इंटिरिअर आणि आम्ही-भाग 2

Submitted by mi_anu on 14 November, 2023 - 04:36

भाग 1 आणि 3 इथे वाचा:
भाग १
भाग ३

'ओ' ही एजन्सी साईटवर मापं घेऊन फर्निचर वेगळ्या फॅक्टरी मध्ये बनवून साईटवर लावणारी असल्याने त्यांना 2 महिन्यात सगळं आवरू याची पूर्ण खात्री होती.आम्हाला ही खात्री अजिबात नव्हती.पण हे सगळं करायला घेण्यापूर्वी काही तोडफोड कामं होती.घरात एकच ईशान्य कोपरा, तिथे ओटा दुसऱ्या बाजूने फोडून त्याची न वापरती जागा तुळईखाली न येणारा देव्हारा अशी लहान दिसणारी पण किचकट कामं होती.

इलेक्ट्रिक ची खूप कामं होती.याला कारण म्हणजे बिल्डर ने दिलेले अत्यंत मूर्खांसारखे आणि कमी स्विच पॉईंट्स आणि आमचा नवा घेतलेला व्हॅक्युम क्लिनर.तो घेऊन आल्यावर तो फक्त 15 अँपिअर सॉकेट ला लागतो हा शोध लागला.आणि घरात 15 अँपिअर सॉकेट फक्त फ्रिज आणि गिझर ला.गिझर पाशी बाथरूममध्ये जाऊन शिडी घेऊन प्लग काढणं, तिथे व्हॅक्युम क्लिनर चा प्लग लावणं हे फारच विनोदी होतं.त्यामुळे सर्व खोल्यात 15 अँपिअर सॉकेट, हे सगळं जड गणित सांभाळायला एखादा चांगला सर्किट ब्रेकर वगैरे लांबड वाढत गेली.शिवाय जिथे आधी पॉईंट्स होते तिथे आता फर्निचर येणार होतं त्यामुळे ते पॉईंट्स शिफ्ट करणे..संन्याशी फक्त उंदरांचा त्रास म्हणून मांजर आणणार होता. पण शेवटी उंदराला मांजर, मांजरीला दूध, दुधाला गाय, गाय सांभाळायला बायको वगैरे पसारा वाढत गेलाच.

प्रत्यक्ष काम पावसाळ्याच्या मुहूर्तावर सुरू झालं.आम्ही अतिशय निरागस अश्राप प्राणी असल्याने 'पावसाळ्याचा प्रश्नच नाही, आम्ही रॅबीट 2 दिवसापेक्षा जास्त ठेवतच नाही.ट्रक ने घेऊन जातो.' या आश्वासनावर डोळे झाकून विश्वास ठेवला.इथे रॅबिट म्हणजे ससा नाही बरं का.घरात जी तोडफोड होते त्या तोडफोडीचा कचरा अर्थात सोसायटीच्या कचऱ्यात टाकता येत नाही.तो टेम्पो करून घेऊन जाऊन योग्य जागी/एखाद्या बांधकाम साईट वर भरावाची गरज असते तिथे जाऊन टाकावा लागतो.नंतर गंमत अशी की 4 महिन्यात हा 'रॅबिट' गोळा करणारा ट्रक फक्त 2 वेळा आला.बाकी वेळ तो घरात पडून होता.इतक्या वेळा सारखं टेम्पो चं भाडं द्यायला 'ओ' येडे नव्हते.हे असे सगळीकडे पडलेले रॅबिट,आम्ही घरातली माणसं आणि यात जागा बघून ठेवलेल्या स्वयंपाकाच्या वस्तू असा महान गोंधळ घरात चालू झाला.

काम जसं जसं पुढे जात गेलं तसे आमच्याही स्वभावात माणूस ते माकड असे उत्क्रांतीपूर्ण बदल होत गेले.सुरुवातीला सगळं रिकामं करून देऊन, तिथे पृष्ठभाग(आमचा नव्हे जमिनीचा) खराब होऊ नये म्हणून जुनी फाटकी बेडशीट टाकून देणे असे लाड आम्ही करायचो. पण जशी जुनी कपाटं रिकामी करून त्यांनी उचकटायला घेतली(म्हणजे यातली काही उचकटून वेगळ्या ठिकाणी नवे वॉर्डरोब किंवा वेगळी शेल्फ येणार होती.) तसं तसं आम्हाला आतल्या वस्तू हलवून वेगळीकडे ठेवायला जागाच उरली नाही.30%वस्तू भंगारवाल्याला गाडी बोलावून देऊन पण वस्तूंचा समुद्र अजिबात आटेना. मग आम्ही मख्खपणे सर्व सामान हलवणं सोडून देऊन ऑफिस कामात पुन्हा बराच वेळ लक्ष नीट घालणे चालू केले.

