इंटिरिअर आणि आम्ही-भाग ३(फायनली समाप्त बरं का पकवणे!!)

Submitted by mi_anu on 14 November, 2023 - 09:06

भाग 1 आणि 2 इथे वाचा:
भाग १
भाग २

अतिशय भिन्न विचार असलेली दोन किंवा माणसं वर्षानुवर्षे घरात नांदत असली की कोणतंही काम अगदी सुधेपणाने होत नाही.(आता मी यापुढे 'आणि यातच तर खरी आयुष्य जगण्याची लज्जत असते.आयुष्य रुपी जेवणाला चव आणणारं हे माईनमूळ लोणचं.संसाराच्या खमंग पोळीला लावलेलं चमचमीत वऱ्हाडी तिखट.असंच हाय हुय करत हे तिखट खात नंतर जिभेवर आलेली गोड आफ्टरटेस्ट न्यारीच.असंच हे तिखट लोणचं,प्रेमाचे गुलाबजाम,समजूतदारपणा चा वरणभात,गॉसिपिंग ची चटणी खात जे जेवण खाऊन एक दिवस यथावकाश मृत्यूरुपी तृप्त ढेकर द्यावा.' असं लिहून तुमच्या साठी वात्रट व्हॉट्सअप फॉरवर्ड अजिबात तयार करणार नाहीये. घाबरू नका.) इंटिरिअर वाल्याना विरोध करण्या वरून झालेले हे काही संवाद वानगीदाखल:

'अरे तू त्यांच्या सगळ्या सूचनांना हो म्हणून मान काय हलवतोस?त्यांचं काय जातंय सगळीकडे काचा लावायला?उद्या काचेच्या भिंती वाला संडास सुचवतील.'
'मग तू कर ना विरोध.तुला मी कधी अडवतो का?'
'मी करते आहेच.पण तू जर नेहमी साने गुरुजी बनून राहिलास तर मला नेहमी विरोध भूमिकेत जावं लागेल आणि ते पाठीमागे 'साहेब बिचारा भला माणूस पण त्याची बायको हडळ आहे' म्हणतील.'
'जसं काय आपण विरोध करत नाही तोपर्यंत आपल्या मागे ते आरत्याच ओवाळतात की नाही.विरोध तुझा आहे.व्यक्त तूच करायचा.'
'म्हणजे मी केला नाही तर तुला घरातल्या सगळ्या कपाटाना काचेची शटर आणि त्यातून दिसणारा पसारा चालेल का?'
'किती निराशावादी सिनिक आहेस गं तू!! पसारा होणाऱच असं सुरुवातीपासून धरून चाललं तर कठीण आहे.माझ्या कपाटात तरी अजिबात असं होणार नाही.'
'हे बघ,आतापासूनच शब्द देऊ नकोस.तुझे शब्द काय आहेत मला माहिती आहे.तू 3 वेळा सिडलिंग ट्रे आणून त्यात मायक्रोग्रीन वाढवून सॅलड खाणार होतास.3 वेळा ते गॅलरीत पडून सडलेले,तुटलेले ट्रे मी फेकलेत.'
'हे बघ,प्रत्येक भांडणात सिडलिंग ट्रे आणायची गरज नाही.दम है तो इंटिरिअर वाल्याना विरोध कर वरना ग्लास शटर बरदास्त कर.'
'सिडलिंग ट्रे' हे आमच्या सर्व भांडणांमधलं ब्रह्मास्त्र आहे.जसा ड्रॅकुला ला परतवायला क्रॉस तसा भांडणातल्या नवऱ्याला गारद करायला सिडलिंग ट्रे.

