्दात करू शकत नाही. जॉर्जने खरोखरच मला लाखमोलाचा खजिना दिलाय. एका बापाचं मन आज त्यानं जिंकून घेतलंय. जॉर्जला यासाठीच मी आज एवढी मोठी भेट दिली. आजच्या दिवसात हीच एक गोष्ट मला पुन्हा पुन्हा आनंदी करत होती.

"हे माझ्या पूर्वजांच्या रोजनिशीतील पान आहे. ", स्मिथनी मोठ्या अभिमानाने सांगितल.

"याचा लिओ ऑप्टस यांच्याशी काय संबंध ? ", जोसेफने गोंधळलेल्या सुरात विचारले.

" १५०२ साली, लिओ ऑप्टसनी लावलेल्या कोड्यांच्या शृंखलेतील काही दस्ताऐवज कुठूनसे जॉर्जच्या हाती लागले. जॉर्जनी जेंव्हा हे कागद आपल्या वडिलांना दाखवले, तेंव्हा त्यांचा आनंद गगनात मावेना. परंतु हा आनंद जास्त काळ टिकला नाही. बऱ्याच वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतरही ते या कोड्यांचा अर्थबोध करून घेऊ शकले नाही. त्यानंतर जॉर्ज आणि पुढच्या ३-४ पिढ्यांनी ही कोडी सोडवण्याचे खूप प्रयत्न केले. पण त्यांना यश आले नाही. शिवाय जॉर्जचे २ भाचे या खजिन्याच्या पायात वेडे झाले. मग त्यांनी ही सारी कागदपत्रे एका दुर्मिळ पेटीत भरून अडगळीच्या खोलीत ठेऊन दिली, जेणेकरून ती कोणाला सापडून ते असे झपाटून वेडे होऊ नयेत. १९व्या शतकाच्या सुमारास माझे आजोबा अडगळीची खोली साफ करत असताना त्यांची नजर या पेटीवर गेली. आणि पुन्हा एकदा खजिन्याच्या शोधमोहिमेला सुरुवात झाली. ", एवढे बोलून स्मिथ खुर्चीवर बसले. अजूनही ते माझ्या प्रहाराने दुखावलेला हात चोळत होते.

आम्ही दोघे एकमेकांकडे पाहू लागलो. जणू काही रहस्यमय मार्ग स्वतःहून समोर येऊन आम्हाला आव्हान देत होता.

जोसेफ उठून त्यांच्याजवळ गेला आणि म्हणाला, " अशी एकूण किती कोडी आहेत आणि किती सोडवून झाली आहेत तुमची ? "

"ए..ए..हे एकच तुम्ही सोडवून आणलेलं ", स्मिथ काहीतरी लपवत होते. स्मिथ याबाबतीत मला जरा ढिसाळ वाटले. त्यांना कदाचित गुपित लपवता येत नसावे.

"हे पहा स्मिथ , मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे - "

तेवढ्यात खाडकन असा आवाज करत मुख्य दरवाजा उघडला गेला आणि बाहेरून एक धिप्पाड, मध्यम उंचीचा एक कृष्णवर्णीय इसम प्रवेशला. त्याच्याकडे पाहून कोणालाही धडकी भरावी असा त्याचा अवतार होता.

"रॉबर्ट, आता फक्त २ राहिल्या - ", आम्हाला पाहून तो इसम बोलायचा थांबला.

" हा कोण ? ", मी स्मिथना विचारले.

"अरे हा आत्ता कशाला कडमडला ! ", स्मिथ स्वतःशी पुटपुटले.

" काय म्हणालात ? "

" अं..काही नाही. हा माझा नोकर म्हणजे खरंतर ह्याच्या मागच्या पिढ्यादेखील आमच्याकडेच कामाला होत्या. ह्याचं नाव एडविन. पूर्वी जेंव्हा अमेरिकेत आफ्रिकन लोकांना गुलामांना विकत घेतले जायचे तेंव्हा याच्या पूर्वजांना माझ्या पूर्वजांनी विकत घेतले होते. नंतर कृष्णवर्णीयांच्या हक्कासाठी लढा झाला. पण एडविनचे वडील तसेच काम करत राहिले. "

मला त्या एडविनची देहबोली पाहून तो यांचा नोकर असावा असे अजिबात वाटले नाही. ज्या पद्धतीने तो उभा होता आणि त्याचे अविर्भाव पाहून, एक नोकर वाटण्याऐवजी तो एक गुंड जास्त वाटत होता. पण मला त्या नोकराच्या किंवा त्याच्या पूर्वजांच्या इतिहासात काडीमात्र रस नव्हता.

