दीनानाथ मंगेशकर रुग्णालय - तनिषा भिसे मृत्यू प्रकरण

Submitted by भरत. on 8 April, 2025 - 02:37

पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका गर्भवती स्त्री- तनिषा / ईश्वरी भिसे - यांना डिपॉझिट न भरल्याने अ‍ॅडमिट करून घेतले नाही आणि नंतर त्यांचा अन्य इस्पितळात बाळंतपणानंतर मृत्यू झाला. याबद्दल सगळ्यांनी वाचलेच असेल.
रुग्णालयाचे इन चार्ज डॉ केळकर यांच्या पत्रकार परिषदेतील वक्तव्यांबद्दल उलट सुलट वाचायला मिळते आहे. म्हणून या पत्रकार परिषदेच्या व्हिडियोची लिंक शोधली.

डॉ केळकर अतिशय आश्वस्त स्वरात आणि आत्मविश्वासाने पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे जाताना पाहून बरे वाटले.
पण दोन गोष्टींचे नवल वाटले.

१ डॉक्टरांकडून डिपॉझिट मागायची पद्धत नाही. त्या दिवशी काय राहू केतू त्यांच्या (डॉ घैसास) आला आणि त्यांनी १० लाख रुपये डिपॉझिट (रुग्णाच्या पेपरवर ) लिहिले.

२. रुग्ण व त्यांचे नातेवाईक त्या दिवशी रुग्णालयात ५-६ तास होते. ते यापूर्वी ५-६ वेळा येऊन गेले होते. त्यांना इथली माहिती होती . हे रुग्ण प्रशासनाच्या कोणाकडेही - सचिन व्यवहारांचे ऑफिस, चॅरिटीचे ऑफिस यांच्याकडे आले असते, तर आज या प्रकरणाला हे वळण लागले नसते.

रुग्णालय कर्मचार्‍यांपैकी कोणी त्यांना या मंडळींना भेटा असे सांगितले का? मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आला होता, असेही बातम्यांमध्ये वाचले. त्याचाही उपयोग झाला नाही ?

--
भाजप महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी डॉ सुश्रुत घैसास यांच्या आई वडिलांच्या अश्विनी नर्सिंग होम मध्ये तोडफोड केली.
त्याचा व्हिडियो - चित्रा वाघ यांच्या ट्वीटची लिंक

सुश्रुत घैसास यांच्या आईंनी पत्रकारांच्या प्रश्नांना दिलेली उत्तरे.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या चौकशी समितीने काढलेला निष्कर्ष.
deenanath.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रुग्णालयाचा खुलासा हे कोर्टाचे जज्जमेंट आहे का?
त्यांच्या दोन्ही प्रेस मधल्या विसंगती दिसत नाहीत का? सूर्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या मुलाखती शोधून बघा. दोन्ही मुली तिथेच जन्मल्या आहेत.
धर्मादाय आयुक्तांचा अहवाल आला आहे.
पोलीस आणि मनपा सुद्धा चौकशी करणार आहे. पोलिसांनी सुरू केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिलेले आहेत.
एव्हढे सगळे विरोधात असून एक बाजू लावून धरताय याबद्दल खरंच हॉस्पिटल कडून फूल ना फुलाची पाकळी दिली पाहिजे.

जेव्हा चौकशीचा निकाल जनतेला उपलब्ध होईल तेव्हा तरी दोषी कोण हे स्विकारणार का?

हे मध्येच जातीचं काय आता?!

संतोष देशमुखांच्या हत्येसंबंधीचा धागा आहे मायबोलीवर.

वाबळे थोर शोधपत्रकार असतील, पण ही स्पेसिफिक बातमी त्यांनी आणि त्यांच्या अँकरने नीट दिली नाही. नीट बातमी म्हणजे सुसंबद्ध, प्रमाणित माहिती. चकाचक ऑफिस आणि चर्चासत्रं नव्हेत. यात जात कुठून आली?!
एकतर माहिती तुकड्यातुकड्यांनी मिळते आहे, आणि जी मिळते आहे ती सुसंगत वाटत नाही. यात जात कुठून आली?!
आणि कोणाची जात? भिश्यांची की वाबळ्यांची की घैसासांची की मंगेशकरांची?!
कैच्याकै!

