प्रवास हिंदी चित्रपट संगीताचा

Submitted by प्रथमेश काटे on 22 June, 2023 - 06:53

Part 1

( हा लेख दोन तीन भागात अपलोड केला जाईल. आणि हा लेख मला असलेली माहिती आणि माझी मते यांवर आधारित आहे. यात मला ज्या गायक, गीतकार, संगीतकारांबद्दल माहिती आहे, त्यांचाच उल्लेख केला आहे. आणि जे कलाकार खास आवडतात, भावतात त्यांच्याबद्दलच थोडं विस्ताराने लिहिले आहे. )

१९४२ ला मन्ना डे यांनी आपल्या गायन कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर काही काळाने हळूवार मोहम्मद रफी ऐकू येऊ लागले. १९४९ सालच्या ' महल ' चित्रपटातील ' आयेगा आनेवाला ' या गाण्यापासून लतादीदींच्या कारकिर्दीची यशस्वी घोडदौड सुरू झाली होती.

५० चे दशक सुरू झाले, आणि ' आवारा हूं ' म्हणत मुकेशनेही दणक्यात एन्ट्री घेतली. आणि मला वाटतं इथूनच हिंदी चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ सुरू झाला‌. ' या दशकातच शंकर - जयकिशन, ओ पी नय्यर, हेमंत कुमार यांसारख्या उत्कृष्ट संगीतकारांच्या, साहिर लुधियानवी, हसरत जयपूरी, इंदीवर इ. प्रतिभावंत गीतकारांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. मन्ना डे ( प्यार हुआ इकरार हुआ है, तू प्यार का सागर है इ. ) मोहम्मद रफी ( सर जो तेरा चकरायें, उडीं जब जब जुल्फें तेरी इ. ) लतादीदी मंगेशकर ( मेरा दिल ये पुकारे आजा, अपलम चपलम, ramaiya vastavaiya इ. ) यांसारख्या गायकांना शब्द सौंदर्याने नटलेली, श्रवणीय, सुरेल चालींनी सजलेली आधिक उत्तमोत्तम गीते मिळू लागली. आणि या महनीय गायकांनी आपल्या सुमधुर आवाजात ही गीते गाऊन त्यांची शोभा वाढविली‌.

प्रत्येक गायकाचे आपलं एक वैशिष्ट्य होतं. मन्ना डे यांचं गायन शास्त्रशुद्ध, शब्दोच्चार स्पष्ट असत. मुकेशच्या आवाजात करूणता, तरलता असे. Emotional songs आणि मुकेश असं जणू समीकरणच बनून गेलं होतं. मात्र याच दशकात " मेरा जूता है जपानी " सारखं अॅटीट्यूड दर्शविणारं मजेशीर गीत, "जीना इसी का नाम है " सारखं जीवन कसं जगावं हे शिकवत ओठांवर हलकंसं हसू फुलवणारं गाणं गाऊन आपण कुठल्याही एका विशिष्ट चौकटीत राहणारे गायक नाही हेही त्यांनी दाखवून दिलं.
मोहम्मद रफींचं गाणं म्हणजे निखळ गोडवा. प्रत्येक ओळीला, प्रत्येक शब्दाला हळूवारपणे, प्रेमळपणे गोंजारल्या सारखं गाण्याची त्याची शैली, आणि त्याचा सुमधुर आवाज मुग्ध करून टाकतो. " सर जो तेरा चकराये " सारख्या गाण्यात सुद्धा त्यांनी जो गोडवा ओतला आहे तो अगदी लाजवाब आहे.

लतादीदींबद्दल बोलावं तितकं कमीच. कुठल्याही प्रकारातलं गाणं असो ते त्यांच्या आवाजात चपखल बसायचं. सुरांशी, तानांशी त्या सहजगत्या खेळायच्या.

