चित्रपट कसा वाटला -९

Submitted by mrunali.samad on 2 January, 2024 - 23:58

आधीचा धागा एकोणीसशे पार..म्हणून हा नवा धागा...
येऊ द्या नव्या वर्षात नव्याने नव्या-जुन्या पाहिलेल्या सिनेमांचे रिव्यूज..

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/83338

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१२ वी फेल वर वेगळा धागा चालला असता
>>>

काल हाच विचार माझ्या मनात आलेला. मी हा चित्रपट तेव्हा थिएटरला बघायला जायचा विचार करत होतो, पण काही कारणाने राहिला. पाहिला असता तर नक्की त्यावर लिहून, त्याची माऊथ पब्लिसिटी करून, वेगळा धागा काढून, किमान शंभर लोकांना तरी हा बघायला लावला असता..
बॉक्स ऑफिस वर केवळ ६६ कोटी कमाई झाली..
पण आता निदान ओटीटी वर तरी कोणी चुकवू नये.

अवांतर आहे. १२ वी नापास चं मार्केटिंग खूप वाईट केलं. त्यातच रिलीजचं टायमिंग अ‍ॅनिमलच्या बरोबरीने म्हणजे स्क्रीन्स मिळणार नाहीत. पण प्रश्न हाच आहे कि इतका सुंदर सिनेमा असून आणि खुद्द विधू विनोद चोप्रा असूनही स्क्रीन्स न मिळणे होत असेल तर आता प्रेक्षकांनीच ओव्हरहाईप्ड सिनेमांना नाकारणे सुरू केले पाहिजे. अशाने असे सिनेमे बनणार नाहीत. विधू चोप्रा आवर्जून बनवतो कारण त्याला इतर सिनेमातनं पैसा मिळतो. पण शेवटी तो ही चोप्रा आहे. बिझनेस मन आहे.

विधू चोप्रा आवर्जून बनवतो कारण त्याला इतर सिनेमातनं पैसा मिळतो
>>
आणि मग तो त्यातनं करीब, मिशन कश्मीर, एकलव्य, शिकारा वगैरे दिग्दर्शित करतो

रुपाली, किमान स्पॉयल अलर्ट टाकाल?>अवल , क्षमस्व.. संपादनाची वेळ टळली. तुम्ही नक्की बघा चित्रपट .. मांडणी वेगवान आहे .. आवडेल तुम्हांला..!

१२ fail ची चर्चा वाचून जरा गूगल केल तर त्याच्या रिअल life हिरो हिरोईन ची मुलाखत पाहिली लल्लन टॉप वर. किती सरळ साधं कुठलाही दंभ नसलेल जोडपं आहे. खूप गोड आहेंत दोघ. आणि रिअल life हिरो च शुध हिंदी तर फारच आवडल, mp touch असलेलं.स्पॉईलर अलर्ट आहे मुलाखत म्हणजे. सो ज्यांना मूवी आधी नको असेल स्पॉईलर तर अव्हॉइड करा.

@ललिता प्रीती, मी लिहिलं आहे अहो कि मुलाखत म्हणजे स्पॉईलर अलर्ट आहे. तरी स्पॉईलर वाटला असेल रिप्लाय तर क्षमस्व

आणि मग तो त्यातनं करीब, मिशन कश्मीर, एकलव्य, शिकारा वगैरे दिग्दर्शित करतो > Happy
तुम्ही म्हणताय म्हणजे एव्हढेच प्रोड्युस केले असतील त्याने. तुमच्याकडे अचूक माहिती असेल. मला त्यातले काही कळत नाही.
कदाचित खामोश, परिंदा, १९४२ अ लव स्टोरी, परिणिता, मुन्नाभाई सिरीज, थ्री इडीयटस , अ‍ॅन एन्काउंटर विथ फेसेस, मर्डर अ‍ॅट मंकी हिल (सजा ए मौत), ब्रोकन हॉर्सेस वगैरे वगैरे सिनेमे त्याने प्रोड्युस्/डायरेक्ट केलेत हा माझा गैरसमज असू शकेल. धन्यवाद तुमच्या मौलिक माहितीबद्दल.