'ओ' ला अतिशय आवडणाऱ्या 2 गोष्टी: प्रोफाईल शटर्स उर्फ काचेची कपाट दारं आणि 'हायड्रॉलीक शटर्स' उर्फ वर उघडणारी दारं.दोन्हीला मी कडाडून विरोध केला.एकतर 15 वर्षांपूर्वी केलेल्या इंटिरिअर मध्ये आम्ही लांब राहत असल्याने पाहणी करायला सारखं येणं न जमल्याने आणि मुख्य सुतार 6 फूट 2 इंच असल्याने त्याने आपल्या उंचीनुसार लावलेली स्वयंपाकघरातली कपाटं.कोणतंही कपाट आतली वस्तू बरगडीत उसण भरल्याशिवाय किंवा कुठून तरी धडपडत शिडी घेऊन आल्याशिवाय दाद न देणारं.हायड्रॉलीक शटर्स वर उघडणारी सर्वात छतालगतच्या शेल्फ ला लावणं हा दिसायला एकदम सुंदर गुळगुळीत एकसंध, हँडल न दिसणारा प्रकार असला तरी बुटबैंगण माणसाला ऍक्सेस ला अतिशय मूर्खपणाचा आणि वेदनादायी होता.त्यामुळे शेवटी शेवटी माझा 'जब वी मेट' मधला अंशुमन, 'क्यो देखू मैं गनने के खेत, नही देखणे मुझे गनने के खेत!!!' झाला.आता यातल्या बऱ्याच शेल्फ ना हाताला येईल असा एक दांडा असतो, तो धरून झाकणं खाली ओढता येतात.

'कटकटी चिडकी बाई शक्यतो सगळ्याला नाही म्हणणार' हे 'ओ' ला माहीत असल्याने ओ चे साईट सुपरवायझर आधी सरांना फोन करून पटवून घेऊ लागले.मग आम्ही सर्व निर्णयात व्हिडिओ कॉल करून चर्चा करून एकमेकांना आणि 'ओ' ला सेम पेजवर आणलं.सुदैवाने हे प्रकार 10-20 मिनिटात आवरत असल्याने ऑफिस कामाला याचा फटका बसला नाही.

'ओ' ची काम करण्याची प्रोसेस शिस्तबद्ध होती.ठराविक टप्प्यात 2डी डिझाईन शेअर करणे, ठराविक रक्कम मिळाल्यावर बिल ऑफ मटेरियल शेअर करणे, ठराविक रक्कम मिळाल्यावर 3डी चे फोटो शेअर करणे(प्रत्यक्ष डिझाईन पाठवले जात नाही.),ठराविक रक्कम दिल्यावर मापं आणि फॅक्टरी फर्निचर ची कट लिस्ट बनवायला येणे, ठराविक रक्कम दिल्यावर सर्व मटेरियल साईट वर टाकणे असे.यात सर्वात जास्त नियमित गोष्ट अकौंन्ट कडून हफ्ता मागणी होती.मग असा कामाचा काही काळ सुरळीत गेल्यावर 'ओ' चा आणि आमचा नाच गं घुमा चा खेळ चालू झाला.

आम्ही: 'नाच गं घुमा!!'
'ओ': 'या गावचा, त्या गावचा, इलेक्टरीशीयन गावी गेला, पैसे नाही मला, सामान नाही मला, कामगार नाही मला,कशी मी नाचू!!'
आम्ही: 'नाच गं घुमा!पैसे घे तुला,कामगार दे मला, सामान घे मला, नाच गं घुमा!!'

'ओ' ची गंमत ही की हफ्ता मागणी करून हफ्ता घेण्याच्या 2 दिवस आधी ते साईटवर पूर्ण 4 सुतार,1 इलेक्टरीशीयन ची टीम लावत.मग खुश होऊन आम्ही हफ्ता दिला की दुसऱ्या दिवशी पासून फक्त एक पाप्याचं पितर प्लास्टर वाला, इन्व्हेंटरी नाही, साईट सुपरवायझर दुसऱ्या साईट वर असे प्रकार चालू होत.'ओ' ने आमचं काम घेतलं तेव्हा त्यांच्याकडे बिझनेस कमी होता.आमचं काम घेतल्यावर सृष्टीत पॉझिटिव्ह गुडलक लहरी निर्माण होऊन त्यांच्याकडे 5 मोठी प्रोजेक्ट आली आणि त्यांच्यावर छाप पाडणे महत्वाचे ठरू लागले.

