इंटिरिअर आणि आम्ही-भाग १

Submitted by mi_anu on 14 November, 2023 - 01:25
Renovation, interior,middleclass

भाग 2 आणि 3 इथे वाचा:
भाग २
भाग ३

रिकामं/वापरात नसलेलं घर किंवा त्या घरातली डागडुजी कामं याचं बॉलिवूड पिक्चर्स आणि के ड्रामा मध्ये अत्यंत सुंदर तलम गुलाबी चित्रण असतं.म्हणजे असं बघा:

१. नायक नायिका एकदम जंगलात एकदम दुर्गम जागी वादळात सापडलेले असतात.मोबाईल ची रेंज, फॉरेस्ट ऑफिस,चहावाला काही काही नसतं.आणि त्यांना एक एकदम टापटीप, पांढरेशुभ्र पडदे वालं,फर्निचर वर पांढरीशुभ्र कव्हरं टाकलेलं, वुडन फ्लोरिंग वालं,अजिबात धूळ, केर आणि बुरशी नसलेलं रिकामं, दाराला कुलूप नसलेलं घर मिळतं. मग ते आपले भिजलेले कपडे बदलून पिळून वाळत घालतात,पटकन लाकडं तोडून आणून फायरप्लेस पेटवतात, आपले मसल्स किंवा कर्व्ह दाखवत हालचाली करत सर्व फर्निचर वरची पांढरीशुभ्र कव्हरं ओढून काढतात आणि मग....इत्यादी इत्यादी.

२. नायक नायिका घर लावत आणि डेकोरेट करत असतात.नायिका हॉट पॅन्ट मध्ये शिडीवर चढून रंगकाम करत असते, मग नायकाला ब्रश ने रंगवते, मग दोघे ब्रश ने रंगपंचमी आणि पळापळी खेळतात आणि मग....इत्यादी इत्यादी.

3. नायक नायिका अतिशय चांगल्या बाहेर जायच्या कपड्यात, किंवा नुकत्याच एरियल नीळ केलेल्या पांढऱ्या फॉर्मल शर्टात फर्निचर जागेवर ठेवत असतात.त्यांनी घामाची चिंता न करता मेकप, आयलायनर, ब्लशर आणि हेअर सेटिंग पण केलेलं असतं.आणि मग ते सर्व फर्निचर ठेवून झाल्यावर हुश्श करून बेडवर अंग टाकून देतात आणि मग....इत्यादी इत्यादी.

नव्या घरात आल्यावर 15 वर्षांनी होऊ घातलेले कुलकरण्यांच्या घराचे नूतनीकरण मात्र बराच गुंतागुंतीचा आणि अरोमँटिक मामला होता.लग्नात, समस्त सणावाराना नातेवाईकांनी हौसेने दिलेली मोठीमोठी भांडी, साबां नी त्यांच्या संसारात खूप पाहुणे आले गेले असताना घेऊन ठेवलेली भरपूर प्रमाणात भांडी(त्यांचं स्वतःचं अतिशय गरीबीत झालेलं लग्न.घरात ३-४च भांडी.जे भांडं चहा कॉफीला वापरणार तेच घासून त्यात नंतर भाजी आमटी होणार.त्यामुळे त्यांना आपल्या होणाऱ्या सुनांना भांड्यांची अजिबात ददात पडू नये वाटलं आणि त्यांनी भरपूर भांडी जमा केली तर नवल नव्हतं.),कपाटातून बदाबदा कोसळणारे कपडे,अनेक प्रसंगांना मिळालेली शाळकरी स्टेशनरी, 'लागतील कधीतरी' म्हणून जपून ठेवलेल्या प्लास्टिक, पॅकिंग च्या वस्तू, ऑफिसातून वेगवेगळ्या प्रसंगी मिळालेल्या (पाण्याच्या) बाटल्या असा सगळा मालामाल प्रकार.कोणतंही कपाट उघडलं की करंगळीवर गोवर्धन तोलून धरणाऱ्या कृष्णाप्रमाणे स्वतःच्या बरगडी किंवा ढु च्या आधाराने खाली कोसळणारा पसारा आवरून धरावा लागे.इतकं करून सणावाराला घालायला धड कपडे नाहीत ते नाहीत.म्हणजे, कपडे चांगले टिकत होते.पण आतली माणसं चंद्राच्या कलांप्रमाणे जाड बारीक होत होती.त्यामुळे जाड फेज बारीक फेज असे दोन्ही वॉर्डरोब प्रेमाने सांभाळावे लागत होते.

