बुलडोझर (एकांकिका - प्रवेश २)

Submitted by प्रणव साकुळकर on 28 November, 2023 - 14:34

(तीच सकाळ. भोंग्यावर गणपतीची गाणी सुरू आहेत. आई स्वयंपाकघरात काम करत असावी. अथर्व समोरच्या खोलीत सोफ्यावर बसून मोबाईल मध्ये गुंतला आहे. आर्णा समोरच्या खोलीत येते.)

आर्णा:- गुड मॉर्निंग दादा.

(अथर्व आपल्याच तंद्रीत. ऐकू आलेलं नाही. आर्णा अथर्वचा मोबाईल हिसकावून घेते.)

आर्णा:- गुड मॉर्निंग म्हटलं अरे मी.

अथर्व:- (चिडून) ही काय गुड मॉर्निंग म्हणायची पद्धत झाली? आणि इतक्या उशिरा होतेय तुमची मॉर्निंग सुरू?

आर्णा:- वाह, म्हणजे रविवारी पण झोपायचं नाही का आम्ही. रोज सातचा क्लास असतो एरवी.

अथर्व:- मोबाईल दे आधी. आणि मला सांग, एवढ्या गोंगाटात झोपू कशी शकतेस तू? मी तर ठरवून पण झोपू शकलो नाही.

आर्णा:- या घरात राहायचं तर गडबड गोंधळीचा त्रास होऊन कसं चालेल? गेले काही महिने तर सकाळपासून येऊन बसतात ते बाबांचे रिकामटेकडे कार्यकर्ते. दिवसभर टवाळक्या करत बसले असतात समोर ऑफिसात. गुंडच वाटतात मला.

अथर्व:- बाबांचं प्रस्थ चांगलंच वाढलेलं दिसतंय पण.

आर्णा:- या चांगल्या वाईटाशी माझं अजिबात घेणं देणं नाही. आता दोन वर्षं इथे काढायची आहेत. आणि बारावीनंतर तुझ्यासारखं दिल्ली, नाहीतर पुणे-मुंबई. नागपूर तर सोडायचंच ठरवलंय मी.

अथर्व:- इतका वीट आला नागपूरचा?

आर्णा:- नागपूरचा नाही रे, बाबांच्या राजकारणाचा. आणि इथे राहून तरी काय करायचंय? बाबा दिवसभर कार्यकर्त्यांसोबत बिझी. त्यांची सोय बघण्याखेरीज आईला फुरसत नाही. आणि बाहेर कुठे फिरायची उजागिरी नाही. मागे मित्रांबरोबर संध्याकाळी सिनेमाला गेली होती. बातमी थेट घरी पोहोचली. घरी आल्यावर मला आपल्या संस्कृतीबद्दल मोठ्ठ लेक्चर मिळालं. मला कळलं संस्कृती वगैरे काही नाही, मुलांसोबत हिंडण यांच्या इमेजसाठी चांगलं नाही. म्हणजे यांच्या राजकारणामुळे आमच्या स्वातंत्र्यावर बंधनं. राहायचंच कशाला मग इथे? तू सुटलास मस्त. (विराम.) पण मला सांग, आमची आठवण येत नाही का रे? उन्हाळ्यात घरी का आला नाहीस? मागे दिवाळीला पण आला नाहीस.

अथर्व:- घरी येऊन काय करणार आता? बरेचसे मित्र तर शिकायला मुंबई-पुण्याला गेले. तुलाच काय ते भेटावसं वाटतं. बाकी घरी तर काय हे भलतंच प्रकरण.

आर्णा:- मग आता गणपतीला काय म्हणून घरी अचानक?

अथर्व:- (कोणी ऐकत नाही हे बघून) गणपतीला म्हणून नाही गं. आमचं मासिक बंद पाडलं कॉलेजनी. अभ्यासक्रमातल्या राजकीय ढवळाढवळीबद्दल मालिका लिहली होती मी त्यात. डीनला ते पटण्यासारखं नव्हतं. सरकारचा बाहुला तो. म्हणाला ही शेवटची वॉर्निंग तुला. यापुढे असल्या उठाठेवी केल्यास तर सस्पेंड करील म्हणाला. डोक्यात तिडीक गेली आणि आलो निघून घरी.