>>> एव्हढे सगळे विरोधात असून एक बाजू लावून धरताय
रानभुली, मला नाही वाटत कोणी कोणाची 'बाजू' लावून धरतंय किंवा व्हिक्टिम बॅशिंग करतंय इथे. हॉस्पिटल आणि कुटुंबीय - दोन्ही बाजूंकडून समोर येणार्‍या माहितीची (एकमेकाशी पडताळून नव्हेच, ते तर फार लांब राहिलं!) सुसंगती लागत नाही. दोन्हीही बाजू काहीतरी लपवत आहेत किंवा पूर्ण सत्य सांगत नाही आहेत असा वाचताना ग्रह होतो आहे म्हणून हे प्रश्न उठत आहेत.

>>> तेव्हा तरी दोषी कोण हे स्विकारणार का?
दोषारोप हा हेतू दुय्यम आहे, त्या बिचार्‍या बाईंचा जीव गेलाच आहे - अशा घटना पुढे टाळता याव्यात म्हणून काय बदलायला हवं, हा विचार जास्त महत्त्वाचा नाही का?

चर्चा वाचली तर काय ग्रह होतो पण?
आरोपीचा लेखी खुलासा हा पुरावा असल्याप्रमाणेच निकाल दिलेत. असो.
किमान दोन्ही बाजू ऐकून घेतल्या या नोटवर आली चर्चा.

शा घटना पुढे टाळता याव्यात म्हणून काय बदलायला हवं, हा विचार जास्त महत्त्वाचा नाही का? >> माझ्या पोस्टमधे हा मुद्दा वारंवार आलेला आहे. पण अनेक पोस्टमधे व्हिक्टीम बॅशींग झालेलंच आहे. त्यामुळे दुसरी बाजू मांडत बसावी लागली.

१. अनघा_पुणे यांचा मुद्दा क्र. २ बरोबर आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या म्हणण्यानुसार ईश्वरी भिसे त्यांच्याकडे गर्भारपणात पहिल्यांदा १५ मार्चला म्हणजे गर्भारपणाच्या थेट सातव्या महिन्यात आल्या. या आधीच्या तपासण्या जिथे त्यांनी IVF treatment घेतली त्या Indira IVF मध्ये करीत होत्या की कसे, डिलिव्हरी तिथेच होणार होती का , हे कळत नाही.
डॉ घैसास यांनी सात दिवसांनी म्हणजे २२ तारखेला या असे सांगूनही त्या आल्या नाहीत. थेट २८ तारखेला रक्तस्राव होतो आहे म्हणून आल्या.
या बाबी भिसे कुटुंबाने अमान्य केल्यात का याची कल्पना नाही. इतक्या उशिरा आपल्याकडे आलेल्या रुग्णाला ,तोही जोखमीचा रुग्ण , ट्रीट करायची तयारी दर्शवणे हा दीनानाथचा चांगुलपणाच म्हणायला हवा.

पुणे महापालिकेची The maternal death audit committee या प्रकरणाची चौकशी करते आहे. (याच नाही, प्रत्येक गर्भवती स्त्रीच्या मृत्यूची चौकशी ही समिती करते). त्यात दीनानाथ बरोबरच, इंदिरा IVF , सूर्या आणि भिसे कुटुंबीय यांचीही चौकशी होते का हे पुढे कळेलच.

२. डिलिव्हरी आणि पुढे प्रिमॅच्युअर जन्मलेल्या मुलांच्या काळजीसाठी १०-२० लाख रुपये खर्चाचा अंदाज २८ मार्च रोजी दिला गेला. त्या आधी देण्याचा प्रश्न येत नाही. डिलिव्हरी प्रिमॅच्युअर होईल / करावी लागेल हे याआधी माहीत होते, असे दिसत नाही. त्यामुळे त्यांना १० लाख रुपयांची जुळवाजुळव करायला वेळ लागणे स्वाभाविक आहे.

3 या प्रकरणात डिपोझिटची रक्कम डॉक्टरांनी लिहिली हे इस्पितळही नाकारत नाही. तसंच ही रक्कम ओपीडी नोट वर लिहिलेली नाही.
शस्त्रक्रियेसाठी दाखल होणार्‍या रुग्णांना देण्यात येणार्‍या पेपरवर लिहिली आहे.