इंटिरियर करायला घेतल्यावर पहिला शोध मध्यमवर्गीय विचारांना सूट होणाऱ्या एजन्सी चा.म्हणजे, डिझायनर 'इथे काचेचे मस्त पारदर्शक पार्टिशन लावू आणि स्वयंपाकघराच्या मधोमध आयलंड ओटा करू' म्हटलं की आम्ही 'ओटा धुणार कसा?किचन मध्ये बसून खोबरं खवावं लागलं तर?ओट्यावरून दुसऱ्या बाजूला पडून काचेच्या वस्तू फुटल्या तर?' असे तद्दन त्यांना हताश करणारे प्रश्न विचारणार.त्यांनी 'कपाट पुढून चकचकीत ठेवून आरसा दाराच्या आतच लावू' म्हटल्यावर 'पण घाईत दारं जोरात आपटली तर?आरसा फुटेल.' असे वर्स्ट केस सिनारिओ सांगून त्यांना जेरीस आणणार. इंटिरियरवाल्या माणसांना आमचं काम पूर्ण झाल्यावर मानसोपचार घ्यायला लागू नयेत यासाठी अनेक चाळण्या लावून योग्य एजन्सी निवडणे गरजेचे होते.

शोधानंतर एक एजन्सी मिळाली. आपण त्यांना 'ओ' मानुया.मग 'ओ' ची आणि आमची जास्त वेळा नाही कोण म्हणणार याची शर्यत चालू झाली.बऱ्याच टेबलांच्या,बुकशेल्फ च्या,दारांच्या व्हर्च्युअल महिरपी, कमानी आम्ही 'बिन उपयोगाचे उगीच लाकूड' म्हणून जन्मण्यापूर्वी छाटून टाकल्या.कुलकर्णी 'स्टोरेज' मॅनिक लोक आहेत.कोणताही लाकडी पृष्ठभाग दिसला की त्याचा आत काहीतरी ठेवायला उपयोग झालाच पाहिजे.मग अगदी बाथरूम शेल्फ म्हणू नका, डायनिंग टेबल ची खुर्ची म्हणू नका,लॅपटॉप टेबल म्हणू नका, प्रत्येकाच्या आत स्टोरेज.आणि त्याच्या आत....पसारा.

आम्ही पुढे केलेल्या प्रत्येक रंगाला 'ओ' नाही म्हणायला लागले.मूळ बेसिक मध्ये दोघांच्या फरक होता.एक माया साराभाई एक मोनिषा साराभाई.आमचे रंग 'आल्हाददायक, घरात प्रकाश येईल असे, जरा नवा रंग दिलाय असं वाटणारे,उठून दिसणारे,ज्यावर उभं राहिल्यावर फोटो चांगले येतील असे' वगैरे वगैरे आणि त्यांचे रंग 'सटल,डिसेंट, आतून 5 लाईट लावल्यावर खोली क्लासी दिसेल असे' होते.त्यांना 'क्लासी, मॅट, नॉन ग्लॉसी, महाग टाईल्स' हव्या होत्या, आम्हाला 'पटकन पाण्याचा पंप मारून धुता येईल, खसाखसा एक फडका मारला की चमकेल असे' गुळगुळीत ग्लॉसी लॅमीनेट हवे होते.त्यांना 'सुंदर कोरीवकाम वाले आर्टिफेक्ट, हेअर ड्रायर ने नियमित एक एक पोकळी साफ ठेवली की सुंदर दिसणारे' हवे होते.(मेला आयुष्यात आलिया भट्ट वाला केराटीन हेअर ड्रायर घरात पडून असून एकसंध पूर्ण केसांना कधी लागला नाहीये, भोकाभोकाच्या कोरीवकाम लाकडी शोपीस ला लागणारे ...डोंबल.) मग काही रंग त्यांचे काही आमचे,'कोणताही हेअर ड्रायरने साफ करावा लागणार नाही, आयुष्यात कमीत कमी वेळा पुसावा लागेल असा शोपीस' यावर मांडवली झाली.

