हा एक अगदी वेगळा प्रसंग आहे. तो घडल्यानंतर त्याचा अर्थ लावायला वेळ लागला. पण नंतर त्याचा अर्थ आणि अन्वयार्थ उलगडत गेला. ह्या प्रसंगाचा किस्सा आपल्यासोबत शेअर करत आहे. आजवर इतके रन आणि वॉक केले होते, पण ह्या प्रसंगाइतकं विचित्र आणि भयाण कधी धावलो व सैरावैरा चाललो नव्हतो! तर झालं असं होतं...
मला अनेक दिवसांपासून जाणवत आहे की, माझा मित्र मला काही सांगू इच्छित आहे. आणि तो जे सांगू इच्छित आहे ते रहस्यमय आणि गोपनीय आहे. त्याबरोबरच त्या गोष्टीवर कशाचं तरी सावटसुद्धा आहे. नक्कीच काही तरी वेगळी गोष्ट असली पाहिजे. मी काही निमित्ताने औरंगाबादला आलो आहे. बाहेरून मुक्काम केलेल्या घरी आलो तेव्हा कळालं की, माझा मित्र नुकताच येऊन गेला. मला भेट, इतकाच निरोप त्याने दिला आहे. आम्ही औरंगाबादमध्ये काही नेहमी भेटत नाही. पण तरी जवळच्या एखाद्या हॉटेलच्या परिसरात तो भेटेल असं वाटलं आणि मी नातेवाईकांना ते सांगून निघालो. शक्यतो मी कुठे जातोय हे सांगायला मला आवडत नाही. पण नकळत "सेफ्टीच्या" दृष्टीने मला हे सांगावसं वाटलं! जितेश- माझा शाळेपासूनचा अगदी जीवलग मित्र. त्याला मला काय सांगायचं असेल? आणि तेही काहीसं लपून छपून?
मी चौकात गेलो. शोधाशोध करत फिरत राहीलो. त्याबरोबर मनामध्ये विचारही सुरू राहिले की काय असेल नक्की प्रकरण? आणि मग आठवलं की, काही दिवसांपूर्वीही दिसला होता तेव्हा तो मला असा इशारा तर करत नव्हता? नक्कीच. काही तरी वेगळं असलं पाहिजे. पण काय असेल? नकळत एक अप्रिय- अशुभाचं सावट ह्यावर जाणवतंय. फिरता फिरता मला जितेश दिसला! पण त्याने फक्त हाताने खूण केली आणि आम्ही रस्त्यावर चालत राहिलो. त्याच्या चेह-यावरूनच जाणवतंय की त्याला जे सांगायचं आहे ते गोपनीय तर आहेच पण कदाचित धोकादायकसुद्धा आहे. म्हणूनच तो खूप काळजी घेतोय. आम्ही काही गल्ली बोळ ओलांडून आतल्या बाजूच्या एका छोट्या हॉटेलजवळ आलो. अगदी साधं असं हे हॉटेल आहे. शाळेत असतात तसे बेंच बसायला आहेत. तुरळक गि-हाईक आहेत. आमचं बोलणं सुरू झालं. तो मला विचारतोय की, मला काही गोष्टी गेल्या काही दिवसांमध्ये जाणवल्या का? काही खटकलं का? मी विचारात पडलो. काही तरी जाणवतंय खरं. काही तरी वाईट घडलं आहे असं वाटतंय. पण काय ते कळत नाहीय.
मग त्यानेच सांगितलं की, गावामध्ये एक अपराधी लोकांना त्रास देत सुटला आहे. लोकांना पळवणं आणि गायब करणं सुरू झालं आहे. आणि अपराधी इतका तयारीचा आहे की, लोकांना जाणीवही नाही अजून की असं काही घडलंय. त्याने मग आमच्या दूरच्या मित्रांच्या संदर्भात माहिती दिली की त्यांच्यासोबत काय घडलंय. ते ऐकून धक्का बसला. मग मीच त्याला बोललो की, हे तू पोलिसांना का सांगितलं नाहीस, इथे का सांगतोय. त्यावर तो म्हणाला की, शत्रू खूपच खतरनाक आहे. इतका की, त्याच्याही जीवाला धोका आहे. त्यामुळे अगदी जपून आणि सगळी काळजी घेऊन आपल्याला काम केलं पाहिजे. मग मी त्याला विचारलं की, हे तुला कसं कळालं? तो म्हणाला की, एका बेकरीमध्ये जाताना त्याला एका व्हॅनमधलं ओरडणं ऐकून शंका आली. आणि ज्याला गायब केलं होतं, त्याचा मित्र जितेशला त्या दिवशी भेटला. त्यामुळे त्याला कळालं की, असं काही होतं आहे. आणि मग त्याने अजून पुढचे तपशील सांगितले. ते ऐकताना भितीही वाटत होती आणि काळजीही वाटत होती.
हॉटेलात चहा- वडा पाव आम्ही घेत होतो, पण तरीही आपल्यावर कोणाची नजर तर नाहीय, आपल्याला काही धोका तर नाहीय हा प्रश्न सतत मनात येतोय. टेबलवर बिलाचे पैसे दिले तरी आम्ही बोलत बसलो. आजूबाजूचे तुरळक लोक त्यांच्या तंद्रीत आहेत. आमच्याकडे कोणाचंही लक्ष नाहीय. आम्ही बराच वेळ बोलत राहिलो. हळु हळु ह्यामध्ये असलेली रिस्क आणि गांभीर्य कळत गेलं. अखेर ठरवलं की, जितेशच्या घरच्यांना हे सांगायचं आणि त्यांची मदत घ्यायची. तसं थोडं हलकं वाटलं आणि निघालो. काउंटरवर गूगल पे ने पैसे देणार तितक्यात आठवलं की, पैसे तर टेबलवरच दिले आहेत. आपल्या मागावर कोणी नाहीय ना ह्याची परत परत खात्री करत निघालो. बाहेर तर सगळं नॉर्मल वाटतंय. पण नकळत एका सावटाची जाणीवही होतेय.
जितेशच्या घरी आम्ही पोहचलो. काका- काकूंना खूप वर्षांनी भेटलो. लहानपणीच्या आठवणी निघाल्या. मग सध्या काय सुरू आहे ह्यावर बोलणं झालं. ह्या गप्पांमध्ये मुख्य बोलायचा विषय मागे पडत होता. रात्र होत आल्यामुळे काका- काकूंनी त्यांच्याकडेच जेवायचा आग्रह केला. जेवण झाल्यावरच आपण बोलू असं ते म्हणाले. शेवटी जेवणानंतर शांततेत सविस्तर बोलू असं ठरवून आम्ही तिथेच थांबलो. वरवर हसत असलो व नॉर्मल दिसत असलो तरी आतून आम्ही दोघंही प्रचंड अस्वस्थ आहोत. आणि का कोण जाणे, पण मला "सेफ" वाटत नाहीय. जणू तो अपराधी आमच्याच मागावर आहे असं वाटतंय.