४ मुख्यमंत्री कक्षातून दाखल करून घेण्यासाठी रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना फोन आल्याचे कुठे वाचले , ऐकले नाही.

५. आम्हांला इमर्जन्सी आहे किंवा आम्ही इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये आहोत, असे भिसे कुटुंबाने म्हटल्याचे वाचले / ऐकले नाही. ते ओपीडीत आले, इमर्जन्सीत नाही, हे दीनानाथही म्हणते आहे. पुढे ही इमर्जन्सी सिच्युएशन कशी झाली? हे आरोग्य विभागाच्या चौकशी समितीच्या अहवालात आहे. या अहवालातून -
प्राथमिक चौकशीनंतरचे निष्कर्ष
१) ४ एप्रिल २०२५ ला राज्यस्तरावरुन नियुक्त कऱण्यात आलेल्या समितीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला भेट दिली. तनिषा भिसे (आधार कार्डानुसार नाव-मोनाली गणेश रुद्रकर) यांच्या मृत्यूबाबतची चौकशी केली. यामध्ये डॉ. घैसास, डॉ. रुचिका कांबळे व श्रीमती रसिका सावंत यांनी तपासणी केली आणि रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. तसंच नवजात अर्भक कक्षातील डॉ. शिल्पा कलानी यांची भेट करुन देण्यात आली. कमी वजनाची, ७ महिन्यांची जुळी मुलं, जुन्या आजारांची गुंतागुंत व कमीत कमी दोन ते अडीच महिने एनआयसीयू उपचार लागतील हे सांगितलं आणि १० ते २० लाख रुपये खर्च लागेल अशीही कल्पना दिली. त्यावर रुग्णाला दाखल करुन घ्या आम्ही पैशांच्या व्यवस्थेसाठी प्रयत्न करत आहोत असं सांगितलं. सदर रुग्णालय हे धर्मदाय रुग्णलाय अधिकृत असून डॉ. घैसास, डॉ. रुचिका कांबळे डॉ. शिल्पा कलानी,श्रीमती रसिका सावंत, श्रीमती मिनाक्षी गोसावी, श्रीमती माधुरी पणसीकर, श्रीमती शिल्पा बर्वे, श्री सचिन व्यवहारे आणि रवि पालवकेकर यांच्यापैकी एकाही डॉक्टर किंवा कर्मचारी यांनी धर्मादाय योजनेच्या अंतर्गत पात्र असताना रुग्णालयात दाखल करुन घेतलं नाही हे स्पष्ट होतं. याबाबत बॉम्बे पब्लिक ट्रस्ट अॅक्ट १९५० मधील स्कीम क्रमांक ३ नुसार ज्यावेळी तातडीची वेळ असते त्यावेळी रुग्णाला आधी दाखल करुन घेणं आवश्यक असतं. हा नियम सुश्रुषागृहे, धर्मदाय रुग्णालयांना लागू होतो. मात्र या ठिकाणी रुग्णालयाने या नियमाचा भंग केला आहे असं दिसून येतं. याबाबत धर्मादाय आयुक्तांनी कारवाई करावी अशी शिफारस आम्ही करत आहोत.

२) रुग्णालायच्या खुलाशानुसार सदर रुग्ण साडेपाच तास रुग्णालयात होता, डॉक्टरांना कल्पना न देता निघून गेला असे नमूद केलं आहे. मात्र शुश्रुषागृहांनी रुग्णाच्या आर्थिक क्षमतेचा विचार न करता गंभीर रुग्णांना प्राथम्याने मुलभूत जिवीत रक्षण सेवा देतील आणि त्यानंतर आजारासंबंधी वैद्यकीय टिपणीसह लवकरात लवकर अशा रुग्णालयाला नजीकच्या संदर्भ रुग्णालयात संदर्भित करतील अशी तरतूद आहे. तरीही असं काही झाल्याचं दिसून आलं नाही. त्यामुळे रुग्णालयाने अॅक्टमधील तरतुदीचा भंग केला असल्याने नियमानुसार वैद्यकीय अधिकारी, पुणे महापालिका यांनी शुश्रुषागृह नोंदणी २०२१ यांना कारवाई करण्यासाठी शिफारस करण्यात येते आहे.