'तुम्ही दुसरीकडे राहायला जा 2 महिने' ला आम्ही कामाची बोलणी किंवा मूळ काम ठरायच्या आधी नकार दिला.'आम्ही राहून चालणार असेल तरच' या बोलीवर काम या एजन्सीला मिळणार होतं.यात मुद्दे 3: ज्या एरियात राहतो तिथे भाड्याची घरं महाग पडणे, आणि 8 पर्यंत कॉल्स झाल्यावर साईट वर वेगळ्या ठिकाणाहून येऊन पाहणी करायचा उत्साह राहिलेला नसणे, आणि शाळेच्या बस चा रूट बदलायची तयारी नसणे.शिवाय '2 महिने' 2 महिने नसणार याची पूर्ण खात्री होती.

'तुम्हाला आवाजाचा त्रास होईल' हा 'ओ' चा मुद्दा आमच्या साठी एकदम नगण्य होता.गेली अनेक वर्षं आमच्या सोसायटीत आम्ही 4-5 कुटुंबं आपापल्या मुलांवर साधारण 2 चौक पलीकडे ऐकू येईल इतक्या बुलंद आवाजात ओरडतो. सकाळी 5.30 ला 'सच्या, उठ मूर्खां,बस यायला पंधरा मिनिटं राहिलीत,आजपण घाणेरडा डुक्कर बनून जाणार का?', त्यानंतर 6.40 ला 'मिनी जलदी करो, बस्स गेट पर आ गया, कबसे हॉर्न बजा रहा है!!', '7.35 ला 'हरी अप लुबना,विल यु, डॅम ईट, बस अलरेडी क्रॉसड काऊ शेड!'(हे इंटरनॅशनल बोर्ड मधले असल्याने यांना मुलांशी घरी इंग्लिश बोला अश्या सूचना आहेत.) अश्या वेगवेगळ्या आवाजात सोसायटी दणाणून जाते.त्यामुळे आम्हाला आवाजाचा त्रास होण्यापेक्षा आमच्याकडून इतरांना आवाजाचा त्रास होण्याचा धोका जास्त होता.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त खुसखुशीत.
सुरूवात एकदम चटपटीत. आणि विरोधाभास म्हणून वास्तव हे भन्नाट जमलय.

Lol मस्त!
आम्ही उलट 'स्टोअरेज नको' वाले आहोत (कारण पसारा साठत जातो). पण त्यामुळे आता असं झालंय की काही वस्तू ठेवायला जागाच नसते.

मागील २.५ महिने या प्रकारातून जात आहे, दिवाळी पूर्वी काम संपणे अपेक्षित होते पण आता दिवाळी ची ४ दिवस सुट्टी दिली आहे आणि अजून १५ दिवस लागणार आहेत काम संपायला. राहत्या घरात काम सुरु करायचे असेल तर अधिकचे २ आठवडे धरलेले चांगले.

कोणताही लाकडी पृष्ठभाग दिसला की त्याचा आत काहीतरी ठेवायला उपयोग झालाच पाहिजे.>>> अगदी अगदी Lol मस्त खुसखुशित झालाय हा भाग. आमच्या घराचे ही रेनोवेशन डोळ्यांपुढे तरळून गेले Wink

मस्तच लिहिलं आहेस अनु. मस्तच घरोघरी त्याच परी ...

ह्या इंटिरियर वाल्यांच ध्येय घर आपल्या हातात देण्याच्या क्षणाला बेस्ट दिसल पाहिजे एवढंच असत मग त्याचा मेंटेन्स किती अशक्य असला त्याचा तरी त्यांना काही ही फरक पडत नाही. उलट दोन वर्षात खराब झालं तर पुन्हा ह्यांचीच चांदी. म्हणून ऑफ व्हाईट सोफे, पांढरे पंखे वैगरे सजेस्ट केले जातात.

मस्त लिहिले आहे . घरातील भांडी आणि पसाऱ्याचे वर्णन वाचून आपलेच घर आहे की काय वाटले. चार महिन्यापूर्वी शिफ्टींग ची आवराअवरी आठवली. बरेचसे टाकायला काढून ठेवलेले सामान ' लागले तर ' म्हणून नवीन घरी घेऊन आलो आहोत .