आम्ही जेवायला बसलो. गप्पाही सुरू आहेत. आमचं जेवण संपता संपता जितेशच्या बाबांचे एक मित्र घरी आले. तेही थोडं जेवले आणि मग आमच्यासोबत बसले. जितेशचे बाबा म्हणाले की, हे खूप अनुभवी आहेत, तुम्हांला जे सांगायचंय ते त्यांनाही सांगा. त्यांचीही मदतच होईल. मग अखेर आम्ही विषय काढला. जितेशनेे सगळे तपशील सांगितले. गायब झालेले ते लोक, त्याचा मित्र आणि कसं झालं ते सांगितलं. त्याबरोबर ह्याची कुठेच नोंद नाहीय, बातमीसुद्धा नाहीय हेही तो बोलला. त्याचे बाबा आणि ते काका शांतपणे ऐकून घेत होते. आम्ही आम्हांला वाटणारी काळजीही बोलून दाखवली. त्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. त्यावर ते इतकंच बोलले की, तुम्ही काळजी करू नका. पोलिस त्यांचं काम करत असतात. आपल्याला दिसत नसलं तरी पोलिसांना सगळं कळत असतं. जितेशनेे त्यांना सांगायचा प्रयत्न केला. पण ते ठाम होते. मग ते काका म्हणाले, मुलांनो तुम्ही इतका विचार का करताय. चला माझ्यासोबत, आपण मस्त फिरून येऊ. कसं काय पण जितेश तयार झाला आणि त्याचे बाबाही तयार झाले. मला विरोध करता आला नाही.
थोड्याच वेळात त्या काकांसोबत आम्ही त्यांच्या गाडीने निघालो. वाटेत कुठे तरी थांबून त्यांनी आमच्यासाठी सरबतासारखं पेय घेतलं. मी ते बाजूला ठेवून दिलं. जितेश खूप दमलेला वाटत होता. त्याने ते गटागटा पिऊन टाकलं. ते पिऊन झाल्यावर त्याला एकदम शांत वाटलं. रिलॅक्स होऊन तो बसला आणि बघता बघता त्याला डुलकी आली. माझं मन मात्र अस्वस्थ आहे. कुठे तरी मेजर घापा आहे असं वाटतंय. पण कुठे??? तेवढ्यात गाडी थांबली. कोणती तरी बेकरी दिसते आहे. इथे ते काका उतरले. दोन मिनिटांत येतो, तुम्ही थांबा म्हणाले. माझ्या मनात शंका कुशंका येत आहेत. आणि अचानक- अगदी अचानक मला जाणीव झाली! बेकरी!! आम्हांला घेऊन जाणारे ते काका! जितेशला आलेली गुंगी! आणि अचानक मला जाणीव झाली की, अपराध्यांनी मला पकडल्यात जमा आहे. आपण आत्ताच निसटलं पाहिजे! आणि मी गाडीचं दार उघडून पळत सुटलो! ते काका बेकरीमध्ये गेले असावेत, त्यांना कळालं नाही आणि मी धावत सुटलो!
जिथे पाय नेतील तिकडे धावत गेलो. थोडं दूर आल्यावर मी नक्की कुठे आहे, इथून माझं नातेवाईकांचं घर किती लांब असेल हे विचार मनात यायला लागले. पण इतकी जबरदस्त भिती वाटतेय की, कोणाला बोलायची हिंमत होत नाहीय. न जाणो माझ्यासमोर असलेली व्यक्ती नेमकी अपराध्यांची हस्तक असली तर? कसा विश्वास ठेवायचा? माझ्या नातेवाईकांचा फोन लावला. पण तोही लागत नाहीय. लोकांना रस्ता विचारावासा तर वाटतोय पण हिंमत होत नाहीय. इतकं हतबल कधीच वाटलं नव्हतं. माझी चाल अगदी वेड्यासारखी आहे. लोकांना थांबून रस्ता विचारायचा आहे पण पाय थांबत नाही आहेत. अक्षरश: सैरावैरा जातोय. आजवर इतके रन आणि वॉक केले होते, पण इतकं विचित्र आणि भयाण कधी चाललो नव्हतो! लोकही माझ्याकडे चमत्कारिक नजरेने बघत आहेत... एक भयाण हतबलतेने मला घेरलं. प्रचंड हेल्पलेस वाटलं. जणू ते अपराधी कधीही मला पकडणार अशी घनदाट भिती वाटते आहे. अतिशय भितीदायक जागी मी अडकलो आहे असं जाणवतंय...
भितीची आणि असुरक्षेची भावना खूप वाढत गेली. सगळे मार्ग बंद झाले आहेत आणि सगळीकडून डेड एंड आहे ही असुरक्षितता वाढत गेली. इतकी वाढत गेली की अखेर माझ्यातला "बघणारा" जागा झाला आणि खाडकन माझे डोळे उघडले! दृश्य इतकं विपरित होतं की, स्वप्नावरून सजगता स्वप्न बघणा-याकडे आली. रात्रीचे दोन वाजलेले आहेत! आणि हे स्वप्न होतं! पण स्वप्न तरी कसं म्हणायचं? मला वाटलेली भिती, ते सगळे प्रसंग, तेव्हा वाटलेली चिंता, काळजी, भय हे सगळं अगदी जीवंत तर वाटत होतं. मित्राचे ते काका असं काही करतात ह्यामुळे बसलेला धक्का तर किती जीवंत होता! सगळं तर समोर घडलं होतं. जणू मी अनुभवलं होतं. हे स्वप्न होतं, पण त्याच्याही पलीकडे काही होतं. जाग येऊनही शांत व्हायला काही मिनिटं लागली. थोड्या वेळाने हायसं वाटत गेलं! आणि मग हळु हळु मनात विचार सुरू झाले. एक एक गोष्ट उलगडत गेली आणि मग मन शांत होत गेलं... पण उरलेली रात्र अजिबात झोप लागली नाही!
मग आठवले मला पडलेले असे किती तरी स्वप्न ज्यांना एक सूचक अर्थ होता- representative meaning होतं. किती तरी स्वप्न. ज्या ज्या ठिकाणी मी सायकलिंग, रनिंग केलं आहे त्या भागांचे सूचक स्वप्न मला पडले होते. स्वप्नामध्ये एक प्रकारे त्या जागा दिसल्या होत्या. मग ते वाईचं मंदीर असेल, मुंबई मॅरेथॉनमधला सीलिंक असेल किंवा हिमालय असेल. लदाख़च्या पहिल्या सायकलिंगच्या वेळी तर स्वप्नाने मला इतका तरल अनुभव दिला की त्यामुळेच माझा आत्मविश्वास वाढला, एक प्रकारे खात्रीच पटली. स्वप्न! स्वप्नावस्था हीसुद्धा चेतनेची एक स्थिती असते. किती तरी वैज्ञानिक शोध, कूट प्रश्न, अनेकांच्या आयुष्यातले प्रश्न ह्यावर स्वप्नावस्थेमध्ये उत्तरं मिळालेली आहेत. अतिशय दुर्गम ठिकाणी आणीबाणीत अडकलेल्या ट्रेकर्सना स्वप्नामध्ये मदतसुद्धा मिळालेली आहे. त्यामुळे स्वप्न हे असत्य असलं तरी सूचक असतं. त्याला एक अर्थ असतो, एक indicative meaning असतं. स्वप्न जरी रूढ अर्थाने खरं नसलं तरी त्यावेळी वाढलेलं बीपी, हार्ट रेट हे तर खरे असतात.