दशकाच्या शेवटाला किशोरकुमार नामक एका तरूण, हरहुन्नरी गायकाचा उदय होऊ लागला होता. आणि ६० च्या दशकात त्यांचा अधिकच उत्कर्ष झाला. गाण्याचं कुठलंही प्रशिक्षण न घेताही इतर नावाजलेल्या गायकांसमोर कुठेही कमी न पडता त्यांनी आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. " हाल कैसा है जनाब का, एक लडकी भिगीं भागी सी " सारखी अवखळ, स्वच्छंदी गाणी असोत, " मेरे मेहबूब," सारखे emotional song असो किंवा " मेरे सामने वाली खिडकी में, " " कोरा कागज था ये मन मेरा," " वोह शाम कुछ अजीब थी " इत्यादी सुंदर भावगीते असोत सर्व श्रेणीतील गाणी पूर्ण न्याय देऊन गात त्यांनी सुरुवातीच्या काळातच आपली versitality दाखवून दिली.
दरम्यान लक्ष्मीकांत - प्यारेलाल या संगीतकार जोडीने पदार्पण केलं. आणि लवकरच दर्जेदार, नितांतसुंदर अशा गीतांची निर्मिती करत आपली चुणूक दाखवायला सुरुवात केली. याच दशकात आर. डी. बर्मन सारख्या अत्यंत ब्रिलियंट, प्रयोगशील आणि क्रिएटिव्ह संगीतकारानेही संगीतसृष्टीत पाऊल टाकले. ते दैनंदिन वापरातील वस्तूंमधून धून तयार करून त्याचा आपल्या गाण्यांमध्ये एखाद्या वाद्याप्रमाणेच खुबीने वापर करीत. ( उदा. मेरे सामने वाली खिडकी में या गाण्यात कंगव्याच्या दातांनी तयार केलेली धून ) त्यांनी काही मोजकी गाणी गायली देखील आहेत. त्यांच्या जराशा वेगळ्या Texture च्या आवाजाचीही पुढे क्रेझ निर्माण झाली.

क्रमशः
प्रथमेश काटे

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

आणि हे घ्या अजून एक.
दिया जलाकर आप बुझाया नूरजहा चे अवीट गाणे. आणि संगीतकार कोण? अपना आपला नूरजहा भक्त Datta Korgaonkar! ह्या महान माणसाने नूरजहा पाकिस्तानात गेल्यावर संगीत सोडून दिले.
https://www.youtube.com/watch?v=FfIUxAX8h8k&ab_channel=SunehreGeet

१९६९ पर्यंत किशोर कुमार ए लिस्टर नव्हता असं म्हणणं त्याच्यावर अन्याय करणारं ठरेल असं मला वाटत होतं. लतारफीमुकेशची तोपर्यंतची गाणी चित्रपटाच्या नावासकट जशी लक्षात राहिली आहेत, तशी किशोरकुमारची आठवायचा प्रयत्न केला. मग बिनाका गीतमालाच्या टॉप गाण्यांच्या याद्या पाहिल्या. १९ ६०-६३ पर्यंत त्याचं एखादंच गाणं टॉप ३२ मध्ये होतं. तेही बहुधा तळाला. १९६४ मध्येही एकच - मेरे मेहबूब कयामत होगी हे सहाव्या पायरीवर होतं. ते त्याच्याच चित्रपटातलं. १९६५ मध्ये तीन देवियाँ मधली दोन द्वंद्वगीतं आणि त्याच्या चित्रपटातली आणखी दोन गीतं आहेत. १९६६ मध्ये गाता रहे मेरा दिल दुसर्‍या आणि प्यार किए जा चं टायटल साँग खाली. १९६७ मध्ये एकही गाणं नाही. १९६८ मेरे सामनेवाली खिडकी में दुसर्‍या आणि ज्वेल थीफमधलं ये दिल न होता बेचारा हे खाली. १९६९ मध्ये एकदम ४ गाणी. त्यातली दोन आराधनामधली आणि प्यार हुआ है जबसे मुझको नही चैन आता तसंच तुम बिन जाऊं कहाँ . मग १९७० मध्ये एकदम ९ गाणी. यातही आराधना आहे.