भारी लिहिलंय. आम्हीही ममव असल्याने युटिलिटी हाच प्रथम मुद्दा डोक्यात. आर्टिस्टिक काय डोक्यात घुसत नाही.
बाकी आमचं नशीब ह्याबाबतीत अजून भारीय.
आम्ही मारे काटछाट करून आखूड शिंगी बहुदुधी वै सर्व काही मान्य करून घेतो आणि .............
Surprise, जो बनवणारा असतो त्याने ह्या फॅमिलीला extra खुश करावे म्हणून कुठे सोफ्याची उंचीच वाढवून आधीच बारीक असलेला हॉल अजून बारीक भासेल ( volume wise ) ह्याची तजवीज केलेली असते.......
आम्ही फार घाबरून आहोत.....
बांधकाम सूरु असताना किचन मधील tiles आवडल्या नव्हत्या म्हणून आमच्या आवडीच्या आणून दिलेल्या, वारंवार सूचना आणि मोठ्या अक्षरात लिहिलेल्या सुचनेकडे दुर्लक्ष करून बिल्डरने त्याच्याच आवडीच्या टाईल्स लावलेल्या. त्यावर चिडचिड वैताग सर्व करून शेवटी आम्ही आणून दिलेल्या टाईल्सचा मागमूस सगळ्या under construction फ्लॅट्स , मग सामान ठेवायच्या सगळ्या जागा, site वर असलेल्या वॉचमन पासून सुपर व्हायजर पर्यन्त सगळ्यांना भेटून विचारून कुठेतरी कोपऱ्यात tiles सापडणे, मग tiles कॉन्ट्रॅक्टर ला आधी लावलेल्या tiles फोडून आमच्या टाईल्स लावण्यासाठी परत खिसा हलका करणे हे आणि असे अनेक अनुभव घेउन शांत बसलोय.
आमच्यासाठी बनवलेला सेफटी door कंत्राटदाराने वरच्या मजल्यावरच्या फ्लॅट ला जाउन लावलाय. Lol
रंगकाम केले की भिंतींना पोपडे येण्याचा एक विलक्षण राजयोग देखील आमच्या नशिबात आहे. Proud

त्यामुळे अंगावर काटाच आला वाचताना
Lol

छान लेख....
कितीतरी अनावश्यक वस्तू आज लागतील उध्या लागतील
म्हणून वर्षानुवर्षे आपल्या घरात सुखनैव पहुडलेल्या असतात.
स्टोरेजची हाव माया आहे. जेवढं गुंतू तेवढं खोल खोल जाऊ..
मुलगी आर्किटेक्ट आहे व सध्या हेच काम करते. त्यामुळे अशी कामं करणारांच्या ग्राहकांचे मत समजायला मदत होईल.

ही गाथा संयम आणि चिकाटी ठेवून पूर्ण वाचल्याबद्दल धन्यवाद मंडळी!!
सर्वांचे किस्से भारी आहेत.प्रत्येकात एक वेगळा लेख बनण्याची क्षमता आहे.
ममो, हो अगदी अगदी.जमेल तिथे अतिशय दुर्बोध, पटकन स्वच्छ होणार नाहीत अश्या गोष्टी बनवत असतात.स्वतःच्या घरात काय करतात पाहिलं पाहिजे Happy सौंदर्य म्हटलं की कम्फर्ट बॅकसीट वर गेलाच पाहिजे.
नरेन, हो तुमचं खरं आहे.तितका वेळ आरामात लागेल.
झकासराव, अतिशय वैतागवाडी अनुभव असेल.आमच्या बिल्डर ने आधीच फक्त 2 टाईल्स ऑप्शन देऊन 'वात्रट सारखे मार्बल वगैरे आणून देऊ नका.आम्ही बसवणार नाही.आम्हाला वेळ लागतो.' म्हणून त्यातलेच निवडायला लावले होते.आम्ही सर्व घराला मार्बल फ्लोअर अफोर्ड करू शकतो असं त्याला वाटलं याबद्दल आम्ही छाती फुलवून घेतली Happy घरात अगदी स्पष्ट डोळ्याला दिसतील अश्या तिरक्या भिंती आहेत काही जागी.
दत्तात्रय, धन्यवाद. ही कलात्मक कामं करणाऱ्या लोकांबद्दल अर्थात आदर आहे.बाकी मतविरोध, रिसोर्स चे प्रश्न हे प्रत्येक धंद्यात चालू राहतातच.