कधी कधी काही घटना ह्या प्रचंड मोठी सजगता निर्माण करणा-या असतात- एखादा अतिशय दु:खाचा किंवा आपत्तीचा प्रसंग. किंवा एखादा अगदी वेगळा- अतिशय नवीन प्रसंग. जेव्हा मी माझी पहिली हाफ मॅरेथॉन ईव्हेंट पळालो होतो, तेव्हा आदल्या रात्री झोप लागतच नव्हती. कारण पुढच्या दिवशी इतकी नवीन गोष्ट होती की, त्या गोष्टीची जाणीव- सजगता इतकी प्रखर होती की, ती झोपेचा अडसर ओलांडून जाणवत राहिली. सायकलिंग- रनिंगमधले ठिकाणं आधी स्वप्नात दिसण्याचं कारण कदाचित हे असू शकेल की, त्यावेळी तिथे राईड करताना/ ते अनुभवताना सजगता इतकी प्रखर होती की, ती खोलवर अशा स्वप्नावस्थेमध्येही डिटेक्ट झाली असेल.
आणि ज्याला आपण सत्य म्हणतो तेसुद्धा अनेकांसाठी असत्यच तर असतं. आपल्याला जे दिसतं ते आपल्या जवळच्याच व्यक्तीला कधी कधी दिसत नाही. किंवा दुस-या व्यक्तीला जे ढळढळीत दिसत असतं ते आपल्याला दिसत नाही! मग सत्य व स्वप्न हा फरक कसा करता येईल! अजून एक स्वप्न आठवतं. स्वप्न असं होतं की, औरंगाबादचेच माझे नातेवाईक व मी एका छोट्या गावात फिरतोय. काही निमित्ताने त्या गावात जमलो आहोत. स्वप्नानंतर काही महिन्यांनी माझ्या आजी गेल्या. तेव्हा आम्ही अंत्यविधीसाठी पैठणजवळच्या गावासारख्या वस्तीत गेलो. तेव्हा कळालं की, अरे "ते स्वप्न" “ह्या अनुभवाचं विजन" होतं! एक स्वप्न एका रस्त्याचं पडलं होतं. मोकळा रस्ता व पलीकडे भिंत, एक विशिष्ट लँडस्केप. एका वेळी श्रीनगरमधून सायकलसोबत जाताना जाणवलं की, अरे ते स्वप्न ह्या दृश्याचं होतं! इतकं ते ओळखीचं वाटलं. Deja vu वाटलं!
मला ओशोंचीही अनेक स्वप्न पडली आहेत. त्यांना मी भेटतो आहे. आत त्यांचं व्याख्यान सुरू आहे आणि मी बाहेर बसलो आहे, जाताना ते दोन क्षण माझ्याशी बोलून जातात. किंवा पाठीवर हात फिरवतात. एका मोठ्या आलीशान इमारतीत त्यांचा एक कार्यक्रम आहे- ठिकाणसुद्धा मी स्वप्नात ओळखलं होतं की हे स्वारगेटजवळचं आहे (कदाचित गणेश कला क्रीडा मंच). त्यांना समोरून बघितल्याच्या खूप आठवणी स्वप्नात दिसतात. पूर्व जन्मातल्या असल्या तरी आठवणीच म्हणेन. त्यांचं प्रवचन ऐकून मी बसने परत जातोय असं एक स्वप्न पडलं होतं. आणि स्वप्नातला रस्ता बंडगार्डन रोड मला ओळखू आला, कारण मी वाडिया कॉलेजला असताना तिथे अनेकदा जायचो. म्हणजे भूतकाळातच नाही तर पूर्व जन्मात घडलेल्या घटनांच्याही सूक्ष्म मेमरीज/ इंप्रेशन्स असतात आणि स्वप्नावस्था खोल असली तर कधी कधी त्या मेमरीजसुद्धा वर येऊ शकतात. मी समुद्र किना-यावर आहे आणि तीन बाजूंनी समुद्र आहे. अचानक माझ्या अंगावर त्सुनामीसारखी महाकाय लाट येते आहे आणि मला पळायला जागा नाही. आणि ती लाट माझ्या अंगावर आता कोसळणारच असं अगदी स्पष्ट स्वप्न तीन वेळेस पडलं. आणि ओशोंच्या पुस्तकात त्याचा अर्थही उलगडला.
आणि स्वप्नाबरोबर इतरही अनेक प्रकारे आपल्याला irrational संवेदना होतातच ना. अचानकच एखाद्या व्यक्तीची काळजी वाटते. तीव्र आठवण येते. किंवा आपण जी गोष्ट करत नाही ती केली जाते. स्वप्नामध्ये सुप्त इच्छा- आकांक्षा जशा प्रोजेक्ट केल्या जातात, तशाच सूक्ष्म जाणीवाही पॉप अप होतात. जे सामान्यपणे आपली बुद्धी सरफेसवर येऊ देत नाही, बुद्धी जे लगेच नाकारते, ते स्वप्नाच्या खोलवरच्या शांततेत सरफेसवर येतं. असो.
बोकोजू ह्या फकिराने एक दिवस त्याच्या शिष्यांना सांगितलं की, मला रात्री स्वप्न पडलं होतं की, मी फुलपाखरू झालो आहे आणि इकडे तिकडे फिरतोय. त्याचे शिष्य हसले. तो पुढे म्हणाला, ते स्वप्न तर संपलं. पण आता मला प्रश्न पडलाय की, कशावरून मी आत्ता जे करतोय ते त्या फुलपाखराला पडलेलं स्वप्न नसेल? ज्ञानी माणसं म्हणतातच की, आपलं जीवन हे जरा जास्त वेळ चालणारं पण स्वप्नच आहे. अर्थात् आपल्या दृष्टीने. तारे- आकाशगंगांच्या संदर्भात तर आपलं जीवन क्षणार्धाचंही नसेल. असो.
तर ह्या स्वप्नाचा काय अर्थ असू शकेल मग? मला जाणवणारा अर्थ हा आहे की, माझ्या मित्राच्या संदर्भातील व्यक्तींसोबत कदाचित असं काही घडू शकेल. किंवा अशा स्वरूपाचा एखादा प्रश्न/ स्थिती/ समस्या त्याच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीसोबत होऊ शकेल. मला स्वप्नात जे जाणवलं ते इतकं डायरेक्ट आणि प्रखर होतं, ती भितीसुद्धा इतकी प्रखर होती की, हे लिहून काढताना त्यात मला बदल करावे लागले. नाव व संदर्भ बदलून थोडं ते सौम्य करावं लागलं. इतकं ते स्वप्नात स्पेसिफिक जाणवलं होतं. ह्यावर उपाय काय मग? तर उपाय हाच की, आपण ज्या गोष्टी करतो त्या अधिक सजगपणे करायच्या. आपल्याला ज्यांची काळजी वाटते, ज्यांच्या काळजीच्या वेव्हज येतात त्यांच्याशी बोलायचं. आपल्याला न दिसणा-याही अनेक गोष्टी असतात ही जाणीव ठेवायची. असो.
