दीनानाथ मंगेशकर रुग्णालय - तनिषा भिसे मृत्यू प्रकरण

Submitted by भरत. on 8 April, 2025 - 02:37

पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका गर्भवती स्त्री- तनिषा / ईश्वरी भिसे - यांना डिपॉझिट न भरल्याने अ‍ॅडमिट करून घेतले नाही आणि नंतर त्यांचा अन्य इस्पितळात बाळंतपणानंतर मृत्यू झाला. याबद्दल सगळ्यांनी वाचलेच असेल.
रुग्णालयाचे इन चार्ज डॉ केळकर यांच्या पत्रकार परिषदेतील वक्तव्यांबद्दल उलट सुलट वाचायला मिळते आहे. म्हणून या पत्रकार परिषदेच्या व्हिडियोची लिंक शोधली.

डॉ केळकर अतिशय आश्वस्त स्वरात आणि आत्मविश्वासाने पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे जाताना पाहून बरे वाटले.
पण दोन गोष्टींचे नवल वाटले.

१ डॉक्टरांकडून डिपॉझिट मागायची पद्धत नाही. त्या दिवशी काय राहू केतू त्यांच्या (डॉ घैसास) आला आणि त्यांनी १० लाख रुपये डिपॉझिट (रुग्णाच्या पेपरवर ) लिहिले.

२. रुग्ण व त्यांचे नातेवाईक त्या दिवशी रुग्णालयात ५-६ तास होते. ते यापूर्वी ५-६ वेळा येऊन गेले होते. त्यांना इथली माहिती होती . हे रुग्ण प्रशासनाच्या कोणाकडेही - सचिन व्यवहारांचे ऑफिस, चॅरिटीचे ऑफिस यांच्याकडे आले असते, तर आज या प्रकरणाला हे वळण लागले नसते.

रुग्णालय कर्मचार्‍यांपैकी कोणी त्यांना या मंडळींना भेटा असे सांगितले का? मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आला होता, असेही बातम्यांमध्ये वाचले. त्याचाही उपयोग झाला नाही ?

--
भाजप महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी डॉ सुश्रुत घैसास यांच्या आई वडिलांच्या अश्विनी नर्सिंग होम मध्ये तोडफोड केली.
त्याचा व्हिडियो - चित्रा वाघ यांच्या ट्वीटची लिंक

सुश्रुत घैसास यांच्या आईंनी पत्रकारांच्या प्रश्नांना दिलेली उत्तरे.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या चौकशी समितीने काढलेला निष्कर्ष.
deenanath.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<जशी या घटनेत सामिल असणाऱ्या रूग्णालयाची चौकशी होते आहे तशीच रूग्णाच्या कुटुंबाने देखील काही हलगर्जीपणा केला आहे का याची चौकशी व्हायला हवी. > गर्भवती अपमृत्यूच्या केसेसची नियमित चौकशी होते. त्या खाली याही प्रकरणाची चौकशी होते आहे, असं डॉ केळकर म्हणाल्याचं आठवतं. रुग्णाच्या कुटुंबाचीही चौकशी व्हायला हवी याबद्दल सहमत.

< त्यांच्या उस्फूर्त बोलण्यातली विसंगती पकडून बसणे हे का होतंय?> मला यात काही चूक वाटत नाही. का ते आधी सविस्तर लिहिलं आहे. तुम्हांला मान्य असलंच पाहिजे असा आग्रह नाही. एकतर ते पत्रकार परिषदेत बोलत आहेत. इतर अनेक बाबींवर अगदी सांभाळून बोलले आहेत. माझ्या बाबतीतलेच प्रश्न मला विचारा, इ. मग इथेही बोलता आलं असतं.

जसं तुम्हांला डॉ केळकर आणि डॉ घैसास यांच्या मागे उभं राहायचा हक्क आहे, तसा इतरांना त्यांना प्रश्न विचारायचाही आहे.

तुम्ही माझे प्रतिसाद पूर्ण वाचलेत की नाही, याची कल्पना नाही. पण चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल आला आहे, आणि त्यात रुग्णालय रुग्णाला चॅरिटेबल बेडसाठी पात्र असताना अ‍ॅडमिट न करणं आणि इमर्जन्सी असताना अ‍ॅडमिट न करणं या दोन बाबींवर दोषी असल्याचं म्हटलंय.
असल्याचं म्हटलंय.