१९६९ मध्ये पहिल्यांदा तो स्वतः किंवा देव आनंद ( राजेश खन्नाही) यांच्याव्यतिरिक्त अन्य नायकांसाठी त्याचा आवाज असलेली गाणी गाजली.

यामागे आवाज नायकाला शोभणं, संगीतकार यांच्यापेक्षाही कोणत्या प्रकारची गाणी बनत होती हा मुद्दा आहे. तोवर गाणी बर्‍यापैकी अर्थपूर्ण, गहन , काव्यात्म शब्द असलेली, कदाचित उर्दूची भर असलेली होती. नंतरची गाणी बोलाचालीच्या भाषेत अधिक आहेत (आनंद बक्षींमुळे?) ७० च्या दशकापासून शंकर जयकिशन, ओ पी, एस डी मागे पडून आर डी, लक्ष्मीकांत प्यारेलाल, कल्याणजी आनंदजी पुढे आले. यांच्या संगीताचा बाज वेगळा. चित्रपटांमध्येही फरक पडला. देव राज दिलीप जाऊन नायकांचीही नवी पिढी आली.हे सगळे बदल किशोरच्या पथ्यावर पडले.
त्याने स्वतः काही गंभीर गाणी बनवून - क्वचित लिहूनही गायली ( कोई हमदम न रहा, दूर का राही, दूर गगन की छाँव में या चित्रपटांतली) . तरीही इतर संगीतकारांना तोवर अशा गाण्यांसाठी अन्य पर्याय अधिक रुचत होते.
हे म्हणणे स्पष्ट करायला एक उदाहरण देतो- तीन देवियाँ मधलं अरे यार मेरे तुम भी हो गजब किशोर गायला. तर कभी बेखयाल हो कर ही गझल रफी. गाइडमधलं गाता रहे मेरा दिल हे किशोरचं तर तेरे मेरे सपने अब एक रंग है, दिन ढल जाए हाए शाम न जाए आणि क्या से क्या हो गया ही अधिक सोलफुल ,आव्हानात्मक गाणी रफीची.

आणखी एक. वर मुकेश, रफी, किशोर कधी मरण पावले याची नोंद आली आहे. त्या काळात हिंदी चित्रपट संगीताची घसरण सुरू झाली होती. त्यामुळे रफी , मुकेशची ऐकवत नाहीत (हे अर्थात सापेक्ष आहे) अशी गाणी क्वचित मिळतील. पण किशोरची मात्र बरीच निघतात. खै के पान बनारसवाला कितीही लोकप्रिय असो. किशोर त्या गाण्याबद्दल काय बोलला होता? ऐकली नाहीत तरी चालतील अशी तर भरपूरच. अर्थात त्याची सोलफुल गाणीही आहेत. राजेश खन्ना - आर डी - किशोर या त्रिकुटाने दिलेली गाणी आधीच्या दशकांतील गाण्यांच्या तोडीस तोड आहेत.

अरे सज्जादच्या खूप खऱ्या खोट्या गोष्टी आहेत . पण उगाच माझ्या घरावर मोर्चा यायला नको. म्हणून नाही लिहित.

सज्जाद चा फक्त फटकळपणा लक्षात रहावा हे दुर्दैवी आहे. ‘यह हवाँ, यह रात यह चाँदनी’, ‘यह कैसी अजब दास्ताँ हों गयीं हैं’, ‘बदनाम मोहब्बत का’ सारखी त्याची अवीट गाणी सुद्धा आहेत.

“ त्या काळात हिंदी चित्रपट संगीताची घसरण सुरू झाली होती. ” - साधारण राजेश खन्नाचा अस्त आणि अमिताभ च्या अँग्री यंग मॅनचा उदय ह्या काळात हिंदी सिनेमात गाण्यांचं महत्व कमी होत गेलं. साहीर, राजेंद्र कृष्ण, शैलेंद्र, हसरत, क्वचित कैफी आझमी वगैरे गीतकारांची जागा आनंद बक्षी आणि मदन मोहन, ओ. पी., एस.डी., शंकर जयकिशन, च्या जागा लक्ष्मीकांत-प्यारेलाल, कल्याणजी आनंदजी, आर.डी. ह्यांनी घेतल्याचा ट्रान्झिशनचा काळ होता तो.

