भाग 1 आणि 2 इथे वाचा:
भाग १
भाग २
अतिशय भिन्न विचार असलेली दोन किंवा माणसं वर्षानुवर्षे घरात नांदत असली की कोणतंही काम अगदी सुधेपणाने होत नाही.(आता मी यापुढे 'आणि यातच तर खरी आयुष्य जगण्याची लज्जत असते.आयुष्य रुपी जेवणाला चव आणणारं हे माईनमूळ लोणचं.संसाराच्या खमंग पोळीला लावलेलं चमचमीत वऱ्हाडी तिखट.असंच हाय हुय करत हे तिखट खात नंतर जिभेवर आलेली गोड आफ्टरटेस्ट न्यारीच.असंच हे तिखट लोणचं,प्रेमाचे गुलाबजाम,समजूतदारपणा चा वरणभात,गॉसिपिंग ची चटणी खात जे जेवण खाऊन एक दिवस यथावकाश मृत्यूरुपी तृप्त ढेकर द्यावा.' असं लिहून तुमच्या साठी वात्रट व्हॉट्सअप फॉरवर्ड अजिबात तयार करणार नाहीये. घाबरू नका.) इंटिरिअर वाल्याना विरोध करण्या वरून झालेले हे काही संवाद वानगीदाखल:
'अरे तू त्यांच्या सगळ्या सूचनांना हो म्हणून मान काय हलवतोस?त्यांचं काय जातंय सगळीकडे काचा लावायला?उद्या काचेच्या भिंती वाला संडास सुचवतील.'
'मग तू कर ना विरोध.तुला मी कधी अडवतो का?'
'मी करते आहेच.पण तू जर नेहमी साने गुरुजी बनून राहिलास तर मला नेहमी विरोध भूमिकेत जावं लागेल आणि ते पाठीमागे 'साहेब बिचारा भला माणूस पण त्याची बायको हडळ आहे' म्हणतील.'
'जसं काय आपण विरोध करत नाही तोपर्यंत आपल्या मागे ते आरत्याच ओवाळतात की नाही.विरोध तुझा आहे.व्यक्त तूच करायचा.'
'म्हणजे मी केला नाही तर तुला घरातल्या सगळ्या कपाटाना काचेची शटर आणि त्यातून दिसणारा पसारा चालेल का?'
'किती निराशावादी सिनिक आहेस गं तू!! पसारा होणाऱच असं सुरुवातीपासून धरून चाललं तर कठीण आहे.माझ्या कपाटात तरी अजिबात असं होणार नाही.'
'हे बघ,आतापासूनच शब्द देऊ नकोस.तुझे शब्द काय आहेत मला माहिती आहे.तू 3 वेळा सिडलिंग ट्रे आणून त्यात मायक्रोग्रीन वाढवून सॅलड खाणार होतास.3 वेळा ते गॅलरीत पडून सडलेले,तुटलेले ट्रे मी फेकलेत.'
'हे बघ,प्रत्येक भांडणात सिडलिंग ट्रे आणायची गरज नाही.दम है तो इंटिरिअर वाल्याना विरोध कर वरना ग्लास शटर बरदास्त कर.'
'सिडलिंग ट्रे' हे आमच्या सर्व भांडणांमधलं ब्रह्मास्त्र आहे.जसा ड्रॅकुला ला परतवायला क्रॉस तसा भांडणातल्या नवऱ्याला गारद करायला सिडलिंग ट्रे.
'ओ' ला अतिशय आवडणाऱ्या 2 गोष्टी: प्रोफाईल शटर्स उर्फ काचेची कपाट दारं आणि 'हायड्रॉलीक शटर्स' उर्फ वर उघडणारी दारं.दोन्हीला मी कडाडून विरोध केला.एकतर 15 वर्षांपूर्वी केलेल्या इंटिरिअर मध्ये आम्ही लांब राहत असल्याने पाहणी करायला सारखं येणं न जमल्याने आणि मुख्य सुतार 6 फूट 2 इंच असल्याने त्याने आपल्या उंचीनुसार लावलेली स्वयंपाकघरातली कपाटं.कोणतंही कपाट आतली वस्तू बरगडीत उसण भरल्याशिवाय किंवा कुठून तरी धडपडत शिडी घेऊन आल्याशिवाय दाद न देणारं.हायड्रॉलीक शटर्स वर उघडणारी सर्वात छतालगतच्या शेल्फ ला लावणं हा दिसायला एकदम सुंदर गुळगुळीत एकसंध, हँडल न दिसणारा प्रकार असला तरी बुटबैंगण माणसाला ऍक्सेस ला अतिशय मूर्खपणाचा आणि वेदनादायी होता.त्यामुळे शेवटी शेवटी माझा 'जब वी मेट' मधला अंशुमन, 'क्यो देखू मैं गनने के खेत, नही देखणे मुझे गनने के खेत!!!' झाला.आता यातल्या बऱ्याच शेल्फ ना हाताला येईल असा एक दांडा असतो, तो धरून झाकणं खाली ओढता येतात.