त्यात 'ओ' च्या एकंदर रिसॉर्स मॅनेजमेंट मुळे एक इलेक्टरीशीयन येऊन आधीची पाहणी करणार, दुसरा येऊन भिंतींना खड्डे पाडून वायरीची खाच बनवणार,तिसराच येऊन स्विचबोर्ड लावणार असा सगळा खो खो होता.या खो खो मध्ये मूळ कॉन्स्टंट आम्हीच असल्याने आम्हाला डोकं ठिकाणावर आणि थंड ठेवून सर्वाना एका पानावर ठेवणं गरजेचं होतं.सुतार टीम बदलत राहिल्याने त्यांनी टीव्ही चं पॅनल 3 वेळा काढून परत बसवलं. आमच्या दोघांपैकी जे कोणी ऑफीस ला जाईल त्याचा व्हॉटसअप वर पहिला प्रश्न 'आज टीव्ही पॅनल परत तोडलं का लॅमीनेट बसवलं' हा असायचा.प्रत्येक ऑफिस ला जाणाऱ्या निरागस जीवाला 'आपण घरी येऊ तेव्हा काहीतरी एक आयटम जोडला गेला असेल,छान वस्तू लावता येतील' असं वाटायचं.घरी येऊन बघावं तर एखाद्या बिझी सलून मध्ये 5 माणसांच्या अर्ध्या अर्ध्या दाढ्या करून फोन घ्यायला बाहेर जाणाऱ्या माणसा सारखं एक कपाटाचे फक्त 2 कप्पे, दुसऱ्याचं दार,तिसऱ्याचं मॅग्नेट राहिलेलं असं सगळंच फर्निचर अर्धंमुर्ध दिनवाणं उभं असायचं.(सुतार काही चूक करत नव्हते. जितकी फायनल प्रोडक्ट लॅमिनेट लावलेली जास्त, तितकें ओरखडे, गोंद न सांडणे,वेल्डिंग कटिंग च्या ठीणग्या जाऊ न देणे याबद्दल जास्त जपावं लागतं.)आता आता जरा सगळ्या पृष्ठभागावर लॅमिनेट लागायला लागले.

ओ च्या चांगल्या गोष्टी या की मटेरियल आणि कामाची प्रत चांगली आहे.शिवाय त्यांनी आमच्या डोक्यातल्या अनेक अबस्ट्रॅक्ट कल्पना नीट पूर्ण केल्या.यातली महत्वाची माझ्यासाठी म्हणजे परदेशात असते तशी शूज, कोट्स आणि हेल्मेट काढून ठेवण्याची लिव्हिंग रूम च्या एका कोपऱ्यात करण्याची चिमुकली(आत नुसती उघडी शेल्फ असलेली) लाकडी खोली.(याला आम्ही 'पसारा करण्याची खोली' म्हणतो.आम्ही आता लिव्हिंग रूम च्या सर्व पृष्ठभागावर टाकतो त्या गोष्टी एकाच खोलीत टाकायच्या.)दुसरी गोष्ट म्हणजे पार्सल्स आत टाकता येतील अशी चौकोनी झडप खिडकी असलेलं दार.हे रेडिमेड दारांमध्ये पण मिळतं.

अश्या प्रकारे गणपती नंतर नवरात्रात 'पूर्ण होणार' अशी वदंता असलेलं काम दिवाळीत पूर्ण होणार होतं.पण 'तुमच्याकडे साईटवर बनवायच्या गोष्टी खूप जास्त आहेत' म्हणून ते अजून बाकी आहे.बहुतेक दिवाळी नंतर 15 दिवसात होईल.आम्हीही मख्खपणे सामानाच्या ढिगात स्वयंपाकघर आणि एक खोली मोकळी स्वच्छ आणि टापटीप ठेवून तिथे मजेत राहतो आहोत.जेव्हा होईल तेव्हा होईल.