अर्थपुर्ण, गहन गाणी किशोर कुमारच्याहि वाट्याला आली. "मेहबुब कि मेहंदि" हे एक उत्तम उदहरण. यातलं "इतना तो याद.." हे रफिचं (लताबाईंच सुद्दा) गाणं जेव्हढं हृदय पिळवटणारं आहे, त्याच तोडिचं "मेरे दिवाने पन कि.." हे किशोर कुमारचं आहे. "खामोशी" मधल्या "वो शाम, कुछ.." बाबतीत तर बोलायलाच नको...

सज्जाद चा फक्त फटकळपणा लक्षात रहावा हे दुर्दैवी आहे>>> अस नाहिये.
हा तर तलत गातोय . त्याच्या मते गलत तलतचा गलत केव्हा झाला?
https://www.youtube.com/watch?v=XHs3O4f516I

मेहबूब की मेहंदी मुस्लिम सोशल. मेरे मेहबूबशी तुलना केली तर काय होईल? म्हणूनच म्हटलं की १९७० पासून चित्रपटांचा रोख बदलला. गीत संगीताला उतरती कळा लागली. गोल्डन पिरियड १९५० ते १९७० मानतात.
(टीप - नंतरचं सगळं संगीत टाकाऊ आहे, असं नाही. त्यातही हिरेमाणकं आहेत. पण एकंदर ट्रेंड, अ‍ॅव्हरेज इ. आधीच्या काळातही कचरा असेलच. पण पुन्हा ओव्हरऑल.

किशोरचा आवाज "किसी दूर खडे हुए आदमी को बुलाने की लिए ठीक है" म्हणणारा सज्जादच का? खय्यामलाही तोच बहुधा "वो तो पहाडसे उतराही नही" म्हंटला होता. Happy लताच्या आवाजात "दाल भात की बू" म्हणणारा दिलीप कुमार ना? नंतर त्याचे मत पूर्ण बदलले म्हणा.

किशोरला प्रि-१९६९ मधे ए लिस्टर म्हणणे जरा सब्जेक्टिव्ह आहे. रफी, मुकेश, मन्ना डे यांना विविध संगीतकार व विविध नायक यांच्या प्ले बॅक करता ५० व ६० च्या दशकात वापरले गेले. तसे किशोरचे झाले नाही. फक्त बर्मन पितापुत्र व फक्त देव आनंद. अगदी थोडे अपवाद आहेत - प्राचीन काळी राज कपूरकरता सुद्धा गायला आहे असे वाचले होते - ते गाणे पूर्वी सापडले नाही. आता नेटवर कोठे असेल तर कल्पना नाही. पण अशी एखाद दुसरीच उदाहरणे आहेत.

पण आरडी बर्मनने लेट ६०ज मधे त्याचा वापर करायला सुरूवात केली. आणि मग आराधनानंतर सगळे बदलले. मग बर्मन पितापुत्रांबरोबरच ७० मधले लीडिंग संगीतकार - लक्ष्मी-प्यारे, कल्याणजी-आनंदजी, खय्याम, राजेश रोशन, सलील चौधरी - नंतर बप्पी लाहिरी - या सर्वांकडे तो गायला. इव्हन शंकर जयकिशन जोडीने त्याचा वापर केला - राजेश खन्ना व रणधीर कपूर करता. ७०ज मधे मुख्य हीरोकरता किशोर व इतरांकरता रफी, शैलेन्द्र सिंग वगैरे वापरले जात.

हे सगळे वाचलेल्या माहितीवरून व हा काळ पाहिलेल्या लोकांकडून जे ऐकले आहे त्यावरून.

भरत,
जेव्हां गाडी तिथ पर्यंत येइल तेव्हा बोलूच.