'कटकटी चिडकी बाई शक्यतो सगळ्याला नाही म्हणणार' हे 'ओ' ला माहीत असल्याने ओ चे साईट सुपरवायझर आधी सरांना फोन करून पटवून घेऊ लागले.मग आम्ही सर्व निर्णयात व्हिडिओ कॉल करून चर्चा करून एकमेकांना आणि 'ओ' ला सेम पेजवर आणलं.सुदैवाने हे प्रकार 10-20 मिनिटात आवरत असल्याने ऑफिस कामाला याचा फटका बसला नाही.
'ओ' ची काम करण्याची प्रोसेस शिस्तबद्ध होती.ठराविक टप्प्यात 2डी डिझाईन शेअर करणे, ठराविक रक्कम मिळाल्यावर बिल ऑफ मटेरियल शेअर करणे, ठराविक रक्कम मिळाल्यावर 3डी चे फोटो शेअर करणे(प्रत्यक्ष डिझाईन पाठवले जात नाही.),ठराविक रक्कम दिल्यावर मापं आणि फॅक्टरी फर्निचर ची कट लिस्ट बनवायला येणे, ठराविक रक्कम दिल्यावर सर्व मटेरियल साईट वर टाकणे असे.यात सर्वात जास्त नियमित गोष्ट अकौंन्ट कडून हफ्ता मागणी होती.मग असा कामाचा काही काळ सुरळीत गेल्यावर 'ओ' चा आणि आमचा नाच गं घुमा चा खेळ चालू झाला.
आम्ही: 'नाच गं घुमा!!'
'ओ': 'या गावचा, त्या गावचा, इलेक्टरीशीयन गावी गेला, पैसे नाही मला, सामान नाही मला, कामगार नाही मला,कशी मी नाचू!!'
आम्ही: 'नाच गं घुमा!पैसे घे तुला,कामगार दे मला, सामान घे मला, नाच गं घुमा!!'
'ओ' ची गंमत ही की हफ्ता मागणी करून हफ्ता घेण्याच्या 2 दिवस आधी ते साईटवर पूर्ण 4 सुतार,1 इलेक्टरीशीयन ची टीम लावत.मग खुश होऊन आम्ही हफ्ता दिला की दुसऱ्या दिवशी पासून फक्त एक पाप्याचं पितर प्लास्टर वाला, इन्व्हेंटरी नाही, साईट सुपरवायझर दुसऱ्या साईट वर असे प्रकार चालू होत.'ओ' ने आमचं काम घेतलं तेव्हा त्यांच्याकडे बिझनेस कमी होता.आमचं काम घेतल्यावर सृष्टीत पॉझिटिव्ह गुडलक लहरी निर्माण होऊन त्यांच्याकडे 5 मोठी प्रोजेक्ट आली आणि त्यांच्यावर छाप पाडणे महत्वाचे ठरू लागले.