हे वाचल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद! हे लेखन आपल्याला रिलेट झालं का, हे नक्की कळवाल. धन्यवाद.
निरंजन वेलणकर 09422108376
17 ऑक्टोबर 2023
आधी प्रत्येक धाग्यावर मीच
आधी प्रत्येक धाग्यावर मीच शहाणा, माझंच ऐका, हे बंद करा ते बंद करा हे थांबवा. इथे तुमच्या प्रतिसादावर मी काहीही लिहीलेले नाही.
माझे अनुभव खरे खोटे ठरवणारे तुम्ही कोण लागून गेलात ? यातले कुठले शिक्षण तुम्ही घेतलेय ? तुम्ही कोण लागून गेलात कुणाचे अनुभव खरे खोटे ठरवणारे ? तुमच्यासारखे अस्सल बेवडे मिळून मतदान घेणार का ?
लोक तुमच्या प्रतिसादांची मजा घेतात. त्यामुळे कुणीच तुम्हाला सत्य सांगत नाही. मजा घेताना एखाद्याला आवडेल असे प्रतिसाद द्यावे लागतात. अर्थात हे समजण्याची कुवत असेल तर मग प्रश्नच येत नाही. पण त्यामुळे तुम्ही रोज लिमिट क्रॉस करताय.
एक तर आयडेन्टीटी माहीत नाही, त्यात एव्हढा उर्मटपणा, वेळेत थांबा हेमंत. हा तुम्हाला या धाग्यावर या विषयावर शेवटचा प्रतिसाद.
अरे इथे मजेसाठी तर यायचे असते
अरे इथे मजेसाठी तर यायचे असते.
गंभीर विषयासाठी ,गंभीर विचाराची देवाण घेवाण करण्यासाठी रिअल kife मध्ये माझ्या कडे खूप लोक आहेत.
. काय रघु आचार्य जी.
तुम्ही प्रतिसाद बदलला. त्या
तुम्ही प्रतिसाद बदलला. त्या आधीच्या प्रतिसादाला अनुसरून प्रतिसाद दिलेला आहे.
तुमच्या रिअल लाईफ मधे काय चालते याच्याशी मला घेणं देणं अजिबात नाही. ते खरे कि खोटे हे मी सांगू शकत नाही.
पण एखाद्याला सोशल लाईफ मधे उत्तम लोक चर्चेसाठी असते तर तो मायबोलीवर प्रत्येक धाग्यावर हावरटासारखे अर्धवट प्रतिसाद देणार नाही. रिअल लाईफ मधले लोक जर अर्धवटच असतील आणि अर्धवटांना आपली मते सर्वोत्तम वाटत असतील तर मग वेगळी मतं पचनी पडत नाहीत म्हणून एका एका धाग्यावर जोपर्यंत लोक नादाला लागणे बंद करत नाहीत तोपर्यंत लेंड्या पाडणे हे अपरिहार्य आहे. हे माझे मत आहे.
अती तीव्र बुध्दी च प्रदर्शन.
अती तीव्र बुध्दी च प्रदर्शन.
लगे रहो
अती तीव्र बुध्दी च प्रदर्शन.
अती तीव्र बुध्दी च प्रदर्शन.
लगे रहो
Submitted by Hemant 333 on 29 October, 2023 - 22:35 >>> Look who's talking !

आता हा प्रतिसाद बदलता येणार नाही.
Very good technical प्रदर्शन
Very good technical प्रदर्शन.
लिहीत रहा खूप छान लिहिता.
फक्त आपण जो विचार करतो तेच फक्त स्वप्नात दिसत नाही..
कधी स्वप्नात पण विचार न केलेल्या गोष्टी पण स्वप्नांत दिसतात.
असे लोकांचे अनुभव आहेत.
ह्या वर तुमचे अमूल्य मत.
शिवीगाळ न करता व्यक्त करा.
शिवीगाळ न करता व्यक्त करा. >>
शिवीगाळ न करता व्यक्त करा. >> कोणती शिवी दिली आहे हे दाखवून द्या.
फक्त आपण जो विचार करतो तेच फक्त स्वप्नात दिसत नाही..
कधी स्वप्नात पण विचार न केलेल्या गोष्टी पण स्वप्नांत दिसतात.
असे लोकांचे अनुभव आहेत. >>> कोणत्या लोकांचे ?
ह्या वर तुमचे अमूल्य मत. >>> एकदा तुमच्या सारखे लोक कसा विचका करतात हे माहिती झाल्यावर इथे लिहायची इच्छाच मेली. त्यात तुमच्यासारख्यांनी सांगितले म्हणून मत द्यावेसे वाटत नाही. तुमच्यासाठी मी लिहीत नाही.
तुमचा जो कुणी गंभीर चर्चेसाठी असलेला गंभीर लोकांचा ग्रुप आहे तिकडे जाऊन चर्चा करा. इथे पडीक राहू नका. तुमच्या गंभीर चर्चेच्या अमृतमंथनातून पुस्तक लिहा. हातोहात खपेल ते. टीव्हीवर जा. तिकडे मतं मांडा.
आमया गावाच्या बाहेर दत्तूचा गुत्ता आहे. तिकडे पण गंभीर चर्चा चालतात. इतकेच कि त्यातला एखादा इथे आलेला नाही. नाहीतर काय होईल याचे प्रात्यक्षिक इथे रोज दिसतेय.
शुभ रात्री ! शब्बा खैर !
चालू द्या तुमची तलवारबाजी.
जे लोक मजा घेत होत होते त्यांच्या आनंदाच्या आड आल्याबद्दल क्षमस्व !
इथे लिहावं की नाही ह्या
इथे लिहावं की नाही ह्या संभ्रमात होते पण लिहितेच ..' मनी वसे ते स्वप्नी दिसे' हि म्हण तशी खरीच असावी..
मला रोजच स्वप्नं पडतात .. काही पूर्ण आठवतात तर काही धुसर आठवतात.
खरंतर विश्वास ठेवायला जड जाईल मात्र स्वप्नात पाहिलेला एक दुर्दैवी प्रसंग आणि अगदी आठवडाभरातच त्या प्रसंगाची वास्तवात आलेली प्रचिती.. अगदी अविश्वसनीय वाटावा असा मात्र पूर्णपणे सत्य असलेला अतिशय दुर्दैवी योगायोग २२ वर्षापूर्वी माझ्याबाबतीत घडला होता.
माझा रोजचा रेल्वे प्रवास कॉलेज जीवनापासूनच सुरु झाला होता.. स्टेशनवरून येता- जाताना बऱ्याच वेळा रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या अभागी जीवांच्या मृतदेहांचे दर्शन नेहमीच होतं असे.. कधी - कधी ट्रेनच्या डब्यातल्या सीट वर जखमी किंवा मृत व्यक्तीना वाहून नेल्याने त्या सीट सुद्धा रक्ताने माखलेल्या असायच्या.. हे सगळं पाहून अंगावर शिरशीरी उठायची.. काही वेळेस ज्या ट्रेनमधून प्रवास असायचा तिच्या खाली काही अपघात घडायचे . हे सगळं घडलेलं कुठेतरी मनात भीती निर्माण करायचे.. आणि हि भीती पुढे कधीतरी स्वप्नातही उफाळून यायची ..