सध्या सोसायटी वाले सोसायटीत चकरा मारता मारता भेटले की 'क्या बात है,अभीभी पुरा नही हुवा, महल बना रहे हो क्या' विचारतात.आम्ही पण शांतपणे 'ह्या ह्या ह्या, होने के बाद आ जाओ देखणे' म्हणून महाल बनवत असल्याच्या ऐटीत म्हणून पुढे निघून जातो!! कितीही छोटे बदल असले तरी आमच्यासारख्या कष्टाच्या व्हाईट मनी ने आयुष्यात कधीतरी मोठं काम काढणाऱ्या लोकांसाठी आमचा महालच तो.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कहर... Lol
काय अफाट लिहिलंय.
पण प्रत्यक्षात ह्या परिस्थिती ला तोंड दिलं ह्याचं कौतुक आणि अभिनंदन नविन फर्निचर बद्दल.
बाकी तुमच्या requirements(पहिल्या भागात लिहिल्या आहेत त्या)ना मम!

छान.
मला आमच्या टीमचे लोक स्प्रिंटच्या शेवटच्या दिनाच्या आदल्या दिवशी कोड चालत असेल नसेल तो रिव्यूला टाकून जिरा प्रोग्रेस मधून इन-स्प्रिंट टेस्टिंगला टाकतात. झाला रोल ओव्हर तरी इतकं स्टोरी पॉईंटचं काम राहिलेलं नाही दादा.. . हे तोंड वेंगाडुन सांगता येतं.
मर्ज मध्ये राडे झालेत त्यामुळे ब्रांचवर फ्रीज येण्याची कुणकुण जरी लागली की तर चेव आल्यागत सगळे जिरे पीअर रिव्यू - इन स्प्रिंट टेस्टिंग मध्ये जातात. मग काय, दुसर्‍या दिवशी रोल ओव्हर होतातच. पण आता रोल ओव्हर झाले.... कारण ब्रांच फ्रीज हो! दुसरं काही नाही.
हे सगळं तुमचं चार दाढ्या अर्ध्या करुन कारागिर फोनवर वाचुन आठवलं. निव्वल योगायोग समजावा हेवेसांनल. Happy

नाच गं घुमा Lol
आमच्याकडे माझ्या डोक्यातली एक कल्पना चांगल्याप्रकारे प्रत्यक्षात आली ती म्हणजे खिडकीला लागून बसण्यासाठी एक लांब सीट आणि दोन्ही बाजूला पुस्तकांसाठी कपाटं. आरामात बसून, पाय लांब करून पुस्तक वाचण्याची जागा. सीटच्या खाली स्टोअरेज.

हा भाग सगळ्यात रीलेट झाला Happy
जसा ड्रॅकुला ला परतवायला क्रॉस तसा भांडणातल्या नवऱ्याला गारद करायला सिडलिंग ट्रे. >>> Lol माझी अशीच काही अस्त्रं आठवली Happy

सर्वांना धन्यवाद मंडळी.
मैत्रेयी, हो प्रत्येक बायको कडे अशी राखीव अस्त्रपेटी असतेच Happy
विशाखा, हो बे विंडो खूप मस्त असते.मला खिडकीत बसून बर्फ बघणारी रॉस शी भांडण झालेली रेचेल आठवते.
अमित, हो जिऱ्यात 'इन प्रोग्रेस' अचानक वेगळ्या स्टेट ला जाणे आणि स्प्रिंट संपल्यावर परत इन प्रोग्रेस येणे हे नेहमीचे हातचलाखी खेळ असतात.तसेच आदल्या दिवशी पर्यन्त सर्व साफ ठेवून स्प्रिंट च्या 2 दिवस आधी टेस्टिंग टीम ने धडाधड 'शो स्टॉपर' इश्यूज काढून डेव्हलपर्स ना खड्ड्यात ढकलणे हेही.