शिवाय मी माझ्या लेखनात कुठेही त्या बाईंच्या मृत्यूला दीनानाथ वा तिथले डॉक्टर जबाबदार असं म्हटलेलं नाही किंवा त्याबद्दल काही लिहिलेलं नाही.

<त्या बाईंच्या जीवाला धोकाच होता. We do not know if she would have survived even then > हा मुद्दा तुम्हीच आणलाय. या वर काही प्रतिक्रिया द्यायला माझ्याकडे शब्द नाहीत.

ट्रोल्स आलेत. त्यामुळे आता हा पक्ष तो पक्ष असे असंबद्ध वळण लागणार. उद्योग आणि हॉस्पिटलची तुलना होणार. या हॉस्पिटलला कुठल्या पक्षाने सवलती दिल्या आणि एखाद्या लॉड्रीला कुठल्या पक्षाने सवलत दिली याचं गाईड घेऊन बसा.
त्या वेळी नाही आताच का.
अरे पण वैद्यकिय व्यवसाय हा भारतात सेवाच आहे. आणि ती नाकारली म्हणून जीव गेला एव्हढी संवेदनशीलता दाखवणे अवघड आहे का?
जर तुमचं नाणं खणखणीत असेल तर ते तावूनसुलाखून निघेल.

संयम नाही का?
पहिल्या प्रेस नोट मधे झालेल्या घटनांबद्दल खेद सुद्धा नव्हता म्हणून क्षोभ उसळला.
ज्यांना जिथे तिथे राजकारण दिसते त्यांच्या साठी.
हे हॉस्पिटल ज्या संघटनेशी संबंधित आहे त्यांच्याच राजकीय पक्षावर हिंसक आंदोलनं करायची वेळ आली आहे.
उगीच टाटांनी कशाला मधे घुसवता? त्या साठी वेगळा धागा काढा. इथे लाईफ इमर्जन्सी आहे तिथे काय आहे म्हणून तुलना करता?

>>>अशा सर्व सवलती खाजगी उद्योगानाही मिळतात. जेव्हा टाटा ला ममता दीदीने बंगाल मधून हाकलले आणि मग ते गुजरात मध्ये गेले. ह्या दोनही वेळी अबब त्यांनी केव्हढ्या सवलती लाटल्या होत्या त्याची यादी तेव्हा पेपर मध्ये आली होती.
त्याना कधी कोणी विचारले आहे?

Submitted by केशवकूल on 9 April, 2025 - 13:15>>>

चर्चेचा विषय काय आणि केशवराव तुम्ही बोलताय काय?

I Exit!

मला एक बेसिक प्रश्न पडला आहे.
सगळीकडे बरीच उलट सुलट माहिती, गोंधळ याने त्याचे उत्तर कुठेतरी हरवले.
पेशंट मंगेशकर हॉस्पिटलनंतर ससूनमध्ये गेला आणि प्रसूतीनंतर मृत्यू सूर्या हॉस्पिटलमध्ये झाला.
ससूनमध्ये का ऍडमिट करून घेतले नाही? या दोन हॉस्पिटलची चौकशी चालू आहे का?

chioo यांना पडलेला प्रश्न मलाही पडलाय.

मुळ धाग्यात प्रेसनोम्चे शेवटचे पान छापलेय. ती तिनपानी प्रेसनोट सो मि वर वाचलीय. त्यात पेशंट गंभीर आजारासाठी ट्रिटमेंट घेत होता हे लिहिलेय. तो गंभीर आजार म्हणजे कर्करोग हे इथे कळले. त्यांना मुल दत्तक घ्यायचा सल्ला दिला होता हेही प्रेस नोटमध्ये वाचले. जीवाशी खेळ ठरु शकेल अशी प्रेग्नन्सी स्वतःवर लादुन घ्यायची. ती घेतल्यावर सुचवलेले चेकप करायचे नाही. यातुन वाईट झाल्यावर सर्व दोष हॉस्पिटलचा म्हणायचे हे अ आणि अ वाटले. हॉस्पिटल अतीनालायक असे मानुन चाललो तरी पेशंटच्या नवर्‍याचे काय? त्याने का हे सगळे बायकोवर लादले? की तिनेच मुल स्वतःच्याच पोटातुन आलेले हवे या ईच्छेपोटी हे स्वतःवर लादले? आता जो धुरळा उडतोय त्यातुन खरे काय ते स्वच्छ दिसुन येईल असे वाटत नाही.