आर्णा:- छान, म्हणजे मला ज्या क्षेत्रात इंटरेस्ट नाही, ज्याच्यासाठी मी घर सोडणार आहे, तू बाहेर जाऊन तेच करतो आहेस. बाबांवर गेला आहेस पक्का.

अथर्व:- काय? मी आणि बाबांवर? बाबांचं आणि माझं राजकारण म्हणजे दोन टोकं अगदी. सकाळीच ते जायच्या आधी वाजलं आमचं.

आर्णा:- सोड ते. मला सांग, काय म्हणते तुझी आर्शिया?

(इतक्यात आई बाहेर येताना शेवटचं वाक्य तिला ऐकू येतं.)

आई:- आर्शिया? कोण रे बाबा ही पोरगी?

अथर्व:- (गांगरतो. पण सावरून) कॉलेजमधली मैत्रीण. आमच्या मासिकात लिहिते लेख.

आई:- नाव हिंदू दिसत नाही.

अथर्व:- हो. मुस्लिम आहे. दिल्लीचीच.

आई:- बाप रे! सांभाळून रे बाबा. काही खरं नाही त्या लोकांचं. लव जिहादचं किती चाललंय आजकाल!

अथर्व:- (हसत) अरे! हे तर त्याच्या विरुद्ध नाही का? इथे तर मुलगा हिंदू आणि मुलगी मुस्लिम. तुम्ही तर पेढे वाटायला पाहिजे.

आई:- तू हसण्यावारी नेऊ नको हं. अरे मुसलमान सून आणलीस तर आम्ही लोकांना काय तोंड दाखवायचं? आणि आर्णाशी मग कोण मुलगा लग्न करेल?

अथर्व:- हे लग्नाचं आलंच कुठे मधून. लग्नाचं वय आहे का माझं? आणि ही अकरावीतली. का हीचं वय आहे? आणि हे तोंड दाखवणं काय, लपवणं काय, कुठल्या जमान्यात आहात तुम्ही?

आई:- तू गेलास दिल्लीला. उंटावरून शेळ्या हाकायला काय होतं. आम्हाला तर इथेच राहायचं आहे, याच समाजात.

अथर्व:- पहिली गोष्ट म्हणजे आमचं तसं काहीच नाही अजून. आणि काही ठरवायचं जरी असेल तरी तुमची संस्कृती, तुमचा समाज, बाबांची राजकीय सोय-गैरसोय असा कुठलाही विचार करणार नाही मी.

आई:- अरे काळजी वाटते म्हणून म्हणते तुला.

अथर्व:- लहान राहिलो आहे का मी आता? माझे निर्णय घ्यायला मी स्वतंत्र आहे.

आई:- मग तर काय बोलणंच खुंटलं.

(आई चिडून स्वयंपाकघरात निघून जाते.)

आर्णा:- तू काय एक-एक करून सगळ्यांशीच वाजवायचं ठरवलं आहेस का?

अथर्व:- आता मी सुरू केलं होतं का? पण मला हे कळत नाही, इतका मुस्लिम द्वेष आलाच कुठून? लहानपणी तर इतकं उघडपणे काही नव्हतं.

आर्णा:- अरे! हे व्हॉट्सऍपचे परिणाम. सतत त्यांच्या ग्रुपवर असं काहीतरी येत असतं. त्या फॅमिली ग्रुपवर पण हेच चाललंय आजकाल. त्यात आई अशी भोळी. ते वाचून सगळं खरंच वाटतं तिला.

अथर्व:- अरे हो! बरं झालं सोडून दिला मी तो फॅमिली ग्रुप आधीच. डोकं तापायचं नुसतं सकाळी सकाळी मेसेज वाचून. किती लोकांशी हुज्जत घालणार आता! आई तर हमखास फेक न्युजला बळी पडत असेल. पण तू तरी सांगत जा काही यांना.

आर्णा:- मला अश्या चर्चांमध्ये काहीच इंटरेस्ट नाही. मी तर दुर्लक्ष करायला शिकली आहे. आजकाल मी तर तो ग्रुप साधा उघडूनही पाहत नाही. (विराम. विषय बदलून) बरं ते सोड आता. तू दिल्लीबद्दल सांग मला. सतत पार्ट्या चालत असणार ना कॉलेजमध्ये तुमच्या?