सुरुवातीला 2 आठवडे रोज सकाळ संध्याकाळ ताजे लिंबू सरबत बनवून देणे, चहा मारी बिस्कीट 2 वेळा देणे हे करून झालं.कामगार या जादा अगत्याने भारावून स्वतःला लग्नघरी आलेले पाहुणे समजून सगळीकडे पेपर कप टाकून द्यायला लागले.(अर्थातच जे आमच्या साठी पवित्र,राहण्याचं घर ते त्यांच्या साठी अनेक वर्क प्लेसेस पैकी एक होती.)कितीही प्रेमाने सांगून पण रात्री ते गेल्यावर जिकडे तिकडे टाकलेले पेपर कप उचलणे, सांडलेला चहा किंवा लिंबू सरबत याचे डाग पुसणे हे नवे उदयोग मागे लागले. कामगारांच्या टीम बदलत गेल्या,त्यांनी केलेला प्लास्टर, लाकूड, सिमेंट कचरा (आणि ऑफिस चं काम) वाढत गेला तसा आमचा उत्साह आणि कनवाळूपणा आटत जाऊन सर्व माया फक्त 'सकाळी 10 ला दाराची कडी उघडून ठेवणे' इतकीच उरली.ते कोपऱ्यावर जाऊन चहा पिऊन यायला लागले.

सुरुवातीला आलेल्या टिम ने सर्व कपाटं भिंतीवरून काढल्यावर आमच्या घरात त्या कपाटात इतकं सामान आहे हा शोध आम्हालाही पहिल्यांदा लागला.बरेच प्लग पॉईंट दुसरीकडे हलवायचे असल्याने ते भिंतीतून उचकटून बाहेर लटकत ठेवलेले होते.यावरची बटणं शोधून दाबणं हे आव्हान होतं.ज्या खोलीत पार्टिशन बनणार तिथला पंखा पार्टिशन ला चाटत असल्याने तोही लटकत ठेवला होता.नंतर आलेल्या टीम ला फ्रेंड्स मध्ये मिस्टर हेकेल्स च्या घरात गेल्यावर होतं तसं होऊन चक्कर यायला लागली.संदर्भ म्हणून पहा 2 मिनिट 16 सेकंदापासून हा सीन: https://youtu.be/l6FG_0NViM4?feature=shared

घरात एकावेळी 3-4 कामगार असले की खोली बंद करूनही दडपण येतं.खरं तर ते आपली कामं करणारे सामान्य लोक.अनेक साईटवर अनेक वर्षे करणारे.बहुतेक खिडकीचे गज 3 मिनिटात कटर ने कापून कुठूनही घरात शिरू शकणारी माणसं आपण रोज बघत नसल्याने हे दडपण असेल.विशेषतः यातले दोन(यांना आपण तात्पुरते क्रिप1 आणि क्रिप2 म्हणू.) आले की मी आणि मुलगी दिवसभर खोलीच्या बाहेर पडत नसू.ते होते साधेच.पण खूप जास्त क्राईम पेट्रोल आणि सिरीयल किलर चित्रपट बघून तयार झालेली आपलीच चक्रम मनं.क्रिप1 ने 'मॅडम,वईसे तो आज छुट्टी था, मगर हम खाली बैठा था अऊर काम भी बाकी था तो आ गया..हॅ हॅ हॅ' केलं की मी मनात जोरात किंचाळायचे. क्रिप2 ला काहीही कामाच्या सूचना दिल्या तरी तो मख्खपणे पापणी पण न हलवता गंभीर चेहऱ्याने बघत राहायचा.त्याला ऐकू येतं, बोलता येतं,कळतं,कळत नाही याचा कसलाच पत्ता लागायचा नाही.रामसेपटातले आत्मे किंवा हॉलिवूड पटात नुकतीच ताजी ताजी अनडेड झालेली माणसं जशी हातपाय आणि पापण्या न हलवता समोरून चालत येतात तसा.त्याला बघून पण मी मनात जोरात किंचाळायचे आणि पटकन पाणी घेऊन आत जायचे.

