लिओ ऑप्टसची दंतकथा ( भाग पहिला) : मिस्टर स्मिथ यांचे पत्र

Submitted by यःकश्चित on 5 July, 2025 - 10:06

प्रकरण पहिले

मिस्टर स्मिथ यांचे पत्र

----------------------------------------------------------------------------------------------------------------

सकाळचे सात वाजले होते. डिसेंबरच्या त्या बोचऱ्या थंडीत उठावेसे वाटत नसताना नाईलाजाने उठलो. रविवार असला तरीही नऊ वाजेपर्यंत आवरून तयार व्हायचे होते. कारण नऊ वाजता मि. स्मिथ भेटायला येणार होते. त्यांचे काहीतरी अत्यंत महत्वाचे काम होते हे मी त्यांच्या काल रात्री आलेल्या फोनवरून ताडले होते. फोनवर बोलताना ते एकही वाक्य एकसंधपणे बोलले नव्हते. त्यांच्या आवाजातील धास्तावलेपणा स्पष्टपणे कळत होता. ते असे बोलत होते जसे कि त्यांच्या कानशिलावर रिव्हॉल्वर धरून त्यांना हे बोलायला भाग पाडले आहे.

मी रोजच्याप्रमाणे चहा तयार केला आणि तो चहाचा कप घेऊन दिवाणखान्यात आलो. दरवाज्याच्या फटीतून पडलेले वर्तमानपत्र उचलले आणि त्याखाली पडलेला लिफाफा दिसला. तो लिफाफा उघडला. त्यात एक पत्र होते.

मि. डॅनी विल्सन,


मी काल रात्री आपल्याला फोन केला होता. त्याप्रमाणे मी आज आपल्याला भेटायला येणार होतो. परंतु माफ करा. काही अपरिहार्य कारणांमुळे मी येऊ शकत नाही. कृपया मला समजून घ्या.


तसेच या पत्रासोबत मी आणखी एक चिट्ठी आपल्याला पाठवली आहे. त्या चिठ्ठीतील मजकूर सांकेतिक लिपीत लिहिलेला आहे. आपण आपल्या बुद्धीचातुर्याने त्याचा अर्थ लाऊन सांगितलात तर फार उपकार होतील आपले माझ्यावर.

आशा करतो आपण त्या मजकुराचा अर्थ लवकरात लवकर सांगाल.

आपला, 
मि. रॉबर्ट स्मिथ

मी ती दुसरी चिठ्ठी उघडली. त्या चिठ्ठीत आकृत्या व चिन्हे या पलीकडे काहीही नव्हते. ती चिन्हे कळायला मी काही भाषातज्ञ नव्हतो. मी एक खाजगी गुप्तहेर होतो. यासाठी मला कुणाची तरी मदत लागणार होती. विशेषकरून एखाद्या भाषातज्ञाची, ज्याला या भाषांतील अर्थ समजतो. अशावेळी फक्त एकच नाव डोक्यात आले "जोसेफ".

***

" सॉरी जोसेफ, मी न सांगता आलो तुझ्याकडे. पण वेळच तशी आहे. ह्या चिठ्ठीत काय लिहिले आहे हे सांगू शकशील का तू ? "

जोसेफने ती चिठ्ठी पहिली आणि मिश्कील स्वरात म्हणाला,

" काय डॅनी, एखादी ग्रीक पोरगी पटवली दिसतंय ! "

" काय ! हे ग्रीकमध्ये आहे ? "

" अरे मित्रा, तिचं नाव तरी सांग. "

" अहो जोसेफ महाराज, काही पोरगी वगैरे नाही. हे ब्लॅकमेलिंग असावे. ", असे म्हणून मी त्याला स्मिथचा फोन आणि पत्राबद्दल सांगितलं.

" ओह्... मग तर मला पटकन अर्थ सांगितला पाहिजे."

