वृत्तान्त - अमितव गटग -ठाणे -११ मे

Submitted by भरत. on 12 May, 2025 - 01:41

काल ११ मे २०२५ रोजी सायंकाळी ६ ते १० या वेळेत कॅनडाहून भारत भेटीस आलेल्या अमितव यांचा मायबोलीकरांसोबतच्या भेटीचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाची काही छायाचित्रे सूत्रांकरवी प्राप्त झाली आहेत.
1.jpg2.jpg3.jpg4.jpg

ही छायाचित्रे पाहून मायबोलीकरांनी कार्यक्रमाबद्दल अंदाज बांधून इथे लिहायचे आहेत.

टीप १. अनुस्वाराच्या लेखनासंबंधी नियम -
काही शब्दांतील अल्पोच्चारित अनुस्वाराऐवजी अनुनासिक जोडले, तर त्या शब्दाचा अर्थ बदलतो. जसे
१. देहांत - शरीरांत ------------- देहान्त - मरण
२ वृत्तांत - कवितेच्या वृत्तांत ----------- वृत्तान्त - बातमी
३ वेदांत - वेदांमध्ये ........... वेदान्त - उपनिषदांतील तत्त्वज्ञान

हा नियम समजत नसेल तर पुढल्या गटगस हजेरी लावावी लागेल. ज्यांना समजला असेल त्यांनी न समजलेल्यांना समजवण्यासाठी पुढचे गटग आयोजित करावे.

टीप २ - अजून ठरायची आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निम्म्याहून अधिक मंडळी कविताप्रेमी असल्याने अधूनमधून कवितांचा विषय निघत होता.
त्यावर मी दरवेळी 'मी कवितांपासून चार हात लांब असते' हे माझं तुणतुणं वाजवत होते. Proud

ऋतुराजचं कामाचं क्षेत्र, कामाचं स्वरूप याबद्दलच्या गप्पा हा कालचा हायलाईट पार्ट होता. बरीच नवी माहिती मिळाली.

माझेमन, ये-जा केलेलं आवडेल. अहोजाहो नको, (आंटी मत कहो ना चालीवर वाचावे :हाहा:)

आंब्याची पेटी वि. वाजवायची पेटी, वाजवायची पेटी कॅनडाला कशी न्यायची, पेटी फोल्ड कशी करतात (फोल्ड होणारी पेटी - यावरून 'पूर्वी हे नव्हतं, स्वातंत्र्यपूर्व काळात....' असा माझा चेहरा झाला होता) - हा पण एक टॉपिक झाला.

हेडर मधलं अवघड text बघून गप बसले होते.
धागा आल्याबरोबर पाहिला होता मी Lol
.
छान झालंय गटग
वृत्तांत मस्त
सगळे photo एकदम refreshing आणि प्रसन्न.
.
स्वगत: पुणे gtg ला ह्यापेक्षा जास्त मेंबर आणावे लागणार तर.>>> हे दडपण च आता... Proud
पुणेकरांनो इथे सुद्धा सांगून ठेवतेय.
यायचं आहे गटग ला नक्की.
तारीख : १८मे, रविवार
वेळ : सकाळी नऊ वाजून २० मिनिटे.
मला किंवा वाड्यावर कुणालाही संपर्क करा विपु/ई-मेल करून.
.

मुंबईकर उत्साही म्हणून आधीच performance pressure देत असतात गटग च्या बाबतीत.
आपल्याला आणखी दणक्यात गटग करायचा आहे Proud
.
पुणे गटग चा धागा काढला आहे
कोण कोण येणार सांगा तिकडे जाऊन
https://www.maayboli.com/node/86705

यातल्या कुणालाही प्रत्यक्षात भेटलेलो नसलो तरी एकदा फोटोत कोण कोण आहे कळल्यावर त्यातले कोण म्हणजे कोण असेल याचा अंदाज बरोबर ठरला!!
Happy

माझ्या नावापुढे सर लावलेल्या आणि यापुढे लावणार्‍यांचा घाऊक निषेध आणि अनुल्लेख. Angry

मुद्रितशोधन करताना तपशिलाच्या चुकाही दाखवून द्यायची वाईट खोड मला आहे. तिला जागून -

अमित, किल्लीकडून माझा नंबर ऋतुराजने मिळवला नाही. किंवा तिने दिला नाही ;). तो त्याने रात्री परतीच्या प्रवासात माझ्याकडेच मागितला.