रच्याकने ह्या हॉस्पिटलाचेही काही धड दिसत नाही. प्रेस नोट मध्ये २ क्रमांकाचा मुद्दा नाहीय, १,३,४ आहेत. असली महत्वाची प्रेसनोट संबंधितांनी नीट वाचायला नको? अधिष्ठाता राहु केतु बोलताहेत. त्यांनी हे बोलण्याच्या ओघात बोलले हे माहित आहे पण इतक्या महत्वाच्या प्रसंगी प्रत्येक शब्द विचारपुर्वक
निवडायला नको का?

ivf चा खर्च करता आला पण जन्मणार्‍या बाळांना केअरमध्ये ठेवण्याचा खर्च परवडला नाही म्हणुन दुसरीकडे गेले. याला कुटुंबाचे फेल गेलेले प्लॅनिंग म्हणायचे काय?

मी दीनानाथ बाहेरुनही बघितलेले नाही त्यामुळे त्याम्ची बाजु घेतेय हा आरोप करु नका.

माझे सध्याच्या कॉर्पोरेट हॉस्पिटलांबद्दल फारसे चांगले मत नाहीय. साध्या आजाराची बिलेही हजारांमध्ये येतात अशा वेळी हाय प्रेग्नन्सि प्लॅन करणार्‍या फॅमिलीने सर्व खर्चाचा अंदाज घेऊन पावले उचलायला हवी होती. अगदीच अडाणी नव्हते किंवा आयुष्यात पहिल्यांदाच हॉस्पिटलात पाय टाकला असेही नव्हते.

एकुण जेवढी माहिती सो मि वर फिरतेय त्यापेक्षा कित्येकपटींने माहिती बाहेर आलेली नाहीय हेमावैम. त्यामुळे दोषारोपाचा लंबक एकदा हॉस्पिटलाच्या बाजुला तर एकदा पेशंटच्या बाजुला फिरतोय.

साधना, आदरार्थी नको please Happy

वरचे काही मुद्दे पुढे नेऊन, पेशंटच्या मृत्यूबाबत घटनांची साखळी आहे.
कॅन्सर सारखा आजार, स्वतःचेच मूल हवे हा आग्रह (लादलेला किंवा स्वेच्छेने), त्यासाठी IVF, त्याचा शरीरावर लोड, योग्य ते फॉलो अप नाहीत, दीनानाथ, ससून आणि सूर्या.
या सगळ्यात फक्त एकाच कडीला सगळा दोष का?
त्याची तपासणी जरूर व्हावी तशीच सगळ्यांची व्हावी.

दीनानाथ, ससून आणि सूर्या.
या सगळ्यात फक्त एकाच कडीला सगळा दोष का? <
ससूनचा काय संबंध???
जिथे पेशंट गेलाच नाही त्या हॉस्पिटलला काय दोष द्यायचा आहे?
पैसे नसतील तर ससूनला जाण्याचा सल्ला दिला होता फक्त. पण ते तिथे गेले नाहीत.

अच्छा, मग ससून काढलं यातून.

दीनानाथ, ससून आणि सूर्या, या तिन्ही ठिकाणी सारख्या सोयी आहेत का?
मला पुण्यातील हॉस्पिटलबद्दल काहीही माहिती नाही. तेव्हा प्रश्न कृपया उपरोधिक समजू नये.
प्रश्न यासाठी कारण नातेवाईकांनी ससून डावललं आणि सूर्या निवडलं, तर त्यामागचा विचार काय?
भारतातील नातेवाईकांमध्ये ज्यापण pregnancy बघितल्या आहेत, तिथे पहिल्यापासून एक तपासायला डॉक्टर आणि प्रसूतिगृह ठरवलेले असते. तिथेच सगळ्या तपासण्या ई होतात. जर त्या प्रसूतिगृहात हाताळता येणार नाहीत अशी complications आढळली, तर दुसरे ठरवले जाते. बऱ्याचदा बॅकअप म्हणूनपण दुसरे एक तयार असते.
मुलीला डोहाळे काय याच्या जोडीला डॉक्टर कोण आणि प्रसूतिगृह कोणते, या चर्चा चालतात.
आता असे होत नाही का?
या कुटुंबाचे 7 महिने डॉक्टर आणि प्रसूतीगृह कोण होते?

