फणसाच्या आठळ्याची भाजी (फणस बियांची भाजी)

Submitted by जाई. on 2 June, 2025 - 02:30
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. फणसाच्या आठळ्या
२. फोडणीचे साहित्य
३. कांदे (आठळ्यांच्या प्रमाणात)
४. कोकम ( चवीनुसार)
५. गोडा मसाला
६. कोथिंबीर (पर्यायी)
७. मीठ
८. पाणी

क्रमवार पाककृती: 

तर मग झाल अस की फणस घरी आणवून, अस्मादिकाना टुकटुक करून, घरच्या मेंब्र गरे खाऊन मोकळी झाली . उरल्या त्या आठळ्या म्हणजेच फणसाच्या बिया ! आंब्यांच्या कोयीप्रमाणे त्या आठळ्या टाकून द्यायच्या नाहीत अस बजावून ठेवलेल होतेच.

एक वेळच्या भाजीला पुरे होतील आणि भाजी शेजारी देता येइल इतपत आठळ्या जमा झाल्या . मग मुहूर्त जमवून आणला फणसाच्या आठळ्याच्या भाजीचा .

कोकणात ही भाजी करतात . माझी आईची आई ही भाजी सुरेख करायची . आईलाही ही भाजी प्रचंड आवडायची.. त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा आला की एका रात्री हा फक्कड बेत असायचा भाकरीबरोबर. आठळ्या फोडायचे काम आजोबांकडे असायचे. वाराप्रमाणे त्यात काळे वाटाणे/ सुका जवळा/ सुके बोंबिल अशी पुरवणी असायची. जोडीला भाकरी , पिठल भात

याची कृती अगदीच सोपी .

आठळ्या धुवून घ्याव्यात . खलबत्याने साधारण एक सारखे तुकडे करावेत. नेहमीची फोडणी करून कांदा परतून, कोकम घालून त्यावर आठळ्या परतून घ्याव्यात . खात असलात तर सुका जवळा / बोंबिल टाकावे . प्रमाणानुसार गोडा मसाला आणि हवे तितके पाणी घालून वाफ काढावी. मीठ आणि हवे असल्यास कोथिंबीर घालून अंगसरशी भाजी करावी.

बस इतकेच.

वाढणी/प्रमाण: 
आवडीनुसार
अधिक टिपा: 

कोकम टाकल्याने छान तिखट आंबट चवीची भाजी मिळुन येते. तेव्हा कोकम वगळू नका.

माहितीचा स्रोत: 
पारंपारिक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त. गावाकडे पावसाळ्याची सोय असते ही. उन्हाळ्यात आठळ्या सुकवून ठेवतात. आणि पावसाळ्यात मासे फार मिळत नाहीत, तेव्हा यात कोलीम ( सुका जवळा), काड किंवा सुकट (सुकी मासळी) घालून मस्त झणझणीत तोंडीलावणे तयार.
आठळ्या भाजून पण खातात पण मला मीठ घालून उकडलेल्याच आवडतात.
यंदा मला गऱ्यांची भाजी काही खायला मिळाली नाही.

Pages