ओ पालघरवासी बाई, क्षमस्व कशाला ओ ?
तुमच्य कथेतलं एखादं भूत कामाला लावून एडीटा कि प्रतिसाद. नाहीतर काळी जादू येत असेल तर प्रतिसाद दिसणारच नाही असा मंत्र म्हणा लिंबू फिरवून. हाकानाका.

12th फेल.
स्पर्धा परीक्षांसाठी ज्यांनी स्वतःची काही वर्षे खर्ची घातली नाहीत, किंवा ज्यांनी ही प्रक्रिया फक्त दूरून ऐकलीय/बघितलीय, त्यांना हा सिनेमा आवडतोय/आवडलाय असं दिसतं. सिनेमाचा मेसेज यूपीएससी ही काय भानगड आहे, हे इतरांना कळावं हा असेल तर तो चांगल्या प्रकारे पोचवलाय. पण हे बघून कुणी मोटिव्हेट व्हावं/होईल असं वाटत असेल तर गडबड आहे.

जरा यू ट्यूब वर चाळलं तर सिलेक्ट झालेल्या अधिकाऱ्यांच्या सक्सेस स्टोरीजच्या भाषणांच्या लाटांवर लाटा मागच्या दहा-बारा वर्षांमध्ये येऊन गेलेल्या आढळतील. अंतिम यादीत नाव आलेल्यांचे सगळे क्लासवाले दरवर्षी सत्कार ठेवतात. परंपरा आहे तशी. त्या भाषणांमध्ये ही नुकतीच सिलेक्ट झालेली पोरं/पोरी जी भाषणं ठोकतात, ज्या संघर्षांच्या कहाण्या सांगतात त्या ऐकून ॲस्पिरंट्सचे कान किटायचा ऋतूही फार फार पूर्वीच येऊन गेलेला आहे.
आपल्याकडे धर्माधिकारी, नांगरे पाटील, आंधळे वगैरे मंडळींनी ह्मा बाबतीत नारळ फोडलेला. सगळ्या आठवणी सांगून सांगून संपून गेल्यावर त्यांनी आणि त्यांच्या लाटेत सापडलेल्या तत्समांनी आत्मचरित्रंही लिहून टाकली. ॲंड दे लिव्हड् हॅप्पीली एव्हर आफ्टर वगैरे झालं. खरी भानगड तिथूनच चालू होते समजा, परंतु मग त्याबाबत 'झाकली मूठ सव्वा लाखाची' ही एक सोय आहेच आपल्याकडे.
तर ह्या अनेक मोटिव्हेशनल स्पीकर्स कम् अधिकाऱ्यांच्या कहाण्यांतून क्षणिक स्फूर्तीच्या फवाऱ्यापेक्षा जास्त काही हाताला लागण्याची अपेक्षा ठेवत नाहीत ॲस्पिरंट्स लोक.
एकतर सत्याचा अपलाप फार करतात. काळं पांढरं असं फार असतंय त्यात. ग्रे शेड्स कुणी सांगत नाहीत. आणि शेवटी सिस्टीममध्ये गेल्यावर अंतिमतः कठपुतळे ठरतो किंवा कसे, आणि हे जे सगळं भोगलं ते वर्थ होतं का, ह्याच्यावर तर फार कमी जण उजेड टाकतात.

बाकी, ह्या पोरा पोरींची प्रेमप्रकरणं एकतर क्लासमध्ये, लायब्रऱ्यांमध्ये जुळतात किंवा मग मसूरी/हैदराबाद ला ट्रेनिंगच्या काळात एकमेकांना हेरलं जातं. हे ही आता नॉर्मल असं झालं आहे.

विक्रांत मेस्सी चांगला अभिनेता आहे, हे मान्य. 'क्रिमिनल जस्टीस' पासून नाव लक्षात राहिलेलं.