किशोरकुमार चित्रपटात येण्याचे कारण त्याचे ज्येष्ठ बंधू अशोककुमार हेच होते. किशोरची पहिली आवड गाणे हीच होती.
सचिन देव बर्मन यांनी प्रेमविवाह केल्यावर त्यांना घर सोडून मुंबईला पळून यावं लागलं. त्या वेळी अशोककुमार, हेमंतकुमार यांनी त्यांना मदत केली.
बहुधा अशोककुमार यांच्या घरी ते काही दिवस राहीले होते.

बर्मनदांची आणि मुंबईत आलेल्या बंगाली कलाकारांची थेट कोलकात्यापासून ओळख होती. त्यांच्या दरबारात ( ते राजे होते) हेमंतकुमार आपली कला पेश करत असत. मुंबईत या कलाकारांनी जशी एसडींना मदत केली तशीच अन्य काही बंगाली दिग्दर्शक, अभिनेत्यांनाही मदत केली.
त्यांच्यात असे घरगुती संबंध असल्याने जेव्हां किशोर अशोककुमार यांच्याकडे मला गायक व्हायचंय म्हणून आला तेव्हां त्यांनी त्याला एसडींकडे नेलं आणि आजपासून माझा भाऊ तुमच्या ओट्यात टाकला आहे असे ते म्हणाले. ( शक्य झाल्यास किशोर कुमार एसडींबद्दल भावुक होऊन बोलतानाचा एक युट्यूब व्हिडीओ आहे, तो मिळवून ऐका).

एसडींनी त्याची जबाबदारी घेतली. त्याची गाण्याची शैली ही तेव्हांच्या हिंदी चित्रपटांसाठी योग्य वाटत नव्हती. पण एसडींनी दिलेला शब्द पाळला. आर डी आणि किशोर मधे भावाचं नातं निर्माण झालं. आरडी खूपच प्रतिभाशाली होता.

किशोरच्या आवाजाला लोक नाके मुरडत. एक शिक्षक होते ते म्हणत कि किशोरकुमारचा आवाज डब्यात खडे टाकून हलवल्यासारखा आहे. आरडीने तिसरी मंझिलचं संगीत दिलं तेव्हां अनेकांनी हे कसलं संगीत म्हणून नाकं मुरडली होती. रफी ऑल राऊंडर होता. तिसरी मंजील असो कि दिन ढल जाये असो कि ये दुनिया अगर मिल जाये असो, कोणतंही गाणं तो जिवंत करत असे.

रफीला नाही म्हणता यायचं नाही. यामुळे त्याने रडकी, बेचव गाणी गायली. किशोर कुमार अशा गाण्याला नकार देत असे. तो पैसेही दाबून घेत असे. रफी थोडा भिडस्त होता. तुम्ही जे द्याल ते पासून पैसे नाहीत म्हटल्यावर राहू दे असे रफीचे वागणे होते. त्यामुळे अडले नडलेले संगीतकार रफीकडे आपले गाणे घेऊन जात. एखादेच लक्ष्मी प्यारे सारखे असत. बाकीच्या ८०% संगीतकारांची गाणी सुमार असत. सतत कानावर आवाज पडत राहिल्याने रफीच्या गाण्याचं अप्रूप वाटेनासं झालं होतं.

तिसरी मंजिल पासून संगीत बदलायला लागलं. आरडीचा जमाना सुरू होत होता. आराधना च्या वेळी आरडी रेकॉर्डिस्ट आणि सहाय्यक संगीतकार म्हणून काम करत होता. रफीने दोन गाणी गायली आणि हजला जाण्यामुळे बाकीची राहिली होती. हज वरून आल्यावर सुद्धा रफीने कुणाच्या तरी सांगण्यावरून चित्रपट संन्यास घेतला अशी अफवा पसरलेली होती. आरडीने मैत्री मुळे कि या अफवेमुळे याची कल्पना नाही, पण आराधना मधले रफीचे एक गाणे कापले, दुसरे गाणे किशोरच्या आवाजात गाऊन घेतले. कापलेले गाणे पुढे अन्य चित्रपटात वापरले.