किल्लीने मला तुझा नंबर पाठवला आणि सोबत हा संदेशही.

डोनाल्ड ट्रंप यांनी भारताला अमेरिकेचे बावन्नावे राज्य घोषित करण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. त्याबद्दल भारत आणि कॅनडा यांच्यात ( ट्रुडो गेल्यावर संबंध पुन्हा मैत्रीपूर्ण झाल्याने) चर्चा करण्यासाठी अमित भारतात आले आहेत. त्यांनी तुम्हांला अर्जंट कॉन्टॅक्ट करायला सांगितले आहे.

आता तू एवढ्या लांबून कॅनडाहून इथे आम्हांला (अनेकवचन) भेटायला आलास तर आम्ही (अनेकवचन) बोरिवलीहून दादर , ठाणेच कशाला पुण्यालाही येऊ की Wink
चर्चेसाठी तयारी करायची म्हणून मधल्या तासाभराच्या प्रवासात वाचावं म्हणून एक पुस्तक घेतलं. त्याच्या प्रस्तावनेत मुंबई ठाणे आणि पहिल्या कथेत वर्तक आळी अशी नावे आली. द ठाणे क्लबला पोचलो आणि विवि ... कुठे दिसतंय का ते शोधून परत येताना अमित दिसला. त्याच्यासोबत ललिता प्रीती. तिने स्वतःच ओळ ख करून दिली. तर जे पुस्तक मी वाचायला घेतलं होतं त्याचा मायबोलीवर परिचय तिनेच लिहिला आहे. बघा किती योगायोग.

संयत हा शब्द काही बर्‍या अर्थाने मायबोलीवर वापरला जात नसे, असे मला आठवते. इथे अमितने माझ्यासाठी चांगल्याच अर्थी वापरलाय. काहीजण त्याच्याशी सहमत होणार नाहीत. यापुढे मायबोलीवर लिहिताना मी , मी संयत आहे याची आठवण ठेवेन.

ललिताप्रीती भेटल्यापासून पुस्तकांबद्दलच बोलत होती. शांताबाई कवितांत अवगाहन करतात तसं ती वेगवेगळ्या विषयांच्या पुस्तकांत अवगाहन करीत असते. माझ्या बुकशेल्फमधल्या वाचलेल्या आणि न वाचलेल्या पुस्तकांचं गुणोत्तर तिला सांगितलं तर तिला घेरी येऊ शकेल. रोज रात्री किमान अर्धा तास पुस्तक वाचायचं हा तिच्याकडून शिकलेला धडा मी आजपासून आचरणात आणायचा प्रयत्न करेन.

पंतप्रधान प्लानिंग कमिशनचे एक्स ऑफिशियो चेअरमन असले तरी डि फॅक्टो चेअरमन कुणी अर्थशास्त्रज्ञ असत, तसं इथे अमित एक्स ऑफिशियो यजमान आणि अ'निरु'द्ध डि फॅक्टो यजमान होते. त्यांची माझी प्रतिसादांत गाठभेट पडत असली तरी त्यांचं लेखन काय ते मला आठवून खात्री करून घ्यावी लागली. आरण्यकवरचं त्यांचं प्रेम वारंवार दिसून येत होतं.

ऋतुराज फार गोड मुलगा आहे, याची मायबोलीवरच्या इंटरॅक्शनमधून मिळालीच होती. काल प्रत्यक्ष प्रत्यय आला. बॉटनी, फार्मॉकॉलॉजी आणि संस्कृत काव्य अशा तीन एकमेकांशी काहीही संबंध नसलेल्या क्षेत्रांत तो लीलया विहार करत असतो.