कामगार अतिशय कष्टाळू आणि अनेक धोक्याची कामं बिना सुरक्षा करणारे होते.वेल्डिंग कोणतीहि काच न लावता थेट करणे.काही घट्ट लागलेली शेल्फ खिळे काढून भिंतीवरून उचकटून काढताना यातला 1 शेल्फ सहित शिडीवरून खाली पडला.टिचक्या ऍलर्जी, फोड किंवा कोणतीही रॅश पाहिली की त्वचारोग तज्ज्ञाना फोन करणारे आपण आणि शांतपणे 'हां वो कल दुसरे साईट पर पैर पे ईट गीर गया' सांगून जखमेसहित सर्व भुसा, खिळे राड्यात काम चालू ठेवणारे हे लोक.प्रचंड विरोधाभास.सुरुवातीला अजिबात न बघवून मी सोफ्रामायसिन आणि फर्स्ट एड किट हातात द्यायचे त्यांना आणि वापरा सांगायचे मग एक दोन वेळा 'वैसे तो हम ऐसा कुछ लगाने पे विश्वास नही करते, उससे जख्म ज्यादा बिगडता है, लेकीन वो प्यार से दे रहे है तो लगाना चाहीये' वगैरे गॉसिप ऐकल्यावर त्यांच्या प्रतिकारशक्ती वर विश्वास ठेवून हे किट देणं मी सोडलं.खरंच गरज असेल तर मालकाकडे मागूदेत बापडे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

घरात एवढं मोठं इंटिरिअर वर्क करत असताना घरातच राहणे हे मोठंच त्रासदायक काम आहे .कमाल आहे तुमची. साधं चार दिवसाचं सुतारकाम असेल तरी मला वैताग येतो. आपल्या पायांना लागून तो भुसा सगळीकडे जातो.

<संन्याशी फक्त उंदरांचा त्रास म्हणून मांजर आणणार होता. पण शेवटी उंदराला मांजर, मांजरीला दूध, दुधाला गाय, गाय सांभाळायला बायको वगैरे पसारा वाढत गेलाच.> तुम्हांला या लेखनाचे पैसे मिळू शकतील, मिळायला हवेत.

आमच्या सोसायटीच्या कंपाउंड वॉलला लागून महिना महिना राबिट पडलेलं असतं. तिथे ओपन पार्किंग आहे. सोसायटी लोकांकडे मोटारी असण्याच्या आधीच्या काळातली आहे, त्यामुळे सोसायटीत पार्किंगचा प्रश्न नाही. एकेका घरातून एवडं राबिट कसं निघतं हा प्रश्न पडतो. शिवाय लाद्या फोडतानाचा भयंकर आवाज.

हो खरंच.मी सुरुवातीला म्हटलं होतं नवऱ्याला.की सोसायटीत घर शोधू.
पण मग शेजारी दीर जाऊ कुटुंब,अगदी लागलं तर एक दोन दिवस जाता येईल, आणि आमच्याकडे खूप लहान बाळ किंवा ज्येष्ठ नागरिक नसल्याने एकंदर जमवू ऍडजस्ट करून असं ठरवलं.

१५ अ‍ॅम्पचं सॉकेट हे तर अगदीच रिलेट झालं.
आमचा फ्लॅट बनताना खर्च मर्यादेच्या बाहेर गेल्याने जेव्हां रिकाम्या फ्लॅटमधे बिल्डरच्या माणसाने एक्स्ट्रा पॉईण्ट्स हवे असतील तर आताच सांगा, एक्स्ट्रा चार्ज पडेल असे सांगितल्यावर आम्ही ते लांबणीवर टाकलेलं. पण नंतर टिव्हीची जागा आणि अन्य काही अप्लायन्सेसच्या वेळी वायरिंग खूपच मूर्खासारखी केल्याचे लक्षात आले. मग भिंती उकरणे, पुन्हा बनवणे, पेंट, बाल्कनीचे काम, किचनचे काम करता करता एखादा छोटा फ्लॅट येईल एव्हढा खर्च झाला.

प्रत्येकाला आपला वाटेलसा लेख आहे.

प्रतिसादांबद्दल धन्यवाद मंडळी.भरत,काम चालू कराल तेव्हा लेखाच्या प्रतीक्षेत आहे Happy
रघु, बरोबर आहे.बिल्डर ने दिलेले पॉईंट कधीच आपल्या वाढत्या फोन, डिव्हाइसेस च्या चार्जिंग गरजांना पुरे पडत नाहीत.