दीनानाथ रुग्णालयात सुरू झालेली व सूर्या रुग्णालयात संपलेली घटना दुर्देवी आहेच. त्या बाळांच्या दृष्टीनेही. त्यानंतर घडवली जाणारी कथानके तशीच दुर्दैवी. मृतांच्या टाळूवरच लोणी खाणारी विषारी मिडीया आणि राजकीय जमात कुठलीच संधी सोडत नाही.

मला एक समजल नाही. दीनानाथ रुग्णालयातून गेल्यावर भिसे कुटुंबीय ससून येथे गेले. तिथूनही अजून एका रुग्णालयात गेले. म्हणजे दीनानाथ रुग्णालय सोडताना रुग्णाची प्रकृती आत्यवस्थ नव्हती. नाहीतर ससूनने सुद्धा सोडले कसे. बरे ही सगळी रुग्णालये जवळ जवळ नाहीत. गर्दीच्या वेळेस ४०-६० मिनिटे या अंतरावर आहेत. येवढा प्रवास कुटंबीयांनी रुग्णाला करावयास लावला, रुग्ण तो प्रवास करू शकली, रुग्णाचा मृत्यु नंतर बाळांना जन्म देऊन झाला, त्यादिवशी नाही. तरी सुद्धा रुग्णाच्या मृत्युला दीनानाथ रुग्णालय जबाबदार कसे?. रुग्णाच्या मृत्युला वैद्यकीय सल्याविपरित केवळ मुल असण्याचा केलेला अट्टाहासच नि:संशय कारणीभूत दिसतो.
दीनानाथ रुग्णालयाने अ‍ॅडव्हन्स मागण्याबाबत नक्कीच असंवेदशीलता दाखवली आहे. जरी दीनानाथ रुग्णालयात दररोज एस्टी स्टँड येवढी गर्दी असली तरी डॉक्टर, नर्सेस, ओपीडी यांनी सर्वांनी सहसंवेदना सतत १०० टक्के वेळा दाखवणे आवश्यक आहे.
माझा स्वतःचा दीनानाथ रुग्णालयाचा अनुभव उत्कृष्ट आहे.
यासगळ्या येवढ्या मोठ्या स्फोटामागे राजकारण नक्कीच आहे. आता ते कसले आहे ते सूज्ञांनी समजवून घ्यावे. घैसास यांच्या वडिलांच्या आणि पत्निच्या दवखान्यावरील हल्ला कसा समर्थनीय होउ शकेल.?

एका माहितीनुसार overian कॅन्सर ची शस्त्रक्रिया दीनानाथ ला केली होती पूर्वी व ५०% सवलत मिळवली होती. आणि तेंव्हाच DMH कॉम्प्लिकेशन्स ची कल्पना दिलेली होती.
डॉक्टर हाही एक माणूसच आहे, व आपल्याला माहित नाही कि overian कॅन्सर ची शस्त्रक्रियावेळेस नक्की काय होते व सधन घरातून येऊनही ५०% सवलत कशी मिळवली होती?
DMH बद्दल जे काही काळात आहे त्यावरून मागील कुटुंबियांच्या इतिहासामुळे ऍडव्हान्स मागितला असू शकतो, हेही शक्यता बघायला हवी.

खरतर timeline लावून ह्या सगळ्याचा शहानिशा करायला हवा, पूर्वीची शस्त्रक्रिया, ओव्हरऑल IVF ; pregency आणि डिलिव्हरी.

जसा हॉस्पिटल ची जवाबदारी आहे तशी समाज, कुटुंब म्हणून आपली जवाबदारी हि आपण घायलाच हवी.