मनीमोहोर या दिसण्याबोलण्याहसण्यात माझ्या एका मावसबहिणीच्या डिट्टो कॉपी आहेत. त्यांनी या गटगची आठवण बरेच दिवस राहील याची सोय करून दिली. डिट्टो अ'निरु'द्ध यांच्यासाठीही.

सकाळी गटगबद्दल वाचल्यावर स्वातीने बिघडवायचं चॅलेंज दिलेली आम्रसांदणी त्यात प्रयोग करून बिघडवून न्यावी असा विचार आला होता. पण आम्रसम्राज्ञी मनीमोहोर येणार आहेत म्हटल्यावर तो रद्द केला.

मंजुडी हल्ली मायबोलीवर अधूनमधून कधीतरी उगवतात, तशा गटगमध्ये उगवून गेल्या.

ललिताप्रीती आणि ऋतुराज यांच्या वाग्गंगा वाहत असताना वृत्तान्तात कुठेतरी आपलं नाव पण आलं पाहिजे म्हणून मी भर घालण्यासारखं मध्ये मध्ये बोलून घेतलं.

सावली यांची प्रतिसादांतून ओळख होती. कधी इंटरॅक्शन झालं नसावं. आम्हां दोघांची एकमेकांशी एक मायबोलीकर एवढीच ओळख असावी. त्यात थोडीशी एकाच तालुक्यातले ही भर पडली.

वृत्तांत - वृत्तान्त शब्दातील चूक सुधारून येते. धन्यवाद भरत. त्यासाठी तुम्ही हे गटग योजिले होते की काय वाटते आहे. Wink

आलेच.

माझ्या नावापुढे सर लावलेल्या आणि यापुढे लावणार्‍यांचा घाऊक निषेध आणि अनुल्लेख. Angry <<
हे विधान मी ही उसने घेऊन +1 म्हणतो.

तर आम्ही (अनेकवचन) बोरिवलीहून दादर , ठाणेच कशाला पुण्यालाही येऊ की Wink <<
अरे वा.. पुण्यालाही जाताय तर.. Wink

मनीमोहोर या दिसण्याबोलण्याहसण्यात माझ्या एका मावसबहिणीच्या डिट्टो कॉपी आहेत. त्यांनी या गटगची आठवण बरेच दिवस राहील याची सोय करून दिली. डिट्टो अ'निरु'द्ध यांच्यासाठीही. <<

डिट्टो अ'निरु'द्ध यांच्यासाठीही. -- हे काही कळलं नाही.
तुम्ही त्यांना मावसबहिणीचा फोटो दाखवलात. मला माझ्यासारख्या कोणाचा फोटो दाखवला नाहीत किंवा तसं काही बोलणंही झाल्याचं आठवत नाहीये.
की उपरोक्त वाक्गंगौघात अशी काही चर्चा झाल्याचं माझ्या काना-मनातून वाहून गेलंय ??

मस्त वृ आणि फोटो

मी मिस केले. ट्राय करेन म्हंटल होतं पण तरी जमणं कठीण हे एकीकडे माहिती होतं. पुन्हा योग असेल तर भेट होईलच तोपर्यंत व्हॉ ॲ गृपवर भेटत राहू (गृप सोडत नाहीस तोपर्यंत :P)

(दादर मला जवळ होतं हा प्लीज नोट Proud पण ठाणे सगळ्यांना कॉमन सोयीच ठिकाण होतं हे मात्र बरोबर)

@लले, ते एक सोबो गटग कधीचं पेंडींग आहे त्याच काय ते घे एकदा मनावर.