किशोरच्या आवाजात गायल्यामुळे ते गाणे चित्रपटात आधीच्या राजेश खन्नावर घेतले गेले.
या वेळी गाण्यातला आशय, गायकी हे मागे पडत चालले होते. दणदणाटी ( जे आज तसे वाटत नाही) संगीत येत चालले होते. त्या वेळचे दिवाळी अंक काढले तरी आरडी वर कसे विनोद असायचे हे समजून येईल.

किशोर कुमारची तीच स्टाईल या काळात अगदी अचूक ठरली. तो स्वतः अभिनेता असल्याने , तसेच त्याच्या अंगात लय असल्याने विनोदी ढंगाची, उडत्या चालीची गाणी तो अक्षरशः जिवंत करत असे. ती म्हणायला सुद्धा सोपी असायची. एके काळी मन्नाडे, तलत हे गायला अवघड म्हणून ंमागे पडले आणि रफी सोपा वाटला होता. आताच्या काळात रफीचे गाणे गायला अवघड वाटू लागले. किशोरची गाणी सर्वसामान्यांना म्हणायला सोपी , आरडीचं संगीत आधुनिक वाटणे असे सगळेच फॅक्टर्स जुळून आले.

सुपरस्टार्स व्हॉईस तर होताच. .....
( अनिल विश्वास यांनी रफीचा आवाज भीक मागणार्‍या भिकार्‍यासारखा आहे असे म्हटले होते. जुन्या खोंडाच्या मान्यता !)

दम लागला.

आनंद बक्षी आणि मदन मोहन >>> फेफ - हे आधी संदर्भ सोडून असे एकत्र वाचले आणि विचारात पडलो Happy

ये हवा ये रात ये चाँदनी बद्दल सहमत. याच चालीवर असलेले "तुझे क्या सुनाऊ मै दिलरूबा" ऐकले की ते पहिले फार भारी वाटते. (आणि तुझे क्या सुनाऊ "पाहिल्यावर" जास्तच Happy )

"मेहबुब कि मेहंदि" हे एक उत्तम उदहरण. यातलं "इतना तो याद.." हे रफिचं (लताबाईंच सुद्दा) गाणं जेव्हढं हृदय पिळवटणारं आहे, त्याच तोडिचं "मेरे दिवाने पन कि.." हे किशोर कुमारचं आहे. >> याचे अगदी सिमिलर उदाहरण म्हणजे दो रास्ते. "मेरे नसीब मे ऐ दोस्त तेरा प्यार नही"

मात्र मला "जाने क्यों लोग मोहब्बत किया करते है" खूप आवडते. आनंद बक्षीने जरा मेहनत घेउन लिहीलेली गाणी खूप नाहीत. पण हे नक्की आहे.

फारेण्ड, किशोर कुमार प्रि १९६९ ए लिस्टर नव्हता या तुमच्या मताला दुजोरा द्यायलाच मी वरचा पसारा मांडलाय.

आता एस डी, देव आलेत. तर त्यांची एक आठवण, जयदेव एस डी चे सहाय्यक. ते स्वतंत्र संगीत देऊ लागल्यावर नवकेतनचे चित्रपट या दोघांनी आलटून पालटून करायचे असं ठरलं. हम दोनो झाला. पुढे नवकेतनने करार पाळला नाही.

आरडीने मैत्री मुळे कि या अफवेमुळे याची कल्पना नाही, पण आराधना मधले रफीचे एक गाणे कापले, दुसरे गाणे किशोरच्या आवाजात गाऊन घेतले. >> इंटरेस्टिंग. त्यात पहिल्या राजेशला किशोर व दुसर्‍याला रफीचा आवाज आहे असे मला वाटायचे. पिक्चर फार पूर्वी पाहिलेला आहे. आता डिटेल्स लक्षात नाहीत.