एकदा झोपेत मला एक स्वप्न पडलं की, मी पालघर स्टेशनवर नेहमीच्या फलाटावर मैत्रिणींसोबत ट्रेनची वाट पाहतेय.. समोरून ट्रेन येतेयं .. माझं लक्ष ट्रेनकडेचं आहे.. तेवढ्यात दुसऱ्या बाजूच्या फलाटावरून एक व्यक्ती उतरतेयं .. तिच्या चाली वरून अंदाज येतोयं की, रुळ क्रॉस करून समोरच्या फलाटावर चढेल पण तसं न घडता ती व्यक्ती अचानक त्या ट्रेनसमोर झोकून देतेयं .. मी ते भयंकर दृश्य पाहून जोरजोराने ओरडतेयं .. रडतेयं.. स्वप्नांत मी प्रचंड घाबरले होते.
जोपर्यंत जाग येत नाही तोपर्यंत स्वप्नात घडणारं सगळं खरंच वाटते हे मात्र खरं..!
अशी भीतीदायक स्वप्नं झोपेत पाहिल्यावर एक-दोन दिवस मनावर त्यातल्या भीतीचं सावट पसरलेलं राहतं.. नंतर मात्र सगळं नॉर्मल वाटतं.. स्वप्नंच ते.. त्याचं एवढं मनावर कशाला घ्यायचं..!
रेल्वे अपघाताचं हे असं भीतीदायक स्वप्नं पाहिल्यानंतर साधारण पाच-सहा दिवस उलटले असतील..
तारीख १४ ऑगस्ट २००१.
स्टेशन पालघर , फलाट क्रमांक १.
त्यावेळी मी S.Y. B.com ला होते.. कॉलेज सुटल्यावर १२ .१० च्या विरार - वापी शटलची वाट पाहत आम्ही तिघी मैत्रिणी फलाट क्रमांक १ वर उभ्या होतो. ट्रेनची अनाऊन्समेंट झाली. ट्रेन समोरून येत होती.. माझं लक्ष गप्पा मारताना सुद्धा ट्रेनकडेच होतं.. मैत्रिणी पाठमोर्या होत्या... तेवढ्यात रेल्वेच्या बाजूच्या झोपडपट्टीतून एक व्यक्ती फलाट क्रमांक दोनवर चढली.. माझं लक्ष त्या व्यक्तीकडे गेलं... जिथून फलाट संपत होता तिथून ती व्यक्ती न थांबता पुढे- पुढे येत राहिली.. मी त्या व्यक्तीकडेच पाहत होते.. मोटरमनने सुद्धा त्या व्यक्तीचा चालण्याचा वेग पाहून ट्रेनचा वेग जरासा कमी केला . मला वाटलं .. रुळ क्रॉस करून ती व्यक्ती फलाट क्रमांक १ वर येईल . बरेचदा लोकं ट्रेनच्या समोरून धावत जाऊन फलाटावर चढण्याचा गाढवपणा करतात हे पाहिलंय ...पण नाही .. तसं काही न घडता ..कुणाच्या काही लक्षात यायच्या आतच त्या व्यक्तीने रेल्वे इंजिनापुढे स्वतःला झोकून दिले.. एखादा कागदाचा कपटा गुंडाळला जावा तसा तो व्यक्ती अगदी काही फुटांच्या अंतरावर माझ्या डोळ्यांसमोर रेल्वे इंजिनाच्या चाकात गुंडाळला गेला... मला क्षणभर काही सुचलेच नाही.. ते भयंकर दृश्य पाहून मी माझ्या मनावर अजिबात ताबा ठेवू शकले नाही ..मी अक्षरक्षः जोरजोरात रडू लागले.. आजूबाजूचे प्रवासी माझ्या भोवती जमले.. त्यांना वाटलं की, मी त्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीला ओळखत असावी.. समोर घडलेली घटना एवढी अनपेक्षितपणे घडली होती की, बऱ्याच लोकांना कळलंच नव्हतं की, नक्की काय घडलंय ते..!
मैत्रिणी मला समजावू लागल्या की, तू कशाला अनोळखी व्यक्तीच्या मृत्यूसाठी रडतेस .. असे अपघात तर नेहमीचं घडत राहतात.. त्यांचं सांगणं काही चुकीचं नव्हतं.. मी रडत- रडतचं सांगू लागले की, मी पाच-सहा दिवसांपूर्वी हा प्रसंग जसा घडला अगदी तंतोतंत तसाच स्वप्नात पाहिलायं.. डोळ्यासमोर एका जिवंत व्यक्तीच्या आयुष्याचा अंत असा भयंकररित्या व्हावा त्याचं दुःख तर मला झालं होतंच मात्र स्वप्नात पाहीलेला अगदी तोच प्रसंग, तोच फलाट, अपघात स्थळ तेचं.. माझं रडणंही तसंच... त्याचा मला जबरदस्त धक्का बसला होता.
मला त्यावेळी काय वाटत होतं ते कुणालाही सांगून समजलं नसतं.. एक तर वयही तसं कोवळं होतं आणि भावनाही तश्या हळव्याच.. !
मला माहीत होतं की, माझ्या भावना समजून घेणारी एकच व्यक्ती आहे ती म्हणजे माझे वडील ..!
मी स्टेशनवर जे घडलं ते घरी गेल्यागेल्या वडीलांना सांगितलं.. घडलेल्या प्रसंगासारखं तंतोतंत स्वप्नं मला पडलं होतं तेही सांगितलं..
त्यांनी मला समजावलं की, घडलेल्या प्रसंगावर तुझी प्रतिक्रिया काही चुकीची नव्हती. तुझ्या संवेदनशील स्वभावामुळे तू तुझ्या भावनांवर ताबा ठेवू शकली नाहीस.. एखाद्याचा असा भयंकर शेवट पाहायला तुला लागला त्याचं दुःख तुला होणं नैसर्गिक आहे.. पण जे घडलं त्याचं आणि स्वप्नाचं जास्त मनाला लावून घेऊ नकोस..! .
पुढे बरेच दिवस मला तो प्रसंग डोळ्यांपुढे येत राहिला..२२ वर्षापूर्वी स्वप्नात पाहिलेला प्रसंग आणि आठवडाभरातच दुर्दैवी योगायोगाने वास्तवात घडलेला अगदी तसाच प्रसंग अजूनही मला जसा घडला तसा पूर्णपणे आठवतो. ते स्वप्नं आणि वास्तवातला तो प्रसंग आजही माझ्यासाठी अनाकलीय कोडं बनून राहिलयं..!
थोडं अवांतर- या प्रसंगावरून सुचलेली 'एकटी' या नावाची कथा मायबोलीवर मी लिहिली आहे ..
असे होते स्वप्नात दिसणारी
असे होते स्वप्नात दिसणारी घटना भविष्यात बघायला मिळते आणि त्या वेळेस आपल्याला पडलेले स्वप्न पण आठवते.
हे 100% खरे आहे.
पण ह्याचा काही पुरावा देत येत नाही.