(प्रतिसाद खूप विरूद्ध टोकाचा वाटल्यास, कृपया हळू घ्यावा, ही विनंती. बाकी, सिनेमा एकदा बघण्या सारखा जरूर आहे. )

प्रतिसाद टोकाचा वाटला नाहीये आणि हळूच घेतला आहे. Happy

एकतर सत्याचा अपलाप फार करतात. काळं पांढरं असं फार असतंय त्यात. ग्रे शेड्स कुणी सांगत नाहीत. आणि शेवटी सिस्टीममध्ये गेल्यावर अंतिमतः कठपुतळे ठरतो किंवा कसे, आणि हे जे सगळं भोगलं ते वर्थ होतं का, ह्याच्यावर तर फार कमी जण उजेड टाकतात.
>>> अगदी जवळच्या नात्यात आहेत असे मेंबर्स, भयंकर तणावपूर्ण आहे कल्पना आहे. कधी मोकळं हसताना बघितलं नाही त्यांना, कारण भ्रष्ट नाहीत.

पण आपल्याकडे प्रेमकहाण्यांत सुद्धा लग्न झाले की कथा संपवायचे, तिथंही नंतरच खरा सिनेमा सुरू होतो. त्यांचं पटलं का, मुलं झाली का, झाल्यावर रात्री लंगोट बदलायला कोण उठलं, शाळेत ॲडमिशन मिळाले का वगैरे अविरत संघर्ष कोण बघणार? कथानक हे सहसा आयुष्यातल्या शिखरावर किंवा गर्तेत असणाऱ्या बिंदूच्या आसपासचे असते, मधली 'फ्लॅट लाईन' नसते.

खाकी- वेबसिरीज मधे याचाच थोडा पार्ट टू आला आहे. पण तो नायक प्रिव्हिलेज्ड पार्श्वभूमी असलेला होता. कुणीही कमी/जास्त नाही. 'मैं लठ्ठ गाड दूं- मैं जाडा फाड दूं' जिगर ठेवणाऱ्या सगळ्यांचाच आदर व कौतुक वाटते. Happy

नंतरही हे वर्थ होते/ नव्हते- पेक्षा ज्या परिस्थितीत त्याने एवढी मोठी महत्त्वाकांक्षा ठेवली व जिद्दीने आणि निष्ठेने ती पूर्ण केली हे कुठल्याही क्षेत्रात असणाऱ्यांसाठी प्रेरणादायीच ठरते. जो एवढी जिद्द दाखवू शकतो तो तेही सारून नेईलच असा विश्वासही वाटतो. मुख्य म्हणजे अशा कथा समोर यायला हव्यात कारण आपलं कवच गळून पडतं. काही प्रेक्षकांना डोळ्यासमोरून चित्र हलली म्हणजे सिनेमा बघितला असं मानता येत नाही. त्यात पृष्ठभागाच्या खाली काय आहे याची उत्सुकता असते, मग ते काही बाबतीत अपूर्ण असलं तरी चालतं. अपूर्णतेची गोडी ! Happy

प्रतिसाद खूप विरूद्ध टोकाचा वाटल्यास, कृपया हळू घ्यावा, ही विनंती. बाकी, सिनेमा एकदा बघण्या सारखा जरूर आहे. )>>>>>>>>>>
तुम्ही अराशा पलीकडचे जग दाखवले जे
आम्हाला सिनेमा खूपच आवडल्या मूळे दिसत नव्हते .
एक प्रकारे आमच्या फिलंग पंचर झाल्या Happy

इथल्या सर्व रिव्ह्यू वरून 12 थ फेल पाहिला. सुंदर आहे.विक्रांत खूप जागी सुपर 30 मधल्या ह्रितीक सारखाच दिसतोय.अभिनय नितांत सुंदर.सगळ्यांचाच.

आचार्य, माझ्या कथेतल्या भुतांची फिरकी घेतलीत ना तुम्ही.. बघा आता रात्री स्वप्नात येतील तुमच्या..! चकवा लावतील तुम्हांला..!