" ते राहू दे. आत्ता हा २ राहिल्या असं म्हणाला ते काय ? "

" अं...अं...ते... "

" खरं काय ते सांगायचं, मिस्टर स्मिथ."

" आता सगळं कळलंच आहे तर हे काय लपवायचं. माझ्या पूर्वजांनी दडवलेल्या त्या पेटीत एकूण १२ कोडी होती. तुमच्याकडून ज्याप्रमाणे हे एक कोड सोडवलं, त्याचप्रमाणे अशी अजून ९ कोडी आम्ही तुमच्यासारख्या इतर बुद्धिवंतांचा आधार घेऊन सोडवली होती. म्हणजे आता एकूण १० सोडवून झाले. आता फक्त २ राहिली होती. ती सोडवून झाली असती कि मला खजिना मिळाला असता. पण - "

" पण आम्ही आलो. आणि तुमचा प्लान फिसकटला. ", जोसेफने त्यांचं वाक्य मधेच तोडलं.

काही सेकंद अस्वस्थ शांततेत गेले. कुणीच काही बोललं नाही. मग मीच ती मूक बेचैनी तोडून म्हणालो -

" मि स्मिथ. माझ्याकडे एक योजना आहे. आपण दोघांनी एकमेकांना मदत केली तर - "

" पण आमच्या खजिन्यात तुम्ही का म्हणून भागीदार ? "

" हे पहा मि. स्मिथ, जरा दूरदृष्टीने विचार करा. मुळात तुमची अजून २ कोडी सोडवून व्हायची आहेत. त्यासाठी तुम्हाला आणखी २ गुप्तहेर वा तत्सम बुद्धिमान व्यक्ती लागणार. त्यापेक्षा आम्ही इथे आहोतच तर आम्ही सोडवू, ज्यायोगे तुमचे कष्ट वाचतील आणि खजिन्याचा मार्ग सुकर होईल. "

" आणखी एक गोष्ट अशी आहे की ", जोसेफ खुर्चीतून उठून बोलू लागला, " जरी तुम्ही ही उर्वरित २ कोडी तुमच्या नेहमीच्या मार्गाने सोडवली, तरी पुढचा प्रश्न येतोच की. "

" पुढचा प्रश्न ? ", एडविन.

" अहो ह्या कोड्यांची उत्तरे तुम्हाला खजिन्यापर्यंत घेऊन जातीलच कशावरून ? तिथे पुढे आणखी कोडी असली तर काय करणार तुम्ही ? पुन्हा एकदा नवीन गुप्तहेर शोधत बसणार ? "

" बघा विचार करा. " - मी.

स्मिथच्या चेहेऱ्यावर नाराजी स्पष्टपणे दिसत होती. पण त्याचा नाईलाज होता. जोसेफने मांडलेला मुद्दाही मजबूत होताच आणि शेवटी गळाला मासा लागलाच.

" बोला वाटणी कशी करायची ? ", मि स्मिथ.

" त्यात ठरवायचं काय ? ५०-५० होणार."

" ५०-५० ? कोडी आमच्या बापजाद्यांकडून आलेली आहेत. "

" ओके ओके. एवढे त्रासिक होऊ नका. वाटणी ६०-४० होईल. "

स्मिथच्या चेहेऱ्यावर ओढून ताणून आणलेली खोटी संमती साफ दिसत होती. मुळातच आमची ही घुसखोरी त्यांना आवडली नव्हती. सहसा कुणाला आवडणारही नाही. पण आयतीच चालून आलेली संधी आम्ही कशी काय सोडणार होतो ! जोसेफ आणि मी, आम्ही एकमेकांकडे पाहून डोळ्यांनीच एकमेकांचे अभिनंदन केले. समोर असलेल्या टेबलभोवती आम्ही चौघे बसलो.

" मी स्मिथ, आता ती सारी कोडी आणा पाहू. "

स्मिथनी एडविनला डोळ्यांनी खुणावलं. तो आत जाऊन ती पेटी घेऊन आला. ती पेटी खरंच खूप दुर्मिळ होती. बारीक कलाकुसर आणि रेखीव नक्षीकाम खूप सुंदर प्रकारे त्या पेटीवर केलं होतं. एखादा पुराणवस्तूसंशोधक ही कोडी सोडवण्यापेक्षा ती पेटी विकत घेऊन गेला असता, इतकी सुंदर पेटी होती ती. स्मिथनी ती पेटी उघडली. त्यातून १२ कोड्यांचे कागद अलगदपणे बाहेर काढले. फार जीर्ण झालेले कागद होते ते. असणारच ! सोळाव्या शतकातील कागदपत्रे होती ती, किंबहुना त्याहूनही जुनी असावीत. कोण जाणे ऑप्टसच्या काळातीलही असतील.