झकास ! अगदी रिलेटेबल. +१
चहाचे कप, क्रिप१,२ हे अनुभव अगदी विश्वात्मक असावेत.
संन्यासी खासच...
कामगार कष्टाळू तर असतात पण बरेचदा डिझाईन न समजल्यामुळे काही तरी उलटसुलट करुन कष्ट तर वाढवतातच पण यजमानाचे खिसे फाडतात.... अशा वेळी डिझायनरला रोष पत्करावा लागतो. खूप क्लोज मॉनिटरिंग केले तरी कामगारांच्या बौधिक कुवतीमुळे असे प्रसंग येतात. जे कामगार हुशार असतात त्यांना जास्त मेहनताना द्यावा लागतो. बरेचदा लो बजेट असेल तर कामाचा दर्जा खालावतो. चांगले रिझल्ट हवे तर पैसे थोडे जास्त लागतील.
दुखापतीच्या बाबतीत कामगार जितके बेफिकीर तितकेच तोडफोड करताना कुठलेही नुकसान टाळावे या बाबत.

हे रॅबिट वगैरे इतकं रिलेट केलं ना, घरात इंटीरीयर न करताही की बास रे बास. नवरात्रात घरात सोसायटीतर्फे बीम आणि पिलर्सला ज्या ज्या घरात बाहेरुन पाणी येऊन ते मुरुन तडे गेलेत ते काम सुरु झालं. बेडरुम आणि किचनच्या दोन बाजूच्या walls ना हा प्रॉब्लेम होता त्यामुळे ह्या दोन ठीकाणी काम होतं. एकदम करु नका हे आम्ही सांगितलं कारण आमचे चिरंजीव, त्यांना वावरायला दोन खोल्या तरी हव्यात, त्यात अनोळखी माणसं सतत ये जा करत असल्याने लेकरु अस्वस्थ झालं, संशयाने सर्वांवर नजर ठेऊ लागलं, ती लोकं ह्याला बघून घाबरु लागली, आधी बेडरुमचं काम करुन घेतलं मग लगे हात सामान बाहेर आहेच (बेड आणि कपाटं सोडून) तर बेडरुम आणि गॅलरी कलर करुया म्हणून त्यांनाच ते काम दिलं (हे सोसायटी नाही करणार, आमचा खर्च. अर्थात सोसायटी म्हणजे सर्व मेम्बर्स, जे फ़ंडिंग असतं त्यातून करणार प्लस खर्च वाढला तर विभागून पण एवढं तरी करते आमची सोसायटी, बीम आणि पिलर्स व्यतिरिक्त प्लॅस्टरिंग आमचा खर्च) , काम स्लो चाललेलं, कलर झाल्यावर किचनकडे वळूया ठरवलं पण ती मुलं म्हणायला लागली, ते करायला घेतो, मग पहाटे स्वयंपाक करून ठेऊन, पोळ्या बाहेरून, ती सोय चांगली आहे. एक मिनी सिलेंडर आहे, तो बाहेर घेऊन चहा, कॉफी करायचो. चहा, सरबत हे त्यांना द्यायचो. त्यात आम्ही रिसेल घेतलेला फ्लॅट, किचन विंडो, टाईल्स आधीच्याच होत्या. ती विंडो बदलावी लागली, मग sliding करायचं ठरवले, आधीची मारबल चौकट फुटली, ती ग्रॅनाईट बसवली. हे काम आणि खर्च मनी ध्यानी नसताना अचानक आला. फक्त तेवढं केलं, बाकी किचन प्लॅस्टर त्यांनी केलं तेच ठेवलं, टाईल्स काय वर चुनाही साधा लाऊन घेतला नाही (पाण्याचे छोटे पिंप, हंडा, कळशी ठेवायचा कडाप्पा तुटला त्यांच्याकडून, जोडून काही दिला नाही, जाऊदे). ओट्याच्या कडाप्पाला तडा गेलाय (तो त्यांच्याकडून नाही, आधीच गेलाय), ते काम काढलं तर महिना पुरायचा नाही, सिमेंटने घर भरून गेलेलं, पुढच्या वर्षी बघू सांगितलं त्यांना. सर्व काम पूर्ण धनत्रयोदशीला झालं एकदाचं. आमच्या लेकराला आता कोणी घरात येत नाही, सर्व घरात नाचता येतंय याचा आनंद झाला, हुश्श. अजूनही कितीही धु पूस केली तरी धूळ, सिमेंट आहेच. त्यामुळे तुमची अवस्था किती बिकट झाली असेल याचा अंदाज आलाच.