रुपाली अगदी अशाच काही प्रसंग
रुपाली अगदी अशाच काही प्रसंग स्वप्नात पहिला आणि प्रत्यक्षात घडलंही . स्वप्नामध्ये पहिले कि आमच्या बाजूच्या वाड्यातला तरुण मुलगा अपघातात गेला , लोक म्हणत आहेत कि असे कसे झालेले वगैरे , रात्रीची वेळ आहे प्रचंड शोक सुरु आहे इतका मी स्वप्नामध्ये पण सहन करू शकत नव्हते . मग अचानक जाग आली , खूप घाबरले होते मी . माझे वय असेल १३-१४.
तोच प्रसंग काही दिवसांनी घडला मावशीचे मिस्टर वय त्या तरुण मुलाइतकेच , कार अकॅसिडेन्ट मध्ये रात्री गेले , तशीच वेळ लोकांची कुजबुज सर्व काही तेच. तितकाच प्रचंड शोक .. फक्त व्यक्ती बदलली .
कुणाला खोटे वाटेल पण अशी स्वप्न पडतात मला , कोणी जायचे असेल तर . मग येते प्रचंड अस्वस्थता ..
होत असे .
होत असे .
ज्यांना अनुभव येतो ते पुरावे देवू शकतं नाहीत.
आणि सायन्स कडे ह्याचे काही उत्तर नाही.
अजून आपण तंत्र ज्ञान मधील ती योग्यता हसिल केली नाही
रूपाली, खूप भाग्यवान आहात.
रूपाली, खूप भाग्यवान आहात.
तुम्ही लिहीलेला अनुभव खोटाच आहे किंवा तुमचे मत खोटे आहे असा निकाल कुणी दिलेला नाही. किंवा आता तुमचा अनुभव लिहीला तर मग अमूक तमूक गोष्टीवर बोला असे कुणी दरडावलेले नाही. ते ही लोक असे म्हणतात त्यावर तुमचे अमूल्य मत सांगा असा आदेश कुणी काढलेला नाही. किती नशीबवान आहात !
खरे तर तुमच्या अनुभवाबाबत असे असे असू शकते असे मला वाटते असे तुमच्या अनुभवाबद्द्ल आदर ठेवणारे, शक्यता मांडणारे म्हणूनच कुणालाही चालणारे वेगळे function at() { [native code] }अ सुद्धा कुणी दिले नाही. याबद्दल अभिनंदन !
मला अशी स्वप्ने पडत नाहीत. पण त्यामुळे तुमचे म्हणणे साफ खोटे आहे असे म्हणण्याचा मलाच काय कुणालाच अधिकार नाही. असे अनुभव ऐकून आहे.
इथून पुढचा प्रतिसाद स्वतंत्र आहे. कुणालाही उद्देशून नाही.
स्वप्नात आपण जी गोष्ट अनुभवलेली नाही ती दिसत नाही असा माझा अनुभव आहे. म्हणजे मी इयत्ता पाचवीत असेन तर इयत्ता दहावीचे गणित तपशिला सहीत मी स्वप्नात पाहू शकत नाही. दहावी हा शब्द मला माहीत असेल, गणित माहिती असेल तर पाचवीत असताना मी दहावीच्या गणिताच्या तासाला बसलो आहे असे पाहू शकेन फार तर. गणित कुठले हे मला स्वप्नात दिसणार नाही.
स्वप्नांबाबत ब्रिटानिका..
https://www.britannica.com/topic/dream-sleep-experience/Physiological-dr...
खुपच छान .. पन एक नक्कि आहे
खुपच छान .. पन एक नक्कि आहे जेव्हा आपण स्वप्नात असतो तेव्हा धावणे खुप कठीण होते... असा माझा अनुभव..वाचून खुप काहि relate करता आले...
छान लिहिले आहे. वर्णन शैली
छान लिहिले आहे. वर्णन शैली प्रभावी. पण शीर्षक जरा misleading वाटते. कारण स्वप्न हा अनुभव कसा म्हणता येईल?
असो. पण अशी surreal स्वप्नं अनेकदा पडतात आणि त्यातून जाग येते तेंव्हा डोके जड झालेले असते व आपणास बराच वेळ वेगळ्याच जगात जाऊन आल्यासारखे वाटत राहते. प्रतिसादातून आलेले स्वप्नानुभव सुध्दा खूपच भिडणारे.
"मला पडलेले स्वप्न" असा धागा सुरू करायचं बरेच दिवस मनात आहे. आज मुहुर्त मिळतोय का बघू.
आणि सायन्स कडे ह्याचे काही
आणि सायन्स कडे ह्याचे काही उत्तर नाही.
>>>>
सायन्सकडे सगळी उत्तरे आहेत. फक्त त्या उत्तरापर्यंत आपण पोहोचलो नाहीत
मार्गी, तुमचा लेख तुम्ही खूप
मार्गी, तुमचा लेख तुम्ही खूप छान लिहिलायं हे मागच्या प्रतिसादात लिहायचं राहिलं.
अनुभव समजून घेतल्याबद्दल आचार्य धन्यवाद..!! लिंक मधला लेख अर्धा वाचला .. पूर्ण वाचते नंतर..!
मला आजही जेव्हा तो प्रसंग आठवतो तेव्हा तो एक दुर्दैवी योगायोग आपल्याबाबतीत घडला होता हेच मी स्वतःला समजावते..
अजून एक गोष्ट म्हणजे त्या ट्रेनने मी रोज प्रवास करायचे नाही. कॉलेज सुटल्यावर एका CA firm मध्ये trainee म्हणून जायचे. १४ ऑगस्ट हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पालघर शहरात दरवर्षी साजरा करतात .. त्यादिवशी ऑफीसला सुट्टी होती म्हणून मी लवकरच्या ट्रेनने मैत्रिणींसोबत घरी परतत होते.. कदाचित मी त्या ट्रेनने गेले नसते तर तो प्रसंग माझ्या डोळ्यांसमोर घडलाही नसता..
अपघाताच्या घटना ऐकून , बघून मनात भीती बसल्याने तसं भयानक स्वप्न मनाने पाहिलं.. हे मी जाणून आहे.
स्वप्नात पाहिलेला प्रसंग जर एक - दोन महिन्याने प्रत्यक्षात डोळ्यांसमोर घडला असता तर त्याचं कदाचित मला हळहळीशिवाय काही वाटलंही नसतं.. अपघात तर नेहमीच घडतच राहणार अशी मनाची समजूत घातली असती.. मात्र ध्यानीमनी नसताना आठवड्याच्या आत तो भयंकर प्रसंग डोळ्यांसमोर घडला.. स्टेशन तेच कारण मी रोजच तिथून प्रवास करायचे.. अपघात ज्या प्रकारे घडला , ज्या जागी घडला जसं मी स्वप्नात पाहिलं होतं आणि माझं रडणं.. ह्या तीन गोष्टीत साम्य असल्याने मला त्याचा मानसिक धक्का बसला होता .. हे मात्र खरं..!!
स्वप्न रोजच पडतात .. मला कधी- कधी कंटाळा येतो त्याचा.. वाटते की मेंदूला झोपेत तरी शांतता लाभतेयं की नाही ..??