३) सदर मृत्यू हा माता मृत्यू असल्याने याबाबत सखोल चौकशी माता मृत्यू अन्वेषण समिती मार्फत करण्यात येत असून सगळ्या बाबींची सखोल चौकशी करुन अहवाल आणि मात मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल यावरुन निष्कर्षांसह अंतिम अहवाल तयार करण्यासाठी काही कालावधी लागणार आहे, तो अहवालही लवकरच सादर केला जाईल.

( लोकसत्तेच्या संकेतस्थळावर ही बातमी वाचताना मजकूर कॉपी पेस्ट करता येत नव्हता. प्रिंट स्क्रीन केल्यावर सगळा मजकूर जाहिरातींशिवाय सलग दिसला आणि कॉपी पेस्ट करता आला. यातलेच काही मुद्दे मुंबई तकच्या वार्ताहराने धर्मादाय आयुक्तालयाच्या अहवालाच्या बातमीसंबंधी व्हिडियोमध्ये सांगितले आहेत. )

मुंबई तक हे इंडिया टुडे ग्रुपचं मराठी चॅनेल आहे. ते यु ट्यूब चॅनेल आहे. त्यांचा स्टुडियोही आहे. या चॅनेलला वेगळा कोणी एडिटर आहे का याची कल्पना नाही. पण आज तक वर दिसायचे ते साहिल जोशी आता या मुंबई तक वर दिसतात. मुंबई तक च्या संकेतस्थळावर त्यांची ओळख इंडिया टुडे ग्रुपचे सिनीयर Managing Editor अशी दिली आहे.

भरत तुम्ही काढलेला निष्कर्ष पटतो.
फक्त एकच की डिलिव्हरी प्रिमॅच्युअर होईल / करावी लागेल हे याआधी माहीत नव्हते हे पटत नाही.
जनरली जुळी असली तर आईची तब्येत उत्तम असली तरी प्रीमिची शक्यता वाढते. डॉक्टर हे आवर्जून सांगतात. त्यातून ivf केले की नॉर्मल प्रसूतीसाठी थांबायचे की सी सेक्शन करायचे यावरही चर्चा झालेली असते. २० लाख खर्च होईल असे कुटुंबाला वाटले नसेल किंवा वेळ आलीच तर पाहू असाही विचार केला असेल. .

प्रेग्नंसी डायबिटीस किंवा वाढलेले बीपी (eclampsia ला कारणीभूत ) या कंडिशनमध्येही नॉर्मल प्रसूतीची वाट पाहणे टाळले जाते. बीपी तर पहिल्या तपासणीपासून मॉनिटर करतात.

मला एक गोष्ट समजत नाही आहे, इथे लोकांच्या डोक्यात इतका गोंधळ का आहे? (नक्की गोंधळ आहे? कि उगाच आपला कांगावा करताहेत?) इथल्या शिक्षित लोकांनाही 'चूक' आणि  'गुन्हा' यातला भेद ध्यानात येऊ नये याचे नवल वाटते ? या केस मध्ये जेंव्हा रुग्णालयाने 'धर्मदाय' श्रेणीत असून रुग्ण दाखल करून घेण्यासाठी दहा लाख मागितले हे मान्य केले, इतका एकच मुद्दा या प्रकरणात रुग्णालयच दोषी आहे हे ठरवायला पुरेसा आहे. इतकं  साधं सरळ गणित आहे, नी इथे रुग्णाच्या नातेवाईकांनी असं का नाही केले?, तसं  का नाही केलं?, हेच का केलं?  आणि तेच का केलं? याचा किस पडला जातोय... अरे काय चालवलंय काय? अरे स्वतःला एकदा प्रश्न विचारा आपल्या देशात या सर्व गोष्टींसाठी काही डिफाइन्ड नियम किंवा कायदे आहेत का? की ज्यांचं पालन बंधनकारक आहे? रुग्णाच्या नातेवाईकांनी जे केलं ते 'चूक' या सदराखाली मोडतं. इथे नियमबर हुकूम ( नियम / बंधनं / कायदे आखून दिले असतानाही ) कोण नाही वागलं?  कायद्याची पायमल्ली कुणी केली? जो कायद्याचे उल्लंघन करतो, तो 'अपराध' करतो, आणि तोच गुन्हेगार ठरतो....जे या प्रसंगात रुग्णालयाने केलं....चुका होणे हे सामान्यतः अपेक्षित असते आणि माफी योग्य ही, पण अपराध नाही. इतकं  साधं सरळ स्थापित सुत्र आहे. आखून दिलेल्या ( गंभीर अथवा सामान्य चुका होऊ नयेत म्हणून ) कर्तव्यात कसूर करणं हा अपराधच आहे, मग त्यामागे  कारणं काही असोत, त्यावर उगाच व्हॉटअबाऊटरी करून काय साध्य होणार?  बाकी रुग्णालयाचा टॅक्स, तोडफोड, पैसे फेक या सर्व राजकीय गोष्टी आहेत आणि ते न कळण्या इतपत इथला वाचक मूर्ख (कधी कधी आव आणत असला तरी) नक्कीच नाही आहे. 