त्यात 'ओ' च्या एकंदर रिसॉर्स मॅनेजमेंट मुळे एक इलेक्टरीशीयन येऊन आधीची पाहणी करणार, दुसरा येऊन भिंतींना खड्डे पाडून वायरीची खाच बनवणार,तिसराच येऊन स्विचबोर्ड लावणार असा सगळा खो खो होता.या खो खो मध्ये मूळ कॉन्स्टंट आम्हीच असल्याने आम्हाला डोकं ठिकाणावर आणि थंड ठेवून सर्वाना एका पानावर ठेवणं गरजेचं होतं.सुतार टीम बदलत राहिल्याने त्यांनी टीव्ही चं पॅनल 3 वेळा काढून परत बसवलं. आमच्या दोघांपैकी जे कोणी ऑफीस ला जाईल त्याचा व्हॉटसअप वर पहिला प्रश्न 'आज टीव्ही पॅनल परत तोडलं का लॅमीनेट बसवलं' हा असायचा.प्रत्येक ऑफिस ला जाणाऱ्या निरागस जीवाला 'आपण घरी येऊ तेव्हा काहीतरी एक आयटम जोडला गेला असेल,छान वस्तू लावता येतील' असं वाटायचं.घरी येऊन बघावं तर एखाद्या बिझी सलून मध्ये 5 माणसांच्या अर्ध्या अर्ध्या दाढ्या करून फोन घ्यायला बाहेर जाणाऱ्या माणसा सारखं एक कपाटाचे फक्त 2 कप्पे, दुसऱ्याचं दार,तिसऱ्याचं मॅग्नेट राहिलेलं असं सगळंच फर्निचर अर्धंमुर्ध दिनवाणं उभं असायचं.(सुतार काही चूक करत नव्हते. जितकी फायनल प्रोडक्ट लॅमिनेट लावलेली जास्त, तितकें ओरखडे, गोंद न सांडणे,वेल्डिंग कटिंग च्या ठीणग्या जाऊ न देणे याबद्दल जास्त जपावं लागतं.)आता आता जरा सगळ्या पृष्ठभागावर लॅमिनेट लागायला लागले.
ओ च्या चांगल्या गोष्टी या की मटेरियल आणि कामाची प्रत चांगली आहे.शिवाय त्यांनी आमच्या डोक्यातल्या अनेक अबस्ट्रॅक्ट कल्पना नीट पूर्ण केल्या.यातली महत्वाची माझ्यासाठी म्हणजे परदेशात असते तशी शूज, कोट्स आणि हेल्मेट काढून ठेवण्याची लिव्हिंग रूम च्या एका कोपऱ्यात करण्याची चिमुकली(आत नुसती उघडी शेल्फ असलेली) लाकडी खोली.(याला आम्ही 'पसारा करण्याची खोली' म्हणतो.आम्ही आता लिव्हिंग रूम च्या सर्व पृष्ठभागावर टाकतो त्या गोष्टी एकाच खोलीत टाकायच्या.)दुसरी गोष्ट म्हणजे पार्सल्स आत टाकता येतील अशी चौकोनी झडप खिडकी असलेलं दार.हे रेडिमेड दारांमध्ये पण मिळतं.
अश्या प्रकारे गणपती नंतर नवरात्रात 'पूर्ण होणार' अशी वदंता असलेलं काम दिवाळीत पूर्ण होणार होतं.पण 'तुमच्याकडे साईटवर बनवायच्या गोष्टी खूप जास्त आहेत' म्हणून ते अजून बाकी आहे.बहुतेक दिवाळी नंतर 15 दिवसात होईल.आम्हीही मख्खपणे सामानाच्या ढिगात स्वयंपाकघर आणि एक खोली मोकळी स्वच्छ आणि टापटीप ठेवून तिथे मजेत राहतो आहोत.जेव्हा होईल तेव्हा होईल.
सध्या सोसायटी वाले सोसायटीत चकरा मारता मारता भेटले की 'क्या बात है,अभीभी पुरा नही हुवा, महल बना रहे हो क्या' विचारतात.आम्ही पण शांतपणे 'ह्या ह्या ह्या, होने के बाद आ जाओ देखणे' म्हणून महाल बनवत असल्याच्या ऐटीत म्हणून पुढे निघून जातो!! कितीही छोटे बदल असले तरी आमच्यासारख्या कष्टाच्या व्हाईट मनी ने आयुष्यात कधीतरी मोठं काम काढणाऱ्या लोकांसाठी आमचा महालच तो.
जबरदस्त लिहिलं आहेस.
जबरदस्त लिहिलं आहेस.
तीनही भाग भन्नाट जमले आहेत.
तीनही भाग भन्नाट जमले आहेत. सगळ्यांच्या दुखऱ्या नसेवर बोट न ठेवता गुदगुल्या केल्या आहेत.