Before ani after चे फोटो तेवढे post करा.
आम्ही फर्निचर केलेलं तेव्हाचे अनुभव आठवले. आम्ही काही suggest केलं की तो designer दादा म्हणायचा ' मजा नाही त्यात '
Signature वाक्य होतं ते.
ह्या वाक्याचं नंतर meme बनलेलं घरात.
कुणाला नाही म्हणायचं असेल तर हेच बोलायचो आम्ही

धन्यवाद किल्ली, आफटर ची दिल्ली बरीच दूर आहे गं अजून Happy पेंटिंग झालं नाही.20% काम बाकी आहे.झाल्यावर नक्की शेअर करेन.

I can understand
२ महिने म्हणून ते काम किमान वर्षभर चालतं. Proud
Finishing नीट होतंय ना ते पाहून घ्या.
शेवटी शेवटी कंटाळा करतात ते लोक

Lol धमाल लिहिले आहे. अगदी रिलेटेबल आहे.
प्रतिसादातली डोकेदुखी पण पोचली, काही पर्याय नसल्याने हसून सोडून द्यावे लागते.
कोणताही लाकडी पृष्ठभाग दिसला की त्याचा आत काहीतरी ठेवायला उपयोग झालाच पाहिजे.> Lol मी तर ड्रॉवरची भुकेली आहे.

कुणाकडे गेले तरी त्यांचं किचन ड्रॉवर आपल्यापेक्षा खोल कसं, आपल्यापेक्षा शेल्फ जास्त कसे, लाकडाचे, विटांचे , कॉन्क्रिटचे भाव आपल्याच वेळेला कसे वाढतात, आपल्या सुताराला/टाईलवाल्याला/फ्लोअरिंगवाल्याला एवढा अहंकार कसा? आपण सगळं एवढा अभ्यास करून निवडतो पण ते एकत्र आलं की 'असं' का दिसतं, कल्पनेत तर हॉटेलची लॉबी आलेली असते. आपल्यालाच सगळे का फसवतात..!
टाईलवाल्याचं कायप्पा स्टेटसही 'माय लाईफ - माय वाईफ' होतं, त्यावरूनही नवऱ्याला 'बघ ,बघ नाही तर तू ' म्हणून नावं ठेवून झाली. Lol

भारी लिहिलंय.
सोफा घेताना अटी
1. त्या सोफ्याखालून केरसुणी नीट फिरलीच पाहिजे.
2. सोफ्याच्या हातावर कप/ फुलपात्र नीट ठेवता आलं पाहिजे. मग भले वापरकर्त्याच्या वेंधळेपणापायी कप/ फुलपात्र कलंडून आतलं पेय सांडलं/ कप फुटला तरी बेहत्तर!!
3. सोफ्याची कुुशनकवर्स काढून वॉशिंग मशीन मधे धुता आली पाहिजेत.

एकबोटे, उंड्री रोडची आणि बाजीराव रोडवरची फर्निचरची दुकानं, घराजवळचे 2 मोठे मॉल्स, ऑनलाईन दुकानं अशी मुशाफिरी करून हौस फिटली की शंकर महाराज मठाजवळ रांगेने असलेल्या दुकानदारांकडून पुन्हा 235 प्रश्न विचारून एक सोफा फायनल करायचा. माझं नशीब खूप बलवत्तर म्हणून यापलिकडे मेजर काम करून घ्यायची वेळ माझ्यावर आली नाही.

अस्मिता, प्रज्ञा, अगदी अगदी.खालून झाडू फिरलाच पाहिजे ला एकदम अनुमोदन. पुढेमागे जमिनीला पाय स्पर्श न करता अर्धा फूट मॅग्नेटिक शक्तीने अधांतरी तरंगणारा सोफा आला तर खालून झाडू मारायला काय मजा येईल ना.