(तुम्ही केलेल्या विनोदावर पाणी ओततो) ते गटगची आठवण बरेच दिवस राहण्याची सोय करून देण्याबद्दल आहे. तुमच्यामुळे तर अनेक वर्षे असं म्हणता येईल.
---------
परतीच्या प्रवासात बोरिवली दहिसरकरांनी मभागौदिवरून किल्लीची आठवण काढली होती आणि पुन्हा एकदा कौतुक केलं होतं.

अरे वा मस्तच गटग झालं कि.
कोण कोण आहे हे माहिती नसल्याने कोण कोण आहे हा अंदाज बांधण्याचे टाळले.
ऋतुराज आणि झकासराव यांच्यात नेहमीच कन्फ्युजन होतं. इथे झकासराव यांचे नाव नसल्याने ते ऋतुराजच असावेत. Happy

भारी झालेलं दिसतंय की गटग! चट् मंगनी/मन्गनी पट् ब्याह! Proud Happy
मायबोलीवर गटगंचा सीझनच आल्यासारखं वाटतंय. Happy

बाकी वृत्तांत/वृत्तान्त संदर्भात असहमती नोंदवून ठेवते, म्हणजे मलाही गटगमध्ये सहभागी झाल्याचा थोडासा आनंद मिळेल. Proud
अंत शब्द अन्त असा लिहीत नाहीत, मग देहान्त/ वेदान्त असं लिहायची सक्ती असू नये.
वृत्तान्त असं लिहायची त्याहून असू नये - हा काही वृत्ताचा 'अन्त' नाही. Proud
खेरीज शब्दकोशांत दोन्ही प्रकारे लिहिलेला दिसतो आहे हा शब्द.

स्वाती आणि भरत, तुम्ही 'गंगाराम आणि गाढव' गोष्टीची आठवण करून देत आहात. मी एकदा बदलून झाले. Happy

भरत, चालेल. Happy

अस्मिता, तुला तरी किती घाई! Lol

अमितव भारतात यायच्या आधीच आमची मेलामेली झाली होती आणि व्हाॅटस्ॲप नंबर्सचीही देवघेव झाली होती.

शनिवारी संध्याकाळी अमितव यांचा रविवारी भेटायचं ठरतंय असा निरोप आला. ठिकाण दादर ठरत होतं आणि ऋतुराज, कविन यांना जमत होतं.

तेवढ्यात ऋतुराजचा निरोप आला की रविवार संध्याकाळचं गटग ठरतंय आणि ठिकाण दादर किंवा बोरिवली असणार आहे.
नंतर प्रत्यक्ष फोनवर संभाषणही झालं त्यात त्याची वेगवेगळ्या माबोकरांसोबत चर्चा चालू असून जागांची टोलवाटोलवी चालू असल्याचंही कळलं.
अमितवही स्वतंत्रपणे चर्चा करत असल्याचंही कळलं.
त्यात माझेमन आणि भरत ही नांवं ॲड झाली होती.
मी, मी कुठेही यायला तयार आहे, ठरलं की कळव असा निःसंदिग्ध होकार देऊन मोकळा झालो.
नंतर काहीच निरोप न आल्यामुळे ‘काय अपडेट्स’ या विचारणेवर ‘उद्या संध्याकाळ, टेंटेटिव्हली दादर’ असं कळलं.

त्याच रात्री तिन्ही रेल्वेमार्गांवर रविवारी मेगाब्लाॅक असल्याची सुवार्ता कळली ती साहजिकच ऋतुराजला फाॅरवर्ड केली कारण दहिसर, बोरिवलीचे माबोकरही ॲड होत होते.

अमितवना ऋतुराजबरोबर संपर्कात आहे, हे कळवलं होतंच.

दुसर्‍या दिवशी पत्नी आणि मुलीने ब्रेकफास्टला बाहेर जायचंय हा फतवा काढला.
मी ठाणे क्लबमधलं ViVi सुचवलं ते एकमताने फायनल झालं.
८.३० ला ViVi मधे स्थानापन्न झाल्यावर, काय मग.. कुठपर्यंत आलंय तुमचं गटगचं.. अशी विचारणा झाली.