" अहो विल्सन, तुम्हाला सांगितलेल्या कोड्याचे उत्तर काय आहे ? ", स्मिथ अचानक काही आठवून म्हणाले.

" अपोलो. ", जोसेफ उत्तरला.

" ही अशीच काहीशी सांकेतिक उत्तरे बाकीच्यानीही सांगितली आहेत. पोसाईडन...झेउस..."

" एक मिनिट मि. स्मिथ, ही सांकेतिक उत्तरे नसून तुमच्या बुद्धीची कमी आहे, असे समजा. "

" काय ? "

" माफ करा. जरा स्पष्टपणे बोललो. पण ही सांकेतिक उत्तरे नाहीयेत. ह्या ग्रीक पुराणकथेतील देवता आहेत. अपोलो ही , संगीत, कला, प्रकाश, भविष्य यांची देवता असून तिचे शस्त्र बाण आहे. जरा मला पाहुद्यात ती उत्तरे "

" हे घ्या. मी सगळी कागदावर लिहून ठेवली आहेत. ", असे म्हणून स्मिथनी जोसेफकडे एक कागद दिला.

त्यावर नऊ नावे लिहिली होती -
झ्यूस, पोसाईडन, डिमेटर, डायनोसस, हर्मस, अथेना, एरिस, आफ्रोडाईट, हिफास्टस

" ह्या तर साऱ्या ग्रीक देवता. ह्यांना 'ऑलिम्पियन गॉड्स' असे संबोधले जाते. असे एकूण १२ ऑलिम्पियन गॉड्स आहेत. माझा अंदाज खरा असेल तर ह्या १२ कोड्यांचे उत्तर ह्या १२ देवताच आहेत. "

आम्ही बोलत असतानाच जोसेफने इतर उर्वरित २ कागदही बाहेर काढले. कोडी, भाषा, गूढचिन्हे अशी बुद्धीला चालना देणारी सामग्री मिळाली की जोसेफसारखा उचापत्या मनुष्य दुसरा कोणी नाही. आणि तसा हवाच. कारण “बौद्धिक उंचीला साजेसं कुतूहल मिळालं नाही, तर मेंदूला गंज चढतो.”

" हे पहा. जसे मी बोललो होतो त्याप्रमाणे याचीही उत्तरे उरलेल्या दोन देवता आहेत. हिरा आणि आर्टमिस . "

" वाह ! जोसेफ तू खरच हुशार आहेस. तुझ्या बुद्धीची दाद द्यायला हवी. " मी खरंच जोसेफच्या हुशारीने प्रभावित झालो होतो.

" पण डॅनी, १२ कोड्यांची १२ उत्तरे मिळाली. पण याच करायचं काय ? यात खजिन्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग कुठे आहे ? "

" होय. तुझे म्हणणे बरोबर आहे. यावर जरा विचार करावा लागेल. कदाचित या देवताच आपल्याला काही मार्ग दाखवतील."

" मि स्मिथ ", इतका वेळ स्मिथ आणि एडविन दोघे शांतच बसले होते, " मी आज रात्री यावर विचार करतो आणि उद्या सकाळी तुम्हाला काही उलगडा होतोय का ते कळवतो. "

" हो ठीक आहे. चालेल मीही थोडाफार विचार करेन यावर. आणि काही कळतंय का ते पाहीन. " स्मिथ.

एवढे बोलून मी आणि जोसेफ उठलो आणि दरवाजाकडे वळलो. इतक्यात काहीतरी माझ्या डोक्यात येऊन मी मागे वळलो.

" मि. स्मिथ, मला जरा ती पेटी दाखवता का ? "

" हो जरूर. " स्मिथनी पेटी माझ्या हातात दिली.

मी पेटीचे निरीक्षण करू लागलो. तिघेही माझ्याकडे आश्चर्याने पाहत होते. त्यांना काहीच कळत नव्हते मी काय करतोय ते. मी पेटी उलट सुलट करून त्याचे बारकाईने निरीक्षण करत होतो. वाजवून पहिली, हलवून पहिली पण मला जे पाहिजे ते मिळत नव्हते.

" डॅनी काय शोधतोयस ? " जोसेफ

" अरे काही नाही...जरा...मला...काहीतरी....वाटलेलंच...हे पहा...सापडलंच."