दोन्ही बाजूचे जितके वाचले त्यावरून ९५% दोष त्या कुटुंबाचा आहे व फार तर ५% दीनानाथ चा, असे मला वाटते.

मला वाटते रुग्णालय प्रशासनाकडून ही case 'mishandle' झाली का हा मुख्य मुद्दा आहे.
पत्रकार परिषदेत जे स्पष्टीकरण दिले गेले त्यात हीच बाब अधोरेखित होते आहे.
कुटुंबाकडून असणारा आक्षेप:
1. नातेवाईक 2 ते 2.5 लाख भरायला तयार होते, पण 10 लाख डिपॉझिटची मागणी करण्यात आली.
2. रुग्णासमोर ह्या बाबी चर्चिल्या गेल्या. त्यामुळे रुग्णावर मानसिक ताण आला.
3. फेरतपासणीची तारीख 2 एप्रिल सांगितली होती. पण त्रास होत असल्याने रुग्ण त्याआधीच रुग्णालयात आला होता.
4. रुग्णावर प्राथमिक उपचारही केले नाहीत.
5. हा जो वेळ वाया गेला त्याने रुग्णाची स्थिती अजून बिघडली.
# रुग्णालयाचे स्पष्टीकरण:
1. संबंधित डॉक्टरांनी तपासले होते. रुग्णाची प्रकृती स्थिर होती. Under observation admission सांगितले होते.
2. नातेवाईकांनी प्रशासनाशी प्रत्यक्ष भेटून संपर्क केला असता तर हे टाळता आले असते.
3. नातेवाईक न सांगता रुग्णास परस्पर घेऊन निघून गेले.
# पत्रकारांचे मुद्दे:
1. रुग्ण 4ते5 तास रुग्णालयात विना उपचार बसून होता.
2. फेरतपासणी 2 एप्रिलला सांगितलेली होती,तरीही रुग्ण 7दिवसात तपासणीसाठी आला नाही असा ठपका ठेवण्यात आला..
3. फक्त observation साठी admit करण्यासाठी 10 लाख डिपॉझिट का मागण्यात आले?
## आपल्यासाठी महत्त्वाचे मुद्दे:
1. रुग्णालयाचे अधिष्ठाता यांना नातेवाईकांचा फोन गेल्यावर त्यांनी जेवढी पैशाची व्यवस्था आहे तेवढे भरून अ‍ॅडमिट होण्यास सांगितले, पण तोच message अधिकृतरीत्या admission counter किंवा charitable desc पर्यंत पोहोचला नाही.
2. रुग्णालयाला 10 लाख डिपॉझिट चे स्पष्टीकरण देता आले नाही.
3. ही case असंवेदनशीलपणे हाताळली गेल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य केले.
###
. त्यामुळेच मला असे वाटते की रुग्ण आहे रे वर्गातील होता की नाही रे याचा ह्या particular case शी संबंध नाही.
. Failure of administration to handle/ tackle this particular situation/ case is the main concern.

रुग्णालयाकडून चूक झाली हे मला पटते. पण रुग्णाने कॅन्सर उपचारानंतर ivf करणे हा मुद्दा गैरलागू कसा? ज्याचा थेट संबंध प्रेग्नन्सी व डिलिव्हरीसाठी येतो अशा रिप्रॉडक्टिव्ह सिस्टीमचा कॅन्सर नसता किंवा कॅन्सर नसता तर ही सामान्य प्रीमॅचुअर डिलिव्हरी किंवा प्रेग्नन्सी केस असती. त्याचे उपचार कदाचित कमी गुंतागुंतीचे असते. औषधोपचारही वेगळे असते.

बाळासाठी ivf खर्चाची तरतूद करताना ही माता व बाळ यांच्यासाठी धोकादायक प्रेग्नन्सी असणार आहे ही कल्पना कुटुंबियांना नव्हती? मग होणाऱ्या मातेच्या आरोग्याची जबाबदारी फक्त डॉक्टरांची? कुठलीही कॉम्प्लिकेशन्स नसताना मुली प्रेग्नन्सी चेकप सासरी करून माहेरी बाळंतपणाला जातात तेव्हाही तशी कल्पना दोन्हीकडच्या डॉक्टरांना दिलेली असते. मग अशा नाजूक केसमध्ये रेग्युलर चेकिंगला न जाणे किंवा इतर ठिकाणी चेकप करून इमर्जन्सीला दीनानाथमध्ये येणे ही रुग्ण कुटुंबीयांची हलगर्जी नाही?