एक तर चित्रपट बघायचा मला आता खूप कंटाळा येतो.. मोजून एखादाच बघते.. त्यात इथलेच review वाचून चित्रपट पाहिला.. चित्रपट आवडला आणि चित्रपटाची कथा , कलाकारांचा अभिनय भावला.. आणि भारावून जाऊन प्रतिसाद लिहिला.. जे आवडतं ते मनापासून लिहायला आवडतं मला..!

चित्रपटाचे , चित्रपट संगीताचे खरे रसिक तुम्ही...! तुम्ही बघा १२th fail आणि तुमच्या शैलीत लिहा परिक्षण.. वाचायला आवडेल मला..!

>>>>>>>अंतिमतः कठपुतळे ठरतो किंवा कसे, आणि हे जे सगळं भोगलं ते वर्थ होतं का,
_/\_ तुझी वैचारीक झेप नेहमीच स्तिमित करते अस्मिता.

वगैरे वगैरे सिनेमे त्याने प्रोड्युस्/डायरेक्ट केलेत हा माझा
>>
विनोद चोप्रा प्रोड्यूसर बरा आहे
डायरेक्टर मात्र बरा होता असं मी म्हणेन कारण मी उल्लेखलेले ४ सिनेमे हे त्यानी १२फेल पूर्वी गेल्या २५ वर्षात दिग्दर्शित केलेले शेवटचे ४ आहेत (१२फेल बघायचा आहे) आणि या चारी सिनेमांचे अनुभव भयानक होते...

हुलु वर पण आहे >> ओह थँक्स. तेथे बघतो. आयपीटीव्ही नाही आमच्याकडे. स्ट्रीमिंग सर्विस एकदा घेतली की ती बंद करायची पद्धत आमच्यात नसल्याने नवीन घ्यायचे टाळतोय.

संप्रति१ +१.

UPSC अक्षरशः लॉटरी सारखी आहे. जी त्यांना लागते ते गावोगावी सत्कार घेत फिरतात, मोटिव्हेशनल कोट्स देतात, मग त्यांचे व्हॅत्सॅप फोर्वर्ड होतात.. पण जी लाखो मुलेमुली आयुष्यातली अनेक वर्षे या मृगजळामागे धावतात व वय निघून गेल्यावर धोबी का कुत्ता बनतात त्यांच्यावर सिनेमे निघत नाहीत. लाखो मुले मुली सरकारी नोकरीच्या परिक्षेसाठी दोन तीन वर्षे रक्त ओकतात हे मुळी निरोगी समाजाचे लक्षण नव्हे.

प्रतिसाद अस्थानी असल्यास दुर्लक्ष करा

जो चित्रपट पाहिलेला नाही पण पहायचा आहे त्यावरची चर्चा वाचताना आपोआप डोळे इतके बारीक होतात कि एकच ओळ कशीबशी दिसते.
स्पॉयलर येतोय असं दिसताक्षणी मिटून घेताना पापण्यातलं अंतर कमी पडतं या ट्रीकने. पाहून झाला कि संपूर्ण वाचून प्रतिसाद देईन.
( तरी पण सांप्रति यांचा प्रतिसाद एक डोळा पूर्ण मिटून आणि एक किंचित उघडा ठेवून पूर्ण वाचला. स्पॉयलर नाही त्यात. म्हणणे मान्यच आहे. पण चित्रपटात काय दाखवलेय माहिती नाही ).

१२वी फेल साठी स्वतंत्र धागा काढण्याची गरज आहे. या निमित्ताने युपिएससी बाबत वेगेळे विचार मांडले जात आहेत, आणि ते स्वागतार्ह आहे.