मस्त .
घरात राहून हे काम।काढणे म्हणजे फारच धाडस
आणि ह्या सर्व गोंधळात विनोदबुद्धी तल्लख असणे हा गुण खासच.
शेवटचं वाक्य पटलेच

माबो वर लाईक बटण ची नितांत गरज आहे Happy
काय लिहिले आहे , जबरदस्त !
प्रत्येकाच्या आयुष्यात हे अनुभव आले असतील किंवा येतील पण त्याकडे इतक्या विनोदी नजरेने पाहणे तुम्हालाच शक्य झालंय ! Happy

मी दोन वर्षांपूर्वी पेंटिंग आणि फर्निचर चे काम काढलेले तर त्यावेळी काम संपता संपता घरातील सर्वांचे चेहरे आनंद साजरा करण्या पलीकडचे झाले होते .
बर शेजारी पाजारी आले की ते फर्निचर मधील बारीक सारीक चूका दाखवायचे हा वाढीव मनस्ताप !

तिन्ही भाग मस्त झालेत . एवढ्या गडबडीत डोके शांत ठेवणे आणि विनोदबुद्धी शाबूत ठेवणे तूच करू जाणे!!! शेवटचे वाक्य खास अनु टच!!!!
यावेळी गणेशोत्सवात पाककृती विभागात तुझी entry नव्हती , अनुपस्थिती जाणवली . त्यामागचे कारण कदाचित हेच असेल.

नाच गं घुमा नि तुमच्या requirements हे अफाट प्रकार आहेत. (आम्ही घर घेताना हाय सिलिंग असलेले घर बायकोने जळामटे साफ करताना आपला जीव जाईल असे सांगून एकाच फटक्यात निकालात काढले होते ते आठवले ) धमालच आली वाचायला. कुठल्या पंधरा दिवसांनंतर महाल पूर्ण सजला कि फोटो टाकून घ्या (त्याचा फायदा नंतर आठवडाभराने भरलेल्या पसरलेल्या घराचे मूळ स्वरुप - ओ च्या डोक्यातले - इतरांना दाखवायला उपयोगी येईल) कस्टमरवरच्या अन्यायाला वाचा फोडल्याबद्दल धन्यवाद !! Happy

अफाट लिहिलंय! दंडवत, अनु! _/\_ Happy
एकेक पंचेस भारी आहेत अगदी. संन्यासी, नाच ग घुमा आणि गन्ने के खेत जबरीच! ते उंचावर असणारी कपाटं, हाताला न येणारी दारं इ. इ. खूप रिलेट झालं.

खिडकीला लागून बसण्यासाठी एक लांब सीट आणि दोन्ही बाजूला पुस्तकांसाठी कपाटं. आरामात बसून, पाय लांब करून पुस्तक वाचण्याची जागा. सीटच्या खाली स्टोअरेज >>> हे मला करायचंय कधीतरी.

तिन्ही भाग मस्त झालेत. जबरदस्त वर्ण्न
हा सगळा प्रकार ५ वर्षापुर्वी अनुभवला आहे. काम चालु होण्याच्या आधी मी बायकोला ही जबाबदारी देउन ६ महिने on-site गेलो आणि काम पुर्ण होण्याच्या मार्गावर असताना आलो . पण त्या दरम्यान होणारे व्हिडियोकॉल , घराचे फोटो यावरुन सगळेच रिलेट झाले.

सर्व भाग मस्त खुसखुशीत Lol almost सर्व वाक्यांना अगदी अगदी झाले.
काही वर्षांपूर्वी रहात्या घरातल्या खोल्यात फर्निचर केल्याने या सर्वाचा पुरेपूर अनुभव गाठीला आहे. आता हॉल व किचन राहिले आहे पण त्यासाठी लागणारी हिम्मत गोळा करणं सुरू आहे Proud

जाता जाता, इंटेरिअर हा एक फसवणूकीचा नवा sofasticated धंदा आहे असे माझे मत झाले आहे.

"साने गुरुजी"
"खो खो मध्ये मूळ कॉन्स्टंट आम्हीच असल्याने"
"एखाद्या बिझी सलून मध्ये 5 माणसांच्या अर्ध्या अर्ध्या दाढ्या करून फोन घ्यायला बाहेर जाणाऱ्या माणसा सारखं"
या आणि अशा अनेक चपखल उपमा खूप आवडल्या.