तुमची मडरूम भरपूर स्टोरेजस्पेसने युक्त अशी छान झाली आहे. 'गुडलक लहरी' बद्दल अनुभव आहे. दुर्दैवाने मग ते आपल्याकडेच दुर्लक्ष करायला सुरुवात करतात. तुमचं घर तुमच्या मनाजोगे संपन्न -संपूर्ण होवो हीच सदिच्छा. अशीच मस्त लिहीत रहा आणि पूर्ण झालेल्या घराचे फोटो येऊ दे.
खूप विनोदी.
खूप विनोदी.
आमचं वायरिंग मीच करतो त्यामुळे फारसा त्रास नसतो. शिवाय १९८५चे बांधकाम असल्याने यात सुधारणा करायच्या नाहीत हे ठरवले आहे. त्यात बदल नाही.
अनुजी ( हे जरा बरं पडतंय, सवय
अनुजी ( हे जरा बरं पडतंय, सवय करून घ्या
)
या लेखाबद्दल धन्यवाद. आमच्याकडे मुलं मोठी होत असल्याने रूमवरून सतत भांडणं असतात. इतक्यातच बंकर बेड फुकटात देऊन मुलीला बेड घेतला. ती आता मुलाला रूममधे येऊच देत नाही. त्यामुळे बाल्कनी एन्क्लोज्ड केली. पण नंतर वेळ खाऊ आणि खर्चिक कामामुळे उर्वरीत काम ठेवून दिले होते.
काल बायकोला लेख वाचायला दिल्यावर तिने उचल खाल्ली. आता काम पूर्ण करण्यासाठी पैसे, वेळ याचे अंदाज आणि वेळापत्रक बनवायचेय. या वेळी नेमके काय करायचे याचे स्केचेस काढून घेतोय. या लेखाचा उपयोग होतोय. नियोजन केले तर कमी त्रासात होईल असं वाटू लागलं आहे.
बाल्कनीत एक बेड. स्टोरेज, डेस्क अरेंज होईल असे माप घेऊन गेलेला सुतार म्हणाला.
मुलीने बेडरूम बळकावले आहे आणि बाल्कनीत अभ्यास करत बसते.
रघु, भविष्यात कामासाठी
रघु, भविष्यात कामासाठी शुभेच्छा!!
काम नक्की व्यवस्थित आणि उत्तम होईल.
पकवणं का बन्द केलं?? काम चालु
पकवणं का बन्द केलं?? काम चालु आहे ना अजुन?
अजुन भाग पाहिजेत...
प्रतेक "ओ" ला प्रचंड हसायला आलं ...
आम्ही नूतनीकरण चालू केलं आणि
आम्ही नूतनीकरण चालू केलं आणि पूर्ण हिंदू कॅलेंडर कायनात आम्हाला उशीर करायला सरसावली.आधी जास्त पाऊस.मग गणपती. मग नवरात्र. मग श्राद्धपक्षात त्यांना डिझाईन ला वेळ हवा म्हणून.मग दिवाळीत 2 जण येत होते.आता छठपूजा म्हणून सुट्टी.
कोणीही आपले काम चालू करताना सणवार कॅलेंडर बघून चालू करा.
'10 नोव्हेंबर दिवाळीपूर्वी नक्की कम्प्लिशन' चे मागच्या आठवड्यात '25 नोव्हेंबर नक्की' आणि काल '30 नोव्हेंबर अगदी नक्की' झालेले आहे.
१ जानेवारीस सुरु करुन जो कोण
१ जानेवारीस सुरु करुन जो कोण २९ फेब्रुवारी पर्यन्त गॅरेंटीसहित पूर्ण करुन देत असेल त्यानाच हमखास काम द्यावे
फायनल
फायनल
आईशप्पत फायनल
आईशप्पत शेवटचे फायनल
आईशप्पत शेवटचे एकदम फायनल
......
.........
............
हे असे शेपूट असतेच
काम संपायला दिलेल्या
काम संपायला दिलेल्या तारखेपेक्षा उशीर झाला किंवा काम करताना लादी फुटणे किंवा अन्य प्रकारचे आपले नुकसान झाले तर पैसे कट करण्याची तरतूद आपण सुरवातीलाच केली पाहिजे पण आपल्याकडं सेलर्स मार्केट असल्याने ग्राहक ते करू शकत नाहीत. असो.