बरं अजून एक बहुतेक स्वप्नं ब्लॅक अँड वाइट रंगात दिसतात .. शक्यतो रंग दिसत नाहीत.. !
मार्गी यांना पडलेलं स्वप्न
मार्गी यांना पडलेलं स्वप्न अगदी दीर्घ आहे. एवढ्या वेळात त्यांना कुणी जागं केलं नाही किंवा जाग आली नाही याचं नवल वाटलं.
ज्या गोष्टींबद्दल काळजी करायची सवय लागलेली असते त्या स्वप्नात दिसणे यात काही नवल नाही. पण ज्यांचा अर्थ कळत नाही अशी स्वप्न -
निल्सन यांनी म्हटल्यासारखं आपल्या अंगावर कपडे नाहीत असं स्वप्न बरेचदा पडलंय. फक्त त्यात कंबरेवरचे कपडे घातलेले असतात. आणि खालचे गायब असतात . स्वप्नात आजूबाजूला असलेल्या लोकांचं मात्र त्याकडे लक्ष नसतं. तसंच आपण बाहेर अनवाणी आहोत आणि चपला मिळत नाहीएत हे स्वप्न अनेकदा पडलं आहे.
फक्त त्यात कंबरेवरचे कपडे
फक्त त्यात कंबरेवरचे कपडे घातलेले असतात. आणि खालचे गायब असतात >> शाळेत असताना खूपदा पडायचं हे स्वप्न. स्वप्नात जेव्हा लक्षात यायचं तेव्हा गडबड व्हायची.
खूप वर्षांनी गप्पांच्या ओघात भोपाळ च्या विनय मिश्रा या मानसशास्त्रज्ञ मित्राशी या विषयावर बोललो. त्याने खूप प्रश्न विचारले तेव्हा त्या प्रश्नातच उत्तर लक्षात येत गेलं.
लहानपणी वेंधळा होतो. त्यावरून आईची बोलणी खाल्ली आहेत. आईचा विश्वास नसल्याने रोज शाळेत जाताना सर्व वस्तू, वही पुस्तके यांची यादी कन्फर्म करून घ्यायची. त्याचा परिणाम म्हणून आत्मविश्वास काहीसा कमी होता. हे एक कारण असू शकतं असं स्वप्न नेहमी पडण्याचं.
परीक्षा चालू आहे आणि उशिरा पोहोचलो हे तर ठरलेलं स्वप्न. पण हे खूप जणांनी पाहिलेलं स्वप्न होतं. जाल आल्यावर समजले कि हे कॉमन स्वप्न आहे. याचं त्याने दिलेलं उत्तर आता विसरलो.पण गुगलने सांगितलं कि काही गोष्टींवरच नियंत्रण सुटणे, आपल्या कामाची / आपली कदर होत नाही/ तब्येतीची विशिष्ट तक्रार यामुळे हे स्वप्न पडतं. असंच काहीसं त्याने सांगितले होतं. पण ते आवडलं / पटलं नाही. तरी हे लोक टेस्ट कसे घेतात. नव्या टेस्ट्स कसे डिझाईन करतात, सॅंपल हे जवळून पाहिले होते. थेट रिलेशन प्रस्थापित होत नसल्याने मन स्विकारत नाही ईतकेच. यात माझा अभ्यास कमी असल्याने तसे होते.
आताचे मोबाईल त्यावेळेस असते तर ते गप्पाष्टक रेकॉर्ड करता आलं असतं.
हे अंगावर कपडे नसण्याचे
हे अंगावर कपडे नसण्याचे स्वप्न मला जरा वेगळ्या स्वरुपात पडते.
म्हणजे माझ्या एखाद्या प्रिय व्यक्तीच्या अंगावर कपडे नाहीयेत. आणि कोणाला लक्षात यायच्या आधी मी त्यांच्या लज्जा निवारणासाठी धडपड करत आहे. कदाचित मी प्रिय व्यक्ती बाबत पझेसिव्ह आहे किंवा असेल.
स्वतः बाबत मात्र कधी असे स्वप्न पडले नाही. किंवा पडले असले तरी दचकलो नाही. कदाचित स्वताबाबत मी नग्नतेचा फार बाऊ करत नाही हे एक कारण असावे.
खरेतर मानवी भावभावना आणि
खरेतर मानवी भावभावना आणि मेंदूचे कार्य अजूनही पूर्णपणे उलगडलेले नाही, त्यात स्वप्नांचा विचार म्हणजे मनाच्या अथांग डोहात उतरून तळ गाठणे होईल. मानवी अंतर्मन आणि भावभावना यामुळे स्वप्ननिर्मीती होत असावी. एकंदरीत पडलेले स्वप्न आपल्या अंतर्मनाचा वर येऊ घातलेला बुडबुडा म्हणता येईल.
स्वप्नातील कालावधी हा जलद गतीने पुढे जातो त्यामुळे केवळ ५ मिनिटांच्या स्वप्नातही आपण १ ते २ तास सहजपणे रमतो. काहीजणांची हा कालावधी कमी जास्तही असू शकतो किंवा प्रत्येकवेळी स्वप्नांचा वेळ वेगवेगळा असू शकतो.
मलाही अनेकदा भीतीदायक स्वप्ने पडलेली आहेत. स्वप्नात जवळच्या व्यक्तीचे आपल्यासमोर अंत किंवा वाईट परिस्थिती, दंगल किंवा दंगल सदृश परिस्थितीत अडकलो आहे, उजाड ओसाड माळरानातून कोणीतरी मागावर आहे, निर्जन रस्त्यावरून जात आहे आणि त्यातून मार्ग सापडत नाही. The Grudge आणि राज चित्रपट बघितल्यावर रात्रभर भुतांची स्वप्ने येत होती.
मला पडणारी स्वप्ने
१) परत शाळेत/कॉलेजात जात आहे.
२) परीक्षेला बसलेलो आहे, प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका हातात आहे आणि काहीच अभ्यास झालेला नाही.
३) परत जुन्या कंपनी/ऑफिसमध्ये काम करत आहे.
४) उंचावरुन उडी मारली आहे पण जमिनीवर पाय टेकायच्या आधी हवेत हळूहळू तरंगत जात आहे.
५) हयात नसलेल्या व्यक्ती स्वप्नात येणे.
६) बसने/रेल्वेने दुसऱ्या गावी जात आहे किंवा दुसऱ्या गावाहून येत आहे, परंतु कधीही ईप्सित स्थळी पोहचलो नाही. समुद्रप्रवास आणि विमानप्रवासचा अनुभव नसल्याने त्याची स्वप्ने पडली नाहीत. फक्त विमानात बसेपर्यंत स्वप्न पडले आहे, पण विमानाने अजूनपर्यंत उड्डाण केले नाही.