>>> रुग्णालयाने 'धर्मदाय' श्रेणीत असून दहा लाख मागितले हे नाकारले नाही
फाविदडि, धर्मादाय रुग्णालय म्हणजे सर्वांसाठी नि:शुल्क उपचारांची हमी नाही, तर रुग्णाच्या आर्थिक क्षमतेनुसार सवलत असा कायदा आहे असं वर आलेल्या दुव्यावरून दिसतं आहे.

फाविदडि, धर्मादाय रुग्णालय म्हणजे सर्वांसाठी नि:शुल्क उपचारांची हमी नाही>>>> मी निशुल्क उपचारांबद्दल नाही बोलत आहे, रुग्ण दाखल करून घेण्याबद्दल जे नियम आहेत त्यावर माझे बोट आहे. (प्रतिसाद संपादित केला आहे.)

नि:शुल्क उपचार असा कुणाचाही समज नाही इथे.
अपुरे पैसे असतील तरी दाखल करून घेऊन नंतर गरज पडल्यास धर्मादाय निधीतून बिल चुकता करता येते.
या रूग्णाला यापूर्वी पात्र ठरवले होते. ५०% कन्सेशन दिले होते. आताही तो पात्र आहे असा निर्णय असल्याचे बातम्या सांगतात.
समजा नसेल तरी तीन लाख रूपये घेऊन ट्रीटमेंट करता आली असती इतकाच मुद्दा आहे.
धर्मादाय रूग्णालयाने दहा लाखच भरा नाहीतर ससूनला जा असे सांगणे अपेक्षित नाही.

धर्मादाय सवलतीला पात्र असेल नसेल पण emergency असेल तर प्राथमिक उपचार द्यायलाच हवेत. Emergency नसेल तर हॉस्पिटल ने तसं विना संधिग्दता स्पष्ट करावं.

स्वाती, वर मी जो राज्य शासनच्या आरो ग्य समितीचा अहवाल डकवला आहे, त्यात
१ धर्मादाय योजनेच्या अंतर्गत पात्र असताना रुग्णालयात दाखल करुन घेतलं नाही
२ तातडीची वेळ असताना रुग्णाला दाखल करून घेतलं नाही
या दोन मुद्द्यांवरून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला दोष दिला आहे. आणि त्यावरून धर्मादाय आयुक्तालयाने कारवाई करावी असं म्हटलं आहे.

हे निष्कर्ष काढताना त्यांनी इस्पितळ आणि नावं घेतलेल्या कर्मचार्‍यांचं म्हणणं ऐकलं नसेल, असं वाटत नाही.

> धर्मादाय रूग्णालयाने दहा लाखच भरा नाहीतर ससूनला जा असे सांगणे अपेक्षित नाही.
रूग्णालयाने 'दहा लाखच भरा नाहीतर ससूनला जा' असे सांगितले होते हे निर्विवादपणे सिद्ध झाले आहे का?

>>> या दोन मुद्द्यांवरून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला दोष दिला आहे. आणि त्यावरून धर्मादाय आयुक्तालयाने कारवाई करावी असं म्हटलं आहे.
होय, आणि ते योग्यच आहे.