मला विचाराल तर हि बाबू लोकांची सिस्टम बाद करायची वेळ आलेली आहे. ज्यांनी सुरु केली त्यांच्या देशात तरी ती आहे का याची कल्पना नाहि. शिवाय, हि सिस्टम भ्रष्टाचाराची जननी (गंगोत्री?) आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाहि. सिनेमातंच त्याचा उल्लेख चोप्राने केलेला आहे. एकदा का यांना टिळे लागले कि रिटायर होइस्तोवर त्यांना नोकरीची हमी असल्याने मोटिवेशन तसं कमीच असल्याचं दिसुन येतं. तुकाराम मुंढेंसारखे सन्माननीय अपवाद वगळता बाकिंचा कल स्वतःचा आणि कुटुंबियांचा विकास करण्याकडे असतो.

देशाला ७५ वर्षां नंतर या सिस्टम मुळे किती फायदा/नुकसान झालं याचा स्ट्डि व्हायला हवा.. देश ट्रांस्फॉर्म होतोय, गवर्नंसचा हा भागहि ट्रांस्फॉर्म व्हावा असं मला तरी वाटतं...

अस्मिता, Happy
तुम्ही भ्रष्टाचाराचा उल्लेख केला, पण 'भ्रष्ट' ही संकल्पना अमूर्त, संप्लवशनील आणि अफाट लवचिक अशी आहे. त्यात 'एव्हरीथिंग इज चेंजिंग फ्लक्स' असल्यामुळे तो शब्दही अचूक अर्थ पोचविण्यात दिवसेंदिवस तोकडा पडत चाललाय.‌ पूर्वी तलाठ्यानं‌ पाचशे रूपै खाल्ले, हवालदारानं दोनशे खाल्ले, लाचखोर तहसीलदारास अटक, वगैरे वगैरे बातम्यांतून काही अर्थ तरी लागायचा. आता हा खेळ एवढ्या विराट जगडव्याळ पटावर, आणि एवढ्या चोख आणि निर्ममपणे चाललेला असतो की, मोठमोठे सिनीयरमोस्ट अधिकारी/ राजकारणीही त्यापुढे किस झाड की पत्ती वाटावेत. ह्यात कुणालाच फार काही हलायला जागा नसते. फार पिरपिर करू नका, सन्मानाने बसा, महापंगतीचा लाभ घ्या, आपापला वाटा उचला, नायतर फुटा इथून.!
समोरचा अधिकारी शासनाचा दूत/धोरणकर्ता म्हणून बोलतोय की दुसऱ्याच कुणाचातरी एजंट/निरोप्या म्हणून रोल अदा करतोय, ह्याचं आकलन करायला जाणं म्हणजे एका नव्याच भुलभुलैय्यात शिरण्यासारखं आहे. आणि जर कधी ह्या सगळ्याचा एखादा अंश दृष्टीपथात आलाच, तर डोकं गरगरून जावं किंवा माणूस त्या विश्वरूपदर्शनाच्या शॉकनं तात्काळ पागल होऊन जावा. (जसे निळू फुले ऊर्फ दिगू टिपणीस 'सिंहासन'च्या शेवटी पागल झाले होते.) असो.
बाकी प्रतिसादाशी सहमत. Happy

फुरोगामी,
तुमच्या फिलींग पंक्चर करण्याचा हेतू नव्हता‌. परंतु नकळतपणे ते आता होऊन गेलेलं आहे, तर त्याबद्दल दिलगीरी.‌ Happy

आचार्यश्री,
तुमच्यासारख्यांनीही स्पॉयलर्ससाठी एवढी दक्षता घ्यायची म्हणजे काय बरं नाही. एवढ्या दीर्घ तपस्येनंतर पुढं काय होणारे ते मन:चक्षुंवर आधीच उमटत असेल ना.? की ती स्टेज आली नाही अजून ? Happy