तोच प्रश्न मग ऋतुराजला विचारल्यावर, अजून काही ठरलं नाही, सांगतो…असं उत्तर आलं.

ViVi चा अँबियन्स पहाता, ठाणेकरांची वाढती संख्या पहाता आणि दहिसरवाल्यांना, क्या दादर क्या थाना..
असा विचार करुन ViVi चे बसल्या जागेवरुन काही फोटो घेतले आणि ऋतुराजला पाठवले..


म्हटलं, By Chance ठाण्याला भेटायचं ठरलं तर हे ठिकाण चालेल का ?
एसीही आहे, कदाचित निवांतपणाही मिळू शकेल.. अगदी माॅलसारखी गर्दी न व्हावी..
Pool Side हा बोनस..


तासाभरातच त्याचा ठाणे, संध्याकाळी ६.०० आणि हेच रेस्टॉरंट फायनल झाल्याचा निरोप आला.

मग ह्या दोन टेबल्सचं बुकिंग करुन ॠतुराज आणि अमितवना कळवलं..


बाकी तिथे काय बोलणी झाली ती बाकीच्यांच्या वृतान्तात आलेलं आहेच.

हा एक निघता निघता तरणतलावाच्या पल्याडहून काढलेला फोटो..


निरू, त्या वेटरला प्रत्येक फोटो मध्ये इंटिरिअर आलंच पाहिजे ही त्याच्या मॅनेजरने शिकवण दिली असणार बहुतेक Proud

विवि गटग वृत्तान्त : १
काही दिवसांपूर्वी अमितव यांनी वाड्यावर "मे महिन्यात भारतभेटीस येणार आहे, तेव्हा मुंबई-ठाण्यात आणि पुण्यात गटग करूयात" असे सुचवले होते त्याला मुंबईसाठी मी, माझेमन आणि निरुदा यांनी अनुमोदन दिले होते. मग गुरुवारी-शुक्रवारी भारतात येण्यासाठी निघाल्याची बातमी पण वाचली. पण लगेच पोचल्या पोचल्या गटग ठरेल असे काही वाटले नव्हते त्यामुळे अमितवला मी निवांत फोन / मॅसेज करणार होतो. शनिवारी आमच्या घरचा सालाबादप्रमाणे लालबागवरून मसाला कुटून आणला, सोबत आई आणि बायको असल्याने डोक्याचा वेगळा कुटाणा झाला होता. त्यामुळे संध्याकाळी घरी येऊन चहा घेतो न घेतो तोच अमितवचा मेसेज पाहिला. रविवारी शिवाजी मंदिराला "असेन मी नसेन मी" नाटकाला चाललोय भेटायला जमेल का? मी म्हटलं हो, आणखी कोणकोण येतंय तर कळलं मीच पहिला भिडू. मग माझेमन येणार म्हणून त्यांचा कॉन्टॅक्ट आहे का विचारले, तर तो माझ्याकडे नव्हता. मग अनिरुद्ध यांना मेसेज केला. एका वविच्या ग्रुपवर विचारलं कोण कोण येतंय म्हणून, तर कविनला दादरला जमणार होते. रविवार संध्याकाळ, दादर नक्की झाले. निरुदाशी बोलणे झाले.
रविवारी सकाळी निरुदांनी विवि चे फोटो टाकले. एवढी भारी जागा पाहून मी लगेच अमितवला फोटो पाठवले कि ही जागा ठाण्यात आहे. तोवर भरत, ललिता-प्रिती आणि ममोताई पण येणार होत्या मग दादर सोडून ठाण्याच्या विविला संध्याकाळसाठी जागा बुक केली. अजूनही माझेमनचा कॉन्टॅक्ट झाला नव्हता. संध्याकाळी पाच वाजता ठाण्याला जायला निघालो, फाउंटन जवळचे ते दळभद्री ट्राफिक नव्हते म्हणून आनंदी होतो. तेवढ्यात मला फोन आला "हॅलो, ऋतुराज का? मी माझेमन". अमितवने त्यांना माझा नंबर दिला होता कि दहिसरवरून एकत्र या म्हणून, पण मी आधीच निघालो आणि मग माझेमन थोडा वेळात निघाल्या. जरा डुलका काढावा म्हटलं तर कधी नव्हे ते ड्रायवर स्वतःहून गप्पा मारायला लागला. तो अगदी गजराज राव सारखा दिसत होता. डिट्टो. युद्ध संपलं का? झेलमच पाणी सोडलं का? ठाणे बोरिवली बोगद्याचे काम सुरु झालं का? मला काय विचारतोय ... मग म्हटलं मै जरा सोता हूं तर उलट म्हणे असे तिन्हीसांजेला झोपू नये.... मग त्याने पंपावर गाडीत गॅस भरून घेतला. तरीही अगदी वेळेत पोचलो. तीन हात नाक्याजवळच्या ठाणे क्लब मध्ये हे विवि बिस्ट्रो आहे. बाजूला तरण तलावाचे निळेशार पाणी,आत सुंदर सजावट, उत्तम प्रकाशयोजना आणि ते सांद्र का काय ते संगीत. त्यामुळे आपण भारी जागेत आलोय याची खात्री पटली. लगेच नुसत्या जागेचे दोन चार फोटो काढून घेतले. तोवर निरू आलेच होते. आम्ही जे टेबल बुक केलं होत त्यावर बऱ्याच साळकाया माळकाया बसल्या होत्या, त्या काही हटेनात, मग आम्हाला दुसरीकडे तसेच टेबल लावून दिले. जागेची निवड अगदी उच्च आणि भारी होती - ऑल क्रेडिट टू निरुदा. लगेचच अमितव, भरत आणि ललिता-प्रिती आले. नमस्कार चमत्कार झाले इतक्यात ममो ताई आल्या. आता सगळे एकदम गप्पा मारायला सज्ज झाले.