महिलेच्या निधनाची जबाबदारी फक्त इस्पितळ आणि डॉक्टर यांच्यावर ढकलणे मला पटत नाही. कुटुंबीयांचा रिस्की निर्णयही तेवढाच जबाबदार आहे.

रुग्णालय का रुग्ण यांतल्या कोणाची चूक वगैरे पेक्षा एक महत्वाचा मुद्दा आहे.

मी काही सेवाभावी वैद्यकीय संस्था, अनाथालय, इतर क्षेत्रातल्या सेवाभावी संस्था (चॅरिटेबल ट्रस्ट ने चालवल्या जाणार्‍या संस्था) यांना जवळून बघितले आहे. सक्षम व्यवस्थापन, चॅरिट्बल किंवा नॉन प्रॉफिट असले तरी फक्त देणगीवर अवलंबून न राहता संस्थेचा स्वतःचा उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करणे वगैरे चांगल्या चॅरिटेबल ट्रस्ट्स चा प्रयत्न असतो. अश्या संस्थांमध्ये संस्थेकडून आर्थिक लाभ उकळायच्या मागे नसलेल्या, चांगल्या चारित्र्याच्या ट्रस्टींचा मोठे योगदान असते. राजकीय पुढार्‍यांच्या रडारवर या संस्था नेहेमी अग्रेसर असतात. यामध्ये ट्रस्टी घुसवून संस्थेवर ताबा मिळवणे, किंवा असे एखादे स्कॅण्डल हाती लागले तर त्याचा पूर्ण फायदा घ्यायला पुढारी टपलेले असतात. या पुढार्‍यांचे पित्ते निदर्शने करणे, कोर्टात केस करणे, ट्रस्टवर ट्रस्टी म्हणून घुसणे अशी कामे करतात. एकदा का ट्रस्टचा/संस्थेचा ताबा घेतला की भांडवल आधी खायचे, मग ऑपरेटिंग प्रॉफिट खायचे, कंत्राटे देताना, कॅपिटल अ‍ॅसेट्स खरेदीमध्ये, नोकर्‍या लावताना दाबून पैसा खायचा एव्हडे एक कलमी काम असते. काही वर्षातच ती संस्था कोलमडून पडते.
संस्था उभे केलेले ट्रस्टी यांना काहीतरी चांगले करायची खाज असल्याने ते पुन्हा दुसरी संस्था उभी करायच्या मागे लागतात. आणि हे चक्र सुरू राहते.

चांगले काम करणार्‍या संस्थांना हा धोका आता कायमचा आहे.

रुग्णसेवा, तिच्यात सुधारणा व्हावी, इस्पितळांची गुणवत्ता सुधारावी वगैरे कुठलेही उदात्त हेतू नसून फक्त संस्थेचे भांडवल, नफा खाणे या एकमेव उद्देशाने सर्व राजकीय पक्ष यांत पडलेले आहेत याची १००% खात्री आहे.

विवेक खूपच सुंदर पोस्ट.. अगदी नाव सार्थ करणारी.

टवणे सर, तुमचे मुद्दे मनात आले होते म्हणून हे हॉस्पिटल बंद व्हावे असे वाटत नाही असे पहिल्यांदाच म्हटले. काही काही बातम्या ऐकून हीच शंका येते.

विकीकाकांच्या संपूर्ण पोस्टला अनुमोदन.