" हो ना. चल आता लवकर त्याच भाषांतर करून सांग. "

जोसेफ शेल्फमधून काही पुस्तके बाहेर काढून तो त्या चिठ्ठीतल्या मजकुराचा अर्थ लावू लागला. जोसेफच्या घरात एक जुनाट वास दरवळत होता, जुन्या कागदांचा - जुन्या ज्ञानाचा. मी खुर्चीवर बसून त्याची ती खोली पाहू लागलो. त्या खोलीत भिंत दिसतच नव्हती. संपूर्ण भिंतीच्या भिंती पुस्तकांच्या शेल्फ्ने भरलेल्या. टेबलावरसुद्धा पुस्तके, नकाशे आणि कसल्याश्या चित्र विचित्र आकृत्या काढलेली कागदे पडली होती. खोलीच्या एका कोपऱ्यात काही दुर्मिळ वस्तूही होत्या. त्या वस्तूंवरही तशाच सांकेतिक भाषातील मजकूर लिहिला होता. मजकूर कुठला, चिन्हे आणि आकृत्याच होत्या त्या.

" डॅनी, हे स्मिथ काय करतात ? "

" काही कल्पना नाही. मी अजून त्यांना भेटलेलो नाहीये. आवाजावरून चाळिशीतले गृहस्थ असावेत. "

" मग आत्ता लगेच त्यांना फोन लाव आणि विचार चिठ्ठीचा अर्थ कुठे आणि कसा सांगायचा ते. "

" जोसेफ ! तू इतक्या लवकर भाषांतर करशील असा वाटलं नव्हतं. पण तू तर कमालच केलीस गड्या. "

" अरे ती साधी ग्रीक होती. फक्त जे शब्द जुन्या ग्रीकनुसार वापरले होते ते मला पुस्तकात शोधावे लागले. हा पहा अर्थ. आणि यातून काय समजतं ते सांग ", असे म्हणून जोसेफने चिठ्ठी माझ्या हातात दिली.

संगीत म्हणजे काव्य असे काव्यातही संगीत असे

सूर छेडता संगीताचा काव्य दिसे इंद्रधनू जसे

 तम इथला जाळून तीराने ज्ञानप्रकाश उजळून दिसे

 भविष्य दृष्टी असे जयाला तोची माझा भक्त असे

 रवी करुनी वंदन मजला प्रकाश जगी या पाडीतसे

 ओळख माझे नाव तयाला मार्ग पुढचा दावितसे

" हे काय आहे ? मला हे एखाद्या कोड्यासारखे वाटत आहे. "

" कोड्यासारखे नाही कोडेच आहे ते. तेही साधेसुधे कोडे नाही तर ते आहे महान कूटप्रश्नकार लिओ ऑप्टस यांनी रचलेल कोडं. इ.स.पू. ५व्या शतकात हे लिओ ऑप्टस त्यांच्या कोड्यांबद्दल फार प्रसिद्ध होते. ते त्या काळी कूटप्रश्न प्रतियोगिता भरवत. वर्षातून एकदा ही स्पर्धा भरवली जायची. या स्पर्धेत युरोप, मध्यपूर्व आशिया आणि भारतीय उपखंडातून अनेक बुद्धिवंत भाग घ्यायचे. जो कोणी दिलेल्या कोड्यांच्या आधारे अंतिम चषकापर्यंत पोहोचेल त्याला ते सहा महिने या कोड्यासंबंधित प्रशिक्षण द्यायचे. "

"म्हणजे हे लिओ ऑप्टस, सॉक्रेटिस आणि प्लेटो सारख्या महान विचारवंतांच्या काळातले - "

" हो, त्यांची कोडी म्हणजे फक्त बौद्धिकच नाही तर वैचारिक आणि तात्विकही होती. आणखी एक विलक्षण गोष्ट म्हणजे एक दंतकथाच सांगतो ज्यात कितपत सत्यता आहे याचा मला अंदाज नाही. पण ह्या भाषांचा अभ्यास करता करता ह्या काही गोष्टी मला समजल्या. लिओ ऑप्टसनी या कोड्यांच्या स्पर्धेतून आणि इतर काही माध्यमातून आयुष्यभरात अमाप पैसा जमवला होता. मरते वेळेस त्यांनी तो कुठे तरी दडवून ठेवला. आजतागायत अनेक जणांनी तो शोधण्याचा प्रयत्न केला. पण कुणालाच सापडला नाही. त्यांनी जिथे तो खजिना लपवला, तिथपर्यंत जाण्यासाठी लिओ ऑप्टस यांनी बौद्धिक कूटप्रश्न शृंखला लिहून ठेवली, जेणेकरून सामान्य माणसाला सहजपणे हा खजिना मिळणार नाही. त्यामुळे आजवर तो खजिना शाबूत आहे असे म्हणतात. काही जणांच्या मते, त्यांनी लिहिलेलं या शृंखलेतील शेवटचं कोडं हे त्यांच्या मृत्यूच्या दिवशीचंच आहे. तर काही जण असे ही म्हणतात, त्यांनी स्वतःच्याच मृत्यूचा एक देखावा तयार केला आणि कुठेतरी गायब झाले. "