किशोरचा एक अ‍ॅक्टर म्हणून अंगभूत विनोद फार धमाल होता. खूप गाणी भयानक मजेदार आहेत. पडोसन मधला रोल, ते मेरी प्यारी बिंदू किंवा बाँबे टू गोवा मधला कॅमिओ सगळे भारी होते Happy हे एक "कीर्तन" सुपर धमाल आहे Happy

माझ्या मते
"तुम बिन जाऊ कहां" हे प्यार का मौसम चे गाणे रफीने गायला नको होत. बिग मिस्टेक.

किशोरचा एक अ‍ॅक्टर म्हणून अंगभूत विनोद फार धमाल होता. >> अगदी. चलती क नाम गाडी मधे हम थे वो थे मधे त्याचे साधे चालणे सुद्धा किती लयीत आहे. क्या खयाल है आपका, दे दो मेरा पांच रूपैय्या बारा आणा मधे मधुबाला समोर असूनही किशोर ने धमाल केली आहे.

ह्या फुटपाथ वरून त्या पलीकडच्या फुटपाथवरून जाणाऱ्या मित्राला साद द्यायची असेल तर त्या साठी किशोरकुमारचा आवाज ठीक आहे.

फारेण्ड, किशोर कुमार प्रि १९६९ ए लिस्टर नव्हता या तुमच्या मताला दुजोरा द्यायलाच मी वरचा पसारा मांडलाय.>>> यस यस वाचली पोस्ट Happy बहुतांश सहमत. फक्त गाइड बद्दल वाचले की किशोर कोणत्यातरी दौर्‍यावर असल्याने काही गाणी रफीकडे गेली (संदर्भ - एक होता गोल्डी).

किशोरचा आवाज "किसी दूर खडे हुए आदमी को बुलाने की लिए ठीक है" म्हणणारा सज्जादच का:

माझ्या माहिती प्रमाणे हे म्हणणारा नौशाद.

:

< त्यात पहिल्या राजेशला किशोर व दुसर्‍याला रफीचा आवाज आहे असे मला वाटायचे. > दुसर्‍या राजेशला एकच गाणं आहे. बागों में बहार है (आज सोमवार है) पहिल्या राजेशचं एक गाणं - गुनगुना रहें हैं भंवरे रफीचं सोबत आशा.. बाकी किशोरची (मेरे सपनों की रानी, रूप तेरा मस्ताना, कोरा कागज था)

चित्रगुप्त आणि लता हे फार सुंदर कॉम्बो आहे. कारे कारे बादरा, दिल का दिया जला के गया, हाय तेरे चंचल नैनवा, दिल को लाख संभाला जी आणि अजून बरीच. मला लताचा आवाज सी रामचंद्र, मदन मोहन, आर डी आणि चित्रगुप्तच्या गाण्यात जास्त गोड वाटतो. चित्रगुप्त किशोरची पण खूप छान गाणी आहेत. मॅडम आणि सज्जादच कोई प्रेम का देके संदेसा, शमशादबाई, राजकुमारी आणि सज्जादच टूट गया हाय टुट गया, लता आणि सज्जादच काली काली रात रे दिल बडा सताये ही आवडती. शाम सुंदर- लता आणि शाम सुंदर -मॅडम हे कॉम्बो पण भारी आहे. खूपच मोठा आवाका आहे.

“ माझ्या माहिती प्रमाणे हे म्हणणारा नौशाद.” - सज्जदच तो. इतक्या प्रतिभाशाली संगीतकाराच्या आठवणी दोन - चार गाण्यांच्या उल्लेखानंतर त्याच्या फटकळपणाच्या किस्स्यांकडे वळतात - आणि ह्याला बहुतांशी त्याचे संगीतेतर वागणंच कारणीभूत आहे - हे दुर्दैवी आहे असं मला म्हणायचं होतं.

सज्जाद हुसैन, गुलाम महमूद, रामलाल यांची फारशी माहिती नाही. त्यातही तलत नही गलत महमूद असे म्हणणारा सज्जाद स्वभावामुळेच लक्षात राहिला. रामलाल म्हणजे व्ही शांताराम यांचा संगीतकार. ज्याच्यावर शेवटी पुन्हा लग्नात शहनाई वाजवण्याची वेळ आली.

Pages