बुलडोझर (एकांकिका - प्रवेश ३)

Submitted by प्रणव साकुळकर on 28 November, 2023 - 16:32

(तीन महिन्यानंतर. आई ओवाळायचं ताट घेऊन समोरच्या खोलीत येते. टेबलावर ठेवते. आर्णा सोफ्यावर अभ्यासाचं पुस्तक वाचत बसली आहे.)

आई:- अगं तू तयारीला पण नाही लागलीस? नवीन कपडे घाल. अश्या कपड्यांनी करणार का ह्यांचं स्वागत?

आर्णा:- मी काही कपडे वगैरे बदलणार नाही. कधी येणार आहेत ते? माझा क्लास पण आहे आता.

आई:- अगं येतीलच इतक्यात. आता शेकडो कार्यकर्ते, माणसं असतील अवतीभवती. हार तुरे, स्वागत-सत्कार म्हणजे होणारच उशीर.

आर्णा:- अजून काही ढोल ताशांचा आवाज पण ऐकू येत नाही आहे अजिबात. म्हणजे भरपूरच वेळ लागेल. तू बसून घे आरामात. सकाळपासून झाडझुड, आवराआवर, सजावट सुरू आहे तुझी. मी क्लासची बॅग वगैरे भरून ठेवते.

(आर्णा आत जाते. वडीलांचा घरात प्रवेश. एकटेच.)

आई:- अहो आलात देखील तुम्ही? कळलंही नाही आम्हाला. तुम्ही थांबा बरं दारातच. तिथेच तुम्हाला ओवाळते पहिले. (ओवाळायचं ताट उचलून दाराकडे जाते.) अहो एकटेच तुम्ही! कार्यकर्ते कुठे गेलेत तुमचे?

वडील:- (निराश) संपलं आता सगळं. कोणी येणार नाही इकडे.

आई:- अहो, असं काय म्हणताय. काय झालं तिकडे?

वडील:- त्या हरामखोर गणपतरावाला तिकीट मिळालं.

आई:- अहो, पण परवा तुमचं नाव पक्षश्रेष्ठींकडे पाठवलं म्हणाले ना तात्या साहेब?

वडील:- (चिडून) शब्दाला जागणारी माणसं आहेत का ही! दाखवलीच जात आपली त्यानी. स्वतःच्या जात-भावालाच दिलं शेवटी तिकीट.

आई:- तुम्ही शांत व्हा बरं. बसा इथे. (मोठ्यानं) आर्णा, पाणी आण बरं बाबांसाठी.

वडील:- हे कुणबी, तेली काल पक्षात आले आणि आज आमदार बनताहेत. आणि वर्षानुवर्षं पक्षासाठी झटणारे आम्ही. काय मिळालं आम्हाला? पक्ष संघटना उभी केली आम्ही, पक्ष गावागावात नेला आम्ही, ब्राह्मणांनी. अरे डिपॉझिट जप्त व्हायचं उमेदवारांचं, तरीही पक्षाचा प्रचार केला अहोरात्र. स्वखर्चानं. पोस्टर्स लावले, पत्रकं वाटली. उमेदवार जिंकून येईल, आर्थिक लाभ होईल कशाचीच अपेक्षा कधी ठेवली नाही. आणि आता पक्ष मोठा झाला, जिंकायला लागला तर आले हे साले आयत्या बिळावर नागोबा बनून बसायला. इतक्या वर्षांची मेहनत सगळी पाण्यात.
(आर्णा पाणी आणते. पाठीवर क्लासची बॅग.)

आर्णा:- (बाहेर जाता जाता.) तुमचं चालू द्या रडगाणं. मला इंटरेस्ट नाही त्यात. मी येते.

आई:- तुम्ही पाणी प्या बरं. असा त्रागा करून बिपी वाढवण्यात काय अर्थ आहे?

वडील:- असं कसं शांत बसायचं माणसानं! गेले काही महिने तर झोप पण सोडली पक्षासाठी. तिकीट तर मिळालं नाहीच आणि वरून जखमेवर मीठ चोळायचं म्हणून त्या गणपतचा जाहीर सत्कार समारंभ आयोजित करण्याची जबाबदारी माझ्यावर टाकतो म्हणतोय हा तात्या. लाज नावाची गोष्ट नाही ह्या माणसाला.

आई:- अहो नाही आमदार तर नाही. नगरसेवक म्हणून काय कमी मान आहे तुमचा?

वडील:- ते पण २-३ महिन्यापुरतंच राहणार आहे आता.

आई:- इथे कोण हरवणार तुम्हाला? मागच्या ३ निवडणुका किती मताधिक्यांनी जिंकल्यात तुम्ही.