II इति विवि गटग वृत्तान्त प्रथमोध्याय: समाप्त II

निरू, त्या वेटरला प्रत्येक फोटो मध्ये इंटिरिअर आलंच पाहिजे ही त्याच्या मॅनेजरने शिकवण दिली असणार बहुतेक Proud <<
असणारच बहुतेक..
आपले सगळ्यांचे फोटो वेटरने काढलेयत. पण सकाळचे जागेचा प्रपोगंडा करणारे फोटो मी काढलेले आहेत.. Wink

ॠतुराज, भारी चाललाय वृतान्त.
पहिल्या अध्यायावरुनच कल्पना आली.
आपल्या भगवद्गीतेत १८ अध्याय आहेत हे तुलाही माहिती असेलंच..

अरे मस्त झालेलं दिसतंय गटग. जागाही छान वाटते आहे.
अमित, भरत, निरु सर, माझेमन आणि ऋतू - खूप भारी लिहिले आहेत वृत्तांत. मजा आली वाचायला.

धाग्याच्या हेडर मधली टीप २ आवडली Proud

@लले, ते एक सोबो गटग कधीचं पेंडींग आहे त्याच काय ते घे एकदा मनावर. >>> मी याचीच वाट बघत होते Proud

रोज रात्री किमान अर्धा तास पुस्तक वाचायचं हा तिच्याकडून शिकलेला धडा मी आजपासून आचरणात आणायचा प्रयत्न करेन >>> वा! आगे बढो...
तो व्यायामाचा एक धागा आहे धावूगल्ली, तसा वाचनाचा काढायला हवा- 'आज काय वाचलं, किती वेळ वाचन केलं'.
पूर्वी एक 'वाचनकट्टा' नावाचा वाहता धागा होता खरं... त्याला जिवंत करायला हवा पुन्हा.