बाकी, स्पॉयलर्ससंदर्भात कुठेतरी वाचलेला एक जुना किस्सा आठवला.
एका शहरात एक मर्डर मिस्ट्री टाईपचा सिनेमा लागलेला असतो. एक माणूस रिक्षात बसून तो सिनेमासाठी जातो.‌ रिक्षातून उतरल्यावर पॅसेंजर आणि रिक्षावाल्यामध्ये भाड्यावरून काही तकतक होते.‌ पॅसेंजर हट्टी असतो, तो आपलंच म्हणणं खरं करतो आणि रिक्षावाल्यास अपेक्षेपेक्षा कमी पैसे देतो‌. रिक्षावाला हताशपणे रिक्षा चालू करतो. आणि जाताजाता त्या थिएटरवर लावलेल्या त्या सिनेमाच्या होर्डींगकडे बोट दाखवून त्या पॅसेंजरला म्हणतो की 'ह्या पिच्चरमधी त्या वकिलानंच मर्डर केलेला है. त्या वकिलावर नजर ठेवा, त्योच खरा खुनी है. जावा बघा जावा आता पिच्चर..!'
पॅसेंजर हतबल प्लस संतप्त चेहऱ्याने निघून जाणाऱ्या रिक्षाकडे बघत उभा राहतो.‌
Wink

संप्रति , हिमनगाचे टोक समजा.... जनरली आधीपासूनच सहमत होते. पण तुम्ही लिहिलेले वाचायला आवडले. या निमित्ताने तुम्ही चर्चेत भाग घेतला. येत जा नं इथं , प्लीज Happy

आचार्य, एवढ्या कसरती करण्यापेक्षा बघून टाका लवकर. अजून फोमो कसा आला नाही तुम्हाला. Lol

सामो, धन्यवाद. Happy
सगळ्याच पोस्टी वाचल्या आहेत.

ही पोस्ट 12th Fail साठी नाही तर सध्याच्या हिंदी सिनेमांचा 'आनंद' बघून चित्रपटांविषयीचा एक जनरल दृष्टिकोन सांगितला आहे. भापो करा. काहीजणं लिहितायत ते 'चालू घडामोडी' आहे. मी 'चिकवा- निष्ठ' लिहितेय. Proud

UPSC वास्तव खोटे नाहीच पण हा चित्रपट त्या व्यक्तीपुरतंच असलेलं सत्य आहे. जेव्हा असे सिनेमे जास्त लोकांपर्यंत पोचतील/आवडतील, निर्माते आणि दिग्दर्शक सुद्धा असे, याविरुद्धचे वास्तव, दुसरी बाजू किंवा आणखी पूर्णपणे वेगळे विषय संयत पद्धतीने मांडायला धजावतील.

आपण प्रेक्षक म्हणून किती उदासीन आहोत, चांगल्या गोष्टींवर पटकन विश्वास बसत नाही, नकारात्मक गोष्टी मात्र सतत खुणावत असतात. सकारात्मकता सुद्धा कचकड्याची असते. याचे पर्यवसान होऊन बघायला शेवटी 'राज मल्होत्रा' वगैरे पात्रच बरं वाटतं-आनंद देतं. इतके ओटीटी उपलब्ध असल्याने आता लॉयल प्रेक्षकही नाही राहिलेत.

जसं आपण पठाण- जवान- एक था टायगर ३ विसरू तसा हाही सिनेमा विसरून जाऊच. जर आता impulsivelyच सगळं बघणार असू तर त्यातल्या त्यात असे विषय खूपच बरे वाटतात. Breath of fresh air..! आपल्याला फक्त त्याला enable करायचं आहे.

सिनेमा बघून मिळालेली 'उमेद' काही चिरकाल टिकत नाही. माणूस स्वयंप्रेरितही (किंवा भ्रमिष्टही Wink )असावा लागतो. चित्रपटातील वाईट गोष्टी मात्र सहज घेतल्या जातात. कारण reptilian brain ला सुखाचा 'शॉर्ट कट' सोयीचा वाटतो. संदर्भ - कदाचित 'ॲनिमल' सिनेमा.

एवढं बोलून मी माझे बिन-स्पॉयलरचे दोन (?) शब्द संपवते. Happy

Asmita practically dazzling. Do take up serious writing.

Wonderful discussion on the movie.

अमा +१
छान पोस्ट अस्मिता, गहिरा अर्थ असणारी पण हलकीफुलकी शब्दरचना.

Pages