>>> रुग्ण दाखल करून घेण्याबद्दल जे नियम आहेत त्यावर माझे बोट आहे.
आलं लक्षात. बरोबर आहे.

>>5. पेशंट जुना असल्याने याच हॉस्पिटल ला येणं स्वाभाविक नाही का?<<
हा प्रश्न मलाहि पडलेला. नॉर्मलि प्रेग्नंसी कंफर्म झाल्यावर पुढचे सगळे उपचार/सोपस्कार एकाच हॉस्पिटल (गाय्नॅक) कडे होतात. असं असताना एका धर्मादाय संस्थेने पेशंटला प्रवेश नाकारणं व्यावसायिक दृष्ट्या (नोबल प्रोफेशन+हिपक्रॅटिक ओथ) चूक आहे, पर्हॅप्स ए नॉन-काग्निझेबल आफेंस. बाकि ती उशीरा गेलेली, अपॉइंटमेंट मिस केलेली, पैशाची व्यवस्था वेळेवर केली नाहि वगैरे मुद्दे गौण आहेत...

सिद्ध म्हणजे कसे ?
दहा लाख भरा हे तर केस पेपर मधेही आहे आणि दाखल करून घेतले नाही हा ठपका धमादाय आयुक्तांच्या चौकशीत आहे. मनपाच्या चौकशीचा अहवाल मला माहिती नाही. पण वरच्या पोस्टमधे आहे असे दिसते. आता राहिली पोलीस चौकशी. म्हणजे नेमकं काय सिद्ध व्हायला पाहीजे ?
सीसीटीव्ही पडताळले नसतील का चार तास पेशंट तिथे होता त्याचे. वर सर्वांनी लिहीले आहे कि केळकरांनी सुद्धा नाकारलेले नाही.

ससूनला जायचा सल्ला दिला होता असे रूग्णालयाने म्हटलेय ना ?

<रूग्णालयाने 'दहा लाखच भरा नाहीतर ससूनला जा' असे सांगितले होते हे निर्विवादपणे सिद्ध झाले आहे का?> चौकशी अहवालाच्या बातमीत दहा लाख, डिपॉझिट यांच्याबद्दल काही नाही. अ‍ॅडमिट करून घेतलं नाही , धर्मादाय सवलतीचा लाभ दिला नाही याबद्दल ठपका आहे.

दहा लाखांचा मुद्दा या समितीच्या कक्षेत येत नसेल.

आज तक वरच्या बातमीत म्हटलं होतं की अशा क्रिटिकल पेशंटला अन्यत्र जायचं असेल तर प्रथम स्टेबल करून दुसर्‍या हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी अँब्युलन्सची सोय करणं ही हॉस्पिटलची जबाबदारी आहे. हेही त्या अहवालात शासकीय मराठीत लिहिलं आहे. ( अँब्युलन्सचा उल्लेख बातमीत नाही. अहवाल बातमीपुरताच वाचायला मिळाला)

<नॉर्मलि प्रेग्नंसी कंफर्म झाल्यावर पुढचे सगळे उपचार/सोपस्कार एकाच हॉस्पिटल (गाय्नॅक) कडे होतात.>

पेशंट प्रेग्नन्सी कन्फर्म होताच दीनानाथ मध्ये आली नव्हती. सहाव्या किंवा सात व्या महिन्यातच पहिल्यांदा - १५ मार्चला आली. हे दीनानाथचं म्हणणं आहे. पण हे unusual आहे का? सासर एका भागात असेल तर जवळचा डॉक्टर 7-8 महिने होईपर्यंत नियमित चेकअप साठी...
आणि मग दुसऱ्या लांबच्या भागात माहेर आहे तर डिलिवरी तिकडच्या डॉक्टरकडे असे करतात ना?

वगैरे मुद्दे गौण आहेत...>>. गौणपेक्षा पुर्णपणे असंबद्धीत आहेत, कारण आतापर्यंत या धाग्यात चर्चिलेल्या पैकी कोणताच मुद्दा रुग्णालयातील मेडिकल ऑथॉरीटीजनी त्यांनी रुग्ण दाखल करुन घेण्यासाठी ( शुल्क म्हणून नाही) जी दहा लाखांची आगावू मागणी केली त्याचं कारण (causation) होऊ शकत नाही.