एक दीर्घ उसासा सोडून जोसेफ पुढे बोलू लागला.

" ह्या कोड्यामुळे आज मला या खजिन्याबद्दल १ टक्का खरेपणा वाटू लागला आहे. जर स्मिथकडे याबद्दल आणखी माहिती असेल तर... "

जोसेफच्या चेहेऱ्यावर हवेत उडत असल्यासारखे भाव आले. मी त्या चिठ्ठ्या खिशात घातल्या आणि जोसेफला म्हणालो,
" चल जोसेफ माझ्यासोबत. आपण स्मिथकडे जाऊया. फक्त तिथे मी सांगतो तसच कर. त्याव्यतिरिक्त काही करायचं नाही. "

दुसऱ्या क्षणाला आम्ही मि. स्मिथच्या दारात होतो, दरवाजावरची बेल वाजवून तो उघडण्याच्या प्रतीक्षेत.

क्रमशः

(पुढील भागावर जाण्यासाठी क्रमशः वर टिचकी मारा)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नमस्कार मायबोलीकरांनो,

२०१२ मध्ये मी इकडे कथालेखन करायचो. पण मध्यंतरीच्या काळात जॉबमध्ये व्यस्त झाल्याने ते बंद झाले. त्यामुळे माझ्या काही अर्धवट कथा अतृप्त आत्म्यासारख्या भटकत आहेत. त्यांना मुक्ती देण्यासाठी आता पुन्हा मी लिखाण सुरू केले आहे आणि आता रोज ठरवून वेळ काढून लिखाण चालू आहे.

आधी ही "लिओ ऑप्टसची दंतकथा" हातात घेतली आहे.

विशेष सूचना क्रमशः न आवडणाऱ्या वाचकांसाठी - खरंतर मी ही कथा संपूर्ण लिहून मगच पोस्टणार होतो पण इथले प्रतिसाद वाचून पुढच्या भागात तश्या सुधारणा करता येतील आणि लेखनशैलीही समृद्ध करता येईल या विचाराने एक-एक भाग दर ३-४ दिवसांनी पोस्टत जाईन.

आपला कृपाभिलाषी,
यःकश्चित

रोचक वाटतेय.
Happy
वाचकांनी यात काही सोडवायचे अपेक्षित नसून त्यांनी फक्त वाचनाचा आनंद घ्यायचाय ना?

यःकश्चित, अतिशय स्तुत्य निर्णय की तुम्ही तुमच्या सर्व कथा पूर्ण करणार आहात.
ही कथा पूर्वी वाचली होतीच, आता परत वाचली. पूर्ण वाचायला खूप आवडेल.

सर्वांना मनापासून धन्यवाद!

@धनवंती: होय पाहिले २ भाग तेच आहेत, काही घटनांमध्ये तपशील अधिक जोडलेला आहे. त्यामुळे २रा भाग आज पोस्टेन आणि पुढचे भाग ३-४ दिवसाच्या अंतराने पोस्टत जाईन.

@छल्ला : नाही वाचकांनी काही सोडवायचे नाही ! फक्त चांगली वाईट उत्कंठावर्धक किंवा रटाळ असा अभिप्राय देणे अपेक्षित आहे.

>>>>>पण मध्यंतरीच्या काळात जॉबमध्ये व्यस्त
व्यस्तचा मराठी अर्थ वेगळा आहे. बिझी नाही. तो हिंदीत आहे.

सामो , बरोबर आहे!
व्यग्र असे म्हणता येईल..किंवा मग, नाहीतरी जॉब हा इंग्लिश शब्द वापरला आहेच, तर बिझी च म्हणायचे सरळ सरळ!
Happy