'राहूकेतू' उल्लेख अत्यंत चुकीचा होता. या परिस्थितीत अधिकच होता, पण एरवीही कामकाजाबद्दल बोलताना त्यात ग्रहदशा आणणं अनप्रोफेशनल आहे.
डॉ. केळकरांनी 'रोगी दगावल्याचा आम्हाला खेद वाटतो, डिपॉझिट असं लिहायची पद्धत नाही, डॉ. घैसासांनी का लिहिलं मला माहीत नाही, बाकी गोष्टी अ‍ॅक्टिव इन्वेस्टिगेशनचा भाग असल्यामुळे मी त्याबद्दल बोलू शकत नाही' इतकंच म्हणायला हवं होतं.
त्यांना कोणी नीट बोलूच देत नव्हतं हेही विचित्र वाटलं - ते अगदी 'ऐका ना' म्हणून गयावया करत होते.

एकूण सध्याच्या रहाटीनुसार सगळ्या संबंधितांची मीडिया ट्रायल सुरू आहे - तपासणी संपेपर्यंत थांबायला कोणाला वेळ दिसत नाही. तपासणीवर विश्वास नसावा का?

मला वाटते की या केसमधे आमचा रुग्ण दगावला मात्र खापर कुणावर फोडावे असे झाले आणि ही केस पुरेशा संवेदनशीलतेने आणि धूर्तपणाने न हाताळल्याने दिनानाथ हॉस्पिटलवर ठपका आला.
मी इथे धूर्तपणे हा शब्द वापरलाय कारण नुसती संवेदनशीलता उपयोगाची नाही, तुम्ही टी क्रॉस केला का आणि आय वर डॉट दिला का हे फार महत्वाचे. हॉस्पिटल वगैरे बाबतीत तुम्ही ९९.९९% वेळा चांगले वागा कुणी मेडल देणार नाही, सगळे त्या .०१% वर डोळा ठेवून असतात. त्यातून ते चॅरिटेबल ट्रस्ट वगैरे असेल तर मग अजूनच सजग रहाणे भाग आहे.

बाकी संबंधीत डॉक्टरांच्या पालकांच्या आणि पत्नीच्या हॉस्पिटलवर हल्ला-नासधुस वगैरे केले गेले त्या बाबतीत न्याय मिळावा म्हणून मेडीआ वगैरे तितक्याच चढाओढीने बाजू मांडणार का? की तिथे झुंडशाही हाच न्याय? एकंदरीतच कायदा हातात घेणार्‍यांवर काय कारवाई झाली / सुरु आहे?

आजची बातमी
the Pune Municipal Corporation (PMC) has warned of legal action, including seizing its property, if property tax dues of Rs 22.06 crore are not paid in the next two days.
टवणे सर म्हणताहेत, त्यात तथ्य वाटतंय.

स्वाती२ , प्रकरण प्रकाशात आल्यावर राजकीय पक्षांमध्ये याबद्दल बोलण्याची आणि निदर्शने करण्याची जणू स्पर्धाच लागली होती. काही राजकीय पक्षांनी दीनानाथ समोर निदर्शने करून झाल्यावर आपण मागे राहून कसं चालेल असं मुख्य सत्ताधारी पक्षाच्या पुणे शाखेला वाटलं. आता निदर्शने करायची तर ती कॅमेर्‍यांसाठी. दीनानाथमध्ये तर घुसता येणार नाही. म्हणून चार महिला कार्यकर्त्या डॉ घैसास यांच्या आईवडिलांच्या नर्सिंग होम मध्ये घुसल्या. तिथे घोषणा दिल्या. टेबलावरची कागदपत्रे, लँडलाइन फोन, शेल्फ वरच्या शोभेच्या वस्तू खाली फेकल्या. मी हेडरमध्ये चित्रा वाघ यांच्या ट्वीटचा उल्लेख केला आहे, तिथे पाहता येईल. अर्थात त्यांनी तोडफोड करावी असं मी म्हणत नाही. त्यांच्या पक्षातही यावरून कलगी तुरा सुरू आहेत. पुण्याच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी यावरून जाहीर नापसंती व्यक्ती केली.

नासधुस करणार्‍यांबाबत एकच कायदा वा तथाकथित न्याय सर्वांना समान पद्धतीने लागतो, असे चित्र नाही. याबद्दल अधिक लिहिण्याची ही जागा नाही.