तपशीलवार वर्णनात या उपमांनी मजा आली. निरीक्षणं तर अगदी अगदी वाटायला लागली.

परदेशात असते तशी शूज, कोट्स आणि हेल्मेट काढून ठेवण्याची लिव्हिंग रूम च्या एका कोपऱ्यात करण्याची चिमुकली(आत नुसती उघडी शेल्फ असलेली) लाकडी खोली.>> व्हिज्युअलाइज केली. मस्त कल्पना आणि अभिनंदन यासाठी. फोटो बघायला मिळेल का?

दुसरी गोष्ट म्हणजे पार्सल्स आत टाकता येतील अशी चौकोनी झडप खिडकी असलेलं दार.हे रेडिमेड दारांमध्ये पण मिळतं.>>ही डोकॅलिटी पण आवडली. याचाही फोटो बघायला आवडेल. कुठे रेडीमेड मिळेल? काय म्हणतात या खोक्याला?

ऐन दिवाळीत अतिशय खुसखुशीत, खमंग, खुमासदार, कुरकुरीत फराळ वाढल्याचा फील आला. अर्थात ज्याच्या वर हा बाका प्रसंग (ओढवला) आला आहे, त्यांनाही तसेच वाटत असेल तर आनंद द्विगुणित होईल. Happy

फेसबुक प्रमाणे दणादण स्मायल्या अपलोड करायची सोय किमानपक्षी इथे तरी हवी होती.

पार्सल्स आत टाकता येतील अशी खिडकी असलेलं बाहेरचं दार म्हणजे खरं तर परदेशात पेट एन्ट्री डोअर आहे(अर्थात मला ही कल्पना सांगताना हे माहीत नव्हतं.मुलीने गुगल करून 'आई तुला डॉगी एन्ट्री डोअर म्हणायचं आहे' असं सांगितलं डिझायनर शी कॉल चालू असताना.)
या लिंक मधल्या इतकं फॅन्सी नाहीये आमचं, फक्त एक लाकडी खिडकी आहे अशी उघडणारी बाहेरच्या दाराला.(आतलं बिल्डर ने दिलेलं दार अतिशय हलक्या दर्जाचं आहे.)
https://amzn.eu/d/4GSoP3m

शूज च्या खोली चा फोटो क्रिप1 आणि क्रिप2 घरी गेले कि टाकेन Happy

लहान ठेवायचे.1 फूट बाय 1 फूट चे खोके जाईल इतके.आणि यांच्या आत बंद मुख्य दार.
मुख्य उद्देश कोणी घरी नसताना पार्सल वाले येतात आणि त्यांना ते दारात उघडे तसेच ठेवायला कसेतरी वाटते(आत फुटकळ वस्तू असते एखादी.),तेव्हा या झडपेतून ते आत टाकता येईल आणि कोणी येईपर्यंत आतल्या आणि बाहेरच्या दाराच्या गॅप मध्ये राहील, अगदी उघड्यावर नाही.
अशीच कल्पना भारतातलया डोअर्स ना मुख्यतः मांजरी दुधाच्या पिशव्या दारात पहाटे ठेवल्यावर फाडतात त्यासाठी करतात.जाळीचे खोके असते, त्यात पत्रासारखे दूध टाकता येते, आणि मांजराचा पंजा आत पर्यंत जात नाही.

लय भारी, जबरदस्त.

झाल्यावर फोटो शेअर कर, लवकर होण्यासाठी शुभेच्छा.

हे त्रिपट्टक आज परत एकत्र वाचले, तीनही भाग धमाल आहेत एकदम. झकास अनु-अनुभव Lol

गृहसज्जा हे फार ओव्हर हाईप्ड आणि अर्थातच खर्चिक प्रकरण झालेय. लेखात लिहिलेले- न लिहिलेले (मला समजलेले) काही टेक अवेज :

- राहत्या घरात ही कामे करून घेणे टाळावे. शक्यतो राहायला जायच्या आधीच केले तर आवाज, गडबड गोंधळ, धूळ-धुराळा आणि शेजाऱ्यांच्या जळजळीत नजरा सगळेच टाळता येते. हे जमेलच असे नाही, पण ट्राय इट.