वडील:- यंदा राखीव होतो आहे हा वॉर्ड. माझ्यासारख्या ब्राह्मणाला तिथेही जागा नाही.

आई:- काय? मग कोणाला उभं करणार तुम्ही?

वडील:- मी कोण ठरवणारा? आता ते निवडताना मला विचारणार देखील नाहीत बघ. कोणीतरी चंदन नगरातून शोधतील. कदाचित बाळ्यालाच देतील तिकीट. तो एकटा पण भेटतो म्हणे इतर पक्षनेत्यांना. तसा आधीपासूनच महत्त्वकांक्षी होता तो. आणि आता नगरसेवक झाल्यावर बाळासाहेब म्हणावं लागेल त्याला. सत्कार करावा लागेल परत. (विराम) संपलं सगळं. सगळं करिअरच संपवलं लेकांनी माझं.

आई:- असं कसं म्हणता तुम्ही? पक्षाला तुमची कदर नसेल तर सोडून द्या असा कृतघ्न पक्ष.

वडील:- आणि काय करायचं?

आई:- जा की दुसऱ्या पक्षात. तिकडून आमदार बनून जिरवा मग इथे एकेकाची. तात्यासाहेब, गणपतराव आलेच ना बाहेरून.

वडील:- ह्यांना वैचारिक बैठक नाही. सत्तेचं वारं कुठे वाहतंय हे बघून पक्ष बदलतात लेकाचे. ब्राह्मणाला आणि त्यातही माझ्यासारख्या कट्टर हिंदुत्ववाद्याला दुसरं कोण देणार तिकीट?

(शांतता. अथर्व २ सुटकेस घेऊन बाहेरून घरी प्रवेश करतो.)

अथर्व:- अरे, हे काय सुतकी वातावरण घरी?

आई:- (आश्चर्याने) अथर्व, अरे तू कसा काय आलास अचानक?

अथर्व:- आठवण आली तुमची. यावं म्हटलं भेटायला.

(अथर्व सुटकेस खाली ठेवून सोफ्यावर बसतो.)

आई:- अरे आधी सांगायचं तरी. आलो असतो तुला घ्यायला स्टेशनवर.

वडील:- काय चाललंय पोराचं कुणास ठाऊक. नाहीतर वर्ष-वर्ष यायचं नाही. आणि आता अकारण घरी परत परत.

आई:- तुम्ही थांबा हो. घरी आला ते महत्त्वाचं. (अथर्वकडे जाताना आईला सुटकेस दिसतात.) अरे हे काय, सगळंच सामान आणलं की काय? किती दिवस राहायचा बेत आहे?

अथर्व:- ६-७ महिने तरी.

आई:- शिक्षण सोडलंस की काय?

अथर्व:- सस्पेंड केलंय मला या वर्षासाठी.

आई:- काय? अशी गंमत करणं बरं नाही हं.

अथर्व:- नाही. खरंच आहे ते.

वडील:- काय उपदव्याप केलेस असे तिथे?

अथर्व:- डीननं बंद पडलेलं मासिक आम्ही परत सुरू केलं. आणि रोहितच्या केस बद्दल सतत लेख लिहायला लागलो.

आई:- रोहित कोण?

अथर्व:- त्याच्या आत्महत्येचं प्रकरण किती गाजतंय आजकाल. न्याय मिळेपर्यंत ते जिवंत ठेवणार आहोत आम्ही.

वडील:- कसला न्याय? आम्ही वाचतोच आहोत. अभ्यास झेपला नाही त्याला कोण काय करणार. लायकी नसताना जात बघून मिळालेली ऍडमिशन.

अथर्व:- खोट्या आहेत त्या बातम्या. बातम्यांच्या नावाखाली प्रोपगांडा पसरवतात सगळे.

आई:- मग प्रकार आहे तरी काय?

अथर्व:- रोहित आमच्या विद्यार्थी संघटनेत खूप सक्रिय असायचा. दलितांवरच्या अन्यायांबद्दल भाषण देणे, पत्रकं तयार करून वाटणे, सतत सुरू असायचं त्याचं. हेच खूपायचं लोकांना. मग अद्दल घडवायची म्हणून काहीतरी तांत्रिक कारण दाखवून त्याचं जात प्रमाणपत्र खोटं ठरवलं. स्कॉलरशिप थांबली बिचाऱ्याची. म्हणजे तो ज्या अन्यायाबद्दल बोलायचा तो त्याच्याही बाबतीत घडवून आणला कॉलेजनी.