" काय ? "

एवढ्यात मी धरलेल्या पेटीतून एक लहानसा कागद बाहेर पडला. न चुरगळलेला आणि बाकीच्या कागदांच्या मानाने हा कागद थोडा स्वच्छ आणि कमी जीर्ण होता.

" हे काय ? "

" पुढचा दुवा. आपल्याला खजिन्यापर्यंत नेणारा. "

" पण तुला कसे कळले कि या पेटीत हा कागद आहे ते ? ", जोसेफ

" अरे मी जेव्हा ही पेटी पहिली त्याच वेळी ह्या पेटीवरचं नक्षीकाम पाहून मला वाटलेलं की यातदेखील काहीतरी गुपित असणार. कारण नुसती देवांची नावे घेऊन कोणीही कोडे सोडवू शकणार नाही. त्याला पुढे काहीतरी दुवा लागणार. तो दुवा या पेटीतच असणार . म्हणून मी ह्या पेटीचे नीट निरीक्षण केले आणि मला या सापाच्या डोळ्यात कोंदलेले हे बटन दिसले. "

" उत्तम. तुमच्या प्रस्तावाची उपयुक्तता मला आत्ता कळतेय. ", स्मिथ

एडविन जरा चिडलेला दिसला. आमचा हस्तक्षेप त्याला आवडलेला नव्हता. पण आम्हा दोघांच्या बौद्धिक मर्यादेपुढे बिचारा हतबल होता. त्याने आपली नाराजी मोठ्या खुबीने लपवली होती. पण माझ्या आणि जोसेफच्या चतुर नजरेतून ती सुटली नाही. आम्ही दोघे एकमेकांकडे पाहून नुसतेच हसलो.

" चला मग त्या कागदावर काय लिहिलंय ते वाचूया. "

जोसेफ तो कागद घेऊन वाचू लागला. ह्या कागदावर इंग्रजीतच लिहिलेलं होतं.

आमुच्यापाशी आहे सारे, आम्ही तुम्हाला सारे देऊ |
या मजपाशी लढवा अक्कल, खजिना तव चरणी ठेऊ ||

" याचा काय अर्थ ? ", स्मिथ बोलले, " आता काय देवांच्याकडे म्हणजे स्वर्गात जायचं का ? "

" हाहा, असं नाही स्मिथ ", मी हसून म्हणालो, " तुम्ही स्वर्गात गेलात तर खजिना कोण घेणार ? हाही कोड्याचाच एक भाग आहे. "

" हो तेही बरोबर आहे."

"मला वाटते, या १२ देवता आणि हे १३वे काव्य यातूनच पुढचा काय तो मार्ग दिसेल. आम्ही या सर्व नोंदी लिहून घेतल्या आहेत. यावर आम्ही विचार करू आणि पुढील रहस्याच्या मार्गावर उद्या निघू. तर मि स्मिथ, सध्या आम्ही निघतो आता. उद्या सकाळी आम्ही याचे उत्तर घेऊनच येऊ."

असे म्हणून आम्ही त्या दोघांचा निरोप घेतला. आम्ही निघेपर्यंत एडविनच्या चेहऱ्यावरची नाराजी वाढलेली वाटली, आणि मि. स्मिथ थोडेसे हतबल वाटले. आमच्या बळेच केलेल्या हस्तक्षेपाचा परिणाम होता.

***

दुसऱ्या दिवशी सकाळी -

" हेलो, "

" हेलो जोसेफ पटकन आवरून तयार हो आपण स्मिथकडे जाणार आहोत."

" काय !! तुला उत्तर सापडल ? "

" अरे तू तयार हो. मी तुला सगळ सांगेन तिथे पोहोचल्यावर. "

" अच्छा . ठीक आहे ठेवतो फोन. "

आम्ही दोघेही स्मिथच्या दारात उभे होतो.

.... आणि स्मिथच्या घराला भले मोठ्ठे कुलूप लावलेले होते.

क्रमशः

(पुढील भागावर जाण्यासाठी क्रमशः वर टिचकी मारा)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे व्वा, नवीन भाग... भारी आहे कथा..
स्मिथ ने पिस्तूल घेऊन का दार उघडले? त्याला तर यांच्या मदतीची गरज आहे ना?

@आबा: धन्यवाद

@धनवंती: बरोबर स्मिथला मदतीची गरज आहे पण आधी त्यांचा approach “डरा धमकाके” वाला होता.. यावेळी डिटेक्टिव असल्याने तो फेल गेला.