७) हातातील काम अपुरे राहिल्यास स्वप्नात काम पूर्ण केले आहे. (ऑगस्ट केकुले या शाश्त्रज्ञाला स्वप्नात बेंझिनचा फॉर्मुला सापडला होता)
मी जेंव्हा कॉलेज मध्ये होतो
मी जेंव्हा कॉलेज मध्ये होतो तेंव्हा एका रात्री मला एक स्वप्न पडलेले की मी रात्रीचा एका भागातून (तो भाग आमच्याच एरियातला आहे ) जात आहे. तिथे एक एका चारपाई वर कुणीतरी गोधडी घेऊन झोपलेले आहे नि मी त्याला उठवायला जाताच चारी बाजुनी अंधार दाटून येत त्या झोपलेल्या कुणी मला गच्च पकडले(कुणी तरी अमानवीय शक्तीने)....कितेही प्रयत्न करून सुटका नाही झाली शेवटी जाग आली. पुन्हा काही आठवड्यांनी मला तेच स्वप्न पडले....अगदी सेम जसेच्या तसे....घामाघूम आणि जाग. जेंव्हा मी थोडा विचार केला स्वप्नाच्या आदल्या दिवशी काय घडलेले त्याचा तंव्हा माझ्या एक पॅटर्न लक्षात आला.
आमच्या इथे एक तबेला होता, त्याच्या बाजूला चाळ होती मध्ये एक अरुंद बोळ होता. चाळीच्या आणि तबेल्याच्या पाठच्या बाजूला मोठा नाला होता आणि पुढच्या बाजूला मैदान होते. आम्ही दर रविवारी दुपारी तिथे क्रिकेट खेळायचो. मधेच लघवीला लागल्यावर त्या नाल्यावर जायचो. त्या तबेल्याला चिटकूनच नाल्याच्या काठावर एक शेगलाचे झाड होते. मी त्या झाडाबाजूला मूत्रविसर्जन केले होते, दोन्ही दिवशी. पुढच्याच आठवड्यात रविवारी मी तिसऱ्यांदा पुन्हा त्याच झाडाखाली मूत्रविसर्जन केले आणि तेच स्वप्न पुन्हा पडले....नंतर जेंव्हा मी माझा मित्रांसोबत ही गोष्ट शेअर केली तेंव्हा त्यापैकीही काहींना या प्रकारचा अनुभव (सेम स्वप्न नाही, पण तसेच अमानवीय घाणेरडे स्वप्न) आल्याचे लक्षात आले पण तोवर त्यांना शेगलाच्या झाडाची लिंक ध्यानात नव्हती आली.
त्यानंतर मी कधी तिथे मूत्रविसर्जन केले नाही... सरळ नाल्यात करायचो , आणि त्या नंतर मला ते स्वप्नही कधी पडले नाही.
अशा प्रकारचा अनुभव कुणाला कधी आला आहे का?
उंचावरुन उडी मारली आहे पण
उंचावरुन उडी मारली आहे पण जमिनीवर पाय टेकायच्या आधी हवेत हळूहळू तरंगत जात आहे.>> हे स्वप्न मला खूपदा पडते, मी उंच इमारती वरून खाली उडी मारतो पण मला बिल्कुलही दुखापत होत नाही . अगदी कॉन्फिडन्टली...स्टूलावरून उडी मारावी त्या सहजतेने उडी मारतो.....वारंवार वेगवेगळ्या इमारतींवरून.
स्वप्नात पण लोकांना नवीन
स्वप्नात पण लोकांना नवीन आयडिया सुचल्या आहेत.
आणि त्या आयडिया चे नंतर शोधात रूपांतर झाले आहे असे वाचनात आल्याचे आठवत आहे.
गौतम बुद्ध ना वट वृक्ष खाली दिव्य ज्ञान प्राप्त झाले .
ह्याचा नक्की काय अर्थ असावा.
तेच मापदंड माझ्या वरील वाक्याला लावावेत
स्वप्नातील कालावधी हा जलद
स्वप्नातील कालावधी हा जलद गतीने पुढे जातो त्यामुळे केवळ ५ मिनिटांच्या स्वप्नातही आपण १ ते २ तास सहजपणे रमतो. >> अगदीच सहमत आहे. खूप वेळा असे होते पण झोप अर्धा तास पण नसते झालेली.
सच्चा यांचा प्रतिसाद बहुतांशी रिलेट झाला.
(खेळीया तुमचा प्रतिसाद हे लिहीत असताना आला. बघतो. जस जसे प्रतिसाद येताहेत तसतशी विस्मरणात गेलेली स्वप्ने आठवत आहेत.
३) परत जुन्या कंपनी/ऑफिसमध्ये
३) परत जुन्या कंपनी/ऑफिसमध्ये काम करत आहे.>> खूप वर्षे भाड्याच्या घरात राहत होतो. बालपण तिथेच गेल. ते सोडल्यावर खूप वर्ष त्या घरात रहायला आल्याचं स्वप्न पडत असे. नंतर त्या कॉलनीतल्या दुसऱ्या घरात रहायला गेल्याचे स्वप्न अधून मधून पडायचे. जुन्या घराशी असलेली अटॅचमेंट निवळल्याचे लक्षण. पण ती कॉलनी, तो परीसर अजून स्वप्नात येतो. मित्र दिसत नाहीत. सगळे अनोळखी असतात स्वप्नात.
कारण नियमित त्या भागात जायचो. हळूहळू सगळे मित्र कुठे कुठे रहायला गेले. एकदा एकाने कोण पाहिजे म्हणून विचारले तेव्हा एव्हढे उदास वाटत होते..
झोपेत छातीवर भूत बसणे : स्लिप
झोपेत छातीवर भूत बसणे : स्लिप पॅरॅलिसिस
https://www.bbc.com/marathi/articles/cx70g45qnxzo?fbclid=IwAR2TA4m9Ku-8b...
हे छातीवर भूत वालं स्वप्न
हे छातीवर भूत वालं स्वप्न तुळईखाली झोपल्यावर विशेष पडतं म्हणे.म्हणजे झोपून वर पाहिल्यावर जी कोंदट, छातीवर दडपण आल्याची भावना येते त्यामुळे असावे.
छातीवर हात ठेवून झोपल्यावर
छातीवर हात ठेवून झोपल्यावर सुद्धा पडत असावे. नक्की माहीत नाही. पण मला तरी ते दडपण आवडतं नाही.
पोरांचे झोपेत हात छातीवर दिसले तरी मी उचलून बाजूला घेतो.
स्वप्नातील कालावधी हा जलद
स्वप्नातील कालावधी हा जलद गतीने पुढे जातो त्यामुळे केवळ ५ मिनिटांच्या स्वप्नातही आपण १ ते २ तास सहजपणे रमतो. >> येस्स. गणपतीच्या दिवशी किंवा घरी जास्त पाहूणे येणार असतील तेव्हा भरपूर स्वयंपाक करायचा असतो त्यावेळेस सकाळचा लवकरचा अलार्म लावून ठेवते. अलार्म झाल्यावर ५ मि. साठी snooze केल्यावर त्या ५ मि. मी संपूर्ण स्वयंपाक ते पण प्रत्येक लहानसहान स्टेपसहीत पूर्ण केल्याचे स्वप्न पडते.

हे स्वप्न मला प्रत्येकवेळेस पडतेच पडते. काश तो स्वप्नात बनविलेला स्वयंपाक प्रत्यक्षात तयार असता
स्वप्नांना वाय फाय बसवणारी
स्वप्नांना वाय फाय बसवणारी माणसं
Pages