'खर्च दहा लाख येईल' असे सांगणे आणी ' पूर्ण दहा लाख आता भरा नाही तर अ‍ॅडमिट करून घेणार नाही!' असे सांगणे यात फरक आहे ना?

खर्च दहा लाख येईल' असे सांगणे आणी ' पूर्ण दहा लाख आता भरा नाही तर अ‍ॅडमिट करून घेणार नाही!' असे सांगणे यात फरक आहे ना? >>> चार पाच तास अ‍ॅडमिट करून घेतलेलं होतं असं म्हणायचंय का ?

'खर्च दहा लाख येईल' असे सांगणे आणी ' पूर्ण दहा लाख आता भरा नाही तर अ‍ॅडमिट करून घेणार नाही!' असे सांगणे यात फरक आहे ना?>>> सामान्य तर्कानुसार जर अशी परिस्थिती असती तर घैसास यांनी राजीनामा देण्याआधी हे ठासून बोलणं अपेक्षित होतं आणि रुग्णालयायाच्या सर्वप्रथम औपचारिक संबोधनात ( official statement) सर्वात प्रथम हे वाक्य असायला हवे होते....पण तिथे विपरीत परिस्थिती दिसून येते आहे.

>>> चूक वि. गुन्हा.
येस अ‍ॅन्ड नो.
जिला चूक म्हटलं आहे, तोही खरंतर गुन्हा असायला हवा. डॉक्टरांनी धोक्याचा कंदिल दाखवलेला असताना जाणूनबुजून एका व्यक्तीचा जीव धोक्यात घालणं हा गुन्हा का नाही कोण जाणे. पण तो अर्थातच या चर्चेचा विषय नाही.

तात्विकदृष्ट्या अनघा_पुणे ह्यांच्या सर्व प्रतिसादांशी सहमत आहे!
इतक्या उलट-सुलट बातम्या आणि माहिती ("खरी-खोटी देव जाणे"... हे कोणी राहु-केतु वाल्या विधानाप्रमाणे घेतले तरी काही पर्वा नाही.) समोर येत आहे कि नक्की कोण बरोबर आणि कोण चुक ह्यचा काही अंदाजच बांधता येत नाहिये. त्यामुळे ह्या प्रकरणाच्या बाबतीत 'वेट अँड वॉच' हे तत्व पाळायचे ठरवले आहे.

>>"जेव्हा चौकशीचा निकाल जनतेला उपलब्ध होईल तेव्हा तरी दोषी कोण हे स्विकारणार का?">>
निकाल तथ्याधारीत असेल तर नक्कीच स्विकारला जाईल... पण बदलापुरच्या प्रकरणाप्रमाणे 'खरे आरोपी उजळमाथ्याने समाजात वावरत आहेत आणि कोणा अक्षय शिंदेला एनकाउंटरमध्ये ठार मारुन केसच रफा-दफा करण्याचा प्रयत्न झाला' अशी उघड चर्चा तिथले सामान्य नागरीक करताना दिसतात. तसेच काही ह्या प्रकरणातही झाल्यास असल्या भंपक चौकशीचा निकाल कोणी का स्विकारावा?

जिला चूक म्हटलं आहे, तोही खरंतर गुन्हा असायला हवा. डॉक्टरांनी धोक्याचा कंदिल दाखवलेला असताना जाणूनबुजून एका व्यक्तीचा जीव धोक्यात घालणं हा गुन्हा का नाही कोण जाणे>>> हा दृष्टिकोन ही पुर्णपणे चुकीचा आहे हे नाही म्हणू शकत भावनिक दृष्टीने समजण्यासारखा( considerable) आहे, पण संविधानाने दिलेल्या मुलभूत हक्कांच्या कक्षेतील ही बाब असल्याने तिला कायद्याच्या कक्षेत आणणे जवळपास अशक्य आहे. (जबरदस्तीने लादल्या गेलेल्या गर्भधारणेसाठी बलात्काराचा गुन्हा सध्याच्या कायद्यानुसार होऊ शकतो...जे या प्रकरणात सध्या असंबद्ध दिसते आहे.).

Pages