हो
हो
))(सगळे कंस बंद केले आहेत,मोजून घ्या)
आणि हे लोक ऑन पेपर कोणत्याही तारीख काय,महिन्याच्या पण कम्प्लिशन कमिटमेंट देत नाही(इथे एक मोठे नवरा उवाच: "ते काय प्रोग्रॅम लिहून द्यायचा it प्रोजेक्ट आहे का?प्रत्यक्षात भिंती उंचसखल असतात.फर्निचर ऑर्डर घेताना घेतलेली मापं नंतर त्यावर त्या पृष्ठभागावर प्लास्टर वाल्याने उत्साहाने जास्त प्रेमाने जास्त पुट्टी लावल्याने फसतात." (अरे पण इतक्या अनिश्चितता आहेत तर पैसे हफ्ता काम होण्यापूर्वी मागून 2 दिवसाची पेमेंट मुदत का देता?तिथेही थोड्या अनिश्चितता लावा की गड्यांनो!!
No syntax error अनु जी
No syntax error अनु जी
ते This is last and final
ते This is the last and final call for all passengers travelling on jet airways flight 9W 456 to...
सारखे झाले.
तो लास्ट अँड फायनल कॉल दहा वेळा तरी ऐकू येतो.
मी जी नाहीये
मी जी नाहीये

नवरा जी आहे, त्याचं मधलं नाव जी पासून चालू होतं
काल इंडीयन आयडॉल मधे विशाल
काल इंडीयन आयडॉल मधे विशाल ददलानी म्हणाला कि इस धुन के लिये अनुजी को सलाम. ते लक्षात राहीलं.
मी_अनु लिहीताना कसरत होते आणि मजेशीर पण वाटतं. म्हणून अनुजी केलं.
लै भारी गं .. इतरांचे हे सगळे
लै भारी गं .. इतरांचे हे सगळे केविलवाणे आणि पेशन्स चा कडेलोट करणारे खटाटोप बघून/ ऐकू// वाचून मी आताच शहाणं व्हावं म्हणते.. लौकरात लौकर घरातील "असूदेत, लागेल कधीतरी" कॅटेगरी नामशेष करायला हवी.
पण लिहिलंय बाकी भन्नाट यात काही वादच नाही ३नही भाग सलग वाचले.. मज्जा आली!! (तुम्हाला नसणार आली .. पण काय आता .. ! काम पूर्ण झाले की या धबडग्याचे फळ गोड असेल !! )
क्यो देखू मैं गनने के खेत नही
क्यो देखू मैं गनने के खेत नही देखणे मुझे गनने के खेत!!!' - हे भाssssssssरी
तीनही भाग वाचले
तीनही भाग वाचले
खूप धमाल आणि खुसखुशीत लिहिलं आहे
बऱ्याच गोष्टी रिलेट झाल्या.
आमच्याकडे काम चालू असताना आमच्या कामगारांकडून माझ्या आईने "पै दक्षिणेत लक्ष प्रदक्षिणा" सारखं काम करून घेतलं.
हमारे पोळपाट को पाय लगाने है
हमारे मिक्सर के लिये छोटा पाट करके दो
हमारे विळी का पाट बदलके दो.
तोरण के लिये खीला ठोक के दो....
"पै दक्षिणेत लक्ष प्रदक्षिणा"
"पै दक्षिणेत लक्ष प्रदक्षिणा"
'कटकटी चिडकी बाई शक्यतो
'कटकटी चिडकी बाई शक्यतो सगळ्याला नाही म्हणणार' हे 'ओ' ला माहीत असल्याने ओ चे साईट सुपरवायझर आधी सरांना फोन करून पटवून घेऊ लागले>>>>
सर्वात जास्त नियमित गोष्ट अकौंन्ट कडून हफ्ता मागणी होती.मग असा कामाचा काही काळ सुरळीत गेल्यावर 'ओ' चा आणि आमचा नाच गं घुमा चा खेळ चालू झाला.>>>
एखाद्या बिझी सलून मध्ये 5 माणसांच्या अर्ध्या अर्ध्या दाढ्या करून फोन घ्यायला बाहेर जाणाऱ्या माणसा सारखं एक कपाटाचे फक्त 2 कप्पे, दुसऱ्याचं दार,तिसऱ्याचं मॅग्नेट राहिलेलं असं सगळंच फर्निचर अर्धंमुर्ध दिनवाणं उभं असायचं.>>>>
त्याने आपल्या उंचीनुसार लावलेली स्वयंपाकघरातली कपाटं.कोणतंही कपाट आतली वस्तू बरगडीत उसण भरल्याशिवाय किंवा कुठून तरी धडपडत शिडी घेऊन आल्याशिवाय दाद न देणारं.>>>
हा हा हा!