वडील:- मला सांग, अन्याय काय दलितांवर होतो फक्त? इथे ब्राह्मणद्वेष्टी राजकारणामुळे हक्काची आमदारकी गेली माझी. दलितांसाठीच्या राखीव जागेमुळे नगरसेवक पद पण जातंय आता. माझं २५ वर्षांचं पूर्ण करिअर संपतंय इथे.

अथर्व:- तुमच्या या दळभद्री सत्ताकारणातल्या पराभवाची तुलना तुम्ही दलितांवरच्या अन्यायाशी, अमानुष अत्याचाराशी करता?

(काही क्षण शांतता.)

आई:- अरे पण या रोहित प्रकरणाचा तुझ्याशी काय संबंध?

अथर्व:- काय संबंध म्हणजे? म्हणजे कोणावर अन्याय होतोय, त्यांच्यावर अकारण चिखलफेक होतेय आणि आपण शांत बसायचं?

आई:- तुझ्या शिक्षणावर परिणाम होतो आहे त्याचा. सस्पेंड होणं म्हणजे काय लहानसहान गोष्ट आहे का? अरे वर्षं वाया जाणार तुझं.

अथर्व:- माझ्या वर्षाचं काय घेऊन बसलीस आई. तिथे रोहितचा जीव गेला. आयुष्य गेलं त्याचं, या कॉलेजच्या व्यवस्थापनामुळे.

आई:- (वडिलांना) अहो, तुम्ही समजवा बरं याला.

वडील:- तो समजण्याच्या पलीकडे गेला आहे आता. आपले कष्ट, त्याच्या फीसाठी जमवलेले पैसे, काहीच दिसत नाही त्याला.

अथर्व:- मी जड झालो आहे का तुम्हाला? सांगा तसं असेल तर. काहीतरी नोकरी करून सोय करून घेईन मी स्वतःची.

वडील:- बघितलंस? एक वाक्य धड बोलत नाही माझ्याशी. संवाद नावाची गोष्ट नाही याच्यासोबत.

अथर्व:- लहानपणापासून तरी होता का संवाद आपल्यात? वेळ तरी होता का तुम्हाला संवाद साधायला आमच्याशी?

वडील:- छान! म्हणजे याच्या सस्पेंड होण्याचं खापर पण माझ्याच डोक्यावर फुटणार तर. (विराम.) कोणालाच तोंड दाखवायची सोय नाही आता. काय सांगणार आहोत आपण मुलगा कॉलेज सोडून घरी का आलाय तर?

आई:- लोकांचं राहू द्या हो जरा. (अथर्वला) तू काय करायचं ठरवलं आहेस मग आता?

अथर्व:- कॉलेजची बंधनं नाहीत मला यावर्षी तरी. आमच्या विद्यार्थी संघटनेच्या शाखांतर्फे हे प्रकरण तापवणार आहोत आम्ही. वेगवेगळ्या शहरात, वेगवेगळ्या कॉलेजमध्ये सभा घेणार आहोत. मोर्चे काढणार आहोत. रोहितचं बंड जागृत ठेवणार आहोत. पुढे नेणार आहोत. अन्याय सहन करत बसला असता तर आज असता जिवंत तो. पण हे असं जगणं त्याला मान्य नव्हतं. आणि त्याचं हे बंड व्यवस्थेलाच मान्य नव्हतं. आत्महत्या नाही ती आई. खून होता तो. या समाजव्यवस्थेनं केलेला. ही समाजव्यवस्था पूर्ण बदलेपर्यंत खरा न्याय मिळणार नाही रोहितला.

आई:- म्हणजे इतकं सगळं होऊन देखील तू थांबणार नाहीसच तर?

अथर्व:- की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने! तूच शिकवली होतीस ही कविता मला लहानपणी. आता मी माझा मार्ग निवडलाय.

(अथर्व निर्धारानं शून्यात बघत स्थिरावतो. शांतता. अंधार.)

बुलडोझर एकांकिकेची संपूर्ण संहिता:

  1. बुलडोझर (एकांकिका - प्रवेश १)
  2. बुलडोझर (एकांकिका - प्रवेश २)
  3. बुलडोझर (एकांकिका - प्रवेश ३)
  4. बुलडोझर (एकांकिका - प्रवेश ४ - अंतिम)

© प्रणव साकुळकर, २०२३.

प्रकाशनाचे, अभिवाचनाचे आणि प्रयोगाचे सर्व हक्क लेखकाकडे. परवानगीसाठी लेखकाशी संपर्क साधावा.
Contact: pranav.sakulkar@gmail.com

Group content visibility: 
Use group defaults