आमदाराचा पीए दारिद्य रेषेखाली कसा असतो?
वर इतके लागेबांधे असलेल्या लोकांना अशी वागणूक तर सामान्यांचे काय लिहिलंय ... ते मला उलट वाटतय. सामान्यांनी त्यांना उत्तम अनुभव आलेला वर लिहिलेला आहे. इथे राजकीय लागेबांधे असल्याने फसवणूक होणार हे दिसत असताना खोट्या गरीब लोकांना जे नंतर कित्येक तास अ‍ॅडमिटही होत नाहीत.... त्यांच्या पासून लांब रहायला किमान फसवणूक टाळायला हे केलं असेल.
टवणे सरांची पोस्ट ही पटते आहे.

<आमदाराचा पीए दारिद्य रेषेखाली कसा असतो?> हे मला माहीत नाही. तसंच दारिद्र्य रेषेखाली असलं पाहिजे अशी अटही नाही. त्यांना याच रुग्णालयात आधी ५० % सवलतीत ट्रीटमेंट मिळाली आहे. सरकारी चौकशी अहवालातही ते चॅरिटी केससाठी पात्र होते असं म्हटलं आहे. त्यासाठी जे निकष असतील , त्यात बसत असतील किंवा तसं दाखवता येत असेल.

इथले प्रतिसाद, बातम्या, व्हिडिओ पाहुन माझे याबाबत निरीक्षण आणि मत:
रुग्णालयाकडून ऍडव्हान्स मागणे आणि नंतर आहेत तेवढे भरा सांगणे पण ते रुग्णाच्या सोबत आलेल्यांना योग्य रीतीने न पोचवणे ही चूक झालेली दिसतेय.

अशी डिलिव्हरी करणे जोखमीचे होते पण जेव्हा त्या तिथे गेल्या होत्या तेव्हा इमर्जन्सी होती का, ताबडतोब ट्रिटमेंटची गरज होती का आणि ती न देता त्यांना ऍडव्हान्स अभावी ताटकळत ठेवले का हे स्पष्ट नाही .
ही घटना २८ तारखेची. नंतर ते ससूनला जाऊन तिथे चौकशी करून मग सूर्याला गेले किंवा कसे? बातम्यांत तसा उल्लेख नाही, ससूनला जाणार होते पण नाही गेले सूर्याला गेले असे म्हटलेय.
ऑपरेशन-डिलिव्हरी २९ तारखेला झाली. त्या दरम्यान कॉम्प्लिकेशन्स निर्माण झाले आणि त्यांना मणिपाल मध्ये नेले.
इंडियन एक्स्प्रेसच्याया बातमी नुसार मणिपालचे म्हणणे आहे "The patient had developed severe pre-eclampsia, which led to antepartum hemorrhage and resulted in emergency obstetric complications including ......" पुढे ही अशा अनेक मेडिकल टर्म्स मध्ये सगळे दिले आहे.
Pre-eclampsia म्हणजे प्रेग्नन्सी दरम्यान हाय ब्लड प्रेशर असे गुगगल्यावर दिसले. इथे हे नमूद यासाठी करतोय, की हे कॉम्प्लिकेशन ते दीनानाथला गेले तेव्हाच होते का की delivery दरम्यान हे झाले ? यात दीनानाथ मध्ये जाऊन उशीर झाल्यामुळे / दीनानाथ ते सूर्या हॉस्पिटल प्रवासाच्या दगदगीमुळे कॉम्प्लिकेशन्स वाढली का?
तेव्हा दीनानाथने ऍडव्हान्स मागणे/ लगेच ऍडमिट न करून घेणे ते दुसऱ्या दिवशी डिलिव्हरी नंतर झालेले कॉम्प्लिकेशन्स आणि त्यानंतर रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू याचा संबंध आहे का हे मेडिकल एक्सपर्टच सांगु शकतील.

आपला दीनानाथचा (किंवा कुठल्याही रुग्णालयाचा) चांगला पूर्वानुभव,तिथले माहितीलले काही चांगले डॉक्टर्स/स्टाफ यावरून काहीच निष्कर्ष काढु नये.

यातील आता झालेले राजकारण, मोर्चा/तोडफोड इत्यादि पहाता निष्पक्ष चौकशी होऊन आपल्यापुढे पूर्ण सत्य येण्याची शक्यता फार कमी वाटते.

Pages