मस्त लिहिलंय!!
कितीही छोटे बदल असले तरी आमच्यासारख्या कष्टाच्या व्हाईट मनी ने आयुष्यात कधीतरी मोठं काम काढणाऱ्या लोकांसाठी आमचा महालच तो.>>>>
खरी गोष्ट आहे
मस्त.. खुसखुशीत
मस्त.. खुसखुशीत
आम्ही नूतनीकरण चालू केलं आणि
आम्ही नूतनीकरण चालू केलं आणि पूर्ण हिंदू कॅलेंडर कायनात आम्हाला उशीर करायला सरसावली >>>

हमारे पोळपाट को पाय लगाने है
.हमारे विळी का पाट बदलके दो.
>>>> कुठलंही सुतारकाम निघाले आणि यापैकी एक काम आले नाही तर आपण भारतीय कुटुंबात राहत नाही असे बिनधास्त समजावे.
यात 'हमारे जुने टीपॉय को बचा
यात 'हमारे जुने टीपॉय को बचा हुवा सनमायका चिपकाके दो.' राहिलं.
यापैकी एक काम आले नाही तर आपण
यापैकी एक काम आले नाही तर आपण भारतीय कुटुंबात राहत नाही असे बिनधास्त समजावे. >>> how to tell you are indian by not telling you are indian.
हाहा.. तिन्ही भाग एकदम वाचले.
हाहा.. तिन्ही भाग एकदम वाचले.
मस्तच लिहिले आहे.. नेहमीच्या खुसखुशीत शैलीत..
आमचे ईंटेअरअर दिवस आठवले.. कोविड लॉकडाऊन मुळे त्याला एक वेगळीच झालर होती. चांगले कमी आणि वाईटच जास्त झाले त्यात.. पण आता हसायला येते बरेच गोष्टींवर.. कदाचित आणखी वाईट होऊ शकले असते ते झाले नाही म्हणून असावे.
मस्त लिहिलंय
मस्त लिहिलंय

अर्धी दाढी, गन्ने के खेत - एक से एक उपमा
मड रूम आवडली. (त्याला 'मड रूम' का म्हणतात? बर्फाचा चिखल होतो - अशा अर्थाने का?)
सध्याचं घर घेतलं तेव्हा याच धर्तीवर बेडरूममध्ये कपडे बदलण्यासाठी एक क्लोजेट करण्याचं माझ्या डोक्यात होतं.
पण बेडरूममध्ये डोक्याइतकीही जागा उरली नाही, त्यामुळे नाही केलं.
https://www
https://www.designingbuildings.co.uk/wiki/Mud_room#:~:text=It%20is%20cal....
धन्यवाद नव्या प्रतिसादक मंडळींनो.
आज 'ओ' चा फोन आला होता की एक काम अपेक्षेपेक्षा बरंच जास्त जातंय, 15 दिवस पुढे वाढेल आणि त्यांना जास्त पैसे हवेत.आता हे काम असं असं आहे हे त्यांनी पाहणी केलेल्या साधारण मागच्या 3.5 महिने आणि 10 साईट व्हिजिट पासून डिझायनर, साईट इनचार्ज सर्वाना क्लिअर होतं.
अर्थात आता घर बरंच चांगलं दिसू लागलं आहे.आजूबाजूला पडलेली लाकडं, खिळे,अरलडाईट, उचकटलेली जुनी हँडल,कचरा,नवी हँडल नसलेली काही कपाटं याकडे दुर्लक्ष करून आम्ही मनात छान घर बघायला शिकलो आहोत.
रिनोव्हेशन करणाऱ्या सर्वांना: घरात एक खोली अशी हवी ज्यात काहीही काम नाही किंवा अगदी फुटकळ 1 टक्का काम आहे.
कालचीच गंमत:
कालचीच गंमत:
'ओ' ला सुतार नव्या साईट वर वळवायचे आहेत.ते वारजे हुन येतात.त्यामुळे त्यांचा कटाक्ष उशिरा(म्हणजे 11,11.3० ला) पोहचून रात्री 8 पर्यंत काम मारायचा असतो.2 सुतारातला 1 चॅम्पियन दुसरा शिकाऊ उमेदवार. त्यांना वारजे हुन 2 वेगवेगळ्या साईटस करण्या पेक्षा एका साईट वर एक दिवस जास्त वेळ ताणून दुसऱ्या साईटवर दुसऱ्या दिवशी काम करणे सोपे पडते.