अथर्व:- पार्ट्या? इतके पैसे आणि वेळ आहे कुणाकडे!

आर्णा:- उगाच टपल्या देऊ नकोस. मला चांगलं माहिती आहे कॉलेजमध्ये कसं दारू, सिगरेट सुरू असतं ते. माझ्यापासून काय लपवायचं?

अथर्व:- लपवण्यासारखं काही नाही त्यात. करणारे करतात. काही अभ्यासू, काही टवाळखोर. काही खेळात बिझी तर काही नाटकात. सगळे आपापल्या आवडीचं काय ते करतात. माझा त्या पार्टी करणाऱ्या मुलांशी काही संबंध नाही फारसा. माझं त्या मासिकाचं काम सुरू असतं. म्हणजे… होतं.

आर्णा:- (निराशेनं) किती बोअरिंग आहेस रे तू!

अथर्व:- तुला काहीतरी इनसाइड स्कुप हवाय वाटतं. तर मग ऐक. मी नॉन-व्हेज खायला लागलोय.

आर्णा:- काय? त्या आर्शियानी लावलं असेल खायला.

अथर्व:- आता तू पण?

आर्णा:- अरे गंमत करतेय. मी ओळखून आहे तुला. तू कोणाच्या कह्यात येणार्यांपैकी नाहीस. न पटलेलं काही करणार नाहीस तू.

अथर्व:- अगदी बरोबर. तूच काय तर ओळखतेस या घरी मला.

आर्णा:- बरं. मग माझं एक ऐकशील?

अथर्व:- पटवून दिलंस तर नक्की ऐकीन.

आर्णा:- आईला फोन करत जा बरं अधून मधून. ती नेहेमी म्हणत असते, अथर्वशी बोलणं झालं का? कसा आहे वगैरे? आई खूप हळवी आहे अरे. तिच्याशी तरी असा वागू नकोस.

अथर्व:- बाप रे! किती शहाण्यासारखं बोलतेस! मोठीच बहीण आहेस की काय असं वाटलं मला.

आर्णा:- मग. आहेच मी समजूतदार. काय समजला काय होतास तू मला!

(आई घाईघाईनं बाहेर येते.)

आई:- अरे नुसते बोलत काय बसलांत! तयारीला लागा पटकन.

अथर्व:- घाई कसली? जायचं कुठे आहे?

आई:- अरे, आज ह्यांचा हस्ते आहे मंडळात आरती नाही का? सहकुटुंब जायचंय.

अथर्व:- जाऊन या तुम्ही. मला इंटरेस्ट नाही त्यात.

आर्णा:- अथर्व! काय बोललो आपण आता?

अथर्व:- (नाईलाजानं) ठीक आहे. येतो. घरी बसून कामं तरी काय आहेत मला. खुश आता?

(अथर्व आत तयारीला जातो.)

आई:- (अथर्वला आत ऐकू जाईल अश्या आवाजात) हो आणि गबाळ्यासारखा येऊ नको असा. छान कपडे घाल. वर्षभरानंतर आला आहेस. सगळ्यांच्या नजारा असतील तुझ्यावर. चांगला दिसला पाहिजे माझा मुलगा. (आर्णाला) आणि तू काय करते आहेस इथे? तुझी तर आंघोळ पण राहिली आहे. लागा तयारीला. चला.

(आई आणि आर्णा आत जातात. अंधार.)

बुलडोझर एकांकिकेची संपूर्ण संहिता:

  1. बुलडोझर (एकांकिका - प्रवेश १)
  2. बुलडोझर (एकांकिका - प्रवेश २)
  3. बुलडोझर (एकांकिका - प्रवेश ३)
  4. बुलडोझर (एकांकिका - प्रवेश ४ - अंतिम)

© प्रणव साकुळकर, २०२३.

प्रकाशनाचे, अभिवाचनाचे आणि प्रयोगाचे सर्व हक्क लेखकाकडे. परवानगीसाठी लेखकाशी संपर्क साधावा.
Contact: pranav.sakulkar@gmail.com

Group content visibility: 
Use group defaults