- असे प्रोजेक्ट कधीही दिलेल्या वेळेत आणि बजेटमध्ये पूर्ण होत नाही. पिरिएड. इथला ८०-२० रूल म्हणजे पहिल्या २०% वेळेत ८०% काम आणि उरलेल्या २०% कामाला ८०% वेळ. Proud Proud

- हनुमंताची शेपटी आणि द्रौपदीच्या साडी- थाळीनंतर कधीही न संपणारी काही एंटीटी असेल तर ते घराचे इंटेरिअर. खिसा रिकामा होईल पण काम संपणार नाही, हौस भागणार नाही. त्यामुळे कंट्रोल मजनू कन्ट्रोल. स्कोप / काम कमी तितके चांगले.

- एकवेळ कुलाबा कॉजवेला वाघ मोकळा फिरतांना दिसेल पण कोणतेही इन्स्टा/ मॅगझीन/ पँप्लेट / वेबसाईट वर दिसणारे आणि प्रत्यक्षात येणारे काम कधीच पूर्णपणे मॅच होणार नाही. ती अपेक्षा चुकीची आहे. जे 'डूएबल' आणि 'यूजेबल' आहे त्यावर लक्ष केंद्रित करावे हेच बरे.

- 'ओ' आणि क्रीप्स निघून गेल्यानंतर आपले घर आपल्यालाच मेंटेन करावे लागते. हे काम सोपे व्हावे, किमान नूतनीकरणानंतर आहे ते साफसफाईचे काम वाढू नये, नाहीतर आपण आपल्या घरचे पूर्णवेळ सफाई कामगार होतो, वैतागवाडीचे खासे सरदार Wink

- घर म्हणजे जिवंत माणसं सुखाने राहण्याची जागा, ते म्युझियम किंवा स्टोअररूम नाही. त्यामुळे सगळीकडे फक्त 'निर्जीव सामान ठेवण्यासाठी जागा' असे इंटेरिअर करू नये Happy सोयीसुविधा मात्र जश्या हव्या तश्या, परवडतील तेव्हढ्या.

सर्वात महत्वाचे :

- घर बदलतांना / घराचे नूतनीकरण करतांना एक प्रचंड मोठे वरदान आपल्याला आपसूक मिळालेले असते - लाईफस्टाईल अपग्रेड करण्याची संधी !! ती पुरेपूर वापरून बिनकामाच्या-बिनवापराच्या वस्तू, पसारा, कचरा कमी करता येतो, नव्या उत्तम वस्तू घेता येतात, माळ्यावर-कपाटात असलेल्या ठेवणीतल्या वस्तू चलनात-वापरात आणण्याची सुसंधी मिळते. ही संधी आपल्या सर्वसाधारण मध्यमवर्गीय आयुष्यात फारदा लाभत नाही. तस्मात या दुर्लभ संधीचे सोने-प्लॅटिनम करावे, वाया घालवू नये.

तुम्हाला लवकरात लवकर सुंदर - सुसज्ज घरात सुखपूर्वक राहता येण्यासाठी शुभेच्छा !

आणि हो, पु ले शु.

अनु, तिन्ही भाग अगदी मजेशीर तसेच वास्तववादी झाले आहेत. तुमच्या घरातील हे इंटिरियर चे काम लवकरात लवकर छान पूर्ण होवो ही सदिच्छा.
या तिनही लेखांवर आलेले प्रतिसाद देखील वाचनीय आहेत.

तिन्ही भाग आवडले आणि काही पूर्वानुभव आठवल्यामुळे अगदी मनाला भिडले. Lol
काम लवकर आणि छान मनासारखं पूर्ण होवो! Happy

Pages