Lol फक्त सोफ्याचीच उत्क्रांती होईल का, तेव्हा झाडूही प्रगत होऊन कचरा खेचून घेईल ना... रूम्बा टाईप. योगा करत जा नियमित, त्याने सोफ्याखालचं ब्रह्मांड दिसतं. माणूस योगासनं सोडून झाडू आणायला जातो, कशाचं रिलॅक्स अन् कशाचं काय.

त्याऐवजी आणि उत्क्रांती होऊन जमिनीला धुळीचा स्पर्श झाल्यावर रासायनिक अभिक्रिया होऊन धुळीचा ऑक्सिजन बनून वातावरणात मिसळला तर अजूनच मजा Happy

अनु मला एकच गाणं सुचतंय कबके बिझडे हुए हम आज कहा आके मिले. आम्ही हल्लीच आमच्या रिडेव्हलप्ड घरात शिफ्ट झालोय. बिल्डरने में मध्ये फ्लॅट च्या चाव्या दिल्या . आम्ही पण आधी इंटिरियर वाला पकडला होता.पण खर्च इ त का वाढला की मग एका चांगल्या सुताराला मेन काम दिलं आणि
....
....
....
....

आता आम्ही त्याच्याबरोबर राहतोय अजून काम चालूच आहे.

धनुडी, हा 'चांगला सुतार' मार्ग मी बराच पटवायचा प्रयत्न केला.पण आजूबाजूला असा कोणी प्राणी मिळाला नाही Happy

चांगला सुतार हे मिथ आहे.
जर तो कामात चांगला असेल तर attitude ने/ वेळ पाळण्यात चांगला नसतो.
सोफा खरेदी पहिल्या वेळी केली तेव्हा असंख्य दुकानं फिरलो होतो. तेव्हा वेळही होता. कित्येक दुकानांमधल्या कित्येक सोफ्यांवर बसलो. शेवटी एक मिळाला. तो खरोखरच मस्त आणि मजबूत होता. पण त्याचं कृत्रिम लेदर चांगल्या प्रतीचं नसावं. त्याचा रंग उडाला.

म्हणून मग नवीन घेताना 'ज्याची कव्हर्स काढून धुता येतील' असा घेतला. ती कव्हर्स पहिल्या धुण्यात आटली Lol मग ती ओढाताण करून बसवणं ही नवीन डोकेदुखी निर्माण झाली. त्यामुळे कव्हर्स धुवायला टाकली की परत घालण्याचं काम (पुढच्या) वीकेंडपर्यंत लांबू लागलं. शेवटी एक चांगला दुकानदार भेटला, ज्याने चांगली कव्हर्स शिवून दिली.

मग परत सोफा घेताना त्याच दुकानदाराकडून बनवून घेतला. तो मात्र (अजून तरी) चांगला आहे.
आता परत सोफा घ्यायला दुकानात जायची वेळ येऊ नये अशी इच्छा आहे.

चांगले सोफे कापड हेही मिथ आहे Happy
स्वेड लेदर घेतल्यास आपला स्वेट आणि नैसर्गिक त्वचेचे तेल लागून तो कडांना मेणचट होतो.साधे कापड घेतल्यास हवा तो लूक येत नाही.लेदर घेतल्यास ते ढु ला चिकटते उन्हाळ्यात घाम येऊन.खोटे रेक्झिन घेतल्यास कोपरे कुरतडले जातात.

अगदी अगदी. आत्ताच सोफ्याचे कापड सिलेक्ट केले आहे. त्या गाद्याही बदलायच्या आहेत..त्याने ३५००० किंमत सांगितली आहे..फक्त गाद्यांची. कापड वेगळे. हॉटेल मधल्या लॉबी बद्दल अगदी पटले Happy
घरी का नाही तसे दिसत कोण जाणे!
आणि सर्वच कापडं एका धुण्यात भुरकट होतात.....

अनु Lol पण आमच्या आत्ताच्या सोफ्याचं कापड चांगलं आहे.

लाकडी बसक्या खुर्च्या आणि त्यावर बसायला आणि टेकायला उशा हे त्या मानाने कमी कटकटीचं प्रकरण असेल. पण मग त्याच्यावर ऐसपैस बसता येत नाही.

Pages