तर नेमकं रोज 11-7.30 किंवा 12 ते 8 करणारे हे सुतार काल 1 ला येऊन साईटवर शेवटचा दिवस म्हणून 9 पर्यंत काम करत होते. आम्ही त्यांना काम करून दार लावून जा सांगून बाहेर गेलो होतो.
घरी येईपर्यंत सोसायटी ग्रुप वर कल्ला. आमच्या समोरच्या बिहारी शेजाऱ्याने 'आपल्या सोसायटीत लोक इमिग्रंट वर्कर्स ना एक्सप्लोईट करतात, त्यांच्याकडून 14 तास काम करवून घेतात.स्वतः गरीब मुलांसाठी ngo चालवणारे हे इतर राज्यातून आलेल्या कामगारांचे हक्क डावलतात' असे मेसेज केले होते.त्याला 'अरे बाबा तू हे प्रत्यक्ष बोल, आम्हाला मेसेज ज
कर, आपली घरं 10 फुटावर आहेत' असे मेसेज केल्यावर त्याचे पुढे अजून चिडलेले उत्तर ग्रुपवर आले. प्रत्यक्ष बोलायला आला तर त्याला 'हे फक्त आजचा 1च दिवस आहे' म्हणून व्यवस्थित समजावू म्हणून शांत राहिलो.मग या प्राण्याला अजून राग आला.त्याने आम्हाला नावानिशी ग्रुप वर टॅग करून अजून मेसेजेस लिहिले.यांचे कामगार कधीही 6 ला जात नाहीत.हे कामगारांना आठवडी सुट्ट्या देत नाहीत.हे कामगारांना माणसं समजत नाहीत, यांच्या जगात घड्याळं अस्तित्वात नाहीत' असे मेसेज केले.
कामगार 11 किंवा 12 ला येतात, लंच आणि टी ब्रेक्स घेतात, सुपरवायझर येईपर्यंत किंवा इन्व्हेंटरी येईपर्यंत कामाची नीट कल्पना नसल्याने शांतपणे बसून मोबाईल वर पिक्चर्स बघतात म्हणून 8 ला जातात, विकेंड ला येणाऱ्या आणि विक डे ना येणाऱ्या टीम वेगळ्या आहेत, हे लोक 'ओ' च्या पे रोल वर आहेत आणि 'ओ' ठरवेल त्याप्रमाणे त्या त्या दिवशी ते वेगवेगळ्या साईटस वर असतात,आमची पॉवर आणि आमचा रोल शॉर्ट वर संस्कारी लॉंग स्कर्ट घालून घरी थांबणं आणि यांच्या साठी दारं उघडणं यापलीकडे काहीही नसतो हे या प्राण्याला सांगून काहीच उपयोग नव्हता.त्यामुळे त्याला नुसते 'टायपिंग' 'टायपिंग' दाखवून काही मेसेज न पाठवता उचकवणे इतका सविनय सत्याग्रह आम्ही केला.
विशेषतः 'हे लोक गरीब मुलांसाठी ngo चालवतात' हा शोध फारच नवा आणि विनोदी होता.हा माणूस मला एका कंपनीचा पट्टा गळ्यात अडकवून ऑफिसला जाताना बघतो.कधीकधी फेसबुकवर पाहिलेले आणि आम्ही दरवर्षी थोडे डोनेट करतो (टॅक्स साठी) त्या स्नेहवन फाउंडेशन ची माहिती देणारे एक दोन मेसेज या ग्रुपवर पाठवले याचा अश्या प्रकारे वचपा काढला गेला.
सुतारांनी पूर्ण साईन ऑफ दिला.ते आता साईटवर येणार नाहीत.गोष्टी उरल्या आहेत.पण त्या किचकट आहेत.त्यामुळे वेगळी आऊटसोर्स टीम करेल.
अरेरे. वैताग आहे.
अरेरे. वैताग आहे.
यावर तर नवीन भाग यायला हवा...
यावर तर नवीन भाग यायला हवा...
ये तो सोसायटी सोसायटी की कहानी है...
Pages