झकास झालेले दिसते गटग. पाहुणे खुश आहेत म्हणजे संयोजक जिंकले Lol

वृत्तांत हळू हळू वाचतो आहेच. ती जागा मात्र फारच आवडली. सुंदर आहे एकदम. कधी तरी मुंबई गटग जमले तर तिथेच करावे असा विचार मनात येऊन गेला Wink अर्थात ते जमणार कधी हे काय माहिती Proud

वृत्तांत हळू हळू वाचतो आहेच. ती जागा मात्र फारच आवडली. सुंदर आहे एकदम. >> +१
वृत्तांत फोटो गप्पा सगळे मस्त झाले. मज्जा केली एकंदर सगळ्यांनीच…>>+१

गटग मस्त झालेले दिसते! मजा आली सर्वांचे वृ वाचून. फोटोही मस्त. अमितला ३-४ वेळा तरी भेटलोय. ललिता-प्रीति ला मी भेटलोय असा माझा समज आहे व तिला खात्री नाही. मंजुडीला भेटलोय की नाही लक्षात नाही पण तिचा फोटो मी ओळखला. इतरांची ओळख परेड करणार होतो पण स्क्रोल करताना अमितची "स्थायी समिती- संगीत खुर्ची" पोस्ट वाचली व कळालेच. हे रेस्टॉरंटही फार मस्त दिसत आहे अशा दीर्घ गटग करता. केवळ त्याकरता सुद्धा कधीतरी ठाण्याला यायची तयारी आहे (म्हणजे भारतात आल्यावर, इथून नव्हे Happy ) तीन हात नाक्याजवळच आमच्या ऑफिसची एक डिविजन पूर्वी होती, मी तेथे ३-४ महिने काम केले आहे. पण मधे एकदा मी त्या भागातून गेलो तेव्हा तो भाग ओळखलाच नाही.

खाण्यापिण्याचे कोणीच काही वर्णन केलेले नाही, की मी वरवर वाचले ते बघतो पुन्हा एकदा. पहिल्या पानावर फक्त एक कॉफीचा दरवळ आहे.

अमितचा मुंबईत पोहोचल्याचा मेसेज व हा धागा इतक्या पाठोपाठ आले की मला वाटले अमित घरी जायच्या आधीच एक गटगला आला Happy काउण्टरजवळ अमितच्या दोन जंगी बॅगा ठेवल्या आहेत व इतर कुतुहलाने तेथे पाहात आहेत, एक दोन वेटर्स त्या एका हाताने उचलून शक्तीप्रदर्शन करत आहेत ई इमॅजिन केले Happy

ललिताप्रितीला भेटायची मला फार इच्छा होती. तिचं चौफेर वाचन, काही चांगलं वाचलं की धागा काढून लिहिणं आणि एकुण समाजविषयक पोटतिडकीने मत मांडणे >>> अमित या वाक्यात "इच्छा होती" च्या नंतर एक "पण" आहे असे मला आधी वाटले Wink "दिग्गज" बद्दल मात्र सहमत.

तो तिने सकाळी झोपेतून उठल्यावर किंवा उठायच्या आधीच वाचला >>> Lol

लाघवी... हा शब्द हल्ली लिहिण्याची पद्धत आहे म्हणे >>>> Lol इंग्रजीत अशाच समर्पक कॉमेण्ट्सना "Touche" म्हणतात बहुतेक (ई च्या डोक्यावर ती फ्रेंच मात्रा)

किल्ली कडून भरतचा नंबर ही ऋतुराजने मिळवला >>> विविध लोकांचे नंबर तिच्याकडून मिळत असतील, तर तिचा आयडी एकदम चपखल आहे Happy

आम्ही सोडलो तर मोठ्याने बोलणारे लोक तिकडे येत नाहीत >>> Happy

फार श्रीमंत असल्याचा फील आला काल एकुणच >>> जोक्स अपार्ट, याच्याशी टोटली सहमत आहे. मलाही असेच वाटले आहे नेहमी मी कोठे गेल्यावर जेव्हा गटग झाले आहे तेव्हा.

Pages