सिमेंट गोणी न्या न्या करत पाठीमागे लागावे लागलं. बेडरूम काम करायला घेतलं तेव्हा रॅबिट किती दिवस उचलत नव्हते, मध्ये गॅप खूप घ्यायचे म्हणून काम लांबले.

ओह अंजू, खूपच लांबलं म्हणायचं काम.रॅबिट ते पटापट उचलत नाहीत(आपण कसं, दिवसभरात एकदाच सर्व खराब झाल्यावर रात्री केर काढून पुसून जमीन स्वच्छ करतो तसं.)

घरात एवढं मोठं इंटिरिअर वर्क करत असताना घरातच राहणे हे मोठंच त्रासदायक काम आहे .कमाल आहे तुमची. साधं चार दिवसाचं सुतारकाम असेल तरी मला वैताग येतो. ......
100%.मला बेडरूम मधली कपाटे रेनोवेट करायची होती.पण आतले सामान कुठे ठेऊ म्हणून ग प्प बसले.आता खरतर रिनोवेशन ची खूप गरज आहे.पण गाप बसते

धन्यवाद देवकी, त्रासदायक आहे खरं. पण आतापर्यंत झालं कारण एका खोलीत जास्त काम नव्हतं.तिथे मुक्काम केला.
आता स्वयंपाकघरात सर्वत्र भांडी,चिकटपट्टी लावलेल्या जुन्या ट्रोल्या(फक्त लॅमिनेट बदलले)आणि हँडल न लावल्याने नीट उघडता न येणारी कपाटं आहेत Happy गॅस वर कुकर लावण्या इतकी जागा आहे.
पुढच्या आठवड्यात किचन नीट होईल.

आमच्याकडेही टोटल रिनोव्हेशनची गरज आहे, आम्हीच रिसेल घेतला २००४ मधे, नंतर दोन वर्षांंनी रहायला आलो. सोसायटीला तीस वर्ष होत आली आहेत, काही वर्षांनी रिडेव्हलपमेंटला जाईल, त्यामुळे सर्व करणार नाही पण काही करणं गरजेचं आहे ते पुढच्या वर्षी बघू. सोसायटीचे आवार फार मोठं आहे, त्यावेळी इतकं मोठं डोंबिवलीत अतिशय क्वचित असायचे त्यामुळे पार्किंग आणि मुलांना खेळायला जागा आहे.

मस्त Lol

कामगार अतिशय कष्टाळू आणि अनेक धोक्याची कामं बिना सुरक्षा करणारे होते.
>>>
मागे एकदा आमच्या घरी फर्निचरचं काम सुरू होतं. कपाटाला सनमायका लावत होते. सनमायका फेविकॉलने चिकटवून ते जागचं हलू नये म्हणून सगळ्या कडांना दोन दिवस चुका (बारीक, नाजूक खिळे) ठोकून ठेवतात. ते करणार्‍या कामगाराने सुरुवातीला काय केलं असेल? चिवड्याचा बकाणा भरतात तसे मूठभर ते खिळे तोंडात टाकले, Rofl आणि मग शांतपणे एक एक खिळा तोंडातून बाहेर काढत कपाटाच्या सगळ्या कडांना ते पटापट ठोकले.
खिळ्यांच्या पुडीतून एक एक खिळा उचलणं वेळखाऊ असतं म्हणे, दरवेळी एकच खिळा हाताशी येण्यासाठी ही त्यांची सर्वात सोपी पद्धत.

चिवड्याचा बकाणा भरतात तसे मूठभर ते खिळे तोंडात टाकले, Rofl आणि मग शांतपणे एक एक खिळा तोंडातून बाहेर काढत कपाटाच्या सगळ्या कडांना ते पटापट ठोकले.>>>>>हो हे पाहिलं आहे

चिवड्याचा बकाणा भरतात तसे मूठभर ते खिळे तोंडात टाकले, Rofl आणि मग शांतपणे एक एक खिळा तोंडातून बाहेर काढत कपाटाच्या सगळ्या कडांना ते पटापट ठोकले >>>>
हो आमच्याकडे पण पाहिलं होतं हे. आणि आपणच चुकून खिळ्यांचा तोबरा भरल्यासारखा जीव घाबरा झाला होता.